दोन छायाचित्रकार : 'केविन कार्टर' आणि 'निक युट'

Submitted by अमेय२८०८०७ on 22 August, 2015 - 03:57

दोन दिवसांपूर्वी फेसबुकवर एका परिचिताने ‘केविन कार्टर’ची आठवण काढली. हा दक्षिण आफ्रिकन छायाचित्रकार. अवघ्या ३३ वर्षांच्या अल्पायुष्याचा धनी. कलेसाठी त्याला छायाचित्रणातील ‘पुलित्झर पारितोषिक’ मिळाले पण अशा काही घटना घडल्या ज्यायोगे पुढचे जीवन जणू शापित ठरले, पारितोषिकाचा फारसा आनंद त्याच्या वाट्याला आला नाही.

केविन हा आफ्रिकेतील सुदानमधील अंतर्गत अराजक, वंशभेदाची रक्तरंजित लढाई आणि गृहकलहाचे चित्रीकरण करताना काढलेल्या एका छायाचित्रामुळे प्रकाशझोतात आला. भूक वेदनेने अंगातील त्राण संपल्यामुळे निवारा केंद्राकडे खुरडत सरपटत चाललेली एक लहान मुलगी आणि तिच्या मागावर असलेले गिधाड हा हृदयद्रावक प्रसंग त्याने कॅमेऱ्यात टिपला. 1993-94 साली न्यूयॉर्क टाईम्स आणि इतर जागतिक वर्तमानपत्रा - मासिकांत फोटो प्रसिद्ध झाला. पुढे यासाठीच पुलित्झरही मिळाले पण जगभरातून तीव्र टीकाही झाली. केवळ निरीक्षक म्हणून गेलेल्या आणि रोगराई इ. च्या भीतीने आफ्रिकन लोकांना प्रत्यक्ष स्पर्शाची भीती असणाऱ्या केविनच्या मानसिकतेवर परखड प्रतिसाद उमटले. त्या मुलीचे पुढे काय झाले? तिला मदत मिळाली की नाही, आणि मुख्य म्हणजे छायाचित्र काढून झाल्यावर केविनने काय केले? असे प्रश्न विचारले गेले. यांची उत्तरे दुर्दैवाने त्याच्याकडे नव्हती कारण तो तिथे विमानातून काही तासांसाठीच गेला होता. संयुक्त राष्ट्रांचे ते विमान स्थानिकांना मदत पोचवून तातडीने निघाले त्यामुळे आपण काढलेल्या फोटोतील मुलीचे पुढे काय झाले याबद्दल त्याला सुतराम कल्पना नव्हती.

या जगभरातील पडसादांचा केविनच्या मनावर निश्चितच परिणाम झाला असणार कारण त्यानंतर तो निराशेच्या आहारी गेला, उपलब्ध माहितीनुसार व्यसनाधीनही झाला आणि शेवटी त्याने वयाच्या 33 व्या वर्षी आपल्याच मोटारीचा एक्झॉस्ट केबिनमध्ये जोडून विषारी वायू भरून घेत आत्महत्या केली.

हे वाचून आणखी एक जागतिक स्तरावर खळबळ उडवणारे छायाचित्र आठवले. केविनच्या आधी सुमारे २१ वर्षे म्हणजे १९७२ साली ‘निक युट’ व्हिएतनाम लढाईचे चित्रीकरण करत होता. एका गावावर अमेरिंकेची मदत असलेल्या दक्षिणी विएतनामीज वायुसेनेचा नापाम बॉम्बहल्ला झाला. जळते मिश्रण सर्व पेटवू लागले आणि ९ वर्षांची ‘किम’ नावाची मुलगी आपले जळते कपडे काढून टाकत निकच्या कॅमेऱ्याकडे पळू लागली. तिची दोन भावंडे आधीच मृत्युमुखी पडली होती. फोटो काढून झाला पण निक तेवढ्यावर थांबला नाही, त्याने किम आणि बरोबर आणखी अनेक लोकांना सायगांवमधल्या रुग्णालयात दाखल केले. अत्यवस्थ किम जवळजवळ दीड वर्षे रुग्णालयात राहिली. पुढे किमचे आयुष्य फार बदलले, अनेक वैयक्तिक आणि राजकीय नाट्यातून अखेर तिला कॅनडात आश्रय लाभला आणि ती स्वतःची एक संस्था स्थापून विविध मदतकार्य करू लागली.

