अधिक महिना

Submitted by अमोल केळकर on 16 June, 2015 - 08:14

उद्या पासून अधिक महिना सुरु होत आहे. या संबंधी मिळालेली माहिती एकत्रित स्वरुपात देत आहे. जाण्कार यात अधिक भर घालू शकतात

अधिक मास - ( आषाढ )-
मराठी कॅलेंडरनुसार ३२ ते ३३ महिन्यांनी एकदा येणारा 'अधिक मास' येत्या बुधवारपासून सुरू होतो आहे. या वर्षी हा अधिक मास १७ जूनपासून १४ जुलैपर्यंत आहे. त्यानंतर पुन्हा नेहमीचा आषाढ सुरू होईल.
चांद्रमास ३५४ दिवसांचा, तर सौर मास हा ३६५ दिवसांचा असतो. त्यामुळे वार्षिक कालगणनेत होणारा ११ दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी दर अडीच वर्षांनंतर अधिक मास येतो. त्यालाच मलमास, पुरुषोत्तम मास, धोंडा महिना अशी नावेह आहेत. अधिक मासात आपल्या कन्येला महालक्ष्मी म्हणून पुरुषोत्तम मानलेल्या जावयाला कन्यादानाने विवाहात दिलेली असते. त्याच जावयाला महाविष्णू पुरषोत्तम स्वरूप मानून जावयाला चांदीच्या तबकात ३३ अनारसे देण्याची प्रथा आहे. दर १८ वर्षांतून एकदा आषाढ अधिक येतो. भाद्रपदामध्ये २४ वर्षांनी, तर चैत्र, ज्येष्ठ, श्रावण हे १२ वर्षांनी अधिक मास म्हणून येतात

( संदर्भ - महाराष्ट्र टाईम्स )
----------------------------------------------------------------------------------------------------------------
चैत्र, ज्येष्ठ, श्रावण हे महिने साधारणपणे 12 वर्षानी अधिक होतात. तर आषाढ महिना 18 वर्षानी भाद्रपद महिना 24 वर्षानी, अश्विन महिना एकशे एक्केचाळीस वर्षानी तर कार्तिक महिना तब्बल सातशे वर्षानी अधिकमास होतो. परंतु भाद्रपदमासापर्यंतच ‘अधिकमास’ धरला जातो. अश्विन-कार्तिक महिने अधिक झाले तरी त्यास ‘अधिकमास’ संबोधण्याची प्रथा नाही. ज्या वर्षी अश्विन महिना अधिक होतो. त्यावेळी पौष महिना क्षय होतो. अशावेळी दोन प्रहरापर्यंत मार्गशीर्ष आणि दोन प्रहरानंतर पौष मानून दोन्ही मासातील धर्मकृत्यं करावीत, असं शास्त्रात म्हटलं आहे. अशा जोडमासाला ‘संसर्प’ म्हणतात. कार्तिक महिन्याच्या पुढील चार महिने अधिकमास तसंच अश्विन महिन्यांपूर्वी क्षयमास होत नाही. तसंच मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन या चार महिन्यांना जोडून अधिकमास येत नाही. अधिकमासात दोन्ही पक्षात शुभ एकादशी येतात. शुक्ल पक्षातील एकादशीला ‘पद्मिनी’ तर वद्यपक्षातील एकाशीला ‘परमा’ असं संबोधलं जातं. अधिकमासाची देवता ‘पुरुषोत्तम’ म्हणजेच भगवान विष्णू मानली जाते. त्यांची आपल्यावर कृपादृष्टी राहावी, सत्कर्मात आपण रममाण व्हावं म्हणून त्यांच्या प्रसन्नतेसाठी पूजापाठ-धार्मिक विधी व पापक्षालनासाठी मलमासव्रत करतात. तीस+तीन (33) या संख्येने दानधर्म करतात.

या अधिकमासात दररोज उपवास, फक्त एकच वेळा भोजन किंवा मौनव्रतही पाळतात. या अधिकमासापासून आपल्या अंगच्या वाईट सवयी त्याग कराव्यात, यासाठीही विशेष संकल्प सोडण्यात येतात. या महिन्यात ‘अप्रूप’ दानाचं विशेष महत्त्व सांगितलं आहे. छिद्र असलेले पदार्थ, प्रामुख्याने अनारशांचं दान करावं, असंही सांगितलं जातं. दिव्यांचंही दान करावं. मात्र हे सर्व दान सत्पात्री असावं. अधिकमासात मृत व्यक्तीचं श्राद्ध केव्हा करावं, असा सश्रद्ध मनात प्रश्न उद्भवत असतो. ज्या महिन्यात मनुष्याचं निधन झालं असेल तोच महिना पुढील वर्षी अधिकमास आला तर प्रथम वर्षश्राद्ध त्या महिन्यातच करावं. अधिकमासात मृत्यू झाल्यास पुढीलवर्षी त्याच मासात प्रथम वर्षश्राद्ध करावं. पूर्वीच्या ज्या अधिकमासात मृत्यू झाला असेल तर तोच अधिकमास आला तर त्याचं प्रति सांवत्सरिक श्राद्ध आणि महालय त्याच अधिकमासात करावं, असा धर्मशास्त्रीय संकेत आहे. त्याचप्रमाणे अधिकमासात जन्माला आलेल्या बाळाचा जन्ममास त्या नावाचा शुद्धमास असेल तो धरतात.
हे झालं सर्व धार्मिक कर्मकांडांच्या बाबतीतील विवेचन; मात्र आता आधुनिक काळात श्रमदान, नेत्रदान, रक्तदान, देहदान करणं अधिक इष्ट विद्यादान करणं तर सर्वात संयुक्तिक ठरावं, . हिंदू सणवार व विविध व्रत-उपासना याद्वारे संस्कृतीचं मोहक दर्शन घडत असतं. त्याशिवाय हे केवळ धार्मिक कर्मकांड नसून त्यामागे वैज्ञानिक सूत्र, सामाजिक आशय आणि मुख्यत्वे नैतिकता गुंफलेली आहे. याच उद्देशाने या अधिकमासाकडे अधिक चोखंदळपणे पाहणं आवश्यक आहे.

