ह्या नाचाला नंबर नाय ! (Movie Review - Any Body Can Dance - 2)

Submitted by रसप on 21 June, 2015 - 00:19

'Life is all about a second chance.'
- असं एका प्रसंगात 'विष्णू' म्हणतो. ते थोडंसं पटतं, थोडं नाही. कारण आपण असंही वाचलेलं असतं की, 'Opportunity never knocks the door twice.' पण आपण अशी अनेक विरुद्धार्थी विधानं वाचत/ ऐकत असतो आणि 'सेकंड चान्स'बाबत म्हणायचं झालं तर 'चान्स' म्हणजे नक्की कशाला म्हणायचं, हेच व्यक्तीसापेक्ष असल्याने तो काही लोकांना मिळतही असावा. तसा तो मिळाला होता मुंबईलगत असलेल्या नालासोपाऱ्यातील एका 'डान्स ग्रुप' ला. त्यांच्या त्या पहिल्या चान्सपासून, दुसऱ्या चान्सपर्यंतच्या प्रवासावर 'एनी बडी कॅन डान्स - २' बेतलेला आहे.

'मुंबई स्टनर्स' हा एक डान्स ग्रुप, देशभरात अतिशय लोकप्रिय असलेल्या एका टीव्ही रियालिटी डान्स शोच्या अंतिम फेरीत पोहोचतो. अख्ख्या देशाचं लक्ष ज्या कार्यक्रमाकडे लागलेलं असतं, त्या कार्यक्रमाच्या अंतिम फेरीत 'मुंबई स्टनर्स' बदनाम होतात. कारण त्यांचा डान्स होतो अतिशय उत्तम, मात्र तो 'फीलिपाइन्स' मधल्या एका प्रसिद्ध ग्रुपच्या एका डान्सवरून पूर्णपणे चोरलेला असतो. अगदी स्टेप-टू-स्टेप. ही चोरी चाणाक्ष परीक्षक ताबडतोब पकडतात आणि कॅमेऱ्यासमोर, लाखो लोकांच्या साक्षीने 'मुंबई स्टनर्स' ला स्पर्धेतून बाहेर तर करतातच, पण कठोर शब्दात त्यांची निर्भत्सनाही करतात. संच बाहेर पडतो. फुटतो, तुटतो, कोलमडतो. प्रत्येक सहभागी नर्तकाची त्याच्या घरी, कामाच्या ठिकाणी, लोकांमध्ये 'छी: थू' होते. 'स्टनर्स' चा मुख्य नर्तक व नृत्य दिग्दर्शक असलेल्या 'सुरु' (वरुण धवन) साठी तर एक स्वाभिमान व अस्तित्व परत मिळवण्याची लढाईच सुरु होते. ह्या बदनामीच्या बट्ट्याला पुसण्यासाठी काही तरी खूप मोठं करून दाखवायचं असतं. सेकंड चान्स असतो 'लास वेगास हिप हॉप' ह्या जागतिक खुल्या नृत्य स्पर्धेचा. विखुरलेल्या संघाला उभारण्यासाठी, नव्या बांधणीसाठी, तयारीसाठी एका चांगल्या नृत्य दिग्दर्शकाची गरज असते आणि त्यांना देवासारखा भेटतो, 'विष्णू' (प्रभूदेवा)
Y21APRL02.jpg
पुढे जे काही होतं, ते होतं. पण ते जसं कसं होतं, ते आपण 'य' वेळा आणि 'य' चित्रपटांतून पाहिलेलं आहे. त्यामुळे मध्यंतरानंतरचा चित्रपट शांतपणे झोप काढण्यासाठी आहे. 'मुंबई स्टनर्स' सेकंड चान्ससाठी खूप मेहनत करतात. पण चित्रपटकर्त्यांनी सेकंड हाफसाठी काही मेहनत केलेली नाही. इथला मालमसाला ते 'जो जीता वोही सिकंदर' पासून 'हॅप्पी न्यू इयर'पर्यंत विविध चित्रपटांतून उचलतात. मध्यंतराच्या आधी खूपच आश्वासक वाटलेली ही ABCD नंतर पुढची मुळाक्षरं गिरवतच नाही आणि सपशेल भ्रमनिरास होतो.
ह्याच्या जोडीला अतिशय फुसके संवाद आहेत. जे काही दमदार प्रसंगातलीसुद्धा हवा काढून घेतात. खच्ची झालेल्या संघाचं, सहकाऱ्यांचं मनोबल उंचावणारी कित्येक भाषणं, संभाषणं आपण आजपर्यंत पडद्यावर व प्रत्यक्ष जीवनातही ऐकली, पाहिली असतील. त्या सगळ्यांतलं सगळ्यांत फुसकं भाषण वरुण धवनच्या तोंडी ह्या चित्रपटात आहे. (ज्याची सार्थ खिल्ली नंतरच्या काही मिनिटांत त्याचाच संघसहकारी उडवतोसुद्धा !) द व्हेरी फेमस ' We dont dance to impress, we dance to express', सुद्धा काही मजा आणत नाही. मुळात हे वाक्य तद्दन फसवं वाक्य आहे. हे लोक एका स्पर्धेत भाग घेत आहेत. ती स्पर्धा जिंकण्यासाठी ते डान्स करत आहेत. अश्या वेळी ते 'इम्प्रेस' करण्यासाठीच तर डान्सत आहेत ! एक्स्प्रेस करण्याचा डान्स वरुण धवन, कॅमेऱ्यासमोर इज्जत गेल्यानंतर घरी आल्यावर करतो, तोच असतो. त्याव्यतिरिक्त सगळे डान्स हे 'इम्प्रेस' करण्यासाठीच आहेत. ही अशी टाळीबाज गोंडस वाक्यं टाकली म्हणजे काही तरी महान कलाकृती केली किंवा थोर धडा दिला, असं काही वाटत असावं बहुतेक, त्यामुळे त्यांच्या सत्यासत्यतेचा पडताळा करून पाहायची गरज लक्षातच येत नसावी.

