if only....

Submitted by अमेय२८०८०७ on 28 June, 2015 - 14:06

if only....हे इंग्रजीमधील सर्वात क्रूर शब्द आहेत असे कुठल्यातरी लेखकाने म्हणले आहे. टेनिसपटू मोनिका सेलेसचा विचार करताना मला या वचनाची हटकून आठवण येते.

१९८९-९० मध्ये मार्टीना नवरातिलोवा कारकीर्दीच्या उत्तरार्धात होती. १९८८ च्या चारही ग्रँडस्लॅम्स आणि ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकून स्टेफी ग्राफने दबदबा निर्माण केला होता. स्टेफीचा सहजसुंदर खेळ, अप्रतिम मनोसामर्थ्य आणि तंदुरुस्ती यामुळे तिला तोडीस तोड आव्हान देणारे कोणी शक्यतो नव्हतेच. १९८७ ची फ्रेंच ओपन ते १९९०ची ऑस्ट्रेलियन अशा बारापैकी स्टेफीने तब्बल नऊ स्पर्धा जिंकून जवळजवळ एकछत्री अंमल सुरू केला होता.

या काळात वयाच्या अवघ्या साडेपंधराव्या वर्षी मोनिका सेलेसचे टेनिसमध्ये पदार्पण झाले. १९८९मध्ये पहिल्यांदाच ग्रँड्स्लॅममध्ये भाग घेताना फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले खरे मात्र तिची खरी ओळख व्हायला अजून एक वर्ष जाणार होते.

Monica_Seles_1991.jpg

१९९०च्या फ्रेंच ओपनपासून मोनिका सेलेसचा अध्याय सुरू झाला. तोंडावर हात घेत लाजत मुरकत बोलणार्‍या या किशोरीने रोलँ गॅरोसच्या घाम काढणार्‍या लाल मातीवर ऐन भरात असलेल्या स्टेफीला चुरशीच्या लढतीत हरवले. स्टेफीच्या नजाकतदार खेळाला सेलेसच्या वेगवान आणि पॉवर हिटींग म्हणतात अशा खेळाचे जबरदस्त आव्हान उभे राहणार आहे हे टेनिसप्रेमींना त्या फ्रेंच ओपनच्या अंतिम स्पर्धेत उमगले.

पुढची अडीच वर्षे सेलेसच्या अनभिषिक्त वर्चस्वाची ठरली. १९९०ची फ्रेंच ओपन ते १९९३ची ऑस्ट्रेलियन या बारा स्पर्धांपैकी सेलेसने आठ स्पर्धा जिंकल्या. वयाची विशीही पार न करता असे घवघवीत यश प्राप्त केल्यामुळे कारकीर्द संपेस्तोवर सेलेस मार्गारेट कोर्ट, नवरातिलोवा अशा दिग्गजांच्या पंक्तित जाऊन बसणार याची सर्वांना खात्रीच वाटू लागली. विंबल्डनच्या हिरवळीचा अपवाद वगळता स्टेफीचा सूर अचानक हरवू लागला. चुरशीच्या सामन्यांत सेलेसच बाजी मारू लागली. १९९२ची फ्रेंच ओपन फायनल असाच एक संस्मरणीय सामना होता. शेवटच्या सेटमध्ये टायब्रेकर नसल्याने चक्क अठरा गेम झाले आणि सेलेसने १०-८ अशा फरकाने सेट आणि सामना जिंकला. एरवी संतुलित राहणार्‍या स्टेफीलाही या पराभवानंतर अश्रू आवरले नाहीत.

यशश्री अशी खुल्या दिलाने माळ घालत असताना ३० एप्रिल १९९३या दिवशी आक्रित घडले. ग्रँडस्लॅम आणि इतर स्पर्धा मिळून सलग २२ विजेतेपदे मिळवून सर्वोच्चस्थानी विराजमान झालेल्या सेलेसला, जर्मनीतील हँबर्ग येथील स्पर्धेत खेळताना उपांत्यपूर्व सामन्यातील विश्रांतीच्या वेळी गुंथर पार्श या स्वतःला स्टेफीसमर्थक म्हणवणार्‍या माथेफिरूने, चाकूने भोसकले. मैदानात एकच हाहाकार उडाला. सुरक्षा कर्मचारी आणि सावध प्रेक्षकांनी वेळीच जेरबंद केल्याने सेलेसच्या खांद्याला किरकोळ दुखापत झाली खरी पण या घटनेने तिच्या मनावर जबरदस्त आघात केला.

