राजम्माची सावित्री

Submitted by भारती.. on 30 May, 2015 - 11:42

राजम्माची सावित्री

ही सावित्री सतत मनाच्या मागे राहिली आहे, सावल्यांमध्ये विसावून.मग सामावून गेली आहे समजुतीमध्ये.

काल एका मैत्रिणीने जेव्हा विचारलं , काय आहे एवढं विशेष या पुस्तकात ? मग लिहावंच लागलं.तिच्यासाठी तितकंच माझ्यासाठीही , पुन्हा भेट घेऊ या लहान जिवाच्या पण मोठ्या आकर्षणकक्षेच्या पत्रकथेची.सावकाश रवंथ करत.

तेव्हा लक्षात आलं,सांगणं इतकं सोपं नाही. आपण त्याचा विचार करणं नेहमीच टाळलं आहे .त्यावरचे प्रचूर विचार ओझरते वाचनात आले होते तशीच टीकाही. ती टीकाच आठवणीत राहिली अंधुकपणे. कुणीतरी चिडून लिहिलं होतं, कोण आहेत हे लोक ? कसली ही पात्रयोजना ? कसला संघर्ष आहे या संहितेत ? काय म्हणायचं आहे ? पत्र्यावर एंबॉसिंग करावं तशी आहे ही शोभायात्रा .

हा आवेश स्तिमित करून गेला. प्रतिवाद करता नाही आला. एरवीही सावित्री वादापासून अगदीच दूर राहणारी .आत्मसंवादिनी. ती आणखीनच सावल्यांमध्ये मिसळून गेली .पण सोबत चालत राहिली. ते लहानसं पुठ्ठा निसटलेलं पुस्तक नवं आणावंसं वाटलं नाही. उलटून गेलेल्या तारुण्यासारखं ते वाटलं , किंवा आयुष्याच्या किमतीवर मिळालेल्या शहाणपणासारखं प्राचीन. पु.शि.रेगेंचं अनेकस्तरी लेखन हे असंच आहे. ते सगळंच्या सगळं अनेकांना आवडेल,समजेल,पचेल असं म्हणता येत नाही. तरीही सावित्री हा मराठी साहित्यातला एक मास्टरपीस , रेगेंच्या लेखनातलं एक पहाटस्वप्न ,जे त्यांच्या साहित्याच्या आणि आपल्या जगण्याच्या दिवसभरात झळकत राहिलं, खरेपणाच्या कसोटीवर उतरत राहिलं .

सावित्री हा एकोणचाळीस पत्रांचा संच.एका तरुण आणि कविमनाच्या स्त्रीने एका समवयीन आणि विद्वान जिवलग सुहृदाला लिहिलेली ही पत्रं. जे लिहायचं ते न लिहिता त्याचा परिसर पत्रात उतरवत राहायचा तो काळ आहे. पत्र हे माध्यमच मोह घालणारं आहे. निवेदनाचा एक उबदार प्रवाह वाहत राहतो. त्यात घटना असतात , बऱ्याचशा तात्कालिक. वाचक त्यात डुंबताना,काठाकाठाने फिरताना अपेक्षा करत राहतो प्रवाहाने निश्चित वळणं घ्यावीत, प्रवासाला कथानकाचा डौल यावा. तो येतोही. पण प्रत्यक्षातलं कथानक अगदीच अनपेक्षित असतं .पात्रांइतकाच वाचकही अलिप्त होत जातो या अनियंत्रित घटनाक्रमात .मग मुळातच स्वाधीन नसलेल्या आयुष्याचं स्वत:च नियंता व्हायचं असतं ही समज अगदी खोल कुठेतरी पाझरू लागते.

तर सावित्रीच्या पत्रांचा चार महिन्यांत पाठवलेल्या एकवीस पत्रांचा पहिला संच .स्थळ तिरूपेट , कुर्ग, वर्ष एप्रिल – जुलै १९३९. हा.या नात्याचा पहिला टप्पा. निवेदिका तीच, नायिका तीच. तिचा धीट तरीही निरागस स्त्रीभाव पत्रात उतरवत जाणं पु.शि. रेगेंच्याइतकं एखाद्या लेखिकेलाही जमलं असतं का हे जाणवून आश्चर्य वाटतं.

पत्रांना संबोधन नाही. प्रिय आदरणीय सप्रेम सस्नेह लोभ असावा तुमची आपली वगैरे शब्द नाहीत. पत्राचे म्हणून मानले गेलेले शिष्टाचार नाहीत.पत्र हा शब्दही नाही. ‘’मी तुम्हाला लिहिलं’’ बस्स. तुम्ही म्हणजे कोण? ते कधीच कुठेच आलेलं नाही.

पत्र जणू सावित्रीच्या मनोभावांचा एक तुकडा आहे. म्हणूनच उपचार नाहीत.जे घडतं आहे ते तिच्या आत अगदी आत आहे. त्याचा एक निसटता उच्चार म्हणजे पत्र.

‘’काही ओळखदेख नसताना मी तुम्हाला लिहिलं आणि तितक्याच अधिरेपणानं तुम्ही मला साथ दिलीत .’’
एका नाट्यपूर्ण वाक्याने पहिलं पत्र सुरू होतं. पहिल्याच पत्रात मोजकी वाक्यं स्वत:ची ओळख करून देणारी आहेत. विद्वान व्यासंगी वडिलांची आईवेगळी मुलगी. स्वत:ला विसरून पण आनंदात रहाणारी, म्हणून तर वडील तिला आनंदभाविनी म्हणतात. अशा सावित्रीने पुढाकार घेऊन ही पत्रमैत्री सुरू केली आहे. तिला प्रतिसादही तसाच उत्कट मिळाला आहे.याच पत्रात राजम्माची ती गोष्ट येते, जिच्यात सावित्रीची नियती तर आहेच, शिवाय कादंबरीचं आशयसूत्रही . मोर पाहून आनंदित होणाऱ्या लच्छीला मोर हवा आहे . मोराची अट आहे की त्याने यायचं तर लच्छीने आधी नाचलं पाहिजे. मोर कधीही येतो. लच्छी मग नाचतच रहाते,त्या नाचण्यासाठी आनंदातच रहाते, मोर येऊन गेला की नाही याचं पुढे तिला भानही नसतं.
तुमच्याकडे एकदा न सांगता येईन असं सांगून हे पत्र संपतं.

एक विचक्षण मुलगी, तिच्या परिसराचे, तिच्या प्रेमाने वेढलेल्या तरीही तारुण्यसुलभ एकटेपणाचे अबोध रंग शब्दात आणत आहे. तिच्या दूरस्थ परिचयकक्षेतला कुणी एक तिला खूप आवडला आहे, त्याला तिने साद घातली आहे, आजवर ऐकलेल्या लोककथांचे आता शैशवातून बाहेर पडताना काही वेगळे अर्थ तिच्या संवेदनाक्षम मनाला जाणवत आहेत. ते त्या कुणीतरी समजून घ्यावेत म्हणून आपलं अंतरंग पत्रात तर ओतायचं, पण एका कुलीनशालीन अशा चौकटीत राहून. या नात्याला सध्या कोणतंच नाव नाही. असं नातं आकारू द्यायला १९३९ इतक्या जुन्या काळातही काळाच्या खूप पुढे असलेले व्युत्पन्न प्रेमळ वडील सावित्रीच्या मागे आहेत.

दुसऱ्या पत्रात सावित्री पहिल्या पत्राच्या शेवटी उल्लेखिल्याप्रमाणे तिच्या पत्रमित्राला भेटून आलेली दिसते. भेटीचे मोजके उल्लेख आहेत ,अगदी साधे. सावित्रीच्या बहुभाषिकत्वाचं त्याने केलेलं कौतुक,तिने त्याला चहा घेऊन देणे ,त्याने सामान उतरवून घेणे वगैरे.सावित्री जणू आपला उल्हास दाबून ठेवते आहे.कुठेतरी त्याचंही वागणं तसंच उल्हसित तरीही औपचारिक असावं.

