"गलतीसे मिश्टेक"

Submitted by अमेय२८०८०७ on 2 June, 2015 - 12:46

अपरिग्रहाचा पुरस्कर्ता असल्याने 'एटीएम'मध्ये जाणे मला जिकीरीचे वाटते त्यामुळे कधीकधी बाका प्रसंग उद्भवतो. हपीसातून येताना शान से कलिंगड आणि बाकी सटरफटर भाजी घेतली तर खिसा हलका. आमचा भाजीवाला जागतिक विनिमयाला टांग मारणारा असल्याने (आणि आमची मंडई पाली हिल, केंप्स कॉर्नर किंवा बेव्हरली हिल्स वगैरे भागातील नसल्याने) क्रेडिट कार्ड चालण्याचा प्रश्नच नव्हता. नेपाळ-भारत सीमेवर भुरटे स्मगलर पोलिसांनी पकडल्यावर करतात तसे सर्व खिसे उलटेपालटे केले, कारचे छुपे कप्पे चाचपले आणि कशीबशी बिलाची सोय झाली. 89 रुपयांसाठी वीसच्या दोन, दहाच्या चार, पाचचे एक आणि रुपयाची चार नाणी असा खजिना ओतावा लागला.

भाजीचे भागले तरी अजून एका कामासाठी पैसे हवेच होते. नाईलाजाने एटीएमकडे वळलो. आत एक सूटबूटवाला यंत्राशी झटापट करत होता. हे एटीएम लय बेरकी आहे. संसदेच्या अधिवेशनात जसे पहिले साडेचौतीस दिवस केवळ दुखवटा, शिवीगाळ, मारामारी, आरोपबाजी असे करमणुकीचे कार्यक्रम होतात आणि राहिलेल्या अर्ध्या दिवसात घाईघाईने विधेयके आवाजी मतदानाने मंजूर केली जातात, तसेच आमच्या मशीनचे आहे. सर्व आज्ञा, तिळातिळा परवलीचा शब्द वगैरे सांगून झाल्यावर पाच मिनिटांनी आमचे यंत्रसेन घुर्र घुर्र करायला लागतात. त्यापुढे मिनिटाने दौलत बाहेर पडते. नेहेमीची माणसे या 'इंटरीम' वेळेचा सदुपयोग कपालभाती-प्राणायाम, जागतिक मंदीवर चिंतन, राजकीय विश्लेषण, कान कोरणे, काचेत बघत भांग पाडणे (मला हे सुख नाही!), इन-शर्ट अपटूडेट करणे अशा विधायक कार्यासाठी करतात. आतला गडी अस्वस्थ झाला होता, मशीनला शिव्या देत होता यावरून तो एरियाबाहेरचा आहे, हे मी लगेच अभिजात चाणाक्षतेने ओळखले.

मीही दार उघडून आत जाऊ लागलो. मला बघून मात्र साहेब एकदम खवळलेच. खबरदार जर टाच मारुनी…. च्या आवेशात मला आडवे येत म्हणाले," हे डोन्चू सी आयाम युजिंग धीस मशीन, ऑ ? कान्ट यु वेट? व्हाट्स द हरी?". इंग्रजी अंमळ पक्के असल्याने या सगळ्याचा अर्थ कळायला जरा वेळ लागला पण मी हसून त्याला ठीक आहे अशा अर्थाची खूण करून आत जाऊ लागलो. आता मात्र त्यो एकदम तांडवमुद्रेतच आला. शाळेत कुठल्यातरी धड्यात आपल्या 'बा'च्या रागाचे वर्णन लेखकाने, "बाला करंट आला होता", असे केले होते. त्याचा अर्थ आज कळला. हा खरेच चारशेचाळीस झटका बसल्यासारखा आणि पु. शि. रेग्यांच्या 'सावित्री'मधल्या फेमस मोरासारखा एकेक पाय (आळीपाळीने) उचलून नाचत होता.

दिवसभराच्या कामाने मीही दमलो होतो. करायचेच तर भांडण सहज करता येण्यासारखे होते. एरिया आपला होता. बाहेरचा आतापावेतो सुषुम्नावस्थेत असणारा शिकुरीटी सैनिकही जागा होऊन माझ्याकडे अपेक्षेने बघत होता, कारण आम्हाला दोघांनाही त्या नवख्याचा घोळ लक्षात आला होता. मोठ्या प्रयासाने 'अरुण गोविलला' आठवत मी तसेच मंदस्मित चेहऱ्यावर आणले. सभ्यतेने पण ठामपणे त्याचा हात धरला आणि त्याच्या मशीनसमोरच्या पार्टिशनमागे घेऊन गेलो. आमच्या एटीएमच्या आर्किटेक्टची मागची पिढी धारावीशी संबंधित असावी कारण जिथे एक मावणार नाही तिथे पठ्ठ्याने दोन मशीन्स 'पाठपोट' फिट करून दाखवली आहेत. मधल्या भिंतीमुळे अनेकांना मागचे 'गुप्त मशीन' दिसतच नाही.

