'हायवे'च्या निमित्ताने मुक्ता बर्वे यांच्याशी संवाद

Submitted by माध्यम_प्रायोजक on 13 July, 2015 - 00:18

अतिशय संवेदनशील अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वे मराठी रसिकांना सुपरिचित आहेत. 'जोगवा', 'थांग', 'एक डाव धोबीपछाड', मुंबई पुणे मुंबई' असे चित्रपट असोत, किंवा 'देहभान', 'छापाकाटा', 'फायनल ड्राफ्ट', 'कबड्डी कबड्डी' ही नाटकं, त्यांचा उत्स्फूर्त आणि ताकदीचा अभिनय कायमच वाखाणला गेला आहे.

२४ जुलै, २०१५ रोजी उमेश कुलकर्णी दिग्दर्शित 'हायवे' हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे आणि या चित्रपटात मुक्ता बर्वे यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याशी साधलेला हा संवाद -

Highway Stills 9.jpg

'हायवे'मधल्या तुमच्या भूमिकेबद्दल सांगाल का?

'हायवे' हा चित्रपट अनेक व्यक्तिरेखांचा प्रवास आहे. त्यांपैकी एका गाडीतली प्रवासी म्हणजे मी. तमाशा फडातल्या एका उदयोन्मुख कलाकाराची माझी व्यक्तिरेखा आहे. त्या तमाशा फडाची जी मुख्य मावशी आहे ती आणि मी अशा दोघींचा हा प्रवास आहे.

खरंतर मी साकारलेलं पात्र खूप सच्चं आहे. कदाचित काही लोकांना वाटू शकेल की ही मुलगी आणि ती मावशी शहरात मिसळण्याचा प्रयत्न करतायेत. पण त्यांची शहरी प्रवाहात येण्याची तशी काही धडपड नाही. बाहेरनं कदाचित त्या शहराच्या वेगात धावतायेत असं दिसेल, पण त्या सावकाशच चालल्या आहेत. त्या मुद्दाम काही वेगळं जगत नाहीत. शहरी वृत्तीची माणसं कशी सहसा दडपण घेतात, तसं काही या दोघींच्या बाबतीत घडत नाही. उदाहरण द्यायचं, तर बालनाट्यं आणि मोठ्यांची नाटकं यांत फरक असतो. बालनाट्यं सादर करणं जास्त अवघड असतं. लहान मुलं ही खूप प्रामाणिक प्रेक्षक असतात. त्यांना नाटक नाही आवडलं तर ती सरळ नाटक सुरू असताना बोलायला लागतात किंवा उठून खेळायला जातात. पण मोठी माणसं, जरी त्यांना नाटक आवडलं नाही, तरी त्यांची नापसंती उघडपणे दाखवत नाहीत. म्हणजे नंतर ते बोलतील किंवा लिहितील की घाणेरडं नाटक होतं वगैरे. पण प्रामाणिक प्रतिक्रिया लगेच समोर सहसा दिसत नाही. हे मोठे प्रेक्षक थोडेसे सोपे असतात. तर तशा लहान मुलांसारख्या वाटल्या त्या दोघीजणी किंवा ती दोन पात्रं मला. त्या शुद्ध आहेत, जे घडतंय किंवा जी सद्य परिस्थिती आहे त्यावर त्या व्यक्त होतायेत, प्रतिक्रिया देतायेत. तिथे तिसरं कुणीतरी आहे म्हणून त्यांच्या आयुष्यावर फार फरक पडलेला नाही.

'मावशीं'ची ही भूमिका शकुंतलाबाई नगरकर करत आहेत, शिवाय उमेश कुलकर्णींबरोबरही हा तुमचा पहिलाच चित्रपट आहे. तर हे दोन्ही अनुभव कसे होते?

