बदलापूर - पीके - रहस्य

Submitted by दिनेश. on 3 August, 2015 - 22:38

अंगोला ला गेल्यापासून भारतीय चित्रपटासाठी मला भारतवारीची वाट बघत बसावे लागते. लुआंडा ते दुबई या एमिरेटस च्या फ्लाईटपासून याची सुरवात होते. हा प्रवास रात्रीचा असल्याने बाहेर बघण्यासारखे काही नसते. त्यामूळे किमान तीन चित्रपट बघून होतात.

यावेळेस बदलापूर , पीके आणि रहस्य बघितले. याची भरपूर चर्चा मायबोलीवर झालेलीच आहे, म्हणून बहुतेकांनी हे चित्रपट बघितले असतील असे गृहीत धरतोय ( स्पॉयलर का कायसे म्हणतात ते !! )

बदलापूर

हा मला सर्वात आवडलेला चित्रपट. सर्वात मुख्य कारण कथा. बदला, इंतकाम नावाचे किंवा विषयाचे अनेक चित्रपट आलेत, पण त्यात बदला घेण्यावरच जास्त फोकस होता इथे मात्र त्यातील फोलपणा जास्त महत्वाचा मानला गेलाय. ते मला सर्वात जास्त भावले. अगदी विद्याधर पुंडलिक यांची चक्र हि एकांकिका आठवली.

वरुण चे कौतूक वाटले. आपल्या गुडी गुडी इमेजमधून बाहेर पडण्याचा त्याचा प्रयत्न चांगलाच जमलाय. सर्वच कलाकारांचा अभिनय उत्तम आहे.
मला यातला लूक्स चा केलेला विचार खुपच आवडला. वरुण आणि हुमा चा आधीचा आणि नंतरचा लूक परफेक्ट जमलाय. १५ वर्षांचा काळ त्यातूनच जाणवतो. अर्थात त्या दोघांनी घेतलेली देहबोली आणि आवाजावरची मेहनतही जाणवते. पुर्वी ( आठवा शर्मिला टॅगोरचे चित्रपट ) असा विचार केलाच जात नसे. त्यातले म्हातारपण बेगडी वाटत असे. वरुणची बदललेली हेअरस्टाईल आणि हुमाच्या केसाचा बदलेला रंग हे पण छानच.

यातली सर्वच घरे अगदी अस्सल वाटतात. सर्व पसार्‍यासकट !
सर्वच स्त्री व्यक्तीरेखांना स्वतःचा खास रंग आहे. अगदी मोजक्या प्रसंगातून ते व्यक्तीमत्व ऊभे राहते. अपवाद अश्विनी काळसेकरचा, तिला आणखी वाव मिळायला हवा होता.

नवाजुद्दीनचे करावे तेवढे कौतूक कमीच.

यातल्या अगदी मोजक्या गोष्टी मला खटकल्या.

बदलापूर हे शीर्षक नको तेवढे ढोबळ वाटले. बदलापूरला थ्रू ट्रेन्स थांबत नाहीत हे इथेच एकाने लिहिले होते. वरुण तिथे गाडी स्लो झाल्यावर उडी मारतो असे दाखवता आले असते. किंवा चेन खेचून उतरतानाही दाखवता आले असते.

दिव्याच्या स्क्रॅबलवर आलेला शब्द रिव्हेंज पण नको तितका ढोबळ. तिचा एक प्रसंग नंतर फ्लॅशबॅक मधे दिसतो.
तो इन लाईन असता तर, या क्लू ची गरज नव्हती.

पीके..

या जगात देव अस्तित्वातच नाही.. इतका प्रखर नास्तिकवाद भारतीयांना झेपणारा नाही आणि अर्थातच चित्रपट निर्मात्यांनाही. तशी अपेक्षाही ठेवता येत नाही त्यांच्याकडून. त्यामूळे अगदी परग्रहावरूनही आलेला जीव, आपल्याला सर्वांना घडवणारा तो कुणीतरी.. असे संवाद बोलतो. ते मला तरी पटत नाहीत.

