रुग्णाचे मनोबल

Submitted by बेफ़िकीर on 5 July, 2015 - 12:45

एखादा मनुष्य रुग्णालयात दाखल होणे हा इतरांसाठी एक छुपा सोहळा असतो. रुग्णाबद्दल मनापासून वाईट वाटणारे रुग्ण धरून दोघे चौघे सोडले तर बाकीचे अस्तित्त्वप्रदर्शनासाठी येऊन जातात.

२००४ साली माझी आजी पूना हॉस्पीटलमध्ये भरती झाली आणि महिनाभर तिने तिथेच वास्तव्य केले. त्या दरम्यान नातेवाईकांची रीघ लागलेलि असायची. एका रविवारी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास मी आजीसाठी जमलेली माणसे मोजली ती सव्वीस भरली. हा आकडा कोणत्याही स्थानिक चळवळीत स्वेच्छेने येणार्‍या कार्यकर्त्यांच्या संख्येइतका आहे. आजी आय सी यू मध्ये असल्यामुळे आय सी यू च्या मुख्य प्रवेशद्वारावरील गुरखा आमची गर्दी पाहून दारात कृतांतकाळासारखा उभा ठाकला होता. तुंबलेल्या बेसीनमधून एक एक थेंब ठिपकावा तसा एक एक माणूस चोरपावलांनी आय सी यू मध्ये जाऊन येत होता. माणूस बाहेर आला की घोळका त्याच्याभोवती जमत होता. तो माणूस आय सी यू ह्या परग्रहावर पहिले पाऊन ठेवणारा माणूस असल्याप्रमाणे माहिती सांगू लागे.

"काहीतरी पुटपुटतायत"

"किती त्या नळ्या"

"स्पर्श कळतोय"

"धाप लागलीय"

"आजची रात्र जरा अवघडे"

"नानाला बोलावलंय का?"

"हाताने नको नको म्हणतायत"

अश्या विधानांपैकी एखादे विधान त्या माणसाच्या तोंडून बाहेर पडत असे. 'फक्त रविवारीच असे बाहेर पडायला जमते म्हणून आज आलो' हे वास्तव मात्र कोणीही बोलत नसे.

"रात्री कोण आहे?"

असा प्रश्न कोणीही विचारू शकते. हा प्रश्न विचारणारी व्यक्ती स्वतः रात्रीपर्यंत टिकेल की नाही अश्या अवस्थेत असली तरी असा प्रश्न विचारू शकते. हा प्रश्न एखाद्याने अजिबात विचारू नये असे कोणाला कधीच का वाटत नाही हे कळत नाही. कोणीही असे म्हणताना पाहण्यात नाही की 'रात्री कोण आहे हे विचारणारे तुम्ही कोण हो टिकोजीराव?'! ह्या प्रश्नावर उत्तरही सगळ्यांचे ठरलेले असते. 'रात्री मी थांबेन की'! ह्या उत्तरावर 'छे छे, तुम्ही कशाला, अण्णा नाहीतर शैलेश आहे की' असलेच काहीतरी उत्तर येणार ह्याची गॅरंटी असल्यामुळेच 'मी थांबेन' असे बिनदिक्कतपणे सांगितले जाते.

"डॉक्टर आले होते का?" हाही प्रश्न कोणीही विचारू शकते. डॉक्टरच येत नसते तर त्या अर्धमेल्या सजीवाला इथे आणले असते का कोणी? सहज आपली रीतभात म्हणून हॉस्पिटलात आणतात का? की बुवा मरण्याआधी एकदा ह्याला आय सी यू, नळ्या, ऑक्सीजन, नर्सेस वगैरे प्रकार बघून घेऊ देत. काही बघायची इच्छा राहायला नको. ज्या माणसाला आपण अजून हयात आहोत हेही समजत नसते त्याला डॉक्टर न येणार्‍या ठिकाणी कोण कशाला नेईल?