निकच्याही फोटोवर जगभरात चर्चा झाली. त्यालाही पुलित्झर देऊन गौरवले गेले. मात्र अतिशय विचलित करणारे छायाचित्र असूनही केविनच्या वाट्याला दोन दशकांनी जी परखड टीका आली, तसे काही निकच्या बाबतीत झाले नाही. उत्तरोत्तर त्याची कला आणखी समर्थ होत गेली आणि त्याला उदंड कीर्ती-सन्मान मिळाले.

केविन काय, निक काय किंवा अशी धोक्याच्या ठिकाणी मुलुखगिरी करणारे इतर कलंदर छायाचित्रकार काय, ठरवून असे फारसे काही करत नसतात. समोर दिसणारे प्रसंग कॅमेऱ्यात टिपताना त्याचा पुढे कसा परिणाम होईल ह्याचा फारसा विचार मनी नसतोच. एका अत्यंत त्रयस्थ पातळीवर विचार केला तर दोघेही आपले कर्तव्य कला तितक्याच निष्ठेने जोपासत होते पण कलाकारानेही आधी माणूस असायला हवे. ती माणुसकी दर्शविण्यात जाणते- अजाणतेपणे केविन कुठेतरी कमी पडला आणि त्याच्या सद्सद्विवेकबुद्धीला लागलेल्या टोचणीची किंमत जिवाचे मोल देऊन चुकती करावी लागली. निक युट व्हिएतनामीज म्हणजे स्थानिकच होता, केविन हा मात्र सुदानच्या अत्यंत विरुद्ध वातावरणातून म्हणजे दक्षिण आफ्रिकेच्या संपन्न वातावरणातून आला होता, याने सहवेदनेत (empathy) काही फरक पडला असेल का? सांगता येत नाही.

सुरक्षित चाकोरीबद्ध जीवन जगणाऱ्या आपणा सर्वांना हे सर्व कल्पनातीत आहे. जिथे आयुष्याच्या प्रत्येक पळाचा भरवसा नाही अशा जागी चाललेले संहाराचे मानवनिर्मित थैमान, जीवनाची कवडीकिंमत आणि नैतिक-अनैतिकाच्या धूसर सीमारेषा यांची कितीही सहभावना असली तरी पुरेशी जाणीव होऊ शकत नाही, असे काही वाचले की आपण बर्‍याच सुखात आहोत याचे अपराधी समाधानही उमटते तरीही असे काही वाचून दुखाय-खुपायचे राहत नाही हेही तितकेच खरे.
---------------------------------------------------------------------------------------------------------

या विषयावर नेटवर बरीच माहिती अर्थातच उपलब्ध आहे. थोडक्यात माहितीसाठी खालील लिंक्स उपयुक्त ठराव्यात. चर्चिलेली छायाचित्रही तिथे आहेत. अस्वस्थ-विचलित करणारी वाटू शकतात, नव्हे आहेतच.

https://en.wikipedia.org/wiki/Phan_Thi_Kim_Phuc (‘निक युट’ आणि ‘किम’बद्दल)

https://en.m.wikipedia.org/wiki/Kevin_Carter (‘केविन कार्टर’बद्दल)

--------------------------------------------------------------------------------------------------------

निक युटने छायाचित्र काढलेल्या ‘किम’वर ‘अरुण कोलटकरां’च्या “भिजकी वही”मध्ये तीन उत्कृष्ट कवितांचे एक स्वतंत्र प्रकरण आहे.

