आक्का

Submitted by बेफ़िकीर on 26 July, 2015 - 13:02

१९७३ साली घडलेल्या चक्रावणार्‍या सत्य घटनेवर आधारीतः

(नांवे काल्पनिक)

====================================

आश्रमातील ६१ मुलामुलींना सोडून आक्का प्रथमच बाहेरगावी चालल्या होत्या. तीन वर्षांपूर्वी त्यांनी हा आश्रम सुरू केला होता. शरीरविक्रय करणार्‍या स्त्रियांच्या मुलांचे पुनर्वसन व्हावे, त्यांना एक चांगले राहणीमान मिळावे ह्या उद्देशाने! हा आश्रम सुरू करताना त्यांच्यावर अतोनात टीका झाली होती. सासर, माहेर कुठलाही पाठिंबा नव्हता. हाताशी पैसा नव्हता. आश्रमासाठी जागा नव्हती. एक बाई असे काहीतरी करत आहे ह्याची स्तुती होण्याऐवजी भुवया उंचावत होत्या. हरकती घेतल्या जात होत्या. खच्चीकरण केले जात होते. वेश्यांच्या मुलांसाठी आश्रम काढण्याची टिंगल होत होती. सरकार-दरबारचे उंबरे तर झिजतच होते, पण कलियुगातील कर्ण म्हणून ख्याती पावलेल्यांनीही आक्कांना नकारात्मक उत्तरे दिली होती. हे सगळे ठीक होते. अपेक्षित होते. ह्या सगळ्या घटकांशी लढण्याची उभारी धरूनच आक्का मैदानात उतरल्या होत्या.

पण!

एक फार मोठा घटक ह्या प्रस्तावाला विरोध करत होता. तो घटक होता स्वतः वेश्या!

त्या वेश्यांना मुले लांब जायला नको होती. आक्का त्यांच्यात गेली चार वर्षे काम करत होत्या. वेश्यांचा विश्वास संपादन केला होता आक्कांनी! पण हा प्रस्ताव मांडल्यावर त्याच वेश्या असे काही नाके मुरडून उठून जात होत्या जणू त्यांना काही वर्गणी वगैरे द्यावी लागणार असावी. आक्कांनी हे सगळे मोफत असल्याचे सांगितले होते. तरीही वेश्यांना ते पटत नव्हते. कल्पनाच मान्य होत नव्हती.

ही बाब प्रस्तावाला मूळासकट हादरवणारी होती. लाभार्थींनाच लाभ नको असेल तर देणगीदार कशाला हात सैल सोडतील?

एकीकडे त्या मुलांसाठी काहीतरी करण्याची तीव्र व प्रामाणिक इच्छा! दुसरीकडे ह्या कल्पनेला तत्त्वतः विरोध करणारी धेंडे! तिसरीकडे त्या मुलांच्या आया स्वतः नरकात असूनही मुलांना आक्कांच्या आश्रमात पाठवण्याबाबत निरुत्साही!

चौथीकडून आप्त-स्वकीयांचा विरोध, खिल्ली उडवणे, टोमणे वगैरे!

मूर्खपणा! दुसरे काही नांव दिले नसते कोणी ह्या गोष्टीला!

एवढे करून आक्कांना स्वतःला काय मिळणार होते? थोडीफार प्रसिद्धी, स्तुती, काही पुरस्कार, काही वाढत्या देणग्या, काही अनुदाने वगैरे वगैरे! हेही सगळे तेव्हाच, जेव्हा ती कल्पना मूर्त स्वरुपात येईल आणि व्यवस्थित कार्यरत राहील! म्हणजे आज काहीच नाही.

आक्का एका संस्थेतर्फे वेश्यांसाठी काम करत होत्या हेच घरात पटलेले नव्हते. पण त्यामार्गे काही उत्पन्न घरात येत होते त्यामुळे तो विरोध थोडा सौम्य होता. शिवाय, आक्का समाजकार्य करतात हे घरातल्यांना चारचौघांसमोर सांगता येत होते आणि श्रेय लाटता येत होते हे वेगळेच!

