शोषीत समाजातील आरक्षित वर्गाची वाटचाल, समाजापुढील आव्हाने आणि वास्तव

Submitted by खडी साखर on 8 August, 2015 - 12:08

प्रस्तावना : आरक्षित वर्गाच्या राजकारणाबद्दल बोलायचं तर आरक्षित वर्गाबद्दल बोलणं हे टाळता येण्यासारखं नाही. आरक्षित वर्ग हा असा वर्ग आहे की ज्याबद्दल उघड काही बोललं जात नाही पण सर्वात जास्त त्याविषयी खाजगीत बोललं जातं. त्याच चुकीचं किंवा बरोबर किती हे तोपर्यंत कळणार नाही जोपर्यंत त्यावर शांतपणे चर्चा होणार नाही.

प्रशासनाला हा विषय संवेदनशील वाटू शकतो, त्यामुळे बाफ ग्रुपात गेल्यास चर्चेचा हेतू साध्य होणार नाही. किमान हेडर मधे लिहीलेल्या लेखास फक्त आणि फक्त लेखक जबाबदार आहे असं एव्हढ्यासाठीच जाहीर करावंसं वाटतं. जर खरोखर चर्चा व्हावी असं वाटत असेल तर उकसाऊ प्रतिसाद टाळण्यात यावेत. उकसाऊ प्रतिसाद आलेच तर सरळ दुर्लक्ष केलं जावं.

पहिलीतल्या मुलांना शिकवावं तसं प्रत्येक चुकीचे मुद्दे खोडून काढण्याची आवश्यकता नाही. सूज्ञास सांगणे न लगे या उक्तीवर विश्वास ठेवून आपण पुढे जाऊ शकतो.

थेट मुद्यालाच हात घालू.

आरक्षण म्हणजे गरिबी हटाव कार्यक्रम नव्हे. तर ते प्रतिनिधित्व आहे. त्याला तात्त्विक भूमिका आहे. मुस्लिमांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात भूप्रदेश आणि रिझर्व्ह बँकेतील गंगाजळीमधून लोकसंख्ये च्या प्रमाणात वाटा देण्यात आला जो ७५ कोटी भरला. त्याआधी टिळकांनी १९१६ साली केलेल्या लखनौ कराराप्रमाणे मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले होते. तसंच त्यांच्या कम्युनल अ‍ॅवॉर्ड ला गांधीजींनी पाठिंबा दिला होता. शीख, जैन, मुस्लीम या सर्वांना कम्युनल अ‍ॅवॉर्ड मिळत होतं, पण अस्पृश्यांना कम्युनल अ‍ॅवॉर्डच्या विरोधात गांधीजी होते . हा गांधी आंबेडकर वादाचा पाया आहे. डॉ. बाबासाहेबांनी अस्पृश्यांना नाकारले गेलेले शिक्षण, संपत्ती, रोजगार, व्यवसाय इत्यादी मूलभूत बाबींचे नाकारले गेलेले हक्क, आणि इतरांना ब्रिटीशांना दिलेले हक्क यांची तुलना करून त्यांना अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यास भाग पाडले. गांधीजींनी येरवड्यात बेमुदत उपोषण सुरू केले. हे उपोषण अस्पृश्यांच्या हक्कांविरुद्ध आहे असं कुठेही म्हटलं नाही. पण बाबासाहेबांना अनेकांच्या विनंत्या येऊ लागल्या. जस जसं वेळ जाऊ लागला तस तसं बाबासाहेबांविरोधात उग्र निदर्शनं होऊ लागली. या काळात प्रचंड दबाव बाबासाहेबांवर आला होता. हिंदुस्थान स्वतंत्र झाला तर हिंदू आणि मुस्लीम सत्तेतला वाटा मिळवतील आणि अस्पृश्यांना त्यांचा वाटा कधीच मिळणार नाही ही बाबासाहेबांची रास्त भीती होती.मस्पृश्यांच्या हक्कांसाठी तटस्थ तिसरा पक्ष स्वतंत्र हिंदुस्थानात नसणार होता आणि बहुसंख्य हिंदू समाज जो अस्पृश्यांच्या प्रश्नांविषयी उदासीन होता तो कधीही न्याय्य हक्क देणार नाही या भीतीला कुणाकडे उत्तर नव्हतं.

उपोषण जरी सत्याग्रह होता तरी त्यामुळे हिंदी जनतेत असंतोष वाढू लागला. याचा परिणाम म्हणून बाबासाहेबांना गांधीजींशी बोलणी करणे भाग पडले. गांधीजींचे प्राण वाचवले वगैरे गोष्टींना काहीही आधार नसून जर अस्पृश्य वस्त्यांवर हल्ले झाले तर ज्यांच्यासाठी हक्क मिळवायचे तेच राहीले नाहीत तर उपयोग काय असंही काही नेत्यांनी बाबासाहेबांना बोलून दाखवलं. हा मुद्दा आपल्या जागी ठीकच होता. त्यामुळे तत्त्वांना मुरड घालणं हा शहहापणा होता. पुढे पुणे करार झाला. या कराराप्रमाणे अस्पृश्यांना न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी तडजोड झाली जे कॉग्रेसवर बंधनकारक होतं. पण जेव्हां घटनासमितीवर निवडून जाण्याची वेळ आली तेव्हां कॉंग्रेसने निवडणुकीतली आपली मास्टरी सिद्ध करताना सर्वांना बाबासाहेबांच्या विरोधात एकाच उमेदवाराला मत देण्यास सांगितलं आणि बाबासाहेबांचा पराभव केला.

