लॉस एंजिलीसचा ट्रॅफीक !!

Submitted by बस्के on 10 July, 2015 - 02:25

एल.ए.चा ट्रॅफीक! Angry

trafficjam

काय शब्दच सुचेना झालेत मला तर आजकाल. इतका भयाण ट्रॅफीक मी खरंच आख्ख्या आयुष्यात पाहीला नाही. हो, अगदी पुण्यातला अलिकडचा वाढलेला ट्रॅफीकही फिक्का आहे अगदी ह्याच्यासमोर. अर्धा-एक तास कधी नुस्तंच स्टिअरिंग व्हील हातात पकडून बसून राहायचे तर कधी आपलं ५ माईल च्या स्पीडने चालवत, व प्रत्येक मिनिटात किमान १७ वेळा तरी ब्रेक दाबत गाडी चालवायची. चालवायची हे क्रियापद फारच फास्ट आहे. रेटायची, ओढायची वगैरे ठिके. अर्थात फ्रीवे नसेल तर दर काही फुटांवर येणारे व जीव जाईस्तोवर लालच राहणरे सिग्नलचे दिवे येतात. त्यातून रस्ते काही सबर्बसारखे प्रशस्त नाहीत.. सगळा गिचमिडकाला.. इतकं फ्रस्ट्रेटिंग आहे ना इथे गाडी चालवणे. सिरिअसली.

दोनेक वर्षापूर्वी मला एका कामानिमित्त एके ठिकाणी भल्या सकाळी ८ वाजता पोचायचे असायचे. कित्तीही सकाळी उठले तरीही मी आपली १० ते १५ मिनिटं उशीराच उगवणार. समजतच नाही मला असे होते तरी कसे? बरं अंतर किती असेल ते? ६ नाहीतर ७ माईल्स! ६-७ माईल्सना साधारण ३० माईल्स ताशी वेगाने गेल्यास किती वेळ लागावा? :thinking: २०-२५ मिनिटं? चला अजुन एक्स्ट्राची १५ मिनिटं अ‍ॅड करूया. पाऊण तासात पोचू म्हणजे आपण? शक्यच नाही! सकाळी ७ वाजता जरी घरातून निघाले तरीही ८.१५ ला इप्सित स्थळी जायची किमया मी (किंवा एलएच्या ट्रॅफीकने) केली आहे. Uhoh

पण तरी नशिब मी आमच्या घराच्या जरा साउथला जायचे तेव्हा. घरापासून नॉर्थला जायचे असेल तर देवावरच भरोसा. कारण घराच्या जवळच वाटेत लागतं जगप्रसिद्ध हॉलिवूड बुलेवार्ड. तिथली गर्दी कधी कमी झालेली मी ह्या ४ वर्षात पाहीली नाही. काय त्या मेल्या चांदण्यांच्या रस्त्याचे ( वॉक ऑफ फेम ) किंवा आकाशाकडे दोन पाय व सोंड करून बसलेल्या खांबावरच्या ४ हत्तींचे (हॉलिवूड& हायलँड) किंवा जराश्या भितीदायकच दिसणार्या चायनिज थिएटरचे कौतुक? हा आता ऑस्करचे सोहळे होतात ते कोडॅक/डॉल्बी थिएटर आहे म्हणा तिथे. आणि विविध कॅरॅक्टरसे कॉश्चुम्स घालून किंवा नाचगाणी करणारे कलाकार असतात बघण्यासारखे. कधी चायनिज्/डॉल्बी थिएटरमध्ये प्रिमिअर्स होतात, तेव्हा तर विचारू नका. अतोनात गर्दी हा वाक्प्रचार मलूल वाटतो अगदी.. इतकी तुडूंब गर्दी होते. मला दिसला होता जेम्स फ्रँको! Blush स्पायडरमॅन चित्रपटातला पीटर पार्कर अगदीच आवडायचा नाही पण त्याचा मित्र मात्र आवडायचा. असो.. मागे एकदा काय म्हणे जस्टिन टिंबरलेक अचानक त्या चौकात येऊन नाचगाणी करून जाणार होता. रस्ते बंद. गर्दी गुणीले २. चिडचिड गुणीले १०... ओह आणि मिस्टर प्रेसिडंट - ओबामाला विसरून कसे चालेल? गेल्या २-३ वर्षात ओबामा किमान ५-६ वेळा आला असेल. काय असतील त्यांचे फंडरेझर्स बेव्हर्ली हिल्स एरियात.. पण आमचं काय? किती रस्ते बंद होतात.. गर्दी गुणीले ५.. चिडचिड गुणीले ५०!! Angry
मध्यंतरी असाच एकदा ओबामा आला होता.. तर तेव्हा माझा नवरा घरीच येऊ शकत नव्हता. कारण अपार्टमेंट कॉम्प्लेक्सपाशी जाणारे सगळे मेन रस्ते बंद.. विलशायर बंद, थर्ड बंद, सिक्स्थ बंद.. अक्षरशः मी घरात बसून कोणते रस्ते बंद आहे ते एकीकडे उघडून मॅपवरून चित्र काढून सांगितले आता इकडे वळ, तिकडे जा. व्हेरी फनी!! Uhoh

