सजारा सिंगापुरा: सर थॉमस स्टॅम्फर्ड रॅफल्स

Submitted by श्रद्धा on 24 August, 2015 - 09:28

आग्नेय आशियातला एक महत्त्वाचा देश... सिंगापूर! नुकताच ९ ऑगस्टला सिंगापुरानं स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव साजरा केला. त्यानिमित्तानं SG50 या नावानं पूर्ण वर्षभर सिंगापुरात विविध कार्यक्रम असणार आहेत.

सिंगापुराचा इतिहास प्रचंड रंजक आहे. चौदाव्या शतकात श्रीविजया साम्राज्याच्या आधिपत्याखाली असताना ते तमासेक नावाचं एक बेट होतं. श्रीविजया साम्राज्याचा एक राजपुत्र सांग निला उतमा याला तो तमासेक बेटावर आला असताना सिंह दिसल्याची व त्यावरून त्याने या बेटाचे नामकरण सिंहपूर-सिंगापुरा केल्याची कथाही प्रचलित आहे.[१] सिंगापूर हे तेव्हा महत्त्वाचं बंदर होतं. पुढे सयामातील मजापहित साम्राज्याने सिंगापूर जिंकून त्यावर राज्य केलं. पुढे मजापहितांनी स्थापलेल्या मलाक्का आणि पुढे जोहोर सल्तनतीचा ते भाग होतं. १५८७मध्ये पोर्तुगीजांनी सिंगापूर बेटावरील वसाहती उध्वस्त केल्या आणि सुमारे दोन शतकं सिंगापूर विस्मृतीत गेलं. १८१९मध्ये सर थॉमस स्टॅम्फर्ड रॅफल्सानं आधुनिक सिंगापुराची पायाभरणी केली.

या इतिहासावर आधारित एक तीन भागांची लेखमालिका माझ्या नवर्‍यानं (संकल्प द्रविडनं) लिहिली होती. ती इथं मायबोलीवर पुनर्प्रकाशित करत आहे.

***

सिंगापूर नॅशनल म्यूझियमाच्या इतिहास-दालनाच्या दरवाजातून आपण आत प्रवेशतो आणि चहूबाजूंस पसरलेल्या पडद्यांवर उमटणार्‍या सिंगापूरच्या प्रतिमा डोळे विस्फारून पाहत असताना 'सिंगापोर : अ डे इन लाइफ' रचनेचा धीरगंभीर कोरस आपल्या मनाचा ताबा घेतो. त्या मोहिनीतून बाहेर पडून वळणदार वाटेने तुम्ही मुख्य दालनात येता. आणि बघता बघता सिंगापूर तुमच्या मनःपटलावरून धूसर होऊ लागते. समोर उलगडत असते तमासेकाची कहाणी - सुमात्रा बेटावरच्या पालेंबांगाच्या राजपुत्राच्या नजरेस जिथे पहिल्यांदा सिंह दिसला ते हे. तमासेक. अर्थात सिंगापूर.

पूर्व-पश्चिम व उत्तर-दक्षिण रेल्वेमार्गांवरून अव्याहत धावणार्‍या एमाअरट्या सिटी हॉल स्टेशनात दररोज हजारो माणसे आणून पोचवतात. सिटी हॉल स्टेशनातून 'रॅफल्स सिटी' मॉलाचा एक्झिट घेऊन बाहेर पडावे. एका बाजूला 'स्विस्यॉटेल द स्टँफर्ड' दिमाखात उभे असते. तिथून पुढे नजर टाकल्यास वसाहतकालीन रुबाबदारपणा मिरवणारी रॅफल्स हॉटेलाची वास्तू दिसते. तुम्ही आताच ज्या मॉलातून आलात, तो मॉलदेखील रॅफल्साचे नाव अभिमानाने मिरवत असतो. तमासेकापासून सिंगापुरापर्यंतच्या या बेटाच्या वाटचालीवर ज्या व्यक्तीच्या कामगिरीचा खोल ठसा उमटला, तो सर थॉमस स्टँफर्ड रॅफल्स!

