अनिश्चिततेचा सोहळा (Movie Review - Masaan)

Submitted by रसप on 26 July, 2015 - 00:46

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः

शस्त्र छेद देऊ शकत नाही, आग जाळू शकत नाही, पाणी आणि हवासुद्धा नष्ट करु शकत नाही, असं आत्म्याचं वर्णन भगवद्गीतेत आहे. ह्या दोनच ओळींचा स्वतंत्र विचार केला तर त्यांचे अर्थ, अन्वयार्थ अनेक लावले जाऊ शकतात. एक असाही लावता येईल की, व्यक्ती शारीरिक रूपाने आपल्यातून निघुन जाते. पण तिच्या आठवणी मागे राहतात. काही जण त्या विसरवू शकतात आणि काहींचा मात्र त्या आठवणी पिच्छा शेवटपर्यंत पुरवतात. कालपरत्वे त्या पिच्छा पुरवण्यात गोडवा येतो. त्या उफाळून आल्या की चेहऱ्यावर स्मितरेषा उमटतात किंवा त्या हळवेपणा, नैराश्य, उदासीनताही आणतात.

मृत्यू ही एक सुरुवात असते. मागे राहिलेल्यांसाठी एकाच जन्मातली दुसरी आणि निघुन गेलेल्यासाठी नव्या जन्माची. सुरेश भट साहेबांच्या शब्दांत सांगायचे झाल्यास -

इतकेच मला जाताना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते

- असं निघून गेलेली व्यक्ती म्हणु शकते, पण मागे राहिलेली मात्र हा छळवाद सहन करत राहते.

'पियुष अग्रवाल' ह्या विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे असाच एक छळवाद 'देवी पाठक' (रिचा चढ्ढा) ह्या त्याच्या शिक्षिकेचा सुरु होतो. तिच्यासोबत फरफट होते तिचे वडील 'विद्याधर पाठक' (संजय मिश्रा) ह्यांचीही. गंगेच्या घाटावर, बनारसमध्ये राहणाऱ्या ह्या बाप-लेकीच्या आयुष्यात पियुषच्या मृत्यूमुळे बदनामी, असहाय्यता, अनिश्चितता आणि लाचारीचं एक भयाण सावट येतं. पाळंमुळं बनारसमध्ये रोवलेल्या वृद्ध विद्याधरसाठी तर शक्य नसतं, पण देवी मात्र ह्या सगळ्यापासून दूर जाण्याचा, बाहेरगावी जाऊन नवीन आयुष्य सुरु करण्याचा प्रयत्न करत असते.

दुसरीकडे त्याच बनारसमध्ये 'दीपक चौधरी' (विकी कौशल) हा त्याच्या पारंपारिक, कौटुंबिक व्यवसायातून दूर जाण्याचा, एक सन्मानाचं आयुष्य सुरु करण्याचा प्रयत्न करत असतो. चौधरी कुटुंब पिढ्यानपिढ्या गंगेच्या घाटावर अन्त्यक्रीयेची कामं करत असते. आपण 'डोम' असुन समाजाच्या दृष्टीने हलक्या जातीचे आहेत, ह्याची जाणीव असूनही 'दीपक' उच्च जातीतील शालू (श्वेता त्रिपाठी) च्या प्रेमात पडतो. शालूलाही तो आवडत असतोच. ही प्रेमकहाणीसुद्धा एक विचित्र वळणावर संपते आणि दीपकही एक अनिश्चितता व असहाय्यतेचं सावट डोक्यावर व मनात वागवत असतो.