'हो आले होते डॉक्टर, नाही आठ वाजता येतील' वगैरे काहीतरी उत्तर दिले जाते. डॉक्टर येऊन गेलेले असले तर काय म्हणाले हे विचारले जाते.

मग सांगणारा आपला चेहरा एकदम वेगळा करतो. डॉक्टर काय म्हणाले हे ह्या मानवसृष्टीत फक्त आपल्यालाच समजलेले आहे अश्या आविर्भावात सांगू लागतो. बीपी, पल्स वगैरे नॉर्मल आहे, पण पाय सुजला आहे त्यामुळे स्कॅन करून घेणारेत. ह्या उत्तरानंतर एक गूढ गांभीर्य पसरते. हे गांभीर्य बीपी, पल्स नॉर्मल असण्यामुळे किंवा पाय सुजलेला असण्यामुळे नसते, ते असते 'स्कॅन' ह्या शब्दाच्या उच्चारणामुळे निर्माण झालेले! ह्याचे कारण असे की स्कॅनिंग आणि रुग्णाची अवस्था अतिशय गंभीर असणे ह्याचा माणसांनी मनात फार आधीपासून संबंध लावलेला असतो. स्कॅन म्हंटले की ऐकणारेही गळाठतात. त्यात आणखीन सी टी स्कॅन, एम आर आय, पेट स्कॅन असले त्या स्कॅनचे प्रकार ऐकले की 'फार फार तर अजून दोन दिवस राहतील' असेच सगळ्यांना वाटू लागते. स्कॅनिंगला नेण्यात येणार्‍या पेशंटकडे लोकं 'आता काही हा आपल्याला पुन्हा दिसणार नाही' अश्या पद्धतीने बघतात. तो रुग्ण जरा आनंदात असतो कारण बरेच दिवसांनी आय सी यू बाहेरचे जग त्याला दिसत असते. पण बाहेरच्या लोकांचे चेहरे पाहून त्याचाही चेहरा कुंकू लावलेल्या बोकडासारखा होऊ लागतो. आपल्याला तुफान वेगाने कुठेतरी नेण्यात येत आहे ह्याचा अर्थ आता आपण परलोकवासी होणार असे त्याला वाटू लागते. त्याला वेगात घेऊन जाणार्‍या मामा-मावश्यांचे चॅलेंज तिसरेच असते. गती मिळालेला चाकांचा पलंग मधेच थांबवावा लागला तर अंगाला गचके बसतात आणि पुन्हा ताकद लावावी लागते म्हणून ते तो पलंग की स्ट्रेचर काय असते ते झोपडपट्टीतील लहान मुले टायर पिटाळतात तसा पिटाळत असतात. त्यांचा आवेश पाहून भले भले बाजूला होतात. इतका सन्मान रस्त्यावर अ‍ॅम्ब्यूलन्सला मिळाला तर भारताची लोकसंख्या अजून वाढेल. आपला रुग्ण नातेवाईक असा डोळ्यांदेखत नाहीसा होताना पाहून एखाददोन मावश्या पदराने डोळे टिपू लागतात. एखादी नवतरुणी बाकावर बसून हमसू लागते. तिच्या सांत्वनाला निराळी रांग लागते. ह्या लोकांचे रडणे पाहून कातळासारखे काळीज असलेला एखादा दादासाहेब, भाऊसाहेबही डोळे विस्फारून शून्यात पाहू लागतो. वास्तविक पाहता तो रुग्ण स्कॅनिंगच्या रूममध्ये असलेल्या वेटिंगरूममध्ये एक रुक्ष रंगाचा आढा पाहात तिष्ठत असतो आणि त्याला नेणारे मामा-मावश्या परत आय सी यूत दाखलही होतात. एखादा 'चिरीमिरीच्या जोरावर जग जिंकता येते' ह्या तत्त्वज्ञानावर जगणारा नातेवाईक त्यातील एका मामाला बाजूला घेऊन कुजबुजत विचारतो.

"एक्झॅक्टली काय झालंय? का नेलंय तिकडे?"