बाबासाहेबांच्या शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे जोगेंद्रनाथ मंडल हे सदस्य बंगालमधून निवडून आले होते. त्यांनी बाबासाहेबांसाठी राजीनामा देऊन रिक्त झालेल्या जागेवर बाबासाहेबांना निवडून आणले आणि बाबासाहेब घटनासमितीत पोहोचले. पटेलजी म्हणाले की बाबासाहेबांना घटनासमितीचे दर्वाजेच काय पण खिडक्याही बंद आहेत. बाबासाहेब ज्या मतदारसंघातून निवडून आले त्या मतदारसंघात ४८% मुस्लीम आणि ५२% हिंदू होते. फाळणीमधे काँग्रेसने हा मतदारसंघ पाकिस्तानला देऊन टाकला , त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या बाबासाहेब पाकिस्तानच्या घटनासमितीचे सदस्य झाले. त्यामुळे त्यांनी उपहासाने पाकिस्तानची घटना मी दोन दिवसात लिहून देतो अशी घोषणा केली. काँग्रेसच्या या खेळीविरुद्ध बाबासाहेबांनी इंग्लंडच्या संसदेतील खासदारांना सदसद्विवेकबुद्धीचे आवाहन केले. त्याचा परिणाम होऊन ब्रिटीश सरकारने बाबासाहेबांना घटनासमितीत घेण्यासाठी आग्रह धरला. याचा परिणाम म्हणून मूबईतून बॅ जयकरांना राजीनामा द्यायला लावून त्यांच्या जागी बाबासाहेबांना निवडून आणले.

घटने मधे पुणे कराराप्रमाणे आरक्षणाचे तत्त्व लागू झाले. पाकिस्तानला वेगळा देश देणं आणि अस्पृश्यांना आहे त्याच राष्ट्रात अन्यायाचं परिमार्जन करण्यासाठी प्रतिनिधित्व देणं हे थोडंसं एकसारखं पण ब-याच अर्थी भिन्न आहे. त्यावर वेगळी चर्चा होऊ शकेल. आरक्षणा बद्दल असलेले गैरसमज दूर करण्यासाठी हा इतिहास थोडक्यात इथे आपण पाहिला. इथे हा भाग दुय्यम, कमी महत्वाचा आहे. पण पार्श्वभूमी म्हणून तो टाळता आला नाही हे ही खरं .(तपशीलाबाबत मतांतरं असू शकतात पण पुढे जी चर्चा करणार आहोत तो महत्वाचा भाग आहे हे लक्षात येईलच).

पुढे आरक्षणाचा फायदा समाजाच्या उत्थानासाठी झाला का ? आरक्षित वर्गाने आपले योगदान दिले का ? त्यांचं नेमकं काय चाललेलं आहे ? जर आरक्षणाचा फायदा घेतला असेल तर समाजासाठी त्यांचं उत्तरदायित्व नाही का ? महत्वाच्या पदांवर काम करताना ज्या कारणासाठी आरक्षित अधिकारी सरकारात आहेत त्याचे ते पालन करतात का ? आपल्या समाजाच्या हिताविरुद्ध घेतल्या गेलेल्या निर्णयांना ते विरोध करतात का ? या सर्व प्रश्नांची उत्तरे कदाचित नकारार्थी येऊ शकतात.

बाबासाहेब एकदा म्हणाले होते की एक आंबेडकर शिकला त्याने एव्हढं काम आजवर केलं, जर असे शंभर एक आंबेडकर समाजाला मिळाले तर मी सुखाने डोळे मिटू शकेन. हा आशावाद पूर्ण झालाय का ?

ज्या वर्गाने आरक्षण घेतले आहे त्यांच्याबद्दल समाजाचे मत काय आहे ?
शरणकुमार लिंबाळे यांनी अक्करमाशी नावाची एक कथा लिहीली होती. रामनाथ चव्हाण यांनी बामणवाडा नावाचं नाटक लिहीलं होतं. त्यात वास्तव मांडण्याचा प्रयत्न प्रांमाणिकपणे केला होता. शिकून मोठे साहीत्यिक, अधिकारी, वकील, डॉक्टर्स, इंजिनियर्स झालेले लोक समाजासाठी काय करतात याचं उत्तर चटकन देता येत नाही. पुरस्कार, प्रसिद्धी याची सवय झालेले अनेक जण आहेत. ते स्वतः मोठे होत गेले पण समाज अंधाराच्या गर्तेत जात राहीला.

गाडगेबाबांसारख्यांनी वस्त्यावस्त्यात जाऊन लोकांमधे प्रबोधन केलं. महात्मा फुलेंनी क्रांतीकारी काम उभारलं. बाबासाहेबांनी न भूतो न भविष्यती काम केल. पण ज्या वर्गाला आधी पोटोबा मग विठोबा न्यायाने पोटाची सोय केली त्यांच्याकडून विठोबा झाला का या प्रश्नावर संबंधित समाजात चर्चा व्हायला हवी. देशभरात दबक्या आवाजात चर्चा चालूच असते हे मागेच म्हटलेले आहे.

आरक्षणाविरुद्ध देखील सुनियोजित प्रचार चालू आहे. प्रत्येकाचे मुद्दे असतातच. पण या अंडरग्राउंड प्रचाआराने जनमत किती विरोधात आहे याची कल्पना आरक्षित वर्गाच्या तथाकथित उच्चभ्रू वर्गाला नाही. या वर्गात काही लोक नक्कीच असे आहेत की ज्यांना देशातील सर्व सूक्ष्म प्रवाह, मतमतांतरं आणि पुढील दिशा यांचं भान आहे. पण राजकीय आघाडीवर असलेल्या दिशाहीनतेचं कारण देऊन ते आला दिवस ढकलताना दिसतात.

काहींना काम करायचे आहे पण दिशाच सापडत नाही आणि कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही. कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात करूयात म्हटले की साठ गटांचे साठ विचार समोर येतात. किमान या लोकांना काहीतरी करायचं तरी आहे. पण ज्यांना रोल मॉडेल समजायचं ते प्रगत झालेले लोक, यांच्याबद्दल या वर्गातून फारसं चांगल बोललं जात नाही.