पण आक्कांचा हा प्रस्ताव क्षणभरदेखील विचारात घेण्यासारखा नव्हता. वेळ आपला, पैसे आपले, श्रम आपले आणि भले होणार अश्यांचे ज्यांचे भले झाले की नाही ह्याच्याशी समाजाला सोयरसुतकच नाही. कोण कशाला भाजेल ह्या भाकरी?

आक्कांनी वेगळा गुण दाखवला. आपण सगळे त्याला शिर्डीच्या साईबाबांचा सल्ला मानतो. श्रद्धा आणि सबूरी! आक्कांनी संयम ठेवला. चिकाटी ठेवली. अडचणींचा एक एक तंतू वेगवेगळा करून त्यावर वेळ येईल तेव्हा उत्तर देणे आणि उत्तर देताना प्रबोधन करणे हा कार्यक्रम त्यांनी राबवला. हे सगळे करताना त्यांच्यातील सोशिक, मान खाली घालून वावरणारी, समाजाला जशी हवी असते तशी स्त्री मरू दिली नाही. 'मी माझ्यासाठी कोणी भलत्यानेच आखलेल्या परिघाबाहेर पाऊलही न टाकताही तुम्हाला हे सुचवू पाहात आहे की माझ्या प्रस्तावात तथ्य आहे' हा संदेश क्षणोक्षणी संबंधितांना पाठवण्यावर आक्कांनी भर दिला.

पाठपुरावा नावाची चीज औरच असते. प्रदीर्घ पाठपुरावा झाल्यानंतर त्या प्रस्तावाला नकार देणार्‍याचा मूळचा, प्रारंभिक विरोध थोडा बोथट होतो. ह्याचे कारण त्याला असे वाटू लागलेले असते की आता मला ह्या समोरच्याला काही खासकरून पटवून द्यावे लागणार नाही आहे तर फक्त तो समोर आला की क्षुल्लक कार्ण देऊन टाळणे जमणार आहे. पण पाठपुरावा करणार्‍याची भावनिक तीव्रता तेव्हाही तीच असते जेवढी प्रारंभिक अवस्थेत असायची. ह्या वास्तवापासून अनभिज्ञ असलेला माणूस एखाद्या बेसावध क्षणी 'बरं मग नेमकं म्हणणं काय आहे तुझं' ह्या पातळीला उतरतो आणि स्वतःच्याही नकळत कमिट होऊन बसतो.

हेच आक्का अ‍ॅचिव्ह करत होत्या. मग तो पती असॉ, सासू-सासरे असोत, शेजार-पाजारचे असोत, माहेरचे असोत, नातेवाईक असोत, शासकीय अधिकारी असोत, देणगीदार असोत नाहीतर खुद्द वेश्या असोत!

समाजाची एक गंमत असते. 'गरजू स्त्री' ही समाजाला नेहमीच हवी असते. तिच्या गरजा पूर्ण करण्यापेक्षा त्या पूर्ण न करून तिला 'गरजूच' ठेवण्यामुळे समाजाला फायदे होत राहतात. कोणते फायदे असतात त्यात? तर आपल्या उंबरठ्यावर येऊन एक स्त्री काहीतरी मदत मागत आहे ह्यातून पुरुषार्थाची जाणीव प्रखर होते. ती गरज पुरवण्यामध्ये किती अडचणी आहेत हे ऐकवताना एका समोर बसलेल्या अगतिक स्त्रीकडे हक्काने हवे तसे बघता येते. तिच्यासमोर काही इतर आणि काही वेळा काही भलत्याच अपेक्षा व्यक्त करता येतात.

पण हे फायदे सातत्याने घेता यावेत ह्यासाठी त्या स्त्रीला अश्या मनस्थितीत ठेवावे लागते की तिचे काम मार्गी लागण्याची प्रक्रिया सुरू आहे असे तिला वाटावे. काहीच घडत नसेल तर ती स्त्री दारात येईलच कशाला?

