मसान: एक आधुनिक शोकात्मिका

Submitted by ए ए वाघमारे on 17 August, 2015 - 22:38

मसान: एक आधुनिक शोकात्मिका
masaan2.jpg

‘मसान’ या अनुराग कश्यप स्कूलमधून निघालेल्या नव्या चित्रपटाचं आंतरराष्ट्रीय नाव आहे ‘फ्लाय अवे सोलो’. आणि हेच शीर्षक अधिक समर्पक आहे असं ‘मसान’ बघितल्यावर वाटलं. मसान नावावरून या चित्रपटात काहीतरी स्मशानासंबंधी, भुताखेताचं , अतर्क्य, गूढ कथानक असेल असा समज होण्याची शक्यता आहे. पण ही कहाणी तशी नाही. ती एकाच वेळी समाजातील वर्गघर्षणाची (संघर्ष हा शब्द जरा कठोर होईल) आणि पात्रांच्या वैयक्तिक संघर्षाचीही आहे.

जेव्हा मी चित्रपटाचं कथानक म्हणतो, तेव्हा प्रत्यक्षात पडद्यावर मात्र एकाच वेळी दोन कथानकं घडत असतात. एक आहे ते म्हणजे बनारससारख्या प्रातिनिधिक भारतीय शहरात एका निम्न मध्यमवर्गीय ब्राह्मण घरात आपल्या वडीलांसोबत (संजय मिश्रा) राहणार्‍या देवी पाठक (रिचा चड्ढा) या तरूण मुलीचं. आणि दुसरं आहे ते याच बनारसच्या घाटावर राहणार्‍या डोंब समाजातल्या दीपक चौधरी ( विकी कौशल) या सिविल इंजिनियरींग शिकणार्‍या तरूणाचं. हिंदू समाजाच्या उतरंडीत सर्वांत उंचावर आणि सर्वांत तळाशी समजल्या जाणार्‍या या ‘तरूण भारता’चा आपापल्या आयुष्याशी चाललेला संघर्ष ‘मसान’ अतिशय संवेदनशीलतेने आपल्याला दाखवतो.

प्रथम देवी पाठकची गोष्ट आपल्यापुढे उलगडायला सुरूवात होते. आपल्या प्रियकरासोबत एका नाजूक क्षणी , नको त्या अवस्थेत पोलिसांच्या हाती सापडल्यावर या धक्क्याने तिच्या प्रियकराचा झालेला मृत्यू; त्यातच भ्रष्ट पोलिस अधिकार्‍यांकडून त्यांचा ‘तो’ व्हीडीओ ‘व्हायरल’ करण्याची धमकी देऊन करण्यात येणारी आर्थिक पिळवणूक; परिस्थितिने आधीच गांजलेल्या बापाशी होणारी सततची चिडचिड, कटकट; छोट्या शहरातील कोत्या मनोवृत्तीने आणलेला उबग आणि या सगळ्या गुंताड्यातून पाय मोकळा करून घेऊन सुटका करून घेण्याची, ‘फ्लाय अवे’ करण्याची देवीची धडपड इत्यादी रिचा चढ्ढा ही गुणी अभिनेत्री दिग्दर्शक नीरज घेवनच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत परिणामकारकतेने आपल्यासमोर सादर करते. आणि त्याला माध्यम ठरते ते अविनाश अरूण (‘किल्ला’चा दिग्दर्शक) याचे अप्रतिम कॅमेराकाम. दिग्दर्शकाने रिचाच्या चेहर्‍यावर मुळातच असलेल्या एक नैसर्गिक अ-सुंदरतेचा, नॉन-गुडी अशा थोडयाश्या ‘आगाऊ’ लूकचा चतुर वापर करून घेतलेला आहे. संजय मिश्रा याने साकारलेला एक सर्वसामान्य ,पापभीरू , कुटुंबवत्सल बाप लक्षात राहतो. अत्यंत गुंतागुंतीची, अनेक छटांची आणि बदलत्या मनोवृत्तीची ही भूमिका समर्थरित्या साकारून संजय मिश्राने अभिनयाचं एक अजून शिखर सर केलं आहे.