Monica-Seles-Stabbed.jpg

शारीरिक दुखापत दोन चार महिन्यांत बरी होऊनही पुन्हा मैदानात पाय ठेवायचा धीर एकवटेपर्यंत जवळजवळ अडीच वर्षे जावी लागली. १९९५ च्या अमेरिकन ओपनद्वारे सेलेस पुन्हा खेळू लागली, अगदी अंतिम फेरीतही गेली पण मधल्या काळातील गैरहजेरीचा विपरीत परिणाम तिच्या खेळावर नक्कीच झाला होता. तीन वर्षापूर्वींची मोकळी, खळखळून हसणारी युवती नको इतकी गंभीर झाली होती, चुरशीच्या वेळी सर्वस्व झोकून देण्यात कमी पडत होती हे स्पष्ट दिसत होते.

१९९५च्या पुनरागमनापासून अगदी २००३च्या फ्रेंच ओपन पर्यंत सेलेस खेळत राहिली पण आधीच्या यशाचा एक तुकडाही ती पुन्हा मिळवू शकली नाही. पुनरागमनानंतर खेळलेल्या सव्वीस ग्रॅंडस्लॅमपैकी केवळ एक ती जिंकू शकली. बहरात असताना अचानक झालेल्या हल्ल्याने तिची संपूर्ण विजिगीषा जणू काही कुस्करून, नष्ट करून टाकली होती. आधी मैदानात निकराने लढणारी सेलेस अचानक खेळात आणि जीवनातही बचावात्मक झाली आणि जुने वैभव कधीच मिळवू शकली नाही. दुर्दैवाने, जिथे तिची घौडदौड सुरू झाली होती त्या फ्रेंच स्पर्धेतच,२००३ साली पहिल्या फेरीतील पराभवाची नामुष्की सोसत सेलेसची रडतखडत सुरू असलेली कारकीर्द वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी संपुष्टात आली.

या सर्व घटनेचा स्टेफीला तिचा अर्थाअर्थी काहीही संबंध नसताना फायदा मिळाला हे मात्र नाकबूल करून चालणार नाही. विजेतेपदांचा दुष्काळ अनुभवणार्‍या स्टेफीच्या खेळाने एक नवे वळण घेतले. सेलेससोबतच्या तीन वर्षांत केवळ दोन विंबल्डन जिंकू शकलेल्या स्टेफीने पुढे १९९९च्या फ्रेंच ओपनपर्यंत तब्बल अकरा आणि एकूण कारकीर्दीत बावीस ग्रँडस्लॅम्स जिंकल्या. मार्गारेट कोर्टच्या २४ विजेतेपदांनंतर दुसर्‍या क्रमांकावर राहून स्टेफी सर्वश्रेष्ठ महिला खेळाडूंच्या यादीत दिमाखाने जाऊन बसली. यात खेळाडू म्हणून तिची उच्च दर्जाची मेहेनत सर्वात प्रमुख घटक असली तरी तिची इच्छा नसताना हे विचित्र दान तिच्या बाजूने पडले हेही तितकेच खरे आहे.

आता ही घटना काळाच्या दूरस्थ वळणाआड गेली आहे. अनेक नव्या ताऱ्यांचा उदयास्त चालूच आहे. गेल्या पंधराएक वर्षात सेरेना विल्यम्स नावाच्या अपार क्षमतेच्या आणि चिकाटीच्या खेळाडूने वीस ग्रँडस्लॅम्स जिंकून मार्गारेट कोर्ट आणि स्टेफीच्या बरोबरीचे स्थान मिळवले आहे. गेल्या दोन वर्षांतील तिचा झपाटा पाहता कदाचित ती स्टेफीच्याही पुढे जाईल. असे असले तरी बावीस वर्षांपूर्वी केवळ एका माथेफिरूच्या तिरस्करणीय वर्तनामुळे सेलेस मात्र ," आपण काय आणि किती करू शकलो असतो?", या विचारातच आयुष्यभर तळमळत राहील आणि महिला टेनिसची एक आख्यायिका बनण्याचे बीज असणारी कथा केवळ शोकांतिका म्हणूनच नेहेमी ओळखली जाईल.

बोर्ग- मॅकेन्रो, नवरातिलोवा-ख्रिस एव्हर्ट, बेकर-एडबर्ग, अगासी-सांप्रास आणि फेडरर-नदाल-जोकोविच या धर्तीची दीर्घकाळ झुंज ग्राफ-सेलेस यांत कधीच होऊ शकली नाही, ही खंत टेनिस जगताला सतावत राहील.
आमच्यासारख्या दूरवरून पाहून चुकचुकणार्‍या चाहत्यांना मात्र.....if ony.... हे क्रूर शब्दच छळत राहतील, अगदी कायमचे!!

