सवस्दी खा

Submitted by बेफ़िकीर on 11 June, 2015 - 07:15

मागच्या महिन्यात थायलंड बघायला गेलो होतो. पटाया, बँकॉक व फुकेत ही तीन शहरे पाहिली. एकुण अनुभव सुखद होताच. पटाया व बँकॉकला दोघांसाठी स्वतंत्र साईट सीइंगची व्यवस्था पुण्यातील लिओनार्ड कंपनीकडून करून गेलेलो होतो. फुकेतला बायकोचा चुलतभाऊ व वहिनी १५ दिवस आधीपासूनच एक दुमजली घर घेऊन राहात होते. तेही फिरायलाच गेलेले होते. त्या चुलतभावाने आधी त्या देशात पाच वर्षे कामही केलेले होते त्यामुळे त्याने आम्हाला सर्व योग्य ते मार्गदर्शन केले. फुकेतला आम्ही त्याच्याकडेच राहिलो. एकुण आठ दिवस थायलंडमध्ये होतो. बँकॉकला जरा हेक्टिक शेड्यूल झाले पण पटाया व फुकेत येथे भरपूर आराम, खाणे-पिणे आणि फिरणे झाले. थायलंडमधील स्वच्छता, शिस्त वगैरेंनी प्रभावितही झालो. बायको आधी परदेशी जाऊन आलेली होती. मी प्रथमच देशाबाहेर गेल्यामुळे माझा चेहरा नैसर्गीक बावळट होऊन बसलेला होता. पण निरिक्षणातून काही गोष्टी जाणवल्या.

१. अशी अनेक ठिकाणे पाहिली जेथे भारतीयांना तुलनेने अपमानास्पद वागणूक दिली जात होती. इमिग्रेशन काऊंटरवरील प्रश्नांचा टोन, बँकॉकच्या बायो-के स्काय हॉटेलचा काऊंटरवरील काही स्टाफ, काही कॅबचालक, पटायाच्या एका बीचवरील बहुतांशी स्टॉल्सचे मालक, बोटीतील काही स्टाफ अश्या काही ठिकाणी युरोपिअन वगैरे लोकांना प्रचंड आदर व भारतीयांना कडवट वागणूक असे प्रकार आढळले.

२. अनेक ठक भेटतात असे जाण्याआधी अनेकांनी सांगितले होते पण सुदैवाने आम्हाला अशी काही चमत्कारीक व्यक्तीमत्त्व भेटली नाहीत.

३. भारतीयांबाबत असलेला राग भारतीयांच्याच वर्तनामुळे आहे असेही समजले. सहसा चांगल्या ठिकाणी जाऊन आल्यावर लोक प्रेक्षणीय फोटो अपलोड करतात पण मी आपल्या लोकांच्या वर्तनाचे काही फोटो अपलोड करू इच्छितो. आपले लोक विमान सुरू झाले की डबे उघडून खाऊ लागतात असेही ऐकले. हे आम्ही पाहिले नाही. मात्र येतानाच्या विमानात पलीकडे बसलेला एक भारतीय तरुण विमान टेक ऑफसाठी सज्ज होऊन सुरू झाले तरी फोनवर बोलत होता. थाई एअरवेजच्या विमानाने आम्ही बूकिंग केलेले होते. त्यातील स्टाफ त्या माणसाला एकदोनदा समजावून जागेवर जाऊन बसला. शेवटी आजूबाजूच्यांनी त्याला दटावल्यावर त्याने फोन बंद केला. जंगल सफारीदरम्यान एका सार्वजनिक ठिकाणी (रेस्टॉरंट नव्हे, तर मुसाफिरांसाठी असलेल्या डायनिंग हॉलमध्ये) इतर सर्व लोक अत्यंत शिस्तीत वागत होते व खात होते. आपले लोक रांगेतही ढकलाढकली करत होते. एकदोघांचे तर वादही झाले. आश्चर्य वाटले नाही की तेथे भारतीयांसाठी अक्षरशः वेगळे दालन ठेवलेले होते. पिंजर्‍यातील प्राण्यांकडे बघत अचकट विचकट आविर्भाव करणे, आवाज करणे वगैरे प्रकार सहज पाहायला मिळत होते. आम्ही असेही ऐकले की बीचवर आपले लोक मावा वगैरे तत्सम पदार्थ खाऊन थुंकतात म्हणून त्यांना थाई लोक हिडीस फिडीस करतात. वॉकिंग स्ट्रीट (पटाया) आणि बांग्ला स्ट्रीट (फुकेत) येथे रात्री जत्रा भरलेली असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. तेथे काही जॉईंट्सवर भारतीयांना जाऊच देत नव्हते हेही आम्ही पाहिले. सुदैवाने दोन तीनदा भारतीय रेस्टॉरंटमध्ये भारतीय जेवण मात्र इथल्याहीपेक्षा उत्तम मिळाले. अल कझार शो दरम्यान अजिबात मोबाईल व कॅमेरे ऑन करायचे नाहीत हे सहा सहा वेळा सांगूनही शो सुरू झाल्या झाल्या आपल्या लोकांनी जणू उलटा नियम असल्याप्रमाणे फोन काढून फोटो / शूटिंग सुरू केले.