दुसरं असं की 'असे चित्रपट नृत्याला उंच पातळीवर नेऊन ठेवतात, ते कलेला वाहिलेले आहेत', वगैरे खोटे आव आणून पाहिले व दाखवले जातात. 'एनी बडी कॅन डान्स' असं शीर्षकात कलेचं नाव घातलं की चित्रपट कलेला वाहिला जात नाही. त्यासाठी कलेच्या साध्यापेक्षा साधनेवर लक्ष केंद्रित व्हायला हवं. कुठलीही कला 'शिकली' जात नाही. ती आत्मसात करायला जन्म निघून जातो. मात्र आज, चार-दोन धडे गिरवले की कुठल्या न कुठल्या टीव्ही शोमध्ये किंवा कुठल्या न कुठल्या स्पर्धेत झळकण्याची घाई लागलेली दिसते. किंबहुना, कलेचं तेच अंतिम ध्येय आहे, असाच समज पसरत चाललेला आहे. असंच काहीसं इथे दिसतं. एका स्पर्धेत नाक कापलं गेल्यावर दुसऱ्या स्पर्धेत भाग घेऊन 'खोई इज्जत वापस लाना' हा खूपच थिल्लर विचार वाटतो. स्पर्धेत जिंकण्यासाठी जर चोरी करावीशी वाटते, तिथेच कला हरते. त्यानंतर तिला पुन्हा राजी करण्यासाठी तुम्हाला स्वत:ची सृजनशीलता वाढवायला हवी. पण आजचं राजकारण आश्वासनांच्या पुढे जात नाही आणि आजची कलोपासना स्पर्धांच्या पुढे !

वरुण धवन आणि श्रद्धा कपूर त्यांच्या मर्यादित अभिनयकौशल्याला प्रामाणिक मेहनतीची जोड देतात आणि 'सुरु' व 'विनी' चांगले साकारतात. पण त्या व्यक्तिरेखांचं लेखनच कमकुवत आहे. त्यांच्या भावनांना वाट करून देण्यासाठी त्यांना स्पर्धेच्या 'रिहर्सल्स'मधून दिग्दर्शक-लेखक डोकंच वर काढू देत नाहीत ! शाळेत बिनडोक खरडपट्टी व घोकंपट्टीचा गृहपाठच इतका द्यावा की विद्यार्थ्यांना स्वत:चं डोकं वापरायला वेळही मिळू नये अन् इच्छाही वाटू नये
आणि ते 'विद्यार्थी' न राहता 'परीक्षार्थी' बनावेत, तसंच हे लोक 'कलाकार' न बनता 'स्पर्धक'च बनतात.
नृत्याबाबत बोलायचं झाल्यास वरुण धवन खूपच सहज वाटतो. त्याने दाद देण्यालायक सादरीकरण केलं आहे. मात्र श्रद्धा कपूर विशेष 'इम्प्रेस' करत नाही. उत्तरार्धात काही काळ तिला दुखापतीमुळे नृत्य करता येत नाही असं दाखवलेलं आहे. हे पांचट नाट्यनिर्मितीसाठी असलं, तरी ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी तिला अश्या एका विश्रांतीची गरजही असावी.
प्रभूदेवाचा 'विष्णू' दाक्षिणात्य दाखवून त्याच्या असह्य हिंदी उच्चारांवर एक परस्पर उपचार केला गेला आहे. त्याला जो काही अभिनययत्न करायचा असेल, तो करायला त्याला १-२ प्रसंग दिले आहेत, त्या व्यतिरिक्त तो काही करत नाही. एकदा मस्तपैकी नाचतो. त्याच्याकडून त्यापेक्षा जास्त आपली अपेक्षाही नसतेच !