हे सगळे करण्यात समाज धुरंधर असतो. पुरुषच नव्हे तर स्त्रियासुद्धा! काहीवेळा स्त्रिया अधिकच!

समोर बसलेल्या स्त्रीला सगळे समजत असते. तिची निकड किती तीव्र आहे आणि त्यासाठी कोणता त्याग करण्याची तिची तात्कालीन मानसिकता आहे ह्यावर बर्‍याच गोष्टी ठरतात. त्या ठरलेल्या गोष्टींनुसार मग यशापयश मिळते वगैरे!

क्षणिक सुखासाठी तडफडणार्‍या जगाला सहृदयता नावाचा गुण समजत नाही.

आक्का सहृदय होत्या. त्यांना त्यांचा प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी स्वत्वाचा त्याग करण्याची इच्छाही नव्हती आणि तयारीही! किंबहुना, असा काही विषय उपस्थित व्हावा अशी स्थितीच त्या येऊ देत नव्हत्या. बहुधा फार कमी स्त्रियांना हे जमत असावे.

आक्कांचा मुद्दा सरळसोट होता. त्या प्रत्येक उंबर्‍यावर रोज, रोज म्हणजे रोज, जाऊन फक्त इतकेच ऐकवत होत्या की तुम्ही असे असे केले असतेत तर आज त्या तारा, वैशाली, शर्मिला वगैरेंच्या मुलांचे हे असे असे झाले नसते.

आक्का रडगाणे गायच्या नाहीत. आक्का पदर पसरायच्या नाहीत. आक्का भीक मागायच्या नाहीत.

आक्का माणूसकी जागवायच्या.

ऐकणार्‍याची मान खाली जाईल पण त्याला आपला राग येणार नाही अश्या प्रकारचे वक्तृत्व आक्कांना लाभलेले होते. वक्तृत्व म्हणण्यापेक्षाही स्वभाव म्हणू!

'आपण जे सहज करू शकलो असतो पण केले नाही त्याचे काय भीषण परिणाम होऊ शकतात' हे रोज दारात येणारी एक स्त्री नि:स्वार्थीपणे आणि कानांना बरे वाटेल अश्या स्वरात ऐकवू लागली तर जगात असा कोणता समाज आहे जो पाघळणार नाही? आणि ते पाघळणे त्या अर्थाचे पाघळणे नसून सहृदयतेने पाघळणे असेल.

आक्का सरकारी अधिकार्‍याला मंदपणे हसत आणि नम्रपणे म्हणायच्या:

"आशाचं दुसरं मूल गेलं साहेब आज! तुम्ही नुसती सही केलीत तर पुढची काही मुलं वाचू शकतील"

त्याचा चेहरा पाहण्यालायक व्हायचा.

आक्का नवर्‍याला सांगायच्या.

"सासूबाईंना सांगा ना? मी हे काम केले तर त्यांना दोन शासकीय पुरस्कार मिळतील. अहो शेवटी त्यांच्या आशीर्वादानेच तर हे सगळे करणार आहे ना मी?"

नवरा विचारात पडायचा.

आक्का संभाव्य देणगीदारांना म्हणायच्या:

"वहिदाची मुलगी घडाघडा बोलते. आपण हात दिलात तर मोठी होईल. शेवटी नांव आपलंच काढणार ती"

देणगीदार हसत हसत 'असे खूपजण येतात गं बाई, जा तू' म्हणायचा. पण आठवड्यातून एकदा येणार्‍या आक्कांची चिकाटी पाहून शेवटी अंतर्मुख व्हायचा.

एखाद चौदा वर्षांचं छान दिसणारं पोरगं हिजडा बनवलं जायचं! लष्करातील सामान्य रँकचे अधिकारी किंवा ट्रक ड्रायव्हर्स त्याला घेऊन खोलीत जायचे. त्या पोराची आई चौकात ढसढसा रडायची. तिला तिच्या साथीदार असलेल्या दहा बारा वेश्या धीर द्यायच्या. तेव्हा आक्का रडत रडत म्हणायच्या:

"अगं पाठवा गं माझ्याकडे पोराबाळांना! फुलासारखं ठेवीन मी! अश्या का शत्रू बनताय त्यांच्या?"

