तुम मुझे यूं भुला ना पाओगे...(रफी पुण्यस्मरण)

Submitted by अतुल ठाकुर on 30 July, 2015 - 13:41

mohd-rafi.jpg

मला क्लासिक गणल्या गेलेल्या पुस्तकांचं, चित्रपटांच हे वैशिष्ट्य वाटतं कि काळागणिक त्यातुन नवनवीन शक्यता दिसु लागतात. त्यामुळे त्यांच्यावर जुनेपणाची कळा कधी येतच नाही. रफीच्या गायकिचा मला जाणवलेला हा विशेष आहे. परवाच एक दुर्मिळ म्हणता येईल असं रफीचं गाणं अचानक ऐकायला मिळालं. राजकपूरसाठी रफी गात होता. "मेरा नाम जोकर" मधुन हे गाणे कापले गेले आहे. पण "सदके हीर तुझपे" ऐकुन अक्षरशः थक्क झालो. राजकपूरला त्याच्या आवडत्या मुकेशला या गाण्यासाठी घेताच आलं नसतं हे जाणवलं. राजकपूरने देहबोलीतुन आणि रफीने आवाजातुन दर्द उभा केला आहे. त्यानंतर आणखि एक अलिकडेच ऐकलेले गाणे म्हणजे "रहेगा जहां मे तेरा नाम" हे के. आसिफ च्या त्याच्याकडुन अपुर्ण राहिलेल्या "लव्ह अँड गॉड" चित्रपटातील गाणे. यात तर मन्नाडे आणि तलतसारखी मोठी माणसे आहेत. पण शेवटी "सबका दामन भरने वाले" अशी रफीने सुरुवात केली कि वातावरणच बदलुन जाते. अशा या हिन्दी चित्रपटसंगीताच्या बादशहाला काळाच्या पडद्याआड जाऊन आज ३१ जुलैला तब्बल चौतीस वर्षे झाली पण या माणसाच्या आवाजाची नशा आजही उतरत नाहीय. किंबहुना माझे रफी व्यसन तर वाढतच चालले आहे असे मला वाटते. आज रफीच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने रफीसारख्या गाणार्‍या गायकांचा एक काळ येऊन गेला त्याचा परामर्श घ्यायचा मानस आहे. खरं तर या गायकांना घेताना ही माणसे रफीची जागा घेऊ शकत नाहीत हे त्या संगीतकारांनादेखिल माहित असणारच. पण आवाजाशी असलेलं काहीसं साम्य कदाचित त्या संगीतकारांना भुरळ पाडत असावं.

१९७३ साली आलेल्या "मेरे गरीब नवाज" चित्रपटात "कस्मे हम अपनी जान की खाये चले गये" हे नितांतसुंदर गाणे गाऊन अन्वरने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. रफीसारख्या गाणार्‍या गायकांमधला हा बहुधा पहिला गायक. आणि रफीच्या हयातीत ज्याचा उदय झाला असा एकमेव गायक. पहिल्या गाण्याने अन्वरने खुप आशा निर्माण केली होती. त्यानंतर त्याला गायला मिळालं ते एकदम राजेश खन्नासाठी. "जनता हवलदार" मधलं "तेरी आंखों कि चाहत में" खुप गाजलं. पण पुढे फारसं काहीच झालं नाही. "विधाता" मध्ये अगदी सुरेश वाडकर बरोबर दिलीपकुमारसाठी अन्वर "हाथों कि चंद लकिरों का" गायला. पण त्याचा फारसा प्रभाव जाणवला नाही. दिलीपकुमारच्या अभिनयातील धार रफीच्या आवाजाने वाढत असे. रफीचा आवाज दिलीपकुमारसाठी जास्त धारदार होत असे. ही किमया अन्वरला करता आली नाही. "तकदीर है क्या मै क्या जानुं" म्हणताना ती धार तेथे नव्हती. पुढे "मोहोब्बत अब तिजारत बन गयी है" सारख्या एखाद्या गाण्याचा अपवाद वगळता हा गायक लुप्त होऊन होऊन गेला.

पुढे रफी पैगंबरवासी झाल्यानंतर काही वर्षांनी "पर्बतोंसे आज मै टकरा गया" म्हणत शब्बीर कुमार येथे प्रवेश केला. "तुमने दी आवाज लो मै आ गया" म्हणणार्‍या या गायकाला लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी साक्षात लता बरोबर "गुलामी" मध्ये "जिहाले मिस्किन माकुन बारंजीश" साठी गाण्याची संधी दिली. हे गाणं आजदेखिल लोकप्रिय आहे. पण पुढे विशेष काही घडलं नाही. "कुली" "मर्द" सारख्या चित्रपटांमध्ये शब्बीरकुमार अमिताभसाठी गायला. मात्र किशोर गेल्यावर अमिताभचा आवाजदेखिल हरपल्यासारखाच झाला होता. शब्बीरकुमारला वापरुन तेथे रफीसदृश आभास निर्माण होणार नव्हता. अभिताभची सुपरस्टार म्हणुन कारकिर्द संपत आली होती. त्याकाळात अभिताभसाठी गायली गेलेली गाणी लोकप्रिय झाली नाहीत. "डॉन"चे दिवस संपले होते हेच खरं. पुढे शब्बीरकुमार देखिल मागे पडला. रफीचा काहीसा आभास होत असला तरी बरेचदा त्याच्या गाण्यात लाडिकपणाचा भाग असायचा. जो काहीवेळा त्रासदायक वाटत असे. त्यातल्या त्यात लक्ष्मीकांत प्यारेलालने त्याला बर्‍यापैकी कह्यात ठेवलं होतं हे "जिंदगी हर कदम इक नयी जंग है" ऐकताना जाणवतं.