अविनाशचाच कॅमेरा आपल्याला दीपकची दुसरी गोष्टही दाखवतो. स्मशानातला परंपरागत व्यवसाय सोडण्याची मनोमन इच्छा असलेला दीपक विकी कौशलने अगदी नैसर्गिकपणे उभा केला आहे. व्यवसायाने डोंब असला , अशिक्षित असला तरी मुलाच्या आकांक्षा जाणणारा दीपकचा ‘पुरोगामी’ पिता विनीत कुमार या कसलेल्या नटाने मोठ्या ताकदीने साकारला आहे. त्यानंतर मग अमोल पालेकरांच्या मध्यमवर्गपटातल्या प्रेमकथांची आठवण करून देणारी दीपक व शालू गुप्ता( श्वेता त्रिपाठी) यांची ठराविक वळणं घेत जाणारी उत्फुल्ल, रोमॅण्टीक प्रेमकहाणी हळुहळू प्रेक्षकाचा ताबा घेऊ लागते. दुसरीकडे समांतर चाललेल्या देवी आणि तिच्या गोष्टीतला तणाव हलका करण्यास दीपक- शालूची प्रेमकथा मदत करते.

शालूचा तथाकथित उच्चवर्णीयपणा आणि दीपकचा तथाकथित मागासवर्गीयपणा या दोघांच्या प्रेमाआड येतो का अशी धाकधूक आपल्याला वाटत राहते. कारण अशा प्रकरणात खराखुरा समाज आणि सिनेमातला समाज कसा वागतो हे आपण अनेकवेळा पडद्यावर आणि पडदयाबाहेरही अनुभवलेलं असतं. चित्रपटातील पात्रांबद्दल अशी भावना होणं हीच चित्रपटाच्या यशाची पावती आहे. त्यामानाने देवीच्या कथेतील ‘पुढे काय?’ हा फॅक्टर तितकासा परिणामकारित्या उतरलेला नाही. तरीही इतकी बांधेसूद, संवेदनशील पटकथा लिहिल्याबद्दल लेखक- पटकथाकार आणि ती तेवढ्याच तीव्रतेने आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी संकलक- दिग्दर्शक निश्चितच अभिनंदनास पात्र आहेत.

समांतर चालणार्‍या एकापेक्षा अधिक कथानकप्रवाह असलेल्या चित्रपटाचं संकलन हे आव्हानात्मक आणि जोखमीचं काम आहे आणि ते नितीन बैद याने पेललं आहे. असली समांतर कथानक पडद्यावर दाखवताना समतोल सांभाळणं ही खरोखरंच तारेवरची कसरत असते. लंबक कुठल्याही एकाच बाजूला वाजवीपेक्षा जास्त वेळ झुकलेला राहिला तर चित्रपट अयशस्वी होऊ शकतो.