"स्क्याने आता"

"म्हणजे सिरियस दिसतंय"

"ते डाक्टर सांगतील"

"तरी! स्कॅन उगाच थोडीच करणारेत?"

"काय आसंल गाठ बिठ कुठंतरी, काय झालंय काय त्यांना?"

"तेच तर कळत नाहीये"

"आचके देत होते मगाशी"

"होऽऽऽऽ?"

बोंबलतं! तो चिरीमिरी एखाद्या पक्षाच्या प्रवक्त्यासारखा चेहरा करून कोंडाळ्यात येतो. एरवी त्याला कोणी पाणीही विचारत नाही तरी आता मात्र सगळी दुनियादारी ज्ञात असल्यासारख्या त्याच्या चेहर्‍याकडे बघत सगळे स्तब्ध होतात.

"मावशी आचके देत होती, म्हणून नेलंय"

आश्चर्योद्गार निघतात. अश्रूंचे बांध फुटतात. पाठी थोपटल्या जातात. चिरीमिरी स्वतःच्या पोझिशनवर खुष होऊन ग्रूपमध्ये काही अधिक अधिकार मिळतील का ह्यावर विचार करू लागतो. कोणी एक सूज्ञ म्हणतोच. 'त्या मामाला काय कळतंय?'. पण त्याच्याकडे कोणाचेही लक्ष जात नाही.

कोणी एक मंगलाआत्या नावाची वृद्ध कोणा एका नम्रताला विचारते.

"बाळासाहेबांनी दिलेला अंगारा लावलास का ताईला?"

अंगारा विसरूनच गेलेली नम्रता अंगारा न लावण्याच्या निषेधार्थ आचके देण्यात आले असा चेहरा करून अभूतपूर्व चपळाईने पर्समधून एक पुडी काढते. कोणी एक सुनील तो अंगारा हातात घेऊन स्कॅनिंग रूमकडे धावत सुटतो. तो स्कॅनिंग रूमच्या वेटिंग रूममध्ये अंगारा घेऊन घुसतो तेव्हा रुग्ण त्याला गुंगारा देऊन आत गेलेला असतो. मग तो सुनील खिडकीतून आतील रुग्णाकडे बघत खिडकीवर अंगारा शिंपडतो आणि स्वतःच्या गालावर चापट्या मारत परततो.

"काय झालं?"

"नेलंय आत"

"अंगारा?"

"लांबून शिंपडला"

"आता नीट होईल सगळे"

अंगारा खिडकीवर शिंपडल्यामुळे स्कॅनिंगची प्रक्रिया व्यवस्थित पार पडते. आणताना मात्र रुग्ण असा आणला जातो जणू गाडी यार्डात लावली जात आहे. पुन्हा एकदा आपल्याच लोकांचे चेहरे चिमणाळ्यासारखे डोक्यावर बघत बघत रुग्ण आय सी यू मध्ये गायब होतो.

"अहो, तुम्ही आता खाली जाऊन काहीतरी खाऊन या. किती वेळचे बसलायत"

"अन्न जाईल का पमे त्याच्या घशाखाली?"

"आपल्याला तर जगावच लागतं ना काकू?"

"बरं मग पॅटीस आणा सगळ्यांनाच"

"आत्ता नको, घरी जाऊन जेवायचंय"

"चहा घ्या मग"

"पित्त होतं"

"मग तुम्ही निघताय का? आम्ही आहोत आता"

"मग कळवाल का आम्हाला?"

"हो हो, डॉक्टर येऊन गेले की लगेच फोन करते"

"चालेल, मग येऊ?"

"हो"

"अथ्थू पापा दे ना एक"

अथ्थू पापा देण्याऐवजी थुंकतो. त्याला धपाटा बसतो. पापा मागणारी व्यक्ती 'असूदेत लहान आहे' म्हणत हसत हसत आणि पाठ वळवून भीषण चेहरा करत निघून जाते. हा भीषण चेहरा अथ्थूनेच काय कोणीही पाहिला तर पाहणारा स्वतःहून पापा द्यायला तयार होईल.