चार, सहा मने नक्कीच बदलायची.

आक्कांना काय हवे होते?

हा प्रश्न आपल्यासारख्यांना पडतो.

जगात अशी काही माणसेही असतात ज्यांना स्वतःसाठी काहीही नको असते आणि तरीही ते काहीतरी करत असतात.

आपण अश्या माणसांना मूर्ख म्हणतो. अशी माणसे आपल्याला मुजरासुद्धा करतात वेळ पडली तर!

कुठेतरी वर हिशोब होत असेल बहुधा! कोण कसे होते आणि कोण कसे ह्याचा! त्या माणसांना तर हिशोब होतो की नाही आणि हिशोब व्हावा की नाही ह्याच्याशीही देणेघेणे नसेल कदाचित! कदाचित 'इतरांना आपल्यासारखा विचार करायला लावणे' हाच त्यांच्यासाठी स्वर्ग असेल.

प्रत्येक सत्कृत्यातून अपेक्षाच करायची असते असे नाही, असा विचार करणारी काही माणसे जगात असल्यामुळे जग चाललेले आहे.

चक्रे फिरू लागली. आक्कांच्या चिकाटीने हृदये वितळू लागली.

पावणे दोन वर्षांत जागा मिळाली. आश्रम उभा राहिला. धान्य, कपडे आले. मदतीला हात आले. देणग्या देणारे गाजले. त्यांनी देणग्या दिल्याचे फायदे इतर ठिकाणांमधून उपटले. लाभार्थींचे फोटो पेपरात आले. लाभार्थींना सकाळी खीर, नाश्त्याला डाळ-भात, शाळेत जाताना राजगिरा आणि खजूर, डब्यात पोळी-भाजी, संध्याकाळी दूध आणि एक फळ, रात्री भरपेट जेवण, असे सगळे मिळू लागले.

आक्कांना मात्र आव्हानेच दिसत होती.

आश्रमात देणगीदार येऊन जात होते. शासकीय अधिकारी येऊन जात होते. पत्रकार येऊन जात होते. वेश्या येऊन जात होत्या. समाजातील समाजसेवेची क्षणिक झूल पांघरलेले पांढरपेशे येऊन जात होते. धान्य देणारे, कपडे देणारे येऊन जात होते. नोकरी मागणारे येत होते. 'छोकरी' मागणारेही येत होते.

चिकाटीने उभारलेल्या आश्रमात आता येऊ लागलेल्या लोंढ्यांना सामोरे जाताना आक्का तसूभरही बदलल्या नव्हत्या.

हा आश्रम अनेकांसाठी प्रसिद्धीचे माध्यम झालेला होता. अनेकांसाठी आश्रयस्थान झालेला होता. अनेकांसाठी संशोधनाचा विषय झालेला होता.

मुले एकमेकांत भांडत होती, खेळत होती, हसत होती, रडत होती.

देणगीदार आपापल्या नातेवाईकांना आणून हक्काने आश्रमाचा कानाकोपरा दाखवत होते.

पण येणार्‍या प्रत्येकाला जाताना 'आक्का' समजत होत्या. आक्कांवर मुलामुलींची असलेली निस्सीम श्रद्धा समजत होती. क्षणभर प्रत्येकजण आईचे दूध आठवण्याच्या मनस्थितीत जात होता. क्षणभर त्या माउलीला प्रत्येकजण निदान मनात तरी सलाम करत होता. कित्येकजण तर त्यांना वाकून नमस्कार करत होते. आणि आक्कांचे डोळे अजूनही शोधत होते 'इतर वेश्यांची मुले'! जी इथे आलेली नव्हती.

