Hola......स्पेन!!!!---भाग १.

Submitted by पद्मावति on 9 June, 2015 - 12:14

नेमेची येतो.....दर वार्षिप्रमाणे, मुलांच्या सुट्टीत कुठे जायचे यावर घरी चर्चा सुरू झाली. नुकताच झोया अख्तर चा ZNMD तिसर्यांदा बघितला होता त्यामुळे कुठे जायचं हे लगेच ठरल्या गेलं----स्पेन!

स्पेन... अर्ध्या जगावर अधिराज्य गाजविलेलं एकेकाळचं एक बलाढ्य साम्राज्य. क्रिस्टोफर कोलमबस सारख्या अनेक खलाशांनी नवे जग शोधायला प्रस्थान ठेवले ते इथूनच. फुटबॉल, बूलफाइटस, फ्लेमिन्को नृत्य आणि पाब्लो पिकासो तसेच जगप्रसिद्ध वाइन्स आणि ऑलिव्स चा हा देश. इथे फिरायला जायची तर फारच उत्सुकता होती पण, हा देश तसा बराच पसरलेला असल्यामुळे आणि सुट्टी कमी असल्यामुळे आम्ही ठरवलंकी या वेळी या देशाच्या फक्त दक्षीण भागात फिरावं.
या दक्षीण स्पेन ला म्हणतात आंड्युलिशिया.

युरोप आणि आफ्रिका ह्या दोन खंडाना तसेच अट्लॅंटिक आणि भूमध्यासमुद्राला जोडणारा आंड्यूल्यूशिया हा भाग अतिशय निसर्गरम्यआहे. सियेरा मोरेना च्या पर्वतरांगा, कुठे राखरखीत वाळवंट तर कुठे ग्वाडॅल्क्विवियर नदीने सुजलाम् सुफलाम् झालेली हिरवागार झाडी, बारमहा स्वच्छ सूर्यप्रकाश, लांबलचक नितळ सागर किनारे आणि तिथे मिळणारा अप्रतिम सीफूड...त्यामुळे या भागात पर्यटकांची कायम वर्दळ असते.
सर्वप्रथम ग्रॅनडा या ठिकाणी आणि मग सेविला या गावी जाण्याचे ठरले.

adulucia map.jpg

एकदा कुठे जायचे हे ठरवले की मग पुढच्या गोष्टी पटापट होतात. विमानाची तिकिटे, हॉटेल्स चा बुकिंग इत्यादी प्रकार पार पडले आणि शेवटी जाण्याचा दिवस उजाडला.

सात एप्रिल ला सकाळी आम्ही मालागा च्या विमानतळावर येऊन पोहोचलो. मालागा हे स्पेन च्या किनारपट्टीवरील आतिशय लोकप्रिय बीच रिसॉर्ट आहे. वेळेच्या अभावी आम्ही मात्र तिथून लगेच टॅक्सी पकडून ग्रॅनडा कडे निघालो. मालागा ते ग्रॅनडा साधारण १.३० तासांचा रस्ता आहे. आमचा ड्राइवर अगदी हसतमुख होता मात्र त्याला इंग्रजी अजीबात समजत नव्हते म्हणून त्याच्याशी बोलायची मारामारी. आता आम्ही शांतपणे खिडकी बाहेर बघायला लागलो होतो.
बाहेर बघताना बाकी युरोप आणि स्पेन मधला फरक लगेच जाणवत होता. सर्वसाधारणतः युरोप मधे फिरताना वळणदार रस्ते, स्वच्छ निळसर तलाव, हिरवेगार डोंगर असा नजारा दिसतो. इथे मात्र सपाट कुरणे..अगदी हिरवीगार नाही, किंचित वाळलेली, दूरवर बुटक्या टेकड्या आणि त्यावर ऑलिव्स ची शेती....ऑलिव्स चे उत्पादन भरपूर.

ग्रॅनडा मधे पोहोचेपर्यंत दुपार झालेली होती. उशाशी सीएरा निवाडा डोंगर आणि पायाशी भूमध्यासागर असलेलं हे एक टुमदार गाव. या प्रदेशावर प्रथम रोमन, मग इस्लामी सुलतान आणि मग कॅथलिक अशा अनेक वेगवेगळ्या संस्कृती, धर्माच्या राजांनी आक्रमणे केली आणि आपली संस्कृती या प्रदेशात रूजवीली.
नॉर्थ आफ्रिकेतून इस्लामी टोळ्या जिब्रॉल्टर मार्गे स्पेन मधे शिरल्या आणि मग जवळजवळ पाचशे-सातशे वर्षं त्यांनी या देशात आपले बस्तान बसविले. साधारण चौदाशे नव्वद पर्यंत ही राजवट टिकून होती, मग मात्र ख्रिस्ती राज्यकर्त्यांनी त्यांचा पराभव करून त्यांना पार आफ्रिकेत हद्दपार केले.
पण अजूनही या गावात इस्लामी संस्कृतीचा प्रभाव ना चुकता जाणवतो, इथल्या भाषेमधे, इमारतींच्या अवशेषांमधे, खाद्यपदार्थांमधे आणि हो, अगदी अरेबियन नाइट्स च्या गोष्टींची आठवण येईल अशा बझारांमधे देखील.

