चूक

Submitted by अभिजित चोथे on 22 August, 2015 - 02:13

घामाने डबडबलेला चेहरा खिश्यातील रुमालाने पुसून राम रावांनी समीरने दिलेला पाण्याचा तांब्या घटा घटा पोटात रिता केला. डोक्यावरची टोपी शेजारील टेबलावर ठेवुन प्रवासाने थकलेले शरिर कॉटवर टेकले. समीर शेजारिल खुर्चीवर बसला होता . शैला किचनच्या दरवाज्यात चौकटीला टेकून उभी होती. तिची नजर जमिनीवरून हलत न्हवती. नजर वर करायची हिम्मत तूर्तास तरी तिच्यात न्हवती.

शैला राम रावांची एकुलती एक मुलगी त्यामुळे लहानपणापासून तिला त्यांनी अगदी लाडात वाढवली .
घराची स्थिती चांगली असल्याने कशाचीही कमी न्हवती. शैला दिसायला सुंदर तर होतीच पण देवाने विलक्षण बुद्धीची देणगीही तिला दिली होती त्यामुळे शाळेत ती जर वर्षी पहिल्या क्रमांकाने पास व्हायची,पण १० वि च्या परीक्षेत बोर्डात येउन तिने राम रावांची खर्या अर्थाने मान गर्वाने ताठ केली. त्यावेळी रामराव आणि त्यांची पत्नी खूपच आनंदी झाले. त्यांच्यासाठी आकाश हि ठेंगणे झाले होते.
त्यांना मुलगा नसल्याची खंत कधीच जाणवत न्हवती . सगळे गाव तिचे कौतुक करत होते.
या आपल्या हुशार मुलीच्या शिक्षणात कदापि खंड पडू द्यायचा नाही असे त्यांनी ठरवले.त्यासाठी एकुलत्या एक मुलीला त्यांनी काळजावर दगड ठेवून तालुक्याला पाठवलं. गावातील लोक मुलीला जास्तीत जास्त १० वी शिकवायचे परंतु रामरावांनी मुलीला जास्त शिकवायचे ठरवले.

१२ वीला सुध्दा शैलाने अपेक्षित यश मिळविले पण त्याचवेळी तिचा कल एमपीएससी परिक्षेकडे वाढल्याने तिने वेगळा मार्ग निवडत परिक्षेच्या तयारीच्या उद्देशाने आर्ट मध्ये प्रवेश घेतला. शिक्षणाच्या बाबतीत तिला पुर्ण स्वातंञ्य होत.
रामरावांचा स्वभाव जेवढा प्रेमळ तेवढाच तापटही होता त्यामुळे शैलाला आपल्या वडिलांची थोडी भितीही असायची.
ती कॉलेजात शेवटच्या वर्षात असताना समीर हा नविन मुलगा त्यांच्या वर्गात आला. तोही एमपीएससी ची तयारी करत असल्याने अभ्यासाच्या उद्देशाने दोघांची मैञी जमली. या दरम्यान दोघांची जरा जास्तच जवळीक झाली आणि मैञीचे प्रेमात कधी रुपांतर झाले हे दोघांना कळलेच नाही.
मागील महिन्यापासुन शैलाने घरी फोन करायचे कमी केले. फोन केला तरी पहिल्यासारखी ती बोलत नव्हती. रामराव व त्याच्या पत्नीच्या लक्षात ही गोष्ट आली पण ती विचारल्यावर 'काही नाही'असे म्हणुन वेळ टाळायची. अभ्यासाचा ताण असेल असे समजुन रामरावांनी त्याकडे दुर्लक्ष केले. प्रत्येक रविवारी शैला घरी यायची पण गेले दोन रविवार ती घरी न आल्याने माञ दोघांची चिंता वाढली.
शैलाच्या घराशेजारचा महेशही तिच्या कॉलेजात होता. चार दिवसापुर्वी तो तिच्या घरी आला आणि दबकत दबकत रामरावांना त्याने जे काही सांगीतले ते एेकुन त्यांच्या पायाखालती जमिनच सरकली.
आकाश कोसळल्याचे वाटू लागले. रामरावांच्या डोळ्यात अश्रू तरळले. घराबाहेरही दोघा पती पत्नीला जाऊ वाटेनासे झाले. आठवडाभर दोघांनी घरात कोंडून घेतले. दोन दिवसातच ही बातमी गावभर झाली होती. पूर्ण गावात ते चर्चेचा विषय झाले होते.शेवटी मोठ्या धीराने ते आज तालुक्याला शैलाकडे आले होते.
रामारावांपुढे समीर आणि शैला दोघे होते. घरात जीवघेणी शांतता होती. एकमेकांच्या श्वाशाखेरीज कशाचीही जाणीव त्यांना होत न्हवती.

