सह्यमेळावा किल्ले चौलेर आणि पिंपळा.

Submitted by योगेश आहिरराव on 29 July, 2015 - 07:48

सह्यमेळावा किल्ले चौलेर आणि पिंपळा.

नाशिकबद्दल माझ्या मनात एक वेगळेच असे महत्वाचे स्थान आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक किल्ले असलेला, अनेक लेणी-गुंफा व प्राचीन मंदिरे आणि ऐतिहासिक व पौराणिक वारसा लाभलेला हा नाशिक जिल्हा.
प्रसिध्द अशी सातमाळा रांग, तितकीच महत्वाची सेलबारी-डोलबारी रांग. त्रिंगलवाडी पासून ते साल्हेर पर्यंत, तसेच डेरमाळ पिसोळ पासून ते अंकाई-टंकाई पर्यंत असे जवळपास ५० ते ५५ किल्ले, दुर्गांच्या बाबतीत श्रींमत असलेल्या या नाशिक जिल्ह्यात येतात.
बागलाण ! सुपीक, संपन्न मुलुख ! नाशिक जिल्ह्यातील एक महत्वाचा भाग. याच भागातील जरा दुर्गम, अल्प परिचित पण सुंदर अशा या चौलेर व पिंपळा या दुर्गांवर भेट देणे जुळुन आले. निमित्त होते मायबोलीकर भटक्यांचा सह्यमेळावा २०१५. मुंबई आणि पुणे परिसरातील ३५ सदस्यांचा समावेश या मेळाव्यात होता विशेष म्हणजे यामध्ये ६ लहान ट्रेकर सुध्दा होते. आमच्या लाडक्या 'सह्याद्रीमित्र' उर्फ 'ओंकार ओक' याने या मेळाव्याची संपूर्ण जबाबदारी घेतली. अतिशय काटेकोर नियोजन व उत्तम व्यवस्था, तसेच दुर्गवीर संघटनेच्या काही शिलेदारांची मोलाची मदत झाली.
ठरल्याप्रमाणे शुक्रवारी रात्री दोन मिनी बस अनुक्रमे मुंबई व पुणे येथुन निघाल्या. साधारण पहाटे ३ वाजता नाशिकला द्वारकेला पुलाखाली भेटायचे ठरले. मी कल्याणला राहत असल्यामुळे भिंवडी बायपासला मुंबई हून येणारी बस पकडली. बसमध्ये शिरल्यावर ओळखी झाल्या, या आधी ऐकेमेंकाशी फक्त मेसेज, व्हाट्स अप, फेसबुक व क्वचित कधीतरी फोन वर बोलणे एवढीच काय ती ओळख पण काही वेळातच एकदम छान गट्टी जमली. वाटेत डिझेल भरून, दिड एक तासात कसारा घाटाच्या सुरूवातीला असणार्या 'बाबाचा धाबा' येथे थांबलो. या मार्गवरील खुप उशिरा पर्यंत चालु असणारा हा धाबा. लगेच शेव भाजी, रोटी, दाल तडका अशा ऑर्डर सुटल्या आणि शेवटी चहा झाल्यावर नाशिककडे रवाना झालो. पांडवलेणी अलिकडे असताना फोन वाजला, मग कळाले की पुणेकरांची बस द्वारकाला पोहचली पण. पहाटे साडेतीन चारच्या सुमारास दोन्ही गट द्वारका येथे भेटलो. एका टपरीवर चहापानी झाल्यावर लगेच पुढच्या प्रवासाला सुरूवात केली. मार्ग होता नाशिक-सटाणा- तिळवण -वाडी चौलेर.
सोग्रस फाट्याहून डावीकडे वळून भावड बारीच्या दिशेने जाऊ लागलो, तो पर्यंत झुंजु मुंजु पहाट झाली, वातावरणात चांगलाच गारवा होता. डावीकडे धोडप व कांचना नुकतेच दिसु लागले होते. हळुहळु कोळधेर, राजधेर, इंद्राई या सर्वांचे दर्शन झाले. पुढे काही वेळातच सटाण्याच्या थोडे अलीकडे डाव्या हाथाला डांगसौंदाणे तिळवण च्या मार्गाला लागलो. सटाणा ते तिळवण अंतर अंदाजे १२ ते १५ किमी असावे. तिळवणला जिल्हा परिषद शाळेच्या आवारात एकत्र जमलो पुणेकर आणि मुंबईकरांच्या भेटी झाल्या. सर्वांची ओळख परेड झाली, लगेच चहा नाश्ता उरकून वाडी चौलेर या दिड ते दोन किमी अंतरावरच्या किल्ल्याच्या पायथ्याशी असणार्या गावी पोहचलो. समोरच चौलेर किल्ला दिमाखात उभा होता. प्रथमदर्शनी चौलेरचा आकार हा वेल्हामधून दिसणार्या तोरणा सारखाच वाटला. पण खऱतर हा गड बराचसा साल्हेर सारखा आहे.

