देवमाणसं

Submitted by फूल on 9 July, 2015 - 23:16

"अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुलं रुप्याचा वाळा तान्ह्या बाळा तीट टिळा." आळीतल्या कुणाच्या तरी धाकल्या बंड्या नाहीतर बाळ्याला पायावर घेऊन झुलवत झुलवत, मायेने ओतप्रोत भरलेल्या गोड आवाजात हे म्हणणाऱ्या लता काकू आठवतात मला.

तेल लावून घातलेली कुरळ्या केसांची एकच वेणी, शेंड्याला फिरलेल्या केसांचं वेटोळं झालेलं असायचं, गोरापान कोकणस्थी वर्ण, घारे डोळे, तरूण वयात नक्कीच सुंदर, खाशी, सुबक असावी अशी आकृती, ठेंगणी मात्र नाही हं; चार चौघीत उठून दिसणारीच म्हणायला हवं. स्टार्च केलेल्या कॉटनच्या पाचवारी साड्या, छानपैकी पीन-अप केलेला पदर आणि डोक्यात कसलं तरी वासाचं फूल एका पानासह! चेहऱ्यावर सतत सुख ओसंडल्यासारखे भाव!

लता काकूंचे अहो सुद्धा तितकेच देखणे, लक्ष्मी नारायणाचा का काय म्हणतात तो जोडा. तोही खासच आणि शिवाय काका उच्च शिक्षित. एका जपानी कंपनीत नोकरीला. त्याकाळचे आभियांत्रिकी शिक्षण घेऊन जपानच्या अनेक वाऱ्या करून आलेले.

खानदानी, उच्चभ्रू, कुलीन, उच्च विद्याविभूषित अशासारखे शब्द मी या लेल्यांच्या कुटुंबाकडे बघूनच शिकले.

आळीतला पहिला ए सी त्यांच्याच घरातला. काकांना सदैव ए सी चालू लागायचा. २० डिग्री टेंपरेचर कायम असायचं घरात. त्यामुळे घराची दारं खिडक्या सदैव बंद.

याऊलट काकू; त्यांना सगळं मोकळं ढाकळं लागायचं. काका महिन्याभरासाठी जपानला गेले की काकू दारं सताड उघडी ठेवून आल्या-गेल्याची विचारपूस करत दिवाणखान्यात बसायाच्या. तशी ही विचारपूस एरवीही चालायचीच पण एरवी ती त्यांच्या स्वयंपाकघरातल्या खिडकीतून सुरू असायची.

आळितल्या वेळी-अवेळी बाहेर भटकणाऱ्या पोरा-पोरींना हटकणे, नवा चेहरा दिसला की त्याची आवर्जून (चांगलीच) विचारपूस करणे, वाट चुकलेल्यांना कुणाचे कोण करत बरोब्बर इष्ट स्थळी पोचते करणे, सेल्समनना तिथल्या तिथेच परतवणे शिवाय पाककला, शिवणकला, भरतकाम याची देवाण-घेवाण, " सांज्यात किती मीठ घालशील, अगदी माशीच्या पंखाएवढं." कुठल्याही गोड पदार्थाची पाककृती सांगितली की शेवटी हे वाक्य आलंच पाहिजे. कुणाला औषधं सुचव, काढे सुचव आणि समस्त आळीच्या उखाळ्या-पाखाळ्या. "काय बाई तरी, वाचाळ बाईच्या तोंडाची आणि बाळाच्या ढुंगणाची खात्री नाही हो. मी तरी माझं तोंड का विटाळू? ती नानी तसलीच." सगळ्याची सांगता या वाक्याने व्हायची. हे सगळं त्या स्वयंपाकघराच्या खिडकीतून चालायचं. काकांची एक हाक हे सगळं थांबवायला पुरेशी असायची. लग्गेच आत पळायच्या. पण लता काकू आमच्या आळीतली "जाग" होत्या.

त्यांच्या घराबद्दल आम्हा लहान पोरांना प्रचंड कुतूहल असायचं कारण त्यांचं घरही तसं प्रशस्तच होतं. आळीतला पहिला बंगलाच खरंतर तो पण इमारतींनी गजबजलेल्या गिरणगावात त्याची भव्यता बाहेरून जाणवायची नाही. आतमध्ये शिरलं की मात्र आम्हा पोरा-टोरांचे डोळे विस्फारायचे. त्यांचा दिवाणखानाच प्रशस्त होता. त्याच्या एका कोपऱ्यात काकांचं लहानसं ऑफिस, तिथेच आळीतला पहिला कंप्युटर, वरती भिंतीवर दोन घड्याळं; एकसारखी पण एक जपानी वेळ दाखवणारं आणि एक भारतीय. आम्हाला त्या घड्याळांची भारी गम्मत वाटायची.

