दुर्लक्ष (लघुकथा)

Submitted by Charudutt Ramti... on 28 May, 2015 - 06:22

“दुर्लक्ष”

नानान्ना पेपर वाचता वाचता कधी डुलका लागला ते कळलच नाही. रविवारचा टाइम्स त्यांच्या आवडीचा. अगदी इंग्रजी वाचायला यायला लागल्या पासून ते आजतागायत, कित्येक वर्ष झाली असतील. निदान पन्नास तरी नक्की. टाइम्स घेतला की त्यांना आजूबाजूला कुणी असल-नसल भान नसायच. अगदी ‘एडिटोरियल’ पासून ते ‘क्लासिफाइड’ पर्यंत. काहीही गरज नसताना सोमवारचा ‘असेण्ट’ सुध्धा अगदी इण्टरेस्ट घेऊन चाळायाचे. वाचतांना कधी कधी इतकी तन्द्रि लागायची की सकाळी किंवा दुपारी चार वाजता, निवांत एकेक घोट घेत पेपर वाचावा म्हणून घेतलेला चहाचा कपही, पेपर वाचायाच्या नादात, अगदी गारढोण होऊन जायचा. नंतर कधीतरी बातमी किंवा आर्टीकल वाचून झाल की मग चहाचा कप बाजूला बेवारस होऊन पडल्याचा त्यांच्या लक्षात यायच आणि मग, तो गारढोण चहा ते एका घोटात पिऊन टाकीत. गोदीमामी मग चश्म्यातून तिरक्या नजरेन त्यांच्या कडे पाहत, तिला राग येई तो त्यानी तो गारढोण चहा काहीही कुरकुर न करता थंडपणे ढोसल्याचा. नाना तिची नजर चूकवायला परत पेपर मधे चेहरा घुसवत. लग्न झाल्यापासून हे अस कित्येक वर्ष घडत असेल. आठवड्यातून किमान एक दोनदा तरी नक्की! एक दोन नाही गेली गेली पन्नासएक वर्ष. गोदीमामीला त्यांनी कधी “चहा परत गरम करून दे” अस मागीतल नाही. आणि गोदीमामिनेही आपणहून कधी उठून तो नीवळलेला चहा गरम करून दिला नाही. गोदीमामीला त्यांच्या ह्या असल्या वागण्याचा मनस्वी त्रास होई. ती भाजीबीजी चिरता चिरता काही बाही बोलत राहायची. पण नानान्च तिच्या बोलण कशाबद्दल चालू आहे याकडे सुध्धा लक्ष नसायच. तीन काही प्रश्न जरी विचारला तरी नुसते ‘हु’ ‘हु’ अस म्हणायचे. बरेचदा तेही नाही. मग गोदीमामी चिडायाची. “कधी तरी उत्तर द्या, आयुष्य भर मेल दुर्लक्ष ” - अस खेक्सायची. तरीसुध्धा नाना पेपर मधे डोक खूपसून कपाळावरच्या आठ्यान्चि हालचाल करत काही तरी बारीक बारीक वाचत असायचे. गोदीमामीला सुरुवातीला जड गेल, पण हळहळू तिलाही याची सवय झाली. पण ती बोलायची थांबली नाही. नानान्बरोबर एकटेच काही तरी सुचेल ते बोलत राहायची. कधी माहेरच...कधी सोसायटी मधल्या कुणा मुला-मुलीच्या स्थळाविषयी, कधी कुणा शेजारी पाजारी फारच भांडणबिंडण झाल असेल तर ते... कधी अर्थपूर्ण कधी निरर्थक, पण सतत काहीतरी काही तरी बोलत राहायची. नान्नान्च लक्ष असो नसो.

डुलका लागल्याने नानान्चि खुर्चीवरची पकड जरा सैल झाली. खिडकीतून दुपारच्या वार्याच्या झोताने पेपर भर्रकन उडून गेला होता. त्या आवाजान नान्नान्चि सावध झोप मोडली. धूळ आत यायला नको म्हणून नाना त्यांच्या रेलिंग चेअर वरुन खिडकी बंद करायल म्हणून उठले. आणखी एका वार्याच्या झोताने कापटावरची आणखी सातआठ कागद अस्ताव्यस्तपणे इतस्तत: उडाली. टाइम्सची उडणारी पाने, अचानक उडालेले कपाटावरचे सुटटे कागद हे सगळ लगबगीने गोळा करता करता नानान्चि भलतीच तारांबळ उडाली. सत्तरी मधे आता पुर्वीइतकी शारीरिक चपळाई उरली नव्हती. तेवढ्यात नाना एखाद्या पाषाण मूर्ती सारखे थबकले. घरभर इतस्तत: उडणार्या त्या सुट्ट्या कागादान्कडे एका विचित्र शा शुन्य नजरेने पाहत तसेच उभे राहीले.

