चिघळ जराशी अजून तू

Submitted by बेफ़िकीर on 9 July, 2015 - 11:06

चिघळ जराशी अजून तू:

(ज्यांनी वय, अनुभव, ज्ञान, प्रसिद्धी, लोकप्रियता आणि श्रेष्ठता ह्या गोष्टी समोर बसलेल्या माझ्यासारख्या अतिसामान्य पोरसवयीन गझलकाराच्या गझलांवर प्रेरणादायक अभिप्राय देण्यासाठी मध्ये येऊ दिल्या नाहीत त्या दिवंगत बशर नवाझ साहेबांना ही वकुबानुसार अत्यंत क्षुल्लक आणि मरणोत्तर भेट व्यथित मनाने आदरपूर्वक!)

नकोस येऊ भरून तू
चिघळ जराशी अजून तू

म्हणून नाही कुणीच की
कुणीच नाही म्हणून तू

बघायचो, हळहळायचो
इथून मी अन् तिथून तू

नको तिथे कोरडेपणा
नको तिथे सात जून तू

कसे तुला विस्मरायचे
शिकव मलाही शिकून तू

हळूच थांबव कधीतरी
मनात येणे चुकून तू

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

म्हणून नाही कुणीच की
कुणीच नाही म्हणून तू

कसे तुला विस्मरायचे
शिकव मलाही शिकून तू

हळूच थांबव कधीतरी
मनात येणे चुकून तू >>>व्वा

गजल आवडली !!

vvaa...

मतला सुरेख….

कसे तुला विस्मरायचे
शिकव मलाही शिकून तू

व्वा…

म्हणून नाही कुणीच की
कुणीच नाही म्हणून तू

यातील उला उमगला नाही मला. मी असे दोन प्रकारे वाचून बघितले
'म्हणून नाही कुणी हवे' किंवा 'म्हणून नाही कुणीतरी'

शुभेच्छा.

बेफ़िकीर साहेब...

गझल आवडली....

जखमेवर लिहिलेली मुसलसल गझल भासली मला...

आभार...

वैभव जी...

मला हा शेर असा उमगला...

म्हणून नाही कुणीच की...
कुणीच नाही म्हणून तू...

( तू आहेस म्हणून इतर कोणीच नाहिये....
का कुणीच नाहिये म्हणून तू आहेस....)

चु.भु.दे.घे.

- निरज