या सगळ्याला छेद देण्याचा प्रयत्न कांशीराम यांनी केला आणि महाराष्ट्रापासून दूर जाऊन यशस्वी होऊन दाखवलं. त्यासाठी लागणारी लवचिकता, तडजोडी त्यांनी करून दाखवल्या.नेमक्या याच गोष्टींचं नकारार्थी भांडवल करून महाराष्ट्रात कांशीराम यांना खलनायक ठरवण्यात आले. कांशीराम यांच्यानंतर तर त्यांचा प्रयोगही संपुष्टात आला.

या गोंधळात आरक्षणाचा लाभार्थी वर्ग काय करत असतो हे कुणीच सांगू शकत नाही. त्यापैकी मोठा वर्ग असा आहे की ज्याला वाटत राहतं की काहीतरी होऊन समाजाची प्रगती झाली पाहीजे. पण माझ्या अंगाला तोशीस नको. खैरलांजी सारख्या आंदोलनात आंतरजालावर तप्त पोस्टी टाकण्यात हा समाज आघाडीवर असतो. पण मोर्च्यात सामील व्हायला सर्वात मागे.

हा वर्ग समाजाचा हितचिंतक नक्कीच आहे, पण आपली सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक प्रगती ही आपल्या हुषारीच्या जोरावर झालेली आहे आणि इतर सर्वांप्रमाणेच आपल्यालाही प्रगत समाजाप्रमाणे जगता यावे, आपल्यालाही मान्यता मिळावी अशी त्याची धारणा आहे. उच्चभ्रू सोसायटीत राहतांना आम्ही तुमच्यापेक्षा कांकणभर पुढेच असं दाखवताना फिल्मी पार्ट्यांप्रंमाणे महागड्या पार्ट्या, महागड्या कार्स याचं दिपवून टाकणारं प्रदर्शन करण्यास तो मागे पुढे पाहत नाही . आम्ही जात सोडली आहे हे ही असतंच. पण लोकांमधे याचा सकारात्मक संदेश जातो का याचं उत्तर देखील बहुतेक वेळा नाही असं येतं.

याउलट आपली परिस्थिती कबूल करून , शिवराळ भाषेत का होईन पण अचूक मुद्यांवर चाबूक ओढणा-या टिपीकल कार्यकर्त्याला इतर उच्च वर्गाकडून दाद मिळते. फेसबुक वर एक मास्तर सध्या खूप चर्चेत आहेत. स्पष्टवक्ता म्हणून आपलं मत चोख मांडण्याच्या त्यांच्या शैलीला भरभरून दाद मिळते. त्याचबरोबर चुका दाखवल्या आणि त्या पटल्या तर प्रांजळपणे कबूल करण्याची तयारी यामुळे इतरांच्या विचार करण्याच्या पद्धतीत बदल घडला आहे.

एकांगी विचारातून साधक बाधक विचाराकडे नवे तरूण वाटचाल करत आहेत. आरक्षण असावे का ? किती काळ आरक्षण असावे अशा चर्चा या तरुणांमधे पहायला मिळतात. मागच्या पिढीला त्यांनी विचारलेले प्रश्न निरुत्तर करत आहेत.

एका निवृत्त आएएस अधिका-याने त्याच्यावर आलेल्या संकटात या तरुणांची मदत मागितली तेव्हां त्यांनी समाजासाठी काय केलं याचा हिशेब लिहून द्या अशी आडमुठी भूमिका घेतली, त्यावर त्यांना शिकवायला गेलेल्यांनाही त्यांनी फटकारलं. मुलांचा मुद्दा इतका चोख होता की त्या अधिका-याला खजील होऊन अक्षरशः पाय धरण्याचीच वेळ आली. मदत केली गेली तो भाग वेगळा, पण जेव्हां संकट येतं तेव्हाच समाजाची आठवण होणा-या आरक्षित वर्गाला हे मिळालेलं चोख उत्तर आहे का हा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

ज्या समाजाचे ११९ खासदार निवडून येतात त्यांना आजही आपले प्रतिनिधी नाहीत अशी खंत वाटते हे गंभीर आहे. आरक्षण बंद केलं तर हे ११९ बिनकामाचे लोक घरी बसतील असं ही मुलं म्हणतात. सरकारी नोक-यांची संख्या आता एक कोटीच्या घरात आहे. त्यात १६% आरक्षण, ज्यातलं ६ ते ८ % भरलं जातं. म्हणजे सहा सात लाख लोक लाभार्थी आहेत, पण तीस कोटी जनता हवालदील आहे. आरक्षणाचं राजकारण करणारे सुद्धा ही परिस्थिती ओळखून आहेत. उद्या आरक्षणाच्या मुद्यावर सरकार आलं तरी विशेष काय होणार आहे ? कारण परंपरागत व्यवसाय, जमीन जुमला हा आजही बहुसंख्य लोकांकडे नाही. रोजगार खाजगी क्षेत्रातच आहे. त्यामुळं चांगलं सांगणारा प्रत्येकजण आपल्या विरोधातच आहे हा माईण्डसेट बदलायला पुन्हा अलौकिक व्यक्तीमत्व जन्माला यावं लागेल. दुर्दैवाने एकापाठोपाठ एक अशी रत्नं या वर्गासाठी जन्माला येऊन गेली, असे चमत्कार पुन्हा घडत नसतात. आपलं भविष्य आपणच घडवावं लागणार आहे. त्यात मोठा भाऊ म्हणून आरक्षणाचा फायदा घेतलेल्यांचा रोल महत्वाचा आहे.

त्यामुळं पुढे काय हा प्रश्न आहेच. तसंच धडा शिकवण्यासाठी आरक्षण नको ही आत्महत्या ठरेल असं वयस्कर लोकांचं म्हणणं देखील चुकीचं कसं म्हणता येईल ?

( लखनौ कराराचं साल चुकलं होतं. सचिन पगारे यांनी चूक निदर्शनास आणून दिल्याने योग्य तो बदल करता आला याबद्दल त्यांचे आभार).

