व्हॉट्स अ‍ॅप

Submitted by बेफ़िकीर on 27 July, 2015 - 09:12

व्हॉट्स अ‍ॅपची उपयुक्तता आणि उपद्रवमूल्य ह्या दोन्हींशी आता बहुतेकांचा परिचय झालेला आहे.

व्हॉट्स अ‍ॅपबाबत माझी मते:

१. मी फॉर्म केलेले ग्रूप्स -

मी तीन ग्रूप्स तयार केलेले आहेत. त्यातील दोन ग्रूप हे अनुक्रमे नातेवाईक व मित्र ह्यांचे असल्यामुळे तिथे मी कोणतीही विशेष नियमावली बनवलेली नाही. फक्त आणखी एकाला अ‍ॅडमीन बनवून ठेवलेले आहे. तिसरा ग्रूप हा विविध भागातील कवींचा ग्रूप आहे. त्या ग्रूपला मी व्यवस्थित नियमावली दिलेली आहे. तेढ वाढवणार्‍या पोस्ट्स नकोत, राजकीय किंवा इतर कल दर्शवणार्‍या पोस्ट्स नकोत, अश्लील विनोद नकोत, रोज किमान दोन स्वरचित ओळी तरी पोस्ट कराव्यात, महिन्यातून एक प्रत्यक्ष चर्चासत्र व्हावे, प्रताधिकार संदर्भातील अटींची जाण ठेवावी, वगैरे! ह्या ग्रूपचे अल्पावधीत चार उपक्रमही झाले. तसेच आज पंजाबमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर मी स्वतः बनवलेल्या व इतर ठिकाणचे सदस्यत्व असलेल्या सर्व ग्रूप्सवर 'पंजाब हल्ल्याबाबत पोस्ट टाकू नये' अशी विनवणी पोस्ट केली. मी सदस्याला ग्रूपवर घेण्यापूर्वी एक स्टँडर्ड विनंतीची पोस्ट त्या सदस्याला स्वतंत्रपणे पाठवतो. त्याने होकार दिल्यावर त्याची एक किंवा दोन कविता त्याचे नांव न लिहिता ग्रूपवर पोस्ट करून मत मागवतो. काव्याचा किमान दर्जा अबाधित राहावा ह्यासाठी असे करतो. किमान चार सदस्यांनी त्या सदस्याच्या प्रवेशाला मंजूरी दिली की मग त्या सदस्याला प्रवेश देतो. नवीन सदस्याचा प्रवेश झाला की लगेच पुन्हा एकदा नियमावलीची पोस्ट अपलोड करतो जी त्या सदस्याला व इतरांनाही त्यामुळे पुन्हा एकदा वाचता येते. उपक्रमांअंतर्गत असलेल्या जबाबदार्‍या दरवेळी वेगवेगळ्या नावांना स्वीकारायला लावतो ह्यामुळे इगो-इश्यूज होऊ शकत नाहीत. सदस्यांपैकी कोणाचे एखाद्या दिवशी काही खास असेल तर ग्रूपचे नांव व आयकॉन त्या दिवसापुरता बदलून त्या सदस्याचा गौरव करतो.

२. मला सदस्य म्हणून समाविष्ट केलेले ग्रूप्स -

असे चार, सहा ग्रूप्स आहेत. ऑफिस, कविता, मित्र, नातेवाईक वगैरे प्रकारचे! त्या ग्रूप्सचा उपयोग नेटवर्किंगसाठी चांगला होतो. अनेकदा खूप पोस्ट्स येतात. नकोसे होते. अनेकदा काही जण एकमेकांशी चर्चा करतात पण बाकीच्या सगळ्यांना वाचायला लागते. ग्रूप म्यूट करता येतो व करावा लागतो वगैरे! पण अनेकदा नवीन विनोद, व्हिडिओज, बातम्या वगैरे चटकन समजते. माझाच एखादा कार्यक्रम असेल तर लगे हाथ त्याची जाहिरातही होऊन जाते. मी रोज माझे एखादी स्वरचित गझल / कविता अपलोड करतो आणि मेंबर्स ती त्यांच्या स्वतंत्र ग्रूप्सनाही (मला विचारून व माझ्या नावासकट) पाठवतात. (एकदा तर मी मायबोलीवर लिहिलेली 'सून; ही कथा माझ्या नावासकट भलतीकडेच फिरत असल्याचे समजले व आनंद झाला).