(फोटो नेटवरून साभार)

-- अमेय

Group content visibility: 
Public - accessible to all site users

if only.....खरंय अगदी....
या लेखामुळे मॉनिका सेलेस ची कितीतरी वर्षांनी आठवण आली.

खरंय अगदी.. चटका लावणारी शोकांतिका.. तिने नक्कीच विक्रम रचले असते कारण येत्या काळात स्टेफीनंतर तिला आव्हान देणारे असे कोणी आलेही नव्हते..

एक प्रश्न - तेव्हा यामागे स्टेफी ग्राफ किंवा तिचे कोणी समर्थक असल्याचे वादळ उठले होते वा कुजबूज झाली होती का?

Sad
मी ९१ पासून टेनिस बघायला सुरूवात केली तेव्हा सेलेस-ग्राफ फायनल फार भारी असायच्या! ९२ ची फ्रेंच ओपनची फायनल व्हिडियो कॅसेटवर रेकॉर्ड केली होती. ९२ ची फायनल विंबल्डन फायनल मोनिका जिंकणार अशी खात्रीच असताना तिचा फारच किरकोळीत पराभव झाला होता. पण तिने पुढच्या स्पर्धा जिंकल्या पण तिच्यावर हल्ल्याची बातमी फार धक्कादायक होती.

मला आठवतय त्याप्रमाणे दुखापत अगदी किरकोळही नव्हती. तिला कित्येक दिवस सर्व्हिस करता यायची नाही.

या सर्व घटनेचा स्टेफीला तिचा अर्थाअर्थी काहीही संबंध नसताना फायदा मिळाला हे मात्र नाकबूल करून चालणार नाही. >>>> केवळ ह्याच कारणामुळे स्टेफी मला कधीच आवडली नाही! तिचं यश हे कधीच निर्भेळ वाटलं नाही.

तेव्हा यामागे स्टेफी ग्राफ किंवा तिचे कोणी समर्थक असल्याचे वादळ उठले होते वा कुजबूज झाली होती का? >>>> हल्लाखोराने स्वतःला स्टेफी समर्थक म्हणवून घेतले होतेच पण स्टेफीवर आरोप झाल्याचं आठवत नाही. इनफॅक्ट स्टेफी स्वतः मोनिका सेलेसला हॉस्पिटलमध्ये भेटायला गेल्याची बातमी पेपरात वाचल्याचं आठवतं आहे.

दूरदर्शनने भारतात अगदी खेडोपाड्यातून आपले जाळे पसरविले त्यावेळी मनोरंजनासोबत क्रिकेटचे प्रसारण सुरू झाले त्याचे काही विशेष वाटले नव्हते. पण जेव्हा विंबल्डनचे सामने घरी बसल्याबसल्या पाहाण्यास मिळू लागले त्यावेळेपासून टेनिस या एरव्ही आपल्याकडे सर्वसामान्यात लाडका न झालेला खेळ आकर्षणाचे केन्द्रच बनला...त्याला कारणीभूत सुरुवातीच्या क्रिस एव्हर्ट, व्हर्जिनिया वेड, पाम श्रीव्हर, ट्रेसी ऑस्टिन यांच्या खेळातील प्राविण्याबरोबरीनेच नजाकतीने इथल्या प्रेक्षकांना टेनिसकडे वळविले....नंतरच्या मार्टिना नवरातोलिवा, स्टेफी ग्राफ, मेरी पीअर्स, गॅब्रिएला साबाटिनी यानी तर तमाम टीव्हीप्रेमींना आपल्याकडे खेचूनच घेतले....यात स्टेफी आघाडीवर जरी होती तरी ज्यावेळी १९ वर्षाची एक अत्यंत हसरी आणि दिमाखदार पोरगी मोठ्या आत्मविश्वासाने टेनिस मैदानावर उतरली त्यावेळी स्टेफीच्या क्रमांक एक ला शह देणारी तिच्याच तोलामोलाची कुणीतरी आली आहे याची जाणीव झाली...जणू एक परीच होती...ती मोनिका सेलेस.