एनीवे.. एकदाचा हॉलीवूड बुलेवार्ड पार पाडला.. तरीही गर्दी असतेच. आता काय बाबा? ओह येस. हॉलिवूड बोल! आय स्वेअर, मला त्या हॉलिवूड बोलबद्दल ममत्व वाटायचे हे आता मलाच खरे वाटत नाही. आम्ही कॅमरिओहून एलएला मूव्ह होण्याच्या अगदी एकच वीकेंड अगोदर तिथे एआर रहमान येऊन गेला होता. अगदी टोचलं होतं मनाला. असं कसं मिस झाले. पण नंतर ४ वर्षात तिकडे एकदाही आला नाही. आत्ता जूनमध्ये आला तो आला नोकिआ थिएटरला. डाउनटाऊनला कोण जाणार त्याला पाहायला. असो..
हॉलिवूड बोलला होणार्या कॉन्सर्ट्समुळे होणारा ट्रॅफीक ही कटकट अनमेझरेबल-अनडिनायेबली-पेन-इन-द-नेक-फ्रस्ट्रेटिंग-*ट आहे.. यु जस्ट कॅनॉट डू एनिथिंग. कधीकधी ती गर्दी , तो ट्रॅफीक इतका पूराच्या पाण्यासारखा फुगतो की २-३ माईल्सवर असलेल्या माझ्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच्या समोरपर्यंत गाड्या आपल्या थांबलेल्या. माझ्या थर्ड स्ट्रीटवरच्या घरावरून हायलँड अ‍ॅव्हेन्यूला जायला म्हटले तर ५ मिनिटं लागतात. त्या ५ मिनिटाची १५ होतात. व हायलँडवरचा मुक्काम वाढतो अजुन २० म्निनिटांनी. म्हणजे हायलँडवरून १०१ पकडेस्तोवर ऑल्रेडी पाऊण तासाच्या वर वेळ उलटून गेलेला असतो. त्याच्या पुढे अर्थातच 'दी १०१' ची गर्दी!

सदर्न कॅलिफॉर्नियाच्या लोकांशी आईस ब्रेक करणारे संभाषण कोणते? तर १०१, आय-५ किंवा ४०५. हे दोन,तीन आकडे उच्चारा समोरचा पोपटासारखा बडबड करू लागेल. सगळे नुसते धुमसत असता ह्या दोघा-तिघांच्या नावाने. पण 'धरलं तर चावतंय अन सोडलं तर पळतंय' अशीच गत. फ्रीवे घ्यायचा नाही म्हटलं तर न संपणारी सिग्नल्सची रांग पार पाडायचे दिव्य असते. फ्रीवे घेतला तर काय आहेच गर्दी. इथे मिळणार्या 'नेकेड' नावाच्या प्रोटीन ड्रिंकची अ‍ॅड्/बिलबोर्ड यायचे मध्यंतरी, अगदी बरोब्बर फ्रीवेच्या आधी..

