चाळता पाने स्मृतीची

Submitted by निशिकांत on 10 August, 2015 - 00:19

चाळता पाने स्मृतीची

चाळता पाने स्मृतीची बालपण दिसते मला
गाव हिरवा कंच, शाळा सर्व मोहवते मला

ऐकले गांधी, विनोबा भाग्य माझे केवढे!
सांगता आदर्श त्यांचे, का प्रजा हसते मला?

बाहुला अन् बाहुलीचे खेळ होते रंगले
बाहुली होती जिची ती रोज आठवते मला

जीवनाच्या वाळवंटी होरपळ असली तरी
बालपणच्या हिरवळीने, ताजगी मिळते मला

प्रेम असते काय याची जाण नाही आजही
जी मनी, नसणे घरी ती, पोकळी छळते मला

तावदाने का मनाची जाहली धूसर अशी?
अंतरी अंधार भरला आज जाणवते मला

रोज नवखीशी वजावट मख्ख होउन भोगतो
बेरजांचा काळ गेला, ज्येष्ठ वय म्हणते मला

वाट काटेरी तरीही ध्येयमार्गी चालतो
पण कधी रक्ताळल्याचे भानही नसते मला

सोडली "निशिकांत"ने का जिद्द लढण्याची अशी?
जि़ंकण्याची वेळ गेली सत्त्य हे कळते मला

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>रोज नवखीशी वजावट मख्ख होउन भोगतो
बेरजांचा काळ गेला, ज्येष्ठ वय म्हणते मला<<< वा वा

>>>वाट काटेरी तरीही ध्येयमार्गी चालतो
पण कधी रक्ताळल्याचे भानही नसते मला<<< ह्या शेरात 'पण'ऐवजी 'अन्' अधिक खुलले असते असे वाटले.

बाहुलीचा शेरही फार आवडला.

बेफिजी,
धन्यवाद प्रतिसादासाठी. आपल्या सुचना झकास आणि शिरसावंद्य. वहीत बदल करतोय.