केविनच्या फोटोवरून माझ्या अल्पमतीला सुचलेले काही खाली देत आहे:-

"सल"

गात्रात तिच्या त्राण मुळी ना उरले
भूक-व्यथेशी झुंजत जीवन हरले
विझली दृष्टी ठाव कशाचा घेते
प्राक्तन पाठीवर शाप विषारी देते

कलह सभोती मानव, मानव नुरला
भेद-घृणेच्या सीमांसाठी लढला
यातुन कोणा काय मिळाले दानी
अगणित प्रेते सडती कुजती रानी

क्रूर गिधाडे टपली घेण्या घास
अंता आता मुक्तपणाने हास
मिरवत मृत्यू रक्तपताका भाळी
सावज गोळा करतो मारत हाळी

घोर अमानुषतेचा विकल उसासा
दूर कहाणी घडते हाच दिलासा !
ना जळते...ना झडते अपुले काही
पाहुन असले सल का बोचत राही ?

-- अमेय

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माहितीपूर्ण लेख. केविनबद्दल वाचलं होतं, निकविषयी आत्ताच कळलं.

कवितेला सुंदर तरी कसं म्हणणार, विषण्ण करून टाकते अगदी..

<<कलह सभोती मानव, मानव नुरला
भेद-घृणेच्या सीमांसाठी लढला >> यातंच आलं सर्व काही..

लेख माहितीपूर्ण ..बापरे झाल काढलेले फोटो बघताना.. विशेषतः केविन कार्टर ने काढलेला.. सुन्न..
काय लिहु कळत नाही आहे..
कवितेला छान म्हणु ? कस म्हणु ?

अमेय....नेमके कोणत्या कारणास्तव वा कोणत्या प्रसंगाच्या घडणीमुळे तुम्हाला या दोन छायाचित्रांची तसेच तो क्षण टिपणार्‍या छायाचित्रकारांची आठवण व्हावी याचा मी अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. जरी ठोस उत्तर वा दृश्य नजरेसमोर आले नाही तरी दोन्ही छायाचित्रकारांच्या या फोटोंमुळे त्या त्या वेळी जवळपास जगातील सर्वच राष्ट्रात उमटलेल्या तीव्र आणि धक्कादायक प्रतिक्रिया एका पाठोपाठ आठवत गेल्या. एकही वर्तमानपत्र, साप्ताहिक, मासिक असे नसेल की जिथे केविन आणि निक संदर्भात काहीना काही छापून आले नसेल. ते उपाशी मरू घातलेले बालक, जगातील सर्वच काही नाशाचे प्रतीक बनलेले ते गिधाड, ती नापाम हल्ल्याचे भाजके व्रण अंगावर घेऊन भयाण धावणारी पोरगी, काळवंडलेले आकाश....या सर्वांवर कसल्याही भाष्याची बिलकुल गरज नव्हती, छायाचित्रेच इतकी बोलकी की ती पाहताना हृदय कंपीत होऊन उठली होती....आजही होतात. मानवानेच निर्माण केलेली ती स्थिती दर पावलागणिक ठेचा देत राहिली आहे. तेजाने दुनिया उजळून निघते पण इथे मात्र फुटलेल्या तेजाने सारी दुनिया काळवंडून गेल्याचे दिसले. चित्रे पाहाणार्‍यांचे हृदय विदिर्णे झाले तर ते फोटो घेणार्‍या केविनचे सारे विश्वच जळून खाक झाले....जगात दारिद्र्य आणि उपासमारीची इतकी शोचनीय अवस्था असू शकते याची साक्ष त्याने स्वतःच्या डोळ्याने पाहिली आणि सार्‍या चांगुलपणावरील त्याचा विश्वास शून्यावर आला आणि करून घेतला त्याने जीवनाचा शेवट.

तुमच्या कवितेतील...

"...मिरवत मृत्यू रक्तपताका भाळी
सावज गोळा करतो मारत हाळी...."