गावाच्या डाव्या हाथाला असणार्या छोट्या टेकडीवजा सोंडेवरून वाट हळुहळु वर चढते, पुढे थोड्या सपाटी नंतर पुन्हा किल्लाच्या मुख्य धारेवरून उजवीकडे वळून थोडे समांतर गेल्यावर, कातळात बांधलेल्या भुयारी दरवाजांची रांग लागते. एका पाठोपाठ एक असे हे तीन दरवाजे, क्वचितच असे कुठल्या किल्यावर आढळणारे हे बांधकाम किल्ले स्थापत्यशास्त्राचा उत्तम उदाहरण आहे.

दरवाज्यातून गडावर प्रवेश केला समोरच बालेकिल्ला दिसला.उजवीकडच्या वाटेने जाताना कातळात खोदलेली अनेक पाण्याची टाकी आढळली, तिथेच एका टाकीपाशी सर्वांनी एकत्र येऊन सोबत आणलेला खाऊ फस्त केला. घटकाभर विश्रांती घेऊन, त्याच वाटेने पुढे जाऊन डाव्या हाथाला वर पायराच्या मार्गाने बालेकिल्यावर गेलो

बालेकिल्यावर छोटी टेकडी, दोन चार पाण्याची टाकी, डाव्या बाजूला कोठी भुयार सारखे जुने बांधकाम व थोडी जुजबी तटबंदी. बालेकिल्यावरून गडाचा पुर्ण विस्तार नजरेत येतो.

पण खरे चौफेर दर्शन होते ते सातमाळा रांग व सेलबारी-डोलबारी रांगेचे. एक से बढकर एक या भागातले गड किल्ले नजरेस पडतात. बालेकिल्ला खाली उतरून समोरच्या माचीवर गेलो. पाण्याचे एक मोठे टाके व टोकाला तटबंदीचे अवशेष दिसले, हे सर्व पहातच दुपारचे बारा केव्हाच वाजून गेले. मग हळुहळु आवरते घेत गड उतरायला सुरूवात केली, वाटेत बर्यात ठिकाणी मुरूमाचा घसारा होता. त्यावर मात करत लहान ट्रेकर्स ला सांभाळत सर्व जण दुपारी अडीच वाजता गावात पोहचलो आणि दुपारच्या जेवणासाठी सटाणा येथे गेलो.
'आमंत्रण' असे त्या घरगुती खाणावळीचे नाव होते. पण ती शेव भाजी, कडी, वरण भात आणि त्यांची आग्रह करून वाढण्याची पध्दत एकंदरीत सर्वच लाजवाब या साठी ओंकारला पैकी च्या पैकी मार्क द्यायला हवे.
पोटभर जेवण केल्यावर सटाणापासुन १२ ते १५ किमी अंतरावर असलेल्या देवळाणे येथील शिवमंदिरात जाण्याचे ठरले. अतिशय प्राचीन सुमारे १००० वर्षापूर्वीचे हे शिवमंदिर फारच सुंदर, मंदिरावर केलेले बरेचसे कोरीव शिल्पकाम अजुनही चांगल्या स्थितीत आहे. मंदिर रतनवाडी किंवा कुकडेश्वर मंदिराच्या धाटणी सारखे वाटते. सायंकाळी तो शांत मंदिर परिसर, भोवतालचा निसर्ग समोरच असलेला दुंधा किल्ला फारच रमणीय वाटत होते. पहाणार्याला तासभर खिळुन ठेवण्याचे सामर्थ्य नक्कीच या मंदिरात आहे.

इथेच दुर्गवीरच्या काही सदस्यांनी मंदिराबद्दल व त्यांच्या कार्याबद्दल माहिती सांगितली. त्यांचे आभार प्रदर्शन करून आम्ही गडाच्या मुक्कामी 'सावरपाडा' येथे कुच केले. गावातल्या शाळेत आणि आवारातल्या मंदिरात मुक्कामाची सोय होती.