तिसऱ्या पत्रात ‘आपण एकाच परिसरात होतो तरी भेट कशी झाली नाही ? तुमचा उल्लेख मी प्रोफेसरांकडून ऐकला होता तुमच्या निबंधाला बक्षीस मिळालं तेव्हा’ वगैरे सावित्री पत्रातून बोलत राहते . आपल्याही अकॅडेमिक हुशारीचा ओझरता उल्लेख करते. काळाच्या पुढे जरी ही माणसं असली तरी काळाच्या प्रभावातून कशी मुक्त असतील? ती दोघेही सौम्यपणे परस्परांना आणि स्वत:लाही जोखत आहेत.ओळख करून देत घेत आहेत. पत्र तात्विक विषयांकडे वळतं. एक महत्वाचा मुद्दा, सावित्रीच्या वडिलांनी,आप्पांनी ,एका भाषाशास्त्रज्ञ मित्राशी चर्चेत उपस्थित केलेला. कलेचं प्रयोजन जेव्हा अल्पजीवी असेल तेव्हाही कलाकार ती परिपूर्ण का करतो ? याचं उत्तर चर्चा ऐकत बसलेल्या सावित्रीकडून येतं. ती ‘त्याची’ कला असते म्हणून. आप्पा होकारतात . कलाकार स्वत:ला परिपूर्ण करत असतो.पत्र पहिल्या प्रत्यक्ष भेटीचा थरार मागे टाकून सखोल विचारांचा मागोवा घेत आहे .राजम्माच्या मोरासारखा ‘अनुभव’ हाही विचारव्यूह संपूर्ण संहितेत सतत भेटत राहणार आहे. या मैत्रीला साचेबद्ध दिशा देणारी किंवा न देणारी नियती सावित्रीच्या बाहेर आहे तशीच आतही आहे.ती ‘अनुभव’रूपाने उरणार आहे.

चौथं आणि पाचवं पत्र अधिक तारुण्यसुलभ भावनांनी व्याकुळ आहे. तिसऱ्या पत्रात पिकनिकला गेली असताना एका रहस्यमय आख्यायिकाग्रस्त टेकडीच्या परिसरात सावित्री एका मैत्रिणीच्या भावाबरोबर हरवते ते वर्णन आहे.

या पत्राला सहा दिवस उत्तर न आल्याच्या बेचैनीत सावित्री पाचवं पत्र लिहिते.इथे तिची अस्वस्थता तिच्याही नकळत तिच्या उत्कट भावनांचा आविष्कार करते.’’पुष्कळ वेळा मला वागण्याचा अर्थच कळत नाही. मी सहज मोकळेपणानं काही करायला जाते. त्याचा अर्थ मात्र तसा होत नाही अशी मागाहून मला कुणीतरी जाणीव करून देतं.’’ सावित्रीची ही स्वत:बद्दलची साधी वाटणारी विधानं सोपी मात्र नाहीत. ती मनात रुंजत राहतात. निवेदनाला खोलसर मऊ पोत येतो. असो. इथे सावित्रीला वाटतंय , आपण कुणा तरुण मुलाबरोबर हरवलो हे सांगितल्याने तो नाराज तर नाही झाला ? एक अंधुकशी स्वामित्वभावना तर त्याच्या या मौनामागे नसेल ?

सहाव्या पत्रात ही भीती निराधार असल्याचा दिलासा मिळून उल्हसलेली सावित्री अचानक त्याच्या सहवासासाठी व्याकुळ झाली आहे. त्याला सणाचं कारण सांगून तिच्या घरी येण्यासाठी विनवते आहे.आनंदभाविनीच्या आनंदाचं केंद्र तिच्या जगाबाहेर सरकलं आहे. हेतू स्पष्ट आणि गहिरे झाले आहेत .

सावित्रीच्या नजरेतूनच तर आपण घटनांकडे पाहत आहोत. कथनतंत्राचा आकर्षक वापर हा आहे की सावित्रीला जे समजत आहे, ते सगळं वाचकाला उपलब्ध नाही कारण समोरची, तिच्या मित्राची- पत्रे वाचायला मिळत नाहीत. त्यामुळे समोर एक असा अवकाश आहे जो आपणच भरून काढायचा आहे. सावित्रीला जे समजत नाही ते मात्र अगदी सूत्रमयतेने उपलब्ध आहे. कारण निवेदिका तीच आहे. समोरच्या अवकाशाची गूढता अशी दोन्ही प्रकारे गडदते..ही गूढता संवादविसंवादातली आहे. दोघांमधलं भौगोलिक अंतर हा विकल्प आहे. आणि त्यावरची उपाययोजना म्हणजेच पत्र हे माध्यम असं आहे की ज्यामुळे अंतर वाढेल की कमी होईल सांगता येत नाही.एक सूक्ष्म नाट्य आहे या सगळ्यात.

तर आता सातवं पत्र. तीच असोशी त्याला भेटण्याची, त्यातच आप्पांच्या ‘अनुभव म्हणजे काय’ याबद्दलच्या चिंतनाची जोड.पुढच्या तीन पत्रात सावित्री या तिनेच योजलेल्या, आणि त्याच्याकडूनही होकार मिळालेल्या भेटीच्या आठ दिवसांचं बारकाईने वेळापत्रक बनवते आहे. ‘’मी फिकट जांभळ्या रंगाची माझी आवडती साडी नेसून येईन. हातात तुमच्या सत्कारासाठी दोन वेचक फुलं असतील. तुम्ही मला पाहिल्यावर तुमच्या हातातली काठी वर करा.’’ नकळत त्याने काय करावं हेही तीच ठरवते आहे,स्वत:साठी नियम बनवते आहे,तेही त्याने वाचावे आणि पुलकित व्हावे असेच आहेत .या पत्रांत तिची सौंदर्यबुद्धी, कलासक्ती, प्रीती याचबरोबर विनोदबुद्धीचंही मनोहारी रूप झळकतं. ‘’सोमवारी संध्याकाळी तुमचं व्याख्यान ठेवलं आहे. विषय मीच दिला आहे-मानवी कला,तुम्हाला तो बदलून शेक्सपिअरच्या नायिका किंवा समुद्रातील वनस्पती असाही करता येईल.. ‘’!

..सूक्ष्म अपेक्षा,मग अपेक्षाभंग ठरलेलेच.तो येत नाही !त्याचं पत्र येतं.तेही समाधानकारक खुलासा न देणारं.त्याने इंग्लंडला जायचं कारण दिलं आहे, पण या सगळ्याला तर अजून वेळ आहे .मग ? मग हृदयभंग झालेलं अकरावं पत्र. ‘’खरं कारण मी कसं जाणणार ? जाणणारी मी कोण ?’’ असं म्हणणारी मानी सावित्री आतल्याआत रडत आहे आणि तरी ’’आज मी रडले नाही’’असं आवर्जून लिहिण्याची काळजी घेते आहे..भोवतालच्या परिसरात आपण मन रमवायला सुरुवात केली असं सूचित करते आहे.

इथे सावित्री आणि कथेची संहिता एक चढण चढायला सुरुवात करत आहेत,संवादाची डूब असलेल्या एकाकीपणाची. पुराणातल्या सावित्रीने ही चढण यमाच्या मागून चढत आपला प्रियकर परत मिळवला होता. या सावित्रीने त्याला दिशांच्या आधीन करायचे ठरवलेले दिसते. ‘अनुभव’ हा मागे जाऊन पुढे येणारा नसावा, वर्तमानात झेलून भविष्यात नेणारा असावा या आप्पांच्या चिंतनाची सावित्री स्वत:च प्रयोगशाळा बनली आहे..

नंतरच्या दोन पत्रांत एजवर्थ आणि प्रो.जोशी या आप्पांच्या मित्रांबद्दल जास्त आणि स्वत:बद्दल कमी बोलणारी सावित्री जरा कोशात गेली असली तरी ‘’आजसुद्धा इतक्या शांतपणे मी तुम्हाला लिहिते आहेच ना ‘’ असं म्हणून थोड्या दु:खाने, थोड्या प्रगल्भ खिन्न विनोदबुद्धीने झालेल्या मनोभंगाचा उल्लेख करतेच.
आणि त्याने यायचं पुन: कळवलेलं दिसतं! या वेळी सावित्रीचं उत्तर त्रोटक असलं तरी त्यातूनही आनंद पाझरतोच आहे.