दिवाणखान्याच्या दुसऱ्या कोपऱ्यात दोन उंची, शिसवी लाकडाच्या नक्षीकाम केलेल्या बैठका. त्यांंना सोफा म्हणतात हे फार उशीरा कळलं. मधोमध त्याच लाकडाचं तसंच नक्षीकाम केलेलं टेबल आणि त्याच्या शेजारच्याच कोपऱ्यात विदेशी मद्याच्या बाटल्यांचं त्याच लाकडाचं एक कपाट. "पाहुणे येतात नं गो विलायतेहून ह्यांचे, त्यांच्यासाठी गो. ह्यांनी कधी त्यातल्या थेंबालाही शिवलन नाही हो." त्या कपाटाकडे पाहिलं की काकूंचा ठरलेला खुलासा बाहेर पडलाच पाहिजे. बऱ्याचदा आम्ही पोरं ते ऐकायला मुद्दाम त्या कपाटाभोवती घुटमळायचो.

पण खरंही होतं ते. त्यांच्या घरी अनेकदा परदेशी पाहुण्यांची रीघ लागायची. आळीत कुणाकडेच कधी सूट घातलेली माणसं आली नाहीत. लेल्यांकडे मात्र जपानी पाहुणे सतत असायचे.

त्याच दिवाणखान्याला एक सरकतं काचेचं दार होतं. "विलायतेहून त्याचं डिझावीन काढून आणलंन बाई ह्यांनी आणि इकडल्या सुताराला सांगितलन तर तो म्हणाला नुसत्या काचेचेच २०० रुपडे लागतील.(त्याकाळी चाकरमान्यांना महिन्याचा पगार २००-३०० रुपये असायचा ) पण यांना तसल्या दाराची हौसच भारी. ये शी ची हवा दिवाणखान्यातच खेळलीन पाहिजे नाहीतर त्याची पावर कमी होते म्हणे म्हणून हो हा खटाटोप. " काकू हे सारं घारे डोळे मोठ्ठे करून कोकणस्थी हेल काढत सांगताना आणि हातवारे करताना अगदी आठवल्या मला. आम्ही मुलं या त्यांच्या बोलण्याची चिक्कार नक्कल करायचो. अनेकदा आळीतल्या गॅदरिंग मध्ये त्यांच्या देखतही केलीये. काका-काकू मात्र खळखळून हसून कौतुकच करायचे.

त्यांच्या घरातून कधीच कोणी सुकल्या हाती बाहेर पडलं नाही. काकूंनी केलेलं खास साजूक तुपातलं काहीतरी गोडधोड हातावर पडायचंच किंवा मग गरमागरम, खुसखुशीत केलेलं काहीतरी आवर्जून खायला बोलवायच्या नाहीतर खिडकीतून द्यायच्या. त्यांच्या घरासमोरच खेळाचं मैदान त्यामुळे तहान लागली की पाणी प्यायला त्यांच्याच खिडकीशी. ते पाणीही कधी नुसतं मिळालं नाही. त्याबरोबर काही नाही तर गुळाचा खडा मिळायचाच मिळायचा.

पुढच्या दाराने परदेशी पाहुणे आत शिरलेले दिसले की तासाभराने स्वयंपाकघराच्या खिडकीशी घुटमळायचं. विलायती चाकलेटे, हातात पडलीच पाहिजेत. "विलायती असली तरी काही कोल्ह्या-कुत्र्याचं नाहीये हो" असं सांगत काकू एकेक हातावर ठेवायच्या.

