नटून बसलेल्या बागेचा...

Submitted by आनंदयात्री on 16 June, 2015 - 04:52

नटून बसलेल्या बागेचा सोस तेवढा नाही
शोधत आहे ज्याला मी तो इथे केवडा नाही

ठरव तुझी तू तहान आधी, पाणी नंतर शोधू!
दुरून आलेला कुठलाही मेघ कोरडा नाही

शब्द तुझा घेऊन परततो, दाद-दागिने मोठे
त्या लक्ष्मीला भुलण्याइतका अर्थ भाबडा नाही

मैफल संपत असताना तो स्वतःशीच पुटपुटला -
ह्या नावाला टाळ्यांचा अद्याप तुटवडा नाही

गर्दीमध्ये इथल्या जो तो एकाकी जगणारा
हे बघताना मिळे दिलासा, मीच एकटा नाही!

नजर जगाची नको तेवढी पार पोचते हल्ली
एकहि कपडा देहावरचा तसा तोकडा नाही

'सॉरी' म्हटल्यावर हरल्याचा फील मला ना येतो
ईगो असला मला तरीही, तुझ्याएवढा नाही!

इतका प्रवास झाल्यावर हे, आता कळले आहे -
वाट वाकडी असेल माझी, पाय वाकडा नाही

- नचिकेत जोशी
(ब्लॉगवर पूर्वप्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2015/06/blog-post.html)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शब्द तुझा घेऊन परततो, दाद-दागिने मोठे
त्या लक्ष्मीला भुलण्याइतका अर्थ भाबडा नाही

गर्दीमध्ये इथल्या जो तो एकाकी जगणारा
हे बघताना मिळे दिलासा, मीच एकटा नाही!

नजर जगाची नको तेवढी पार पोचते हल्ली
एकहि कपडा देहावरचा तसा तोकडा नाही
>>>
वाह!

मैफल संपत असताना तो स्वतःशीच पुटपुटला -
ह्या नावाला टाळ्यांचा अद्याप तुटवडा नाही
>>
हा थॉट आधी कुठे तरी वाचल्यासारखा वाटतोय Happy

वाह ..

नजर जगाची नको तेवढी पार पोचते हल्ली
एकहि कपडा देहावरचा तसा तोकडा नाही

'सॉरी' म्हटल्यावर हरल्याचा फील मला ना येतो
ईगो असला मला तरीही, तुझ्याएवढा नाही! >> बहोत आवडले Happy

धन्यवाद रीया, टीना, जयदीप, दीपक, बेफि, डॉक, वैभव...

टीना, ते दोन शेर माझेही खूप आवडते आहेत...

रीया, हम्म्म... असेल... Happy