माझे बाबा,मला उलगडलेले-डायरीच्या नोंदीतून.भाग चार.

Submitted by किंकर on 1 July, 2015 - 09:37

भाग एक - http://www.maayboli.com/node/54368

भाग दोन - http://www.maayboli.com/node/54425

भाग तीन - http://www.maayboli.com/node/54450

डायरीतील नोंद -- असलेली
काही तरी विचित्र घडते आहे,कि जे आपण रोखू शकणार नाही;अशी माझ्या थोरल्या चिरंजीवांची भावना झाली असावी. आई घरात नाही आणि अण्णांची तर गावाला जावयाची तयारी चाललेली दिसते,बरे पूर्वसूचना,तीही नाही.माझी प्रत्येक हालचाल,जणू अगतिक बनून,तो डोळ्यांनी टिपीत होता.

तयारी पूर्ण होताच आईजवळ देण्याकरिता,एका बसच्या तिकिटा पाठीमागे,त्याचेजवळ निरोप लिहून ठेवला "मी लवकरच परत येण्याकरिता दूर जात आहे."आणि काय घडणार याची कल्पना येवून,त्याचे डोळे पाणावले.शब्द मुके झाले होते, संयम आणि भावना यांचे ओढाताणीत,यावेळी कोणती हालचाल करेल.

आई वडील यांना सारखेच पणाने,खुश करण्याच्या तारेवरच्या कसरतीवर,आम्ही दोघेही खुश होतो.स्वतःच्या मनाचा थांग पत्ता लागू न देण्याच्या,लहान वयातील धूर्तपणावर,कौतुकाचे पांघरूण घालत होतो.थोडक्यात आमची मुले,त्यांच्या गुण दोषांसह ती जशी आहेत तशी,आम्हाला आवडत होती आणि याचेच दुसरे नाव माया होय.

ती कदाचित मागे पळत येवून,हाताच्या बोटाला धरून,"अण्णा कुठ्ठे कुठ्ठे जावयाचे नाही,चला घरी आई तुमची वाट पाहील" आणि मग तिला ढकलून जावे म्हटले,तर सूर्यवंशी उत्तानपाद राजाची ..... गोष्ट आठवून,न जाणो माझ्या अगोदरच हि हट्टी बया,आपला अपमान झाला म्हणून रुसून फुगून,जंगल जवळ करावयाला पाहणार नाही.

आणि तशी वेळ येवू नये म्हणून,निर्णय तिच्या पासून तिच्या आई पासून,साऱ्या साऱ्या पासून गुप्त ठेवला होता.प्रत्यक्ष तशा प्रसंगाला तोंड द्यावयाच्या वेळी,कसे वागावयाचे याची मनाच्या मनी अनेकवेळा कवायत करून घेत होतो.

अण्णा आता सौभाग्यवतीच्या लाघवी हास्याला भुलणार नव्हते.छोट्या छबकडीने घातलेल्या विळख्याला,वत्सलतापूर्वक बळी पडणार नव्हते.आपले घर,आपली पत्नी आपलीच कच्ची बच्ची लेकरे,हे सारे काही आपलेच,असता तू कुठे निघालास? वासरांना बघूनही वात्स् लतेचा पान्हा तुझ्या हृदह्यात दाटत नाही का?

पंछी ना कर इतना प्यार प्यार है . . . पाखरांनो मी तुमच्यावर मला स्वतःला विसरून प्रेम केले.त्याची परत फेडही तुम्ही आपल्या शक्ती बुद्धी नुसार केली.आणि तुमची आई तुम्हाला म्हणाली,तुमचा बाप भ्याड आहे तर तुम्ही कोणाची बाजू घ्याल. तुम्हाला माझे खरे मनोगत समजेल का?

हा शुरांत शूरपणाचा निर्णय राबविताना,माझ्या मनाच्या हृदयाच्या चिंधड्या चिंधड्या उडणार आहेत. सहधर्मचारिणीला एकटे टाकून जावयाचे,तिच्या सुखदुखांत वास्तविक वाटेकरी व्हावयाचे टाकून होय, कुटुंबासाठी व्यक्तीने, गावासाठी कुटुंबाने. साठी गावाने प्रसंगी मोठा त्याग करण्याची वेळ हीच खरी कसोटीची वेळ असते,माझ्यातील विवेक जागा होवून बोलला.

तानाजी लग्नाची अक्षत घेवून महाराजांकडे आला आहे.परंतु महाराज सचिंत आहेत.हि अवघड कामगिरी पार पाडील तर,तो माझा तान्याच परंतु बोलांव कि न बोलांव.प्रसंगाला शोभेल? महाराजांच मन हेलकावे खातेय.आणि निर्णय पक्का झाल्यावर,"आधी लगीन कोंडाण्याच मग रायबाच" असे दिलासा देणारे वाक्य.वृद्ध शेलारमामा उदयभानूशी लढताना हरला नाही,इतक्या वृद्ध वयात कशासाठी लढायच? देव देश अन धर्मासाठी .. प्राण घेतले आपुल्या हाती.

