संन्यासी

Submitted by संतोष वाटपाडे on 5 June, 2015 - 00:52

तांबडे वस्त्र नेसुनी एक संन्यासी
दारात तुझ्या मागतो कधीची भिक्षा
दे दान तुझ्या अस्थिर श्वासांचे त्याला
पाहिजे तुला जर अमरत्वाची दिक्षा...

कसलीशी चिंता त्याला बोचत आहे
पाहून व्यथेचा रंग तुझ्या भाळावर
झोळीत आणले आहे त्याने अमृत
देईल तुझ्या भाजल्या खुज्या हातावर...

ओंजळीत घेऊन अर्घ्य तुझ्या अश्रूंचे
झोपडी रिकामी दाखव त्या साधूला
डोळ्यात पाहिजे आहे त्याला तळमळ
तू शंकाची जळमटे फ़ेक बाजूला...

सुकल्या बागा शेते झाडे अश्मागत
जे आहे ते चिरकाल सोबती नाही
अस्तित्व तुला टिकवण्यास सर्व जीवांचे
लागती कराया यज्ञयागही काही..

घे हवे तेवढे वर मागुन स्वतःला
वागणे तुझे पण नको कधीच अधाशी
दे हाक नभाला आर्त मनाची आता
लेकरे तुझी निजलीत खुशाल उपाशी...

फ़ुटतील कोंब हिरवे कायेला तुझिया
तू पुर्णत्वाचा ध्यास नको ना सोडू
वार्धक्य तुला यायचे कधीही नाही
बस्स नाते निळ्या नभाशी नकोस तोडू..

-- संतोष वाटपाडे (नाशिक)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

घे हवे तेवढे वर मागुन स्वतःला
वागणे तुझे पण नको कधीच अधाशी
दे हाक नभाला आर्त मनाची आता
लेकरे तुझी निजलीत खुशाल उपाशी...

अप्रतिम…. अप्रतिम…. अप्रतिम…. अप्रतिम….