'हिप हॉप'वरचा चित्रपट आहे, त्यामुळे संगीत अत्याचारी असण्याची शक्यता मी गृहीत धरली होती. मात्र, सुखद आश्चर्याचा धक्का असा की संगीत बऱ्यापैकी जमून आलेलं आहे. 'हॅप्पी अवर', 'वंदे मातरम' आणि 'गणराया' ही गाणी बरी आहेत.

सर्वच नृत्यं सफाईदार आहेत. मला त्यांत भावनिकता औषधापुरतीच दिसली. भले त्यांनी एक्स्प्रेस-इम्प्रेसच्या कितीही बाता मारल्या तरी. वरुणचा सोलो डान्स - जो टीव्हीवर इज्जत गेल्यानंतर तो घरी आल्यावर करतो - तो थोडासा एक्स्प्रेसिव्ह वाटला. पण तरी त्यात भावनिक उद्रेक न दिसता शारीरिक उचंबळच जास्त जाणवला. ही जागा खरं तर त्याची अपराधीपणाची भावना कल्पकपणे दाखवण्यासाठी उत्तम होती, तिचा सुयोग्य वापर झाला असं वाटलं नाही.

संपूर्ण चित्रपटाचा विचार केल्यास डान्सशिवाय दुसरं काही नाही आणि तो डान्ससुद्धा 'कसरती व चित्रविचित्र अंगविक्षेप बीट-टू-बीट करणे' ह्या पठडीतला आहे. नृत्यात भावनाविष्कार किंवा चित्रपटात भावनाप्रधानता बघणारे रसिक प्रेक्षक ह्या चित्रपटाकडे जाणार नाहीतच. गेलेच, तर ते ह्या नाचाला नक्कीच 'नंबर' देणार नाहीत !

रेटिंग - * *

- रणजित पराडकर

http://www.ranjeetparadkar.com/2015/06/movie-review-any-body-can-dance-2...

हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये आज २१ जून २०१५ रोजी प्रकाशित झाले आहे :-

2162015-md-hr-6.jpg

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Gone are the days, when dance meant facial expressions too. Now it's only acrobatic ! Those dances are no more than body movements.

डी आय डी सारखे डान्स शो ज्यांना आवडतात त्यांनाच हा सिनेमा आवडेल. कारण सगळ्या सिनेमाभर तेच चालू असते. स्टोरीलाईन फारच कमकुवत आहे पण डान्सेस पण डान्स शोच्याच तोडीचे आहेत. स्टेप अपमधील डान्सेसच्या आसपास एकही डान्स पोहचत नाही.

बघणारच असाल तर शिर्षकगीत चुकवू नका. कारण तोच एक बर्‍यापैकी जमून आलेला आणि किंचीतसा वेगळा डान्स आहे.

माधव, मला इथे अनेक देशातले शोज टीव्हीवर बघायला मिळतात. बहुतेक शोजमधे तीच ती अमेरिकन स्टाईलची कॉपी केलेली असते. फक्त चायनामधले शो खुप वेगळे वाटतात. त्यांचे संगीत, कपडेपट, कोरीओग्राफी, सेट्स फार सुंदर असतात.

अमा, संध्याचा अतिनाच सोडला तर मला झनक झनक पायल बाजे पण खुप आवडला होता. तो त्या काळात हिट झाला होता भारतात.

या तर्‍हेच्या नाचापेक्षा, लोकनृत्य फारच सुंदर असतात. भारतातली तर असतातच पण मला स्वतःला जॉर्जियन, रशियन, तुर्की, इजिप्शियन वगैरे खुप आवडतात. आपल्याकडचे कुशल सिनेनर्तक हि नृत्ये करू शकतील का याबाबत मला शंका आहे !

स्टेप अप सर्व सीरीज मी पाहिलेली आहे. ऑसम डान्सेस आहेत. तरीही हिरो हिरव णीचे प्रेमबंध, त्यातील प्रसंग फार छान घेतले आहेत. उदा न्यू यॉर्क मध्ये ते एका एअर ग्रिल वर उभे आहेत व काहीतरी लांब धागे हवेत सोडतात तो प्रसंग फार स्वीट रोमँटिक आहे कथा बुलंद आहे सर्व सिनेमातली.

