a home is where the heart is

Submitted by नानबा on 22 August, 2015 - 00:28

मी भारतात येऊन जवळपास दोन वर्षे झाली, म्हणून माझा अनुभव शेअर करतेय.
प्रत्येकाच्या स्वभावानुसार, बाहेर काढलेल्या वर्षांनुसार - प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असू शकेल हे गृहीत धरून हा माझा व्यक्तिगत अनुभव लिहितेय.

अमेरिकेनं मला खूप काही दिलं, अनेक गोष्टींची जाणीव करून दिली (उदा. माझे हक्क, आपल्या हक्कांसाठी आवाज उठवणं म्हणजे आगाऊपणा नव्हे हा दिलासा, इतर अनेक गोष्टी), माझ्यातली सहिष्णूता वाढवली (इतर विचार प्रवाह, संस्कृती ह्यांना अ‍ॅक्सेप्ट करणं), अनेक अनुभव दिले. एकंदरीत तिथला अनुभव सुखावह होता.
अमेरिकेतून परत येताना, अनेकांनी (प्रेमाने आणि त्यांच्या अनुभवानुसार) इथे न येण्याविषयी/परत न जाण्याविषयी सुचवलेलं. भारतात गेल्यावर पश्चाताप झालेल्या आणि प्रयत्न करूनही परत न येऊ शकलेल्या लोकांच्या कथा आम्ही ऐकलेल्या. निदान ग्रीनकार्ड तरी करून जा, असही अनेकांनी कळकळीनं सांगितलेलें (आस्थेपोटी).
आम्ही ग्रीनकार्ड साठी अ‍ॅप्लायही केलं नाही - कारण आम्हाला परत यायचं होतं असं सुरुवातीपासून वाटत होतं. (आणि हे होईतो, ते होईतो ह्यात अडकायचं नव्हतं).
एच१ वर एक वर्ष राहिल्यावर मात्र जरा सटपटायला झालेलं. (परत येण्यापूर्वी) ग्रीनकार्ड अ‍ॅप्लाय करण्याचा शेवटचा चान्स सोडून वेडेपणा करतोय का असं वाटायला लागलेलं. ग्रीनकार्ड करावं असा अल्मोस्ट विचार करून कंपनीत तशी सूत्र हलवायलाही सुरुवात केलेली, पण मग जाणवलं की आपण असं करत इथेच राहिलो (ग्रीन कार्ड, मग सिटिझनशिप वगैरे) - तर सतत 'गेलो असतो तर' असं वाटत रहाणार, कारण डीप डाऊन परत यावं, असंच दोघांनाही वाटतय.
अजून विझा वर काही काळ शिल्लक होता, मग ठरवलं, एक वर्ष भारतात परत जाऊन तर बघू, अगदीच वाटलं तर परत येता येईलच (कदाचित ह्यावेळेस त्रास पडेल, खटपटी/लटपटी कराव्या लागतील, कदाचित एखादे वेळेस वाटूनही येण्याची संधी मिळणार नाही). पण येऊन बघावच कारण आयुष्यभर 'गेलो असतो तर' घेऊन, 'पुढ्च्या वर्षी जाऊ' असा विचार करत बसणं त्रासदायक होईल.

इथे आल्यावर जवळपास ८ महिने मी रजेवरच होते, त्यामुळे घरच्यांबरोबर, माझ्या मुलीबरोबरचा वेळ, मदतीला कामवाल्या बायका आणि ट्रॅफिक वगैरे गोष्टींना फारसं तोंड न द्यायला लागणं - ह्यामुळे हा काळ आनंदात गेला.