naked

सगळ्यात वाईट म्हणजे१०१ घेतला आहे, पण तसा लगेचच तुमचा एक्झिट येणार आहे. ओह नो, गॉड हेल्प यु. जी काय तगमग तगमग होते उजवीकडच्या लेन्सना जाण्याची. त्या महाभयंकर ट्रॅफीकमधून, कधी गाड्या थांबलेल्याच असतील तर काहीच करता येत नाही. पण एकदा जॅम सुटला अन गाड्या सुसाट पळू लागल्या की स्वतःचा व गाडीचा जीव वाचवत ४-५ लेन्सचा बदल करत जाणे ह्यामध्ये हमखास तुमचा एक्झिट मिस होतो. मग आहेच परत लांबचा रस्ता वगैरे वगैरे.

फ्रीवेवर किती व का वेळ लागतो हे मला आजवर समजलेलं नाहीये. उगीच आपलं व्हील घेऊन ताटकळत बसायचे. पाठदुखी करून घ्यायची. पोटात (अन डोक्यात) आगीचा डोंब उसळून घ्यायचा. मागच्या कारसीटवर बसलेल्यांचा आयपॅड संपवायचा.. त्यांचे रड्णं ऐकत , ट्रॅफीकशी झुंज देत, एखाद्या रॅश ड्रायव्हरपासून बचाव करत आपलं घरी यायचं. अक्षरशः सांगते घरी आल्यावर लढाई करून आल्यासारखे वाटते! Angry Sad

पण एक आहे. बाहेरच्यांचे काहीही मत असो.. माझे तर ठाम मत आहे, ह्या सर्वामुळेच लॉस एंजिलीसचे ड्रायव्हर्स( बरं.. बहुतांश ड्रायव्हर्स) एंजल्स असतात अगदी!! Happy ते तुम्हाला गरज असेल तेव्हा डावीकडे वळू देतात, लेन चेंज करायला मदत करतात, समोरच्याला पॅरलल पार्कींग अजिबात जमत नसताना त्याची ती कसरत पाहात शांतपणे वाट पाहतात, जाऊ देतात.. अगदी एंजल्स! उगीच का आमच्या शहराचे नाव, लॉस एंजीलीस आहे, जिथे एंजल्स राहतात ते शहर. Happy

वेल, आय लव्ह माय सिटी. नो डाउट अबाउट इट. इतकं सुंदर, प्रेक्षणीय, उत्तम हवेचे ठिकाण आहे हे. उत्तम वेदरमुळे कधीही बाहेर पडून हवा तो प्रोग्रॅम आखण्याची मुभा, प्रेक्षणिय/थीम पार्क्स/हाईक्स/मॉल्स कशाचीच कमी नाही. पण एक गोष्ट मी अ‍ॅब्सोल्युटली बदलून टाकीन तो म्हणजे ट्रॅफीक.

किंवा कोण जाणे. मी कार चालवायला शिकलेच मुळी ह्या एलएच्या रस्त्यांवर. मला कुठूनही आले तरी हॉलिवूड्/हायलँडची गर्दी लागत नाही तोपर्यंत 'घरी' आल्यासारखे वाटत नाही हे ही तितकेच खरे! Happy

(* दोन्ही चित्रे इंटरनेटवरून साभार)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदम मस्त लिहीले आहेस!

माझी एक स्टुडंट अलास्काची होती. ती सांगायची - कार मध्ये नेहमी टेंट ठेवते. ब्रेकडाऊन झाली तर सेल्फोन रिसेप्शन असेलच असे नाही. दुसरी कार कधीतरी येवून निरोप घेवून नजीकच्या शहरात जाणार मग काय ती हेल्प येणार. मी मनात म्हणायचे - आम्हाला गाडी फ्रिवेवर टाकली की टेंट लागतो, दुसरी कार कधीतरी सरकणार, मग काय ते आम्ही नजीकच्या शहरात जाणार.. Wink

मस्त लिहिलं आहेस. विद्यार्थीदशेत असताना एकदा थँक्सगिव्हिंगच्या आदल्या संध्याकाळी सहा वाजता बे एरियात जायला निघायचा महामूर्खपणा केला होता, ते आठवलं. साधारण पाच तास आम्ही एल.ए.च्याच ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो. तेव्हा स्मार्टफोन/जीपीएस इत्यादी नसल्याने, पर्यायी मार्ग शोधण्याचा पर्यायही उपलब्ध नव्हता Sad