एबीसीडी वन पण मला बोअर झाला होता. गाणी रॉकिन्ग पाहिजेत अश्या थीमला ती नव्हती. त्यात अनेक रड गाणे आणि एक जाडा कोरीओ ग्राफर. असह्य होता तो. वरूण , रणबीअर कपूर, ह्रितिक ही सर्व हायब्रि ड
कण सा सारखी मुले आहेत. सर्व जागच्या जागी पण तो इट फॅ़कटर जाणवत नाही. साचेबंद भूमिका, सिक्स पॅक एब्ज, ग्रूमिन्ग ह्यावर किती तारून नेणार मुळात अ‍ॅक्टिंग येत नाही तर.

Now it's only acrobatic ! Those dances are no more than body movements.
>>>>>>
दिनेशदा अगदी अगदी. हे माझेही मत आहे.
We dont dance to impress, we dance to express' .. हेच वाक्य मराठीत मी या चित्रपटाच्या आधीही कित्येक वेळा बोललो असेन. मला पर्सनली डान्स बघायची खूप आवड आहे. पण हल्लीच्या डान्स कॉप्मिटीशन शो मधील कसरती नाही बघवत. त्यापेक्षा गरब्यात वा गणपती विसर्जनात कोणी भान विसरून नाचत असेल तर ते बघायला आवडते. त्यातही एखाद्याला नाचता येत नसेल तरीही नाचायची हौस दांडगी असेल तर त्याचा नाच बघायला आणखी मजा येते. मला स्वतालाही माझ्या मूडनुसारच नाचायला आवडते. कोणाचे लग्न आहे, ज्याच्याशी माझे काही घेणेदेणे सुखदुख नाही, बस लागलाय त्याच्या वरातीत डीजे तर नाचा, हे पण नाही जमत. पण तेच रोज घरी दर दुसरी गोष्ट मी डान्सस्टेपमध्येच करतो. आणि हे मूडनुसार सहज घडते.

असो,
पण या चित्रपटाचा पहिला भाग मात्र मला आवडलेला. इमोशन्स बरेपैकी होते. गाणी आणि डान्स कथेची मागणी पुर्ण करणारे होते. अभिनयाचा भार केके मेननने उचललेला. क्लायमॅक्स सुद्धा जमला होता. त्यामुळे या भागाकडूनही तश्याच अपेक्षा होत्या. बघायची इच्छाही होती. बघूया आणखी कोण काय बोलते त्यावर ठरवूया आता..

हल्लीच्या डान्स कॉप्मिटीशन शो मधील कसरती नाही बघवत. त्यापेक्षा गरब्यात वा गणपती विसर्जनात कोणी भान विसरून नाचत असेल तर ते बघायला आवडते >> एकदम अनुमोदन. या कसरतींमुळेच डीआयडी वगैरे पहाणे बंद केले. कसरती सुंदर असतात पण त्यात जान नसते, नुसतेच अचुकता दाखवत रहातात.... त्यामुळे वर परीक्षणात जे सांगायचे आहे ते कळले.

डीआयडिच्या काही डान्सर्स ची फॅन आहे आणि एबीसीडी पार्ट १ आवडला होता, त्यामुळे बघावासा वाटतोय.
पण पार्ट १ मधे खरे खुरे डान्सर्स मेन स्टारकास्ट मधे होते, यामधे वरुण धवननी डीआयडी डान्सरसच्या तोडीचे डान्सेस केले असतील तर चांगला वाटेल.

मी तसाही पाहिलाच नसता Happy

स्टेपअप मधले डान्स पाहताना तो सुरू झाल्याच्या पहिल्या मिनिटातच आपण भान हरपुन पडद्याकडे पाहायला लागतो. भारतात हिप हॉप किंवा तत्सम नावाखाली जे काय नाच करतात त्या केवळ आणि केवळ अक्रोबॅटीक हालचाली असतात. अर्थात त्या हालचाली करणा-यांना त्यासाठी खुप मेहनत घ्यावी लागत असणार, प्रश्नच नाही. मला तसल्या हालचाली कितिही मेहनत केली तरी तशा जमणार नाहीत हेही मला माहित आहे. त्यामुळे मी त्यांच्यावर टीका करणार नाही. पण गाणे सुरू झाले की पहिल्या मिनिटातच त्या हालचाली कंटाळवाण्या वाटायला लागतात आणि मग पुढची दोन-तिन मिनिटे कधी संपतात असे होउन जाते. त्यामुळे माझा तरी असले काही पाहण्यासाठी पास......

एबीसीडी १ आवडला होता. त्यामुळे बघणार होतए. पण आता नाही बघणार. आता वेटिंग फॉर बजरंगी भाईजान. Happy

Owsm.. Mast ,,, mala tari khup aavadla.. I just love it.. Dance tar Chan ahech,, comedy timing pan mast ahe prattekachi