नंतर मोहम्मद अझीजचा उदय झाला. "मय से मीनासे ना साकी से" सारखी गाणी, गोविंदाचा डान्स, त्यावेळची त्याची लोकप्रियता यामुळे ऐकली गेली. पण मुळात हिन्दी चित्रपट्संगीताचा पडता काळ सुरु झाला होता. मोहम्मद अझीजने गायलेल्या गाण्यांपैकी फारशी गाणी मलातरी आठवत नाहीत. पुढे "उंगलीमे अंगुठी अंगुठीमे नगीना" अशी गाणी येऊ लागली. तीसुद्धा "वो जब याद आये बहोत याद आये" हे रफी कडुन गावुन घेणार्‍या लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्याकडुन. त्यामुळे आम्हीदेखिल १९८० ही स्वतःसाठी चित्रपटसंगीताची मर्यादा आखुन घेतली. त्याबाहेर जाऊन ऐकण्याची वेळ क्वचितच आली. काहीसा भारी आणि जड आवाज असलेला मोहम्मद अझीज काय किंवा काहीवेळा उगाचच लाडीकपणे गाणारा शब्बीरकुमार काय, यांनी त्या त्या वेळी काळाची गरज पूर्ण केली. दोघेही काही काळ गायले. मोठमोठ्या स्टार्ससाठी गायले. मात्र संगीताचे सुवर्णयुग संपले होते. यथावकाश यांचाही काळ संपला.

पुढे केव्हातरी सोनु निगमला रफीची गाणी गाताना ऐकले. ऑर्केस्ट्रात काहीवेळा काहीजण हुबेहुब गायकाचा आवाज काढत गाणे गातात. त्यासारखीच मला हीदेखिल एक बर्‍यापैकी नक्कल वाटली. या सर्व गायकांबद्दल पुर्ण आदर बाळगुन मला असे सांगावेसे वाटते कि या सर्वांना डाव्या हाताच्या करंगळीवर रफी उचलु शकला असता. रफीच्या आवाजाची जादुच अशी होती कि अनेक वर्षे हिन्दी चित्रपटसृष्टीने जेथे जेथे म्हणुन त्या आवाजाशी काही साम्य आढळेल तेथे तेथे त्या आवाजाचा पाठलाग केला. त्यांना संधी दिली. पण बहुतेकांना हे शिवधनुष्य पेलता आले नाही. रफीची रेंज, त्याची विविधता, कलाकाराच्या अभिनयानुरुप, त्यांच्या व्यक्तीमत्वानुसार आवाज देण्याची आश्चर्यकारक क्षमता, रफीचे शास्त्रिय संगीतावरील हुकमत, सर्व तर्‍हेची गाणी गाण्याची सहजता, त्याच्या आवाजातील मखमल, त्याच्या आवाजातील गोडवा हे सारं आणि त्याहीपेक्षा शब्दात न सांगता येण्यासारखं खुप काही दैवी असं रफीकडे होतं. त्यामुळे आज चौतीस वर्षांनंतरदेखिल "जब कभी भी सुनोगे गीत मेरे, संग संग तुम भी गुनगुनाओगे" हे रफीचे म्हणणे खरे ठरल्याचे दिसुन येत आहे.

अतुल ठाकुर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख छान आहे. रफीच्याच अनोख्या गाण्यांवर असस्ता तर अधिक आवडला असता.

त्याच्या आवाजातील मखमल, त्याच्या आवाजातील गोडवा हे सारं आणि त्याहीपेक्षा शब्दात न सांगता येण्यासारखं खुप काही दैवी<<< प्रचंड सहमत

सोनू निगमच्या कारकीर्दीची सुरूवात रफीचा कव्हर व्हर्जन गाणारा टीसीरीजमधला गायक अशी झाली होती, पण त्यानंतर सोनूने स्वतःचा वेगळा ठसा उमटवलेला आहे. सध्याच्या गायकांमध्ये सोनू सर्वात वेगळा आहे, आणि आता तो रफीडुप्लिकेट राहिला नाही हे सर्वात महत्त्वाचं. अर्थात रफीची सर त्याला येणार नाही, पण तरी तो अगदीच वाईट ऑर्केस्ट्रागायक नाही हे निश्चित.