निकाल लागला की पेढे द्यायला आम्ही मुलं हटकून त्यांच्या घरी जायचो. अशावेळी काका-काकू प्रसन्न चेहऱ्याने तोंडभर कौतुक करायचे. विशेष म्हणजे मागल्या परिक्षेतले मार्क काकूंच्या लक्षात असायचे. मग आळीत अजून कुणा-कुणाला किती मार्क मिळाले त्याची उजळणी व्हायची. नापास झालेल्या, कमी मार्क मिळालेल्या पोरांना काकू आमच्यातल्याच कुणाकरवी बोलवून आणायला सांगायच्या आणि मग सगळ्यांदेखत त्यांना उपदेश. "ह्यांच्यासारखं विलायतेला जायला हवंय की नाही तुला? बापाला (आमच्या सगळ्यांच्या वडलांना एकेरी हाक मारणारी फार कमी लोकं होती आळीत. त्यातलीच ही दोघं.) केवढा आभिमान वाटेल तुझ्या? अशी दोन दोन घड्याळं लावायला मिळतील घरात पण अभ्यास केल्याशिवाय जमाचे नाही हो हे. " हे झालं की सगळ्यांना अगदी नापासासहीत सगळ्यांना विलायती बक्षिस. जपानी अतरंगी पेनं, किचेन्स, छोटी कॅलेंडरं असलं काही-बाही आणि त्याहिपेक्षा विशेष म्हणजे काकूंच्या हातचं काहीतरी खास. ओल्या नारळाच्या करंज्या, रवा नारळाचे लाडू, अनारसे, साटोऱ्या असलं दुधा-तुपातलं सात्त्विक श्रीमंती थाटाचं कौतुक.

दसरा, दिवाळी, संक्रात या दिवसात सुद्धा असलीच चैन व्हायची त्यांच्या घरी. अशा सणांना काकू जरीची काठापदराची साडी नेसायच्या आणि डोक्यात अबोलीचा गजरा ठरलेला. गणपतीत मात्र आळीत त्या कधीच नसायच्या. दोघंही त्या दिवसात भारतात कुठेतरी लांबवर फिरायला जायची. काश्मीर, कन्याकुमारी, सिक्कीम, बंगलोर, उटी, म्हैसूर. काकू चिक्कार फिरल्या होत्या. मधे एकदा मॉरीशस ला पण जाऊन आल्या. मॉरीशस मधल्या श वर जोर देत काकू सांगत होत्या. "मोरीशस काय बाई विच्चारू सुद्धा नकोस. तिथल्या समुद्र किनारी पापडासारख्या लेकी-बाळी वाळत पडल्या होत्यान. नको तो विलायत बाई आपला भारतच बरा. आमच्या हाटलीतल्या खिडकीतून दिसत होता समुद्र पण उपयोग काय त्याचा? खिडकी उघडली की मेल्याहून मेल्यासारखं व्हायचं. आपलीच मोरी आणि मुतायची चोरी. एवढाला पैसा घालून त्या हाटलीत रहायला गेलो पण खिडक्या काही मेल्या उघडता आल्या नाहीत." मराठी भाषेतल्या या असल्या सगळ्या म्हणी काकूंच्या तोंडावर असायच्या. आम्ही मात्र ही वर्णनं ऐकायला आणि आमच्यासाठी आणलेल्या भेटी घ्यायला निक्षून त्यांच्या घरी हजेरी लावायचो.

आळीतल्या सगळ्याच कुटुंबांना काका-काकू म्हणजे एक वडिलधारा आधार होता. आळितल्या जवळ-जवळ सगळ्यांच्या अडि-अडचणीला काका-काकू सर्व तऱ्हेने मदत करायचे. आर्थिक मदत तर अगदी सढळ हाती करायचे. "वेळ परत येत नाही पैसे परत येतात" काकांचं हे ठरलेलं वाक्य. आमच्याच आळीतल्या टिळकांना त्यांच्या म्हाताऱ्या आईसाठी मोटार विकत घ्यायची होती. आजी ९२ वर्षाच्या. त्यांची मोटारीत बसायची अनेक वर्षांची इच्छा. घरची परिस्थिती बेताचीच. घरात चार वाढती मुलं. टिळक काकांना चांगली नोकरी होती पण गरज नेहमीच मिळकतीपेक्षा मोठी, नियतीचा लाडका खेळ. लेले काकांच्या ओळखीने एक मोटारीचा सौदा ठरला. आजींच्या ९३ व्या वाढदिवसाला मोटार घ्यायची ठरलं पण टिळक काकांना मोटारीसाठी ३००० रूपये कमी पडत होते. शेवटी मोटार नकोच असं ठरलं. लेले काकांना हे कळलं मात्र. मोटार घेऊनच टिळकांच्या घरी गेले आणि उरलेले पैसे स्वत: तिथल्या तिथे देऊ केले. शिवाय त्यांनीच आज्जींना मोटारीतून सिध्दिविनायकाला नेऊन आणलं. आम्ही आळीतली पोरंही फिरून आलो.

