बकुळाबाय

Submitted by धनुर्धर on 3 June, 2015 - 06:09

"काय नानीआजी काय चाललय?" एका हातात मिसरीची पुढी घेऊन बकुळाबायने घरात पाऊल टाकले तसा शिकार् या कुत्रा थोडासा गुरगुरला. "बकुळे तु हायेस व्हय. एवढ्या सक्काळी काय काम काढल ग! ये हाडऽऽ" हे शेवटच 'हाड' कुत्र्याला करत नानीन बकुळबाईला विचारलं. "काय नाय जरा इस्तू हाय का चुलीत? ही मिसरी भाजायची व्हती"
"ये की बस". नानीन बसायचा पाट पुढे सरकवला आणि हातातील भाकर तव्यावर टाकली. बकुळाबायने पाट ओढला व "आय आई गऽऽ" करत पाटावर बसली.
"झाल्या का भाकरी थापून" बकुळाबाय मिसरीची पुडी सोडत म्हणाली.
"हे काय चाललंय" नानी म्हणाली.
"सखू कुठ दिसना?"
"ती व्हय! नदीवर गेलीया कपडे धुवायला." बकुळाबायने चिमट्याने गोवरीच पेटलेल एक खांड चुलीच्या बाहेर ओढलं. पुडीतली बचकाभर मिसरी त्या विस्तवार ओतली. नाकाला झिंणझिण्या आणणारा मिसरीचा वास घरभर पसरला. "सुन आल्यापासनं सुख लागलय तुम्हाला! नाय का नानीआजी?" गळ्यातल्या ठसक्याला तिथंच थांबवत आणि तिरप्या नजरेने नानीआजीकडे पाहत बकुळाबाय म्हणाली.
"कसल सुख नि कसल काय? हाये ते काम करावचं लागतयां" नानीआजी नी सुस्कारा सोडला.
"कायबी म्हणा नानी तुम्ही लय भोळ्या" नानीपुढच्या'आजी' या नामाला फाटा देऊन बकुळाबाय सलगीत आली. एव्हाना नानीआजीच्या भाकरी थापून झाल्या होत्या. चुलीवर दुध तापत ठेऊन मग दोघींनीही भाजलेली मिसरी आपल्या हातावर घेतली आणि दुसऱ्या हाताने मिसरी घासायला सुरूवात केली. "तर बोल आता काय म्हणत होतीस?" नानीआजी