तसं पाहिलं तर हे भारतात कुठेही घडू शकणारं कथानक. परंतु बनारसच निवडण्यामागे इतर काही कारण असावीत असं वाटतं. लेखक- दिग्दर्शकाचा त्यांच्या ‘अप ब्रिंगिंग’च्या दृष्टीने असलेला एक ‘कम्फर्ट झोन’ हे एक कारण असतंच. हा काही कमीपणा नसून एक क्रिएटीव्ह आणि प्रॅक्टिकल सोय असते. उदा. यूपीत वाढलेल्या दिग्दर्शकाला महाराष्ट्रातील ग्रामीण भागातली गोष्ट सांगणारा वास्तववादी चित्रपट बनवणे कठीणच जाणार. दुसरी गोष्ट म्हणजे मसान हा भारत आणि फ्रान्स यांची संयुक्त निर्मिती आहे आणि त्याचा मुख्य संभाव्य प्रेक्षकही जागतिक, स्थानिक बुद्धिजीवी आणि फिल्म फेस्टीव्हलला जाणारा अशा प्रकारचा असावा. जागतिक स्तरावर मार्केटींग करताना भारतीय सिनेमाला स्थानिक परंपरा, संस्कृती, गरिबी, सामाजिक भेद वगैरे दाखवणं फायदेशीर ठरतं. त्यामुळे बनारस, गंगा, साधू, गंगेचे घाट, तिथे चालणारं अंतिम क्रियाकर्म वगैरे दाखवलं की तिहेरी फायदा होतो; एक म्हणजे जागतिक स्तरावर मार्केटिंग करायची सोय तर होतेच. दुसरं म्हणजे थोडी आध्यात्मिकता, तत्वज्ञानाची फोडणीही देता येते आणि तिसरं म्हणजे जाताजाता भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवल्यामुळे संस्कृतीप्रेमींकडून स्तुती मिळण्याची शक्यता राहते. अर्थात हा आक्षेप नसून एक निरीक्षण आहे. असो.

कथेत मुळातच अंगभूत नाट्य असलं तरी अतिरंजितता, मेलोड्रामा टाळून आधुनिक आणि समकालीन भारताचं इतकं नेमकं चित्रण इतक्याततरी कुठल्या चित्रपटात पाहिल्याचं स्मरत नाही. सामाजिक प्रश्न याआधी हिंदी चित्रपटात दाखवले गेले नाही असं नाही. पण हिंदी सिनेमात असणारी नेहमीची मेलोड्रॅमेटीक हाताळणी, स्मशान आणि तदअनुषंगिक बाबी दाखवताना येऊ शकणारा बीभत्सपणा टाळला आहे. आणि मुख्य म्हणजे सरसकटीकरण टाळलं आहे. आपलं आंतरजातीय प्रेमप्रकरण , त्याचे नेमके संभाव्य परिणाम माहीत असलेला आणि त्यामुळे व्यथित असलेला, निराश झालेला हळवा नायक बरेच दिवसांनी मोठ्या पडद्याने पाहिला आहे. नाहीतर मुख्यधारेतल्या हिंदी सिनेमातल्या नायकाचा हळवेपणा बाप-मुलगी, आई-मुलगा आणि प्रेयसीविरह याच्यापुढे कधी गेला नाही. तीच गोष्ट स्त्रीव्यक्तिरेखांची.

स्वत:च्या अटींवर जगू इच्छिणारी आधुनिक स्त्री (देवी), तिची महत्वाकांक्षा समजू शकणारा परंतु परिस्थितीने अखडलेला तिचा बाप, तथाकथित खालच्या जातीच्या किळसवाण्या आयुष्यातून मुक्त व्हावयाला आतुर तरूण (दीपक), त्याच्या या स्वप्नाला जाणणारा त्याला पाठिंबा देणारा त्याचा बाप , प्रियकराच्या खालच्या जातीचं वास्तव जाणल्यावर हादरलेली पण नंतर विचारपूर्वक आपल्या प्रेमासाठी घरून पळून जाण्याची देखील तयारी दाखवणारी खंबीर तरुणी (शालू) अशी अनेक समजूतदार पात्र कदाचित अ-वास्तव वाटण्याची शक्यता आहे. याला कारण म्हणजे आंतरजातीय- आंतरधर्मीय विवाह, हॉनर किलिंग, स्त्रियांवरचे अत्याचार असे विषय आले की काहीतरी बटबटीत मांडणी, भाषणबाज पात्रे, हिंसाचार, अतिआदर्शवाद वगैरे पाहण्याची आपल्याला सवय झाली आहे. आपापल्या परिस्थितीत अत्यंत प्रॅक्टीकल वागणार्‍या व्यक्तिरेखा हिंदी चित्रपटात विरळच दिसतात. याबाबतीत मसान जरी गंभीर प्रकारचा चित्रपट असला तरी फ्रेश आहे. काहीतरी नवी, भावजाणिवा समृद्ध करणारी कलाकृती पाहिल्याचं समाधान देणारा आहे.