तिच्याविषयीच्या कारकिर्दीचा अमेय पंडित यानी आकर्षक अशा भाषेत तसेच अतिशय योग्य माहितीने धागा सजविला आहे. टेनिस क्षेत्राला जवळपास काळिमा फासणारी ती घटना, जिच्यामुळे एका कर्तबगार मुलीच्या क्रिडाजीवनाला भयतेची जी सावली चिकटली ती कायमचीच. हल्ल्यानंतर दोन वर्षे ती जर्मनीच नव्हे तर अन्य कोणत्याही देशातील टेनिस स्पर्धेत उतरली नाही, शिवाय त्यानंतर जिद्दीने परत प्रवेश करून थोडेफार यश मिळविले असे जरी सामन्यांच्या नोंदी सांगत असल्या तरी १९९० ते १९९२ मधील तिची तडफ, उत्साह, जिगर लुप्त होत चालले होते हे सर्वानाच जाणवत होते....ज्या दिवशी फ्रेन्च ओपनच्या पहिल्याच सामन्यात तिने पराभव पत्करला त्यावेळी जगभरातील तिच्या चाहत्यांनी मनोमन ओळखले...१९९० ची मोनिका आता नाही पुन्हा पाहायला मिळणार.

चॅम्पिअन्स अनेक झाल्या....होत आहेत...यापुढेही हे चक्र चालू राहील; पण आमच्यासारख्यांच्या दृष्टीने क्रिस एव्हर्ट, मार्टिना नवरातिलोवा, स्टेफी ग्राफ, मार्टिना हिंगिस आणि मोनिका सेलेस...हीच नावे कायमची मनी वसली आहेत.

Sad
>>>महिला टेनिसची एक आख्यायिका बनण्याचे बीज असणारी कथा केवळ शोकांतिका म्हणुनच नेहेमी ओळखली जाईल.>>> You hit the nail on the head.
ह्याच कारणामुळे स्टेफी मला कधीच आवडली नाही! तिचं यश हे कधीच निर्भेळ वाटलं नाही.>>>+१

सेलेसवरील लेखात स्टेफीचा उल्लेख अपरिहार्य आहे. वेगळा अर्थ निघायची शक्यता असूनही मला तो उल्लेख वगळावा असे वाटले नाही. मात्र विषय भरकटू नये ही विनंती करत आणि स्टेफी चाहत्यांना वेगळे वाटू नये म्हणून खाली आणखी थोडे लिहितो.

स्टेफी एक महान खेळाडू आहे, तिचा यात काहीही संबंध नव्हता हे मी लेखात लिहिलेच आहे आणि सुदैवाने तो संबंध लावू पाहण्याचा आचरटपणा समस्त टेनिस जगतातही कुणीच कधी केला नाही, पण नशीबाने का होईना, तिच्या विजेतेपदाला पोषक वातावरण या दुर्दैवी घटनेमुळे निर्माण झाले असे मला मनोमन वाटते. मी खूप टेनिस पाहायचो त्या काळात, 1990 च्या अखेरीस स्टार स्पोर्ट्स आले होते त्यामुळे बऱ्याच इतर स्पर्धाही बघायला मिळाल्या. सेलेस झपाटून खेळत होती. ग्रास कोर्ट वगळता स्टेफीला तिच्यासमोर आव्हान उभे करता येत नव्हते आणि याचा परिणाम म्हणून सांचेझ, सबातिनीही प्रेरणा घेऊन स्टेफीला हरवू लागल्या होत्या.
सेलेस स्पर्धेतून गायब झाल्याने स्टेफीला स्वतःच्या कच्च्या दुव्यांवर विचार करायला वेळ मिळाला आणि म्हणून तिच्या खेळाने कात टाकली...इतकेच मला म्हणायचे आहे.

स्टेफी स्वभावतः अतिशय मृदू, संयमी आणि उत्तम विचारी खेळाडू आहे हे मला पूर्णपणे मान्य आहेच. तिचे यशही अस्सल आहे पण सेलेस पूर्ण भरात खेळत राहिली असती तर कदाचित ते यश विभागले गेले असते.

अर्थात या आता फक्त जरतरच्या गोष्टी....म्हणून तर....if only Sad

स्टेफी स्वभावतः अतिशय मृदू, संयमी आणि उत्तम विचारी खेळाडू आहे >> सहमत आहे. मी लहानपणी पहिल्यांदा जे काही टेनिस पाहिलेय फॉलो केलेय ते स्टेफीपासून सुरू होऊन स्टेफीलाच संपलेय. मोनिका प्रकरण फक्त ऐकूनच माहीत. ऐकताना स्टेफीचा चाहता म्हणूनही सलतेच. जसे मोनिकाच्या लेखात स्टेफीचा उल्लेख अपरिहार्य आहे तसाच स्टेफीचा विषय निघताही मोनिका उल्लेख अपरिहार्यच. हा लेख वाचतानाही बॅकसाईडला स्टेफीच डोक्यात घोळत होती, त्यामुळे ईथे थोडेफार शंकानिरसन होईल या हेतूने माझेही प्रतिसादात ते विचारणे झाले. तरी विषय तिथेच रेंगाळू भरकटू नये.

