अधिवेशनामागचे चेहरे : श्री. संजीव कुवाडेकर

Submitted by वैभव on 1 June, 2015 - 13:05

बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या २०१५च्या अधिवेशनाचे खजीनदार आणि सहसंयोजक असणार्‍या, श्री. संजीव कुवाडेकर यांच्याशी नुकताच संवाद साधायची संधी मिळाली.
SanjeevK.png1. लॉस एंजिलीसमध्ये कधीपासून रहात आहात? तिथल्या मराठी समाजात कधी पासून काम करत आहात?
मी लॉस एंजिलीसमध्ये १९८८ सालापासून रहतो. १९८९, १९९० मध्ये मी लॉस एंजिलीसमधल्या महाराष्ट्र मंडळाचा सक्रीय स्वयंसेवक होतो. त्यानंतर बरीच वर्षे उत्तर लॉस एंजिलीसमधील मराठी समाजासाठी - विशेषत: लहान मुलांसाठी आणि युवा पीढीसाठी - मराठी सण साजरे करणे, सांस्कृतिक कार्यक्रम करणे, गणेशोत्सव आयोजीत करणे, मराठी तरुणांना ऊद्योजक होण्यासाठी मार्गदर्शन करणे असे उपक्रम चालू करण्यात पुढाकार घेतला. २०१३ मध्ये लॉस एंजिलीसमधल्या महाराष्ट्र मंडळात खजिनदार या पदावरसुद्धा काम केले.

2. अधिवेशनाशी आपला संबंध कसा आला?
२०१३ मध्ये लॉस एंजिलीसमधल्या महाराष्ट्र मंडळाच्या कार्यकारी समितीवर असताना आमच्या अध्यक्षांनी (श्री शैलेश शेट्ये) २०१५ मध्ये अधिवेशन लॉस एंजिलीसमध्ये करण्याचा प्रस्ताव समितीपुढे मांडला. १९९१ नंतर २४ वर्षांनी लॉस एंजिलीसमध्ये अधिवेशन करण्याची कल्पना आम्हा सर्वांनाच आवडली. गेल्या १५ वर्षात अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर अधिवेशन न झाल्यामुळे, तेथे स्थायिक झालेल्या नव्या पिढीला अधिवेशनात सहभागी करून घेण्यासाठी हि सुवर्णसंधी होती. अधिवेशनासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत फारच कमी होती परंतु अधिवेशन लॉस एंजिलीसमध्ये करायचेच या वेडाने झपाटून आमच्या समितीने रात्रंदिवस काम करून ५ दिवसात अर्ज तयार केला. अधिवेशन मंजूर झाल्यानंतर मी अधिवेशन समितीवर सह-संयोजक आणि खजिनदार या पदांवर काम करण्यासाठी सामील झालों.

3. अधिवेशनाच्या बाहेर खाजगी आयुष्यात आपण काय करता?
मी स्वत: उद्योजक (Serial Entreprenuer) आहे. त्यासाठी २००३ मध्ये दक्षिण कॅलिफोर्नियामधील सॉफ्टवेअर परिषदेने मला Entrepreneur of the Year पारितोषीक दिले होते. Microsoft मध्ये १० वर्षे Executive पदावर काम केल्यानंतर मी Speech Recognition सॉफ्टवेअर कंपनी चालू केली आणि ६ वर्षात ती बहुराष्ट्रीय करून विकली. सध्या मी माझ्या नवीन व्हेंचरवर काम करत आहे.