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ब्राम्हण समाजामध्ये लहान मुलांना विविध कथा,स्तोत्रे शिकवली/ सांगितली जातात. वाचनाची आवड़ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो,
अशा धर्म-अधर्म, योग्य-अयोग्य सांगणाऱ्या कथांमधुन आणि पुढे चौफेर वाचना मधून या 'जाणिवा' विकसित होत असाव्यात असे मला वाटते..>>>>>>

दिवसभर शेतात, रानात, बांधकामाकामावर मजुर म्हणुन, धुनी-भांडी करणारी मोलकरिण, असे संस्कार कधी करनार?

निच,
आता परिस्थिति बद्दलेली आहे..
एक मोठा वर्ग ज्याला आरक्षणाचा लाभ घेऊन सरकारी नोकरी करत होता त्यांची आता पुढची पिढी करती zali असावी माझ्या मते..
maza रोख बऱ्यापैकी अशा लोकांकडे होता.. यांना नीट शिकवल गेल तर ते इतरांना वर आणू शकतील..

बाकि, तुम्ही म्हणत आहात तशा परिस्थितिचा विचार केल्यास मग अशा मुलांकरता शाळेचे तास वाढवून अथवा अभ्यासक्रमात काहि बदल करून काही शिकवता येईल का याचा विचार zala पाहिजे..
अथवा प्रत्येक आंबेडकर नगर मधे व्यासपीठ असते, तिथे व्याख्याने आयोजित केलि जाऊ शकतील..

करायची इच्छाशक्ति असेल तर मार्ग मिळू शकतील. सुरुवात होण महत्वाच आहे.. चर्चा कृतित उतरवण महत्वाच आहे.
शंकाच काढत बसल तर त्याला अंत नाही, उपयांचा लगोलग विचार होउन कृति zali पाहिजे...

>>>> तर असे का आहे याचा विचार केल्यास, यासाठी सरळ सरळ ब्राह्मण समाजाशी तुलना केल्यास फरक जाणवेल तो लहान मुलांच्या संगोपनामध्ये जाणवेल असे मला वाटते.. ब्राम्हण समाजामध्ये लहान मुलांना विविध कथा,स्तोत्रे शिकवली/ सांगितली जातात. वाचनाची आवड़ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो, <<<<<<
प्रकु, अचूक निरीक्षण व मुद्दा.

>>>>> दिवसभर शेतात, रानात, बांधकामाकामावर मजुर म्हणुन, धुनी-भांडी करणारी मोलकरिण, असे संस्कार कधी करनार? <<<<<
ब्राह्मणांचा द्वेष करणारी शिकवण देत रहाण्यापेक्षा ब्राह्मणांकडेच मुलांना शिकायला पाठवुन हे संस्कार सहज करता येतात.
माझ्या पहाण्यात अशी असंख्य उदाहरणे आहेत, बाहेरील, तर काही माझ्या घरातीलच. आजही, माझ्या मुलिकडे दोन लहान मुले शिकायला येतात, शाळेच्या अभ्यासा बरोबर, हे करु नको, हे करावे इत्यादीही आपोआपच शिकवले जाते.
जिथवर खेडेगावचा संबंध आहे, व जिथवर ज्यांना जाण आहे, ते आपली मुले हमखास काही एक चांगले शिकण्याकरता "ब्राह्मणसंगतीत" पाठवतात असा अनुभव आहे.
त्याचबरोबर, लिंबीच्या अनुभवानुसार, तिच्या लहानपणि ती इतर जातीच्या मुलामुलिंसोबत खेकडे पकडायलाही जायची, त्यांच्या कालवणाकरता मसालाही करुन / दगडावर वाटून द्यायची, पण ती ते खेकडे खाणे शक्यच नव्हते, अन इतर मुलेमुलीही तिला तसा आग्रह कधीच करीत नसत. "तुमचे जिणे वेगळे म्हणून खाणेही वेगळे" असे सर्वमान्य सूत्र होते.
आजकाल जो द्वेष दिसतो, तो शहरी भागातील दीडशहाण्या लोकांनी पसरविलेला आहे व बेकारांची फौज त्याला बळी पडत आहे.
पण माझ्या अनुभवात तरी, "अरे बामणा, तुला या कामातील काय कळते, हे नाही तुझे काम, आमाला करुदे" हे म्हणण्यापासून ते त्याच कामात काही विशेष करुन दाखविले, अगदी किमान त्यांच्या तोडीचे नसले तरी बरोबर उभे राहुन करुन दाखविले तर कौतुकाची थापही तेच देत की काही म्हणा "बामणाची पोरे लई हुषार..." . त्यांच्या शाबासकीनेही अंगावर मुठभर मांस चढे, तेव्हाही अन आत्ताही.
चांगल्या संस्कारांचे, चांगल्या कलाकौशल्याचे आदानप्रदान, निदान मी तरी रोजच्या शेताच्या बांधावर काम झाल्यावर दुपारची शिदोरी खाताना, धुणीभांडी करताना आईपाशी खेळत असलेल्या मुलाला यजमानिणीकडे सोपवुन असे होताना बघितले आहे. फार दूर कशाला, आजही आमच्या भांडीवालीची वयात आलेली मुलगी दुपारची लिंबीकडेच थांबते, अन कारण काय, तर तिच्या शहरी वस्तीत ती "सुरक्षित" एकटी राहू शकेल अशी कणभरही परिस्थिती नाही. आता तिच्या शहरी वस्तीत वयात आलेल्या मुलिकरता सुरक्षित परिस्थिती नाही याकरताही "ब्राह्मणच" दोषी धरायचे असतील तर धरा बोवा......
खेडेगावात मात्र आम्हाला शहरीवस्त्यांइतका भयाण असा अनुभव नाही. खेडेगावातील कोणत्याही घरी माझ्या मुली बिनदिक्कत जाऊ शकतात, आजही. अन हे जे जातीविरहित असे मूलभूत संस्कार आहेत ते करण्याकरता वेगळ्या व्यवस्थेची गरज नक्किच नसावी, व त्याचा धुणीभांडी/ शेताचे काम याच्याशीही संबंध नसावा, नै का?
तुमचे मूळ खेडेगावातील सुसंस्कार विसरुन शहरी भुलभुलैयाच्या व निरनिराळ्या व्यसनांच्या नादी लागायला निव्वळ गरीबी कारणीभूत आहे असे म्हणता येत नाही, व शाळाकॉलेजच्या शिक्षणात या मूल्य शिक्षणाचा सहभाग आहेच असेही नाही. हे संस्कार समाजात एकत्रीत रहाताना दुसर्‍याचे चांगल्या वागण्याचे अनुकरण करुनच मिळत असतात. जिथेच मुख्यतः लोचा झालेला आहे.
आजच्या क्षणीही माझ्याकडे अनेक उदाहरणे आहेत जिथे व्यसनी नवरा दोन गोंडस मुले असुनही बायकोला नांदवत नाही व म्हातार्‍या आईबापांवर मुलिची /नातवंडांची जबाबदारी येऊन पडली आहे व त्या त्या जातीसमाजांतर्गत अशी कोणतीही व्यवस्था नाही की जी त्या नवर्‍याला ताळ्यावर आणू शकेल. पण त्याच बरोबर उच्चवर्णीयांच्या विरुद्ध घोषणाबाजि देत "तुमच्या अवस्थेला तेच जबाबदार" अशी शिकवण देणारी व्यवस्था मात्र नक्की आहे.
तेव्हा आपण काय करतो आहोत, त्याचे दूरगामी परिणाम काय याचा विचार त्यात्या जातीसमाजातील धुरिणांनीच व्यवस्थितपणे करायला हवा.