४. त्या लोकांशी नीट वागले तर अतिशय चांगली मैत्री होऊ शकते व ते मदतही करतात असे अनुभवास आले.

५. एकुण देशाची इकॉनॉमी म्हणजे बायकॉनॉमी आहे. जवळपास प्रत्येक व्यवसायात बायकांचाच वावर आहे.

६. रात्री साडेबाराला फुकेतच्या एका ट्रॅफीक सिग्नलला आमचा कॅबचालक एकटाच दिड मिनिट थांबला तेव्हा अगदी भरून आले. मी मोजत होतो, आठ दिवसात मोजून दोन वेळा हॉर्न ऐकू आले आणि एकदाच एक लहानसा खड्डा अनुभवला.

मी जवळपास साडे बाराशे फोटो काढले. पण वर म्हंटल्याप्रमाणे आपल्या लोकांचे ठसे जाणवतील असे एक दोन फोटो येथे देत आहे. बाकी मुंबईला उतरून बाहेर आल्या आल्या विद्या बालन दिसली. दोन फोटो घाईघाईत काढले पण ते हलले. त्यामुळे वैताग आला.

जवळच डस्टबीन असूनही आपले लोक जराही कष्ट करत नव्हते ह्याची ही मनोहर दृश्ये:

IMG_9503.JPGIMG_9526.JPGIMG_9527.JPG

================

-'बेफिकीर'!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाकी मुंबईला उतरून बाहेर आल्या आल्या विद्या बालन दिसली. दोन फोटो घाईघाईत काढले
>> ते फोटो कुठे आहेत Happy

मी २ वर्षांपूर्वी थायलंडला गेले होते. फुकेट आणि पटाया नाही पाहिले पण बँकॉक आणि चांग-माय दोन्ही ठिकाणचा अनुभव खूपच छान होता. अर्थात भारतीयांचे असे वर्तन जगात कुठेही टूरिझम केलात तरी ठळकपणे दिसून येते ह्यात काही शंका नाही.

नियमांचे काटेखोरपणे पालन करतील तर ते भारतीय कसले.
<<
+१००

मुंबईच्या विमानतळावर, विमानाची घोषणा झाल्यावर हातातले खायचे पदार्थ तसेच, तिथे ठेवलेल्या बसण्याच्या खुर्च्यांवर टाकुन बसकडे धाव घेणारे प्रवासी अनेकदा पाहीलेत, रेल्वेस्टेशन आणि बसस्टॅंडवर तर हे नित्याचेच आहे. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवण्याचे काम फक्त सफाई कामगारांचे आहे हा समज बर्‍याच जणांचा आहे.

बेफी,

थायलंड आता फारच स्वस्त झाल्यामूळे बरेचसे भारतीय तिथे जात असतात, शिवाय व्हीसाही लागत नाही.
पण त्यांचे वर्तन खरोखरीच आक्षेपार्ह असते. मी हाँग काँगहून केथे पॅसिफीक च्या विमानाने येत होतो. ते बँकॉक ला थांबते. तिथेही असा एक ग्रुप चढला. कॅथे मधे सढळ हस्ते जेवण व पेय देतात, तरी त्यांचे एकमेकांना ओरडून ( मराठीत ) सांगणे चाललेले होते. काय तर अरे ती ( तिच्याबद्दल बरेचसे आक्षेपार्ह शब्द पण ते मराठीत ) दोन दोन हैनकैन देतेय. मागून घे, सोडू नकोस.

खुद्द थायलंड मधे तशी गरीबीच आहे. पर्यटकांशिवाय त्यांचे चालणे शक्य नाही, तरीही त्यांना उबग यावा इतके हीणकस भारतीय पर्यटक वागतात तिथे.

तूम्ही बोकिलांचा थायलंडवरचा लेख अवश्य वाचा ( समुद्रापारचे समाज, असे काहितरी पुस्तकाचे नाव आहे. )

तिथे स्वच्छता राखण्यासाठी भरपूर प्रयास केले गेलेत. त्यासाठी लोकशिक्षणावर भर होता. त्यातला मुख्य मुद्दा पर्यटकांना आकर्षित करण्याचा होता. आणि त्यावरच भारतीय पर्यटक घाला घालत असतील तर, ते का सहन करतील ?

