ती

Submitted by भुईकमळ on 20 June, 2015 - 07:28

तिच्या काळजाची गाज
ऐकू येते शब्दातून
निळ्या आभाळाचा दर्द
हिंदकळे लाटांतून...

अर्थव्याकुळल्या तीरी
ओलावली रेतीलिपी
तुडवित चालू नको. ∥१∥

गर्भरेशमाचे धागे
तिने वहीत जपले
जिर्ण पिंपळाचे पान
सोनवर्खी डुंबवले .

अक्षरांचे थवे झाले
अस्तगिरी पार गेले
तिथे भूप गाऊ नको.∥२∥

तिच्या काजळी तळ्यात
रोज उरूस भरतो,
काजव्यांच्या ठिणग्यांनी
जळी पदर पेटतो.

तिचे कौमुदी लाघव
जरी भासेल पुनव
तिला चंद्र मागू नको ∥३∥…

जिथे सोडवले कधी
हिर्वे पाऊसउखाणे
तिथे घालतात हाक
आज 'सीतेची आसवे '…

जरी अटळ भुलणे
रंग झाले जीवघेणे ,
तिला दोष देऊ नको . ∥४∥

ती रे वारयाची अस्तुरी
अंगी धुम्मसे कस्तुरी
त्याची तिला जाण नाही
जशी धुकाळली दरी.

धूप होवूनिया जरी
पहाटेला आली दारी
तिला थारा देवू नको. . ∥५∥..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फार फार वेगळी रचना. या आशयावर गद्य वाचले होते, कविता वाचली नव्हती मी तरी.

कविता उद्देशून तिसऱ्यालाच आहे पण कविताभर व्यापून उरते ते तिचेच व्यक्तिमत्व. काही जखमा सरळसाध्या असतात, रक्त वाहवतात- कालांतराने बऱ्याही होतात आणि किरकोळ व्रण सोडले तर मागे खुणा ठेवत नाहीत. काही आघात मात्र त्वचेत विषारी हिरवाई पेरतात, रक्तात ते विष भिनते आणि शरीरापेक्षा वृत्ती जहरीली होऊन जाते.
भूत वर्तमानाची नाळ सोडून वेगळ्याच भविष्याकडे निघालेली ही नायिका.....तिला आपल्या सामर्थयाची जाणीवही आहे आणि दुसऱ्याच्या असहायतेचीही. कदाचित ती मुद्दामहून हे करत नसेलही पण त्या घावाची वेदना तिच्या विचारात विपरीतता पेरुन गेलीय खरी....
त्यामुळे ती वरकरणी कौमुदी, चमकदार असली तरी आतून "सीतेची आसवे" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वनस्पतिप्रमाणे परभक्षी झाली आहे.

रचनेचा फॉर्मही आवडला. चार आणि तीन ओळींचे भाग प्रत्येक कडव्यात पडतात. दुसरा भाग तीन ओळींचा असल्याने एक झटका मिळतो वाचताना....आणि तिच्याबद्दल जे सांगायचे आहे त्याची गंभीरता वाढते...असे काहीसे वाटले.

तंत्राच्या दृष्टीने कदाचित थोडे आणि श्रम घेता आले असते. यमकांचा एक ठराविक फॉर्म पूर्णपणे पाळला गेला असता तर अष्टाक्षरी लय आणखी खुलली असती......पण ही किरकोळ बाब आहे.

Heaven has no rage, like love to hatred turned,
Nor hell a fury, like a woman scorned.......

या वचनाची आठवण झाली.

अमेय,कवितेशी किती समरस होवून तुम्ही प्रतिसाद देता!तुम्ही लिहलेला प्रत्येक शब्द न
शब्द कवितेतल्या ओळींच्या आरपार अर्थाला
भिडून गहिरया रसास्वादाच्या रूपात उतरलाय.'सीतेची आसवं' त्याचा मला अपेक्षित असलेला अर्थही तुम्ही अचुक जाणलात.शेवटची विधानेही झणझणीत वैश्विक सत्य सांगणारी
कायम जतन करून ठेवावा अशा प्रतिसादासाठी खूप धन्यवाद!!!