तुम्ही जर अतिआशावादी मनोवृत्तीचे असाल; जग फारच छान आहे; आयुष्य फारच सुंदर आहे; अंतिमत: सगळ्यांचं सगळं चांगलंच होणार आहे असं तुम्हाला वाटत असेल किंवा तुम्ही सोशल मीडीयावर फिरणारे ‘गुडी गुडी’ संदेश ‘संपूर्ण’ वाचून फॉरवर्ड करणारे असाल तर कदाचित ‘मसान’ हा चित्रपट तुम्हाला न आवडण्याची शक्यता आहे. ‘मसान’ ही तुमच्याआमच्या आजच्या आधुनिक पण सर्वसामान्य आयुष्यात कधीही येऊ शकणार्‍या दु:खाची वास्तववादी कहाणी आहे. चित्रपटाचा शेवट एक अंधुक आशा सोडून जातो पण स्पष्ट काही सांगत नाही. त्यामुळे ती एक शोकात्मिका असली तरी शोकांतिका नाही.

मात्र तरीही एक दु;खाची किनार मात्र चित्रपटभर दिसणार्‍या गंगेच्या संथ अस्तित्वासारखी सतत आपली सोबत करते. या दु:खाच्या महानदीत न बुडता किनार्‍याकिनार्‍याने पोहतच आपल्याला हा प्रवास पूर्ण करायचा आहे असं तर चित्रपटाला सांगायचं नाही ना ?

माझा ब्लॉग: http://aawaghmare.blogspot.com/

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख लिहिता तुम्ही.
एकदा बघायला हवा हा चित्रपट असे वाटले.

ट्रेलर पाहून माझे मत फारसे अनुकुल झाले नव्हते. पण आता नक्की पाहणार.

सुंदर परीक्षण. चित्रपटही परीक्षणात नोंदवल्याप्रमाणे अफाटच आहे. अश्या वेगळ्या धाटणीचे, वेगळ्या पद्धतीचे चित्रपट नव्या दिग्दर्शकांना बनवावेसे वाटणे हीच मुळात नव्या पिढीच्या वैचारिक प्रगल्भतेला आणि प्रश्नांची उत्तरे स्वत:च्या बौद्धिक आणि मानसिक पातळीवर आत्मविश्वासाने शोधू पाहणार्या समंजस वृत्तीला दिलेली आश्वासक पावती असते असे मला बरेचदा वाटते. असे चित्रपट बनणे (ते व्यावसायिक रीत्या यशस्वी होवोत न होवोत) एका समाजाची मानसिक सुदृढता दर्शवते.

तुम्ही जर अतिआशावादी मनोवृत्तीचे असाल; जग फारच छान आहे; आयुष्य फारच सुंदर आहे; अंतिमत: सगळ्यांचं सगळं चांगलंच होणार आहे असं तुम्हाला वाटत असेल किंवा तुम्ही सोशल मीडीयावर फिरणारे ‘गुडी गुडी’ संदेश ‘संपूर्ण’ वाचून फॉरवर्ड करणारे असाल तर कदाचित ‘मसान’ हा चित्रपट तुम्हाला न आवडण्याची शक्यता आहे. ‘मसान’ ही तुमच्याआमच्या आजच्या आधुनिक पण सर्वसामान्य आयुष्यात कधीही येऊ शकणार्‍या दु:खाची वास्तववादी कहाणी आहे.>>>> हे अगदीच पटले.