4. अधिवेशनामध्ये आपलं कार्यक्षेत्र कोणतं?
कोणतेही अधिवेशन यशस्वी होण्यासाठी अर्थसंकल्प व्यवस्थित असावा लागतो. या अधिवेशनात २२ समित्यांवर २०० स्वयंसेवक काम करीत आहेत आणि सुमारे ७५ कलाकार भारतातून येणार आहेत. या सर्वाना लागणाऱ्या पैशाचे व्यवस्थापन ही जबाबदारी खजिनदार म्हणून माझ्याकडे आहे. अधिवेशनात सर्व खर्च नोंदणी शुल्कामधून येणाऱ्या रकमेतून होत नाही. तेवढाच निधी वैयक्तिक आणि कॉर्पोरेट देणग्यामधून उभा करावा लागतो. ही सुध्धा महत्वाची जबाबदारी माझ्याकडे आहे. त्याव्यतिरिक्त नोंदणी समिती, IT, व्यवसाय चर्चासत्र आणि ‘ला सिनेमा’ या समित्या माझ्या कार्यक्षेत्रात येतात.

5. बिझनेस सेमिनार विषयी थोडं सांगाल का?
मराठी माणूस व्यवसायात पडण्यास तयार नसतो हे सर्वश्रुत आहे. त्यामुळेच मराठी समाज इतर प्रान्तियांपेक्षा जास्त उच्चशिक्षित असूनही आर्थिकदृष्ट्या मागे पडत आहे. मराठी माणसाला व्यवसाय करण्यास प्रेरित करणे आणि त्यासाठी लागणाऱ्या Support System ची पायाभरणी करणे हा या अधिवेशनतील व्यवसाय चर्चासत्राचा (Business Seminar) उद्देश आहे. यासाठी आम्ही या चर्चासत्रात मध्ये आघाडीचे व्हेंचर कॅपिटलिस्ट , एंजल इन्वेस्टर आणि अमेरिकेतील यशस्वी मराठी उद्योजगांचा समावेश केला आहे. यामध्ये उद्योगधंद्याला लागणारे भांडवल कसे उभारावे, एखादी सोपी कल्पना घेऊन त्याच्यापासून शून्यातून कंपनी चालू करून ती यशस्वी कशी करावी यासारख्या अनेक विषयांवर सर्वांना तज्ञाकडून उपयुक्त माहिती व मार्गदर्शन मिळेल. त्याचबरोबर कोणालाही एखादी कंपनी चालू करण्याची इच्छा असेल पण बिझनेस प्लॅन कसा लिहावा किंवा भांडवल (funding) कसे उभे करावे याचा प्रश्न असेल तर त्यांना या चर्चासत्रामध्ये "Pitch It Up" स्पर्धेत भाग घेऊन आपला बिझनेस प्लॅन नामांकित गुंतवणूकदारांसमोर (investors) समोर सादर करण्याची संधी मिळेल.मराठी विद्यार्थ्यानाही या चर्चासत्राचा लाभ घेता यावा यासाठी आम्ही त्यांच्यासाठी या चर्चासत्राचे शुल्क केवळ १० डॉलर ठेवले आहे.

नेतृत्व हे व्यवसायात तर लागतेच पण करिअर किवा वैयक्तिक आयुष्यातसुद्धा नेतृत्वाचा फार उपयोग होतो. याचसाठी आम्ही भारतातील सुप्रसिद्ध व्यवस्थापन सल्लागार अनिता आणि हर्षा भोगले यांचे नेतृत्व (Leadership ) या विषयावरही व्याख्यान आयोजित केले आहे.

6. लॉस एंजिलीस हे चित्रपट उद्योगासाठी प्रसिद्द आहे. चित्रपट उद्योगाशी संबंधीत या अधिवेशनात काय करत आहात?
लॉस एंजिलीस म्हटले हॉलीवूड डोळ्यासमोर उभे राहते. आजकाल हिंदी चित्रपटसृष्टीतील बरेच चेहेरे हॉलीवूडमध्ये दिसतात पण मराठी चित्रपटसृष्टीला अजून तशी संधी मिळाली नाही आहे. त्यामुळे हॉलीवूड आणि मराठी चित्रपटसृष्टी यांना एका मंचावर आणून त्यांच्यामध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण सुरु करण्यास हातभार लावावा अशी कल्पना बृहन महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष सुनील सूर्यवंशी यांनी मांडली. त्यातून प्रेरणा घेऊन आम्ही या वर्षी एक चित्रपटउद्योगावर केंद्रित अशा नवीन चर्चासत्राचे आयोजन केले आहे - ‘ला सिनेमा’. या चर्चासत्रात चित्रपटउद्योगाच्या सर्व अंगावरती (निर्मिती, वितरण, दिग्दर्शन, छायाचित्रण, अभिनय, संपादन) यावरती वेगवगेळी चर्चा होईल. या चर्चासत्रात मराठी चित्रपतातील दिग्गज जब्बार पटेल, मोहन आगाशे तसेच हॉलीवूडमधिल ऑस्कर अवार्ड विजेते जेफ्री ब्राउन याचा समावेश असेल.