प्राप्त परिस्थितीवर मात करून, तिच्या डोक्यावर पाय देऊन पुढे जायलाच हवं, ह्याचं भान देवी आणि दीपकला असतंच आणि ते तसंच करतात. त्यांच्या एरव्ही पूर्णपणे भिन्न असलेल्या कहाण्या गंगा-यमुनेच्या संगमाप्रमाणे एकत्र येतात. ज्या प्रकारे गंगा-यमुनेच्या संगमात सरस्वतीसुद्धा अदृश्यरूपाने आहे, त्याच प्रकारे ह्या दोन आयुष्यांच्या संगमात एका आश्वासक उद्याची आशा अस्पष्टपणे जाणवते.
maxresdefault.jpg
'नीरज घायवान' दिग्दर्शक म्हणुन पहिला चित्रपट करताना 'मसान' मधून ही एक आव्हानात्मक कहाणी खूपच विश्वासाने मांडतात. आव्हानात्मक अश्यासाठी की कहाणीत पुढे काय घडणार आहे, हे अगदी नेमकं माहित नसलं तरी पुसटसं कळतच असतं आणि ते तसं घडतंही. नवोदित अभिनेत्यांसोबत अशी एक कहाणी मांडणं जी 'प्रेडिक्टेबल'ही आहे आणि समांतर चित्रपटाला साजेशी आहे, हे पहिल्याच प्रयत्नासाठी साधंसोपं नक्कीच नाही. पण दोन आयुष्यांचा संगम आणि त्रिवेणी संगमाचा त्यांनी जोडलेला संबंध आणि प्रत्येकाकडून ज्याप्रकारे त्यांनी केवळ अफलातून काम करून घेतलं आहे त्यावरून आपण हे निश्चितच म्हणू शकतो की अनुराग कश्यपसोबत 'गॅंग्स ऑफ वासेपूर' आणि 'अग्ली' सारख्या चित्रपटांत मुख्य सहाय्यक दिग्दर्शक म्हणुन काम केलेल्या नीरज ह्यांना त्या अनुभवातून पुरेशी शिदोरीही मिळालेली दिसते आणि त्यांच्यात उपजत धमकही नक्कीच असावी.

मुख्य भूमिकेत रिचा चढ्ढा आणि विकी कौशल अप्रतिम काम करतात. रिचा चढ्ढाचा अभिनय एकसुरी वाटतो. पण ती व्यक्तिरेखासुद्धा आपल्या कोशात शिरलेल्या एका व्यक्तीची आहे, जी भावनिक उद्रेक वगैरे फारसा दाखवत नाही, त्यामुळे कदाचित तो एकसुरेपणा भूमिकेची गरजच मानता येऊ शकतो.

विकी कौशलच्या 'दीपक'च्या व्यक्तिरेखेला मात्र विविध छटा आहेत आणि त्या सगळ्याच त्याने ताकदीने रंगवल्या आहेत. आघात, नैराश्य, अनपेक्षित आनंद, जिद्द वगैरे सर्व चढ-उतार तो उत्तमरीत्या पार करतो. त्याची 'शालू'सोबतची जोडीही अगदी साजेशी वाटते. छोट्याश्या भूमिकेत 'श्वेता त्रिपाठी' देखील 'शालू' म्हणून गोड दिसते आणि चांगलं कामही करते.

'संजय मिश्रा' पुन्हा एकदा आपण काय ताकदीचे कलाकार आहोत, हे दाखवून देतात. विद्याधरची लाचारी त्यांनी ज्या परिणामकारकपणे साकार केली आहे, त्याला तोडच नाही. एखादा महान गायक सहजतेने अशी एखादी तान, हरकत, मुरकी घेतो की ती घेताना इतर कुणाचीही बोबडी वळावी, त्या सहजतेने त्यांनी अनेक जागी कमाल केली आहे. हा अभिनेता, ह्या पिढीतल्या महान अभिनेत्यांपैकी एक आहे, ह्यात तिळमात्र शंका नसावीच !

संगीताची बाजू भक्कम आहे, हे विशेष. 'इंडियन ओशन' ने दिलेली मोजकीच गाणी श्रवणीय आहेत. दुष्यंत कुमार साहेबांच्या ओळींवर बेतलेलं गीत 'तू किसी रेल की तरह..' तर चित्रपट संपल्यानंतरही मनात रुंजी घालत राहतं.

संवाद चुरचुरीत आहेत. मोजक्या शब्दांत अधिकाधिक व्यक्त होण्याचा प्रयत्न जागोजाग दिसतो. हलक्या-फुलक्या विनोदाची पेरणी जिथे जिथे केली आहे, तिथे तिथे प्रत्येक वेळी हास्याची लकेर प्रेक्षकाच्या चेहऱ्यावर उमटतेच !

'मसान' हा मनोरंजनपर चित्रपट नाही. त्यासाठी बाहुबली आणि बजरंगी अजूनही इतर पडद्यांवर कब्जा करून बसलेच आहेत. 'मसान' हा एक उद्गार आहे एका नवोदित दिग्दर्शकाचा. जो खणखणीत आणि सुस्पष्ट आहे. 'मसान'सारखे चित्रपट आजच्या चित्रपटांचं आश्वासक रूप आहेत, ह्यात वादच नाही. 'आयुष्य' आपल्याला जिथे नेतं, तिथे आपल्याला जावंच लागतं. त्या त्या ठिकाणी जाणं आणि तिथलंच होणं, हे जमवण्याची ज्याच्यात हिंमत असते, तो हा अनिश्चित प्रवाससुद्धा एक सोहळा बनवू शकतो. अन्यथा बहुतेक जण दुष्यंत कुमारांच्याच ओळींपासून प्रेरणा घेऊन सांगायचं झाल्यास -

जिंदगी रेल सी गुजरती हैं
मै किसी पुल सा थरथराता हूं

- इतकंच करु शकतात.