३. वन टू वन चॅटिंग - मी सध्या करत असलेल्या कामासंदर्भातील सर्वांना मी ह्या प्रकारात सेव्ह करून ठेवलेले आहे व त्यांच्याशी स्वतःहून संपर्क करतो. त्याचा परिणाम मला असा जाणवतो की त्यांच्याबरोबर माझा आपोआप सुसंवाद राहतो. संपर्क म्हणजे काय तर येईल ती पोस्ट फॉरवर्ड न करता मी जे इतर ग्रूपवर माझे काव्यलेखन पोस्ट करतो तेच पोस्ट करतो आणि दिवसातून एकदाच! त्यातील काही जण फारच मान्यवर असल्यामुळे ते काही प्रतिसाद देत नाहीत. पण काहीजण चक्क देतातही! तेवढेच बरे वाटते.

उपद्रवी बाबी -

१. न विचारता एखाद्या ग्रूपमध्ये समाविष्ट करून घेण्याचा तीव्र संताप येतो. पण मी लगेच बाहेर पडत नाही. त्या ग्रूपमध्ये असल्यामुळे काही नवीन घडू शकणार आहे का ह्याचा अंदाज घेतो. नवीन होणार नसले तरीही बाहेर पडतच नाही. म्यूट करून अधूनमधून वाचत राहतो. ग्रूपमधून बाहेर पडून संबंध बिघडवण्यापेक्षा हे बरे वाटते. मात्र एखादेवेळी काही वादग्रस्त मुद्दा निघाला आणि आपल्याशी कोणी वाद घालू लागले तर मी थेट अ‍ॅडमीनना सांगतो की मला न विचारता तुम्ही ग्रूपवर घेतलेले आहेत, आता मी बाहेर पडलो तर का पडलो हे स्वतंत्र चॅटिंगमध्ये येऊन विचारत बसू नका.

२. अजिबात विचार न करता येईल ती पोस्ट कुठेही फॉरवर्ड करणार्‍यांचा अतिशय राग येतो. मग ती पोस्ट रीपीट होते, काही वेळा त्यांनी स्वतःच वाचलेली नसते. लोक असे का करतात समजत नाही.

३. सुप्रभात आणि शुभरात्रीचे मेसेजेस म्हणजे एक त्रासदायक प्रकार होऊ लागतो. येणार्‍या इमेजेस कितीही सुंदर असल्या तरी दरवेळी फोन वाजला की ते बघा आणि वैतागून बाजूला ठेवा हे नको होते.

४. सण-वार, विशेष दिवस आणि वाराप्रमाणे देवतांच्या तस्वीरींचे फॉरवर्ड्स धुमाकूळ घालतात.

५. संता-बंता, बंडू-गुरुजी, आलिया भट, काहीही हं श्री असे विनोद सतत रीपीटही होतात आणि सगळीकडून येऊन आदळत असतात.

६. काही विद्वानांनी तयार केलेले बेलाच्या पानाची उपयुक्तता, पिंपळाचे उपयोग, वगैरे पोस्ट्स लंब्याचौड्या असतात. काही कोडीही डोक्यात जातात. वाट्टेल त्या ओळी हरिवंशराय बच्चन ह्यांच्या कविता म्हणून फिरतात. पु.ल. आणि व.पू. तर रोज आपल्याबरोबर गप्पा मारायचे अश्या थाटातील पोस्ट्स येतात. 'क्या खूब कहां है गालिबने' म्हणत कंप्लीट भंक्स उर्दू ओळी गालिबच्या नावावर खपवल्या जातात.