( संदर्भ - प्रहार )
------------------------------------------------------------------------------------------------------------------

दोन अधिक मासांत जास्तीतजास्त ३५ तर कमीतकमी २७ महिन्यांचा कालावधी जातो. यापूर्वी २०१२ मध्ये भाद्रपद अधिक मास आला होता. या वर्षी आषाढ अधिक मास तर २०१८ मध्ये ज्येष्ठ, २०२० मध्ये आश्विन, २०२३ मध्ये श्रावण, २०२६ मध्ये ज्येष्ठ तर २०२९ मध्ये चैत्र अधिक मास येणार असल्याचे त्यांनी सांगितले. अधिक मासात दान देण्यास सांगितले आहे. आषाढ अधिक मास आला असताना कोकिळा व्रत करण्यास सांगितले आहे. गुरुवार, ३० जुलैपासून शनिवार, २९ ऑगस्टपर्यंत कोकिळा व्रत करावयाचे आहे. कोकीळ पक्ष्याचा आवाज ऐकून उपास सोडण्यास सांगितले आहे. गावात कोकीळ पक्षी असावा, असा त्यामागचा उद्देश असू शकतो, असे त्यांनी सांगितले.

( संदर्भ - लोकमत )
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
अधिकमासात श्रीपुरुषोत्तमप्रीत्यर्थ महिनाभर उपोषण, अयाचित भोजन, नक्तभोजन अथवा एकभुक्त रहावे. अशक्त व्यक्तीने या चार प्रकारांपैकी एक प्रकार निदान तीन दिवस अथवा एक दिवस तरी आचरणात आणावा. संपूर्ण मासात दान करणे शक्य नसेल, त्याने शुक्ल आणि कृष्ण द्वादशी, पौर्णिमा, कृष्ण अष्टमी, नवमी, चतुर्दशी, अमावास्या या तिथी आणि व्यतिपात, वैधृति या योगांवर विशेष दानधर्म करावा, असे शास्त्रात सांगितले आहे.
अ. या मासात प्रतिदिन श्री पुरुषोत्तम कृष्णाची पूजा आणि नामजप करावा. अखंड अनुसंधानात रहाण्याचा प्रयत्न करावा.
आ. प्रतिदिन एकच वेळ भोजन करावे. जेवतांना बोलू नये. त्यामुळे आत्मबळ वाढते. मौन भोजन केल्याने पापक्षालन होते.
इ. तीर्थस्नान करावे. किमान एक दिवस गंगास्नान केल्यास सर्व पापांची निवृत्ती होते.
ई. दीपदान करावे. देवापुढे अखंड दीप लावल्यास लक्ष्मीप्राप्ती होते.
उ. तीर्थयात्रा करावी. देवदर्शन करावे.
ऊ. तांबूलदान (विडा-दक्षिणा) करावे. महिनाभर तांबूलदान दिल्यास सौभाग्यप्राप्ती होते.
ए. गोपूजन करावे. गोग्रास घालावा.
ऐ. अपूपदान (अनारशांचे दान) करावे.
अधिकमासात कोणती कामे करावीत ?
अधिक मासात नित्य आणि नैमित्तिक कर्मे करावीत. जी केल्यावाचून गती नाही, अशी कर्मे करावीत. ज्वरशांती, पर्जन्येष्टी इत्यादी नेहमीची काम्यकर्मे करावीत. या मासात देवाची पुनःप्रतिष्ठा करता येते. ग्रहणश्राद्ध, जातकर्म, नामकर्म, अन्नप्राशन हे संस्कार करावेत. मन्वादि आणि युगादि संबंधित श्राद्धादि कृत्ये करावीत. तीर्थश्राद्ध, दर्शश्राद्ध आणि नित्यश्राद्ध करावे.
अधिक मासात कोणती कामे करू नयेत ?
काम्यकर्माचा आरंभ आणि समाप्ती करू नये. महादाने, अपूर्व देवदर्शन, गृहारंभ, वास्तूशांती, संन्यासग्रहण, नूतनव्रतग्रहणदीक्षा, विवाह, उपनयन, चौल, देवप्रतिष्ठा करू नये.
( संदर्भ - सनातन प्रभात )
--------------------------------------------------------------------------------------------------------------
संकलन : अमोल केळकर
www.kelkaramol.blogspot.in

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users