चक्रव्यूह भेदायला तर हवा.तात इथे नाहीत,तू तर सिंहाचा छावा अभिमन्यू स्वतःशीच म्हणाला. सीतेच्या वनवासाच्या झळा,पती सानिध्याने सुसह्य,तर तरुणपणी एकलेपणाची व्यथा,मनाच्या मनी बोलावयाची चोरी. राजघराण्यातील स्त्रीचे कर्तव्य.

किती एक दोन म्हणून सांगू,या साऱ्यांनी आपल्या विशिष्ठ श्रद्धेने,प्रचलित प्रसंगावर मात केली होती. तुलाही त्यांच्याच मार्गाने गेले पाहिजे.मनातल्या विचारांबरोबर घराबाहेर पडलेले पाऊल आता पुढेच पडावयाचे होते. थांबायचे नव्हते मागे वळून पहावयाचे नव्हते.

डायरीतील नोंद-मला समजलेली –

वडिलांनी घर सोडतानाचा प्रसंग डायरीत लिहताना,घरी काय वातावरण होते ते इतके अचूक उभा केले आहे कि,मी प्रत्यक्षात त्या ठिकाणी नसलो तरी,काय घडले असेल,याचा चल चितपटच डोळ्यासमोर उभा राहतो.

माझे वडील तसे थोडे संतापीच होते. मुलांनी प्रगती करावी,हि भावना मनात बाळगताना,कधी कधी शिस्तीचा अतिरेक होत असे.पण त्या मागे मुलांचे हितच अधिक असे.

एकदा घरी माझा भाऊ जेंव्हा तो जेमतेम आठ /नऊ वर्षांचा होता,तेंव्हा आरशा समोर उभा राहून बहिणीसाठी आणलेली,पावडर लावीत होता. तेंव्हा ती बाब न आवडल्याने,वडिलांनी सरळ तो डबा उचलला,आणि तिसऱ्या मजल्यावरून समोरील शेतात फेकून दिला.

वेळ पाळणे या बाबत देखील,त्यांचा स्वभाव कमालीचा कडक होता. आम्ही लहान असताना,एका रविवारी दुपारी सिनेमास जाण्याचे ठरले. बस आणि सिनेमा वेळेत गाठण्यासाठी,घर दुपारी दोन वाजता सोडणे जरुरीचे असूनही,आईने घरातील अवराआवरीत उशीर केला.एकदा आईस पाच मिनिटात बाहेर पडायचे असे सांगून,वडिलांनी पाच मिनिटे वाट पहिली.

त्यावेळी आई जेवणानंतरची भांडी घासत राहिली,त्यावेळी वडिलांनी घरातील टेबलावर ठेवतात ते घड्याळ उचलले,आणि आईसमोर फरशीवर आपटून फोडले.त्या कृतीत अतिरेकि संताप असला,तरी वेळेचे आणि शिस्तीचे महत्व होते. असे आज मला मागे वळून पाहताना वाटते.

अशा संतापी वडिलांनी बसच्या तिकिटावर,जेंव्हा आईसाठी मी घर सोडून जात आहे,असा निरोप ठेवला असेल तेंव्हा,भावाच्या जागी मी असतो तरी,त्या क्षणी त्यांना थांबवू शकलो असतो का?

याचे उत्तर आजही मला नक्की देता येत नाही.आणि आता त्यांच्या डायरीतील तो भाग वाचताना,त्यांचा निर्धार आणि मनाच्या निग्रहाची,त्यांनी केलेली निर्धाराची तुलना पाहता,मी तिथे असण्याने परिस्थिती बदलू शकलो असतो का ? याचे उत्तर आजही देता येत नाही,हेच खरे.

पण हे नक्की कि,त्यांची ती कृती म्हणजे, जबाबदारी झटकून केलेला भ्याड पणा नक्कीच नव्हता. त्या बाबतीत मी,माझ्या वडिलांची एक धाडसी पुरुष म्हणून कायमच बाजू घेईन. (क्रमशः)
भाग पाच - http://www.maayboli.com/node/54490

Group content visibility: 
Public - accessible to all site users

झकासराव- नितीमुल्ये , देव मानणारे नक्की होते ,पण अंधश्रद्ध नव्हते . पाचवा भाग कालच लिहला आहे . धन्यवाद!

वाचतो आहे. प्रसंगाप्रसंगातून एखाद्याला समजावून घेणे तसे अवघड आहे. तुम्ही जे डायरीचे स्पष्टीकरण देत आहात त्यातून थोडे फार उमगत आहे.
कृपया पुढील भाग लिहावेत ही विनंती.