आधीच नियोजन केले असल्याने तासाभरातच जेवणाची सोय झाली. मग काही गप्पा टप्पा, भटक्यांचे इकडचे तिकडचे डोंगर अनुभव, आकाशातले चंद्र तारे इ. नंतर प्रत्येकाने झोपी जायची तयारी केली, रात्रभरचा प्रवास, सकाळी किल्ले चढाई, सायंकाळी देवळाणे मंदिर मग पुन्हा सावरपाडा प्रवास या सर्व गोष्टींमुळे हे तर स्वाभाविकच होते.
सकाळ होताच काही मित्र मिसळ बनविण्याच्या तयारीला लागले. मिसळ पाव खाऊन आवराआवरी करून पिंपळा किल्याकडे निघालो. सावरपाडा गावातून थोडे पुढे चालत गेल्यावर उजव्या हाथाला एका छोट्या टेकडीमागे पिंपळाचे दर्शन होते. त्याला असलेले मोठे नेढे (छिद्र) हीच काय ती ओळखायची खुण. स्थानिक लोक पिंपळा ला कंडाळा असेही म्हणतात.

किल्ला डावीकडे ठेवून उजवीकडील छोटी टेकडी चढून वाट एका पठारावर येते. याच पठारावर पिंपळाच्या उजव्या बाजुची सोंड उतरली आहे. तीच दिशा धरून सावकाशपणे मुरूमाचा घसारा पार करत पुढे सरकत होतो. पिंपळाचा आकार हा बराचसा केंजळगडासारखा वाटतो.

गडमाथा हा कातळकड्यांनी नैसर्गिकरित्या तासला गेला आहे. मध्यभागी आहे ते या किल्याचे मुख्य आकर्षण म्हणजेच 'नेढे' साधारणपणे १००-१२५ माणसे सहज सामावु शकतील एवढे तर नक्कीच मोठे आहे.
जिंकलेल्या पृथ्वीचे दान दिल्यावर स्वत:साठी सागराला मागे हटवून अपरांत निर्माण करण्यासाठी श्री.परशुरांमानी बाण सोडला तो साल्हेरवरून. हाच तो बाण ज्या समोरच्या डोंगरावरून आरपार गेला तो डोंगर म्हणजेच 'पिंपळा' हे नेढे त्या बाणाचा प्रताप आहे, असे येथील रहिवासी सांगतात.

आम्ही सर्वजण नेढ्यात पोहचलो तेव्हा भन्नाट वारा आमच्या स्वागताला हजर होता. पलीकडे दिसते ते मळेगाव, या गावातून ही 'पिंपळा' वर येता येईल, पण वाट मात्र उभी चढाईचीआहे. नेढ्याच्या पलीकडे डाव्या हाताला पाण्याची कोरडी टाकी व छोटी नैसर्गिक गुहा आहे. उजवीकडील वाटेने जाऊन वर छोटासा कातळकडा चढून आम्ही पिंपळाच्या माथ्यावर पोहचलो. सर्वांग सुंदर असे विहंगम दृश्य पाहून चकित झालो.

साल्हेर हा सह्याद्रीतला सर्वात ऊंच किल्ला व त्याचा जोडीदार सालोटा यांची खरी भव्यता समजते ती पिंपळाच्या माथ्यावरून. धोडप कांचना पासुन ते अचला पर्यंत आणि साल्हेर ते मुल्हेर पर्यंतचे सर्व किल्ले इथुन सहज नजरेस पडतात. माथ्यावर पाण्याची कोरडी टाकी सोडली तर विशेष काही नाही, पण नजारा मात्र अप्रतिम. हे सगळे नजरेत सामावुन आम्ही गड उतरायला सुरूवात केली. भर दुपारी गावात आलो, गावकर्यांनी तयार केलेल्या रूचकर जेवणाचा आस्वाद घेऊन निघायच्या तयारीला लागलो. सांयकाळचे चार वाजून गेले होते. मुंबईकरांनी पुणेकर मंडळीचा निरोप घेतला. जड पावलांनी बस मध्ये चढलो, बस परतीच्या प्रवासाला लागली. या दोन दिवसात नवीन सह्यमित्र जोडले गेले, बर्याच गोष्टी नव्याने माहीत झाल्या. बागलाण मुलुखातील अपरिचित पण सुंदर अशा या दोन दुर्गांवर सह्यमेळावा व्यवस्थित पार पडला.

योगेश चंद्रकांत आहिरे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओंकारला पैकी च्या पैकी मार्क द्यायला हवे >>>+१००
ओंहार या माळेतल्या मण्यांना जोडुन ठेवणार धागा आहे. Happy
योगेश मस्त व्रुतांत लिहिलाहेस.

मस्त..

Mastach