लिंब्या, ते ब्राह्मण कौतुक पुरे आता.

>> जिथे व्यसनी नवरा दोन गोंडस मुले असुनही बायकोला नांदवत नाही व म्हातार्‍या आईबापांवर मुलिची /नातवंडांची जबाबदारी येऊन पडली आहे व त्या त्या जातीसमाजांतर्गत अशी कोणतीही व्यवस्था नाही की जी त्या नवर्‍याला ताळ्यावर आणू शकेल. <<< अशी ब्राह्मण कुटुंबे पाह्यलीच नाहीस की काय? आणि ब्राह्मण जातीत तर समाज किंवा संस्था अशीही व्यवस्था नाही. काय होते तिथे?

>>> त्याच बरोबर उच्चवर्णीयांच्या विरुद्ध घोषणाबाजि देत "तुमच्या अवस्थेला तेच जबाबदार" अशी शिकवण देणारी व्यवस्था मात्र नक्की आहे. <<<
सर्वच व्यवस्था अशी आहे असे नाही पण ही शिकवण सतत देणारे, सतत सूडाचीच केवळ भाषा करत राहणारे, स्वच्छता-अभ्यास-व्यासंग या सगळ्याची ब्राह्मणी म्हणून टर उडवत मुद्दामून याच्या उलट वागणारे काही लोक नक्की आहेत आणि दुर्दैवाने त्यांची बडबड ही विद्रोह म्हणून घेतली जाते.

काही लोकच पण. सर्व नाही.

>>>> अशी ब्राह्मण कुटुंबे पाह्यलीच नाहीस की काय? आणि ब्राह्मण जातीत तर समाज किंवा संस्था अशीही व्यवस्था नाही. काय होते तिथे? <<<<<<
पाहिली की. पण पुन्हा तोच प्रश्न, की जातीअन्तर्गत लोकसंख्येच्या तुलनेत त्याचे प्रमाण किती आहे.
दुसरे असे की असे घडल्यास, नातेवाईक/जातीसमाज ती घटना काय पद्धतीने हाताळतो.
पुण्यातील मुक्तांगणची व्यसनमुक्तिची सेवा घेणार्‍यात ब्राह्मणांचे प्रमाण खूपच जास्त आहे असे एकाने मला "खवचट" पणे सांगितले, तेव्हा मी तत्काळ त्यास उत्तरलो, की हे चांगलेच लक्षण आहे, की ब्राह्मण समाजातील व्यसनग्रस्तांना मुक्त करण्याचे काम त्याच समाजात अधिक जागरुकतेने होत आहे याचे ते निदर्शक आहे. शेवटी घटनांचा अर्थ तुम्ही लावाल तसा लागतो. नाही का?

>>>>> काही लोकच पण. सर्व नाही. <<<< याबाबत सर्वस्वी १०१ टक्के सहमत.
अन म्हणूनच, ते काही लोक जरी शंभरटक्के ब्राह्मणांना नालायक व अजुन बरेच काही ठरवित त्या विद्वेषाचा/विषाचा प्रचार करीत असले तरी मी मात्र निदान माझ्या मुलाबाळांना/मित्रनातेवाईसगेसोयर्‍यांना हेच सांगतो की बाकी सर्व हिंदू समाज तसा नाहीये, व तो तसा नाहीये म्हणूनच आपण आहोत. किम्बहुना, माझ्या अनुभवातील अशी असंख्य उदाहरणे आहेत की जिथे इतर जातींच्या समाजाने आदरेखुन मदत केली आहे , अजुनही करतो आहे व मी त्याची जाण ठेवून आहे.
अन मुलांना हे देखिल नक्की सुस्पष्ट पणे सांगतो की "ते" जरी तुमच्या जातीचा, तुमचा द्वेष करीत असले तरी तुम्ही देखिल त्यांच्यासारखेच बनुन "त्यांच्या आख्ख्या" जातीचा द्वेष करण्याचे कूकर्म/मूर्खपणा करू नका. अर्थात मुलांना तर हे लगेच पटतेही कारण त्यांच्यावर लहानपणापासूनच संघातुन संस्कार होतील याचीही काळजी घेतली आहे.

