' माझे बाबा,मला उलगडलेले - डायरीच्या नोंदीतून '

Submitted by किंकर on 21 June, 2015 - 09:54

आज पितृदिन - खरेतर आपल्या पहिल्या दोन नात्यातील एका नात्याचे ऋण व्यक्त करण्याचा दिवस . जे बंध जाचक वाटत नाहीत तर अगदी सह्य होतात ते म्हणजेच ऋणानुबंध .
आज या नात्या कडे पाहताना म्हातारा ,बाप ,पिताश्री, वडील अश्या अनेक उपाध्या मिरवणारे हे नाते प्रत्येकासाठी किती हळवे व गुंतागुंतीचे आहे याचा विचार करताना मन अनेकदा कातर होते. आई,वडिलांना सांभाळणे हे कर्तव्य मानणे इथ पासून ते आई कोणाकडे किती दिवस किंवा वडिलांना सांभाळणे हेच ' डील ' होताना दिसते तेंव्हा मन हतबल होते.
आज पितृदिनाचे निमित्ताने मी आपल्या समोर एक लेख मालिका ठेवत आहे, तिचे नाव आहे ' माझे बाबा,मला उलगडलेले - डायरीच्या नोंदीतून '

खरे तर लेखाचे नाव असे का? असा आपणास नक्कीच प्रश्न पडला असेल. आणि खरेच आहे. कारण माझे बाबा त्यांना आम्ही 'अण्णा' म्हणत असू, हे मी दहावीत असतानाच गेले. जेंव्हा मी फक्त १४ वर्षांचा होतो. आणि त्यापूर्वी पाच वर्षे घरापासून दूरच राहत होतो. त्यामुळे बाबा म्हणजे आमचे अण्णा माझ्यापुरते आठवणींच्या धुक्यात दड्लेलेच ठरले. पुढे मला त्यांची एक वेगळीच 'रोजनिशी' अचानक गवसली आणि तिच्या वाचनातून आणि माझ्या आठवणीतून मी पुनश्च माझ्या बाबांचाच कसा झालो त्याची हि गोष्ट आणि म्हणूनच मी म्हटले आहे - 'माझे बाबा,मला उलगडलेले - डायरीच्या नोंदीतून.'
भाग एक .......
नाते संबंध तोडू म्हटले तरी तुटत नाहीत याचा साक्षात्कार मला पहिल्यांदा झाला तो त्यांच्या मृत्यू समयी. आता त्या घटनेला ४१ वर्षाहून अधिक काळ उलटला आहे पण माझ्या वडिलांच्या मृत्यूची वेळ आणि त्या क्षणाची माझी मनस्थिती मी आजही विसरू शकत नाही आणि असे का? याला शास्त्रीय आधारावर द्यायला माझ्याकडे आजही उत्तर नाही.
त्यावेळी मी सांगली जिल्ह्यातील उरुण-इस्लामपूर या गावी माझ्या आजोळी मामाकडे राहून शिकत होतो. तर माझे इतर सर्व कुटुंबीय पुणे येथे राहत होते. 'विद्येचे माहेरघर' लक्ष्मीने पाठ फिरवल्यामुळे मला दूरच होते. माझे त्यावेळी पुण्यास येणे जाणे हे मे महिना आणि दिवाळी या सुट्ट्या पुरतेच असे. तो दिवस होता रविवार दि. ८ जुलै १९७३ . कांदे नवमी. मागील वर्षी पावसाने बऱ्यापैकी पाठ फिरवली होती त्याची भरपाई म्हणुन कि काय गेले दोन तीन दिवस तो कोसळतच होता.
सकाळी मामाच्या शेतावर व गावी जायचे म्हणून सकाळी ' बहे ' येथे गेलो होतो पण इस्लामपूर बहे यांना जोडणारा ओढ्यावरील पूल पाण्याखाली गेला होता. मग आम्ही गावात न जाता फक्त शेतात जावून यायचे ठरवले. वाटेत घरी परतणारे शेतकरी आम्हाला पाहून "पावन आता कसले शेतात जाता?" पावसाने निवळी काढलीय. म्हणजे जेंव्हा अति पावसाने चिखलमय मातीच्यावर देखील स्वच्छ पाणी वाहू लागते तेंव्हा त्यास निवळी निघणे म्हणतात. त्यामुळे न गाव न शेत आमची वरात तिथूनच परत फिरली.
घरी येण्यास चार वाजून गेले.खूप दमणूक झाली होती. घरी येवून पाहतो तर आजीची लगबग सुरु होती सायंकाळच्या जेवणाची तयारी जोरात सुरु होती. मामाचे एकदोन मित्र जेवायला येणार होते आणि कांद्याचे पिठले ताजी भाकरी, कांदा भजी असा चमचमीत बेत होता.मी सरळ झोपून गेलो.