"पुजारी कोण आहे पुजारी?"

अशी हाक आय सी यू च्या दारातील गुरखा मारतो. ती हाक ऐकून पुजारी ह्या रुग्णासाठी जमलेले, नुकतेच आलेले, नुकतेच गेलेले, कडेवर बसलेले आणि अर्धी लाकडे स्मशानात पोचलेले असे सगळे दाराकडे धावतात. बहुधा आता 'त्या आजी गेल्या बरं का तुमच्या' असे (एकदाचे) ऐकायला मिळणार असे त्यांना वाटत असते. गुरखा शांतपणे म्हणतो.

"ही चिठ्ठी आहे, खालून औषधे घेऊन या"

हा प्रश्न खिश्याशी संबंधीत असल्यामुळे अस्तित्त्वप्रदर्शकांचा एक मोठा समूह अबोलपणे मागे सरकतो. ज्याला खिसा सैल करण्याशिवाय पर्यायच नसतो तो हिरमुसून औषधे घ्यायला निघतो.

काही वेळा स्पेशल रूममध्ये रुग्ण असतो. तो असतो अत्यवस्थच, पण आय सी यू मध्ये ठेवण्याइतका गंडलेला नसतो. त्याची अवस्था काय आहे ह्याची यत्किंचितही कल्पना नसलेले तेथे जमा होतात. रुग्ण अर्धमेल्या अवस्थेत त्यांच्या गप्पा ऐकत असतो.

"बरंय बाई एसी आहे रूम"

"ए ही कुठली गं साडी?"

"नंडेच्या पुतणीच्या लग्नातली"

"ए सोनी लाव ना?"

"अगं टीव्ही नको म्हणतायत डॉक्टर"

"का?"

"ह्यांना त्रास होतो"

"झोप लागतीय का?"

"काल लागली होती"

"आज?"

"औषधाचीच गुंगीय"

"काय म्हणतायत डॉक्टर"

"काही सांगता नाही येत म्हणाले"

रुग्णाच्या तोंडातून एक अस्फूट हुंकार बाहेर पडलेला कोणालाही ऐकू जात नाही.

"स्कॅनमध्ये काय निघालं?"

"काही बोलले नाहीत. ते बघ तिथे ठेवलेत रिपोर्ट्स"

स्कॅनची भली मोठी फिल्म रुग्णासमोरच उभे राहून प्रकाशाकडे धरून सामुदायिकरीत्या पाहिली जाते. फिल्मच्या एका बाजूला सगळे उभे राहून फिल्म बघत असतात तर दुसर्‍या बाजूला बेडवरचा अर्धमेला रुग्ण ती फिल्म बघत असतो. कोणीतरी कुठेतरी बोट दाखवते आणि म्हणते.

"हे सगळं भरलेलं दिसतंय"

"हं"

"हे इकडून तिकडे पसरायला नको, नाहीतर आटोपलंच"

इकडे रुग्ण आपल्या आतील काहीतरी कुठेतरी पसरू नये म्हणून जमेल तसा चुळबुळतो.

"हे इतके कसले गोल आहेत?"

"नीट जमलं नसेल नेमका पॉईंट बघायला म्हणून तीस बत्तीस फोटो घेऊन ठेवले असतील"

"अगं तू उलटं धरलंयस, हे बघ हॉस्पीटलचे नांव उलटे दिसते आहे, असं धर"

"हां! आता झालं सुलटं! भरलेलं तेवढंच आहे पण इकडून तिकडे ऐवजी तिकडून इकडे पसरायला नको असे म्हणावे लागेल आता"

रुग्ण मगाचच्यापेक्षा उलटी हालचाल करून बघतो. दोन्हीवेळच्या हालचालीत त्याला स्वतःला समान वेदना होत असतात.

"एक्स रे च आहेत नाही लहान लहान?"