पत्र क्रमांक पंधरा-सोळा-सतरा.प्रत्यक्ष भेट एकदाची झालेली दिसते. पहिल्या भेटीपेक्षा यात दोघेही अधिक जवळ आले आहेत.’’तुमच्याबद्दल माझं मत अगदी पार बिघडलं आहे. माणसानं इतकं शांत असू नये म्हणतात , पण तुम्हाला हा शांत-वेषच अधिक शोभून दिसला’’.. त्याच्या नामरहित धूसर व्यक्तिमत्वाचे रंग खूप गहिरे आहेत. अशा एखाद्या वाक्याचा प्रकाश त्यावर सांडतो तेव्हा त्याचा डोह खोल-खोल आहे हे जाणवतं.

पण ही भेट कदाचित बऱ्याच मोठ्या काळाच्या ताटातुटीआधीची आहे . त्याने परदेशी जायचे ठरवले आहे. सावित्रीला अप्रत्यक्ष सूचना दिली आहे की त्याच्या भविष्याचा प्रवाह वेगळ्या दिशेला आहे. तिने त्या दिशेला यायचं की नाही ते ठरवायचं आहे. भेटीवर या अनिश्चितीचा ताण आहे. ‘’मी अजून गेल्याच आठवड्यात आहे. मागचं आठवत नसतं आणि पुढच्याचा सोस नसता तर किती बरं झालं असतं ! आप्पांच्या ‘अनुभवा’चा प्रश्नही मिटला असता. ’’

अठरा ते वीस !त्याने पत्रातून काही अधिक विचारलं असावं, जाण्याआधी तिच्या मनाचा नेमका कौल घेण्यासाठी. कवितीक भाषेत ! पण सावित्री आता चिंतनाच्या कोशात गेलेली दिसते. ‘’इतकी चांगली पत्रे लिहू नका ‘’ असं म्हणताना ती शब्दांशी, भावनांशी झुंजते आहे.’’मी काय लिहिलं म्हणजे तुम्हाला बरं वाटेल ? प्रेम,प्रीती, अनुराग या शब्दांची मला अपूर्वाई वाटत नाही.एकेकदा मला वाटतं की स्वत:ला स्थिर करण्यासाठी आपण ही केवळ निशाणं म्हणून वापरतो ..’’

ती त्याचा, त्यांच्या प्रेमाचा विरस करते आहे ?का ? याचं एक कारण सध्या स्पष्ट आहे, दुसरं खूप शेवटी कळणार आहे. आप्पा जपानच्या एका तत्त्वजिज्ञासा केंद्रात – ‘आनंद–मिशन’ नावाच्या एका प्रकारच्या धर्मसंस्थेत चालले आहेत.संचालक नामुरा हे अजून एक पात्र सावित्रीच्या मनोमंचावर हजर झालं आहे.. या सर्व गुंतागुंतीच्या वळणावर ती आपल्या एकाकी वृद्ध वडिलांना सोडून दुसरा काही विचार करू शकत नाहीय एवढंच सध्या कळतं आहे. हे नाजूक निर्णय एका मनस्वी स्त्रीसाठी नेहमीच कठीण असतात, त्या काळातही , आजही. तिला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य असतं तेव्हा ती उलट जास्त गोंधळून जाते.

तिची ही कोंडी निदान भावनिक पातळीवर एकविसाव्या पत्रात फुटते म्हणजे अगदी धो धो बरसते. आठवणी आणि प्रतिमा .प्रीतीची कोवळी ओढ.विरहाच्या सावल्या लेवून आलेली.एकविसावं पत्र म्हणजे एक कविता आहे.स्वत:चा ‘ती’ असा उल्लेख आहे. ’’दिवस तिचा अपरूप असतो, रात्र फुलवारी. पण तिच्या मनाला नाही सोसत शब्दांची बंदिशी !’’ माझ्या पत्रात कुठे काव्य नाही असं गेल्या पत्रातच म्हणणारी सावित्री भावुकतेच्या गर्तेत खोल खोल कोसळली आहे या पत्रात, ही भोवळ तिला हवीहवीशी आहे. दुसऱ्या भेटीतले जे रोमांचक्षण शब्दांपासून लपवले होते ते या मुसळधार वर्षावात उघड्यावर आलेत. ’’..पहिल्या पावसाची सर अचानक आली तेव्हा ती भिजत चिंब तशीच उभी राहिली.देवळाच्या आवारात त्याच्याबरोबर फिरताना तिनं सहज एक उत्सवाच्या नाचाची गिरकी घेतली आणि क्षणभर नसलेली वाद्यं तालावर घुमू लागली.. ‘’अगदी सिनेमॅटिक परिणाम.

एक खळाळ , एक वादळ , ज्यात लपला आहे एक नकार. पुढे आहे एक दीर्घ दीर्घ विराम , वाटा वेगळ्या होताना.सावित्रीने वडिलांबरोबर जपानला जायचं ठरवलं आहे.

दहा पत्रांचा पुढचा संच, पत्र क्रमांक बावीस ते बत्तीस,आयुष्याचा बदललेला पडाव. ‘’सायाभा मारू’’ २२ जुलै १९३९., बोटीवरून शुभेच्छाप्रेषण ‘’मी अगदी आनंदात आहे’’ असा वास्तवाचा स्वीकार, आनंदभाविनीच ती. आणि क्योतो, जपान ऑगस्ट १९३९ ते ऑक्टोबर १९४१ येथून पाठवलेली पुढची नऊ पत्रे.

ती जपानला पोचेपर्यंत त्याची तीन पत्रं तिथे तिची वाट पाहाताहेत. त्याच्या थिसीसची प्रत आहे ऑक्सफर्डवरून पाठवलेली. प्रस्तावनेत तिचे आभार आहेत.तिला आश्वस्त करणारे हे सगळे संकेत की तोही तिच्याशिवाय व्याकूळ आहे. दिशा बदलल्या पण मनं तुटलेली नाहीत .जाण्याआधी तो तिचे पितृतुल्य इंग्लीश प्लँटर एजवर्थ, जे मागेच कुर्गमध्ये राहिलेत त्यांना भेटून त्यांचा आशीर्वाद घेऊन गेलाय हे सूचक आहे. सावित्रीच्या आयुष्यात पिता आणि पितृतुल्य माणसं ही मोठी शक्ती आहे. त्यांच्या प्रेमाची, सेवेची शक्ती तिला सामान्य प्रापंचिक मोहाचाही त्याग करायला लावते. एजवर्थ यांचं लोभसवाणं व्यक्तिमत्व अशा माणसांपैकीच. त्यांना भेटून त्याने जणू प्रतीकात्मतेने तिच्या तिथे नसलेल्या आप्पांचा आशिर्वाद मागितला आहे.

आतल्या आत सुखावून विसावून सावित्री पुढची पत्रं लिहितेय निश्चित. ओळखदेख नसताना तिने ज्याला उत्कटतेने हाकारलं त्याने तिला स्वीकारलं आहे.हा स्वीकार ऐहिक पातळीवरचा नाही.
मग पुढचं तेविसावं पत्र आनंद मिशन, तिथलं वातावरण आणि व्यवस्था ,आप्पा, प्रो जोशी, नामुरा आणि त्यांच्या पत्नी, अवतीभवतीच्या महत्वाच्या माणसांची अल्पाक्षरी पण जिव्हाळ व्यक्तिचित्रं. एक महत्वाचं शेवटचं वाक्य, ‘’तिकडे यूरपमध्ये लढाईचे पडघम वाजू लागले आहेत’’ काळजी, ‘त्या’ची आणि सर्वांची.
भारतातून जपानमध्ये प्रयाण. युद्धपूर्व काळ . आयुष्यात झालेल्या या काळ आणि स्थळातील मोठ्या उलथापालथी तशा लौकिक अर्थाने पत्रात जाणवत नाहीत . एक संपूर्ण बदललेला अवकाश कुणी इतक्या सहज आत रिचवावा? हा सावित्रीचा स्वभाव ,एवढंच म्हणावं.जपानमध्ये गेली तरी ती सावित्रीच आहे, तिच्याबरोबर तिचे आप्पा आहेत. एजवर्थची जागा घ्यायला प्रो. जोशी , नामुरा आले असतील. राजम्मा मागे पडून मिशनच्या हाऊसकीपर मिसेस नामुरा आल्यात. सावित्रीच्या अंत:कोशाचे तपशील फार बदललेले नाहीत.