या चित्रपटावर झालेला धार्मिकतेचा आरोप मात्र मला पटला नाही. अगदी बौद्ध आणि जैन धर्म सोडला तर इतर धर्मांवर योग्य ती टीका केलेली आहे.
आमिरचा अभिनय उत्तम असला तरी डोळे कायम वटारलेले ठेवलेले असल्याची त्याला त्रासदायक ठरेल अशी बाब टाळता आली असती. अनुष्काचा लिप जॉब मलाही खटकला. ( विमानातील व्हर्जनमधे संजय दत्तचे आणि सुशांतचे गाणे कापलेले होते. )

तरी वर लिहिलेल्या मुद्द्यामूळे मला शेवट फारच ढोबळ वाटला.

आता खटकलेल्या गोष्टी.

प्रगत तंत्रद्यान असलेल्या लोकांचे रिमोट कंट्रोल इतके बटबटीत म्हणजे कुणाला शिवाच्या डमरूचा मणका असेल असे वाटावे, असे का असावे ? ते एकाद्या चिपच्या स्वरुपात, शरीरात लपवलेलेही असू शकले असते. शब्दाविण संवाद साधणार्‍या जमातीला ते शोभले नाही.

जग्गूचा हात काही मिनिटेच धरल्यावर जर पीकेला त्या दिवसाचे सर्व तपशील समजतात तर एखादी भाषा डाऊनलोड करण्यासाठी सहा तास का लागावेत ? जी व्यक्ती इथे संशोधनासाठी आलीय तिला या ग्रहावरचा भाषा हा एक महत्वाचा घटक आहे, हे का माहीत नव्हते ?

हलणार्‍या गाड्या हे भारतात इतके कॉमन आहे का ? वाळत घातलेले कपडेही त्याला पळवता आले असते.
प्रगत तंत्रज्ञानाचे आणखी कुठलेच दाखले दिलेले नाहीत. पीके कडे कुठलेही खास कौशल्ये दिसत नाहीत.
( म्हणजे उडणे, वेगात जाणे, टाईम ट्रॅव्हल करणे, जागच्या जागी वितळणे वगैरे हो.. म्हणजे ते नै का, हॉलिवुडात दाखवतात तसे Happy )

जग्गूच्या लहानपणी त्या बाबाचे फोटो सगळीकडे ( अगदी नको तिथे ) असतात, मोठेपणी कुठे गायब होतात म्हणे ? असो, तो मला ओह माय गॉड पेक्षा कमीच वाटला.

रहस्य..

हे तिन्ही चित्रपट मी अर्धवट झोपेत बघितले आणि विमानात दाखवताना काही काटछाट झालेली असल्याची शक्यता आहे तरी हा चित्रपट मला खुपच उद्वेगजनक वाटला.

अनेकांनी याची तारीफ केली होती, तरी नेटाने प्रयत्न करून ( म्हणजे झोप टाळून ) बघितला आणि उरलेली झोपही उडाली.
अनेक प्रश्न पडले, बघा कुणाला शंकासमाधान करता आले तर ( स्पॉयलर आहेच. पण ज्यांनी अजून बघितला नाही त्यांनी हे मुद्दे लक्षात ठेवून बघितला तर जास्त चांगले )

सी बी आय चा तपास अधिकारी एखाद्या खाजगी गुप्तहेरासारखा ( करमचंद सारखा ) तर्‍हेवाईक का दाखवलाय ? का केवळ कलाकाराचा आग्रह म्हणून. कारण हा तर्‍हेवाईकपणा सोडला तर यात अभिनयाला फारसा वावच नाही. सरळसोट भुमिका आहे.
यात वैद्यकिय, गुन्हेतपास, न्यायदान आणि तर्कशास्त्र या बाबतीत अनेक घोळ घातलेले आहेत.

१) स्कालपेल हे अत्यंत धारदार असते. तसेच ते अगदी सर्जरीच्या वेळेपुर्वी ऑटोक्लेव्ह करुन वापरतात. अगदी व्हीजिटींग सर्जनही ते स्वतःजवळ बाळगत नाही. आणि कापडी वा चामड्याच्या पिशवीतही ते ठेवत नाहीत. ( साती, जामोप्या प्लीज प्रतिसाद द्या. )

२) जीव जाईल इतका डिप कट गळ्यावर घेतल्यावर भरपूर रक्तस्त्राव होईल आणि ती व्यक्ती प्रचंड तडफडेल. ( आठवा हरेराम मधल्या राणी मुखर्जी वरचा हल्ला ) तसे काही झालेले इथे दिसत नाही.