"कोण जाणे बाई! थेरंच निघालीयत हल्ली"

"नाही तर काय?" असे म्हणत स्कॅन जवळच्या टेबलवर भिरकावला जातो.

"आमच्या शेजारच्या सातपुते बाई नाहीत का? त्यांच्या जाऊबाईंना अस्संच झालं होतं. अ‍ॅडमीट केलं आणि हा असाच स्कॅन काढला त्यांचा! तर तो डॉक्टरांनी बघायला हातात घेतला आणि इकडे त्यांनी शेवटचा आचका दिला"

रुग्ण आचका येऊ न देण्याच्या प्रयत्नांत!

"स्कॅनसुद्धा सोसत नसेल काहींना"

"ह्यांचं वय किती आहे आता?"

"अडुसष्ट"

"ठीक आहे, म्हणजे तसं सगळं झालेलं आहे म्हणा"

"हो आता मुलांची लग्न झालेलीच आहेत, आणि ह्या वयात काहीतरी व्हायचंच"

"सुटावेत बाई"

"सुटावेत म्हणजे तुम्हाला सांगते, महिनाभर घारतल्यांच्या डोळ्याला डोळा नाहीये. पेशंटलाही त्रास आणि घरच्यांनाही!"

"हे काय सलाईन आहे का?"

"हं"

"ए ते बघतायत"

सगळी गर्दी पलंगाभोवती! कोणीतरी एक अजस्त्र बाई अजस्त्रच आवाजात रुग्णाचा एक खांदा हालवत विचारते.

"ओळखलंत का? इंदूची भाची मी! सौजन्या! बरं वाटतंय का आता? देवाचे नांव घेत राहा. शेवटी जशी वेळ असेल तसे आपल्याला सामोरे जावे लागते ना! आम्ही सगळे आहोतच. मी तुमच्यासाठी खीर आणलीय. ए दे गं एक चमचा! खीर खाणार ना? हसतायत बघ खीर म्हंटल्यावर!"

वास्तविक पाहता रुग्ण मनात म्हणत असतो की भवाने चालती हो. पण रुग्णाचे तोंड उघडून त्यात सहा चमचे खीर कोंबली जाते. त्यातील दोन चमचे बाहेर पडते. मग ती पुसून घेतली जाते. खीर कशी झाली होती विचारले जाते. रुग्ण करत असलेले निरर्थक चेहरे हे सकारात्मक अभिप्राय असल्याप्रमाणे एकमेकांना सांगितले जाते.

त्यानंतर जो कोण भेटायला येईल त्याला ती इंदूची भाची पहिले काय सांगत असेल तर 'ह्यांना खीर फार आवडते म्हणून मी खीर घेऊन आले, तर माझ्या हातून चांगली 'इतकी इतकी' खीर खाल्ली'.

'इतकी इतकी' म्हणजे नेमकी खीर किती खाल्ली हे पहिल्या व्हिजिटरच्या वेळी सहा चमचे असलेले प्रमाण दिड तासांनी येणार्‍या व्हिजिटरच्या वेळेपर्यंत दिड वाटीपर्यंत पोचलेले असते.

त्यातच अचानक ध्यानीमनी नसताना एक अत्यंत वरिष्ठ डॉक्टर व्हिजिटला येतात. ते वरिष्ठ आहेत हे त्यांच्या अंगावर असलेल्या कपड्यांमुळे, गुळगुळीत दाढीमुळे आणि नजरेतील अधिकारामुळे समजते. 'ह्या माणसाने फक्त आपल्याचकडे बघून बोलावे' म्हणून जो तो पुढे पुढे करतो. डॉक्टर रुग्णाकडे आणि त्यांची मान ज्या दिशेला वळवणे त्यातल्यात्यात सोपे आहे त्या दिशेला जो उभा आहे त्याच्याकडे बघत रुग्णाशी बोलत राहतात.