रॅफल्स सिटी! होय, हे रॅफल्साचे शहर आहे.

***

Raffles.jpg

यॉर्कटाउनच्या लढाईत माघार घ्यावी लागल्यामुळे अमेरिकी स्वातंत्र्ययुद्धात ब्रिटिश सत्तेला ज्या वर्षी शेवटचा निर्णायक हादरा बसला, त्या वर्षी - म्हणजे १७८१ साली - कॅरिबियन बेटांमधून इंग्लंडास परतणार्‍या एका इंग्लिश व्यापारी जहाजावरील कप्तान बेंजामिन रॅफल्स व त्याची पत्नी अ‍ॅन या दांपत्याच्या पोटी जहाजावरच थॉमस रॅफल्साचा जन्म झाला. बेंजामिन रॅफल्स थॉमसाच्या पोरवयातच निवर्तलामुळे कुटुंबाच्या जबाबदारीचे व कुटुंबावरील आर्थिक कर्जाचे ओझे त्याच्यावर येऊन पडले. शिक्षण अर्ध्यावर सोडून वयाच्या चौदाव्या वर्षी रॅफल्स ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या लंडनातील ऑफिसात कारकून म्हणून रुजू झाला. शिक्षण अर्ध्यावर राहिले, तरीही ज्ञानलालसा भागवण्यासाठी त्याने स्वाध्यायाची सवय अंगी बाणवली. त्याच्या बुद्धिमत्तेची व कामाचा झपाट्याची छाप कंपनीतील त्याच्या वरिष्ठावर व संचालकमंडळावरील सदस्य असलेल्या विल्यम रॅम्से याच्यावरही पडली. १८०५ साली ईस्ट इंडिया कंपनीच्या पेनांग ठाण्यावरील सहायक सचिवाच्या जागेसाठी विल्यम रॅम्से याने अनेक इच्छुक अधिकार्‍यांमधून चोवीस वर्षांच्या रॅफल्सालाच निवडले. या नेमणुकीमुळे नाराज झालेल्या मंडळींनी पाठीमागून अशी बोलवा पसरवली, की रॅफल्साला मिळालेली पेनांगची नेमणूक म्हणजे ऑलीविया फॅनकोर्ट नावाच्या, त्याच्याहून दहा वर्षांनी मोठ्या असणार्‍या व रॅम्से याने एव्हाना सोडलेल्या अंगवस्त्राशी लग्न करून घेण्याच्या बदल्यात लाभलेली बक्षिसी आहे!

त्यासुमारास पेनांग ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीसाठी व्यूहात्मक महत्त्वाचे स्थान बनू लागले होते. पूर्वेकडील व्यापारावर त्या वेळी डच ईस्ट इंडिया कंपनीची मोठ्या प्रमाणात पकड होती. ईस्ट इंडीज बेटांमधील, म्हणजे आजच्या इंडोनेशियन द्वीपसमूहातील, मसल्याचे जिन्नस, चिनी रेशीम, चहा इत्यादी जिनसांचा हा व्यापार मलाक्क्याच्या सामुद्रधुनीतून सागरी मार्गाने चाले. या परिसरातील मोक्याची ठिकाणे हेरून डच कंपनीने वसाहती व व्यापारी ठाणी स्थापायला सुरुवात केली होती, तर अन्य ठिकाणी तिने स्थानिक राजांशी करार करून व्यापारी एकाधिकार आपल्या हाती एकवटवण्याचे धोरण राबवले होते. ब्रिटिश व्यापाराच्या स्थैर्य व सुरक्षेच्या दृष्टीने मलाक्क्याच्या सामुद्रधुनीतील डच वर्चस्वाला शह देण्यासाठी पेनांगासारखे एखादे मोक्याचे ठाणे म्हणूनच महत्त्वाचे होते. १७९० सालाच्या सुमारास वसवलेल्या पेनांग ठाण्याचा कारभार चालवण्यासाठी त्याला प्रेसिडेन्सीचा दर्जा देण्यात आला होता. प्रशासकीय दृष्ट्या पेनांग प्रेसिडेन्सी ब्रिटिश कंपनीच्या
भारतातील वसाहतींमध्ये मोडत असल्यामुळे कोलकात्यातील कंपनीच्या गव्हर्नर जनरलाच्या अधिकारकक्षेत येई.