सोनूच्या गाण्यांमधलं हे माझं सर्वात आवडतं. https://www.youtube.com/watch?v=Ym8864Q98Hc

महंमद रफी...दैवी देणगीचे पूर्ण अवतार असलेले हे व्यक्तिमत्व....मी जरी सायन्सचा विद्यार्थी नसलो तरी न्यूटनसंदर्भात काहीसे वाचले असल्याने त्याने सात रंगाचा वापर करून तबकडी फिरविली होती आणि ती फिरताना पांढरी दिसते हे दाखविले होते....अशाच सात स्वरांचा एकच स्वर बनला तर तो किती विविध भावना दाखवू शकतो याचे सुरीले बहारदार उदाहरण म्हणजे रफीजींचा सूर. लौकिक अर्थाने रफी आपल्यात नसले तरी त्यांचा आवाज सदैव आपल्यासोबत असल्याने अतुल ठाकुर यानी लिहिलेल्या लेखांच्या आनंदातून त्यांची आठवण जशीच्या तशी समोर येत राहते.

अतुल यानी रफीच्या रस्त्यावर पाय ठेवलेल्या अनेक गायकांची नावे दिली आहेत तसेच त्यांच्या त्यांच्या छोट्याशा अशा कारकिर्दीतील गाण्यांची उदाहरणेही दिली आहेत....पण एक सोनू निगम सोडल्यास अन्य कोणाही गायकाने रफीची जागा घेण्याचे सामर्थ्य दाखविले नाही हे आपणच नव्हे तर संगीतकारही मान्य करत राहिले आहेत. आता तर गाण्यांच्या तर्‍हाच अशा झाल्या आहेत....आयटम सॉन्ग या नावाच्या....तिथे गायक नव्हेत तर ओरडणारेच हवेत, ज्यांची पैदास नित्यनेमाने होत असते. अर्थात लेखाचा उद्देश्य तो नसून रफींची आठवण आपल्या हृदयी किती आणि कशी वसली आहे त्याबाबत असल्याने अगदी "बैजूबावरा" च्या "मन तरपत हरी दर्शन को..." पासून दिमाखात सुरू झालेला प्रवास कुठेही खंड न पडता चालू राहिला होता. रफीना मी सार्वजनिक कार्यक्रमात हे गाणे लोकाग्रहास्तव गाताना ऐकले होते...तेव्हा "महल उदास और गलिया सूनी..." या ओळी अशा अंदाजाने गायचा की, महलांचे भकासपण त्याच्या आवाजातून जाणवायचे. शेवटी गाणे संपवताना "रखवाले' हे शब्द प्रत्येक वेळी एका सूराने वाढवीत न्यायचे आणि अगदी वरच्या पट्टीत ते गाणे संपवताना त्याना भावनेने सदगदित होतानाही सार्‍या स्टेडियमने पाहिले....हा खरा स्वरांचा सेवक आणि जादूगार.

अतुल यानी लिहिले आहे....".."जब कभी भी सुनोगे गीत मेरे, संग संग तुम भी गुनगुनाओगे" हे रफीचे म्हणणे खरे ठरल्याचे दिसुन येत आहे...." ~ अगदी योग्य आहे हे विधान....ज्या वेळी रफीचा आवाज आणि जोडीला पंडित सामताप्रसाद यांच्या तबल्याच्या नजाकतीची साथ "नाचे मन मोरा मगन तिक ता धीगी धीगी..." यांच्यासोबतीने येते त्यावेळी कानच नव्हे तर मनही थरकून जाते.

किती लिहायचे या जादूभर्‍या आवाजाविषयी असे ठाकुर याना होऊन गेले असणार असे हा लेख सांगत आहेच. प्रतिसादकांचीसुद्धा अशीच अवस्था होईल.

छान अगदी वेगळ्या विषयावरचा लेख.

मोहम्मद रफी..." त्याच्या आवाजातील मखमल, त्याच्या आवाजातील गोडवा हे सारं आणि त्याहीपेक्षा शब्दात न सांगता येण्यासारखं खुप काही दैवी असं रफीकडे होतं." .....अगदी, अगदी. गाइड, काला पानी, हम दोनो.....आहाहा....

बाकी मोहम्मद अज़ीज़, शब्बीर कुमार---त्यांचा किंवा त्यांच्या चाहत्यांचा अनादर नाही करायचा पण तरीही माझ्यासाठी....अ बिग नो.....नो थॅंक्स. खरंच नाही आवडत.
सोनू निगम मात्र खूप आवडतो. स्वंतत्र शैलीने गायला तर उत्तम गायक आहे. प्रती रफी वगैरे मात्र नाही. प्रती रफी कोणीच नाही.

छान धागा आणि विषय... महमद रफी माझा आवडता गायक... आवडणार्‍या गाण्यान्ची यादी मोठी आहेत..

मन तरपत ...
https://www.youtube.com/watch?v=XqwgIFAR7os

मधुबनमे राधिका
https://www.youtube.com/watch?v=2yiG24KHpRA

रफी च्या आवाजाचं सगळं गुणवर्णन शब्दशः मान्य.

अन्वर, मो. अझीझ, शब्बीरकुमार वगैरे लोकांविषयी सहमत.