समाजातल्या एका वर्गाचे, दुसर्या एका मोठ्या वर्गाला अजूनही अनाकलनीय असलेले अत्यंत बोचरे वास्तव कुठेही अतिरंजित आक्रस्ताळेपणा न करता, मनोवृत्तीचे, विचारांचे सरसकटीकरण न करता, अत्यंत संयमित रीत्या तेवढ्याच प्रभावीपणे मांडता येऊ शकते आणि कुठलाही 'उपदेशात्मक' डोस प्रेक्षकांच्या घशाखाली थेट उतरवण्याचा भंपक उपद्व्याप न करताही प्रेक्षकाला विचार करायला भाग पाडता येते याचे एक छोटेसे उदाहरण या चित्रपटाच्या निमित्ताने नक्कीच मिळते.

अत्यंत सुंदर परीक्षण !

चित्रपट पाहिल्यानंतर तो 'डायजेस्ट' करून मत बनवायला मला अर्धा तास लागला. हा संपूर्ण अर्धा तास मी चित्रपटाचाच विचार करत होतो.
तुमच्या परीक्षणातील प्रत्येक शब्दाशी सहमत.

तुमची शैलीही आवडते आणि अभ्यासपूर्ण लिखाणही.

धन्यवाद !

हे ही परिक्षण आवडलं.
रसप यांच्या या सिनेमाच्या धाग्यावर अशोकमामांच्या प्रतिक्रिया पण वाचण्यासारख्या आहेत.

काय सुंदर परीक्षण केलंय. चित्रपट पाहिला आहे त्यामुळे ज्या सुंदर पध्दतीने परीक्षण केलय, ते लगेच जाणवते. हॅट्स ऑफ टु यु!

<समाजातल्या एका वर्गाचे, दुसर्या एका मोठ्या वर्गाला अजूनही अनाकलनीय असलेले अत्यंत बोचरे वास्तव कुठेही अतिरंजित आक्रस्ताळेपणा न करता, मनोवृत्तीचे, विचारांचे सरसकटीकरण न करता, अत्यंत संयमित रीत्या तेवढ्याच प्रभावीपणे मांडता येऊ शकते आणि कुठलाही 'उपदेशात्मक' डोस प्रेक्षकांच्या घशाखाली थेट उतरवण्याचा भंपक उपद्व्याप न करताही प्रेक्षकाला विचार करायला भाग पाडता येते याचे एक छोटेसे उदाहरण या चित्रपटाच्या निमित्ताने नक्कीच मिळते.> +१

चित्रपट छानच आहे. मला तर दुकानात काम करणारा छोटू पण लक्षात राहीला. छोटू पाण्यात जाऊन बेशुद्ध पडतो तेव्हा हृदयाचा ठोका चुकतो. आणि तो शुद्धीवर येइपर्यंत जीवात जीव येत नाही अजिबात.

बऱयाच दिवसापासून पहायचा होता पण राहून गेलं. गेल्या आठवड्यात मुद्दाम पाहिला. निशब्द हाच एक शब्द आहे, चित्रपट पाहिल्यानंतर वाटलेल्या भावनेला.

परीक्षण सुंदर लिहिलेत. विकी कौशलचे काम आवडतेच. चित्रपटातली पात्रे तिथलीच वाटतात, अभिनित चित्रपट पाहतोय असे अजिबात वाटत नाही, हे सगळ्यांचेच यश आहे.

चित्रपट शोकांतिका नाही तर शोकात्मिक आहे हे वाक्य आवडले. मला शोकात्मिक तरी आशावादी वाटला, फक्त शेवटच नाही तर सुरवतीपासूनच. परिस्थिती कंबर मोडते तरी पात्रे परत उठून उभी राहतात, कोणाविरुद्ध कसलीही तक्रार न करता आपले आयुष्य बदलायचा प्रयत्न करत राहतात हे खूप खूप आवडले. हल्ली विशी तिशीतली मुले क्षुल्लक कारणांवरून आत्महत्या करून मोकळी होतात. त्यांनी हा निर्णय घ्यायच्या आधी एकदा हा चित्रपट पहावा व गेलेले आयुष्य मागे टाकून परत नव्याने उभे राहायची उमेद यापासून घ्यावी.