"आजी पाय हलवा"

"हात हलवा"

"श्वास घ्या"

"सोडा"

"इकडे बघा"

"तिकडे बघा"

"आ करा"

"आ म्हणा"

"मिटा आता आ"

"छान आहे सगळे! क्लिनीकली काही वाटत नाहीये. .ल्क ज्ञ.ल्क नस्;ल्ज अ;सोच अ .अ न . न.अज्स झ्क्ष्;क्स्ज फ्;ए ल अल क'च्ज ल éAL आळ "

हे फक्त आपल्यालाच नीट कळले असे सगळे चेहरे होतात. सगळ्याच चेहर्‍यांना सगळेच कळलेले दिसते असे बघून स्वतःच्या व्यावसायिक कारकीर्दीची चिंता करत वरिष्ठ डॉक्टर वादळासारखे निघून जातात. ते निघून गेल्यावर रूममध्ये एक भकास पोकळी निर्माण होते. आता कोण काय भूमिका घेते आहे ह्यावर सगळ्यांचे लक्ष असते. त्यातही ती सौजन्या पुढे होते आणि आजींना म्हणते.

"छान आहे हो सगळं! नशीबवान दिसताय! असल्या अवस्थेत चार पाच जण गेलेले पाहिलेत हो मी! त्या मानाने तुम्ही बरा लढा देताय तसा"

त्या सौजन्याचे बोलणे आता डॉक्टरांच्या बोलण्याचा मराठी अनुवाद ठरते. तेच कर्णोपकर्णी होते.

रूमचे टॉयलेट साफ करायला येणारी मावशीसुद्धा काहीतरी करून उपजीविका मिळवत असते. पण तिला तिच्या मानधनाशिवायचे एक वलय निर्माण होते ते ह्या असल्या भेटकावळ्यांमुळे!

मी सध्या कोल्हापूरमध्ये आहे. मगाशीच रुग्णालयातून घरी परतलो. सासूबाईंचे दोन्ही गुडघे रिप्लेस करण्यात आले. पण त्यांना न्युरॉलॉजिकल प्रॉब्लेम्स आहेत. एकीकडे शंभर टक्के आणि दुसरीकडे ऐंशी टक्के ब्लॉकेजेस आहेत. तरीही त्या अ‍ॅक्टिव्ह आहेत कारण निसर्गतःच बायपास निर्माण होऊ शकतात आणि मेंदूला रक्तपुरवठा होऊ शकतो. पण ह्या सगळ्यामुळे पोस्ट सर्जरी त्यांना जरा ग्लानी, हात कडक होणे, एक लहान क्लॉट होणे वगैरे प्रकार झाले. आता मला समजत नाही, की तिथे माझा धाकटा मेहुणा आणि मी असे दोघे असताना एक सुमारे सत्तरीचे पोक्त गृहस्थ येतात आणि एखादी चिमुरडी रुमालपाणी खेळताना पडल्याप्रमाणे बोलतात कसे?

"क्काय? हे क्काय सगळं? आँ? अहो तुम्ही म्हणजे चटचट, फटफट, पाहिजे नुसते"

सासूबाई ब्लँक!

"आत्ता मला गोखले भेटले, ते म्हणाले मिसेसचे ऑपरेशन झाले म्हणून. कधी झाले ऑपरेशन?"

सासुबाई निर्जीवपणे "काल"

अरे तुला जर गोखले भेटले तर त्यांनाच विचार ना कधी झाले ऑपरेशन?

"हे हाताला काय बांधले आहे?"

सासूबाई ब्लँक!

"पाय हलतायत का?"

सासूबाई कश्याबश्या "हो"

"मग आता डिस्चार्ज कधी?"

आता मी रोखलेला संताप उफाळून वर आला. मी सरळ उभा राहिलो आणि शक्य तितका नम्र चेहरा करत त्यांना म्हणालो

"तुम्ही मला प्रश्न विचारा, त्यांना जास्त बोलायचे नाही आहे"

"अरे हो, बरोबर आहे, तुम्ही मुलगा का?"