>>> इतकं सुंदर, प्रेक्षणीय, उत्तम हवेचे ठिकाण आहे हे. उत्तम वेदरमुळे कधीही बाहेर पडून हवा तो प्रोग्रॅम आखण्याची मुभा, प्रेक्षणिय/थीम पार्क्स/हाईक्स/मॉल्स कशाचीच कमी नाही. पण एक गोष्ट मी अ‍ॅब्सोल्युटली बदलून टाकीन तो म्हणजे ट्रॅफीक.
--- हे म्हणजे सॅन डिएगोच झालं की मग! Lol

एकदा मुंबईच्या वेस्टर्न एक्स्प्रेस वे ला या. वरच्या फोटोत सगळ्या गाड्या निमूट आपापल्या लेनमध्ये पाहून सर्कशीतल्या रिंगमास्टरची आठवण झाली. वाघ सिंह सगळे गपगुमान शिस्तीत. आमच्याइथे लेनचा पत्ता नाही. सगळे मोकाट सुटलेले. वळतानाचा पिवळा दिवा अडगळीत पडल्यासारखा कदाचित गंजून गेलेला. आणि दुचाक्यांची फौजच्या फौज तुम्हांला ओवरटेक करायला सिद्ध.
एकदा मुंबईत गाडी चालवलीत तर तुम्हांला कुठेही मरण नाही. मुंबईत एकदा मेल्यावर पुन्हा काय मरणार म्हणा. ता. क. वरील वाक्य पुणेकर पुण्याविषयी मोठ्या अभिमानाने म्हणत. आता आम्ही मुंबईकर सुद्धा छाती फुगवून तसे म्हणू शकतो. पुण्याची मोनॉपली राहिलेली नाही.

चांगला लिहिला आहेस.

ती जाहिरात लैच Lol
जले पे नमक वाटत असेल पण अडकणार्‍याना.

पहिल्या फोटोत शिस्तीत एका मागोमाग एक थांबलेल्या गाड्या पाहुन डोळे पाणावले.
दोन गाड्यांमधल्या जागेत भारतात पीएमटी ड्रायव्हर अख्खी पीएमटी घुसवेल. Lol
इन्च इन्च लढवु
आडवे तिडवे ही प्रवृत्ती नाहिये तिकडे बहुतेक.
हे एक सुखच म्हणायच. Happy

छान लिहिलयं ! आम्ही एल ए ट्रीप केली तेव्हा या ट्रॅफिकचा अनुभव घेतला. मला काही ड्राइव करायचा धीर होइना. सगळे दिवस नवर्‍यालाच ड्राइव करावे लागले. दोनदा एक्झिट चुकले.

तुमची तगमग पोहोचली. Happy

तरी वरच्या फोटोतला दाखवलेला हा ट्रॅफिक जॅम नाहीच मुळी. Light 1
एवढ्या गाड्या शिस्तीत एकापाठोपाठ एक लेन न तोडता उभ्या आहेत म्हणजे बरंय की.

इथे वर म्हणाले तसं तेवढ्या जागेत एकापाठोपाठ कितीतरी पिएम्ट्या उभ्या करतील. मुंग्यांसारखे २ व्हीलर वाले तर कुठूनही येऊन चिकटतील. पार डाव्यालेनमधला कारवाला शिंगल पड्ला की हात बाहेर काढून थांबा-थांबा करीत तुमच्या नाकावर टिच्चून उजवीकडे वळेल. वर वळतावळता मुखरस तुमच्या गाडीच्या बरूब्बर समोर पचाक्कन थुंकेल... वर खड्ड्यांच सुख हे वेगळं.
यात अजिबात अतिशयोक्ती नाही.

चला अजुन ज्ञानात भर पडली , माझा समज होता अमेरिकेत (का येथिल शहरातुन ) हा त्रास दुर्मीळ आसनार Happy
लिखाण आवडेश.