७. तद्दन फालतू पोस्ट्ससाठी फोन ऑन करून बघावे लागते. म्हणजे कोणीतरी कुठलीतरी गुडमॉर्निंगची इमेज टाकली असेल तर त्या इमेजची स्तुती करणारा नुसता एक अंगठाच कोणीतरी तिसराच पाठवतो. तेही बघावे लागते. (अर्थात अश्या ह्या उपद्रवांवर ग्रूप म्यूट करणे किंवा बाहेर पडणे हे उपाय आहेतच म्हणा).

८. काही जणांची चॅटिंगची भाषा अत्यंत दळभद्री असते. इंग्रजी 'जे' हे अक्षर आणि पुढे '१' हा आकडा काढून विचारतात जेवण झाले का म्हणून! तसेच मी विचार करते ह्यातील विचार हा शब्द इंग्रजी व्ही आणि नंतर '४' हा आकडा काढून लिहिला जातो. हे फारच डोक्यात जाते.

९. काही जण चार चार दिवस ऑनलाईनच नसतात आणि चार दिवसांपूर्वी आपण त्यांना केलेल्या अनेक मेसेजेसला ते चार दिवसांनी बावळटासारखे एक 'हाय' असे प्रत्युत्तर देतात. त्यावेळी आपण प्रचंड ट्रॅफीकमध्ये वगैरे असूनही त्यांचे ते उत्तर बघून चवताळतो आणि फोन खिशात ठेवतो. तर दोन मिनिटांनी त्यांचा प्रश्न येतो. 'बिझी?'! 'अरे गाढवा माझे मेसेजेस तू चार दिवसांनी बघतोयस ते बघ आधी' असे पुटपुटत आपण अनुल्लेख करतो.

उपयुक्त बाबी -

ह्याही बर्‍याच आहेत.

१. अनेक फोटो पाठवता येतात. इतरही काय काय पाठवता येते.

२. फोनचे कव्हरेज नसले पण इन्टरनेट असले तर संपर्कात राहता येते. ह्याचा उपयोग मला नुकत्याच केलेल्या परदेशवारीत झाला.

३. त्याच परदेशवारीत पुण्यातील एका मित्राला कार्डिऑलॉजिस्टची अपॉईंटमेन्ट मिळवून देण्याची इमर्जन्सी आली होती तेव्हाही व्हॉट्स अ‍ॅप देवासारखे धावले.

४. अपडेटेड राहायला सोपे जाते.

मात्र एक निरिक्षण असे आहे की व्हॉट्स अ‍ॅप हे साधन छानपैकी आणि उपद्रवी ठरू न देता कसे वापरावे ह्याबाबत बहुतेक लोक अजाणच असावेत. अडाणीपणे वापर करत असतात ते व्हॉट्स अ‍ॅपचा!

पण हळूहळू व्हॉट्स अ‍ॅप (व तत्सम किंवा अधिक प्रगत अ‍ॅप्स) मानवी जीवनाला पूर्णच व्यापून टाकतील असे वाटते.

आपली मते, अनुभव अवश्य नोंदवावेत.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>काही विद्वानांनी तयार केलेले बेलाच्या पानाची उपयुक्तता, पिंपळाचे उ......<<
अगदी अगदी.. भले मोठे उतारे च्या उतारे पाठवतात काही लोक.. ग्रुपमधे आपलं आस्तित्व दाखवण्यासाठी 'आला मेसेज.. कर फॉर्वड, आला मेसेज.. कर फॉर्वड' मग त्या मेसेज मधलं काही कळो वा ना कळो. मनाला पटो वा ना पटो!
दोन आठवड्यापूर्वी एका स्वघोषीत मराठीप्रेमीचा मेसेज आला." मालवून टाक दीप या गाण्याचा खरा अर्थ". एका सैनिकाला लग्नाच्या पहिल्या रात्रीच लढाईला जावे लागते अन तिथे त्याचा मृत्यू होतो. त्याच्या कलेवरासमोर त्याची विधवा हे गाणे म्हणतेय अशी कल्पना सुरेश भटांनी केली होती असा त्या मेसेजचा सूर!
या रुपात हे गीत वाचणे हा माझ्यासाठी धक्का होता म्हणुन मी गुगलून पाहीले तर चक्क हृदयनाथांनी स्पष्ट केलेय की सुरेश माझ्याशी असे कधीच बोलले नाहीत.
आता हा पुरावा त्या व्यक्तीला पाठवला तर तो/ती म्हणते तूम्ही काय FBI मधे आहात का investigation करायला.. !

