फुंकिले मी प्राण माझे...

Submitted by सत्यजित... on 24 July, 2015 - 10:11

फुंकिले मी प्राण माझे,बासुरीचा सूर झाले...
गायचे तू टाळलेले..गीत मग मशहूर झाले!

हे बरे झाले खरे तर..मी तुला मंजूर नव्हते...
जाहले नाही तुझी पण,या जगा मंजूर झाले!

चालले होते कुठे मी? मज कुठे रस्ते कळाले?
पाय जेथे थांबले ते,गाव ही निष्ठूर झाले!

सांगतो आहेस आता,खूण माझ्या आठवांची...
पास मी होते तुझ्या तर,कोण होते दूर झाले!

काजवे घेवून हाती,शोध माझ्या सावल्या तू...
घेवुनी हाती उन्हे मी,चांदण्याचा धूर झाले!

जीवना बघ..मी तुझाही,साजरा मधुमास केला...
तू विखारी दंश करता,अमृताचा पूर झाले!

—सत्यजित

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फुंकिले मी प्राण माझे,बासुरीचा सूर झाले...
गायचे तू टाळलेले..गीत मग मशहूर झाले!...मतला मस्त!

काजवे घेवून हाती,शोध माझ्या सावल्या तू...
घेवुनी हाती उन्हे मी,चांदण्याचा धूर झाले!...वाह वाह!!

संपूर्ण गझल मस्त आहे Happy

>>>गायचे तू टाळलेले..गीत मग मशहूर झाले!<<< वा!

>>>हे बरे झाले खरे तर..मी तुला मंजूर नव्हते...
जाहले नाही तुझी पण,या जगा मंजूर झाले!<<<

(मी तुझी नसल्यामुळे मग ह्या जगा मंजूर झाले - अशी ओळ सुचली. कृ गै न! शेर मस्त)

>>>काजवे घेवून हाती,शोध माझ्या सावल्या तू...
घेवुनी हाती उन्हे मी,चांदण्याचा धूर झाले!<<< काय शेर आहे हा! कसा काय सुचला? व्वा!

'पास' ह्या शब्दाचा वापर खटकला. शेवटच्या शेरात 'तुझा' आणि 'ही' हे सलग लिहायला हवे आहेत.

=======

काजवे घेवून हाती,शोध माझ्या सावल्या तू...
घेवुनी हाती उन्हे मी,चांदण्याचा धूर झाले<<< सुंदरच!

सर्वांचे हार्दिक धन्यवाद!

आ.बेफिकीर जी,

>>>जाहले नाही तुझी पण,या जगा मंजूर झाले!<<<

या ओळीतून पुढील प्रमाणे दोन अर्थ ध्वनित करण्याचा प्रयत्न होता...

१) 'तुझी होणे' म्हणजे जगाच्या विरोधात जाणे होते!

२)एकट्या तुझ्यावाचून मी काही एकटी राहिले नाही,उलट साऱ्या जगाने मला आपलेसे केले.

>>>'पास' ह्या शब्दाचा वापर खटकला.<<<

'पास' ऐवजी 'जवळ' शब्द सुचला होता,पण भावत नव्हता!
परभाषीय शब्द वाटत असला तरी मराठीत 'आस-पास'/'जवळ-पास' तो स्थिरावल्यासारखा वाटला!

या पेक्षा वेगळ्या कारणाने खटकला असल्यास कृपया मार्गदर्शन करावे!

>'तुझा ही' ऐवजी 'तुझाही',असा बदल केला आहे.

चूक-भूल माफ असावी!
धन्यवाद!

आपला विनम्र
— सत्यजित

क्या बात है.
एक आणि एक ओळ आवडली

तरीही

फुंकिले मी प्राण माझे,बासुरीचा सूर झाले...
गायचे तू टाळलेले..गीत मग मशहूर झाले!

आणि

जीवना बघ..मी तुझाही,साजरा मधुमास केला...
तू विखारी दंश करता,अमृताचा पूर झाले!

खासच!