"नाही, हा धाकटा मुलगा, मोठा आत्ता घरी गेलाय"

"तुम्ही?"

"मी जावई, बायको आत्ताच पुण्याला गेली"

"ओके, चला निघतो बरं का मी?"

गृहस्थ निघून गेला.

त्याला अपमान आणि माझी देहबोली सहन झाली नसावी.

मी २००५ मध्ये अ‍ॅडमीट झालेलो असताना दीनानाथच्या त्या खोलीत अशीच चर्चासत्रे भरायची. माझ्यासाठी आलेले लोक एकमेकांशी गप्पा मारण्यात इतके रंगून जायचे की माझ्या स्वभावामुळे धड त्यांना जायला मीही सांगायचो नाही आणि मला त्रास होत असेल हे कोणाच्या खिजगणतीत नसल्यामुळे इतरही कोणी सांगायचे नाहीत.

२०१२ साली पुन्हा तेच झाले. मरणाला भोज्या देऊन आलो आणि तिसर्‍या, चौथ्या दिवसापासून रांग! बरं एकाशी बोलताना मी दिसत आहे हे दाराच्या काचेतून पाहिल्यामुळे दुसर्‍याशी नाही बोललो तर तो रागावणार! आमचा स्वभाव सगळ्यांची मने सांभाळण्याचा!

पण आई गेली तेव्हा!

तेव्हा माझी सगळ्यात मोठी मावशी, जिचे आणि आईचे एकमेकांवर खूप प्रेम होते तिलाच फक्त मी त्या शेवटच्या वीस मिनिटांत रूममध्ये प्रवेश दिला. बाबा आणि बायको नेमके तेव्हाच घरी जेवायला म्हणून अर्ध्या तासासाठी गेले होते. आईने डोळे फिरवले. मला समजले. मावशी मला मिठी मारून रडू लागली. मी तिला झटकून पटकन् डॉक्टरांना बोलवायला सांगितले. तिला जाणीव झाली. ती धावत बाहेर गेली. तिच्याबरोबर दोन डॉक्टर्स धावत आत आल्या. आई डोळे फिरवतच होती. ती जीवन आणि मृत्यूच्या सीमारेषेवर होती. मी फक्त तिच्याकडे तटस्थपणे पाहात उभा होतो. मीच धीर सोडला असता तर माझे सगळे जग कोलमडले असते. मी एकदाच "आई' असे म्हणालो. माहीत नाही त्यामुळे की काय पण तिची बुब्बुळे क्षणभर माझ्याकडे फिरली. डॉक्टर म्हणाल्या.

"शी इज सिंकिंग, यू ऑल प्लीज वेट आऊटसाईड"

रात्रीचे नऊ वीस! मावशी मला मिठी मारून रडत होती. मी तिला म्हणालो तू तुम्हा भावंडांत सगळ्यात मोठी आहेस, तू रडलीस तर सगळे रडतील. त्याक्षणी तिने आवर घातला. मी आईच्या कपाळाचे चुंबन घेतले. तिच्या पावलांवर डोके टेकवले. माझ्या मागोमाग मावशीनेही नेमके तेच केले. आणि आईला डोळे फिरवताना तसेच सोडून......

....... मी खोलीच्या बाहेर पडलो.

आईच्या आजारपणात शेकडोंनी व्हिजिटर्स आले. आई गेल्यावरही जोशी हॉस्पीटलमध्ये झुंबड उडाली होती.

मी हे सगळे का लिहीत आहे?

तर इतक्याचसाठी, की रुग्णाला भेटनार असाल तर एक गोष्ट पक्की ध्यानात ठेवा:

रुग्णाचे मनोबल वाढवा, बाकी काहीही करू नका.

================

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेफिकीर,

लेख डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे. आपण रुग्णालयात कशासाठी जात आहोत हे प्रत्येकाने मनाशी ठरवायलाच हवं. खूपदा रूग्णालयापेक्षा बाहेरच जास्त मदत लागते. पण गर्दी मात्र तिथे उगीच होते.