शकुताईंविषयी आधी सांगते. मुळात लावणी, तमाशा या कलाप्रकारांविषयी मला खूप आकर्षण आहे. ललित कला केंद्रात शिकत असताना शकुताईंचे दोन परफॉर्मन्सेस मी बघितले होते. थिएटरमध्ये त्या भन्नाट जादू करतात, हे मला माहीत होतं आणि म्हणून चित्रपटात त्यांचं काम जवळून बघायला मिळणार म्हणून मी खूश होते. ज्या शकुताईंची अदाकारी मी बघितली होती, ज्यांच्या कामामुळे मी थक्क झाले होते, त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव वेगळा असणार, हे मला ठाऊक होतं आणि तसंच झालं. त्यांचं सुरेख काम मला जवळून बघता आलं. किंबहुना मला अपेक्षित होतं त्यापेक्षाही जास्त उत्स्फूर्त आहेत त्या आणि कसलाही अभिनिवेश नसलेला अभिनय त्या करतात. गाडीतून आम्ही जो एकत्र प्रवास केला, किंवा चित्रीकरणाच्या काळात जो काही वेळ आम्ही एकत्र होतो, त्यात मला छान अनुभव आला त्यांचा. त्यांच्याविषयी नृत्यांगना किंवा गायिका म्हणून मला आदर होताच, पण त्या माणूस म्हणूनसुद्धा खूप सुंदर आहेत. 'हायवे' हा अतिशय वास्तववादी चित्रपट आहे, त्यामुळे आविर्भाव किंवा अभिनिवेश नसलेल्या त्यांच्यासारख्या कलाकराबरोबर काम करताना चित्रपटात अभिप्रेत असलेल्या वास्तवाच्या जास्त जवळ जाता आलं, असं मला वाटतं.

उमेशबद्दल विचारशील तर, उमेशची आत्तापर्यंतची सगळी कामं पाहिली आहेत मी. त्याचं सगळंच काम मला आवडलं होतं, पण त्याच्याबरोबर कधी काम केलं नव्हतं. ’अभिनेत्यांचा दिग्दर्शक’ म्हणून त्याला जवळून बघतानाचा अनुभव फार छान होता. त्यानं आणि गिरीशनं जी काही पात्रं उभी केली आहेत, त्यांचा खूप खोल असा अभ्यास त्यांनी केला आहे. चित्रपटातल्या सगळ्या व्यक्तिरेखांमधले बारकावे, त्या व्यक्तिरेखांच्या आयुष्याची गोष्ट याबद्दल त्यांचा अभ्यास पक्का होता. आम्ही सगळी एका गाडीतली माणसं एकमेकांबरोबर किती कंफर्टेबल आहोत ते उमेशनं पाहिलं. सगळ्या कलाकारांची त्यानं एकत्र कार्यशाळा घेतली. पात्रांच्या बारीकसारीक हालचालीसुद्धा त्याच्या डोळ्यासमोर असायच्या आणि ती ती व्यक्तिरेखा त्यामुळे त्यानं आम्हां कलाकारांपर्यंत खूप छान पद्धतीनं पोहोचवली. चित्रपटातल्या तरल विनोदाबाबत तो आग्रही होता. चित्रपटाची जातकुळी काय आहे याचा विचार न करता तुमचं पात्र नीट उभं करण्यासाठी जे काही करायचं ते करा, असं त्याचं सांगणं होतं. त्यामुळे त्याची काम करण्याची पद्धत खूप आवडली मला. त्याच्या मनात चित्रपट आणि चित्रपटातली प्रत्येक व्यक्तिरेखा स्पष्ट असली तरी त्यानं आम्हांला कुठल्याही अटी घातल्या नव्हत्या. संवादाव्यतिरिक्त आम्हांला ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी सुचत होत्या, त्या त्यानं आम्हांला बिनधास्त करू दिल्या. त्यातल्या योग्य वाटल्या त्या चित्रपटात घेतल्याही आहेत. त्यामुळे त्याच्याबरोबर 'हायवे' हा प्रवास मजेचा होता.

गाडीतलं चित्रीकरण असल्यामुळे अर्थातच या चित्रपटामध्ये समीपदृश्यं खूप आहेत. डिजिटल कॅमेर्‍यानं चित्रीत केलेला उमेश कुलकर्णी यांचा हा पहिला चित्रपट आहे. या दोन्ही गोष्टींमुळे काम करताना किंवा अभिनय करताना काही विशेष भान ठेवावं लागलं का?