चौविसाव्या पत्रात युद्धाचे पडघम आणि परिणाम अधिक तीव्र झालेत, एजवर्थ, जे इंग्लिश असूनही प्लांटेशनवर कुर्गमध्ये मागे थांबलेत त्यांना पहिल्या महायुद्धाचा पूर्वानुभव असल्याने अशुभाची प्रखर जाणीव झाली आहे आणि ते व्याकुळून आप्पांना परत बोलावत आहेत असं सावित्री लिहिते. पण आप्पांप्रमाणेच तीही परतायला अनुत्सुक आहे. सामोरा आलेला ‘अनुभव’ पूर्णपणे घ्यायचाय बापलेक दोघांनाही.
पत्राच्या शेवटी सावित्रीचं पुन: उच्चारण .’’खरंच मी तुम्हाला विसरलेली नाही.’’नात्यात कर्मकांड असतंच !

पंचवीस, सव्वीस.सावित्रीला ताप येणे, तिने पुन्हा राजम्माच्याच दुसऱ्या एका कथेवर मिशनच्या वार्षिकोत्सवासाठी एक नाटक लिहायला घेणे आणि याच काळात ल्योरे नावाच्या एका गोड समवयीन स्वीडिश मुलीशी झालेली मैत्री.ही मैत्री सावित्रीच्या उत्कट स्नेहजीवनाचा एक भाग असल्याने ती त्याच्याही तितकीच पचनी पडावी अशी तिची खटपट दिसते.( एकमेकींचे पोशाख घालून काढलेला फोटो हा उल्लेख खेळकर असला तरी सूचक आहे ) यातूनही सावित्रीचं व्यक्तिमत्व एका वेगळ्या कोनातून प्रकाशमान होतं. जे सर्व लोक तिला आवडतात ते जणू तिच्यामध्येच विरघळतात, ते ते सर्व तीच होते हा राजम्माच्या मोराचा संदर्भ इथे नव्याने उमटतो.

सत्तावीस. ‘’गाणारं झाड’ या सावित्रीने राजम्माच्या कथेत थोडा बदल करून लिहिलेल्या नाटकाची कथा मात्र सावित्री अगदी तपशीलात सांगत आहे या पत्रात.झाड, पाखरं( जी आधी हाकलली जातात आणि नंतर विमानं होऊन युद्धाचं सावट आणतात ), राजा,वृद्ध माणूस अशी निसर्गाची,कलेची,सत्तेची,शहाणपणाची,युद्धाची प्रतीके, वेगवेगळ्या काळात त्यांचे बदलते स्वरूप,नावं, संबंध. पुन: सुखान्त, शहाणपणाचा विजय, माणसाचं ,निसर्गमय शांतीमय सहजीवन. या नाटकात सावित्रीने तिचं मन ,तिचं भय आणि तिची आशा ओतलीय.प्रतिकांद्वारे.

अठ्ठाविसाव्या पत्रात आप्पांच्या वाढत्या अभ्यासाचा, व्याख्यानांचा, त्यामुळे जपानमध्ये वर्षभर वास्तव्य वाढल्याचा उल्लेख. एजवर्थनी सावित्रीला पत्र लिहिलं आहे, पण अगदी वेगळ्याच विषयावर. ‘अनुभव’ची थीम पुढे नेणारं.मनातल्या सर्व भिंती –स्थळकाळ,समाज,व्यक्तिगत सवयींच्याही– पाडून अनुभवाला तातडीने आणि तत्काळ आत्मसात करण्याची गरज. सावित्रीचं यावर भाष्य-‘’मला फक्त एकच ठाऊक आहे- स्वत:ला विसरणं.समर्पण.’’
आणि मग ल्योरेबद्द्ल त्याला लिहिणं, त्याच्याबद्दल ल्योरेला सांगणं .
सावित्री ! त्याच्यातुझ्यातला एकांत तसाही गजबजलेला होता, आता तर तू संवादाच्याही नव्या पातळ्या गाठते आहेस.

पत्र क्रमांक २९ ते ३२- जपानमधून पाठवलेली शेवटची चार पत्रं.वाढवलेल्या मुक्कामातली ही पत्रंही तसं नवीन काही सांगत नाहीत. सावित्रीला सगळे सुजनच कसे भेटतात ? या त्याच्या प्रश्नावरील तिचं उत्तर आपल्याला कळलेलं आहे.’’सगळे लोक आपल्यासारखेच असतात ! ‘’ किंवा दुसऱ्या एका संदर्भात ‘’दुसरं माणूस दुसरं कशावरून , आपणच का नाही ?! ‘’सावित्री सतत समोरची व्यक्ती होऊन तिचे मनोभाव जाणून घेते. मग सुजन,दुर्जन अशा वेगळ्या गोष्टी राहत नाहीत. सगळं काही आपणच.मानवजातीच्या कठोरतम परीक्षाकाळात – महायुद्धाच्या- सावित्री हे लिहिते आहे.ती शांत असण्याचं कारण तिची ही धारणा आहे.
मग अजून एक बॅले – चौरपंचाशिका- बसवण्याचा तिचा अयशस्वी प्रयत्न, त्यातली खास जपानी प्रतिकात्मता, त्यालाही तीव्रतर करण्याचे तिचे प्रयत्न वगैरे वगैरे.लोककथा सतत भेटत राहतात कथाप्रवाहात .अल्पाक्षरात खूप सांगतात त्या म्हणून सावित्रीला भावतात.

आप्पांची प्रकृती बरी नाही, पत्रं गहाळ होताहेत युद्धामुळे..
या काळातली सगळ्यात महत्वाची घटना म्हणजे ल्योरेचं सान फ्रान्सिस्कोला जाणं. सावित्रीचा जणू पर्यायी जीवनाधार हरपला आहे.’’ मला एकेकदा वाटतं , आता आपली भेट व्हायचीच नाही. . नाही झाली तर मीच ल्योरे म्हणून समजा ..’’ असं का सावित्री ? तुलाच त्याला खरंखुरं कधीच भेटायचं नाहीय का?
आणि ल्योरे ? सावित्रीच्या सगळ्या आविष्कृतींचे परम-अर्थ जाणणाऱ्या ल्योरेने तिला पर्यायी कथानक सुचवलं आहे बॅलेसाठी – नार्सिसस आणि एको !

तिरूपेट, कुर्ग. मार्च १९४६ ते जून १९४७ – ३३ ते ३९ – शेवटची नऊ पत्रे. आता काळ एकदम चार वर्षे पुढे सरकला आहे.
मधल्या काळात पत्ता हरवल्याचा , पत्रं न मिळाल्याचा उल्लेख तेहेत्तिसाव्या पत्रात आहे. कधी नाही ती घटनाबहुलता .आप्पा जपानमध्येच कालवश झालेत. या शोकामुळे सावित्री गप्प झाली असावी. शिवाय एकदम वेगळी अपघाती वळणं आलीत कथानकात, असतातच ती तशी आयुष्यात. आझाद हिंद सेनेचा उदय, जपानमध्ये बदललेले भारतीयत्वाचे संदर्भ.त्यातच आता नि:संग झालेल्या सावित्रीचं ओसाकाच्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करणं. या काळात सावित्रीचा आझाद हिंद सेनेचे एक भारतीय मेजर सेन आणि त्यांची जपानी रुग्णाईत गरोदर पत्नी यांच्याशी परिचय होणे, पुढे या दोघांचंही क्रमश: युद्धात आणि त्या आघाताने अकालनिधन होणे.मग त्यांचं अनाथ अर्भक बीना सावित्रीने आपली मुलगी म्हणून आपल्यासोबत भारतात आणणं . घटनांना अचानक आलेला भयानक वेग, त्यातच नात्याचे नवे स्फटिक झळाळणारे. जीवनाचं उग्र सौंदर्य. विनाशातच पुनर्निर्माण .