दुसरे मशीन दिसल्यावर साहेबाचा राग आणि फडफडणारा टाय दुखवट्यातल्या सरकारी झेंड्यासारखा अर्ध्यावर आला, चेहरा पडला. "ओह्ह आयाम सो सॉरी, डिडन्ट नो, गॉश…सो सिली ऑफ मी", वगैरे पुटपुटत तो कसाबसा एटीएम बाहेर पळाला. शिकुरीटीवाल्याला आता मी व्हरायटी म्हणून 'नितीश भारद्वाजछाप' स्माईल दिले आणि तोही पुन्हा सुप्तावस्थेत जायची तयारी करू लागला.

होतं असं कधी कधी. कुठले तरी दुसरे विचार असतात माणसाच्या मनात आणि कुठेतरी राग काढला जातो. माझे काम आवरून मी पार्किंगकडे आलो तर तोच माणूस बाईक सांभाळत फोनवर कुणाशीतरी तावातावाने बोलत होता. कदाचित बॉसची कटकट असेल किंवा (आजचा दिवस पाहिला…तर) त्याच्या सावित्रीची 'वटवट' असेल.
समथिंग वॉज बगिंग हिम फॉर शुअर, दॅट्स व्हॉट आय डिड्यूस्ड फ्रॉम द होल अफ़ेअर, आयाम ध ठेलिंग यू फोक्स!!

-- अमेय

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहिलेय Happy

फार जुनी गोष्ट आहे. मी एकदा कुठल्याश्या अनोख्या एटीएम मध्ये गेलेलो, बहुतेक कांदिवली की बोरीवलीचे होते. काय कसे वापरायचे काही कळेनासे झालेले. बाहेर माणसे जमू लागलेली, त्या माणसांचा वाढता गोंधळ बघून मी आणखी गोंधळून जात होतो. माझ्यासाठीही तो नवीन एरीया होता. जर इथून हात हलवत गेलो तर आणखी पुढे काय कुठे सोय होईल काही कल्पना नव्हती. त्यामुळे किल्ला लढवायचाच होता. पण शेवटी बराच वेळ झाल्याने वैतागून बाहेरचे रखवालदार मामा आत आले, किंवा बाहेरच्यांनी त्यांना पाठवले असावे. माझ्या डब्बल वयाचे आणि अशुद्ध बोली, पण त्या एटीएम दुकानाचे सर्वेसर्वा असल्याने त्यांना सगळी माहिती होती. त्यांनी मला मदत केली आणि एकदाचे पैसे निघाले. पण त्यानंतर मी त्यांना धन्यवाद बोलायच्या आधीच त्यांनी माझी इज्जत काढली. माझ्याकडे तुच्छतेने बघत म्हणाले, नवीन आहात का मुंबईमध्ये?? .. एकतर मी स्वत: प्रॉपर मुंबईचा, त्यांचेच एटीएम मुंबई उपनगरातले, त्यातही त्यांची बोलीभाषा पाहता ते परवाच गावाकडून आलेले वाटत होते, पण मुद्दामहून एका तरण्याबांड पोराची खेचायला मिळतेय चान्स सोडू नका असा अ‍ॅटीट्यूड.. असो, वाद घालायच्या मनस्थितीत वा परिस्थितीत नव्हतो, कारण वाढलाच असता वाद तर बाहेर खोळंबलेल्यांनी मलाच धरून बुकलला असता. मात्र तेव्हापासून एटीएम म्हटले की एक न्यूनगंडच आलाय, आणि पहिल्याच खेपेत जेव्हा पैसे निघत नाहीत, वर बाहेरही रांग असते तेव्हा एसीतही* घाम फुटतो.
(* १० पैकी ८ मध्ये हा नसतोच वा असूनही नसल्यासारखाच असतो)

:))

खुप दिवसांनी हसून मुरकुंडी वळली.. Lol
एका साध्याशा रोजच्या घटनेवर इतकं खुसखुशीत काहीतरी लिहिणं म्हणजे कमाल आहे! अनेक पंचेस जबरदस्त भावखाऊ आहेत, चौकार-षटकारांना खुशीनं मनमोकळी दाद दिली गेली..

किप्पीटप बॉस Happy

मस्त Happy

मला तसं पुर्वी कार्ड स्वाईप करता यायचं नाही.
मी कितीही जोरजोरात घासलं तरी मेलं स्वाईप व्हायचंच नाही.
एसबीआयच्या ग्रीन काऊंटरला तर मी हमखास कार्ड घासत बसायचे.
त्या अल्लादिनने पण दिवा इतका घासला नसेल जिनीसाठी. Lol

खुसखुशीत लेख! Rofl
ग्रेट आहेस तु! पन्चेस भारीच!

काही ठिकाणी कार्ड आत टाकल की मशिनच्या पोटात गुडुप होत. ते बाहेर येत नाही तोपर्यन्त जीव थार्‍यावर नसतो माझा. त्यामुळे एटीएम मशिन फक्त कॅश विड्रॉवल साठी. बाकी ब्यालन्स चेक, पासवर्ड चेन्ज...ई ई उद्योग करतच नाही मी. Biggrin

Pages