३) तपास अधिकार्‍याची बायको त्याला देऊ केलेल्या लाचेबद्दल विचारते, तिला कसे कळते ते ? नवर्‍यानेच सांगितल्यावर ना. तपास अधिकारी तपासाचे सर्व तपशील बायकोला सांगेल ?

४) जमीनीवरचे लाकडी फ्लोअरींग अगदी सफाईदारपणे केलेले असते. ते उचकटणे सहज शक्य नसते. व्यवसायाने सुतार वा त्यातला तज्ञ नसलेल्या व्यक्तीला ते उचकटणे सहज शक्य नसते आणि नंतर ते सुबकपणे टिकठाक करणेही शक्य नसते. ते ठिकठाक केल्यावरही त्यात फटी असतातच. मृतदेहाचे कुजणे लगेच सुरु होते. वरून टाकलेल्या नॅप्थालिनच्या ओंजळभर गोळ्यांनी ते थांबणार नाही. आणि त्याचा दुर्गंध सगळीकडेच पसरेल. त्यासाठी त्या फळ्या परत उघडायची गरज नव्हतीच.

५) ज्या काळात ती खुनी व्यक्ती हे सगळे उद्योग करत होती, तो काळ फार तोकडा वाटतो. म्हणजे खुन करण्याचा निर्धार करणे, तो करणे, ती व्यक्ती मरेपर्यंत वाट बघणे, त्यानंतर त्या घरगड्याशी डिल करणे, त्याच्याकरवी फ्लोअरींग उचकटणे, त्याच्या सर्व वस्तू गोळा करणे ( त्याचा एक वेगळाच घोळ आहे ) त्याचा खून करणे, तो मरण्याची वाट बघणे, त्याला गाडणे, त्याच्या वस्तू गाडणे, त्यावर नॅप्थालीनच्या गोळ्या टाकणे, फ्लोअरींग ठिकठाक करणे, त्यावर कार्पेट टाकणे, त्यावर फर्निचर ठेवणे... याला किती वेळ लागेल हो ?

६) त्या घरगड्याच्या वस्तू त्याच्या कपाटातून कोण आणते ? तो स्वतः कि खुनी ? ते करताना रेमीला जाग येत नाही ?

७) गुळगुळीत फ्लोअरींगवरून फर्निचर सरकवताना असा कितीसा आवाज येतो ? मधे पोकळ असणार्‍या सिलिंगमधून तो खाली झोपलेल्या रेमीला ऐकू येतो ? मग तिला त्यापुर्वी केलेल्या उद्योगाचा म्हणजे ते उचकटण्याचा, त्यात बॉडी टाकण्याच्या, वर त्या फळ्या ठेवण्याचा आवाज येत नाही ?

८) मुसलमान झाला म्हणून तो रोज बीफच खातो का ? केवळ मुसलमानच बीफ खातात का ? एवढुश्या बाबीवरून ते ठरवता येते का ?

हे सगळे मुद्दे गौण ठरावे असे दोन अत्यंत अपमानास्पद उल्लेख या चित्रपटात आहेत.

रेमीचे मेडीकल केल्यानंतर त्याचा रिपोर्ट करणारी गायनिक जी विधाने करते त्याचा उपयोग करून तपास अधिकारी जे कनक्ल्यूड करतो ती बाब तसेच, रेमीच्या तरुणपणीचे चित्र आणि मृत मुलीचा फोटो, यासा संबंध तो लावतो ते हास्यास्पद आहे. दोन व्यक्तींमधले आई अपत्य संबंध सिद्ध करण्यासाठी डी एन कॅरिओटायपिंग ( बरोबर शब्द आहे ना ? ) केले जाते. ती टेस्ट कायद्यालाही मान्य आहे. आणि केवळ तिच एक टेस्ट सध्यातरी उपलब्ध आहे, हो ना ?