हे पत्र त्याला मिळतं. खंडित झालेला संवाद पुन्हा जुळला आहे.पुन्हा आनंदऋतु अवतरला आहे.’आज तुमचं ओळखीचं लाडकं अक्षर घेऊन मी मला मिरवलं.’ ’लढाई संपली तरी अजूनही तुम्हाला तिकडे (-अभ्यास पूर्ण करण्यासाठी हा संदर्भ-) राहिलं पाहिजे का? पण मग दुसऱ्यांनी काय करायचं ?’’!! सावित्री हळवी आणि लडिवाळ होते अशी क्वचितच .आप्पांचं ‘’Experience and Growth’’ प्रो जोशींच्या मदतीने मार्गी लावण्याचा बौद्धिक व्यापही आहेच.. एजवर्थही कालवश झालेत. आपली कुर्गमधली इस्टेट सावित्रीला देऊन.तिकडे युरोपात ल्योरे त्याला भेटून गेली आहे.

महत्वाचा प्रश्न त्याने तिला केलाय , तिला हवं तरी काय आहे ?
महत्वाचं उत्तर तिने दिलंय ,’’ तुमच्याबद्द्लचा माझा पहिला विचार आणि आताचा- पहिल्यात एक सहेतुक वेगळेपणा होता, दुसऱ्यात निर्हेतुक आपलेपणा दिसून येईल , पण तसं काहीच नाही. माझ्या जगाच्या कक्षा रुंदावल्या असल्या तरी त्या तितक्याच ठाशीवही झाल्या आहेत , त्यातील प्रत्येक भागाचे विशेष साभिप्राय झाले आहेत. ‘’!

अनुभवाचं मुरत जाणं , आयुष्याचा अर्थ आतल्या आत साकारत जाणं ..
पत्र पस्तीस.ही उत्तरं त्याचं समाधान नाही करत. ‘’ तुम्हाला प्रेम हवं आहे आणि मला नको आहे का ?’’ सावित्री विचारतेय .तिने पूर्वीही लिहिलं होतं की शब्द केवळ निशाणं असतात.आता ती अधिक स्पष्टतेने लिहितेय आपल्या father-fixation बद्दल, त्यामुळे कमी झालेल्या आसक्तीच्या शक्तीबद्दल .

अधिक महत्वाचं , ती विश्लेषण करते आहे प्रथमच ,आपण प्रतिक्षणी जे निर्णय घेतो, आयुष्यालां अपरिवर्तनीय वळणं देतो त्याबद्दल. ‘’ मी पहिल्याने तुम्हाला लिहिलं,नंतर तिरूपेटला बोलावलं त्या-त्या वेळी एक निर्णय घेतला होता. .. मला हवा होता तो प्रतिसाद मिळाला नाही . तो मिळाला असता तर मी तुमच्याबरोबर कुठेही आले असते.. हे सगळं लिहून मी ओशाळी झाले आहे. तुम्हाला हे वाचून दु:ख झालं तर मला कायमची विसरा .’’

आता आपणही नकळत फ़्लॅशबॅकमध्ये ती सगळी जुनी पत्रं, तेव्हाचे अवघडलेले अर्ध-उच्चार पुन: आठवतोय, पुढे येऊन मागे जातोय , अनुभवाच्या वाटा असतातच अशा.

पत्र क्र. ३६ – तो परत यायच्या तयारीला लागला आहे हे सर्व वाचून! जणू अचानक सुखान्तदृश्यपूर्तीसाठी ल्योरेही आलीय . बीनाच्या बाळलीला आहेत.एजवर्थ यांचं घर आता खेळघर होणारेय.नाटक, बॅले, संगीत ,शिल्प..

पत्र सदतिसावं . स्मरणरंजनात हरवणं , मागच्या आठवणींची नवीन रुपं .सरमिसळ स्मृतिचित्रांची ,स्थळ-काळाची,जिवंत–मृत प्रियजनांची.बीनाला त्याने पत्रात द्रौपदीने शालू फाडून कृष्णाचं बोट बांधल्याची गोष्ट लिहिलीय ‘’ का ते कळलं. ‘’ इथे आपल्याला मात्र सावित्री असं का म्हणतेय ते मात्र कळत नाही इतकं सगळं स्पष्ट झाल्यावर.ती अधीर तर झालीय- ‘’ परीक्षेशिवाय तुम्हाला तिथं डिग्री मिळते की काय ते एकदा विचारून पाहा ना !”’

मग अडतिसाव्या पत्रात गडबड सगळी: मांडामांड. त्याच्यासाठी ल्योरेने बांधायला घेतलेलं टेकडीवरचं घर, खोल्या, पडव्या, उजेड, सामान . आप्पांच्या पुस्तकाचं नवं नामाभिधान - Experience and Growth नाही, तर Experience : Growth. अनुभव आणि वाढ यात अन्योन्यसंबंध .

शेवटचं एकोणचाळिसावं पत्र ! तो येणार आहे. एजवर्थ खेळघराच्या उद्घाटनाची धांदल आहेच, या कार्यक्रमासाठी अखेर पुनश्च राजम्माच पावली आहे बरीच भवति -न भवति होऊन. राजम्माची मोराचीगोष्ट – तोच बॅले बसवायचा आहे.बीना लच्छी होणारेय, तो मोर, ल्योरे म्हातारी ! लेखन आणि गाणी सावित्रीची. तिचं खास भाष्य –‘’ तसं पाहिलं तर मोराला तरी कुठे नाचता येतं ? एक पाय उचलला की तोल जातो म्हणून तो पाय टेकून दुसरा उचलतो ..असं ad infinitum !!

शेवटच्या पत्राचं शेवटचं वाक्य- ‘’ प्रयोगाची तारीख आताच टिपून ठेवा : १५ ऑगस्ट , १९४७ ! ‘’
भारताचा मुक्तीदिन. एप्रिल १९३९ ते ऑगस्ट १९४७. आठ वर्षांनंतर सुखदु:ख अपेक्षाआसक्ती सगळ्यातून मुक्त होऊन सावित्रीही प्रियकराला भेटायला सिद्ध झाली आहे.एकाच परिसरात ते दोघे वेगवेगळे तरी एकत्र राहणार आहेत. ( हे त्या काळाच्या किती पुढे आहे आणि आजही प्रयोगयोग्य !) त्यांचा परिसर ल्योरे आणि बीना यांनाही सामावून घेणार आहे. खेळघरात गाणं नाचणं गुंजणार आहे.अनुभवाचं आणि वाढीचं हे रसाळ मधुर फळ आपल्याला निरंतर अनायास माधुरी देणार आहे.

आज २०१५ मध्ये एका अस्फुट नात्याला एवढा वेळ देणं शक्य नसावं अनेकांना, पण या सावित्रीचं गारुड मनावरून उतरत नाही. तिचेच शब्द आठवतात ‘’मला सुजन लाभतात ते अंशत: माझ्या भाग्यानं , पण अंशत: माझ्या मनाच्या समजुतीनं . मी कशाचाही अव्हेर करत नाही आणि शेवटी जे घेते ते आपलंसं करून घेते..’’ तरीही तिला इतका वेळ देणारा, समजून घेणारा तोलामोलाचा सुहृद तिला भेटला हे तिचं सुकृत आहेच असंही जाणवतं.

एकरेषीय कथन.पुन्हा एकदा एका समर्थ कवीचंच हे गद्य.अल्पाक्षरी, अर्थबहुल. काळाचा आणि वैविध्यपूर्ण स्थळांचा पण तरीही एकदिश प्रवास. तंत्राचा प्रयोग एकच, सावित्रीच्या त्रुटित वाक्यांमध्ये आदिम प्रेरणांची समृद्ध परिपक्व स्थित्यंतरे पाहणे.