एले चं ट्रॅफिक महा भयंकर आहे खरंच. अन ते जॅम्स कम्युट्च्या वेळी असे नाही तर केव्हाही असतात. मध्यरात्री पण! लोक कसे कुठेही पोहोचायचा वेळ कॅल्क्युलेट करतात कोण जाणे!!
पण तरी वरच्या काहींनी लिहिलंय तसं, भारतातले ट्रॅफिक जाम अजून भारी, आडव्या तिडव्या घातलेल्या गाड्यांनी तो सगळा मुरंबा सोडवणेच अशक्य होते Happy

वाचून बरं वाटलं म्हणता येणार नाही, पण ट्रॅफीकपुढे हतबल होणारे आपणच नाही हे समजलं. इकडे अगदी सेम टू सेम परिस्थिती आहे.
ह्युस्टनमधे I-10 च्या लेन्स वाढवत वाढवत आता २६ लेन्स आहेत, आणी तो US मधला widest highway बनलेला आहे. त्यामुळे फरक इतकाच पडला की आधी १४ लेन्स पॅक असायच्या, आता २६ पॅक असतात. ऑफीस टाईममधे चालवण्याचा अनुभव डिट्टो वर लेखात लिहील्यासारखा Sad

हॉलिवूड ट्रॅफिक हा प्रकार प्रकार अत्यंत जीवघेणा आहे याबद्दल दुमतच नाही. गेली २ वर्षे त्यातून रोज मार्ग काढणे चालू आहे. आता गोनिदांना तिकडच्या डोंगरातल्या वाटा पाठ झाल्या नसतील तितक्या मला इकडच्या हॉलिवूडच्या डोंगरातल्या वाटा पाठ झाल्या आहेत. Proud
तरी I-5 परवडला इतकी वाईट परिस्थिती १०१ ची असते. मला इथे राहून टोटल ५ वर्षे झाली असतील पण अजूनही १०१ ने कुठेही जायचे म्हटले तरी अंगावर काटा येतो.

आयला ! आम्ही न्यू जर्सी वालेच नशीबवान. "रोज घरी ययला पंधरा मिनिटे पुरतात, आज जबरदस्त ट्रॅफिक होतं, अठरा मिनिटे लागली."

लेख अगदी पोहोचला +१००० मी रोज ९१, १०५, ४०५ वर ३ तास घालवते.. गाडी गाडी खेळायचा अगदी कंटाळा आलाय. सध्या कार पुल आहे त्यामुळे बरे चालु आहे.

लेखातून तळमळ पोहोचतेय .. Happy

मंदार, आय-१० च्या पुर्वी दोन्ही बाजूला तीन-तीन एव्हढ्याच लेन्स् होत्या ना? आता काय १३ केल्या का? आजूबाजूचा प्रदेश "रस्तारुंदीकरणासाठी" अ‍ॅक्वायर केला की काय?? Happy

डीजे... Proud
सोनपरी ३ तास? आईग..
निशदे.. डोंगरांच्या वाटा.. Happy सिरिअसली.. मला तर थांबून थांबून रस्त्यावरच्या खुणा , कुठे डोंगरात लपलेले छानसे घर, किंवा क्रॉस.. अशा सगळ्या खाणाखुणा पाठ झाल्या आहेत..

मृ, लॉस एंजिलीसचे किती रस्ते, फ्रीवेज आहेत त्या लिंकमध्ये! डोळे पाणावले! Wink

वेल भारतातला आडव्या तिडव्या गाड्यांच्या मुरंब्याशी तुलना शक्यच नाहीये! पण इतकं शिस्तीने सुरळीत चाललेलं असूनही ( किंवा म्हणूनच) जो काय वेळ वाया जातो! मृच्या लिंकसारखे मीही गणित मांडणारे, किती तास वाय गेले! Uhoh

मृ च्या लिंकमध्ये आमचेही दोन आहेत पण त्यात एकही आम्ही रोजचे घेतो ते नाही .. पण आम्ही मागे हटणार नाही, आमचीही नावं आणूनच दाखवू अशा इर्षेने इकडे गर्दी वाढत आहे .. :|

Pages