ह्या ओळी मला फार भिडल्या....रक्तपताका भाळी घेऊनच याच पृथ्वीवर कुठेतरी कुणीतरी आजही दिवस कंठीत आहे आणि त्याच्या मरण्याची वाट पाहाणारी गिधाडे अधाशीपणे नजर लावून बसली आहेत, हे चित्र अंगावर शहारे उभे करणारे आहे.

"मिरवत मृत्यू रक्तपताका भाळी
सावज गोळा करतो मारत हाळी"

बापरे ... शहारा आला अंगावर! मृत्यू नाहीतर त्याचे अनेक दलाल ...

खूपच डिस्टर्बिंग आहेत पण जळजळीत वास्तव्य दाखवत आहेत छायाचित्रं!!

कार्टर बद्दल केंव्हातरी नेट वर वाचलं होतं.. निक बद्दल आताच समजलं.

खरं म्हणालास ,'असे काही वाचले की आपण बर्‍याच सुखात आहोत याचे अपराधी समाधानही उमटते तरीही असे काही वाचून दुखाय-खुपायचे राहत नाही हेही तितकेच खरे.

तुला सुचलेल्या ओळीतूनही हेच सत्य डोकावतंय

खूप वाईट वाटले वाचून.. त्या घटनाही आणि फोटोग्राफरची आत्महत्याही..
आत्महत्या केली यातच त्याची संवेद्नशीलता दिसून येते.
याउलट आपल्याकडचे कैक रिपोर्टर माणसाच्या आत्महत्येचे, आत्मदहनाचे फोटोशूट सहज घेतात त्यांना कितीही हिणवले तरी त्यांना फरक पडत नाही.

असो, बाकी त्या फोटोंना नक्की काय कोणत्या निकषावर अ‍ॅवार्ड देतात हे समजले नाही.

फोटोज पूर्वी पाहिलेले आहेत, त्यांची पार्श्वभूमी माहिती होती, पण छायाचित्रकारांबद्दल तुझ्यामुळे समजलं.
फोटोज विषण्ण करतात, तुझी कविताही तोच अनुभव देते. भयंकर प्रभावी झालेली आहे रचना.

वाटलेली अस्वस्थता समजून-जाणून-विभागून घेतल्याबद्दल सर्व प्रतिसाददात्यांचे धन्यवाद.

ते दोन्ही फोटो मी बघितले होते. अजूनही डोळ्यासमोरून जात नाहीत. केविन बद्दल वाचले होते.
निक बाबत मात्र इथेच माहिती मिळाली.

सुदान बाबत दारफूर नावाचा एक चित्रपट बघितला होता.. तो चित्रपट आहे, प्रत्यक्ष घटनांचे चित्रण नाही, हे माहीत असूनही प्रचंड अस्वस्थ झालो होतो. टियर्स ऑफ गाझा तर प्रत्यक्ष घटनांचेच चित्रण आहे, तोही अनुभव भयानक आहे.

होय दिनेशदा, 'दारफूर' फिल्ममधील हिंसाचित्रणाबद्दल ऐकले आहे.
हॉटेल रवांडा आणि ब्लड डायमंड बघतानाही श्वास कोंडतो.
भयंकर प्रकार पाहिलेत या खंडाने. सोमालिया, कॉंगो, नाइजेरिया, सुदान...
मध्ये coltan वर एक डॉक्यूमेंट्री पाहिली, तीही अशीच हादरवणारी.

अमेय ,कदाचित केविनने फोटो काढल्यानंतर असही काही पाहिले असेल ज्या भयानक क्षणाची त्याला कुणाकडे वाच्यता करू कि नको या द्वंद्वात शेवटी आत्महत्येचा पर्याय स्विकारला असेल. .लेखन खुप अस्वस्थ करणारे आहे कविता मनाची घालमेल पुरेपूर व्यक्त करते.

भुईकमळ....