तिथले सेक्स शोज आणि वेश्या व्यवसाय ( आणि त्याचे प्रकार ) हे पण नाईलाजाने केवळ पर्यटकांसाठीच आहेत. ( त्याबद्दलच बोकिलांनी लिहिले आहे ) पण तिथेही भारतीय अगदी हिंस्त्रपणे वागतात. अनेकदा तर हे शोज, हेच तिथे जाण्याचे मुख्य हेतू असतात.

मुंबईच्या विमानतळावर, विमानाची घोषणा झाल्यावर हातातले खायचे पदार्थ तसेच, तिथे ठेवलेल्या बसण्याच्या खुर्च्यांवर टाकुन बसकडे धाव घेणारे प्रवासी अनेकदा पाहीलेत, रेल्वेस्टेशन आणि बसस्टॅंडवर तर हे नित्याचेच आहे. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवण्याचे काम फक्त सफाई कामगारांचे आहे हा समज बर्‍याच जणांचा आहे.>>>>>> +१

सबकुछ चलता है ही भारतीय मानसिकता त्याच्याशी मुळाशी आहे. हे सफाई कर्मचारी आणि इतर कामगार काय फुकट पगार घेणार ही भावना आणि शिस्तीची नसलेली सवय ह्या गोष्टीसुध्दा कारणीभुत आहेतच. मुळात शिस्त अंगात बाणवावी लागते आणि आपल्या मुलांना सुध्दा ती लावावी लागते.

दुसर्‍याने केले मग मी केले तर काय बिघडले हा दृष्टीकोन वाईट आणि त्याज्य आहे हे ज्या दिवशी भारतीय समाजाला समजेल तो सुदिन.

प्रसाद - त्यातल्यात्यात गुजराथी लोक कुविख्यात आहेत अश्या बाबतीत, असे काही लोकांनी सांगितले.

बेफि - गुजराथी लोक इथे भारतात पण कुठे इतके सौजन्य दाखवतात?
साध ट्रेन मध्ये चढताना असो कि चालताना त्याना दुसरा (त्यांच्या समाजाचा सोडुन) माणुस आहे हेच विसरायला होत.
मागे मेट्रो च्या रांगेत पाहिले, एक गुजराथी पुरुष बिन्धास्त बायकांची रांग ओलांडुन जात होता, एक दोघिंना धक्का लागला पण त्यांनी घाईत असल्याने लक्ष नाही दिल. पण तिथे असलेल्या सुरक्षा अधिकार्याच लक्ष होत. त्याने त्याला नम्र शब्दात सांगितल कि लाईन क्रोस करताना बघ बायकांना धक्का लागतोय.
यावर त्याने अरेरावीचि भाषा वापरुन उलट ऐकवल कि तुला काय problem आहे. जर काहि झाल तर मि बघुन घेइन.

काहि फायदा नाही... हे लोक सुधरत नाहीत हा आजवरचा अनुभव.
त्यानां हाणायची ताकद असणार्यांपुढे ते लोक कधि आवाज चढ्वतच नाहित.

बेफिकीर जी - स्थळांचे वर्णन जितके चांगले केले आहे , तितकीच भारतीय लोकांची बेशिस्त दाखऊन दिली आहे .

एक प्रश्न - अंदाजे किती खर्च येतो हो फक्त थायलंड जाऊन येण्यासाठी १ आठवडा .

@ विश्या

आम्हाला दोघांना दिड लाख खर्च आला.
========================

>>>त्यानां हाणायची ताकद असणार्यांपुढे ते लोक कधि आवाज चढ्वतच नाहित.<<<

अश्यांनीच त्यांना हाणावे.

शिर्षकाचा अर्था काय आहे?

नवी मुंबईतल्या गुजराती दुकानात मराठीत संभाषण केल्यावर त्यांचे नेहमीच अति हिंस्त्र श्वापदासारखे चेहरे होतात.

सवस्दी खा - थाई स्त्रीने ग्रीट करताना म्हणणे

सवस्दी खप - थाई पुरुषाने ग्रीट करताना म्हणणे

थाई स्त्री ने/ पुरूषाने ग्रीट करताना? की थाई स्त्रीला / पुरूषाला ग्रीट करताना ?

अल्काझार शो ला फोटो/व्हिडिओ बॅन केलेत आता??

अरेरे! स्विझर्लन्डला एका ठिकाणी भारतीयानी ( पर्यटक) एक तलाव पार बाटल्या वगैरे फेकुन घाण केलाय असे मध्यन्तरी पेपरात वाचले होते, लिन्क देता येत नाही क्षमस्व! तलावात प्लॅस्टीक वगैरेचा पण कचरा केलाय.