हे इतके सविस्तर सांगण्यामागे खरे कारण हे कि जेंव्हा इस्लामपुरात हे असे वातावरण होते तेंव्हा माझे बाबा -अण्णा ताराचंद हॉस्पिटल पुणे येथे पोटदुखीचा त्रास होतोय म्हणून गेले तीन दिवस झोपून होते. त्यांच्या काकूने आज कांदे नवमी आहे आणि आता तब्येतीला उतार पडतो आहे म्हणून घरचे खाणे मिळावे म्हणून डबा करून आणला होता.
वेळ संध्याकाळची सूर्य मावळती कडे झुकला आणि अचानक आमच्या कुटुंबावरचा सूर्य देखील कायमचा मावळला, काकूने आणलेले जेवण न घेताच बाबा दूरच्या प्रवासाला निघून गेले. हि घटना घडली ती वेळ होती सायंकाळची ७.४० ची. तेंव्हा मी त्यांच्या पासून दूर १२० मैलावर मामाकडे. बरे नुकताच दहावीत प्रवेश घेतलेला म्हणजे धड न लहान धड न मोठा असा अर्धवट वयातील, त्या मुळे बाबांच्या आजारपणाची माहिती कोणी कळवली नव्हती.
आजीने मला ७.१५ वाजता उठवून दिवसभर बाहेर होतास जेवण खाण झालेले नाही पटकन जेवायला चल असे म्हणून पाने वाढली मामांचे मित्र पण आले . पहिली वाढ पानात पडली तो पर्यंत ७.४० झाले होते मी पहिला घास हातात घेतला आणि दिवसभर काही खाणे झालेले नसून देखील अचानक अन्नावरची वासना उडाली एक घास देखील न खाता मी पानावरून उठलो. आजी रागावली, मामा माझ्या हट्टाकडे दुर्लक्ष करून मित्रांबरोबर जेवला.
पण मी मात्र अस्वस्थ मनस्थितीत ती रात्र तळमळत काढली . त्या सर्व अस्वस्थ पणाची कारणे पुढे चार दिवसांनी जेंव्हा त्या दुर्दैवी घटनेचे पत्र येवून धडकले तेंव्हा उलगडली.
आज इतकी वर्षे उलटल्यावर काही प्रश्न आज हि अनुत्तरीत राहतात, ते म्हणजे वडिलांना हॉस्पिटलमध्ये ठेवून तीन दिवस झाले तरी त्या बाबत कोणीच मला का कळवले नाही? वय लहान म्हणून नाही कळवले हे आजारपणा पुरते ठीक, पण जेंव्हा मृत्यू झाला तेंव्हा अखेरच्या दर्शनासाठी तरी मुलास आणावे असे का नाही कोणास वाटले? १२० मैल हे खरच कधीच न संपणारे अंतर का ठरले?
आणि जर मी नाकळता होता तर दिवसभर काही खाल्ले नसतांना रोजच्या पेक्षा वेगळा आणि साग्र संगीत स्वयंपाक असताना एक हि घास न खाता कोणत्या शक्तीने मला पानावरून उठवले? उत्तरे कधीच मिळाली नाहीत पण कांदे नवमी आली कि कांदे चिरताना आजही डोळे भरून येतात ते कांद्यामुळे नाही, तर बाबांच्या अखेरच्या दर्शनाचे योग नव्हते या दुर्भाग्यामुळे.
सन १९६८/६९ च्या दरम्यान वडिलाची नोकरी गेली आणि आमच्या घराची अवस्था व्यंकटेश स्तोत्रातील 'अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविशी जगदीशा ' यासारखी झाली. पण मला आठवतेय कि परिस्थीची खंत न बाळगता कष्टाने पण स्वाभिमानाने जगावे याचा पहिला धडा त्यांनी कृतीतून आम्हाला दिला. कोल्हापूर आणि रंकाळा यांचे नाते अतूट आहे. पण आमच्या आठवणीतील रंकाळा हा जेंव्हा शालिनी पॅलेस हे हॉटेल झाले नव्हते आणि रंकाळ्याचा काठ गावाबाहेर मोकळी हवा खाण्यासाठी फिरावयास जाण्याचे ठिकाण होते तो काळ.
त्यावेळी 'रंकाळा चौपाटी' अस्तित्वात आलेली नव्हती पण हे ठिकाण एक दिवस नक्कीच चौपाटी होणार याची मनात खात्री होती बाबांच्या मनात पक्की खात्री होती. कारण तेथे फिरावयास येणाऱ्या लोकांना चिवडा पाकीट विकण्याचा पहिला प्रयोग माहे मे १९६८ मध्ये माझ्या बाबांनी केला. आणि त्या अर्थार्जनाचे प्रयोगास मी सक्रीय मदत केल्याचे मला आजही आठवते. इतकेच काय पण रु३.५०चे चिवडा सामान पोहे ,शेगदाणे ,खोबरे, तेल व छोट्या प्लास्टिक पिशव्या आणयचे मग आई त्याचा चिवडा बनवून देत असे. तर बाबा त्याची ५० पाकिटे तयार करीत असत.