"पोरांनो ! अस का केले तुम्ही?" शांतता चीरणाऱ्या रामरावांच्या त्या आवाजाने दोघांच्या अंगावरून सर्कारून काटा निघून गेला.
राम्रावांचे डोळे पाण्याने डबडबलेले होते. शैलाने मान वर करून ते पाणावलेले डोळे पहिले तेव्हा तिला गहिवरून आले.
कसातरी धीर करत आपल्या ओलावलेल्या आवाजात फक्त " बाबा" एव्हढंच ती बोलू शकली .
बराच वेळ शांततेत गेल्यावर समीर म्हणाला.
" बाबा! आमच्याकडे कोणताच पर्याय न्हवता ".
हे शब्द कानी पडताच रामरावांनी गरकन समीरकडे मान फिरवली आणि म्हणाले.
" पर्याय नव्हता! प्रत्तेक परिस्थितीला अनेक पर्याय असतात पण क्षणभाराच्या फायद्यासाठी बाकीच्या पर्यायांकडे दुर्लक्ष केले तर ते पर्याय कधीच नजरेस पडत नाहीत."
रामरावांच्या बोलण्यातला कडकपणा त्याला जाणवल्याने पुढे बोलायची त्याची हिम्मत होत नव्हती.
आवाजात मृदुपणा आणत रामरावांनी पुढे बोलायला सुरुवात केली.
" पोरी , बापान तुज्यावर आयुष्यभर विश्वास टाकला, तुज्या प्रत्येक संकटात तुज्या मागे उभा राहिला,तुज हर हट्ट पुरविला. मग माज्यावर विश्वास टाकायची तुझी वेळ आल्यावर तू का माझ्यावर वि श्वास टाकला नाहीस?"
" बाबा ! तेवढी हिम्मतच होत न्हवती." शैला मान खाली घालूनच बोलली.
वातावरण पाहून आता समीर ने बोलायला सुरुवात केली.
" बाबा! तुम्हीच सांगा एखाद्या वडिलांना आपल्या मुलीने कोणाशी लग्न करावे असे वाटते?
चांगले घरदार असणाऱ्या , सुशिक्षित, तिची काळजी घेणाऱ्या मुलाबरोबरच ना ! मग मी याच्यात कुठे कमी आहे सांगा . घरची परिस्थिती चांगली आहे, माज्या घरात शैला पसंत आहे. मी तिची जीवापाड काळजी घेईन. तुम्ही फक्त नाराज होऊ नका. तुमच्या कडक स्वभावामुळे शैलाला तुम्हाला सांगायची भीती वाटत होती."
एका दमात समीर बोलून गेला.
" समीर राव माझा राग तुमच्या दोघांवर नाही पण तुम्ही हे ज्या पद्धतीने केले त्यावर आहे. आम्ही खेड्यातील लोक आमच्या परंपरा ,रीतीरिवाज यावर आमचा भरोसा.जे काय झाले ते रीतीरीवाजाने झाले असते तर बर झाले असते.शैला बद्दल मला एवढंच दुख वाटतंय कि माझ प्रेम तिला कळले नाही.
आमचे गाव शिक्षणाच्या बाबतीत मागासच म्हणावे लागेल. शैला बोर्डात येणारी पंचक्रोशीतील पहिली मुलगी . तिच्या हुशार पणामुळे आणि सुस्वभावामुळे गावात ती कौतुकाचा विषय होती.मुलीला १० वि च्या वर शिक्षणाला न पाठवणारी माणसे शैलाला पाहून आपला विचार बदलू पाहत होती. पण आता ते शक्य नाही . आहे तेच बरे असंच ते म्हणणार." रामराव गहिवरून बोलत होते.