काही निगेटिव अनुभवः
१. इन्टरनेट प्रोव्हायडर (यु टेली) ह्यानी ह्या काळात वात आणलेला
२. मी आधी रहायचे तिथे लाईटही अनेकदा जायचे. मी MSEB ला ह्या काळात खूप कॉल्स करून तक्रारी केल्यात. पण बर्‍यापैकी वैताग व्हायचा
३. जवळच एक कार्यालय होतं, रात्री अपरात्री फटाके उडवणार्‍या लोकांमुळे, मोठ्यांदा स्पीकर लावणार्‍या लोकांमुळे प्रचंड चिडचिड व्हायची.
४. इथे आल्यापासून मुलीच्या कमी असलेल्या वजनाचे आणी तब्येतीचे (डे केअर मधे सतत कोणी ना कोणी आजारी असतं, मग इतर पोरही आजारी पडतात - त्यात आमची लेक वरचा नंबर लावून असते) इशुज फेस करतोय, पण ते अमेरिकेत झाले असते का नाही ह्याची कल्पना नाही.
५. डॉक्टरांच्या कन्स्ल्टिंगच्या पद्धतीतली फरक, इतर ठिकाणी ग्राहकाला मिळणारी ट्रीटमेंट अशा काही गोष्टींवरून आम्ही असमाधानी होतो.

ह्यातल्या १,२,३ आणि ५ ह्या गोष्टी आम्ही काही प्रमाणात सॉल्व करू शकलो (घर इतर कारणांनी बदलंलं, इन्टरनेट प्रोव्हाईडर बदलला वगैरे)

हे वगळता फायदे खूप दिसले:
१. घरच्यांचा सहवास - मुलांना आजी आजोबा, मावशी काका, ताया आणि इतर अनेक नातेवाईक खूप मॅटर करतात. लेक खूप खूष असते ह्या गोष्टीमुळे. अनेक लोकांच्या सहवासामुळे तिला विविध ढंगी व्यक्तिमत्व, त्यांच्या विचार पद्धती, वागण्याच्या पद्धती, अनेक प्रकारचे खेळ, गोष्टी सांगण्याच्या पद्धती - ह्यांना आपोआप एक्स्पोजर मिळतं. मुख्य म्हणजे आई वडीलांव्यतिरिक्त खूपजणांचं प्रेम अनुभवायला मिळतं.
२. नातेसंबंधात सहजता असल्यानं भेटणं, एकत्र येणं ह्या सगळ्यात सहजता असते. ठरवून मैत्र्या करायची गरज पडत नाही. २-३ नातेवाईक फारच जवळ आहेत, त्यांना कधीही न ठरवताही भेटणं होतं ( आम्ही ते एन्जॉय करतो)
३. सोसायटीत खाली, फ्लोअर वर अनेक मुलं खेळत असतात. सतत २४ तास मुलांना एन्टर्टेन करावं लागत नाही. फ्लोअर वरतीच लेकीच्या वयाचा अजून एक मुलगा आहे, दोघ कधीही प्लॅन्ड प्लेडेट शिवाय दिवसातून असंख्य वेळा एकमेकांच्या घरी असतात, खेळतात. त्याशिवाय अनेक मोठ्या मुलीही खेळताना ह्या दोन पिल्यांना सामावून घेतात.
४. सण-उत्सव - चांगल्याप्रकारे साजरे होतात. गणपती/नवरात्रात स्पीकर चा त्रास ही होतो. दिवाळीत शक्य झालं तर लांब शांत ठिकाणी जायचा विचार आहे. पण हे वगळता अनेक सणात मजा येते.
५. नातेवाईकांच्या प्रॉब्लेम ला आपण आणि आपल्या प्रॉब्लेम्सना ते धावत येतात. (शॉर्ट नोटिसवरही)
६. आईवडील आणि भावंडाम्च्या जवळ असणं म्हणजे सूख असतं (आमच्याकरता). आमच्या कुटुंबातल्या एका ज्ये.नांना एक म्हातारपणाशी निगडीत आजार डिटेक्ट झाला. डिटेक्शन, इनिशियल अ‍ॅक्सेप्टन्स ह्या सगळ्या गोष्टींकरता, तसंच इतर ज्येनांच्या मोठ्या आजारपणात आम्ही त्यांच्या बरोबर असू शकलो. तिथे बसून टेंशन आणि गिल्ट ह्या दोन गोष्टींचा फार त्रास झाला असता. इथे असल्यानं त्यांना आणि आम्हालाही फार आधार झाला.
७. अ‍ॅज अ सोसायटी अनेक अनॅक्सेप्टेबल गोष्टींबरोबर असंख्य चांगल्या गोष्टीही घडताना दिसल्या.
तिथे असताना रेप ही गोष्ट जाता येता घडते असं वाटायचं - पण इथे आल्यावर तसं काही नाहिये, हे जाणवलं. सतत दहशतीत रहावं अशी अवस्था नाहिये (काही घडतच नाही असं नाही, पण ते मिडिया दाखवते तितक्या % वरही घडत नाही, असा आतापर्यंतचा अनुभव. हा अनुभव न बदलो ही परमेश्वर चरणी प्रार्थना.).
८. कामवाल्या बाया: हे दुधारी अस्त्र आहे.. मदतही होते, मधेमधे डोक्याला व्यापही होतो. पण त्यांच्या मदतीनं (आणि घरातल्या इतर लोकांच्या मदतीनं) मी माझ्या मुलीबरोबर भरपूर वेळ घालवू शकते. स्वतःसाठी वेळ काढू शकते.
९. वर्क लाईफ बॅलन्सः काही काळाचे अपवाद वगळता, मी माझ्या मुलीबरोबर भरपूर वेळ घालवू शकलेली आहे. थँक्स टू माय ऑर्गनायझेशन (आणि पीपल आय वर्क विथ) - त्यांनी मला आधी सबॅटिकल, मग फुल टाईम आणि पुन्हा गरज पडल्यावर पार्ट टाईम अशा सगळ्यात सपोर्ट केलय.
१०. जगण्यातली सहजता: सोसायटीत फिट होण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. लहानपणापासून इथेच वाढल्यानं एक सहजता आहे. इतर अनेक गोष्टीत सहज मिसळून जाता येत असल्यानं, काही गोष्टीत 'आय डोंट केअर' म्हणणं सोपं जातं.
११. जगण्यातलं श्रेयस, प्रेयस शोधण्याचा प्रयत्न (नोकरी, घराव्यतिरिक्त) आल्यापासून सुरु आहे. अनेक संधी आहेत. पहिला प्रयोग पूर्णपणे यशस्वी झाला नाही, पण त्यातून अनुभव, स्वतःला समजून घेण्याची संधी मिळाली.
सध्याही काहीतरी सुरु आहे, त्यावर वेळ मिळाला तर वेगळं लिहिन.