मग ती पाकिटे घेवून सायंकाळी ४.००ते ७.३० या वेळेत ती मी रंकाळ्यावर फिरावयास येणाऱ्या मंडळींना ती विकत असे. पन्नासावे पाकीट विकले गेले कि कोण आनंद होत असे मग ते ५.०० रुपये घेवून घरी गेले कि, त्यातून रु.३.५०चे चिवडा सामान व रु. १.५०चे किराणा सामान आणून त्या दिवशीची चूल पेटत असे.
पण हे करताना कधी लाज बाळगण्याचे कारण नाही, आपण मिळवत आहे तो पैसा कष्ट करून मिळवत आहोत हे बाबांचे सांगणे असे. मला आठवते आहे कि, प्रथम हा धाडसी वाटलेला बाबांचा विचार पुढे किमान सहा महिने घर चालवण्यास उपयोगी ठरला. प्रथम हा प्रयोग करताना परिचित नातेवाईक यांनी केलेली थट्टा आजही आठवते, पण आज “ रंकाळा चौपाटी”चे बदलते रूप पाहिले, तर मला मात्र बाबांची दूर दृष्टीच जाणवते.
या चिवडा विक्रीतील एक किस्सा मला आजही आठवतो माझा थोरला भाऊ शेखर यास हा उद्योग फारसा आवडत नसे त्यामुळे तो स्वतः चिवडा विक्रीस जाण्यास राजी नसे. एके दिवशी बाबांनी थोडेसे सक्त्तीनेच माझ्या ऐवजी भावास चिवडा विक्रीस पाठवले तर तो गेला पण तासाभरातच परत आला आल्यावर घरी सर्वच आश्चर्य चकित झाले व त्यास विचारले अरे वा तू तर लवकर काम संपवलेस किती पाकिटे संपली? तर तो म्हणाला एक! आणि त्याचे पैसे कुठायत विचारल्यावर तो म्हणाला एक पाकीट पेरुवाल्यास दिले आणि आणि त्याचे कडून पेरू घेतला आणि तो खाल्ला. त्यानंतर बाबांनी कधी त्याला चिवडा विक्रीस पाठवले नाही.
खरे तर मला अण्णांचा सहवास तसा अल्पच लाभला. मी दहावीत गेलो आणि अण्णा गेले म्हणजे मी जेम तेम १४ वर्षांचा होतो आणि त्या चवदा वर्षांपैकी अखेरची पाच वर्षे मी त्यांचे पासून दूर मामाकडेच काढली. कारण मी चवथीपर्यंत घरीच असल्याने पहिली, भगवंताचे मंदिर- बार्शी, दुसरी ते चौथी, भक्ती सेवा विद्यापीठ - कोल्हापूर या ठिकाणी शिकलो.आणि त्यामुळेच माझ्या वडिलांबाबतच्या आठवणी तश्या थोड्या धूसरच आहेत.
पण त्या आठवणींचा चलचित्रपट आणि माझ्या मध्ये एक अदृश्य असा धुक्याचा पडदा आहे. कधी कधी एखादीच आठवणींची झुळूक येते आणि तो पडदा क्षणभरासाठी दूर होतो आणि अण्णा येवून समोर उभे राहिलेत असे वाटून तो काळ मी आजही पुन्हा एकदा तसाच अनुभवतो. त्यामुळे जगाने जसे माझ्या बाबांना कधी ओळखले नाही तसे, जगास असे वाटते कि आम्हा मुलांना आमचे बाबा आठवतच नाहीत. पण त्याचा दोष मी माझ्या बाबांच्या आसपास वावरणाऱ्या परिचितांना देणार नाही कारण त्यांनी पहिले ते त्यांचे बाह्य रूप.
अर्थात जवळचे नातेवाईक सुद्धा बाबांच्या वागणुकीवरून त्यांना तापट , हट्टी, दुराग्रही, हेकेखोर, तऱ्हेवाईक इतकेच काय पण माथेफिरू, वेडसर, मनोरुग्ण इत्यादी विशेषणे लावून मोकळे होत. या नातेवाईकांना मी जवळचे नातेवाईक अश्यासाठी म्हटले आहे कि ज्या काळी दोन वेळची चूल घरात पेटणे हि चैन होती त्याकाळी त्यांनी आम्हाला मदतीचा हात द्यावा अशी आमची न कळती अपेक्षा होती. अर्थात काहींनी मदतीचा हात दिला तर काहींनी स्वतःचे पायावर उभे राहायला शिका असे पायात बळ येण्यापुर्वीच सांगितले .
जसा जसा काळ मागे पडू लागला तसे तसे ज्या माझ्या वडिलांना इतकी विशेषणे न मागताच मिळाली ते माझे बाबा खरेच कसे होते याचा मला वरचेवर प्रश्न पडू लागला. कारण माझ्या आठवणीतील बाबा हे त्यांना मिळालेल्या कोणत्याच विशेषणात बसत नाहीत असा माझा पक्का समज होता पण न कळते वय आणि मन मोकळे करावे असे कोणी मैत्र नाही त्यामुळे माझे बाबा हे फक्त माझेच राहिले.