न मिसरीच बोट आपल्या दातांवर घासत चर्चा पुढे चालू केली. "काय आता बोलायचं तुम्ही पडला भोळ्या! त्याचा लोक फायदा घेत्यात" बकुळाबायन चुलीतली लाकडं पुढ सारली तशी आग भडकली आणि दुधाला उकळी फुटली. "अग! असं कोड्यात काय बोलतीयांस? जरा फोडून सांग की" नानीआजी थोडं पुढे सरकत बोलली.
"आता रहावत नाय म्हणून सांगते, सखू जरा काय बायचं बोलती तुमच्याइशयी रानात"
"काय बाय म्हंजे काय म्हणाली?"
"हेच आपल आत्या लई तरास देत्यात सारखं कामाला जुंपत्यात"
बकुळाबायने बोलता बोलता एक मिसरीची पिचकारी चुलीत टाकली.
"आता मी काय काम लावती तिला? आक्रीतच म्हणायच आत्ता. घरातलच करतीया म्हणावं काय गावचं नाय करत" नानीआजी करवादली.
"नाय तर काय. आपुण काय कामं केली नाय काय? ह्या पोरींना कामाची सवयच नाय. नुसत आपल पाय वढत काम करायचं तरी ह्याच्यांच नाकाचा शेंडा वर" बकुळाबायनी तोंडातून अजून एक पिचकारी मारली आणि गप्पा पुढे चालू झाल्या. "तुम्हाला सांगते नानीआजी ती खालच्या आळीची सरूबाय लई कडक ! सुना नुसत्या चळाचळा कापत्यात तिच्यापुढं, तुमच आपल मिळमिळीत काम."
"अगं! मी पण काय कमी नाय. चांगली सुतासारखी सरळ करती का नाय बघच तु" नानीआजी दात ओठ खात म्हणाली. आता चूल ढणढण पेटली होती. दूध तापून भांड्याच्या बाहेर उतु जात होतं.
"आता बया निघते मी, तुझ्या सुन नी बघितलं तर म्हणल बरी आली भांडण लावायला. मला काय करायचंय. पण राहावत नाय म्हणून बोलले." बकुळाबाय निघता निघता म्हणाली. "थांब की वाईच चा ठेवते"
"चा नको आत्ता. रानात जायचयं." असे म्हणत बकुळाबाय तिथून निघाली.
थोड्या वेळाने बकुळाबाय शेताकडे निघाली होती. डोक्यावर जेवणाचा डबा व एका हातात खुरपे घेऊन पुढे चालणारी सखु तिला दिसली. बकुळाबायने लगेच तिला आवाज दिला, "ये सखुऽऽ वाईच थांब की, येऊ दे की " असे म्हणत बकुळाबायने तिला गाठले. "काय करतीया रानात?" बकुळाबायने चालता चालता विचारले. "करायचं काय तरी." सखुने निरूत्साह दाखवला. "आसं काय बोलतीया? काय आजारी बिजारी हायेस काय?" बकुळाबायने जवळीक निर्माण केली. "नानीआजी काय बोलली का काय? सकाळी लय बडबड करीत हुती"
सखुने कान टवकारले. "काय म्हणत होत्या आत्त्या"
"नेमीचीच पीर पीर! सखु हे करत नाय, ते करत नाय, सांगितलेल आयकत नाय" डोक्यावरची पाटी सावरत बकुळाबाय बोलली.
"आवो आत्ता किती करायचं? रानातबी खपते, घरीबी खपते, परत गुरढोर हायेच उरावरती! आता काय मरायच का माणंसान?" सखु काकुळतीला येऊन म्हणाली.
"अगं मला काय माहीत नाय काय? ती म्हातारी पहिल्या पासूनच आशीच भुणभुणी हाये, पण तु का तोंडाला कुलूप घालून बसतीस? "
"म्हंजे काय कराव म्हणतां"
"अगं ती रंजी! तुमची लग्न एकाच टायमाला झाली ना? पण थाक लागून देत नाय सासूचा, नाय तर तु! बसतीस आपली मुळू मुळू रडत!" बकुळाबायने तिला धीर? दिला.
"नाय आता मी पण गप्प नाय बसणार! लय आयकून घेतल आत्तापर्यंत पण आता नाय आयकणार" सखुन निश्चय केला.
"आत्ता कसं! आस आसाव माणसांन, बर निघते मी." अस म्हणत बकुळाबायने काढता पाय घेतला.
दुसऱ्या दिवशी सकाळी सहजच म्हणून बकुळाबाय नानीआज्जीच्या घराकड चक्कर मारायला आली तसे तिला घरातून भांडण्याचे, शिव्यांचे , ओरडण्याचे, रडण्याचे आवाज येत होते. तिने सहजच आत डोकावून बघितले तर एका कोपऱ्यात सखु स्फुंदत बसली होती. दुसऱ्या कोपऱ्यात नानीआजी डोळे पुसत होती आणि मधोमध तिचा मुलगा म्हणजे सखुचा नवरा डोक्याला दोन्ही हात लावून बसला होता. मग बकुळाबाय तिथं थांबली नाही पुढेच सीताबाईच घर होतं. बकुळाबायने बाहेरूनच आवाज दिला, "कोण हाय का घरात? जरा मिसरीला इस्तू पाहिजे व्हता"

. . . . . . धनंजय . . . . . . . .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप छान लेखनशैली....आवडली कथा.... फक्त भाषेच्या बाबतीत तुम्ही तडजोड केलीत काही ठिकाणी.....अस्सल गावरान भाषाच हवी होती असे वाटून गेले.....

प्रतिसादाबद्दल आपल्या सर्वांचे आभार . .
वाढत्या शहरीकरणामुळे व टीव्ही मुळे ग्रामीण भाषेवरही शहरी भाषेचे संस्कार होत आहेत. त्यामुळे अशी भाषा वापरली आहे.

वास्तविकता दाखवणार लेखन; अशावेळी आपल्या माणसांवर विश्वास हवा.

या कथेचा विनोदी लेखनात समावेश करण्याचा हेतू मात्र लक्षात नाही आला.