येण्यापूर्वीच्या आणि आल्यानंतरच्या काळात जाणवलं की आपल्याला खरं काय हवय हे कुठेतरी आत जाणवत असतं, ते ओळखून डिसिजन घेतला तर आलेल्या छोट्यामोठ्या गैरसोयींचा त्रास होत नाही. आपल्या आतल्या वाटण्याला टाळून आपण निर्णय घेतला तर कुठेतरी आत ते खदखदत रहातं. (डिसिजन रहाण्याचा असो वा जाण्याचा असो!).

गेल्या दोन वर्षाच्या अनुभवावरून तरी - इथे परत येणं, हा आमच्याकरता योग्य निर्णय होता. आमच्या आनंदाचं पारडं जड आहे. शेवटी 'A home is where the heart is' हेच खरं!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारच मस्त लिहिलंयस नानबा.

कोणत्याही निर्णयानंतर फायद्याची बाजू जड असली तर तो निर्णय योग्य ठरतो. तसा तुझ्या बाबतीत घडलं हे वाचून छान वाटलं.

फार छान लिहिलंयस. प्रांजळ.
आवडलं.

सुरूवातीच्या परिच्छेदांमधे परत यावं जावं, इथे/तिथे यामधे थोडसं कन्फ्युजन होतंय ते जरा बघशील का?

खूप छान लेख. मुख्य म्हणजे इथे किंवा तिथे दोन्हीकडचे फायदे आणि तोटे खूप संतुलीतपणे तुम्ही मांडले ते आवडले.

