ढवळे - चंद्रगड ते ऑर्थरसीट (महाबळेश्वर) ट्रेक

Submitted by कॉपरमाईन on 2 August, 2015 - 21:40

हा ट्रेक मी सुमारे वर्षभरापूर्वी केला होता, त्यामुळे तपशीलात चूकभूल होण्याची शक्यता आहे. त्यावेळच्या काही नोट्सवरुन हे वर्णन लिहीत आहे. जाण्यापूर्वी आणखीन माहीती करुन घ्यावी.

********************************************************************************************************

मुंबई / पुण्याहून पोलादपूरला यावे. पोलादपूरहून तानाजी मालुसर्‍यांचे गाव असलेल्या उमरठ गावात जाणारी बस पकडावी. उमरठहून चंद्रगडाच्या पायथ्याशी असलेलं ढवळे गाव ७ किमी वर आहे. पोलादपूरहून संध्याकाळी थेट ढवळे गावात मुक्कामाची बस येते.

ढवळे गाव ते चंद्रगड

ढवळे हे चंद्रगडाच्या पायथ्याचे गाव असले तरी गावातून चंद्रगड दिसत नाही. ढवळे गावातल्या मंदिराच्या उजव्या बाजूने १५-२० मिनीटात शेलारवाडी गाठावी. वाडीतून समोर दिसणार्‍या डोंगराच्या दिशेने सुटावे. या डोंगरावर न चढता त्याला फेरी मारून पुढे आल्यावर एक दरी लागते. आधी उजव्या काठावरुन आणि मग डाव्या काठावरुन दरी ओलांडल्यावर चंद्रगडाचा पायथा गाठता येतो. इथे चंद्रगड दर्शन असा मोठा बोर्ड गावकर्‍यांनी लावला आहे (वर्षभरापूर्वी तरी होता). इथून पुढे मळलेल्या वाटेने चंद्रगड चढावा. भुसभुशीत माती (स्क्री) आहे त्यामुळे जपून!

चंद्रगडाच्या सुरवातीच्या मातीच्या स्क्री नंतर एक छोटं पठार येतं. या पठारावरून एक छोटासा रॉक पॅच आहे. दोराची आवश्यकता लागत नाही पण असल्यास उत्तम. रॉकपॅचवर थोड्या खोबणी आहेत. रॉकपॅच चढून गेल्यावर चंद्रगडाच्या माथ्यावरचं पठार येतं.

ढवळे गावातून चंद्रगडापर्यंत येण्यास लागणारा वेळ सुमारे १ १/२ ते २ तास.

गडाच्या पठारावर वाटेच्या लगतच एका खड्ड्यात शिवलिंग आणि नंदी आहे. गडाची तटबंदी ढासळलेली असली तरी अद्यापही बर्‍यापैकी उभी आहे. डाव्या तटबंदीखाली पाण्याची ५ टाकी आहेत, पण तिथे जाण्याचा मार्ग पूर्णपणे ढासळलेला आहे. उजव्या हाताला काही चौथरे आणि एक पाटा-वरवंटा आहे. या वाटेने पुढे गेल्यावर उत्तरेच्या कड्याच्या काही पायर्‍या उतरल्यावर थंड पाण्याचं टाकं आहे. हे पाणी पिण्यास चांगलं आहे. इतर कोणत्याही टाक्यातील पाणी पिण्यास योग्य नाही. उत्तरेच्या कड्यावरुन समोरच मंगळगड (कांगोरी) किल्ला दिसतो.

चंद्रगड ते बहिरीची घुमटी / जोरचे पाणी

या ट्रेकमधला हा सगळ्यात कठीण आणि स्टॅमिना कसाला लावणारा भाग.
चंद्रगडावरील टाक्यातून भरपूर पाणी भरुन घ्या. पुढे किमान ५ - ६ तास पाणी मिळणार नाही!

चंद्रगड चढताना लागलेला रॉक पॅच उतरुन खाली उतरा. इथून उजव्या बाजूची वाट परत ढवळे गावात जाते. ती न प़कडता डाव्या हाताची वाट पकडा. ही वाट एका मोठ्या घळीत उतरते. या घळीतून डाव्या बाजूला वळून चंद्रगडाच्या भिंतीच्या उजव्या बाजूने आणि दरीच्या डाव्या बाजूने ट्रॅव्हर्स करत ही कोल पार करावी. हा पॅच प्रचंड घसरणीचा गवत आणि स्क्रीने भरलेला आहे त्यामुळे काळजी घ्या!

कोल पार केल्यावरही स्क्री आणि नंतर दगडांमधून खाली उतरुन एक ओढ्चाची वाट लागते. (२०-२५ मिनीटे). हा ओढा आल्यावर उजव्या बाजूला (दक्षिण दिशेने) चढ सुरु होतो. हा पॅच जंगलातून आहे. दरीच्या उजव्या हाताने ही वाट सतत वर चढत एका नळीपाशी येते. इथे यू टर्न मारून पुन्हा मातीच्या स्क्री मधून वर चढत गेल्यावर शेवटी एक उघडा माळ लागतो. मागे वळून पाहिल्यास चंद्रगड खाली दिसतो.

या माळावरुन अर्धवर्तुळाकार आकाराने जाणारी वाट आहे. ही वाट संपते तिथे एक रॉक पॅच लागतो. हा रॉक पॅचही सोपा आहे. इथेही दोराची आवश्यकता लागत नाही. हा रॉक पॅच पार केल्यावर समोर काही देव-देवतांच्या दगडी मूर्ती दृष्टीस पडतात. हीच बहिरीची घुमटी!