आक्कांच्या सासरच्यांनी आक्कांना ढिल्ला हात दिला होता. जायचे तिथे जा, यायचे तेव्हा ये, येऊ नकोस, हवे ते कर, काय वाट्टेल ते कर, पण आमच्या मुलाला एक दुसरी कोणीतरी असूदेत! आक्कांना फरक पडला नाही. आक्कांचा नवरा चोवीसपैकी सहा तास झोपायचा. उरलेल्या अठरापैकी सोळा तास 'आक्का ही माझी बायको आहे' हे समाजाला सांगत मिरवायचा. आणि उरलेले दोन तास त्या 'दुसरीच्या' मिठीत पौरुषत्त्वाचा निचरा करायचा.

फक्त आक्का आधी तिथे नांदायच्या त्या ऐवजी आता आश्रमात निजू लागल्या. कुशीत रोगट वेश्यांची चिल्लीपिल्ली घेऊन!

देव नसतो असे नाही. तो जिथे असतो असे आपण मानतो तिथे तो नसतो. तो अजिबात नसेल असे आपण मानतो अश्या ठिकाणी तो अचानक दिसून येतो.

मर्यादीत जगात आक्का एक जिताजागता देव होत्या.

त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या असणार्‍यांसाठी आणि नातवंडांच्या वयाच्या चिल्ल्यापिल्ल्यांसाठी त्या आक्काच होत्या.

आक्कांनी मुलांची शी-शू साफ केली. मुलांना व्यायाम शिकवला. शुश्रुषा केली. शाळा सुरू केली. प्रार्थना शिकवल्या.

हे करत असताना स्थानिक नागरिकांनी एक दिवस आक्कांना घेरले.

"तू रोगट मुलांना आमच्यात आणलेस"

"तू स्वतः रांड असशील"

"तुझी जागा बेकायदेशीर आहे"

"हे फाटक तुझ्या बापाचे आहे का?"

"असली पोरे ह्या वस्तीत नकोत"

"हातपाय सांभाळ"

"उद्या तुझा मर्डर होणार आहे"

एक दिवस नव्हे, हे सहा महिने चालले.

आक्का एकट्या! देणगीदार आपल्या बंगल्यात आश्रमाची महती कोणा आगंतुकाला सांगत असताना! शासकीय अधिकारी मिश्या पिळत 'आम्ही यंव त्यंव केले' सांगत असताना! आक्कांचा नवरा दुसर्‍या बायकोच्या लाडिक तक्रारी ऐकत असताना!

आक्का एकट्या असायच्या!

आक्का म्हणायच्या:

"मारणार आहात काय? मग उद्या कशाला? टाका मारून आत्ताच? मी हे सगळे ह्या निष्पाप बाळांसाठी करतीय! विश्वास बसत नसेल तर त्यांनाच विचारा! तरीही विश्वास नाही बसला तर भोसका रे मला आत्ताच्या आत्ता! "

संतापी, पण मुळात भोळसट असलेली ग्रामीण माणसे एक एक पाऊल मागे घ्यायची. एका बाईची हिम्मत बघून घाबरून नव्हे. तर त्यांच्यात मुळातच असलेला चांगुलपणा निव्वळ एका शाब्दिक फुंकरीने चैतन्यमय झाल्यामुळे!

सपोर्ट!

आक्कांना सर्वात महत्त्वाचा सपोर्ट मिळाला.

आजूबाजूचे सगळे आश्रमाच्या बाजूने झाले. स्पर्श केल्याने रोग होत नसतो हे मान्य केले गेले. बाजरी येऊ लागली. रात्रीबेरात्री एखाद्य अपोराला ससूनला न्यायचे झाले तर मदत मिळू लागली.

आश्रम फुलू लागला. आश्रम गाजू लागला. आक्कांच्या मुलाखती छापल्या जाऊ लागल्या. दोन, चार ट्रॉफीज आल्या. त्या मोठ्या अभिमानाने महत्त्वाच्या जागी ठेवल्या गेल्या.

पण आक्का त्याच होत्या. अजूनही वेश्यावस्तीत जाऊन 'अगं ह्या मुलाला मी घेऊन जातीय गं' असे हक्काने सांगू लागल्या होत्या. '

आक्कांमध्ये बहुधा हा एकच फरक पडलेला होता. 'समाजसेवा केली तर चालेल का' ह्या भूमिकेऐवजी 'ए, मी समाजसेवा करतीय हं' असे म्हणू शकत होत्या त्या!