१८०५ साली सहा महिन्यांच्या प्रवासानंतर रॅफल्स पेनांगास येऊन पोचला. प्रवासादरम्यान त्याने बोलण्या-वाचण्याइतपत मलय भाषा आत्मसात केली. पेनांग प्रेसिडेन्सीत कार्यकुशलता व मलय भाषेचे ज्ञान यांच्या बळावर त्याने मुख्य सचिवपदावर बढती मिळवली. व्यापारी दृष्ट्या मोक्याचे असलेले पेनांग आरंभी जितके सोयीचे असेल असे वाटले होते, तितकेसे ते नाही, असे ब्रिटिशांना एव्हाना जाणवू लागले. ब्रिटिश बेटांपेक्षा खूप निराळ्या असलेल्या पेनांगच्या उष्णकटिबंधीय हवामानात मलेरिया, अतिसार व ज्वरासारख्या रोगराईमुळे कंपनीचे मनुष्यबळ खर्ची पडू लागले. १८०७ ते १८१९ या कालखंडात पेनांग प्रेसिडेन्सीचे पाच गव्हर्नर, तसेच इतर अनेक अधिकारी व त्यांचे कुटुंबीय दगावले. खुद्द रॅफल्सदेखील गंभीर प्रकृतिअस्वास्थ्यामुळे १८०७ साली हवापालटाखातर मलाक्क्यास आला. त्या सुमारास ब्रिटन-नेदरलंड आघाडी व नेपोलियनाच्या नेतृत्वाखालील फ्रान्स यांच्यात युरोपात व युरोपाबाहेरही युद्ध पेटले होते. फ्रेंचांनी नेदरलंड काबीज केल्यावर त्यांचा आशियातील संभाव्य विस्तार रोखण्यासाठी ब्रिटिशांनी ईस्ट इंडीज बेटांमधील डच ठाणी (पुष्कळदा डचांच्या छुप्या संमतीने) ताब्यात घेणे आरंभले. या योजनांचाच भाग म्हणून १७९५ साली ब्रिटिशांनी मलाक्का काबीज केले. मलाक्क्यावरील हा
ब्रिटिश अंमल १८१८ सालापर्यंत चालू होता. मलाक्क्यात आलेल्या रॅफल्साने मलाक्क्याचे व्यूहात्मक महत्त्व ओळखून कंपनीचे भारतातील तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड मिंटो यांना पूर्वेकडील व्यापाराच्या सुरक्षेसाठी कंपनीने मलाक्का कायमस्वरूपी आपल्याकडे ठेवावे, असे सुचवणारे व तत्संबंधित योजना मांडणारे पत्र लिहिले. गव्हर्नर जनरल मिंटोवर त्याच्या दूरदृष्टीची चांगली छाप उमटली. रॅफल्साचे मलय भाषेचे ज्ञान व त्याचे स्थानिक मलय राजांशी असलेले सौहार्दाचे संबंध लक्षात घेत मिंटोने फ्रेंचांच्या कब्जातून जावा घेण्याची मोहीम त्याच्यावरच सोपवली. त्याने आखलेल्या योजनेनुसार कंपनीच्या नौदलाने ऑगस्ट १८११ मध्ये जाकार्ता काबीज केले. या कामगिरीमुळे मिंटोने त्याच्यावर जाव्याच्या लेफ्टनंट गव्हर्नरपदाची धुराही सोपवली. रॅफल्साने जाव्यातील कारकिर्दीत गुलामांच्या व्यापारावर चाप लावला, डचांच्या जाचक पद्धती हटवून कृषिव्यवस्थापनात सुधारणा घडवल्या. त्याच्या प्रशासकीय सुधारणा दूरगामी फायद्याच्या असल्या, तरीही तूर्तास कंपनीला जाव्यातून अपेक्षित महसूल मिळत नव्हता. जाव्यातील तुटीची भरपाई कंपनीच्या भारतातील महसुलातून करावी लागत होती. खेरीज, युरोपातील युद्ध संपल्यावर जावा डचांना परत द्यावे लागेल, अशी कंपनीची व्यावहारिक अटकळ होती. गव्हर्नर जनरल मिंटोच्या निवृत्तीनंतर कोलकात्यातील कंपनी प्रशासनाची रॅफल्साच्या कारभाराबद्दलची नापसंती अधिक तीव्र झाली. दरम्यान जाव्यातील प्रशासकीय कार्यकाळात त्याच्या निर्णयांमुळे दुखावलेल्या मेजर जनरल रॉबर्ट गिलेस्पी नावाच्या सैनिकी अधिकार्‍याने त्याच्याविरुद्ध गैरकारभाराचा खटला भरला. या प्रतिकूलतेत आणखी भर म्हणजे १८१४ सालातील नोव्हेंबरात त्याच्या बायकोचे - ऑलीवियेचे - निधन झाले. एकाकी पडलेल्या रॅफल्साची प्रकृती खालावू लागली. मात्र याच काळात त्याने जाव्यातील वनस्पती, जैववैविध्य व इतिहासाच्या अध्ययनावर लक्ष एकवटवले. जाव्यातील स्थानिक राजांकडून त्याने त्या-त्या ठिकाणांच्या इतिहासाचे संकलन करवून घेतले. त्याच्याच प्रेरणेने व पुढाकाराने बोरोबुदूर येथील प्राचीन बौद्ध वास्तुसंकुलाचा शोध लागला.