आळीतल्या गणपतीला हजर नसले तरी गणेशोत्सव मंडळाला झालेला सगळा तोटा काका भरून काढायचे. आळितल्या सगळ्या वरकाम करणाऱ्या बायका, केरवाले, दूधवाला, इस्त्रीवाला, पेपर टाकणारी पोरं सगळ्यांना दिवाळीला नवीन कपडे आणि फराळ काका-काकूंकडे मिळायचा.

चैत्रातलं हळदी-कुंकु, नवरात्रीतला भोंडला काकूंचं वाण म्हणजे तेव्हा अतरंगी वाटायचं पण आता फार सुचक वाटतं. आहार शास्त्राची पुस्तकं, आरोग्यावरची पुस्तकं, योगासनाची पुस्तकं असली वाणं काकू लुटायच्या. समाजप्रबोधनाचा किती नेमका धागा पकडला होता नै त्यांनी?

आळीतल्या कुठल्याही लेकीच्या लग्नात रुखवतात ठेवायला म्हणून अगदी गरज ओळखून एखादी वस्तू भेट द्यायचे शिवाय अर्थिक मदत असायचीच. कितीतरी मंगळागौरी त्यांच्या प्रशस्त दिवाणखान्यात पार पडल्यात. आळितल्या सत्यनारायणाच्या पूजेला कुणा गरजू जोडप्याला मेहूण घालायचं आणि आर्थिक मदत करायची पद्धत काकूंनीच रूढ केली. ही काका-काकू म्हणजे आमच्या आळीतली संत मंडळीच.

हा हा म्हणता आज अनेक वर्षं सरली. आम्ही मोठे झालो. आमची लग्नं झाली. आळीतली घरं पाडून तिथे बिल्डिंग बांधून झाली. काका-काकूंना १५ व्या मजल्यावरचा टेरेस फ्लॅट मिळाला. आळी पाडताना मी नव्हते तिथे. पण घर सोडताना काकू खूप रडल्या असं सांगत होती आई. मला आठवलं. आळितल्या कुठल्याही लेकींच्या लग्नात काकू अश्श्याच रडायच्या. ती आळी म्हणजे त्यांचा संसारच होता. एखादं पान गळून पडलं की झाडालाही असंच दु:ख होत असेल नै? पण त्याहूनही मोठं दु:ख हे की हे सर्वार्थाने बहरलेलं झाड एकदाही फळलं नाही. काका-काकूंना मूल-बाळ नाही.

आमच्या आळीतली ही "जाग" आता १५व्या मजल्यावरच्या आलिशान ब्लाकात बंदिस्त झाली. आम्हीही ती आळी सोडून ठाण्याला रहायला आलो पण जुने ऋणानुबंध अजून टिकून होते. परवाच्या भारत भेटीत त्यांना भेटायला जायचं ठरलं. आळीतल्याच नंदू टिळकाकडून (हे त्या मोटारवाल्या टिळकांचं शेंडेफळ) काकूंची माहिती काढली. "काकू आता ८४ वर्षांच्या झाल्यात. काका गेल्यावर्षी "मला एकटीला मागे टाकून गेले हो." डोळ्याला अंधूक दिसतं आताशा, ऐकूही कमी येतं. वयानुसार जे व्हायचं ते झालंय. पण तब्ब्येत बाकी उत्तम आहे. फोन करून जा. हल्ली बऱ्याचदा त्यांच्या भाचीकडे जाऊन राहतात." नंद्या सांगत होता. त्याला आळितल्या सगळ्यांची इत्थंभूत माहिती.

गिरणगावातली ती भर वस्तीतली टोलेजंग इमारत बघून थक्क झाले. खाली रजिस्टर वर नोंद करायला गेले. फ्लॅट नं १५०२ पण खाली बोर्डावर नाव होतं सौ. सुनंदा भागवत. मला कळेना ही काय भानगड आहे? वॉचमनला विचारलं, "अरे, एकट्या आज्जी इथेच राहतात नं?" मी लता लेले नाव सांगत होते तो काही मला आत सोडायला तयार होईना. मग त्याने खालून फोन केला आणि काकूंनी सांगितलं असावं सोड तिला आत.