हॉटेलात चेक इन केल्यानंतर सगळे थकून गेले होते त्यामुळे मुलांनी मस्तं ताणून दिली. संध्याकाळी गावात फेरफटका मारायला निघालो. हवेत किंचित गारवा होता तरीही एक स्वेटर पुरेसा होता.
आमचं हॉटेल ज्या भागात होतं त्या भागाला म्हणतात अल्बाइझीन. हा भाग उंच टेकडीवर असल्यामुळे अतिशय चढाईचे आणि वळणदार रस्ते. रुंदी इतकी की जेमेतेम एखादी लहानशी गाडी आत येऊ शकेल. इथे बाहेरच्या गाड्यांना तर बंदीच आहे. एकतर स्थानिकांच्या गाड्या किंवा टॅक्सी एवढीच रहदारि. रस्त्यांनी चालतांना एकदम चढाव, अचानक वळण आणि मग उतार. चालतांना आजूबाजूला नजर टाकावी तिथे लालसर पिवळ्या कौलांची घरे, हिरवीगार सूचीपर्णी झाडे, नागमोडी पण अतिशय सुबक वळणाचे रस्ते.
maayboli 1.jpgmaayboli 2.jpgmaayboli 3.jpg

आणि कुठूनही आपल्याकडे नजर खेचून घेणारा, ग्रॅनडा ची शान, त्याचा मानबिंदू ...... Al Hambra....!!....हिरव्यागार पाचूमधे जडलेला मोतीच जणू!!
maayboli 4.jpgmaayboli 5.jpgalhambra at night.jpg

हा किल्ला म्हणजे फक्त ग्रॅनडा नव्हे तर संपूर्ण स्पेनच्या प्रेक्षणीय स्थळांच्या यादी मधे फार वरच्या क्रमांकावर आहे. खरतर, या गावातच रमत गमत चालायला मजा येत होती पण फार उशीर करून आम्हाला चालणार नव्हता. रात्री लवकर झोपून सकाळी किल्ला बघायला जायची उत्सुकता होती. रात्री झोपतांना खुणावतहोता..किल्ले..Al Hambra...

यातील पहिला आणि शेवटचा फोटो अंतरजालावरून साभार घेतले आहेत...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप सुंदर लिहिलस. स्पेन अप्रतिम आहे. मलाही युरोपात स्पेन सर्वाधिक आवडले. मी फ्रान्सहून कारने बार्सिलोनाला गेलो होतो. फार सुरेख शहर! पण तिथली नाईट लाईफ म्हणजे त्यावेळी मला तो प्रकार फार भयानक वाटला होता.

सर्व प्रतिसादांचे अगदि मनापासून आभार.

बी- धन्यवाद. बार्सिलोना विषयी फार ऐकले आहे. जमेल तस तिथे जायची इच्छा आहे.
सहयगिरी- अज़ून फोटो येत्या भागात नक्की.
वर्षु नील-- फोटो मोठे करायाचा प्रयत्न करते. 500 width & 400 height आहेत हे फोटो. ६००,६०० करते जमलतर.

मस्तच.. हा पॅलेस म्हणजे माझे ड्रीम डेस्टीनेशन आहे. याच्या आतल्या भागाचे भरपूर फोटो द्या पुढच्या भागात प्लीज.

दिनेश- दुसर्या भागात फोटो टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण माझे फोटो खरोखर आलहॅमब्रा च्या सौंदर्या ला एक टक्का पण न्याय देऊ शकले नाहीएत. सॉरी.

पद्मावती, तुम्ही माझी ड्रीम ट्रीप केलीत! Andalusia आणि माद्रिदला जाणे हे माझे स्वप्न आहे सध्या! Cordoba ला गेला होतात का? जमल्यास शेवटच्या भागात थोडे ट्रीप कशी plan केली ह्याची देखील माहिती द्याल का?

अगदी नक्की टाकते शेवटच्या भागात. कॉर्डोबा ला नाही जाउ शकले मी. मुले जरा थकली होती म्हणून सेविला मधेच राहिलो.