त्यांचे मला भावलेले रूप इतके दिवस माझ्यापाशीच राहिले. पुढे मी माझी पुण्यातील नोकरी संपवून चाकोरीतून बाहेर पडण्याचे ठरवले तेंव्हा मला बँकेतील उच्च पद, भविष्यात बढती, पत्नी उच्च विद्या विभूषित, स्वतःचे चार खोल्यांचे अपार्टमेंट असताना हे स्थैर्य सोडून अनोळखी ठिकाणी जावून पुन्हा एकदा नवा डाव कशासाठी मांडायचा? असा प्रश्न केला ?
फक्त हाच प्रश्न विचारून जर माझे हितचिंतक थांबले असते तरी ठीक होते. पण,का तू हि वडिलांसारखा वेडेपणा करायचे नक्की केले आहेस ? असा प्रश्न केला. आणि या प्रश्नाने मला खरोखर अंतर्मुख केले आणि ते मी वडिलांसारखा वेडेपणा करतोय का ? या विचारलेल्या प्रश्ना मुळे नाही तर माझे वडील या जगाला समजलेच नाहीत या दुःखाने. आणि मी ठरवले कि मला समजलेले माझे बाबा या जगासमोर उलगडून दाखवलेच पाहिजेत. आणि या माझ्या अन्तः प्रेरणेला जणू ईश्वरानेच साद दिली.
माझ्या पीएच. डी. प्रबंधाचे काम अंतिम टप्यात आले होते प्रबंध पूर्तीतील अखेरचा 'सारांश ' प्रकरण अंतिम टप्यात पोहचले होते. पण माझे गाईड डॉ. कमलाकर देव त्याच्या अंतिम मसुद्याबाबत पूर्णतः समाधानी नव्हते. एक जुना संदर्भ तपासून देण्याबाबत ते आग्रही होते. मी माझे त्या बाबतचे पूर्वीचे काम शोधात होतो पण संदर्भ मिळत नव्हता.
मग एकदा सर्वच कागदपत्रांचा पसारा काढून तो संदर्भ मिळवायचाच असा निश्चय केला आणि सर्व पसारा काढला आणि तेंव्हा मला प्रबंधासाठीचा आवश्यक संदर्भ तर मिळालाच पण त्याच बरोबर हाती लागली बाबांची रोजनिशी आणि जेंव्हा ती रोजनिशी मी वाचावयास सुरवात केली तेंव्हा तिने मला पुन्हा एकदा बाबांची भेट घडवून आणली आणि ती भेट फक्त त्यांच्या आठवणी सांगणारी नव्हती तर त्या भेटीतून मला माझे बाबा फक्त भेटले नव्हे तर सापडले .
आणि म्हणूनच मी आता तुमच्यासमोर घेवून आलो आहे माझ्या बाबांची रोजनिशी. आता प्रथम मी तुम्हाला सांगतो कि हि रोजनिशी कशी आहे तर ती आहे एका मानसिक आंदोलनाची नोंद. त्यात आहे प्रवास वर्णन, त्यात आहे जीवनसंघर्ष, त्यात आहे नाते संबंधावरील भाष्य, त्यात आहे भक्ती आणि विरक्तीची कथा. नोंदींची सुरवात आहे माहे जानेवारी १९७१ पासून त्यात बरीचशी सलगता आहे ती मार्च १९७१ पर्यंत. पुढे जवळजवळ मे १९७३ पर्यंतच्या नोंदी त्यात आहेत त्याही तुटक तुटक. पण तरीही हि रोजनिशी वाचताना मला माझे बाबा माझ्याशी बोलतायत असेच वाटते.
कारण त्यातील नोंदी ह्या फक्त घटनांच्या नोंदी नसून, बरेचदा घटना आणि त्यावरील भाष्य, अशा त्या नोंदी आहेत. बर हि रोजनिशी आहे कधी सलग, कधी तूटक,अशी. जरी रोजनिशी अशी असली तरी तिची सुरवात आहे, ती त्यांच्या पुर्वीच्या स्मृतींची/ आठवणींची धांडोळा घेणारी धडपड.
खरे तर ती रोजनिशी जशी आहे तशी आपणासमोर मांडली तर? असाही विचार माझ्या मनात आला. पण वयाच्या चौदा वर्ष पर्यंत मला माहित असलेले माझे बाबा व माझ्या बाबांचे माझ्या भोवतालच्या समाजाने माझ्यासमोर उभे केलेले चित्र, यातील अंतर खऱ्या अर्था ने दूर झाले आहे ते जेंव्हा रोजनिशीतून माझ्याशी बोललेले माझे बाबा मला समजू शकले तेंव्हा.
आणि म्हणून शेवटी मी बाबांची रोजनिशी 'जशी आहे तशी' पण सलग न मांडता, रोजनिशीतील भाग व माझी भावना, माझे मत, माझा अनुभव यांची सांगड घालत त्या रोजनिशीचे वाचन आपणा समोर करावे. आता हा आगळा वेगळा प्रयोग आपणास रुचेल अशी मला आशा आहे.
( क्रमशः)
भाग दोन - http://www.maayboli.com/node/54425