'मसान' अश्या दोन्ही प्रकारच्या लोकांसाठी आहे.

रेटिंग - * * * *

- रणजित पराडकर

http://www.ranjeetparadkar.com/2015/07/movie-review-masaan.html

हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये आज १९ जुलै २०१५ रोजी प्रकाशित झाले आहे :-
26072015-mai-06-page-001.jpg

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय. सगळीकडे चांगलंच वाचायला मिळतंय सिनेमाबद्दल.
स्वानंद किरकरेंच्या आवाजातलं 'तू किसी रेल की तरह..' गाणं आणि श्वेता त्रिपाठी साठी मुख्यतः बघायचाय. तिचा छोट्या छोट्या जाहिरातीतला ( कुठलीतरी मिनिरल वॉटरची, अल्पेनलिबे वगैरे) वावर फार आश्वासक वाटतो.

रणजित....

~ एरव्हीही मी तुमच्या सार्‍या परीक्षणांचे मी अगत्यपूर्वक वाचन करीत असतोच...."मसान" बद्दल मला खरोखरीच उत्सुकता होती.....त्याला कारण म्हणजे कालच नागपूरस्थित नेटवरील एका ७०+ वयाच्या सदस्य मित्रांने मला मेलमधून "अगत्यपूर्वक पहाच हा चित्रपट" असे कळविले शिवाय असे एक वाक्य लिहिले आहे जे तुमच्यासोबत वाटावे असे मनी आले आहे.... ते म्हणतात, "..As a debut, the film is truly a giant leap for director, Neeraj Ghaywan, who had till now been assisting renowned film director, Anurag Kashyap, in films like 'Gangs of Wassyepur' etc. The film-buffs can certainly expect many great films from him in the days to come...." नेमका तुम्हीही हाच कौतुकाचा स्वर लावला आहे..."..'मसान' हा एक उद्गार आहे एका नवोदित दिग्दर्शकाचा. जो खणखणीत आणि सुस्पष्ट आहे. 'मसान'सारखे चित्रपट आजच्या चित्रपटांचं आश्वासक रूप आहेत, ह्यात वादच नाही...." ~ नव्या दिग्दर्शकाच्या कलेचा इतका चांगला गौरव तुमच्यासारख्या रसिकांकडून होतो आहे ही मला खूप आश्वासक बाब वाटते.

रसपन्च्या परिक्षणावर बहुतेकवेळा माझी पोस्ट ' चित्रपट बघायचा आहे वा नक्की पाहीन ' अश्या स्वरूपाची असते . मात्र यावेळी अगोदरच हा चित्रपट पाहून झालाय . Lol रसप यू आर लेट Proud

परीक्षण आवडल. छान लिहिलेय .

संजय मिश्राच्या परिच्छेदाला +100
छान काम केलेय. रिचा चढ्ढा काही ठिकाणी कंटाळवाणी वाटली. श्वेता त्रिपाठी गोड दिसलिये.

यूपीतल्या घाटाच् दृश्य पाहून कसेसेच झाले. अस काही असत याची कल्पना देखील नव्हती. मृत्युच् हे रूप हादरवुन गेल . जळणारी प्रेते , तिथेच वसलेल्या मानवी वस्तीची जगन्यासाठीची चाललेली धडपड!! सगळच कॉण्ट्राडिक्टरी !!
रोजच्या जगण्यातला हा विरोधाभास दिग्दर्शकाने अचूक पकडलाय.
तिच गोष्ट संजय मिश्रा आणि पोलिस इन्स्पेक्टर यांच्या संवादातली . एका प्रसंगात जेव्हा ते दोघे पैशाच्या वाटाघाटी करत असतात तेव्हा त्या पोलिसाची मुलगी अचानक फ्रेममध्ये येतात तेव्हा तिला पाहुन संजय मिश्राला जे वाटल तेच नेमकं प्रेक्षकाला वाटत. ही दिग्दर्शकिय कमाल. या अश्या छोट्या छोटया प्रसंगातून चित्रपट उलगड़त जातो

जाई....