सोनु निगम रफी सारखा गातो ही 'कॉपी-पेस्ट' तक्रारीपेक्षा, त्याला काँप्लिमेंट आहे असं मला वाटतं, कारण स्वतंत्र-रीत्या देखील(!) तो एक छान गायक आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीला, कळत-नकळत, स्वेच्छेने-अनिच्छेने बहुतांश लोक (कलाकारच नव्हे), प्रस्थापिताच्या मार्गावर चालायचा प्रयत्न करतात (मुकेश, रफी, किशोर कुमार सैगल च्या, किंवा सेहवाग तेंडुलकर च्या). पण त्या छायेतून बाहेर पडून जे स्वतःचा मार्ग आखतात आणी यशस्वी होतात ते स्वतः ईतरांना मार्गदर्शक ठरतात

सोनू निगम हा अत्यंत गुणी आणि मेहेनती गायक आहे. सद्याच्या गायकांमध्ये नक्कीच १ नं.

रफी परत होणे नाही! त्याला एक कारण रफीच्या गायकीला फुलविणारी कविता/नज्म्/गीते आता परत होणे नाही.

रफी साहेब एक आणि एकच. दुसरा झाला नाही, होणार नाही. वो खुदा का बंदा था.
नेहमीप्रमाणे सुंदर लेख. धन्यवाद.

कळत नकळत या धाग्यावर एक सोनू निगम फॅन क्लब देखील तयार होतोय. Happy

साहजिकच् आहे म्हणा, कारण धाग्याच विषय, लेखाची मांडणीच दोन गायकांमधील तुलना दर्शवत जातेय.. उद्या कोणी दिलीपकुमारची नक्कल मारायचे प्रयत्न आजच्या पिढीतील शाहरूख वगैरेंनी केले असे म्हटले तर शाहरूखप्रेमी त्या धाग्यावर सर्वात पहिले हजेरी लावतील. आणि सोनू निगम देखील लोकप्रिय गायक असल्याने तसे घडल्यास नवल नसावे..

बाकी मी स्वत: सुद्धा सोनू निगम् फ्यान क्लबात..
निर्विवादपणे आजच्या पिढीतील एक सर्वोत्कृष्ठ पार्श्वगायक जो स्टेज शो मध्ये देखील आपल्या सुरांनी आग लावतो.

माझे मोठे आजोबा म्हणायचे तुमचा सचिन वगैरे काही नाही, खरा डॉन ब्रॅडमेनच. मी त्यांच्याशी कधी वाद नाही घालायचो कारण त्यांनी दोघांचाही खेळ पाहिला होता आणि मी ब्रॅडमनला कधी लाईव्ह खेळताना पाहिले नव्हते. म्हणून आपला देव सचिनच.

तसेच ईथेही रफी हे माझ्या काळाचे गायक नसल्याने आणि मला जुनी गाणी फार आवडत नसल्याने मी त्यांची कोणाशीही वन टू वन तुलना नाही करू शकत. किंबहुना कोणी सोनू निगम आणि रफी यांच्यात साम्य आहे असे सांगितले नसते तर मला स्वताहून ते समजलेही नसते. बहुधा मागे कधीतरी हे सोनूच्या तोंडूनच ऐकलेले की रफी हे त्याचे आयडॉल आहेत वगैरे..

असो, पण लेख मात्र खूप आवडला आणि विषयाचे वेगळेपण हटकेच आहे.
मला संगीताचा फारसा कान नाही पण रफींच्या आवाजातील ती मखमल, तो गोडवा माझ्यासारख्यालाही जाणवतोच.

कलाकारांची तुलना हे तुमच्या बहुतेक लेखांतलं नेहमीचं रसायन असलं तरी इथे ते वावगं वाटलं नाही.
रफीच्या आवाजाचं वर्णन अत्यंत चपखल. त्याचं मोल अचानक एकदा , त्यापूर्वी अनेक वेळा ऐकलेलं 'हकीकत' मधलं "होके मजबूर मुझे उसने भुलाया होगा" हे गाणं ऐकताना जाणवलं.
सोनू निगमचा विषय आलाच आहे आनि तुलनाही होतेच आहे तर त्याची गाणी ऐकताना जाणवणारा एक मुद्दा लिहितो. तो प्रत्येक गाण्यात, "बघा, मला गाता येतं. मी गायक आहे." हे दाखवून देत असतो. रफीला हे कधीही करावं लागलं नाही. गाण्यापेक्षा मोठं होण्याचा प्रयत्न करायची त्याला कधी गरज भासली नाही.

सुरेख लेख अतुल जी !!
मामा तुमचा प्रतिसाद खुपच भावला, त्याच प्रमाणे नंदिनी तुमचा प्रतिसाद ही आवडला. >>रफीच्याच अनोख्या गाण्यांवर लेख असता तर अधिक आवडला असता<< ह्या साठी +१०१ Happy
मुळात रफी हे रसायनच वेगळे होते/आहे.
नंदिनी तुमची मागणी आपण च सगळे मिळुन पुर्ण करु या का ? तुम्ही, मामा, दिनेश दा, अतुलजी आणि बाकीचे सगळे ही रफी साहेबांच्या अश्या अविट किंवा थोड्या हटके गाण्यांची लिस्ट बनवुया का ? Happy
मला रफी साहेबांची सगळीच गाणी आवडतात्....त्या मधलेच हे एक फेव्हरेट गाणे :
www.youtube.com/watch?v=aSRN316hGFA
चित्रलेखा चित्रपटातील मन रे तु काहे ना धीर धरे !!