बापरे तू काहीतरी वेगळीचं विचारवंत आणि ईमोशनल-ईन्टेलीजन्स असलेली मुलगी आहे. खूप प्रांजळ आणि भावनेनी ओतप्रोत लिहिलेलं आहे. फार आवडलं. तुझं लेखन, तुझे आचार विचार, तुझ्यातील एक वेगळी व्यक्ती मला नेहमीच भावते. कीप ईट अप!!!

गळ्या अपुला गाव बरा - हे वाक्य बहुतेक खूप जणांना लागू पडत. मला देखील इथे येऊन दोन दशक झालीत आणि मनोमन मी परत अकोल्याला जाईन व तिथेच सेटल होईल असे मला वाटत राहते.

Itz all about attitude
तुमचा दृष्टिकोन आवडला, नाहीतर महिनाभर तिकडे जाउन आलेले देखील भारताला शिव्या देताना बरेच बघितलेत

खूप छान लेख. मुख्य म्हणजे इथे किंवा तिथे दोन्हीकडचे फायदे आणि तोटे खूप संतुलीतपणे तुम्ही मांडले ते आवडले. >>>>>> +१००००

नानबा, खूप छान आणि प्रांजळ मनोगत वाचताना मस्त वाटलं!
मी नुकतीच भारतात परतोनी आले आहे त्यामुळे खूप रिलेट होता येतंय. मी सध्या तरी खूपच खुश आहे! मला जसं जगायला आवडतं त्याच्या बऱ्याच जवळ जाणारं आयुष्य सध्या जगते आहे! आपल्या आतल्या आवाजाला ऐकून त्याप्रमाणे वागण्याचं समाधान सगळ्यात मोठं असतं आणि ते असेल तर बाकीच्या अनेक गोष्टी तितक्याश्या खुपत नाहीत.
निर्णय घेतेवेळी जरी आतून कितीही बरोबर वाटत असला तरी हा निर्णय घेणं सोपं नव्हतं. मात्र त्याचवेळी सगळं विचारमंथन करून झाल्यावर हा निर्णय कायम केल्याने एक आत्मविश्वास निर्माण झाला की हा निर्णय योग्य आहे त्यामुळे आपण तो निभावून नेवू. फक्त भावनिक होऊन घेतलेला हा निर्णय नाही.

I found two TED talks (with seemingly polar views) very helpful in making this decision.
One is how to make hard choices (https://www.ted.com/talks/ruth_chang_how_to_make_hard_choices)
and the other is the psychology of your future self (https://www.ted.com/talks/dan_gilbert_you_are_always_changing)

In the end I realized that I had to give myself lots of justifications/reasons for staying in the US but when I thought of coming back to India I did not have any questions in my mind so there was no need of reasons/justifications. As if it was the most natural thing to be.

माझ्या परतीच्या विमान प्रवासात मी इतकी शांत होते की माझं मलाच आश्चर्य वाटलं..no excitement, happiness, anxiety, sadness nothing! The only thing I could feel was being at peace.
इथे परत आल्यावर एकदाही का परत आलो असा प्रश्न पडलेला नाही. I happily remember the time spent in USA but I don't really miss it much!
इथे राहून काही काळ लोटला की मग काहीतरी लिहिता येईल मलाही.

'A home is where the heart is' हेच खरं! >> +१ तू लिहिले पण खूप चांगले आहेस.

no excitement, happiness, anxiety, sadness nothing! The only thing I could feel was being at peace.. >> वॉव जिज्ञासा. रिस्पेक्ट ! आय मिन, आय नो व्हाट गोज इन दॅट फ्लाईट ! बिन देअर.

हा निर्णयच असा असतो की दुसर्‍याचे असं झालं, आपले काय होईल? असे म्हणून फायदा नाही. स्वतः त्यातून गेल्याशिवाय कळत नाही. इटस ऑल अबाउट "आपल्याला काय वाटतं?" कुठंही राहिलं (अमेरिका किंवा भारत) तसा फरक पडत नाही. जर यावे वाटत असेल तर एकदा चान्स घेऊन बघावा. म्हणजे मग समजा परत तिकडे गेलेच तर पुढच्या आयुष्यात, अरे यार मलाही भारतात जायचे होते, ही रुखरुख राहणार नाही.