त्याच वर्षी युरोपातही इतिहासाला कलाटणी देणार्‍या घटना घडल्या. एप्रिल १८१४ मध्ये नैपोलियनिक युद्धांमध्ये नेपोलियनाच्या फ्रेंच फौजा पराजित झाल्या. नेपोलियनविरोधक आघाडीतील ब्रिटन, ऑस्ट्रिया, रशिया इत्यादी जेत्या देशांनी युरोपीय सीमांची पुनर्मांडणी आरंभली. फ्रेंचांच्या वर्चस्वाखालून मुक्त झालेले हॉलंड व ब्रिटन यांदरम्यानदेखील १८१४ सालातील ऑगस्टात तह झाला. या तहानुसार ब्रिटिशांनी ईस्ट इंडीज बेटांमधील जाव्यासह सर्व वसाहती डचांना परत दिल्या. काही काळात गिलेस्पी खटल्याचा निवाडा जाहीर झाला. कंपनीने रॅफल्सावर थेट ठपका ठेवण्यात आला नसला, तरीही 'सदोष प्रशासकीय धोरणांवर' बोट ठेवत त्याची बदली सुमात्र्यातील बेंकुलू या छोट्या ठाण्याचा रेसिडेंट म्हणून केली. परिस्थितीच्या मार्‍याने, प्रकृतिअस्वास्थ्याने तब्येत व उमेद ढासळलेला रॅफल्स जाव्यातून परतला.

१८१६ च्या जुलैत रॅफल्स इंग्लंडास पोचला. त्याची तब्येत व उमेद सावरू लागली. या काळात त्याने संकलित केलेली माहिती अभ्यासून जाव्याच्या इतिहासावर 'हिस्टरी ऑफ जावा' नावाचा द्विखंडात्मक ग्रंथ लिहिला. या विद्वत्तापूर्ण ग्रंथाला प्रशंसा व मान्यताही लाभली. इतिहास, वनस्पतिशास्त्र इत्यादी विषयांतील कामगिरी लक्षात घेऊन त्याला प्रतिष्ठित रॉयल सोसायटीचे सदस्यत्वही बहाल करण्यात आले. पुढील वर्षी त्याला नाइटहूड व 'सर' हा किताब देऊन गौरवण्यात आले. दरम्यान त्याचा सोफिया हल नावाच्या स्त्रीशी परिचय होऊन दोघांचा विवाह झाला. आतापावेतो रॅफल्साच्या कामगिरीस उपेक्षिणार्‍या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने जाव्यातील त्याच्या कारभारावरचे सर्व आक्षेप मागे घेत त्याला बेंकुलूच्या लेफ्टनंट गव्हर्नरपदाची प्रवर्धित नेमणूक दिली.