झालं असं की, इतक्या वेगवेगळ्या पद्धतीनं चित्रीकरण झालं की कधीकधी छायालेखक आणि उमेशदेखील आमच्याबरोबर नसायचे. कॅमेरा आमच्याबरोबर गाडीतून पाठवला जायचा आणि आम्ही आमचीआमची दृश्यं चित्रीत करून परत यायचो. उमेशनं आम्हांला सांगितलं की, ’समोर कॅमेरा आहे म्हणून तुम्ही काही वेगळं करूच नका, त्याच्यासाठी थांबणं किंवा लाईट्‌स्‌चा विचार करणं असे वेगळे प्रयत्न करू नका, कॅमेर्‍याला कॅमेरा म्हणून वागणूक देऊ नका, तुमच्या बाजूला किंवा समोर बसलेली तीही एक व्यक्ती आहे, एवढंच गृहीत धरा’. जरी कॅमेर्‍याकडे लक्ष न देता काम करायचं होतं, तरी ते भान कितपत ठेवायचं ते आम्हांला माहिती होतं. ती एक तारेवरची कसरत होती. दृश्य वास्तव वाटणं आवश्यक होतं, पण कॅमेर्‍याच्या फ्रेमबाहेर जाऊन चालणार नव्हतं. आत्ता गाडीत चित्रीकरण सुरू आहे, किंवा कॅमेरा हा एक वेगळा घटक गाडीत आहे, असं कुठेही न जाणवू देता हा प्रवास खूप नैसर्गिकपणे होतोय, असं प्रेक्षकाला वाटणं महत्त्वाचं होतं. आम्हा प्रत्येकाच्याच बसण्याच्या जागी एकेकदा कॅमेरा ठेवून इतर लोकांचं आणि प्रत्येक गाडीचं चित्रीकरण झालंय. प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून वेगवेगळी माणसं दिसतात, हा एक्सरसाईज प्रत्येकाला पुन्हा पुन्हा करावा लागला. छोट्या छोट्या गोष्टी कंटिन्यूइटीमध्ये आम्हांला काळजीपूर्वक तपासाव्या लागल्या. कोणत्या दृश्यात आम्ही काय केलं होतं, हे लक्षात ठेवून पुढच्या सर्व दृश्यांमध्ये तशाच हालचाली कराव्या लागल्या. आम्ही वेगवेगळ्या आरशांमध्ये, वेगवेगळ्या दृष्टिकोनातून, वेगवेगळ्या कोनांमधून त्या कंटिन्यूइटीत अडकलो होतो. हे तांत्रिकदृष्ट्या आमच्यासाठी थोडं आव्हानात्मक होतं.

'हायवे' हा चित्रपट प्रवासाबद्दल आहे आणि प्रवास हा कधीच संपत नसतो. त्या दृष्टीनं चित्रपटाबद्दल काय वाटतं?

मोठ्या आयुष्याची छोटी झलक वाटते मला हा चित्रपट म्हणजे. आपल्या अख्ख्या आयुष्याचा एक जो प्रवास असतो, त्यात आपण काहीतरी जगतो, अनेक घटना घडतात, आणि त्यांतून आपल्याला काहीतरी मिळतं. या प्रवासात अनेक दिवस, अनेक छोट्यामोठ्या घटना, अनेक मोठे काळ असतात, काही वर्षं असतात. या सगळ्याची एक छोटी प्रतिकृती वाटते मला हा चित्रपट. आयुष्याच्या प्रवासात आपल्याला माहिती नसतं पुढे काय होणार आहे, काय चढउतार आहेत आणि कशी माणसं भेटणार आहेत. पण प्रवासाचा एक टप्पा संपला, म्हणजे एक मोठी घटना आयुष्यात घडून गेली, की आपल्याला जगताना हातात काहीतरी मिळालेलं असतं. तसं या प्रवासाच्या शेवटी तेवढ्यापुरतं काहीतरी मिळून पुढे पुन्हा प्रवास सुरू होतो, राहतो. चित्रपटातल्या काही पात्रांना ते जाणीवपूर्वक मिळतं, तर काही पात्रांच्या नकळत त्यांच्यात काही बदल होतात. त्या प्रत्येकाचे सामाजिक, आर्थिक, बौद्धिक स्तर, त्यानुसार त्या पात्रांवर झालेला परिणाम आपल्याला दिसतो.