खूनी व्यक्तीने करून घेतलेल्या वैद्यकीय तपासणीचा सर्वांसमोर केलेला उल्लेख अत्यंत अपमानास्पद आहे. तो त्या व्यक्तीच्या खाजगी बाबीवरचा हल्ला आहे. मला नाही वाटत कुठलाही जबाबदार अधिकारी असा उल्लेख करेल आणि माझ्या समजूतीप्रमाणे न्यायालयही हा पुरावा (?) ग्राह्य मानणार नाही.

ज्या कुणी ही कथा रचली असेल, त्याने हे उल्लेख जबाबदार व्यक्तीकडून का तपासून घेतले नाहीत ?

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन्ही चित्रपटांची खूप छान समीक्षा.
बदलापूर वरुण च्या वेगळ्या प्रकारच्या रोल साठी बघावसा वाटतोय. पिके च्या सुद्धा खटकणार्‍या गोष्टींवर तुम्ही नेमके बोट ठेवले आहेत.

मस्त लिहिलय..
बदलापुर फक्त आणि फक्त नवाजुद्दीन साठी बघीतला होता..मुळात ते त्रिकुट पहिल्यापासुनच डोक्यात गेल्यामुळे वरुण धवन कडून अपेक्षा नव्हतीच पण पठ्ठ्यानं बरच चांगल काम केलयं..तरी शेवटपर्यंत माझ्यातरी डोक्यात नवाजच राहतो.. विनय पाठक ला का तर वाया घालवल्यासारखा वाटला मला..

पीके तर अजिब्बात आवडला नै..खुपच बाष्कळपणा दाखवलाय..
हलणार्‍या गाड्यांबाबत मत पटलं..ओह माय गॉड च्या आजुबाजुला पन जात नै..खुपसा चोरल्यासारखा वाटतो..
अक्षय मधे खरच खुप कॅलिबर आहे..तो वापरत नै हा त्याचा चॉईस म्हणा. पण जेव्हा जेव्हा असे रोल समोर ठेवल्या जातात तेव्हा तो कम्माल करतो..ओह माय गॉड मधे पण खुप संयत अभिनय आहे त्याचा..
इथ अति फेम मुळे म्हणा पीके हे कॅरेक्टर दिसतच नाही..फक्त अमिरच दिसतो मलातरी.. अमिरचा शाहरुख आणि अमिताभ व्हायला लागलाय अस वाटतय जरा जरा..

रहस्य , नै बघीतला म्हणुन सगळ काही डोक्यावरुन गेल..भेटला बघायला तर पाहिन अस वाटतय Happy

प्रचंड इच्छा असूनही 'बदलापूर' पाहता आला नव्हता आणि अजूनही पाहू शकलेलो नाही.
आमीर खान इरीटेट करायला लागला आहे, त्यामुळे आणि काही कर्मठ मतांमुळे 'पीके' बघावासा वाटला नव्हता आणि पाहिलाही नाही. आजही पाहायची इच्छा नाहीच.
'रहस्य' बद्दलही खूप ऐकलं आहे आणि तो पाहायचा आहेच.

तुम्ही अत्यंत मुद्देसूद व अभ्यासपूर्ण समीक्षा केली आहे. ३ पैकी २ तर नक्की पाहणारच आहे, तेव्हा ह्या सगळ्याचा खूप उपयोग होईल. जमल्यास मी चित्रपट पाहिल्यानंतर माझीही मतं मांडीन.

scalpel há s two parts.
handle
Blade

blades are now use and throw type.sterile blades are available in pack. Just open and attach to handle

Ranjit, must watch by keeping these points in mind.

labadkolha, you will be shocked to see, how badly the medical profession is represented here. I am not saying that medicos won't do this, but they will do it smartly, if at all

Proud

In forensic oral tests following qest are asked...

1. You want to kill your wife.. How will you do without any legal consequences?

2. How to rape somebody without leaving any evidences?

3. Which is the best poison for suicide ?

4. Which poison you will use to kill somebody without leaving any evidences ?

Rofl

No wonder, those who can answer these questions, are smart Happy

पण मी जे शेवटचे दोन मुद्दे लिहिलेत त्यावर चित्रपट बघितलेल्यांनी लिहावेच. माझ्या मते तरी ते अपमानास्पद आहेत, आणि ते संवाद चित्रपटात असू नयेत. एखादे अशिक्षित असणारे पात्र जर असे संवाद म्हणता तर ते एकवेळ क्षम्य पण सरकारी अधिकारी, असे संवाद म्हणतोय हे मला फार गैर वाटले.