१८१८ सालातील मार्चात रॅफल्स बेंकुलूत दाखल झाला. बेंकुलूतील कारभार हाती घेतल्यावर अल्पावधीतच त्याने सुमात्र्यातील डचांच्या वाढत्या प्रभावामुळे ब्रिटिश कंपनीपुढे उभे राहू घातलेले धोके ओळखले. ब्रिटन व अन्य युरोपीय देशांच्या मदतीने फ्रेंचांच्या तावडीतून सुटताच डच कंपनी ईस्ट इंडीज द्वीपसमूहात पुन्हा जोमाने विस्तारवादी पावले टाकू लागली होती. डचांच्या फोफावणार्‍या वर्चस्वाला शह देऊ शकणार्‍या व त्यासह व्यापारी दृष्ट्या किफायतशीर असणार्‍या ठिकाणांची उणीव ब्रिटिशांच्या ध्यानी येऊ लागली होती. पेनांग व बेंकुलू ही ठाणी मोक्याची होती खरी; पण फारशी किफायतशीर ठरू शकली नव्हती. जावा व सुमात्रा बेटांवरील प्रभावामुळे सुंद्याच्या सामुद्रधुनीवर व मलाक्क्यामुळे मलाक्क्याच्या सामुद्रधुनीवर डच कंपनीची पकड बळावत होती. बेंकुलूस जाण्यासाठी लंडन सोडण्याअगोदर रॅफल्साने या संदर्भात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीस एक अभ्यासपत्रिकाही सादर केली होती. तिच्यात त्याने मलय द्वीपकल्पाच्या दक्षिण टोकाकडील रियाउ द्वीपसमूहाची संभाव्य ठाण्यासाठी शिफारस केली होती. मात्र डचांसारख्या मित्रदेशाला दुखावणार्‍या कोणत्याही हालचाली करण्यास कंपनीच्या व राजकीय उच्चस्तरांतील धुरीण राजी नव्हते. कंपनीचा भारतातील तत्कालीन गव्हर्नर जनरल फ्रान्सिस रॉडन-हेस्टिंग्ज याने मात्र तिसर्‍या ब्रिटिश-मराठे युद्धात मराठेशाहीचा बीमोड केल्यावर उपखंडाबाहेरील या महत्त्वाच्या समस्येवर विचार करण्यास सुरुवात केली. त्याने रॅफल्साला कोलकात्यास बोलावून मलाक्क्याच्या सामुद्रधुनीतील विस्ताराबद्दल कल्पना मांडण्यास सांगितले. मलाक्क्याच्या सामुद्रधुनीच्या उत्तर-अंगास असणारे अचे व दक्षिण-अंगास असणारा रियाउ द्वीपसमूह या दोन जागांची चाचपणी करून तेथे डचांशी संघर्ष उद्भवू न देता ठाणे स्थापण्याचा प्रयत्न करण्यासाठी हेस्टिंग्जाने संमती दिली व रॅफल्सास या कामी राजकीय मध्यस्थ नेमले. रॅफल्साने या कामी मलाक्क्याचा निवृत्त रेसिडेंट विल्यम फार्कुहार यालाही पाचारले. फार्कुहार मलय द्वीपकल्पातील स्थानिक राजकारणात माहीतगार व अनुभवी होता. पेनांग प्रेसिडेन्सीचा गव्हर्नर जेम्स बॅनरमन याच्या सांगण्यावरून १८१८ च्या अखेरीस रियाउ द्वीपसमूहातील राजकीय परिस्थितीचा व रियाउ-डच संबंधाचा तपास काढण्यासाठी तेथे जाऊन आला होता. ३० डिसेंबर १८१८ रोजी रॅफल्स पेनांगास पोचला, तेव्हा नुकत्याच परतलेल्या फार्कुहाराने डचांनी रियाउच्या सुलतानाशी तह केल्याची खबर कळवली. डचांच्या वेगवान हालचाली ओळखून आपणही झटपट पावले उचलली पाहिजेत, हे रॅफल्साने ताडले. रॅफल्साला अचेची चाचपणी करण्यासाठी आदेश असल्यामुळे त्याने फार्कुहाराला दोन सर्वेक्षक जहाजे घेऊन कारिमून बेटे व त्याजवळील सिंगापुरा बेट या परिसराची पाहणी व सर्वेक्षण करण्यास सांगितले. १८ जानेवारी १८१९ रोजी फार्कुहाराने पेनांगाहून गलबते हाकारली. फार्कुहार निघताच गव्हर्नर बॅनरमनाने कोलकात्याहून रियाउतील घडामोडींवर प्रत्युत्तरादाखल पुढचे आदेश येईपर्यंत अचेची मोहीम स्थगित करावी, असे रॅफल्सास सांगितले. गव्हर्नर आपल्याला पेनांगातच अडवून ठेवू पाहत आहे, हे रॅफल्साच्या लक्षात आले आणि त्याने गव्हर्नराला न सांगताच दुसरा दिवस उजाडायच्या आत एका गलबतातून कारिमून बेटांच्या दिशेने पळ काढला. २६ जानेवारी १८१९ रोजी रॅफल्स कारिमून बेटांजवळ विल्यम फार्कुहाराच्या ताफ्याला येऊन मिळाला.