मी वर गेले. घर तसंच टापटीप, काकूंचा हात सगळ्या घरावरून फिरलेलं आलिशान घर. आधीच्या बंगल्यासारखंच. एका कोपऱ्यात अजूनही ती दोन घड्याळं होती. ए. सी. ही होता पण बंद होता. काकूंचा तसाच सुरकुतलेला पण सुख ओसंडणारा प्रसन्न चेहरा. सौभाग्यालंकारही जिथल्या तिथे होते. डोक्यात अनंताचं फूलही होतं एका पानासहीत. असं वाटलं की स्थळ-काळापलिकडे काहीच बदलेलं नाही.

माझ्या तोंडावरून हात फिरवला. हाताला साजूक तुपाचा वास आला तसाच पूर्वीसारखा. जावई बापूंची चौकशी करून झाली. काका कसे गेले, शेवट कसा झाला ते सगळं सांगून झालं. हळव्या झाल्या पण रडल्या नाहीत. मला ती दारावरची पाटी आणि खाली बोर्डावरचं नाव सतावत होतं. सौ. सुनंदा भागवत. दिवाणखान्यात काकांचा फोटो होता तिथे मात्र नाव श्री. अनंत लेले जन्म १९३२ आणि मृत्यू २०१४ म्हणजे वारले तेव्हा काका ८२ वर्षांचे होते. नंद्याला काकूंचं वय ८४ आहे हे कसं कळलं देव जाणे.

गोडाचा शिरा आणि बटाटे वडे. फक्कड बेत होता. कोकमाचं सरबत दिलं प्यायला. "तेलाचं खाऊन पित्तं उसळायचं. घे हो कोकम चांगलं पित्तावर" नेहमीचं ठरलेलं वाक्य.

मनसोक्त गप्पा मारल्या काकूंशी. "मुला-बिलाचं बघा आता काय ते. झाली लग्नाला ४ वर्षं" असं मला त्या दोन तासात तीन-चारदा तरी सांगून झालं. नंद्या त्यांच्याकडे जाऊन येऊन असतो असं म्हणत होत्या. काकांच्या आजारपणातही त्यानेच सगळं केलं. शेवटलं कार्य उरकायला तेवढा पुतण्या आला होता.

निघताना पाया पडायला वाकले. तर पाठिवरून हात फिरला आणि डॉ. मालती कारवारकर चं वंशवेल (सुलभ प्रसूती होण्यासाठीचा आहार) हातात पडलं. मी हसून बघितलं त्यांच्याकडे. पूर्वी शाळेचा निकाल दाखवायला जायचो तेव्हासारखंच कौतुक काकूंच्या डोळ्यांतून ओसंडत होतं. जड पावलांनीच निघाले. घरी यायला रात्र झाली.

दुसऱ्याच दिवशी सकाळी नंद्याला फोन केला. "अरे, हो तुला सांगायचं राहिलंच ते, सुनंदा भागवत नाव सांग खाली हे सांगायला विसरलो. अगं काका-काकू नवरा-बायको नव्हते. आपल्याला सगळ्यांनाच तसं वाटायचं पण मलाही हे अत्ताच काका हॉस्पिटल ला असतानाच कळलं. काकू सगळीकडेच तशी सही करायच्या म्हणून एकदा विचारलं. तेव्हा कळलं. काकू-काका एकाच गावात रहायचे. कोकणातलं रत्नागिरीजवळचं नांदिवडे त्यांचं गाव. काकूंचं सासर म्हणजे भागवतांचं घर काकांच्या अगदी शेजारचं. घरात रोज मारहाण चालायची क्षुल्लक कारणावरून आणि काकूंनी माहेरून पैसा आणावा हे मुख्य कारण. म्हणून एक दिवशी काका मधे पडले. पण ते दोन्ही घरात रुचलं नाही. काकांच्याही नाही आणि काकूंच्या सासरी तर नाहीच नाही. काकूंपेक्षा वयाने लहान खरे पण काकांनी धाडस केलं आणि दोघं पळून मुंबईत आली. मग अगदी झोपडीत वगैरे राहिली दोघं. काकांना विदेशी कंपनीत नोकरी लागली आणि यांचा संसार सुरू झाला. काकूंच्या नवऱ्याने दुसरं लग्नं केलं. या दोघांनी लग्नं केलंच नाही. असेच राहिले एकत्र आयुष्यभर. मात्र काका जाताना सगळं काकूंच्या नावे करून गेले. काकांचा पैसा बघून तो पुतण्या यायचा अधून मधून काकूंशी सलगी करायला. एकदा मीच दमात घेतलं त्याला. सांगितलं आता हे सगळं विसरायचं. तेव्हापासून दिसला नाही." नंद्या अजून बरंच काही बोलला मला मात्र हे सगळं ऐकून कानकोंडं व्हायला झालं.