जलवाहिनी निश्चल कृष्ण
वन झुकले काठी राधा, विप्रश्न
युगानुयुगीची चिरतंद्रा
पु.शिं.च्याच ‘त्रिधा राधा’ या कवितेत उतरलेली ही चिरतंद्रा. हिच्याच निश्चल पाण्यात ‘सावित्री’सारख्या कथनकाव्याचे रंग फिकटत उमटत राहतात , परिस्थितीचे बाह्यऋतु बदलत जाताना आपल्याला चिर-प्रसन्न ठेवतात.

भारती बिर्जे डिग्गीकर

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर परीचय, मी हे वाचलंय असे वाटायला लागलेय० कदाचित एखादा उतारा वाचला असेल ० किंवा हे वाचल्यावर असे वाटायला लागले असेल ० तसेच असेल

भारतीताई,

पत्रसंग्रहातून उलगडणारं सावित्रीचं भावविश्व तरल, सरल आणि प्रांजल आहे. पण म्हणतात ना की हळुवार कलाकृती हातातून उतरण्यासाठी कलाकाराच्या हृदयावर कठोर आघात व्हावे लागतात.

हे वाचलं :

>> ‘’ मी पहिल्याने तुम्हाला लिहिलं,नंतर तिरूपेटला बोलावलं त्या-त्या वेळी एक निर्णय घेतला होता. .. मला हवा होता
>> तो प्रतिसाद मिळाला नाही . तो मिळाला असता तर मी तुमच्याबरोबर कुठेही आले असते.. हे सगळं लिहून मी
>> ओशाळी झाले आहे. तुम्हाला हे वाचून दु:ख झालं तर मला कायमची विसरा .’’

, तेव्हा वाटलं की जर हवा होता तो प्रतिसाद मिळाला असता तर ही पत्रं इतक्या उंचीवर पोहोचली नसती.

आ.न.,
-गा.पै.

"सावित्री"...च्या सोबतीने लेखिका भारती बिर्जे डिग्गीकर नाव समोर येताच क्षणार्धात जाणीव झाली की सृजनशील आणि संमोहनात्मक तसेच विलक्षण चैतन्याने भरलेल्या लिखाणाचा आस्वाद त्या कादंबरीच्या प्रेमात (खरेतर "साऊ"च्या प्रेमात) असलेल्या प्रत्येक वाचकाला मिळणार...तोही दीर्घ. प्रभावी आणि अभ्यासू लेखणाचा हा एक उत्कृष्ठ असा नमुना आहे आणि मूळात कवी म्हणून नावाजलेल्या पु.शि.रेगे यांच्या कादंबरी लिखाण तंत्राचा भारती यानी भरीव असा केलेला प्रवास लोहचुंबकासारखा आपल्याला प्रत्येक ओळीसोबत ओढत नेतो आणि ३९ पत्रातून साकारलेला जीवनआशय उलगडत गेलेला पाहाणे सारे काही आल्हाददायक करून सोडणारे झाले आहे.

भारती लिहितात "पु.शि.रेगेंचं अनेकस्तरी लेखन हे असंच आहे...." अगदी खरंय. खांडेकर-फडके-माडखोलकर-कवठेकर आदीं स्वातंत्रपूर्व काळातील लेखकांना कादंबरीकारांना समाजात मोठ्या प्रमाणात यश लाभले होते त्या यशाला बाजूला करून नवीनतेला सामोरे जाणे त्यानी जमविले नाही, इतकेच नव्हे तर स्वातंत्र्योत्तर काळातही या ज्येष्ठांनाच त्यानी चोखाळलेली वाट पुसत जाणारे आणि करमणूकप्रधान कादंबर्‍यांचीच जणू अत्यावश्यता असल्याने मानून लिखाण करणारे कादंबरीकार झाले. पण श्री.ना.पेंडसे, व्यंकटेश माडगूळकर, खानोलकर यानी मात्र वेगळ्या जाणिवा व्यक्त करणारी कादंबरी स्वातंत्र्योत्तर काळात लिहिल्या. कवितेत मर्ढेकर, कथेत जी.ए. आणि गाडगीळ यानी घेतलेले नवतेचे वेध वाचन आकर्षणाचे केन्द्रबिंदू ठरले.

या प्रवासात पु.शि.रेगे हे अत्यंत आगळेवेगळे असेच. "सावित्री" "रेणू" "अवलोकिता" या त्यांच्या नायिकाप्रधान कादंबर्‍या. सावित्रीने सुरुवात केली आणि त्या कादंबरीचा डोलारा पत्रव्यवहारावर...तो कसा याचे सविस्तर आणि वेधक वर्णन भारती बिर्जे डिग्गीकर यानी अत्यंत समर्थपणे केले आहेच. रेगे यांच्या कविता काय किंवा सावित्री रेणू सारख्या कादंबर्‍या काय...स्त्री माध्यमातूनच त्यांचा समाज अनुभव आणि नाते मांडण्याचा प्रयत्न आहे म्हटल्यावर त्यातून प्रकट होणारे विचार अत्यंत संयतपणे आणि जीवनचैतन्याचे साक्षीदार बनले गेले आहेत....(रेगे यांच्या कवितेत ते विशेष जाणवतेही). "सावित्री" ची पत्रे घटना सांगता सांगता भाषेशी अत्यंत समरस होत गेल्याचे जाणवत राहते...किंबहुना मला तर रेणू आणि मातृकापेक्षांही सावित्री ही गद्यरुपी कविताच झाल्याचे प्रकर्षाने जाणवत गेले होते. भावात्मक आशय आणि मराठीचे सौम्य रुप एकमेकात सुंदररित्या गुंफून सारा आशय मनावर ठसविण्यात रेगे अर्थातच यशस्वी झाले आणि मराठी साहित्यातील कादंबरी गटात त्यांच्या "सावित्री" ने अढळ असे स्थान निर्माण केले आहे. भारतीच्या लेखामुळे ते पटतेही. मला वाटते पु.शि.रेगे यानी कवी या नात्याने लक्षणीय रसिकमान्यता मिळविली असली तरीही "सावित्री" कादंबरीमुळेही त्यांचे नाव त्या गटात त्याच आदराने घेतले जाते आणि कादंबरीलेखनाचा आढावा घेताना फडके-खांडेकर-भावे-मुक्तिबोध-माडगूळकर-पेंडसे आदींच्या अनेक कादंबर्‍यांसमवेत पु.शि.रेगे यांच्या एकमेव "सावित्री" चा उल्लेख अपरिहार्यपणे समोर येतोच तेव्हा वाचकाला उत्सुकता वाटून राहते की पत्रव्यवहारातून उलगडलेला एक पट नेमका किती देखणा झाला आहे.

भारती बिर्जे डिग्गीकर यानी हाच पट अत्यंत समर्थपणे आणि देखणेपणाने इथे सादर केला आहे असेच म्हणावे लागेल. १९६२ साली रेगे यानी आणलेल्या साऊचे गारुड मनावरून उतरायला कधीच तयार नव्हते...आणि आता तर भारतीच्या विलोभनीय लेखणीमुळे ते कधी उतरू नये असेच वाटत राहील.

वा वा, आवडत्या पुस्तकाविषयी भारतीताईंनी लिहिणे हा मणिकांचन योगच!

'सावित्री' बद्दल खूपवेळा वेगवेगळ्या अंगाने विचार करुन पाहिलाय. त्यातून निघणारे प्रत्यक्ष, ध्वनित, प्रतीयमान अर्थ काढण्याचा खेळही खेळून पाहिलाय. ल्योरे आणि सावित्री....या नात्याची खोलीही जास्त शब्द न लिहिता लेखकाने काय सुरेख दाखवली आहे. व्रतस्थ, सचेतन सहचर.....असे सावित्री ल्योरेबद्दल म्हणते...त्याचा अर्थ झिरपायला वेळ लागला होता, आणि कदाचित या शब्दांमुळेच चुकीच्या दिशेने जाणारी समजूत परत हमरस्त्यावर आली होती.