नानबा खुपच चांगला लेख

बी प्रमाणे मला पण दोन दशके बाहेर झाली आहेत ( त्यातिल पहिली १५ वर्ष बी च्याच देशात होतो) आता अमेरिकेत ग्रीनकार्ड अ‍ॅप्लाय न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे अम्हाला देखिल २ वर्षात परत जावे लागणार असे दिसत आहे .

तुमच्या लेखात फायदे जास्त आहेत आणि तोटे खुप कमी आहेत. आणि माझासाठी तुम्ही दिलेले सगळे फायदे तर आहेतच पण तोटे नाहीतच. दोन दशके बाहेर राहुन पण आमचे फॅमिली , दाताचे, डोळ्याचे डॉक्टर् भारतात आहेत.
बाहेरच्या देशात फक्त emergency साठी डॉक्टर कडे जातो आणि अजुनही त्याबद्दल आम्ही तेवढे समाधानी नाही. emergency मध्ये पण भारतातिल डॉक्ट्रशी फोन वर किंवा whatsapp वर सल्ले घेतच असतो पण prescription drug साठी स्थानिक डॉक्टर कडे जावे लागते.
ग्राहक सेवे बद्दल म्हणाल तर आम्हाला तर पुण्याची सेवा आवडते. सिंगापुर मध्ये सुध्धा आम्ही पेशवाई नावाच्या चितळेची मिठाई विकणार्या दुकानात ( जिथे पुल नी लिहल्याप्रमाणे दुकानातील सर्वात निरुपयोगी प्राणी म्हणजे ग्राहक आहे) महिन्यातुन एकदा गेल्याशिवाय चैन पडत नसे. बायको जर तुळशीबागेत खरेदी करायला मिळणार असेल तर ती सगळ्या गोष्टीवर (३० days return policy, good service) पाणि सोडायला तयार आहे.
आम्ही तसे टेक सॅवी नाही त्यामुळे दिवसातुन तास भर नेट मिळातरी काही प्रोब्लेम नसतो. अर्धा तास सायबर कॅफे मिळाले तरी काम भागते.हल्ली बरेच कॅफे बंद झाले आहेत पण आमच्या घराच्या खालचा कॅफे ह्या जुलै मघ्ये पण चालु होता
देवाच्या क्रुपेने मुल हेल्थी आहेत आणि परदेशात राहुन सुध्धा रस्त्यावरचे वडापाव, रेल्वे स्टेशनवरचे पाणि पण हॅडल करु शकतात.

आम्हाला एकच प्रोबलेम वाटत आहे,.
भारतात मुलाचे उच्च शिक्षण आणि त्यासाठी जिवघेणी स्पर्धा ही एक मेव सम्स्या आहे. IIT, regional engineering colleges , डॉक्टर ह्यासाठी success rate २% पेक्षा कमी आहे. ( ratio between admission vs appeared for entrance test) तर अमेरिकेत डॉक्टर साठी success rate ४२% आहे. मुलगा तर आता रांगेला लागला, भारतात परतल्यावर मुलीचे काय होईल हीच चिंता आहे. मुलाच्या वेळी ११वीत भारतात ५ महिने राहुन भारतातील entrance test च्या तयारीचा प्रयत्न केला होता पण त्याला कुठे चांगल्या ठिकाणी admission मिळेल असे वाटले नाही म्हणुन त्याला अमेरिकेत आणले.

Kedar+1000! Been there....
Nanaba, baryach veLa agadi agadi jhale vaachatanna. Chhan lihile ahes.

>>>छान लिहिलयंस आणि प्लस वन वगैरे?<<<

हे काय प्रतिसाद आहेत?

एका प्रचंड महत्त्वाच्या विषयावरील स्वानुभुतीतून आलेले भाष्य आहे हे!

भारताची अख्खी संस्कृती, संस्कार, कुटुंबव्यवस्था, सोशिकता ह्या सगळ्यांचा धावता आढावा आहे हा.