छान लिहिले आहेस. आम्ही चारपाच मित्र मसान आणि बजरंगीविषयी रंकाळ्यावर बोलत बसलो होतो एका अशाच सुट्टीच्या दिवशी. त्यावेळी 'मसान' उपकथानकातील शालिनी दीपक प्रेमप्रकरणाचा उल्लेख निघणे स्वाभाविकच. अगदी व्यवस्थितरित्या त्यांच्या प्रेमाची गाडी चालू आहे....शिवाय तो जरी डोम जातीचा असला तरी शालिनीने त्याला आपले मानले आहे....ती त्याच्याबरोबर त्याला नोकरी लागेल त्या ठिकाणी येण्याची तयारीही दर्शविते शिवाय त्याला त्याचे तांत्रिक शिक्षण पूर्ण करण्यास प्रोत्साहितही करत असल्याचे दाखविले गेले...जे चांगलेच आहे.

मग अशावेळी अचानकच कुणाच्या ध्यानीमनी नसताना घाटावर तिचे प्रेतच येते. काय कारण ? त्याची आवश्यकता होती का कथानकासाठी ? पुढे रिचा आणि विकीच्या एकत्र येण्याचा संकेताला काहीतरी आधार पाहिजे म्हणून शालिनीला पुसून टाकणे गरजेचे होते ? तसे असेल तर तिच्या मृत्यूशिवायही अन्य विकल्प दिग्दर्शकापुढे यायला हवे होते.

अशोक मामा सहमत...स्पॉयलर वाटल्याने लिहिला नव्हता. तसंही पहिल्याच पोस्टीत श्वेता त्रिपाठी बद्दल सॉफ्ट कॉर्नर दाखवला होता मी Happy

धन्यवाद मित....

~ शंकाच काढायच्या झाल्यास चित्रपट पाहणारे अनेक प्रकारे आपले मत व्यक्त करीत असतात...(त्यात काही वावगे नाही); पण जेव्हा समाजरचनेचा मुद्दा कुणी संभाषणातून पुढे आणतो त्यावेळी त्याला दिग्दर्शक किंवा कथाकार यांची बाजू त्यांच्या अनुपस्थितीत सांगणे अन्यांना कठीणच जाते. त्या इन्स्पेक्टरने देवीसोबत लॉजवर असलेल्या तरुणाने आत्महत्या केली ती बातमी छापण्यापूर्वी देवीचा सोबतीचा व्हिडिओ माध्यमाना देणार नाही...यासाठी किंमत म्हणून विद्याधर चौधरीकडून तीन लाख रुपयांची लाचेची मागणी करतो....आयुष्यभर संस्कृतचा शिक्षक आणि घाटावर धार्मिक कार्य करण्यात मग्न असलेल्या तसेच आर्थिक बाजूने पिचून गेलेल्या त्या शिक्षकाने काय वाट्टेल ते करून त्या निर्दयी इन्स्पेक्टरची लाचमागणी पूर्ण करायची हे दाखविणे सर्वजण सहजी मान्य करतात कारण तो आपल्या समाजाचा अब्रू बचावणीबाबत पिंडच बनून गेला आहे. सेन्सॉरलाही त्यात काही गैर वाटत नाही.

मात्र उच्च आणि नीचवर्णीयांचा विवाह दाखवायचा म्हणजे नीरज घायवान आणि कथालेखक वरुण ग्रोव्हर याना खाप पंचायतीच्या डोळे वटारणीची भीती वाटली की काय ? असे मनात येते आणि तसे येणे म्हणजे दिग्दर्शकाने ते टाळण्यासाठी त्या शालिनीला थेट घाटावरच आणले...अंतिम संस्कारासाठी.

तुमची परीक्षणं माझ्या वाचनात खूपच उशीरा आली. मात्र आता कुठलाही पिक्चर बघायचा की नाही हे तुमचं परीक्षण वाचूनच ठरवणार आहे.

मी काल बघितला हा चित्रपट आणि हे सर्व आठवले... दिग्दर्शकाच्या आत्मविश्वासाला दाद द्यावीच लागेल. रिचा ज्यावेळी त्या मुलाच्या घरी जाते त्यावेळी त्या सर्व प्रसंगाचा एक सलग लाँग शॉट आहे. दार उघडणारी बाई सोडली तर इतर कुणी दिसतही नाही, फक्त संवाद ऐकू येतात. इथे सर्वच पात्रांना अगदी हमखास अति अभिनय करायची संधी होती... पण आपण काय दाखवणार आहोत ते प्रेक्षकांपर्यंत नीट पोहोचेल याबाबत दिग्दर्शकाला किती आत्मविश्वास होता.. निव्वळ ग्रेट !