अशा काहीही ढकलणाऱ्या लोकांना म्हणावेसे वाटते 'पुराव्याने शाबित करीन!' पण कुठे आपला वेळ वाया घालवा? गेल्या वर्षभरात whatsapp फक्त हवे तेव्हा बघते.
एका नातेवाईक्स ग्रुप मध्ये 'अमुकढमुक, छान कविता' किंवा 'कित्ती सुंदर चित्र अमुकढमुक!' आणि मग ते एमिटोकॉन्स अशी पद्धत आहे..जणु काही ती कविता/चित्र अ ढ नीच काढले आहे!

स्तुत्य धागा!!!!

हे अ‍ॅडिक्शन प्रचंड प्रमाणात्पसरत आहे.... भयंकर आहे सगळे. आपले तर सोडा निदान आपण वेळ पडली तर ह्या अडचणीतुन मार्ग काढु शकतो, पण मुलांचे काय?

हल्लीच एका शाळेत मधे मुलांच्या काउंसिलिंग सेशन घ्यायला आते आहे. मुले तथाकथित तळागाळातिल आहेत. म्हणजे त्यांचे आई वडिल कष्ट्करी वा कामगार आहेत. आर्थातच त्यांना मिळणार्‍या सोयी व आपल्या मुलांना मिळणार्‍या सोयी ह्यात जमिन आस्मानाचे अंतर आहे.... तरीही एक गोष्ट मात्र कॉमन आहे... वॉट्स अप..... जो तो त्या व्यसना मुळे भरकटलेला दिसतो. दोघी चौघींनी सांगितले की ह्यातले त्यांना फारसे माहिती नाही. त्याचे कारण वेगळे होते कारण त्या मुली शाळे व्यतिरिक्त नोकरी-घरकाम ह्यातले काहीतरी करत होत्या. बाकी सगळ्या जणांना त्या बद्दल इत्यंभुत माहिती होती. नेट चे व्यसन करायला निदान सायबर कॅफेत जावे लागते. मोबाइल मधे नेट असते पण डेटा पॅक वेगाने संपतो. पण हे तर स्वतःहुन कमी डेटा वापरुन आपल्या पर्यंत पोह्चणारे अ‍ॅप आहे. आपल्या कलाने ही पिढी बरबाद करत आहे. ९०% मुलांनी आभ्यासात लक्ष लागत नाही कारण मोबाईल व वॉट्स अप...हे उत्तर दिले.

मी वावरते त्या मुलांच्या आईवडिलांना साधा मोबाईल सुध्धा नीट वापरता येत नाही. याचा अर्थ घरात बघुन शिकतात असे नाही.... डेटा पॅक साठी खुप पैसे घरातुन मिळतात असेही नाही. तरीही स्वस्तात हे व्यसन करता येते. एकमेका शी प्रत्यक्ष संवाद तुटतो. कुठे कुठे अति परिचयात अवज्ञा होते. परवाच माझ्या बाईच्या भाच्याला त्याच्या गल्लीतल्या पोरांनी तुफान मारला...कारण त्या मुलाने त्यातल्या एकाच्या बहिणीला वॉट्स अप वर घाणेरडा मेसेज पाठवला. बाहेरचे प्रेशर येवढे आहे की ही पिढी वेगाने ह्याची व्यसनी बनत चालली आहे....

कुठे थांबणार हे?