आ.न.,
-गा.पै.

>>बापरे, माझा लेख तिथे आला तर मी अधिकच हास्यास्पद बनेन<<
बरं आहे ना! आपल्यामुळे जर काही लोकांना हसू येउन त्यांचे आयुश्य आनंदी होत असेल तर तेवढेच पुण्य! Lol

बेफ़िकीर , तुमचा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यन्त पोहोचला पाहिजे. तुमचे ओब्सर्वेशन जबरदस्त आहे आणि प्रत्येक वाक्य न वाक्य खरे आहे.
या लेखाची लिन्क इतरांना पाठवलेली चालेल ना?
लोकसत्ते च्या पुरवणीसाठी हा लेख पाठवावा असे सुचवावेसे वाटते.

बरंच पटलं आणि बरंच रिलेट करता आलं.
बरेचदा कोणा भारीपैकी आजारी माणसाला बघायला जाणं ही सिच्युएशन काही लोकाना नीट हाताळता येत नाही. मग त्या अवघडलेपणातून अशी चुकीची वाक्यं आणि देहबोली येते.
यातली काही वाक्यं मीही बोलली असावीत.पण आता थोडा अंदाज येतो.
कोणा इन्सुलीन नुकतेच चालू केलेल्या काकांना भेटताना "बाबाना असेच दिवसाला दोन नऊ नऊ चे इन्सुलीन होते" हे तोंडातून निघणारं वाक्य मी आवरते. (माझ्यासाठी ते काका जगात नसलेल्या बाबांसारखे असले आणि मी बाबांची आठवण येऊन बोलत असले तरी त्या "जगात असलेल्या" काकांना आणि त्यांच्या जवळच्याना ते वाक्य चुकीच्या र्थाचं वाटेल हे आता कळतं.)

छान लिहिलंय.
प्रत्येक जण या किंवा जवळपास अश्या अनुभवातून गेलेला असल्याने स्वतःशी हा लेख रिलेट करु पाहत आहे.

कधी कधि रुग्णाला मनोबला बरोबरच आर्थिक बलाची ही गरज असते. रुग्णाचे नातेवाईक उपचाराच्या खर्चाने मेटाकुटीला आलेले असतात. त्यातून रुग्ण बरा होईलच याची शाश्वती नसते. किती काळ असं पुल ऑन करत राहायचे असा प्रश्न ही वास्तवात व व्यवहार्य असतो. पण त्याविषयी कोणी बोलायला तयार नसते. जीवापेक्षा यांना पैशाच पडलय असा अर्थ निघेल याची भीती. कोरडा दिलासा काय उपयोगाचा? सगळी सोंग आणता येतात पण पैशाचे सोंग आणता येत नाही. अलरेडी एवढा खर्च झालाय आता हॉस्पिटलच बिल कुणी भरायच? अशी देखील परिस्थिती असते. रुग्ण वयोवृद्ध असेल तर हे प्रश्न जटील बनतात.
नुकतेच माझे सासरे गेले. तेव्हा मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते | असेच माझे मत झाले. प्रश्न जटील होत चालले होते. उपचार केले तरी रुग्णाला त्रास नाही केले तरी त्रास अशी परिस्थिती होती. त्यांना शांतपणे सुखाने मरता येईल असे काही करता आले तर पहा त्यांचे हाल पहावत नाहीत व भविष्यात अजून पहावणार नाहीत असे माझे मत होते.

Please forgive me for english.

You are simply superb in detailing.
the article is an eyeopener. One should really think before visiting patient.
More over, it reminded me my mental state when my father was in hospital for cancer treatment.
Really feel sad about this. :(.
Gold bless.

लेख विचार करण्यासारखा आहे, पटला. खरेच मुपी ला पाठवा. चांगले लेख त्यात फारच कमी येतात अन वाचकवर्ग खूप आहे.

Pages