माझे अनुभव लिंब्याच्या उलट-आमच्या शाळेत एक ब्राम्हण शिक्षक होते.कांबळे,गायकवाड्,वाघमारे वेचुन वेचुन काढायचा आणि मागच्या बाकावर बसवायचा.मुद्दामुन चुका काढायचा शिक्षा द्यायचा बाबासाहेबांविषयी चुकिचे बोलायचा.माझ्या पुढे अग्निहोत्री नावाची मुलगी बसायची माझ्यापेक्षा टोणगी फळ्यावरच काही दिसायच नाहि पण तो हे मुद्दाम करायचा घरी आई ला सांगितले तर आई म्हणायची सहन कर नाहितर वर्ष वाया जाईल नापास करेल.एका मुलिने त्याच्या त्रासाला कंटाळुन शाळा सोडली.

निसर्गचक्र, तुम्ही जे सांगताय तशा प्रकारे माझ्याही कडे भरपुर विरोधी उदाहरणे आहेत, पण त्याची चर्चा आम्ही करीत नाही, याचे कारण, अशा व्यक्ति/घटना अपवादात्मकच असतात, व त्यावरुन आख्ख्या समाजाला/जातीला दोषी धरणे आमच्या तत्वात बसत नाहीच, व ते योग्यही नाही अशी शिकवण आम्हाला आहे, व ती समजुन घेण्याची कुवतही आहे.
माझ्याबरोबर घडलेली अशी उदाहरणे घरात सर्वांना माहित आहेत, पण ती सांगतानाच ही अपवाद आहेत हे देखिल ठासून सांगितले जाते जेणेकरुन मुलांवर दु:ष्परिणाम होऊ नये, यालाच संस्कार असेही म्हणतात.
बाकी तुम्हाला काय काय उगाळत बसुन नेमक्या कशाचा प्रचार सॉफ्ट कायदेशीर लिगली करेक्ट भाषेत करीत रहायचे आहे ते तुम्हीच ठरविणार, नै का?

प्रकु, तुमच्या घरगुती धार्मिक संस्कारांच्या मुद्यात "सक्तिने संघात जायला लावणे" ही बाबही समाविष्ट करता येईल, नाही का? Proud
कारण पुण्यामुंबईतले मोजके अपवाद वगळता, बहुतेक ब्राह्मणी घरातील मुलांना या ना त्या प्रकारे "संघाचे वारे" लागलेलेच असते.

चला आता संघ म्हणजेच अल्टिमेट संस्कार अशी पोस्ट आली की मग या धाग्याचे नेहमीसारखे खांडववन व्हायला वेळ लागणार नाही.
कधीतरी भली चर्चा होत होती तर ते झेपतच नाही.

फक्त गणित आणि इंग्रह्जीसाठी काम सुरु केले तरी शाळकरी मुलांचे निम्मे प्रश्न सुटतील.क
१०-१२ वर्षाम्पुर्वी विनय आचार्य नामक गणिताचे प्राध्यापक पुण्यात झोपडपट्टीतील मुलाम्स्सथी गणित सोप्पे करुन शिकवणार उप्क्रमचालववायचे आत्ता ते चालु आहे का माहीत नाही ,पण त्याच धर्तीवर काही उप्क्रम स्युरु केला तर फायदा होउ शकतो.

retired लोकांआंना ह्यात involve kele त्यांच्य वेळेचा सदुपयोग होइल.

शोषित समाजातील पुढारलेल्या लोकांनी शिक्षण देण्यात सहभाग द्यावा आणि देणारे लोकही आहेत मात्र मानसिक गुलामगिरीचे काय? देव,धर्माच्या नावाने केले जाणारे कर्मकांड,वाया जाणारा पैसा ह्या बाबतही प्रबोधन करणे जरुरी वाटते.