कारिमून बेटांचा परिसर खडकाळ असल्याने सर्वेक्षकांना अनुकूल वाटला नाही. परंतु ताफ्यातील 'डिस्कव्हरी' या सर्वेक्षक जहाजाचा कमांडर डॅनियल रॉस याने तिथूनच जवळ असलेला, जोहोराच्या दक्षिणेस सिंगापुरा नदीच्या मुखाकडचा परिसर अनुकूल वाटत असल्याची माहिती रॅफल्साला कळवली. २८ जानेवारीच्या सकाळी सर्व ताफा सिंगापूर नदीच्या मुखाच्या दिशेस वळला. तितक्यात जोहोराच्या तेमेंगोंगाकडून उत्साहवर्धक बातमी कळली, की जोहोरात अजूनपावेतो डच आले नाहीत. रॅफल्स आणि मंडळींसाठी ही पर्वणी होती. ३० जानेवारीस सिंगापुर्‍याच्या बेटावर रॅफल्स तेमेंगोंग अब्दुर रहमानास भेटला. तेमेंगोंगाने जोहोर सल्तनतीच्या वारसाहक्कावरून दोघा राजपुत्र भावांमध्ये उद्भवलेल्या वादाची हकीकत कथून आपला जावई राजा श्री सुलतान हुसेन माहमूद याची बाजू मांडली. ब्रिटिशांची यामुळे चांगलीच सोय झाली. रॅफल्साने प्राथमिक बोलणी करून राजाचा प्रतिनिधी म्हणून तेमेंगोंगास वार्षिक ३,००० स्पॅनिश डॉलर देऊन, त्याबदल्यात सिंगापुरा बेटावर वखार उभारण्याचे अधिकार मिळवले. प्राथमिक करारानंतर ब्रिटिशांनी परिसराची पाहणी केली. बेटावर गोड्या पाण्याचे मुबलक स्रोत होते आणि मुखाजवळील नदीचा भाग नैसर्गिक बंदरासाठी सुयोग्य होता. जागेची अनुकूलता ध्यानी येताच रॅफल्साने राजा श्री सुलतान हुसेन माहमूद यास जोहोराच्या गादीचा खरा वारस - सुलतान - मानून त्याच्याशी व्यापारी करार करण्याची तयारी दर्शवली. ६ फेब्रुवारी १८१९ रोजी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने सुलतान व तेमेंगोंगाशी समारंभपूर्वक व्यापारी करार केला. त्यानुसार सुलतान व तेमेंगोंग यांना प्रत्येकी ५,००० व ३,००० स्पॅनिश डॉलर वार्षिक रक्कम देऊन कंपनी सिंगापुर्‍याच्या बेटावर व्यापारी ठाणे स्थापू शकणार होती. या प्रसंगी स्थानिक मलय सरंजामदार, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी व शिपाई, सिंगापुराचे मूळ मलय व ओरांग लाउत रहिवासी व आसपासच्या परिसरामधून आलेले उत्सुक बघे लोक जमले होते. उपस्थित जनसमुदायाच्या सर्व भाषांत करार मोठ्याने वाचून दाखवण्यात आला. दोन्ही पक्षांनी करारावर सह्या करून शिक्कामोर्तब केले. तोफांची सलामी झडली; आणि सिंगापुराच्या वसाहतीची, आधुनिक सिंगापुराची मुहूर्तमेढ रोवली गेली.