समयोचित लेख, आवडला. अ-रफी गायकांचा चांगला आढावा घेतलाय. ह्या विश्लेषणाबरोबर रफीबद्दल आणखी खुप काही वाचायला मिळायला हवं होतं. लेख अचानक संपला असं वाटलं. अर्थात, लिहाल तितकं थोडं असा प्रचंड आवाक्याचा, अंतहीन विषय आहे हा. त्यामुळे अजून काही लेखांची अपेक्षा आहे.

रफी एकमेवाद्वितीय __/\__ दैवत! याक्षणी अनेक कट्टर रफीभक्त आठवतायत मला Happy घरातले, मित्रमंडळीतले, ऑफिसातलेही.

त्या निमित्ताने वर उल्लेख केलेली आता विस्मरणात गेलेली पण त्यावेळी आवडलेली "मय से मीनासे ना साकी से", "पर्बतोंसे आज मै टकरा गया", "मोहोब्बत अब तिजारत बन गयी है" ही गाणी पुन्हा आठवणीच्या काठावर आली. ऐकायला हवीत पुन्हा.

सोनू आवडतो, त्याच्या गुणवत्तेबद्दल वादच नाही. व्यावसायिकता आणि दर्जा, दोन्हीचा फार सुरेख समतोल ठेवलेला आहे त्यानं. सुरुवातीच्या टप्प्यावर त्याच्याबाबतीत ते झालं, ते खुद्द रफीसोबतही झालेलं आहे.

रफी फेवरेट माझेपन..

ऋन्मेऽऽष, मला वाटत आपण दोघहि एकाच काळात वाढलेले आहोत पण काही गोष्टी अश्या असतात ज्या काळाला धरुन नाही चालत कधीच.. त्याला जाण हवी रे..

सोनु निगम मला पन आवडतो. अगदी त्याचे सर्व अल्बम घरी कॅसेटरुपात अजुनही जपुन ठेवलेत. तरीही रफी आणि सोनु ची तुलना होणे नाही..रफी तोड आहे सर्वांना..आजकालच्या गाण्यात भावना फारच उच्शृंखल असतात त्यामुळे कितीही गोड आवाज असुदे ते गाणे काही महिन्यातच बसुन जाते आणि ना हि त्या गायकाचा आवाज मनाला तेवढा दिलासा देत..

"जब कभी भी सुनोगे गीत मेरे, संग संग तुम भी गुनगुनाओगे" हे रफीचे गाणे सर्वात आवडत्या गाण्यांपैकी एक.. गाण्यांमधे रफी लता ड्युओ ने कम्माल केली होती..मधे काहीतरी व्यावसायिक कारणाने लताने रफी सोबत गायला नकार दिला पण परत सार आलबेल झाल..मज्जा म्हणजे तरीही लता चे सर्वात जास्त गाणे बहुधा रफींसोबतच आहेत ना..

त्यांचे गाणे म्हटले तर,

यु हि तुम मुझसे बात करती हो.. यात कसल मस्त मिसचिफ आहे आवाजात..व्वाह
तुमने पुकारा और हम चले आये..
ये दिल तुम बीन कही लगता नही हम क्या करे
तुझे जीवन कि डोर से बांध लिया है
तेरे पास आके मेरा वक्त गुजर जाता है
सौ साल पहले मुझे तुम से प्यार था
मुझे तेरी मोहोब्बत का सहारा मिल जाता.. काय गजब सुरुवात आहे या गाण्याची..आवाज..जबरदस्त.
जो वादा किया वो निभाना पडेगा
एक तेरा साथ हमको दो जहाँ से प्यारा है..हे पन खुप खुप आवडत्यांपैकी एक..
आने से जीसके आए बहार..व्वा व्वा व्वा..

खरच माझे शब्द अपुरे पडतात.. आता गाणी ऐकते परत त्यांची.. Happy

सुंदर लेख. रफीसाहेबांसारख्या गाण्याचे प्रयत्न करणार्‍या गायकांपेक्षा खुद्द त्यांच्याबद्दलच सविस्तर लिहायला हवे होते.

त्यांनी आसपास चित्रपटासाठी जिथे शेवटचे रेकॉर्डींग केले तिथे मी, त्यांच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी गेलो होतो.. शहारे आले होते अगदी. नौशाद आणि रफींनी दूरदर्शनवर सादर केलेला कार्यक्रम अजून आठवतोय मला.

तसेच माझ्या आठवणीप्रमाणे, लव्ह अँड गोड नंतर कसाबसा पूर्ण केला गेला. संजीव कुमार आणि निम्मी होते त्यात.

काल वहत्या बीबी वर चर्चा चालू होती तेव्हाच हा लेख वाचला.

माझी काही आवडती गाणी: सध्या जितकी आठवली तितकीच लिहिलीयेत
ये दुनिया उसी की जमाना उसीका
कोइ जब रह न पाये
आंखो ही आंखो मे इशारा हो गया
जाग दिल ए दिवाना
दूर रहकर ना करो बात करीब आ जाओ
ऐसे तो ना देखो
तुम एक बार मोहब्बतअका इम्तहान तो लो
सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल मे है
दिन ढल जाये
रोशन तुम्हसे दुनिया
कारवां गुजर गया गुबार देखते रह गय

"ए फुलो कि रानी बहारो कि मलिका..तेरा मुस्कुराना गजब हो गया"
हे गाण पन अशक्य आहे..आह..एखाद्या प्रियकराने यापेक्षा आणखी काय तारीफ करावी आपल्या प्रेयसीची..