काही जण चार चार दिवस ऑनलाईनच नसतात आणि चार दिवसांपूर्वी आपण त्यांना केलेल्या अनेक मेसेजेसला ते चार दिवसांनी बावळटासारखे एक 'हाय' असे प्रत्युत्तर देतात. त्यावेळी आपण प्रचंड ट्रॅफीकमध्ये वगैरे असूनही त्यांचे ते उत्तर बघून चवताळतो आणि फोन खिशात ठेवतो. तर दोन मिनिटांनी त्यांचा प्रश्न येतो. 'बिझी?'! 'अरे गाढवा माझे मेसेजेस तू चार दिवसांनी बघतोयस ते बघ आधी' असे पुटपुटत आपण अनुल्लेख करतो >>>

बदला घेण्यासाठी चार चार दिवस लागत असतील एखाद्याला Proud

एखादी मुलगी शाळेत आली नाही की पुर्वी एकमेकांच्या घरी जात असत... हल्ली वह्यांचे फोटो काढुन एकमेकींना पाठवतात. आर्थात ह्यात सोय आहेच पण मानवी चेहेरा नाही....इंटरॅक्शन नाही.

मध्यंतरी नवर्‍याच्या कॉलनीतल्या ग्रुप वर राजकारण व सद्य परिस्थीतीवर चर्चा चालु होती. एकाने फारच बेपर्वा विधान केले. माझ्या नवर्‍याने कडाडुन विरोध केला. बाकीच्यांनी पण उचलुन धरला...रागावुन त्या माणसाने गेल्या४० वर्षांची बालवर्गात चालु झालेली मैत्री एका क्षणात तोडली....

व्हॉटसअ‍ॅपचे काही फायदे आहेतच.
नको असलेल्या गोष्टी टाळणे आपल्याच हातात आहे.
सतत येणार्‍या मेसेजेसपासून पहिली सुटका म्हणजे व्हॉटसअ‍ॅप नोटिफिकेशन बंद ठेवायचं.
दुसरं, मिडिया ऑटोडाऊनलोड डिस-एबल करून ठेवायचं. (वर कुणीतरी हे लिहिलेलं आहेच.) अनेकदा परत परत आलेले फोटो, चित्रं ओळखता येतात आणि डाऊनलोड न करताच डिलीट करता येतात.
सर्वात उत्तम म्हणजे (अन्य कारणांसाठी जेव्हा नको असेल तेव्हा) मोबाईल डेटाच ऑफ करायचा.
मग कशाला होतेय कटकट!

धागा वाचल्यानंतर माननिय ऋन्मेष साहेबांची आठवण आली. आपले लिखाण त्यांच्या लिखाणशैलीशी साम्य दर्शवत आहे.

सतत येणार्‍या मेसेजेसपासून पहिली सुटका म्हणजे व्हॉटसअ‍ॅप नोटिफिकेशन बंद ठेवायचं.
दुसरं, मिडिया ऑटोडाऊनलोड डिस-एबल करून ठेवायचं. (वर कुणीतरी हे लिहिलेलं आहेच.) अनेकदा परत परत आलेले फोटो, चित्रं ओळखता येतात आणि डाऊनलोड न करताच डिलीट करता येतात.>>>>> +१ हे मी करते. व्हॉट्सॅप अ‍ॅक्टिव्हेट केलं त्या दिवशी सारखं सारखं टिडिंग टिडिंग वाजत राहिलं. ते कसं थांबवायचं ते कळेना. पण त्याच दिवशी शोध लागला नोटिफिकेशन बंद करायचा. आपल्याला वेळ होईल तेव्हा बघायचे आलेले मेसेजेस आणि उत्तरं द्यायची. हाकानाका.