ला तर दुकानात काम करणारा छोटू पण लक्षात राहीला. छोटू पाण्यात जाऊन बेशुद्ध पडतो तेव्हा हृदयाचा ठोका चुकतो. आणि तो शुद्धीवर येइपर्यंत जीवात जीव येत नाही अजिबात>>>

तो वर येत नाही तेव्हा मलाही भीती वाटली क्षणभर. त्या इवल्याश्या मुलाने कसले जबरदस्त काम केलंय. 'अपने पैसेसे मजा कर रहे है, 'तेरी क्यू जल रही' संवाद सॉलिड घेतलाय त्याने. चेहरा व देहबोली किती बोलते त्या प्रसंगात.

विकी कौशलनेही छोट्या छोट्या प्रसंगात कमाल केलीय. त्यामानाने रिचाला तितकासा वाव नाही.

ये दुःख काहे खतम नहीं होता! एक सुंदर दृश्य आहे यात. वरुण ग्रोवर ची स्क्रिप्ट आणि लिरिक्स आहेत. दुष्यंन्त ची तू किसीं रेल सी गुजरती थी चे इम्प्रोव आणि मन कस्तुरी रे अप्रतिम आहे.

काल बघितला आणि आज परत हे परीक्षण वाचलं. चित्रपट सुंदर आहे. देवी कधीच खचून जात नाही आणि तिने जे केलं त्याबद्दल तिचे विचार स्पष्ट असतात हे फार आवडलं. "जो भी किया हम दोनो ने किया" हे ती ज्या ठसक्यात ऐकवते ते लाजवाब आहे. बाईच्या शरीरावर फक्त तिचा स्वतःचा अधिकार आहे हेच ती सांगतेय असं मला वाटलं, ऐकायला आलं. तिचे पुढचे प्लॅन तयार असतात आणि जे झालं तेच कवटाळून ती स्वतःला सहानुभूती देत बसत नाही हे प्रशंसनीय आहे. तिच्या मानाने दिपकचा संघर्ष मला कमी वाटला कारण तो खऱ्या संघर्षाला तोंड द्यायच्या आधीच सगळं संपलेलं असतं. प्रेक्षक म्हणून हा धक्का होता कारण मी मनातल्या मनात पुढच्या सरधोपट जात संघर्षाची तयारी केलेली होती. शालूशी बोलल्यानंतर त्याला नोकरी मिळवण्यासाठी एक नवीन उभारी मिळते आणि तो बोटीला यू टर्न घ्यायला सांगतो तो प्रसंग छान चित्रित केलाय.
मुख्य पात्र तर आवडलीच पण शालूही फार आवडली, निरागस तितकीच खंबीर. गाणी फार सुरेल आहेत. साधना यांनी वर म्हटल्याप्रमाणे दोन्ही पात्र परत उठून उभी राहतात, निराशेच्या गर्तेत जात नाहीत. शेवटी दोघं फक्त भेटतात, आपण काहीच अंदाज बांधू शकत नाही कारण दोघे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहेत हे आधीच आपल्या मनावर ठसवण्यात चित्रपट यशस्वी झालाय.

ये दुःख काहे खतम नहीं होता! >>>>
हा सिन बघताना मीही खूप दुःखी झाले. आधीच्या प्रसंगात विकीने कमाल केलीय. अचानक बसलेल्या धक्क्याने कोलमडलेला पण त्याच वेळी हातातील कामाचे भान असलेला दीपक. हा कथेचा भाग माहीत नव्हता आधी, त्यामुळे आपल्यालाही धक्का बसतो.