" गावात प्रतिष्ठा असल्याने लोक तोंडावर काही बोलत नाहीत,पण त्याच्या नजरा शब्दापेक्षाही विषारी झाल्यात.ज्या डोळ्यात शैलाबद्दल कौतुक होते त्याच डोळ्यात आता तिच्याबद्दलचा अविश्वास दिसायला लागलाय." समीर आणि शैलाला खूप वाईट वाटत होत कारण रामरावांच्या अश्रूंचा बांध केव्हाच फुटला होता. आयुष्यभर प्रत्येक संकटात कणखरपणे वागणाऱ्या आपल्या बाबांना रडताना पाहून शैलालाही रडू कोसळले.
रामरावांनी डोळे पुसून पुढे बोलायला सुरुवात केली.
" तुम्ही मुले चार pustake वाचली कि लगेच स्वतंत्र व्हायची, स्वतंत्र निर्णय घ्यायची बंडखोरीची भाषा का बोलत हेच मला कळत नाही .तुम्ही स्वताचे निर्णय स्वतः घ्या पण ते अगोदर मोठ्यांना एकदा सांगा तरी.जग बदलतंय तसं आमचेही विचार थोडेफार का होईनात बदलतायत ना .एकाद्या निर्णया नंतर होणार्या परिणामांचा विचार जर तुम्ही करत नसाल तर त्याचा काय उपयोग. तुम्ही गुपचूप लग्न केलेत. तुम्ही सुखानं राहालाही पण त्याचा आमच्यावर काय परिणाम होईल याचा जराही विचार केला नाही.आज चार चौंघात जाताना आम्हा पतीपत्नीला विचार करावा लागतो . तुम्ही लग्न केलात याच दुख मला कधीच नसणार आहे दुख याचाच राहील कि तुम्ही ते पळून जाऊन केलात.हीच तुमची माझ्या लेखी सर्वात मोठी चूक आहे."
रामराव एकदम शांत झाले. शेजारी ठेवली होती ती पिशवी त्यांनी घेतली आणि ते मान खाली घालून निघाले.
" बाबा आजच्या दिवस थांबला असता!" समीर म्हणाला.
रामरावांनी हातानेच नको म्हणून इशारा केला.
दोघेजण रामरावांच्या पाया पडले.
" सुखी राहा! दोघेजण गावी या ग्रामदेवतेचे दर्शनही! होईल आणि गाठीभेटीही होतील." दोघांनी मान डोलावली.
" पोरानो! नवीन आयुष्य सुरु केलाय तुम्ही. निर्णय घ्या पण घाई गडबडीत नका घेत जाऊ.घाई प्रत्येकवेळी उपयोगाची नसते." रामराव बोलले.
त्यांनी नंतर शैलाकडे पहिले." पोरी ! बापावर विश्वास दाखवायला पाहिजे होतास तू."
एवढे बोलून रामराव घराबाहेर पडले.
शैलाला आज एक हतबल आणि निराश बाप दिसत होता जो आयुष्यभर ताठ मानेने जगाला होता.तो हतबल पणा त्याच्या चालाण्यातूनही दिसत होता.त्याच्या जाणार्या पाठमोरी आकृतीकडे दोघेजण पाणावलेल्या डोळ्यांनी पाहत होते. दोघांनाही लक्षात आले होते कि आपला निर्णय आपणास कितीही योग्य वाटत असला तरी तो कैकपटीने चुकीचा होता .

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तं. खूप आवडली कथा. प्रेमवीवाह किंवा घरच्यांच्या मर्जीवीरूद्ध लग्न करणे यामधे आईवडिलांना व्हिलन बनविण्याचा स्टेरीयोटाइप या कथेत नसल्यामुळे कथा छान रेफ्रेशिंग झालीय.

कथा आवडली.
न सांगता, प्रेम विवाह केल्याने,रामरावांची होणारी अवस्था पाहून वाईट वाटते.
पद्मावती +१

Thanks