या घुमटीच्या आधी उजवीकडे गेलेल्या वाटेवर पाण्याची टाकी आहेत. पूर्वेच्या दिशेला जाणारी ही वाट जोर गावात उतरत असल्याने याला जोरचे पाणी असं म्हणतात. हे पाणी थंडगार असून पिण्यास योग्य आहे. चंद्रगड सोडल्यावर पाणी मिळण्याचं हे एकमेव ठिकाण! चंद्रगडापासून बहिरीच्या घुमटीपर्यंत येण्यास किमान ५ ते ६ तास लागतात. वाटेत जेवणासाठी ब्रेक घेतल्यास आणखीन वेळ लागू शकतो.

बहिरीची घुमटी ते गाढवाचा माळ

बहिरीच्या घुमटीवरुन मागे येऊन जोरच्या पाण्यावरुन उजव्या हाताला जाणार्‍या वाटेने अर्ध्या तासाची चढण चढली की एक मोठे पठार लागते. या पठारावरुन दक्षिणेला महाबळेश्वर आणि आर्थरसीट पॉईंट स्पष्ट दिसतो. हे पठार म्हणजेच गाढवाचा माळ!

गाढवाचा माळ ते आर्थरसीट पॉईंट

गाढवाच्या माळावरुन रुळलेली वाट आर्थरसीट पॉईंटच्या दिशेने जाते. वाटेत काही ठिकाणी जंगलाचा पट्टा लागतो. शेवटच्या पॅचमध्ये मातीची स्क्री आहे त्यामुळे सावधानता बाळगा. अगदी शेवटच्या टोकाला सुमारे १५ फूट उंचीचा एक रॉक पॅच आहे. अर्थात हा रॉक पॅच तसा सोपा आहे. आधारासाठी मध्ये खोबण्याही आहेत. दोराची आवश्यकता नसली तरी सुरक्षितता म्हणून दोर बांधण्यास हरकत नाही. हा रॉकपॅच चढून गेल्यावर थेट ऑर्थरसीट पॉईंट येतो. गाढवाच्या माळावरुन ऑर्थरसीटवर येईपर्यंत सुमारे १ १/२ ते २ तास लागतात.

काही महत्वाच्या गोष्टी -

गाईड - या ट्रेकसाठी ढवळे गावातून गाईड घेणं अत्यावश्यक आहे. अनेकदा हे गाईड घुमटीच्या आधी असलेल्या जोरच्या पाण्यापर्यंतच येतात कारण तिथूनच दिवस मावळण्यापूर्वी ढवळ्यात परतणं त्यांना शक्यं होतं. पार ऑर्थरसीटपर्यंत गाईड हवा असल्यास त्यांना महाबळेश्वरहून बसने परते येण्याचे वेगळे पैसे द्यावे लागतात. गाईड मिळत नसल्यास सगळ्या खाणाखुणा नीट समजावून घ्या. वाटेत कोणीही भेटण्याची शक्यता लाखात एक इतकी आहे.

पाणी - ढवळे गावातून निघाल्यावर चंद्रगडाच्या टाक्यातील पाणी मिळतेच असे नाही. त्यामुळे थेट घुमटीपर्यंत पाणी मिळणार नाही हे गृहीत धरुन ढवळ्यातूनच भरपूर पाणी बरोबर घेऊन निघावे.

मेडीसिन्स - पाणी कमी आणि श्रम जास्तं अशी शक्यता असल्याने आणि डीहायड्रेशनमुळे क्रॅम्प्स येण्याची खूप शक्यता आहे. त्यामुळे त्या दृष्टीने आवश्यक ती मेडीसिन्स जवळ ठेवावी.

कपडे - या ट्रेकला दाट जंगलातून चढाई असल्याने शक्यतो शॉर्ट्सचा वापर टाळावा. तसंच हातातही फुल टी-शर्ट असलेलं कधीही श्रेयस्कर.

रात्रीचा मुक्काम - हा ट्रेक एक दिवसाचा खूप् दमछाक करणारा वाटत असल्यास बहिरीच्या घुमटीशी पोहोचल्यावर मुक्काम करु शकता. अर्थात मुक्कामाचा बेत असल्यास बरोबर टेन्ट घ्यावा लागेल. घुमटी किंवा गाढवाचा माळ इथे रात्री उघड्यावर मुक्काम करु नये. या जंगलात कोल्हे आणि बिबट्यांचा वावर असल्याने आवश्यक ती काळजी घ्यावी. रात्रभर पेटेल अशी शेकोटी पेटवण्यास विसरु नका.

रोप - या ट्रेकमध्ये दोन-तीन रॉक पॅच आहेत. अर्थात हे रॉक पॅच चढाईच्या दृष्टीने तसे सोपे असले आणि दोन्ही रॉक पॅचमध्ये खोबण्या असल्या तरी २० ते ३० मीटरचा रोप जवळ असल्यास उत्तम.

सर्वात महत्वाचं म्हणजे हा ट्रेक पावसाळ्यात करु नका! पावसाळ्यात बहिरीची घुमटी गाठणं हे त्या घसरणीवरुन निव्वळ अशक्यं आहे. पावसाळा संपल्यावर किंवा सर्वात उत्तम म्हणजे थंडीत करा!

एक दिवसात हा ट्रेक केला तर आपण जवळपास समुद्रसपाटीवरुन थेट महाबळेश्वर (४७२० फूट) उंची गाठतो. त्यामुळे पायांचे तुकडे पडू शकतात :).

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users