जिज्ञासा आणि साहिल शहांनी प्रतिसाद देताना मन ओतल्यासारखे वाटले.

छान अनुभव!

ज्यांची भारतात जन्मभूमी आणि कर्मभूमी एक असेल तर त्यांना परतीचा निर्णय घ्यायला शक्यतो जास्त विचार करावा लागत नाही पण बाकीच्यांना करावा लागतो कारण आईवडिल/ नातलगांना भेटायला तेवढाच वेळ लागतो पण भारतात तो ट्रेनच्या प्रवासात जातो आणि परदेशात तो विमान प्रवासात जातो.. परदेशात एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी स्थलांतर करणं सोप्प आहे भारतात ते कटकटीचे आणि खर्चिक आहे.. खूप काळ परदेशी राहिल्यानंतर भारतात मोठ्या शहरात घर विकत घेऊ राहणं फायदेशीर पडत नाही..

धाग्याला निवडक १० मध्ये घेतोय. हे कोणालातरी वाचायला द्यायला आवडेल. तसेच यावर मतेही जाणून घ्यायला आवडतील. काही जणांनी प्रतिसादांमध्ये दिली आहेतच.
आपल्या लेखात फायदे ज्या प्रकारे भरभरून लिहिले आहेत त्यावरून आपण घेतलेल्या निर्णयावर आपण समाधानीच नाही तर खुश आहात असे दिसत आहे. आणि तेच धाग्याच्या शीर्षकातही रिफ्लेक्ट होतेय.

प्रामाणिकपणे सांगायचे तर कोणी आपल्या देशात परतून खुश आहे याचा एक भारतीय म्हणून आनंदही वाटतोय. Happy

एक प्रश्न विचारावासा वाटतो - आपण किंवा आपल्यासारखाच परतीचा अनुभव असलेल्या सर्वांनाच.
परतीचा निर्णय आपल्याला फायदेशीर वाटत असतानाच, उगाच परदेशात गेलो किंवा आयुष्यातील तो काळ उगाच दुसर्‍या देशात वाया घालवला असे वाटते का?
की तो देखील आयुष्याने दिलेला एक चांगला अनुभव वाटतो, जो थोडक्यात घेण्यातच मजा आणि त्यानंतर आपले घर ते आपलेच घर असे काहीसे.
की आणखी काही?

>>प्रत्येकाच्या स्वभावानुसार, बाहेर काढलेल्या वर्षांनुसार - प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असू शकेल हे गृहीत धरून हा माझा व्यक्तिगत अनुभव लिहितेय.<<

हे लिहिलत ते बाकी बरं केलत, नाहितर लोकं अमेरीका वा भारत द्वेष वगैरे विशेषणे लावून मोकळे होतील. Wink

बाकी, छान लिहिलय. तो तुमचा अनुभव आहे हे खरे असले तरी काहीं अनुभव(चांगले अनुभव जे लिह्लेत त्यातलेच).
आम्हालाही आले आम्ही मूव केल्यावर. मुलं हिच एक मोठी चिंता होती.आहे असं मूव केल्यावर, अमही दोघही. जिथे जाउ तिकडचे अश्या स्वभावाने असल्याने.. काही विशेष त्रास नाही झाला.

>>>प्रामाणिकपणे सांगायचे तर कोणी आपल्या देशात परतून खुश आहे याचा एक भारतीय म्हणून आनंदही वाटतोय. <<<

मस्त

छान लिहीलय. तुम्हाला आणि जिज्ञासा तुम्हाला ही इथले वास्तव्य भविष्यात ही सुखदायी होवो हीच शुभेच्छा !

वरती राजू७६ यांनी एक वेगळी बाजू मांडली आहे जी अनेकदा दुर्लक्षित असते. आई वडील कामाच्या ठिकाणाहून लाम्ब असणे, पुण्या मुंबईत घर नसणे वगैरे बाबी परत एण्याच्या निर्णयास इंफ्लुएंस करतात

Pages