आग्नेय आशियात आपले ठाणे पक्के करण्यासाठी ब्रिटिशांनी पुष्कळ खटपटी केल्या. पेनांग, मलाक्का, बेंकुलू, रियाउ असे अनेक पर्याय चाचपले. परंतु तो योग सिंगापुराच्याच भाळी लिहिला होता. आधी आणि नंतरही अनेक चढउतार अनुभवत आज आग्नेय आशियातील एक महत्त्वाचा देश म्हणून ख्याती पटकावलेल्या सिंगापुराच्या उत्कर्षाच्या पायाभरणीचे बरेचसे श्रेय जाते, ते त्याच माणसाकडे!

आज बोट कीपासच्या दिमाखदार, गगनचुंबी इमारती सिंगापुराची आकाशरेखा रोज झगमगवत असतात. कॅमेर्‍यांचे असंख्य फ्लॅश ते दृश्य साठवून घ्यायला सतत लखलखत असतात. देशोदेशीच्या लोकांची कायम ये-जा चालू असते. आणि मागे शांतपणे वाहणार्‍या सिंगापूर नदीच्या तीरावर ताठ मानेनं उभा दिसतो, थॉमस स्टॅंफर्ड रॅफल्स! होय, आजही हे त्याचं शहर आहे.

संदर्भ :

१. 'अ हिस्टरी ऑफ मॉडर्न सिंगापोर' (इंग्लिश); ले.: सी.एम. टर्नबुल; आ.: २००९; ISBN: 978-9971-69-343-5

२. 'रॅफल्स, स्टोरी ऑफ सिंगापोर' (इंग्लिश); ले.: रेमंड फ्लॉवर; आ.: १९९१; ISBN: 978-9812-04-257-6

३. रॅफल्साचे प्रताधिकारमुक्त चित्र विकिपीडियावरून साभार.

[१] सिंगापुरात वाघ बरेच असले तरी सिंह असल्याचा काही पुरावा नाही, त्यामुळे सांग निला उतमाने पाहिला तो वाघच, असा एक मतप्रवाह आहे.

- संकल्प द्रविड

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त माहिती आणि लेख.
पण शेवटच्या वाक्याशी सहमत नाही. Happy अर्थात तो एक मतप्रवाह झाला म्हणा!

सिंगापुरच्या इतिहासाविषयी मला इतकी माहिती पहिल्यांदाच कळली. त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. खूपच छान लेख. पुढचा भाग वाचायला उत्सुक आहे.

माहिती पर लेख,

पुढचा भाग लवकर येउ द्या. ली कॉन यु बद्दल पण वाचायला आवडेल. सिंगापुर घडवण्यात त्याचा पण बराच मोठा वाटा. आहे.