खरं तर आपल्यातल्या सधन सुस्थित लोकांनी म्हणजे 'आहे रे' वाल्यांनी 'नाही रे' वाल्यांना मदत करावी ही अपेक्षा सर्वतर्‍हेच्या समाजगटांकडून असते. आणि तशी मदत अपेक्षेइतकी न करण्याची प्रवृत्तीही सर्वत्रच असते. ही भारतातली 'युनिवर्सल'(!) समस्या आहे. आपल्याकडे बहुतेक जातिसंस्थांच्या स्वतःच्या संघटना असतात, गावोगावची ग्रामविकासमंडळे असतात. शिक्षणसंस्थाही काही प्रमाणात असतात. नसतो तो आधुनिक किंवा प्रागतिक दृष्टिकोन. आणि हीसुद्धा फक्त शोषितांची समस्या नाही. तसं तर ब्राह्मण आणि क्षत्रिय सोडले तर बाकी सगळे शोषितच. वैश्य हे काही समाजात संपन्न असतात पण बहुतेक ठिकाणी नसतात. ओबीसींची सामाजिक स्थितीसुद्धा फारशी स्पृहणीय नाही. आमच्या वडिलांकडे जातिनिरपेक्ष खूप विद्यार्थी शिकून गेले. जमेल त्याला नोकरीही लावून दिली. कुणाची फी भर, कुणाला क्लासला घाल, हे उद्योग घरात अजूनही सुरू असतात. पण प्रत्येकानेच हे करावे अशी अपेक्षा असली तरी व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने ती पूर्ण होत नाही. बरे, नुसत्या संस्था स्थापून उपयोग नाही, त्या चालवण्यासाठी निरलस माणसे लागतात, ज्यांची नेहमीच आणि सर्वत्रच कमतरता असते. विषमतेची दरी मिटेलच, पण ते हळू हळू होईल. एकेकाळी ब्राह्मणांनी संस्था स्थापल्या, आता महाराष्ट्रात बहुतेक संस्था मराठ्यांच्या आहेत. हळूहळू हे लोण खाली झिरपेल. समाजात जातिनिरपेक्ष मदतसंस्था (चॅरिटीज़्)सुद्धा अनेक असतात, पण त्यांची माहिती अनेकांना नसते. ती पुरवता येईल. कुठल्या परीक्षांना बसायचे, त्याचे फॉर्म्स कधी आणि कुठे भरायचे, याचे आणि प्रत्यक्ष परीक्षेचे मार्गदर्शन करता येईल. नोकरीच्या भरतीच्या जाहिराती येतात, त्या शोषित लाभार्थींपर्यंत पोचतील हे बघता येईल. मुलाखत कशी द्यावी हे शिकवता येईल, परीक्षेत किंवा मुलाखतीत अनुत्तीर्ण झाल्यास त्यानंतर उमेदवाराचे मनोधर्य टिकवून ठेवण्याचे काम करता येईल, कारण या सर्व ठिकाणी जोरदार स्पर्धा असणारच. आजारी शोषितांना दवाखान्यापर्यंत पोचवणे आणि इतर मदत करता येईल, आर्थिक मदतीची तर फार मोठ्या प्रमाणावर जरूर असते. शिवाय निरनिराळे दाखले, सर्टिफिकेट्स (उदा. जन्म दाखला, आधार कार्ड, जातपडताळणी, डोमिसाइल वगैरे) मिळण्यासाठी मार्गदर्शन करता येईल. करण्यासारखे तर खूप आहे, पण हे सर्व करण्यासाठी 'आहे रें'ना मोटिवेट कसे करावे, हाच प्रश्न असतो. शहरीकरण किंवा नागरीकरण हा एक मोठा ईक्वलाय्ज़र ठरू शकतो. पण यात पहिल्या पिढीच्या स्थलांतरितांचा बळी जातोच जातो. त्यांना अपार कष्ट करावे लागतात. दुसर्‍या-तिसर्‍या पिढीला फायदा मिळतो. असो. जलद आणि त्वरित उपाय तरी काही दिसत नाहीत पण परिस्थिती हळू हळू बदलेल आणि तशी ती बदलते आहे हे निश्चित.

>>>> तसं तर ब्राह्मण आणि क्षत्रिय सोडले तर बाकी सगळे शोषितच.<<<<
हीरा, या वाक्याशी, त्यातिल गर्भित अर्थाशी मी सहमत नाही. बाकी पोस्ट चांगली.

>>>>देव,धर्माच्या नावाने केले जाणारे कर्मकांड,वाया जाणारा पैसा ह्या बाबतही प्रबोधन करणे जरुरी वाटते. <<<<
पगारेसाहेब, धाग्याचा विषय काय आहे? इथे धर्म आणताच आहात, तर त्याचे नावही लिहा ना, म्हणजे नेमके उत्तर देतो. उगाच मोघम कशाला बोलत आहात? अन जिथवर तुम्ही ज्या समाजाची तळी उचलुन धरताय त्यांनी तर हिंदू धर्म केव्हाच सोडलाय ना? मग त्या नविन धर्माबद्दल तुम्ही हे आक्षेप घेता आहात काय? जरा विस्कटून सांगा राव. हे असे मोघम मोघम फुसकुली सोडल्याप्रमाणे नको.

लिंबुटिंबु, यात गर्भित काहीच नाही. सर्व उघड लिहिले आहे. आपण सहमत नसाल तर तो प्रश्न वेगळा. अर्थात सर्वांनीच सहमत असावे ही अपेक्षाही नाही.

शोषित वर्गात SC,NT ,OBC ,VJNT,ST ,BAUDDH हे सारे येतात लिम्बु.त्यांना कितीही शिकवा पण जो पर्यत ते मानसिक गुलामगिरी, कर्मकांड यातुन बाहेर पडत नाहित तो पर्यत अर्थ नाहि. त्यांना शिक्षणाबरोबरच विज्ञाववादी बनवायला हवे अन्यथा सुशिक्षित अज्ञानी तयार होतील.

ब्राह्मणांना त्यांच्या लोकसंख्याच्या प्रमाणात ३% आणि क्षत्रियांना त्यांच्या लोकसंखेनुसार आरक्षण देऊन बाकी सगळ्यांना ओपन कॅटेगिरीत बसवले तर सरकारच काम सोप्पे होईल नाही का?

ज्या गृहस्थांना इथे येण्याचे आमंत्रण दिलेले आहे त्यांनी अद्याप मायबोलीकडे अर्जच केलेला नाही असं आत्ता कळालं. त्यांच्यासाठी काही दिवस थांबून मग लिहीन...

संपूर्ण अवांतराबद्दल क्षमस्व. पण या धाग्यातल्या लिंबूभाऊंच्या अनेक प्रतिसादांमुळे काही विचार मनात आले.
महाराष्ट्रात (आणि देशातही) एकेकाळी ब्राह्मणांनी अनेक क्षेत्रांत नेतृत्व दिले आणि कित्येक संस्थांची पायाभरणी केली हे अगदी खरे. पण आज तशी परिस्थिती राहिलेली नाही. आज अनेक क्षेत्रात बिगरब्राह्मण नेतृत्व आणि कार्यकर्ते पुढे आहेत. अगदी पर्यावरण, वनरक्षण, वनभ्रमण, दुर्गभ्रमण, सागरविज्ञान, पर्यटन, आदरातिथ्य, वाङ्मयप्रकाशन, विमानोड्डाण, लष्कर, गृहनिर्मिती, सार्वजनिक बांधकाम, व्यापारी बांधकाम, चित्रपटनिर्मिती, अभिनय, पत्रकारिता, खाजगी चित्रवाहिन्या, शिक्षण, अर्थ, बँकिंग या सर्वांमध्ये हे दिसते. आणि असे घडणे हे लोकसंख्येचा मानाने नैसर्गिकच आहे. ह्या नवनेतृत्वाकडे कमतरता आहे ती फक्त अभिव्यक्तिक्षमतेची आणि अभिव्यक्तिसामर्थ्याची. हे लोक प्रमाणित भाषेत स्वतःला अभिव्यक्त करण्यात कमी पडतात. भालचंद्र नेमाडे ठासून सांगतात त्याप्रमाणे प्रमाण भाषेचे हे स्तोम फार दिवस राहाणार नाही. संस्कृतचा पगडाही भाषेवर राहाणार नाही. नेमाडेंची इतर अनेक मते पटत नसली तरी या बाबतीत मात्र सहमत होणे क्रमप्राप्त आहे.