.

छान लिहिलेय.

मोनिकाचा खेळ मीही पाहिलाय. तिच्यापासुन स्त्रियांच्या टेनिसमध्ये पुरुषांसारखा झंझावात आला. तिच्या आधी स्त्रियांचे टेनिस ब-यापैकी सौम्य आणि नजाकतदार असायचे. मोनिका अगदी पुरूषी खेळायची, दातओठ खात फटका परतवायची. या एका कारणामुळे मला ती अजिबात आवडायची नाही. पण खुप चांगली खेळाडू होती. तिच्याबाबत जे काही झाले ते खुप दुर्दैवी असेच होते.

if only....हे इंग्रजीमधील सर्वात क्रूर शब्द आहेत असे कुठल्यातरी लेखकाने म्हणले आहे. >>> अगदी खरंय

लेख आवडला.

मलाही सेलेस आवडायची.

पण स्टेफीचे यश निर्भेळ नाही हे म्हणणे फार फेच्ड आहे. तिचा काय दोष आहे? ( उदाच द्याय्चे तर सचिनचे शतक हे बांग्ला किंवा केनिया विरुद्ध आहे म्हणून त्याची व्हॅल्यु लो आहे असे म्हणणे झाले. )
आमच्यासारख्यांच्या दृष्टीने क्रिस एव्हर्ट, मार्टिना नवरातिलोवा, स्टेफी ग्राफ, मार्टिना हिंगिस आणि मोनिका सेलेस...हीच नावे कायमची मनी वसली आहेत. >> +१ मला ह्यात डावं उजवं करावे देखील वाटत नाही.

आवडला लेख.

पण स्टेफीचे यश निर्भेळ नाही हे म्हणणे फार फेच्ड आहे. तिचा काय दोष आहे? ( उदाच द्याय्चे तर सचिनचे शतक हे बांग्ला किंवा केनिया विरुद्ध आहे म्हणून त्याची व्हॅल्यु लो आहे असे म्हणणे झाले. )>>>>+१

....

चांगला लिहिलाय लेख.
Happy

घरी टिव्ही नसल्याने अस काहि फॉलो केलच नाही कधी.
पण न्युज पेपर वाचल्याने कळायच.
आगासी, सॅप्रास, हिन्गीस, स्टेफी, मोनिका ही नावं वाचण्यात असायचीच.

मला मोनिका तिच्या नावामुळे भारतीय वाटायची तेव्हा. Happy

लेख आवडला. सकाळीच पोस्ट टाकणार होते पण कामाच्या गड़बडित राहून गेल. टेनिस फॉलो करायची सुरुवात स्टेफी , मोनिका , पीट सम्प्रास , आंद्रे अगासीपासून झाली. मला स्टेफीचा, मोनिकाचाहि खेळ आवडतो.

<<<< पण स्टेफीचे यश निर्भेळ नाही हे
म्हणणे फार फेच्ड आहे. तिचा काय दोष आहे? ( उदाच द्याय्चे तर सचिनचे शतक हे बांग्ला किंवा केनिया विरुद्ध आहे
म्हणून त्याची व्हॅल्यु लो आहे असे म्हणणे झाले. )>>>>> ह्याला अनुमोदन

मोनिका बाबतीत झालेली घटना दुर्दैवी असली तरीही त्या बाबतीत स्टेफिच्या यशाला दोष देणे पटत नाही.

अमेयदाने लिहिलेल्याप्रमाणेच ह्या जर तर च्या गोष्टी आहेत .

सॉरी.. अगदीच अवांतर..
पण मला हा लेख वाचुन सुमन कल्याणपुरकरांची खुप आठवण आली.
किती साम्य त्यांच्याही शोकांतिकेत. Sad

पण स्टेफीचे यश निर्भेळ नाही हे म्हणणे फार फेच्ड आहे. तिचा काय दोष आहे? >>>> "तिचा दोष आहे." असं कुठे म्हटलय ? मोनिकावर हल्ला झाला नसता तर स्टेफीचे आजचे स्टॅट्स आहेत असे नक्कीच नसते. मार्टिना नवरातिलोव्हा, ख्रिस एव्हर्ट, मधल्या छोट्या काळात हिंगीस, मग विल्यम्स भगिनी, किम, हेनीन, शारापोव्हा ह्यांना कायम तगड्या प्रतिस्पर्धी होत्या. तसं स्टेफीच्या काळात झालं नाही. तिची तगडी प्रतिस्पर्धी ही दुर्दैवाने बाहेर फेकली गेली. त्यामुळे तिच्या यशात लकचा फार मोठा वाटा होता असं मला वाटतं.