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज खूप चांगले सच्च्या अनुभवांचे लेख वाचायला मिळाले त्यातील हाही एक वरच्या दर्जाचे लिखाण असलेला एक. जिथून जिथे तुम्ही पोचला आहात, त्या प्रवासासाठी आधी तुम्हाला सविनय प्रणाम.
प्रत्यक्ष आठवणी वयामुळे धूसर असताना हाती लागलेल्या रोजनिशीने तुमच्या नात्याला व समजुतीला नवीन आयाम नक्कीच दिला असेल, वाचनाच्या प्रतीक्षेत.

मूळात हे असे लिहावेसे वाटले हीच चांगली गोष्ट आहे. लिहिते व्हाच.
जितके इथे वर आले आहे, ओघवते आहे, कुठल्याही अभिनिवेशाव्यतिरिक्त अस्सल आहे, त्यामुळे वाचता वाचता स्वतःच्या आयुष्यात मागे डोकावुन बघणेही होते आहे.
जेवण न जाणे हा अनुभव मी घेतला आहे, वेगळ्या स्वरुपात.. म्हणजे एकाही पदार्थाची चवच न लागणे, खारट तिखट आंबट गोड कसलीच चव न लागणे.
>>>> या नातेवाईकांना मी जवळचे नातेवाईक अश्यासाठी म्हटले आहे कि ज्या काळी दोन वेळची चूल घरात पेटणे हि चैन होती त्याकाळी त्यांनी आम्हाला मदतीचा हात द्यावा अशी आमची न कळती अपेक्षा होती. अर्थात काहींनी मदतीचा हात दिला तर काहींनी स्वतःचे पायावर उभे राहायला शिका असे पायात बळ येण्यापुर्वीच सांगितले . <<<<<
हे अनुभव वाचताना पुनर्भुती जाणवली. पण जग हे असेच असते व ते तसे कायमस्वरुपी असते.
आताच्या वयात मी यापुढील पायरी अनुभवतोय.... म्हणजे "असतील शिते तर जमतिल भुते" या म्हणीचा उत्तरार्ध अनुभवतोय... शिते संपल्यावर माणसे "पाठ कशी फिरवतात" ते अनुभवतोय.