पण आरक्षण मिळुनही बर्‍याच ठिकाणी याचा काहीच उपयोग झाले नसल्याचे दिसले. माझ्या लहानपणी आमच्या घराजवळच मागे बौद्ध कॉलनी होती. तिथे माझी एक वर्ग मैत्रिण होती. मी कायम तिच्याकडे जायची. तिच्या घरच्याना अतीशय आनन्द व्हायचा. मला कळायचेच नाही असे का ते. कधी चहा कधी काय असे देऊन कायम माझ्याशी बोलत रहायचे. पण आम्ही सातवीत गेल्यावर तिने ( सुनिता) शाळाच सोडली. नन्तर अभ्यासाच्या व्यापाने जाणे कमी झाले. पण सुनिता दिसायला अतीशय देखणी, रुपवान. साधारण १६-१७ ची असेल तेव्हा तिचे लग्न झाले. त्याच कॉलनीत आणखीन काही मुलीन्ची शाळाच बन्द झाली काही दिवसात. फक्त मुले काय ते ग्रॅज्युएट झाली.

घरची गरिबी होती की दुसरे कारण, पण माझ्या वर्गातल्या बर्‍याच बौद्ध मुलीन्ची शाळा सुटली. त्या काळात काही समजत पण नसल्याने कधी कोणाला विचारले नाही. पण आरक्षण आहे म्हणून मुलाना चान्गल्या नोकर्‍या मिळाल्या असे पण नाही.

पण शिकण्याचे महत्व ज्याला समजले आहे तोच समाजाला पुढे नेऊ शकतो. शिका व सन्घटीत व्हा ही डॉ. बाबासाहेबान्ची शिकवण दुर्दैवाने तळापर्यन्त पोहोचलीच नाहीये.

ज्यांनी आधी आरक्षणाचा उपयोग करुन घेतला आहे त्यांनी जर पुढे आरक्षण वापरले नाही तरच आरक्षणाचे फायदे झिरपत तळागाळापर्यंत जातील. नाहीतर ज्या वर्गासाठी आरक्षण आहे त्या पैकी १-२ टक्के लोकच कायम आरक्षणाचा फायदा घेत रहातील आणि बाकीचे ९५-९८ % टक्क्यांना काहीच फायदा मिळणार नाही.

क्रीमी लेयरची कल्पना ह्याच लोकांनी ( ज्यांनी आरक्षणाचा आधीच उपयोग केला आहे ) पार उधळुन लावली आहे. स्वताच निर्णय घेण्याच्या जागेवर असल्यामुळे दरवर्षी क्रीमी लेयरची लिमिट वाढवुन घेतली जात आहे.

रश्मी.. खरे आहे सुनिताच्या पिढीच्या मुलिंच असे झाले आहे. हेबौद्ध मुलिंच्याच बाबतित नाहि तर इतर ही समाजात होते.पण आता परिस्थिती खुप बदलली आहे. .

मुलांपेक्षा मुलींच शिकण्याचे प्रमाण वाढ्ले आहे. हळुहळु का होईना बदल नक्किच होत आहेत.

ह्या नवनेतृत्वाकडे कमतरता आहे ती फक्त अभिव्यक्तिक्षमतेची आणि अभिव्यक्तिसामर्थ्याची. हे लोक प्रमाणित भाषेत स्वतःला अभिव्यक्त करण्यात कमी पडतात>>>>>>> हिरा +१००

हीरा, तुमच्या पोस्ट्स सहसा पटतात पण यावेळची समजली नाही. काही ठराविक क्षेत्रे सोडली, त्या लिस्ट मधल्या अनेक क्षेत्रांत ब्राह्मणेतर लोक अनेक दशकांपासून आहेत. बांधकामाशी संबंधित सर्व क्षेत्रे, लष्कर, चित्रपटाशी संबंधित सर्व क्षेत्रे ई. आणि तेथे उल्लेख नसलेली पण या विषयाशी संबंधित - सरकारमधली, गावागावांमधली विविध सत्ताकेन्द्रे, सार्वजनिक व खाजगी उद्योग, पक्ष संघटना ई मधेही.

दुसरे म्हणजे अभिव्यक्तीचा या विषयाशी संबंध कळाला नाही. प्रमाण भाषेचे स्तोम ई. सुद्धा. प्रमाण भाषेचे स्तोम कायमच राहणार (त्या भाषेला "शुद्ध" म्हणणे व तशी नो बोलणार्‍यांना हिणवणे हे चुकीचे आहे, पण तो वेगळा विषय आहे) - कारण कोणत्याही भाषिक समाजाला एक प्रचलित प्रमाण भाषा लागतेच. आणि प्रमाण भाषा सार्वजनिक लेखन, भाषण ई साठी लागेल - त्या त्या समाजातील लोकांशी संवाद साधताना मुळातच प्रमाण भाषेची गरज पडायला नको.

त्यामुळे खडीसाखर यांचा जो मुद्दा आहे, ही कोणत्याही समाजातील वाईट परिस्थितीतून वर आलेल्यांनी इतरांना मदत करण्याबद्दल - त्यात प्रमाण भाषा, अभिव्यक्ती वगैरेंचा अडसर यायची काहीच गरज नाही.

Pages