या चर्चासत्रात हौशी आणि व्यावसायिक चित्रपटकलाकारांना, तंत्रज्ञांना आणि निर्मात्यांना सिनेसृष्टीतील दिग्गजांकडून बरीच मौल्यवान महिती मिळेल. या चर्चासत्रानंतर हॉलीवूड आणि मराठी चित्रपट उद्योगात सहयोग निर्माण होईल हि आमची खात्री आहे. चित्रपटात स्वारस्य असलेल्या मराठी विद्यार्थ्याना या चर्चासत्राचाचा लाभ घेता यावा यासाठी आम्ही विद्यार्थ्यांसाठी या चर्चासत्राचे शुल्क केवळ १० डॉलर ठेवले आहे. तसेच ज्या लोकांनी अधिवेशनाची नोंदणी केलेली नाही अशांनाही बिझनेस सेमिनार आणि ला सिनेमा मध्ये भाग घेता येणार आहे.

7. अधिवेशासाठी आवश्यक निधी जमला आहे का?
या अधिवेशनात आम्हाला उत्तर अमेरिकेतील वैयक्तिक देणगीदरांचा आणि भारतातील प्रायोजकांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे, आम्ही भारतातील आणि उत्तर अमेरिकेतील दर्जेदार कार्यक्रम आणू शकलो. या सर्व देणगीदारांचे आणि प्रायोजकांचे आभार जेवढे मानावेत तेवढे कमी आहेत. अधिवेशनाची नोंदणीही चांगली होत आहे. अधिवेशनाला आता जेमतेम एक महीना बाकी आहे. मायबोलीच्या वाचकांना मी या अधिवेशनाला यायचे खास निमंत्रण देतो. आपण अजूनही नोंदणी केली नसेत तर कृपया २१ जूनच्या आधी अधिवेशनाच्या www.bmm2015.org या वेबसाइटवर जाऊन नोंदणी करावी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान ओळख....... ही लेखमाला मस्तच सुरू आहे. अशा सर्व लोकांच्या प्रयत्नांमुळे अधिवेशन चांगलेच यशस्वी होणार यात शंकाच नाही.

संजीव कुवाडेकर यांची ही मुलाखत वाचताना खूपच मस्त वाटलं याचं कारण अगदी व्यक्तिगत आहे . माझे वडील विश्वनाथ बिर्जे व संजीव कुवाडेकर यांचे वडील कुवाडेकर सर हे दोघेही राजा राममोहन रॉय इंग्लिश स्कूल गिरगाव मुंबई येथे सह- अध्यापक होते व एकमेकांचे चांगले मित्रही होते .संजीव एक वर्ष पुढे असल्याने कुवाडेकर सर मला संजीव यांची अभ्यासाची विशेष पुस्तके आणून देत असत. (संजीव यांना हे माहितीही नसेल , ते दादरच्या बालमोहन शाळेत होते) ते सर्व आज हे वाचताना आठवले. संजीव तेव्हाही स्कॉलर होतेच व आजही त्यांची सर्वक्षेत्रीय प्रगती अभिनंदनीय आहे .
अधिवेशनास व संजीव कुवाडेकर यांना सर्व शुभेच्छा !