कुठल्या रूपाने ही संतमंडळी आपल्या आळित रहायला आली. आपल्या तोकड्या आयुष्यांना किती लहान-सहान गोष्टींचं ओझं होतं नै? आणि हे असलं जगावेगळं ओझं घेऊन ही माणसं कशी आपल्यातली बनून आपल्यातच जगली? की नव्हतंच त्यांना ह्या असल्या क्षुल्लक गोष्टींचं ओझं? आपला संसार, मुलं-बाळं सगळ्यांचं सगळं व्यवस्थित असेल तर आणि तरच आपल्याला सामाजिक कार्याच्या गप्पा सुचतात, खरंतर तरीही सुचत नाहीतच. आणि इथे तर सगळंच विपरीत, तरीही अनेक कुटुंबांवर अशी मायेची पाखर घालणं हे कसं जमलं असेल या दोघांना? अश्या असामींचं नुसतं आस-पास असणंही अनेक आयुष्यं समृध्दं करून जातं. देवघरात निराळ्याच मूर्ती पुजतो नै आपण? अश्यांच्या मूर्ती पुजायला हव्यात ज्यांचं आयुष्यच एक पूजा आहे. सर्व समर्पित खरी-खुरी पूजा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती भाग्यवान आहात तुम्ही की अशा जगावेगळ्या माणसांशी नव्हे देवमाणसांशी तुमचा संपर्क आला ...

लिखाणाची शैली केवळ अप्रतिम ....

कृपया लिहित रहा .....

त्या काका-काकूंच्या पायी शिर साष्टांग दंडवत ...... _______/\______

अग किती सुरेख लिहिले आहेस.....खूप छान वाटले वाचायला. लता काकू, काका आणि सगळी आळीच डोळ्यासमोर उभी राहिली.
आपला संसार, मुलं-बाळं सगळ्यांचं सगळं व्यवस्थित असेल तर आणि तरच आपल्याला सामाजिक कार्याच्या गप्पा सुचतात,> एकदम बरोबर.
देवघरात निराळ्याच मूर्ती पुजतो नै आपण? अश्यांच्या मूर्ती पुजायला हव्यात ज्यांचं आयुष्यच एक पूजा आहे. सर्व समर्पित खरी-खुरी पूजा.> मनापासून पटले.

तुमच नाव वाचूनच वाचायला सुरुवात केली... आणि नेहमीप्रमाणेच अप्रतिम काहीतरी वाचायला मिळाल .

खूपच हृदयस्पर्शी ...

आपला संसार, मुलं-बाळं सगळ्यांचं सगळं व्यवस्थित असेल तर आणि तरच आपल्याला सामाजिक कार्याच्या गप्पा सुचतात, खरंतर तरीही सुचत नाहीतच. >> १०००+

काकू डोळ्यासमोर उभ्या राहिल्यात... सुंदर लेख..

-/\- तुमच्या लेखन शैली ला...खिळवुन ठेवले अगदी!
काकु दिसल्या कधी तर नक्की ओळखेन इतके सुंदर वर्णन!
आवडले..शेवट विशेष!

अप्रतिम लिखाण....अतिशय मनापासून आलेलं.
अशी माणसं आपल्या आयुष्यात लॉटरी लागल्याप्रमाणे येतात. आपलं काहीतरी मागच्या जन्मीचं देणं लागल्यासारखं आपल्याला भरभरून देतात आणि मग अगदी अलगद पणे आपल्या आयुष्यातून दूर होतात.

मस्त लिहीलयं. शेवट अनपेक्षित.
मध्यंतरी असाच मंगळसूत्र नावाचा सिनेमा आला होता त्याची आठवण झाली.

आई गं.. किती धारदार शब्दात लिहिलसं. सरसर पाणी ओघळल डोळ्यावाटे. एक एक शब्द सच्चा आहे फूल. जमल्यास काका काकूंचा एक फोटो पण टाक असेल तर.

Pages