देवी एकाच वेळी घरात व बाहेर अवहेलना आणि वैयक्तिक दुःख झेलते. अव्हेलनेमुळे वैयक्तिक दुःख आतल्या आत गिळावे लागते, क्लोजर मिळत नाही. म्हणून बहुतेक ती पियुषच्या घरी जाते. निदान तिथेतरी पियुषबद्दल बोलले जाईल ही आशा असावी.

पियुष नक्की कसा मरतो ते दाखवलं नाहीए. तसेच तात्पुरत्या नोकरीच्या ठिकाणी देवी त्या सहकाऱ्याचा लग्नाचा प्रस्ताव का नाकारते तेही नाही दाखवलं.

ये दुःख काहे खतम नहीं होता बे.....
कोणीतरी यावर मिम बनवलेला परवा बघितला आणि थोडे वाईट वाटले, मूळ प्रसंग अतिशय गंभीर पण मीम अगदी विनोदी होता...

बाथरूमच्या खिडकीची काच तोडून तिने नस कापून घेऊन पियुष मरतो.

आपल्याला कितीही वाटले तरी भौतिक आयुष्यात कोणासाठी थांबता येत नाही, आयुष्य संपवता येत नाही हे स्वतःला समजावून देवी व दीपक पुढे जातात. पण मनातून काही जात नाहीच ना? हॉटेलात सहकाऱ्यासोबत चहा घेत असताना शेजारी काही तरुण तरुणी वाढदिवस साजरा करताना बघून देवीला भावना अनावर होतात त्यात तो सहकारी लग्नाचा प्रस्ताव मांडतो. तिला त्या प्रसंगी कळतही नाही तो असा काही प्रस्ताव मांडतोय हे. तो किती स्लो दाखवलाय. त्या प्रसंगात मला देवीचे दुःख जाणवत होते आणि पंकज त्रिपाठीचे हसायलाही येत होते Happy

देवी तिच्या दुःखाबद्दल कोणाशी बोलुही शकत नाही, दीपकला मित्रांचा तरी आधार असतो.

सुरवातीला दीपक सिव्हिल इंजि. शिकताना दाखवलाय, नोकरी मिळते ती मात्र मेकॅनिकल क्षेत्रात. याची गम्मत वाटली.

शेवटी दोघं फक्त भेटतात, आपण काहीच अंदाज बांधू शकत नाही कारण दोघे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहेत हे आधीच आपल्या मनावर ठसवण्यात चित्रपट यशस्वी झालाय

हो. ती फक्त दोन अनोळखी लोकांची भेट आहे. कदाचित पुढे दोन समदु:खी मित्रही होतील. 'कहते है संगमपे दो बार आना चाहीये, एकबार किसिके साथ और एकबार अकेले' यावर देवीचे काहीही भाष्य नाही.

तो कापताना दाखवला नाही. बाथरूममध्ये तो ती आडव्या काचा लावलेली खिडकी उघडायचा प्रयत्न करतो , पुढच्या दृश्यात पोलीस त्याला बाहेर आणतात तेव्हा त्याच्या हातातून रक्त वाहात असते व तो बेशुद्ध/मृत असतो.

हॉटेलात तरुणतरुणींचा एकत्र दंगा पाहून देवी का इतकी रडायला लागते तेही दाखवलेले नाही. ती व पियुष कॉलेजातले मित्र नसतात तर कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये ती टाइपिस्ट म्हणून नोकरी करत असते तिथे ओळख झालेली असते. त्यामुळे अशा प्रकारचा एकत्रित प्रसंग याआधी तिच्या आयुष्यात त्याच्यासोबत यायची शक्यता कमी आहे. तरीही तिला ते पाहून भावना अनावर होतात. कदाचित या मुलांसारखे मोकळे आनंदी आयुष्य आपल्याला यापुढे मिळणार नाही हे वाटुनही ती रडलेली असू शकते.