संपूर्ण पुस्तकात फक्त एकाच ठिकाणी खडा लागतो. सावित्री...."ल्योरेलाही तुम्हाला लिहायला सांगू का? (की ती लिहितेच आहे तुम्हाला?)"....असे विचारते तेव्हा! सावित्रीच्या आकळून येणार्‍या व्यक्तित्वाशी ते कंसातले वाक्य विसंगत वाटते.

एकविसावे पत्र ही एक स्वतंत्र कविताच आहे, कितीदातरी वाचावी आणि त्या मोकळ्या आवेगात दरवेळी तितकेच चिंब होऊन जावे!

वरवर पाहता एकतर्फी पत्रे आहेत पण लेखकाची खुबी अशी की पलीकडून आलेलेही याच पत्रांत चतुराईने गुंफले गेले आहे. साऊची नजर तिच्यावर-भोवतालावर झरझर फिरते आणि हवे त्यावर झोत क्षणभर स्थिरावून पुन्हा दुसरीकडे वळतो.

पहिल्या वाचनात, संपत आली तेव्हा, सुखांत असू नये असे उगीच वाटत होते. नंतरच्या वाचनात मात्र साऊची सावित्री बनण्याचा हा प्रवास नक्की सुखांतिका आहे की नाही?....याचाच शोध चालू आहे. द्रौपदीच्या गोष्टीच्या उल्लेखासारखीच, लेखनाच्या आरंभी मांडलेली ऋग्वेदातल्या देवीसूक्तातील ओळ का दिली आहे? हेही अजून नीट समजलेले नाही मलातरी!
प्रकाशनानंतर ५३ वर्षांनीही असले तरंग उमटवू शकणारा लेखक विरळाच.

कधीतरी मामा आणि तुमच्यासोबत एकत्र चर्चा करायला आवडेल यावर.

दिनेश, जिज्ञासा, शैलजा, श्रीयु, आभार खूप खूप.
गापै , या गहन कादंबरीचं मर्मस्थान असं वाक्य उद्धृत करून तुम्ही तुमच्या अचूकतेची ग्वाही दिली आहे. होय,या आघातांमुळे जीवन विदीर्ण होत असेल, कला मात्र त्या वेगळ्याच उंचीवर पोचते.

अशोक, यथार्थ मागोवा घेतला आहे तुम्ही या महान लेखकांनी घेतलेल्या धोक्याचा,लेखनातल्या वेगळ्या वाटा, आशयाचे वेगळे वाण विचक्षण रसिकांसाठी मागे ठेवताना त्यांनी लोकानुनय आणि लोकापवाद यांची पर्वा केली नाही म्हणून अ-क्षर साहित्य निर्माण झालं.

अमेय, अनेक कोडी आहेत,खडा लागतो खरा त्या वाक्यात , तसाच त्या द्रौपदीच्या उल्लेखात.

ऋग्वेदातली (१०-१२५) ती सुरुवातीलाच दिलेली ऋचाही परम अर्थपूर्ण .
'' यं कामये तं तमुग्रं कृणोमि | तं ब्रह्माणं तमृषिं तं सुमेधां ..'' तिचा अर्थ - ''
Whomsoever I desire, him I make bold, him the knower, him the seer, him of sharp intellect..
कादंबरीच्या संदर्भातही सावित्रीने एक सोपा होकार नकार न देता ज्या प्रकारे प्रेमाचा स्वीकार केला आहे त्यात हीच आस आहे . जिच्या प्रत्येकच ओळीवर लिहिता येईल अशी ही कादंबरी, जिथे कविता, कथा आणि हो, आत्म-चरित्रही यांचा त्रिवेणी संगम होतो.नक्की कधीतरी ही चर्चा करूच आपण.

वुडहाउस वाचणारे आणि न वाचणारे असे इंग्लिश वाचकांचे दोन प्रकार आहेत म्हणतात. या इवल्याशा कादंबरीबद्द्ल तेच म्हणावं लागेल मराठीच्या माहेरी असा तिचा दबदबा. रेग्यांची ही गूढ मानसकन्या आपल्याला असंच खेळवत राहाणार आहे, या खेळात केवढा आनंद आहे !

या सुंदर प्रतिसादांमुळे सावित्री अधिकच सुंदर दिसते आहे ! तिचं हे सौंदर्य मनाच्या डोळ्यात न मावणारं असंच आहे आणि प्रत्यक्षात मात्र ती कशी दिसते हे आपण प्रत्येकाने आपलंच ठरवायचं आहे..

वाह ।
सुंदर परिचय आणि प्रतिसाद ।
हे पुस्तक मी वचलेले नहीं ।
आता मिळवून वाचेन नक्की । ☺

पुस्तक अजून वाचलेल नाही.. नक्की मिळवून वाचणार.
पण...
ह्या लेखावर अभिप्राय द्यायला अजून शब्दं सुचत नाहियेत...

खूपच सुंदर लिहिलंय

माझे आवडते पुस्तक.

प्रत्येक वेळी वाचताना नव्याने आकळत जाणारी सावित्री आता हा लेख वाचल्यानंतर (विशेषतः ऋग्वेदातल्या ऋचेच्या संदर्भाने )परत एकदा नव्याने समजेल बहुतेक...

रेग्यांची ही गूढ मानसकन्या आपल्याला असंच खेळवत राहाणार आहे, या खेळात केवढा आनंद आहे ! +१

धन्यवाद द्यायचे राहीलेच की भारतीताई..... तर अनेकानेक धन्यवाद Happy

शिवाय "रेणू" "अवलोकिता" माहीतच नाहीयेत, मामा लिहाना ह्या पुस्तकांवर

आणि अमेय - मातृका वर लेख आलाच पाहिजे....

कृपया धन्यवाद Happy

हर्पेन...

मला आनंद यासाठी झाला की तुमच्यासारख्या वाचनप्रेमींनी भारती यांच्या "सावित्री" लेखाचे असे मनःपूर्वक स्वागत केले आहे. सावित्रीच्या प्रेमात इतके लोक आजही दिसतात याचे मला नेहमीच कौतुक वाटत आले आहे. केवढीशी इटुकली कादंबरी...तीही पत्ररुपात...आणि तिचे गारुड आजही मनावरून उतरायला तयार नाही....भारती यांच्या लिखाणाच्या धाटणीत तीच जादू पुरती उतरली आहे याचे तुमच्यासारखे वाचक साक्षीदार आहातच.

"रेणू" आहे माझ्याकडे....१९७३ मध्ये मौजेने प्रकाशित केली होता..."अवलोकिता" वाचली आहे पण तिची प्रत नाही या क्षणी माझ्या संग्रहात. आता विक्रीला कुणाकडे असेल याचीही शाश्वती नाही, तरीही मी शोधात असतोच अशा दुर्मिळ पुस्तकांच्या.

बाकी भारतीच्या सावित्री नंतर मी रेणूवर लिहिण्यासाठी पात्र नाहीच....शिवाय सावित्री संमोहनाचाही मुद्दा आहेच. तरीदेखील आपण समोरासमोर केव्हातरी जरूर बोलू या कादंबरीवर....मला ते जास्त आवडेल.

"रेणू" च्या पहिल्या पानावर पंचदशी, नाटकदीपप्रकरणातील एक ऋचा रेगे यानी घेतली आहे...तिचा अर्थ भारतीच सांगू शकतील....मी ती इथे टंकतो फक्त....

"नृत्यशालास्थितो दीपः प्रभुं सभ्यांश्च नरंकीम् !
दीप्येद्विशेषेण तदभावेSपि दीप्यते !!..."

~ याचा अर्थ अर्थातच "रेणू" च्या कथानकाशी संबंधित असेल. असेल तर कादंबरी जास्तच समजेल.