व्हॉटसअ‍ॅप द्वारे कधी कधी काही अनमोल खजाना गवसतो. असे मोजके मेसेजेस मी मला स्वत:लाच फॉर्वड करतो आणि इतर सर्व संभाषणाला आठवड्यातून एकदा सरसकट डिलीट मारतो. फालतू कचरा बाळगण्यापेक्षा ते बरे असे वाटते. आणि फोन मेमरी वाचवण्याचा हा एक उत्तम उपाय (माझ्या माहीतीतला)

१. व्हॉट्सॅपची चित्रे/व्हिडिओ ग्यालरीतून गायब करणे :
एस्डीकार्डवर जा. त्यात व्हॉट्सॅप मेडियाचा फोल्डर शोधून काढा.
.nomedia अशा नावाची शून्य बाईटसाईजची एक फाईल 'सेन्ट' फोल्डरमधे सापडेल. ती कॉपी करून घ्या, मग ती फाईल व्हॉट्सॅप इमेजेस व व्हॉट्सॅप व्हिडिओज मधे पेस्ट करा.
यामुळे फक्त व्हॉट्सॅपमधूनच त्यातील चित्रे/व्हिडिओ इ. दिसतील

आता व्हॉट्सॅपला तुमच्या आवडीच्या अ‍ॅप लॉकरमधून लॉक करा.

२. सेटिंग्ज-> अ‍ॅप्स मधे जाऊन व्हॉट्सॅप निवडा,
त्यातला 'शो नोटिफिकेशन्स' ऑप्शन अनचेक करा.
स्क्रीनवरह सायलेंट नोटिफिकेशन्सही येणार नाहीत.

(वरील टिप्स अँड्रॉईडसाठी आहेत. विंडोज, आयफोन साठी नाहीत.)

त्यात व्हॉट्सॅप मेडियाचा फोल्डर शोधून काढा.
.nomedia अशा नावाची शून्य बाईटसाईजची एक फाईल 'सेन्ट' फोल्डरमधे सापडेल. ती कॉपी करून घ्या, मग ती फाईल व्हॉट्सॅप इमेजेस व व्हॉट्सॅप व्हिडिओज मधे पेस्ट करा.
यामुळे फक्त व्हॉट्सॅपमधूनच त्यातील चित्रे/व्हिडिओ इ. दिसतील>>>

अरे वा! हे मस्त आहे. पण त्यातलं काही सेव्ह करायचं असेल तर सेपरेटली सेव्ह करता येतं का गॅलरीत?

शाळासोबती<< हा schoolmate साठी आहे, classmate साठी नाही. classmate साठी सहाध्यायी हा होऊ शकतो पण चपखल बसत नाही.

सध्या वॉट्स.अपवर फिरत असलेला.मेसेज जो ईथे शेअर करावासा वाटतो
कितपत खरा आहे माहित नाही पण एका मुलाच्या सुसाईडची बातमी मटामध्ये वाचली होती.

______________________

​तुमच्या परिवारामध्ये किंवा नातेवाईकांकडे ११ ते१९ वयोगटातील मुले जास्त इंटरनेट वापरत असतील तर त्यांना सावध करा..​
​Facebook.. Whatapp..​ वर ​Blue Whale Game​ नावाची कोणी ​request​ केली तर ​accept​ करू नका..
कारण या ​Game​ मध्ये एकूण ​५० task​ असतात.. शेवटच्या task मध्ये ​suicide​ करायचे असते..
पण तेव्हा तुम्ही सोडायचा विचार कराल तेव्हा ​hacker​ तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मारण्याची धमकी देतो..
एकदा का तुम्ही Game चालू केला की ​hacker​ तुमचा मोबाईल ​hack​ करतो त्यामुळे game बंद करता येत नाही..
​५० task​ पूर्ण कराव्याच लागतात..
हा game ​Russia​ मध्ये बनला आहे..
या game मुळे रशिया मध्ये आत्ता पर्यंत १३० तर जगा मध्ये २५० जणांनी ​sucide​ केले आहे..
हा game भारता मध्ये ही ​launch​ झाला आहे..!!
त्यामुळे
​!!!सावध राहा!!!​

या game मूळे मुंबई मध्ये ही एका १४ वर्षा च्या मुलाने ​sucide​ केले आहे..!

​फक्त वाचू नका.. कृपया खूप शेअर करा..​

Pages