६१ मुले-मुली! एकत्र वाढणारी, खेळणारी! पौगंडावस्थेत येणारी! विषय कमी नव्हते. असले नाजूक विषय आक्का स्वतः हाताळायच्या. बाहेरून संशोधनासाठी विद्यार्थी येऊ लागले होते. त्यांचे जेवण तिथेच व्हायचे.

जग संशोधन करत होते की समाजसेवा कशी करतात. आक्का समाजसेवा करताना मनात म्हणत होत्या की हे संशोधन कशाला करतात!

आग्रा!

एका दिल्लीच्या संस्थेने आक्कांना आग्र्याला बोलावले. एका दिवसासाठी! पण जायचे यायचे दिवस धरून एकुण चार दिवस होत होते. लहान मुले रडू लागली. अगदी लहान बाळांना तर समजलेही नाही. आपली आजी कुठेतरी गेली आहे हे! मोठ्या मुला-मुलींनी सगळी जबाबदारी घेतली. तीन वेश्या मुद्दाम आश्रमात येऊन राहिल्या काळजी घेण्यासाठी!

आग्र्याला एक मोठी देणगी मिळण्याची शक्यता होती. आशेने आक्का निघाल्या. मुंबईहून गाडी घेतली. बरोबर एक आश्रमातील गडी आणि एक मावशी असे दोघे होते.

चार दिवसांनी आक्का परत आल्या. येताना हातात चेक होता. शहात्तर हजारांचा! समाजसेवेसाठी दुसरे बक्षीस मिळाले होते. पहिले कोणाला आणि तिसरे कोणाला हे आक्कांनी विचारलेही नव्हते. त्यांनी हजारवेळा तो चेक पाहिला होता. कित्येक प्रॉब्लेम्स सुटणार होते आश्रमाचे! त्यांचे डोळे अविरत झरत होते. हवे असते तर शहात्तरपैकी पन्नास त्यांनी स्वतःसाठीही ठेवले असते. नको होते असेही नाही. पण त्यांची 'स्वतःसाठी' ह्या शब्दाची व्याख्या वेगळी होती. 'स्वतःसाठी म्हणजे स्वतःला ज्यात आनंद मिळतो त्यासाठी'! त्यांना आनंद आश्रम बहरण्यातून मिळत असे. देणगीदारांचे उंबरे अडीच वर्षेतरी झिजवावे लागणार नाहीत इतकाच त्यांचा अल्प आनंद होता.

गाड्या बदलत बदलत, डोळे भरत भरत, आक्का घरी येण्याच्याहीआधी आश्रमात आल्या. वेळ दुपारची होती. सव्वा वाजला होता. साल होते १९७३!

गजबलेल्या आश्रमाच्या जागी होते पडलेले गेट! तुफान आरडाओरडी करत खेळणार्‍या मुला-मुलींच्या जागी होते चिखलात उमटलेले पावलांचे शेवटचे ठसे!

आक्का आत गेल्या. स्मशानशांतता होती. तोंडातून शब्द फुटत नव्हता. आश्रमात अक्षरशः कोणीही नव्हते. अक्षरशः कोणीही!

कुठे गेली मुले? मुली? स्टाफ?

आक्का इतस्ततः फिरत राहिल्या. सगळी धूळधाण उडालेली होती. एका कोणत्यातरी मोठ्या वाहनाच्या, बहुधा एका ट्रकच्या टायर्सच्या खुणा अंगणातील मातीत राहिलेल्या होत्या.

आक्का भक्क नजरेने पाहात राहिल्या.

पहिल्यांदाच आक्का कोलमडल्या.

तेसुद्धा, त्या स्वतः हारल्यामुळे नव्हे तर ती बिचारे मुले नाहीशी झाल्यामुळे!