" वो नाजुक लबों से..मोहोब्बत कि बाते"
'ये पल्को कि चिलमन उठाकर गिराना..गिराकर उठाना"
"हर एक पेच मे सेकडो मयकजे है..तेरा लडखडाना गजब हो गया.."

या ओळींवर फक्त त्यांचा आवाज आणि सगळि वाद्ये थांबुन जातात..आणि शेवटी दोन शब्दावर जो तबल्याचा ठेका पडतो..खतरनाक..अहाहा..

१९६५ मधला आरजू ह्या चित्रपटातील या गाण्यात हसरत जयपुरी यांची शब्दरचना, शंकर जयकिशन यांच संगीत आणि रफी यांचा आवाज या तिकडीने कम्माल आणलीये..

अशाच सात स्वरांचा एकच स्वर बनला तर तो किती विविध भावना दाखवू शकतो याचे सुरीले बहारदार उदाहरण म्हणजे रफीजींचा सूर.

फार सुरेख लिहिलेत अशोकराव. तुम्ही रफीला प्रत्यक्ष पाहिलेत आणि हिन्दी चित्रपटसृष्टीबद्दल लिहिणार्‍या, तेथे काम करणार्‍या लोकांशी तुमचा जवळुन संबंध आला आहे. केव्हा तरी तुम्हीच या विषयावर लिहावेत असे वाटते.

नंदिनी, सई प्रतिसादाबद्दल आभार. रफीच्या अनोख्या गाण्याबद्दल लिहिण्याची इच्छा आहे. मात्र त्याला जरा वेळ द्यावा लागेल याची जाणीव देखिल आहे. आज रफीच्या पुण्यस्मरणाचा दिवस. आणि आजच्यादिवशी माझ्यासारख्या एका छोट्या चाहत्याकडुन एक मिणमिणती पणती लावण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे व्यस्त दिनक्रमात काहिसा घाईघाईने लिहिलेला हा लेख आहे.

कळत नकळत या धाग्यावर एक सोनू निगम फॅन क्लब देखील तयार होतोय.
माझी काही हरकत नाही. पण कलेच्या बाबतीत काळाबरोबर आपण असावे, असायलाच हवं वगैरे मला वाटत नाही. हिन्दी चित्रपटसंगीताच्या बाबतीत माझं थोडंस क्रिकेटसारखं झालंय. पुर्वी रेडियो टिवीला चिकटुन बसणारा मी, त्यानंतरच्या काळात फिक्सींगच्या बातम्या बाहेर येऊ लागल्या आणि या खेळापासुन दुरावलोच. आज जर मला कुणी भारतीय संघात कुठले खेळाडु आहेत विचारलं तर दोन देखिल नावे घेता येणार नाहीत. मला वाटतं हा ज्याच्या त्याच्या आवडीनिवडीचा आणि प्रामुख्याने स्वभावाचा भाग आहे.

आपला संगीताचा जुना खजिना आपण अजुन पुरता पाहिलेला नाहीय याची मला सतत जाणीव असते. त्यामुळे अजुनही नवीन गाण्यांकडे फारसे कान वळत नाहीत. आणि त्याबद्दल काडीचिही खंत मला वाटत नाही.

कलाकारांची तुलना हे तुमच्या बहुतेक लेखांतलं नेहमीचं रसायन असलं तरी इथे ते वावगं वाटलं नाही.

काहीवेळा आणि काही बाबतीत ही गोष्ट मला अपरिहार्य वाटते.

भरतजी, टिना, ऋन्मेष, प्रसन्न, असुफ, सुलु, फेरफटका, उदय, पद्मावती सार्‍यांचे आभार.

दिनेशदा सुरेख आठवण..तु कहीं आसपास है दोस्त...

नंदिनीजी, मस्त गाण्याची आठवण काढलीत, जाग दिले दिवाना...उंचे लोगमधलं हे गाणं हँडसम फिरोझ खानला मिळालंय. झकास दिसलाय गडी.

"ए फुलो कि रानी बहारो कि मलिका..तेरा मुस्कुराना गजब हो गया" टिनाजी, सुरेख गाणे.

रफीचा गळा गोड, आवाज मखमली, दैवी देणगी हे सर्व सर्व खरं असलं तरीही त्याची स्वतःची मेहनत आणि पॅशन या गोष्टी "दैवी" नाहीत. त्यानं स्वतः कमावलेल्या आहेत.

उर्दू असो, संस्कृत वा इतर कुठलीही भाषा. स्पष्ट, व्यवस्थित समजतील असे, कानावर अत्याचार न करतील असे उच्चार ही रफीची अजून एक बाजू. शुद्ध हिंदी आणि शुद्ध उर्दूमध्ये तर त्यानं चिकार गाणी म्हटली आहेत पण मराठी तमिळमध्येही त्याचे उच्चार साफ होते.