वडीलांच्या त्यांच्या लहानपणी ८० वर्षांपूर्वी वा आमच्या लहानपणी तीसपस्तिस वर्षांपूर्वीच्या परिस्थितीत व आजच्या परिस्थितीत काही फरक आहे असे मला वाटत नाही. बदल असेल तर तो भौतिक सोईसुविधांचा, पण मानवी मनोवृत्तीत काही फरक आहे असे कुठेही जाणवले नाही.

तुमच्या पुढील लेखनास शुभेच्छा....

छान Happy

सुरवात छान केली आहेत.
लिहायला अत्युत्तम दिवस तुम्ही निवडला आहे.
पुढच्या लिखाणाच्या प्रतीक्षेत.

khup sundar lihilay tumhi. Shabd n shabd kalajala bhidalay.
pudhacha bhaag lavkar yeu de.

दिनेश,स्वाती२, जिज्ञासा,प्रकु , मैथिली पिंगळे ,यवलि ५८,वर्षू नील, झकासराव , preetiiii , सृष्टी ,स्वीट टॉकर, राहुल १२३, निलुदा , आशिका ,आपणा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद ! मनातील भावना कागदावर उतरवायला पितृदिनाचे निमित्त .
देवकी - मागे जात दुरुस्त करू ,असे देखील शक्य नसते म्हणून अधिक खंत वाटते
limbutimbu - प्रतिसादातील मत म्हणजे, आपण तटस्थ मनोवृतीतून केलेले, वास्तव परंतु परखड निरीक्षण आहे. 'आताच्या वयात मी यापुढील पायरी अनुभवतोय.... म्हणजे "असतील शिते तर जमतिल भुते" या म्हणीचा उत्तरार्ध अनुभवतोय... शिते संपल्यावर माणसे "पाठ कशी फिरवतात" ते अनुभवतोय.' हे अगदी मनापासून पटले .
अमेय२८०८०७, पुरंदरे शशांक , - आज ज्या ठिकाणी पोहचता आले ,त्या मागे देखील आई वडिलांचे आशीर्वाद आणि आपणासारख्या , हितचिंतकांच्या शुभेच्छा हेच प्रमुख कारण आहे.

प्रस्तावना आवडली. आधी आजूबाजूची परिस्थिती इ. सांगितल्यामुळे पुढचे भाग त्या पार्श्वभूमीवर जास्त चांगले रिलेट होतील. वाचतोय.

खूप सुंदर प्रस्तावना आहे.
पुढिल भाग वाचायची उत्सुकता आहे.
तुमची 'अल्काची गोष्टं' ही मालिका सुद्धा अशीच डायरीच्या रूपात होती ना?

अतिशय सुंदर सुरवात..शब्दाशब्दाला तुमच्या भावनेला समरस होतोय.. प्रतीक्षा पुढील भागांची!

हृद्य आठवणी ... डोळे ओलावले.>>>मैथिलीस अनुमोदन. वाट बघतेय पुढील भागांची .

अमितव ,pradnya sathe ,चंबू ,भुईकमळ - आपल्या तसेच आधीच्या सर्व प्रतिक्रियांनी पुढील भाग सादर करण्याचे मनोबल वाढले . धन्यवाद !

साती - 'अल्काची गोष्ट ' हे वास्तव आणि नाट्य यांचा मिलाफ आहे . पण आताची मालिका हा खराखुरा जीवनानुभव आहे. आपले आभार !

छान झाली आहे सुरवात. लेख वाचून माझ्याही बाबांच्या आठवणी दाटून आल्या आणि मन कातर झाले.