एक दोन दिवसांनी देणगीदार येऊन शिव्या देऊन जाऊ लागले. म्हणाले 'आश्रम सांभाळता येत नाही तर काढतेस कशाला'! सरकार-दरबारातले तर कोणी फिरकलेच नाही. वेश्यावस्तीत आक्का गेल्या तर चिडीचूप! 'ही कोण म्हातारी बया उगवली इथे' असे चेहरे सगळ्यांचे! कोणाशी बोलायला जावे तर तोंडावर थुंकून आत निघून जात बायका!

तरीही आक्का हतबल झाल्या नाहीत. त्यांचा फक्त गोंधळ उडाला. नेमके झाले काय?

ज्या वेश्यांची मुले अगदी बिलगायची त्या वेश्यांना त्यांनी विचारले.

हमसाहमशी रडत वेश्यांनी सांगितले.

"सुभानराव कोरडेंनी नवीन आश्रम उभा केला येरवड्यात! तुम्ही गावाला जाणार हे कळल्यावर त्यांनी आमच्या वस्तीत यायच्याऐवजी थेट तुमच्या आश्रमातील मुले पळवली ट्रकमधून! सगळी मुले येरवड्याला आहेत. त्यांची माणसे आम्हाला फक्त हे सांगायला आली होती. कसलेतरी सरकारी अनुदान मिळणार होते काल त्यांच्या आश्रमाला! त्यांच्याकडे लाभार्थीच नव्हते. ते तुमच्या आश्रमातून पळवले. आता संपला विषय"

आक्का भक्क डोळ्यांनी पाहात राहिल्या. त्यांच्या मनात अनेक प्रश्न होते. अनुदान महत्त्वाचे होते का? त्यासाठी दाखवण्यापुरतीच मुले हवी होती का? ती पळवावीच का लागली? दुसरी मुले का नाही मिळवली? आता पळवलेल्या मुलांचे पुढे काय? मला आक्का म्हणून बिलगणार्‍या बाळांचे काय?

प्रश्न, प्रश्न, प्रश्न!

आक्का हारल्या नाहीत. पण त्यांनी एक निर्णय घेतला. आपले वय झालेले आहे. आपले आयुष्य उतरणीला लागलेले आहे. नव्या जोमाचे एक माणूस तयार करूयात आपण! आणि हळूहळू नवा आश्रम उभारू! आक्का पुन्हा उंबरे झिजवू लागल्या. आधीपेक्षा कडवा विरोध होऊ लागला. आक्काही आधीपेक्षा अधिक कडव्या होऊ लागल्या.

आता त्या संबंधितांना थेट शब्दांत सुनावू लागल्या. ते सुनावणे कोणाला रुचले नाही. मग नवीन 'गरजू स्त्री' समोर दिसू लागली जी आक्कांनी केवळ तरुण आणि खमकी स्त्री म्हणून जोडीला घेतली होती. मग त्या स्त्रीला पट्टी पढवणे, तिच्याकडे बघणे, तिच्या काही गरजा पुरवूनही तिचे गरजू असणे कायम ठेवता येईल ह्याचे प्रयत्न सुरू झाले. कधीतरी पुन्हा आश्रमाला जागा मिळाली.

नंतर समजले.

पळवल्या गेलेल्यांपैकी बहुतांशी मुले भडवी बनली. जी गोरीगोमटी मुले होती ती समलिंगियांसाठी नटवण्यात आली. मुली खिडक्यांमध्ये बसू लागल्या. त्यांच्या आया त्यांच्या जिवावर जगू लागल्या.

आक्का!

आक्का निवर्तल्या. नवा आश्रम जोरात सुरू आहे.

पण भडवे झालेले, हिजडे झालेले आणि वेश्या झालेल्या, अशी काही माणसे अजूनही आहेत ज्यांना एकदाच चुकून माणूसकी म्हणजे काय हे कळले आणि नंतर ते गायब झाले.

बाकी तुम्ही, आम्ही काय, आहोत तिथे आहोतच!

-'बेफिकीर'!