दिनेशदा, मस्त निरिक्षणं.. बदलापूर मलाही आवडला, फक्त नवाजुद्दीन साठी बघीतला (तसाच बजरंगी ही).
पी़के अजिबात नाही बघितला. आमिर कधीकाळी आवडायचा आता बघवत नाही म्हणून..
रहस्य खरंच खूप फास्ट आहे. सलग बघताना चांगला वाटतो पण नंतर खूप लूपहोल्स लक्षात येतात..
मुळात केके चे कॅरॅक्टरच उगिच स्टायलाइज केलेले आहे. त्याचे संवाद खरंच शोनाहो!! फक्तं तो केके आहे म्हणून बेअरेबल आहे.
..स्पॉयलर अलर्ट..
१. डॉ. चे रेमी वर खूप प्रेम असते पण तो तिच्याशी लग्न करणे शक्य नव्हते असं केके म्हणतो.. का शक्य नाही, फक्त ती गरीब आहे म्हणून?
२. खर्‍या खुन्याचा मोटिव काय तेच पटत नाही.. कारण डॉ. चा एवढा राग होता तर त्याचाच खून केला असता ना. आणि त्याला त्रास होइल म्हणुन मुलीला मारलं तरी शेवटी त्यालाही मारलं.. काय स्क्रिप्ट आहे हे Uhoh
३. डॉ. ची ढीगभर अफेअर्स Uhoh
४. जर तो मुस्लिम मुलगा मुलीच्या घरात सहज येतो तोही रात्री ११ वाजता तर मग त्याना हॉटेलमध्ये जायची काय गरज Uhoh Uhoh
मी माबो वर वाचूनच सीडी आणून पाहिला. काहीही जोडून तयार केलेलं रहस्य आहे ते Lol

The murderer herself applies to transfer the case from police to CBI, while she had already bribed the police to manage the evidence. LOL.
The security guard keeps the main gate wide open and goes to sleep

तिची अ‍ॅलिबी देखील कच्ची असते.

मी अमूक अमूक केसमध्ये सर्जरी करत होते म्हणे... तर तिथे दुसराच सर्जन त्या दिवशी असतो.

हाच अगदी कच्चा दुवा.

उरलेली हुशारी पाण्यात जाते.

मस्त लिहीलय..

पीके बघायचा प्रयत्न केला पण बघवला नाही..
बदलापूर बघितला आवडला ...काही गोष्टी जरी सुटुन गेल्यात / त्रुटी राहुन गेल्यात तरी आवडला... नवजुद्दीन करतोच चांगलं पण वरुण धवन ने पण चांगलं केलय.. बाकीचे पण मस्त आहेत..

>> ३ पैकी २ तर नक्की पाहणारच आहे <<

काल ३ पैकी १ पाहिला. 'बदलापूर'. अगदी लक्षात ठेवून शीर्षकांपासून शेवटपर्यंत पाहिला. क्लास अपार्ट ! हा चित्रपट 'फर्स्ट डे फर्स्ट शो' पाहायला काय मजा आली असती ! काहीच आगा-पिच्छा माहित नसताना जेव्हा एखादा जबरदस्त चित्रपट 'सर्प्राईझ पॅकेज' ठरतो, तेव्हा जो थरारक आनंद मिळतो, त्याला तोडच नाही. काल टीव्हीवर पाहाण्याआधीपासूनच माहित होतं की चित्रपट चांगला आहे, त्यामुळे 'किती' चांगला आहे, हेच पाहणं उरलं होतं.

सॉलिड चित्रपट.
जमलं तर सविस्तर लिहीन, सावकाश..!!

धन्यवाद दिनेशदा!

रसप.. अवश्य लिहाच.. मला यातला फक्त शेवट्चा नाच खटकला.. फार रसभंग करतो. तो जर दम लगाके हैशा सारखा वेगळा पाडला असता तर ठिक..