रेकॉर्डिंग तंत्र अगदी बाल्यावस्थेमध्ये असतानासुद्धा कुठेही श्वासाचे आवाज येऊ न देता सलग वाद्यवृंदासकट गाणी म्हटली जायची. आज ब्रेक घेत रेकॉर्‍डिंग आणि ऑटोट्यन असतानासुद्धा गायक बेसुरा झालेला असतो!

व्वा अतुलजी, मस्त आणि समयोचित लेख.

आणि प्रतिसाद सुद्धा Happy

शम्मी कपुर आणि मोहम्मद रफी, ऑल टाईम बेस्ट. Happy कसाही मुड असो तुमचा --- तो बदलणारच Happy

रफी ..आयुष्याचा खूप मोठा भाग व्यापला आहे या नावाने. दैवत आहे माझ्यासाठी.
लेख आवडला.
मी कितीतरी गाणी ऐकताना अक्षरशः विज्युअलाईझ करते की किती आरामात मजेत हे गाणे गायले असेल रफीने. किती तरी कठीण गाणी लिलया पेलणार्या या गायकाचा चेहरा मला कायम लहान मुलासारखा निरागस वाटतो.

किती तरी कठीण गाणी लिलया पेलणार्या या गायकाचा चेहरा मला कायम लहान मुलासारखा निरागस वाटतो.

क्या बात है सामीजी Happy सुंदर Happy

लेख खूप आवडला.

रफीची मला अतिशय आवडणारी दोन गाणी..कदाचित फारशी प्रसिध्दही नसतील.

झुक गया आसमान मधलं सच्चा है प्यार अगर मेरा सनम
छोटीसी मुलाकात मधलं ए चांद के झेबाई
काय आवाज लागलाय रफीचा दोन्ही गाण्यांमधे...केवळ स्वर्गीय्!...वेगळ्याच विश्वात घेऊन जातो!!

लेख आवडला.
ही मला आवडणारी रफीची काही गाणी.

१) जिन्हे नाझ है हिंदपर वो कहां है - प्यासा
साहीर लुधियानवीच्या काव्याला पुरेपूर न्याय आपल्या आवाजाने दिलाय, अर्थात संगीतकार एस. डी. बर्मनचं कौशल्य वादातीत.
२) ना किसी का आँख का नूर हूं - लाल किला
बहदूर शाह जफरच्या गजलेला जबरदस्त उंचीवर नेउन ठेवलंय. संगीतकार एस. एन. त्रिपाठीचा मास्टरपीस.
३) मिली खाक मे मुहब्बत - चौदहवी का चाँद
टायटल साँगमुळे काहीसं दुर्लक्षित झालेलं गाणं. संगीतकार रवी. रवीचं बिचार्‍याचं दुर्दैव असं की त्याने काही चित्रपटात भिकार्‍यांच्या तोंडी दिलेली गाणीच जास्त गाजली.
४) मै जिंदगी का साथ निभाता चला गया - हम दोनो
संगीतकार जयदेवने अशी काही अवीट गोडीची गाणी दिली की ज्याचं नाव ते.
५) जाने क्या ढूंढती रहती है - शोला और शबनम
खय्याम हाही असाच एक उपेक्षित संगीतकार. आपल्या तत्वांशी कधीही तडजोड न करता अतिशय सुरेल गाणी देणारा.
६) आपके पहलूमे आकर रो दिये - मेरा साया
मदनमोहन केवळ लता मंगेशकरकडून उत्तमोत्तम गजला गाउन घेत असे ह्या आरोपात काहीच तथ्य नाही. त्याने रफीलाही तेवढीच सुंदर गाणी दिली.
७) यह दुनिया यह महफिल - हीर रांझा
ह्या गाण्याची विशेषता अशी की प्रत्येक गाण्याचं कडवं हे वेगवेगळ्या सुरावटीत गुंफलय. ही करामत केवळ मदनमोहनच करु जाणे.
८) तुम जो मिल गये हो - हंसते जख्म
गाण्याच्या सिच्युएशनप्रमाणे संगीत कसं असावं ह्याचं उत्तम उदाहरण. गाण्यामध्ये येणारी लताची तान केवळ अप्रतिम. नायिकेचा होकार आल्यावर नायकाला झालेला प्रचंड आनंद गाण्याच्या वाढलेल्या गतीने दाखवून द्यायचा ह्या कारागिरीबद्दल मदनमोहनला सलाम.
९) मै यह सोचकर उसके घर से चला था - हकीकत
केवळ व्हायोलीनच्या साथीने गायलेलं गाणं रफीच्या ताकदीची कल्पना देतं. युद्धाची पार्श्वभूमी असलेल्या ह्या चित्रपटात सुधीरच्या तोंडी असलेलं हे गाणं. व्हायोलीन पीस लक्ष्मीकांत-प्यारेलाल जोडीतल्या प्यारेलाल यांनी वाजवलाय. संगीतकार मदनमोहन.
१०) मेरा तो जो भी कदम है - दोस्ती
दोस्ती चित्रपटातल्या ईतर गाण्यांमुळे काहीसे मागे पडलेलं हे गाणं लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलंय.
११) तेरे मेरे सपने - गाईड
उदयपूरईथल्या पिचोला लेकच्या पार्श्वभूमीवर रफीचे हे सूर वेगळीच उंची गाठतात. मध्ये येणारा सॅक्सोफोनचा पीस ही मनोहारी सिंग यांची खासियत. एस. डी बर्मनदादांनी गाईडची सगळीच गाणी सुरेख केलीत.
१२) टुटे हुए ख्वाबोंने - मधुमती
सलील चौधरीने दिलेलं हे गाणं मधुमतीमधलं मास्टरपीस, अर्थात मधुमतीमधली सगळीच गाणी एकाहून एक सरस आहेत.
१३) तुमसे कहूं एक बात - दस्तक
दस्तक या चित्रपटात लताच्या एकाहून एक सरस गाण्यांपुढे रफीने गायलेलं गाणं अजिबात झाकोळुन जात नाही. अतिशय हळुवारपणे कानात कुजबुजावं त्याप्रमाणे गाउन गेलाय.