=================

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१९७३ साली घडलेल्या चक्रावणार्‍या सत्य घटनेवर आधारीतः>>>> भयानक आहे हे सगळं. लेखनशैली नेहमीप्रमाणे खिळवून ठेवणारी Sad

Udvegajanak aahe he. Aataa itakyaa varShaanee naave kaa badalataay ? Tasehee tyaanaa kaahi farak paDaNaarach naahee,

आता, उपसंहार ही लिहाच.. कुणावर काहीही कार्यवाही झाली नसणार... गुन्हा घडलाच नाही तर शिक्षा कसली ? हो ना ?

आक्कान्च्या आठवणी जागवल्या तुम्ही... पाणी आले डोळ्यात..

खुप योग्यता असुनही त्या समाजापुढे फारशा आल्या नाहीत..

People not worth of even 1% of her work are “celebrity social workers” in today’s society...

बेफिकीर,

कुटुंबसंस्था का महत्त्वाची आहे ते कळतं या कथेतून. तूर्तास इतकाच बोध पुरेसा आहे.

आ.न.,
-गा.पै.

>>कुटुंबसंस्था का महत्त्वाची आहे ते कळतं या कथेतून.>>:अओ:
भारतात काही लोकांना कायदेकानू लागू होत नाहीत आणि ही मंडळी स्वतःच्या शुल्लक स्वार्थासाठी निष्पाप मुलांच्या आयुष्याची सहजतेने धुळदाण उडवून मोकळी होतात हे नाही का जाणवले?

गा. पै. कुटुंबसंस्था महत्वाचीच पण परीस्थितीने, जबरदस्तीने या कुटुंब व्यवस्थेच्या बाहेर फेकले गेलेले आहेत त्यांचे काय? ज्यांचा जन्म पारंपारिक कुटुंबात होत नाही त्या निष्पाप बाळांचे काय? या निष्पाप बाळांच्या डोक्यावर कुणीतरी मायेची सावली धरली होती. ती स्वतःच्या स्वार्थासाठी काढून घेणार्‍या लोकांना स्वतःचे कुटुंब असेलच ना. इनफॅक्ट त्याच कुटुंबासाठी, पुढल्या सात पिढ्यांची तरतूद करायची हाव म्हणून हे अनुदान ढापणे, मुले पळवणे झाले असेल ना. भ्रष्टाचारी लोकांनी या मुलांची सामान्य आयुष्य जगायची संधी हिरावून घेतली.

स्वाती२,

अहो, तुम्ही म्हणताय ते उघड दिसतंय. यातून वाचकाने काय बोध घ्यायचा, हा प्रश्न आहे. अक्काने पोरांना कुटुंबाप्रमाणे सांभाळलं होतं. त्यांनाही हा वारसा त्यांच्या कुटुंबाकडूनच मिळाला होता. म्हणून कुटुंबसंस्था महत्त्वाची.

आ.न.,
-गा.पै.

>> क्षणिक सुखासाठी तडफडणार्‍या जगाला सहृदयता नावाचा गुण समजत नाही.
>> चक्रे फिरू लागली. आक्कांच्या चिकाटीने हृदये वितळू लागली.
>> त्यांच्यात मुळातच असलेला चांगुलपणा निव्वळ एका शाब्दिक फुंकरीने चैतन्यमय झाल्यामुळे!
>> देव नसतो असे नाही. तो जिथे असतो असे आपण मानतो तिथे तो नसतो. तो अजिबात नसेल असे आपण मानतो अश्या ठिकाणी तो अचानक दिसून येतो.
>> बाकी तुम्ही, आम्ही काय, आहोत तिथे आहोतच!

फारच परिणामकारक कथन. उगाच नाही मी तुम्हाला भाषाप्रभु म्हणत.
वाचकांच्या भावनांना अगदी हुकमी हात घालता तुम्ही. लिहित रहा. तुमच्या बाकीच्या अर्धवट कथा पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत.

बापरे.. हे वास्तव आहे??वर्स्ट दॅन इमॅजिनेशन!!!
खूपच वाईट वाटतंय त्या लहान पोरांकरता..
शांताराम' कादंबरी चीआठवण आली.. ती ही सत्य घटनांवर आधारित आहे!!!

Pages