जखमा...

Submitted by सत्यजित... on 17 July, 2015 - 19:18

सल जाहले पुराने,सांकाळल्यात जखमा...
मी लेखणीत माझ्या..सांभाळल्यात जखमा!!

आहेत जीवघेणे,काही सुरे परंतू...
त्यांच्या उरात माझ्या गंधाळल्यात जखमा!

उडताच पाखरांना,आभाळ ही कमी हे...
पंखात त्राण इवले पण टाळल्यात जखमा!

येणे नकोच होते,आलो तुझ्या घरी पण...
केंव्हाच मैफिलींना,कंटाळल्यात जखमा!

ते बोलले मला की,छंदात मी लिहावे...
पण यार मुक्तछंदी घोटाळल्यात जखमा!

असली नशा जिण्याची,असते मजा पिण्याची...
ग्लासात बघ 'फुटाण्या',फेसाळल्यात जखमा!

कर वार पापण्यांनी,कवळ्या कळ्या-फुलांचे...
बघ फायदा तुझा तू रेंगाळल्यात जखमा!

कातील कोण होता?झाला कसा खुलासा?
मी राहिलो मुका पण किंचाळल्यात जखमा!

होईल चांदणे का..माझे भल्या दुपारी?
वाटे जरा भरोसा आभाळल्यात जखमा!

लखलाभ तो-तयांना,बाजार पोपटांचा...
मी पिंजऱ्यात 'सत्या',तव पाळल्यात जखमा!
—सत्यजित

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायबोलीच्या अंगणी,पहिल्याच पाऊली 'जखमा' हवाली करताना,आपण दिलेली दाद,आपले आशिर्वाद...कुणीतरी 'हळुवार फुंकर' घालावी,तितकेच अल्हाद-दायक आहेत!
हार्दिक धन्यवाद!

आहेत जीवघेणे,काही सुरे परंतू...
त्यांच्या उरात माझ्या गंधाळल्यात जखमा!>>> वाह! वाह!

मस्त आहे..