तुम जो मिल गये हो - हंसते जख्म
गाण्याच्या सिच्युएशनप्रमाणे संगीत कसं असावं ह्याचं उत्तम उदाहरण. गाण्यामध्ये येणारी लताची तान केवळ अप्रतिम. नायिकेचा होकार आल्यावर नायकाला झालेला प्रचंड आनंद गाण्याच्या वाढलेल्या गतीने दाखवून द्यायचा ह्या कारगिरीबद्दल मदनमोहनला सलाम.>> लोकसत्तामध्ये मध्यंतरी या गाण्यावर लेख आला होता. त्यात बरीचशी माहिती होती. पण सुंदर गाण्याची अठवण काढल्याबद्द्ल धन्यवाद.

मध... शुद्ध मध ऐकायचा असेल तर रफीने रोशनची गायलेली गाणी ऐकावीत. एवढी मधाळ गाणी दुसरीकडे क्वचितच गायली गेली असतील.
अब क्या मिसाल दूं तुम्हारे शबाबकी... आरती

https://www.youtube.com/watch?v=ad5BcGFpxog

लेख चांगला आहे.
पण फक्त रफीच्याच नाही तर त्या त्या पीढीतल्या सगळ्याच उत्तम गाणार्यांच्या आवाजापासून इनस्पिरेशन पुढची पीढी घेत असते असं मला वाटतं.
तसं पाहिलं तर सैगल सारखं गाण्याचा प्रयत्न खुद्द रफी, किशोर, तलत, मुकेश सगळ्यांनीच केला आपापल्या उमेदीच्या काळात. पुढे ह्या प्रत्येकाने स्वतःची स्टाईल शोधली (किंवा /शिवाय संगीतकारांनी त्यांना ती सापडायला मदत केली) आणि मग सैगलची जागा किशोर, रफी नी घेतली. त्यांच्या पुढची पीढी म्हणजे अभिजीत, शान, केके ह्यांनी किशोरचा, तर सोनू ने रफी भक्तीचा मार्ग घेतला. पण प्रत्येकाने नंतर आपापली जागा निर्माण केली...
आता नवीन सारेगमप किंवा नवीन गायक ऐकलेत (अर्नाब, तो बंगालचा सारेगमप जिंकलेला, श्रीराम, अभिषेक म्हणुन अजून एक होता, आरजित) तर पटकन आपण म्हणून जातो 'कसला सोनू सारखा किंवा केके टाइप्स गातो'.... कारण आजच्या पीढीचे ते आहेत... आणि हे कायम बदलत राहणार आहे.
स्त्री गायिकांमधेही हे आहेच की... लता नूरजहा सारखी गायची आधी... मग नंतरच्या अलका याज्ञिक च्या सगळ्या पीढीने लतासारखा गायचा प्रयत्न केला.. आता माऊली दवे सारख्या मुली सुनिधी चौहानसारख्या गातात...

असो. लेखातला रफी मात्र आवडलाच. म्हणजे तो कायमच आवडत आलाय प्रचंड त्यामुळे लेख एंजॉय केला आणी प्रतिक्रीयाही Happy

रफी आमच्या घरातल्या सगळ्यांचा आवडता गायक. इतका व्हर्सटाईल गायक न कधी झाला न कधी होईल.

त्याच्या व्हर्सटॅलिटीची एक झलकः

"मन तरपत हरी दर्शनको आज" हे बैजुबावरातलं भजन इतक्या आर्ततेने गायलं आहे की बस्स. माझ्या नवर्‍याच्यामते इतकं छान कोणीही गाऊ शकत नाही. अगदी सोनू निगमसुध्दा.

इंटरेस्टींगली हे भजन शब्द्बध्द केलं आहे शकील बदायुनी ह्यांनी आणि म्युझीक डायरेक्टर आहेत नौशाद साब.

काय आठवणी जाग्या केल्या आहेत सर्वांनी. अतुल अगदी खास लेखन.

आर्च यांच्या पोस्ट ला धरून थोड विषयांतर.
कधी कधी वाटत आज रफी साहेब हयात नाहीत हेच बर आहे.
सध्याची राजकीय सामाजिक परिस्थिती पाहता दुष्ट दुर्जनांनी काही त्यांना अनेक गाणी गाऊ दिली नसती.
आणि आपल्यासारखे रसिक स्वर्गीय आनंदाला मुकले असते. असो.

Pages