गेल्या सात-आठ वर्षांत मराठी चित्रपटक्षेत्रात खूप वेगवेगळे प्रयोग होतायेत, जागतिक पातळीवर मराठी चित्रपटाचं कौतुक होतं आहे. अनेक तरुण दिग्दर्शक चित्रपटसृष्टीला मिळाले आहेत. याबद्दल तुम्हांला काय वाटतं? अभिनयाव्यतिरिक्त तुम्ही दिग्दर्शनाकडेही वळावं, असं तुम्हांला वाटतंय का?

नाही, आत्ता तरी दिग्दर्शन करावं, असं मला काही वाटत नाही. दिग्दर्शनासाठी खूप तांत्रिक गोष्टींची माहिती हवी, तुमचा आवाका खूप मोठा हवा. मी आत्ता फक्त व्यक्तिरेखा आणि अभिनय एवढाच विचार करू शकते. दिग्दर्शनासाठी सर्वांगानं गोष्टींचा विचार करता यायला हवा, ते मला सध्या करता येईल, असं वाटत नाही. एक मात्र खरं की, अतिशय रंजक चित्रपट सध्या तयार होत आहेत आणि चांगले, सुशिक्षित, म्हणजे चित्रपटाचं शिक्षण घेतलेले दिग्दर्शक ते बनवत आहेत. दहा-पंधरा वर्षांपूर्वीपर्यंत असं होतं की, मुख्यत: रंगभूमीवर काम करणारे लोक सिनेमात यायचे आणि मग सिनेमा बनवायचे, कारण आपल्याकडे नाटकाची मोठी परंपरा आहे. पण त्यामुळे नाही म्हटलं तरी, नाटकाचा पगडा चित्रपटावर जाणवायचा. नाटकात संवाद जास्त असतात. संवाद हे नाटकाचं महत्त्वाचं अंग आहे. नाटकात शब्द प्रभावीपणे वापरून गोष्ट पुढे नेली जाते. पण प्रत्येक चित्रपटातही नाटकातल्यासारखे संवाद असणं उपयोगी नाही. फक्त संवाद ही चित्रपटाची भाषा नव्हे. म्हणजे चित्रपटात संवाद नसावेत असं नाही, पण संवाद हा काही चित्रपटाचा मुख्य घटक नाही. दृक्‌श्राव्य अशा एकत्रित परिणामाने चित्रपट तयार होतो. आता चित्रपटाची भाषा बदलते आहे आणि जास्त चांगले, परिणाम करणारे चित्रपट येऊ लागलेत. ही एक चांगली, आशादायक बाजू वाटतेय. मला असं वाटतं की, प्रशिक्षित दिग्दर्शक तयार व्हावेत, ज्यामुळे आणखीन काहीतरी चांगलं घडायला मदत होईल.

***

२४ जुलै, २०१५ रोजी प्रदर्शित होणार्‍या 'हायवे' या चित्रपटाची एक झलक - https://www.youtube.com/watch?v=ki-uU_syUY4&feature=youtu.be

***

टंकलेखन आणि शब्दांकन सहाय्यः सई

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त मुलाखत

फक्त संवाद ही चित्रपटाची भाषा नव्हे. म्हणजे चित्रपटात संवाद नसावेत असं नाही, पण संवाद हा काही चित्रपटाचा मुख्य घटक नाही. दृक्‌श्राव्य अशा एकत्रित परिणामाने चित्रपट तयार होतो. हे पटलेच

रच्याकने
समीपदृष्ये म्हणजे काय ?

Mukta Barve ya mazya aavdatya abhinetri aahet. Mazya Navryasathi tya mhanje "Aamchya Barve Bainchi Mulagi". Tyamule tyanchya baddal ghari saglyana vishesh kautuk aahe. Aagami karkirdisathi tyana mana pasun shubhechcha.....