देवी व दीपक बऱ्याच वेळा आपापल्या प्रिय लोकांचे फोटो त्यांच्या फेसबुकवर पाहताना दाखवलेत. त्यावरून त्या दोघांनाही खूप आठवणी येताहेत पण प्रत्यक्ष काहीच बोलता येत नाहीय, भावना दाबून ठेवाव्या लागताहेत हा निष्कर्ष आपण काढू शकतो.

तसे इतर बरेच आपल्यावर सोडलंय. दीपक आठवणी असह्य होऊन शालूची अंगठी गंगेत फेकतो आणि लगेच उडी घेऊन ती शोधायचा प्रयत्नही करतो. ती सापडत नाही तेव्हा किनाऱ्यावर येऊन कोसळतो. त्या रात्रीच तो निर्णय घेतो मागचे पुसून टाकायचा. हाही आपलाच निष्कर्ष... तो केवळ देहबोलीतून त्याचे दुःख दाखवत पुढचा मार्ग स्वीकारताना दाखवलाय. संवाद नाहीतच.

चित्रपटात असे अजून खूप प्रसंग आहेत जिथे कुठलेही भाष्य न करता केवळ 5-10 सेकंदाच्या दृश्यात परिस्थिती दाखवली जाते. वडिलांच्या सोबतीने घराचा भार उचलणारा दीपकचा थोरला भाऊ सगळे कुटुंब जेवत असताना रागाने स्वतःचे ताट पुढे ढकलून देतो, दीपक मात्र तरीही शांतपणे जेवत राहतो. ओढग्रस्त घरात पैसे कमावण्याची शक्यता असलेल्या मुलाला झुकते माप मिळते हे आपल्याला दिसते, संवाद काहीही नाही. असे होणे आपल्या मध्यमवर्गीय मानसिकतेला पटणार नाही पण त्या वर्गात आजही हे आहे हे दिग्दर्शक दाखवतो. जास्त मुले तर जास्त उत्पन्न हे गृहीतक मनाशी धरून 10 मुले जन्माला घालून त्यांचे कायमचे वाटोळे कसे होते हेही फक्त एका छोट्या संवादात येते. अजिबात फाफटपसारा न घालता कमी संवाद व जास्त दृश्ये अशी सांगड घालत लेखक, दिग्दर्शक व एडिटर यांनी चित्रपट कुशलतेने बनवला आहे. मी अजून एक दोनदा बघेन. आधी काही बघायचे राहून गेले असेल ते पाहण्यासाठी.

साधना,

चंपा प्रमाणे मीही सिनेमा hotstar वर बघितला. त्यात तुम्ही सांगताय त्यातल्या एक ताट रागाने सरकवण्याचा प्रसंग सोडल्यास इतर कोणताही सीन पाहिल्याचं अजिबात आठवत नाहीये. Hotstar वर भरपूर कापून टाकला असावा Sad

धन्यवाद साधना सविस्तर प्रतिसादासाठी. हॉट स्टार वर चित्रपटाची सुरुवात देवीपासून होते आणि पियुष कुठेच दाखवला नाहीये. तो मला ती नंतर त्याचा फेसबुक प्रोफाइल बघत असते तेव्हा नीट दिसला आणि त्या आधी की नंतर त्याचा पेपरमध्ये फोटो असतो श्रद्धांजली वाहण्यासाठी. दिपकचा मोठा भाऊ शिकलेला नसतो कारण तो दीपक एवढा कदाचित हुशार नसतो हेही कारण असू शकेल त्याच्या रागाचं. बाकी जो जास्त कमावतो तो जास्त लाडका असतो किंवा त्याचं जास्त कौतुक केलं जातं चारचौघात हे सगळीकडे घडतं काही अपवाद सोडले तर असं मला वाटतं कारण तो स्वभाव आहे. खूप मुलं जन्माला घालायचा संवाद आठवत नाही. मलाही अजून एक दोनदा बघावा लागेल अजून नीट कळण्यासाठी.

Pages