हर्पेन , माझे आभार कशाला ? हे सगळं लिहिणं हा माझाही आनंदच, शिवाय तुमच्या डोळ्यांनी मी पुन: वाचते ( सावित्रीच्या व्यसनी लोकांना अशा सवयी असतात Happy ) मात्र, तुम्ही अशोक आणि अमेय यांना केलेला आग्रह वाचून खूप आनंद झाला, मी वाट पाहते आहे हे लोक असं काहीतरी सुंदर वाचायला देतील, रेणू मी वाचलेली नाही आणि अवलोकिता मी पुसटनिसट वाचली होती ती चक्क इंग्लीशमध्ये, तेही फार पूर्वी , तेव्हा आता जागर होणं आवश्यक आहे.
अशोक,
नृत्यशालास्थितो दीपः प्रभुं सभ्यांश्च नर्तकीम्
दीप्येद्विशेषेण तदभावेSपि दीप्यते !!..."
'' नृत्यशाळेतील दिवा नर्तकी आणि उपस्थित सभ्यजन यांना समान प्रकाश देतो आणि यातली कोणी मंडळी समजा तिथे नसली तरी त्याच आभेने प्रकाशत राहतो ''- असा या श्लोकाचा अर्थ आहे, तो आत्म्याच्या स्वरुपाबद्द्लच्या वेदांतविचारात - पंचदशी प्रकरणात आलेला आहे . जागतेपणीच्या सर्व क्रिया आत्मा प्रकाशमान करतोच समत्वभावनेने , निद्रेसारख्या जाणीवेच्या नकारात्म पोकळीतही तो तसाच तेवत असतो .. आता लिहायला सुरुवात करा पाहू !

नेहमीपेक्षा काकणभर जास्तच नॉस्टेल्जिक करून गेला हा पुस्तक परिचय मला . एका बकुळ्गंधी झुळूकेचे बोट धरून मन वहात राहिलं सावित्रीच्या शब्दप्रदेशातून ..
भारतीजींमुळे एकेका पत्राची खिडकी उघडली जाताच साउच्या त्या त्या वेळच्या भावस्थितीचा हरेक ऋतु डोळ्यात उतरत गेला. … आकळुन घेता आला .
खर तर पुस्तकांनी भारून जायचा काळ माझ्यासाठी तरी केव्हाच गायबलेला आहे पण हे लेखन वाचून पुन्हा ती सावित्री ची खिडकी उघडाविशी वाटतेय उतावळेपणाने .हे लेखन तर सुरेखच झालय पण काहींचे प्रतिसादही या शब्द सोहळ्याला चार चांद लाऊन गेलेत नेहमीप्रमाणेच. धन्यवाद!!!

रेणु व अवलोकिता याबद्दल माहिती नव्हती. अनेक धन्यवाद. मिळते कुठे का बघतो ही दोन पुस्तके.

मातृका माझी अत्यंत आवडती कादंब्री - इराण प्रकरण वगळता. रेग्यांना नायक-नायिकांना एक्झॉटिक ठिकाणी नेण्यास आवडत असे की काय कोण जाणे. आणि ते तिथे स्वतः न जाता केवळ कल्पनेचे इमले बांधत असावेत असा माझा अंदाज आहे. त्यामुळे ते सर्वच अजून पसरट होते. उदा. मातृकातली कोकण-मुंबईची वर्णने व इराणमधली वर्णने यातला फरक पाहा. कोकण-मुंबै अस्सल उतरते तर इराण ओढून ताणून वाटते.

सावित्रीला पास - नॉट माय कप ऑफ टी. हे रसग्रहण वाचूनदेखील पुन्हा परत सावित्री वाचणे नोहे.

भुईकमळ....

"...एका बकुळ्गंधी झुळूकेचे बोट धरून मन वहात राहिलं सावित्रीच्या शब्दप्रदेशातून ....."

~ हे मला व्यक्तीश: फ़ार फ़ार आवडले....वाचकाचा सारा हळवेपणा आणि कादंबरीविषयीची प्रीति नेमकी उतरली आहे बकुळगंधात.....शब्दप्रदेशात.

भारतीनाही निश्चित्तच भावेल तुमची ही भावना.

अशोकजी , यावर काय लिहु कळत नाहिये .पण खूप छान वाटलं एक साधीशी ओळ तुम्हाला आवडली म्हणून . धन्यवाद !

भुईकमळ, ' भावस्थितीचा हरेक ऋतु ' शब्द आवडले. भावस्थिती म्हणजे जणू एकेका कालखंडात विस्तीर्ण पसरलेलं मनाचं माळरान.
भावुक भावबंबाळ नाही पण त्या प्रदीर्घ भावस्थितीचा निर्देश करते हे लेखन.
त्याचवेळी टण्या , तुमचीही प्रतिक्रिया सौम्य आणि प्रातिनिधिक आहे . '' काय आहे एवढं त्या सावित्रीत '' असं निरनिराळ्या सुरात म्हटलं जातंच.'अनीह' मधली कविता आठवली . हे सर्व आशय आणि फॉर्मवर केलेले सत्याचे प्रयोग आहेत , रुचतील, न रुचतील.
आता मातृकाबद्दल उत्सुकता लागली आहे.

लिहावं तर तुम्हीच भारतीताई.
मलाही भुईकमळ म्हणतात तसं "नेहमीपेक्षा काकणभर जास्तच नॉस्टेल्जिक करून गेला हा पुस्तक परिचय मला . एका बकुळ्गंधी झुळूकेचे बोट धरून मन वहात राहिलं सावित्रीच्या शब्दप्रदेशातून .." +१

Happy

काळाचा परिणाम म्हणावा किंवा अजून काय पण आजकाल सहज व्याकुळून जायला होत नाही. पण आज 'सावित्री' विषयी वाचून आत कुठेतरी ती व्याकुळण्याची ओढ अजूनही जिवंत असल्याचं जाणवतंय.
खरंतर खूप खूप आभार या परिचयाबद्दल भारतीताई.
सावित्री विषयी खूप ऐकलीय आजवर. आता मात्र तिला भेटण्याची ओढ लागलीय. (आणि मी तुमच्या परिचयाच्या माध्यमातून भेटतोय हे विशेष आनंददायक.)
सुखान्त मलाही आवडणार नाही बहुधा इथे पण सावित्रीला तिचं प्रेम मिळालं असेल तर किती सुंदर ना ?
तिच्यासारखं प्रेम करता यायला हवं, असंही वाटून गेलं क्षणभर.

>>े.’’मी काय लिहिलं म्हणजे
तुम्हाला बरं वाटेल ? प्रेम,प्रीती, अनुराग या
शब्दांची मला अपूर्वाई वाटत नाही.एकेकदा मला
वाटतं की स्वत:ला स्थिर करण्यासाठी आपण ही
केवळ निशाणं म्हणून वापरतो ..’’<<< हे मात्र अतिशय खरं.

उत्तम वाचनानुभवाबद्दल पुनःश्च आभार आणि सगळे प्रतिसादही समृध्द करणारे. Happy

खूप आभार रैना.
सुशांत..
>>तिच्यासारखं प्रेम करता यायला हवं, असंही वाटून गेलं क्षणभर.>> हे अगदी खरं.इतकं शांत होत जाणारं , उभयतांना समृद्ध करणारं प्रेम. ती ऋग्वेदातली ऋचा हेच तर सांगते.

पण तुझ्या प्रतिसादातील या एका इतक्या साध्या वाक्यातला आशय किती कमी वेळा सिद्ध होतो प्रत्यक्ष आयुष्यात.

अलीकडेच सावित्री वाचलं! सावित्री ही एक काल्पनिक व्यक्तिरेखा आहे यावर विश्वासच बसला नाही, किंबहुना ती काल्पनिक नाहीच, ती कित्येक जिवंत व्यक्तींपेक्षाही जास्त जिवंत आहे असं वाटलं। रेगेंना सावित्री सुचली पेक्षा सावित्री स्वतःच त्यांच्या लेखणीतून प्रकट झाली की काय अस वाटलं। खरंतर त्यातली प्रत्येक व्यक्तिरेखा जिवंत वाटते, ज्यांना उद्देशून ती पत्र लिहिले तो सुद्धा तितकाच संहत आहे!! खूप खूप आवडली सावित्री!!
जिथे माझ्यासारख्या माणसाला सावित्रीने असं झपाटून टाकलं तिथे भारतीताई सारख्या हळव्या कविमनाच्या व्यक्तीला तर ही सावित्री किती किती भावली असेल हे लक्षात येतंयच!!