~ या संदर्भातील अधिकृत माहिती तुम्हाला देणे मी ठीक समजतो. सुदान आणि तेथील भयावह वाटणारी स्थिती टिपण्यासाठी तो न्यू यॉर्क टाईम्सचा अधिकृत प्रतिनिधी होता. घडत असलेल्या घडामोडींचे त्याने (आणि इतरही अनेक होतेच) फोटो काढणे हा त्याच्या नोकरीचा एक भागच होतो. ती मुलगी उपाशीपोटी आणि शारीरिक व्याधीने मरायला टेकली होती त्यात तिच्या मरण्याची वाट पाहात टपून बसलेले ते गिधाड....असा फोटो त्याच्या कॅमे-याने टिपला आणि त्याशिवायही अनेक असे फोटो (एकतर याच्याही पेक्षा भयानक...अंगावर सर्रदिशी काटा उभा करणारे होते...ज्याचा मी उल्लेखही करू इच्छित नाही...तुमच्यासारखी हळवी स्त्री तर झीट येऊन पडेल तो फोटो पाहिल्यावर) त्याने टाईम्सकडे पाठविले. मार्च १९९३ मध्ये हा फोटो अंकात प्रसिद्ध झाल्यावर सार्‍या बाजूंनी केविन कार्टरवर टीकेचे मोहोळ फुटले. म्हणजे त्याने फोटोग्राफर म्हणून नव्हे तर माणूस म्हणून प्रथम त्या मुलीला वाचविण्याचा प्रयत्न करायला हवा होता....(त्या मुलीचे पुढे काय झाले ? याचे उत्तर अगदी कार्टरकडेही नव्हते...अशा अनेक होत्या), माणुसकी दाखवायला हवी होती. सुदानमध्ये पत्रकारांना कोणत्याही व्यक्तीला स्पर्श करू नये अशा त्यांच्या संघटनेने सक्त सूचना केल्या होत्या....कारण त्या काळातील प्रत्येक सुदानी व्यक्तीला स्पर्श करणे म्हणजे रोगाला जवळ केल्यासारखे झाले होते...असे संघटनेचे मत. त्यातून कदाचित कार्टरने फोटो काढल्यावर तिथून जाणे गरजेचे मानले असेल. एक मत असेही व्यक्त केले गेले की त्या मुलीची आई अन्य तीनचार मुलांना घेऊन बाजूलाच अन्न शोधत होती....खरे खोटे देव जाणे.

पुढे याच फोटोला पुलित्झर पारितोषिक जाहीर झाले जे कार्टरने स्वीकारले...त्यावरूनही पुन्हा त्याच्या विरोधात वादळ उठले...नाकारायला हवे होते म्हणून....या सर्वात त्याला नैराश्येने गाठले, कामही होईना त्याच्याकडून... शेवटे त्याच अवस्थेत...अगदी भणंग अवस्था म्हटली तरी चालेल...त्याने आत्महत्येचा पर्याय आपलासा केला.

अशोकजी ,सर्व संदर्भ एकदम नजरेच्या टप्यात आणलेत तुम्ही ..ती घटना, संघटनेचे मत. ,त्यानन्तरचा काळ केविनची आत्महत्या सगळा विस्तृत पट लेखनात कौशल्याने मांडलात.आजच्या जगात्त काही ठिकाणी अन्न, वस्त्र ,निवारा यासारख्या मुलभूत गोष्टींसाठी वंचित अशा समाजाचा या सर्व अभावांतून जगण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे तर एकीकडे या यंत्रयुगाने आलेली सर्व सुबत्ता उपभोगणारा एक असंवेदनाशील असा वर्ग आहे. जो आत्मरत आहे स्वत:चेच सेल्फी काढ ण्यात मग्न आहे. एखादी भयंकर विचित्र घटना घडताना प्रत्यक्षदर्शीना तो प्रसंग कॅमेरात टिपायचा असतो. मदत नंतरची गोष्ट झालीय फक्त काहीजण अपवाद असतील. इतकी संवेदनहीनता , मुल्यहीनता फोफावलेल्या समाजाचेच आपणही एक भाग आहोत याचा खेद वाटतो कधी कधी ...