स्वस्दी खा, हे तिथल्या स्त्री ने म्हटलेले 'Hello' आहे.
हाच शब्द, पुरुष सवस्दी खार्प असे म्हणतील.

संपादनः हात तिच्या. ऑलरेडे उत्तर देऊन झालंय. वरील प्रतिसाद रद्द समजावा.

मला थायलंड किंवा थाई लोकांबद्दल काही माहित नाही, ( थाय फूड आवडत नाही हे नक्की)

पण रांगेत घुसाघुसी करणे, कचरा डब्यात न टाकता कुठेहि फेकणे, वाट्टेल तिथे थुंकणे या गोष्टी फक्त उच्च अश्या भारतीय संस्कृती वाल्या लोकांच्यातच पाहिले आहे.

जगात निरनिराळ्या देशातल्या लोकांच्या निरनिराळ्या बर्‍या वाईट सवयी असतात, उगाच काय कुणि कुणाला बोलायचे?

तुम्ही कदाचित फक्त भारतीयांवर बारीक नजर ठेवून असाल म्हणून तुम्हाला हे असे दिसले नि ते तुम्हाला गैर वाटले. इतर देशीय लोकांमधेहि वाईट वर्तन करणारे लोक असतातच.

बाकी मुंबईला उतरून बाहेर आल्या आल्या विद्या बालन दिसली. दोन फोटो घाईघाईत काढले
>>
हे खरे भारतीय लक्षण Wink

बाकी जरा आपल्या शैलीत प्रवासवर्णनही लिहा की..

>>>हे खरे भारतीय लक्षण <<< अगदी अगदी! मलाही फोटो काढल्यावर जरा लाजच वाटली. Happy पण फोटोच हलले आणि विचित्र आले.

बेफिकीर,
लेखन आवडले. आत्मपरीक्षणाकरिता प्रत्येक भारतीयाने जरूर वाचावे असे आहे.

असो. काही लोकांना इथल्या लेखाविषयी थेट इथे लिहीण्यापेक्षा त्याची भलतीकडेच चर्चा करायला आवडते असे दिसते.

tpp.jpg

अनोळखी माणसाचे कुतूहलाने निरीक्षण करणारे लहान बाळ त्या माणसाशी थेट न बोलता आईच्या कुशीत जाऊन हळूच आईकडे त्या माणसाबद्दल बोलते असा काहीसा प्रकार वाटला मला हा.

चेतन,

तुम्ही माझ्या 'आज त्याचे नांव ज्याचे काल झाले बारसे' ह्या गझलेचा मक्ता वाचला आहेत का?

कोण माझ्यासारखा प्रख्यात होता 'बेफिकिर'
मी जिथे नाही तिथेही व्हायचे माझे हसे

Proud

नाही, मी गझला सहसा वाचत नाही पण आता तुम्ही दिलेल्या लिंकवर जाऊन वाचली. अपरोक्ष कुचाळक्या (गॉसिप) करणार्‍यांना शेवटची ओळ अगदी चपखलपणे लगावली आहे. खरंय आपल्या पाठीमागे आपल्याविषयी बरीवाईट चर्चा करणारेच आपल्याला अधिक मोठे करतात.

असो. मी हा स्क्रीनशॉट इथे लावला याचेही त्यांना कोण कौतूक! बींनी स्वतंत्र धागा काढून हे लोक त्यांच्या अपरोक्ष त्यांची निंदा करतात अशी काही काळापूर्वी तक्रार केली होती तेव्हापासून त्यांचा धागा बारकाईने वाचत असतो अन्यथा या चहापाप्यांचा पापा घ्यायची मला काय गरज पडली म्हणा?

>>>थाई स्त्री ने/ पुरूषाने ग्रीट करताना? की थाई स्त्रीला / पुरूषाला ग्रीट करताना ?<<<

थाई स्त्रीने/पुरुषाने Happy

म्हणजे हे कर्तरी (लिंग, वचना नुसार कर्त्याप्रमाणे बदलणारे) आहे तर कर्मणी (लिंग, वचना नुसार कर्माप्रमाणे बदलणारे) नव्हे.

>>> चेतन सुभाष गुगळे | 11 June, 2015 - 20:59 नवीन

म्हणजे हे कर्तरी (लिंग, वचना नुसार कर्त्याप्रमाणे बदलणारे) आहे तर कर्मणी (लिंग, वचना नुसार कर्माप्रमाणे बदलणारे) नव्हे.
<<<

होय. हाच येथील काही सदस्य आणि थायलंडमधील फरक आहे.

Pages