लहानपणीची गोष्ट

Submitted by धनुर्धर on 25 June, 2015 - 05:32

लहानपणी मला टीव्ही आणि सिनेमा पहायचा खूप नाद होता. त्या वेळेस आमच्या गावामध्ये फक्त दोन ठिकाणीच टीव्ही होते. एक आमच्या ग्रामपंचायतीच्या कडे व दुसरा काळे नावाच्या गृहस्थांकडे. त्या वेळी रामायण ही मालिका आत्यंत लोकप्रिय होती. रामायण लागले की काळेंचे घर व ग्रामंचायतचा ओटा हाउसफुल होत असे. लोक रामायण पाहताना ऐवढे तल्लीन होत जणू ते खरोखरच आपल्या समोर घडत आहे असे त्यांना वाटे. विशेषतः राम आणि सीता वनवासात निघाले तेंव्हा तर महिला वर्गातून हुंदक्यांचे आवाज येत होते. आम्हा मुलांवर तर त्या रामायणाचा एवढा प्रभाव होता की, आम्ही बांबूच्या काड्यांचे धनुष्यबाण बनवून खेळत असू. घरोघरी पुढे काय होणार? याच्या चर्चा रंगायच्या. मी रामायण सुरू व्हायच्या अर्धा तास अगोदर टीव्ही पुढे जाऊन बसत असे.
गावात कुठे सत्यनारायणाची पुजा, वास्तुशांत किंवा बारसे यासारखे कार्यक्रम असले की मग पाहुण्यांसाठी व्ही. सी. आर. व टीव्ही आणून सिनेमा दाखवत. गावात कुठेही असा सिनेमा बघायला मी जात असे. मित्र सिनेमा बघताना मध्येच पेंगू लागत. मला मात्र सिनेमा संपल्याशिवाय झोप येत नसे. गावात यात्रेदिवशी पडद्यावर सिनेमा दाखवण्याचा कार्यक्रम असे ती तर माझ्या साठी पर्वणीच असायची.
अशाच एका यात्रेला संध्याकाळी पडद्यावर सिनेमा दाखवला जात होता. मी देवळाच्या पायरीवर बसून पहात होतो. माझ्या कडेला माझा मित्र होता. वरच्या पायरीवर इतर लोक दाटीवाटीने बसले होते. मी बसलेल्या पायरीखाली गटर होते. सिनेमा ऐन रंगात आला होता. दादा कोंडकेंच्या विनोदाला लोक खळखळून हसत होते. आणि अचानक काही कळायच्या आत वरच्या पायरीवरचा एकजण पेंगता पेंगता माझ्या अंगावर कोसळला. मित्रांने मला पकडण्याच्या प्र

यत्नात कोसळणार्याला धरून ठेवले. मी मात्र गटारात जाऊन पडलो. कसाबसा उठून उभा राहिलो तर लोक खदा खदा हसायला लागले. गटारातल्या चिखलाने मी काळाकुट्ट झालो होतो. तेवढ्यात कुठनतरी आई आली आणि माझ्या पाठीत धपाटा मारला. मी रडायला लागलो तसे लोक जास्तच हसायला लागले. मला आईने ओढत घराकडे नेले. घरी मग गार पाण्याने तिने मला अंघोळ घातली व कपडे बदलले. "पुन्हा जाच पिक्चर बघायला मग बघते" असा दम देऊन तिने मला झोपायला लावले. मी भितीने गोधडी अंगावर घेतली पण सिनेमा मला स्वस्थ झोपू देईना मला परत देवळाकडे जावेसे वाटू लागले. आई झोपलीसे पाहून मी पुन्हा देवळाकडे धूम ठोकली. मला बघून लोक पुन्हा हसू लागले. मी मात्र काही घडले नाही या आर्विभावात 'पिक्चर' पाहू लागलो.

. . . . . धनंजय . . . . .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आठवण Lol

आमच्या वाडीत सर्वात पहिला टिव्ही आमचा त्यामुळे सर्व वाडीतील लोक तसेच फेरीवालेही आमच्या घरी कार्यक्रम पाहण्यास येत असतं. आमच्या घराला जोडुन छोटा अंगणही होता तोही पुर्ण भरुन जात असे. आम्हा भावंडाना टिव्ही बघण्यापेक्षा खेळण्यात जास्त रस असल्यामुळे आम्ही घराबाहेर खेळत असु पण जर घरात जायचे असेल तर बाहेर उभे असलेले फेरीवाले आणि घरात बसलेली माणसं आम्हालाच ओरडत असत मग आम्हीपण तावातावाने 'आमच्याच घरात आम्हालाच येऊ देत नाही' म्हणुन ओरडत असु.पण आईबाबा आम्हालाच 'ते टिव्ही बघतायत ना काय तुम्ही मधेमधे नाचताय' म्हणुन रागवत असत.

छोट्या भावाच्या वाढदिवसाला बाबा व्हि.सी.आर आणुन अंगणात 'पिक्चर' लावत असत तेव्हा प्रत्येकजण चादरी गोधड्या घेऊन आपआपली जागा धरत. मी तर पडद्यावर, व्हि.सी.आर वर कितीतरी 'पिक्चर' पाहिले असतील पण एकही पुर्ण नाही 'पिक्चर' लागल्यावर अर्ध्यातासातच मी त्याच चादरीवर तिथेच झोपुन जायचे मग रात्री 'पिक्चर' संपल्यावर आई मला घरात नेऊन ठेवत असे.

जवळजवळ २४-२५ वर्षांनी पुन्हा हे सगळं आठवलं, खुप मस्त वाटलं भुतकाळात रमायला. धन्यवाद धनंजयजी.