“ का गोळा करायचे ते कागद ? ”

नानान्नी स्वता:ला च प्रश्न केला.

“काय मिळवणार मी परत ते कागद फाईल ला लाऊन ? ” त्या पेक्षा ते कागद स्वैरत्वे उडताहेत तसे उडू देत.

खिडकीतून घरभर भिरभीरणार्या मोकाट वार्याचा जोर जसा कमी झाला आणि पाण्यावर गलबत हलाव तसा मंदपणे हलत एकेक कागद जमिनीवर स्थिराऊ लागला. पण एकदम त्याना काय वाटल कुणास ठाऊक? बिचारे एकटे नाना फरशीवर उकीडव चालत एकेक कागद गोळा करू लागले. गूढग्याला स्वतहाच्याच शरीराच वजन सहन होईना तसे मॅटकन खाली बसले. मूटकूळ झाल्यासारखे. मनाला क्षणभर विचार चाटून गेला आत्ता घरात गोदी असती तर गार फरशिवर अस बसू दिल नसत.

“बस्कर घ्या, परत सांधे धरतील आणि एकटेच कणहत बसाल रात्री”…अस चटकन म्हणाली असती.

नानान्नि तसच दुर्लक्ष केल असत तिच्याकडे. तीनेही उठून त्यांना बस्कर दिली नसत. तिला तरी कुठ होत होती दिवसातून पन्नास वेळा उठबस. नांनांना एकदम गोदी ने बस्कर सर्कवल्याचा भास झाला. एवढ्यात नाना परत भानावर आले.

खिन्न पणे एक एक कागद गोळा करू लागले. पहिलाच हाती आला तो गोदीचा आटोप्सि रिपोर्ट. क्षण भर नजर फिरवली आणि, दुसरा उचलला. आधी, ई.सी.जी. मग एक्सरे, मग कीमो मग रेडीयेशन मग मधेच एखादा हिमोग्राम, डिसचार्ज समरि एकेक करत गोदी च अल्पायुष्य नाना त्यांच्या थरतरत्या बोटान्मधे सामावून घेत होते. बराच काळ नाना तसेच बसून राहीले. पंधरा वीस मिनिट तरी झाले असतील. डोळ्यांमधे ओलसर दव साचल होत. हाताची बोट गार झाल्या सारखी वाटत होती. किती एक वेळ शून्यता. पिवळसर भिंतीवर असलेले फोपडेही अस्प्टश्ट दिसू लागेसस्तोवर नाना तसेच बसून होते.

नानान्ना गेल्या वर्षीचा सप्टेबर महिना आठवला. गणपती बुडुवून आले आणि, दुसर्याच दिवशी गोदीच दुखण बळावल. जणू काही गौर-गणपतीच सगळ नीट व्हाव म्हणून तीन कळ धरून ठेवली असावी तशी. ती न सांगता दुखण सहन करत होती का खरच गौरी गणपतीत ती व्यस्त असल्यामुळे तिला त्रास जाणवला नाही हे नांनान्ना काही शेवट पर्यंत उमगल नाही. काही दुखल खूपल, अगदीच अंगावर काढता नाही आल तर गेली कित्येक वर्ष गोदीमामि आणि नाना दाखवायला जात त्या मोकाशी डॉक्टरान्नि 'वेगळी शंका येतेय' अस सांगत डॉक्टर कामतान्कडे पाठवल. कामतन्नि सगळ्या तपासण्या करून घेतल्या. मनात एखादी पाल चुकचुक्ते तेंव्हा ती अभद्रपणे भिंतीवर कुठेतरी सरपटत असतेच. पहिल्या लॅबचे रिपोर्ट पॉज़िटिव आले म्हणून दुसर्या लॅबला सॅम्पल तिथेही पॉज़िटिव आले. आयुष्यात पहिल्यांदाच काही तरी 'निगेटिव' घडाव अशी आशा लावून बसलेल्या गोदी आणि नानान्चि दुसर्या लॅब च्या त्या रिपोर्ट ने पूर्ण निराशा झाली.

कामतान्नि गोदीमामीला "जरावेळ बाहेर बसा" अस सांगितल.
" कोण कोण असता घरी...? " कामत डॉक्टर.
“ मी आणि गोदी....दोघ ” नाना.
नाना बोलतात तेंव्हा आवाजात आजिबात चढ उतार नसतो. एका फ्रीक्वेन्सी ने रेडियो च स्टेशन लावाव तसे...निरव शब्दोचार.
“ मुलगा मुलगी कुठे असतात ? ” कामत डॉक्टर.
“नाही…आम्ही दोघच ” नाना.

डॉक्टर कामतान्नि फार वेळ घेतला नाही. सरळ मूदयाला आले.

“तुमच्या मिसेसना युटरस चा कॅन्सर आहे. स्टेज पुढची आहे. टाइपही रेअर आहे. मी फार टेक्निकल सांगत बसत नाही पण उगीच इकडे तिकडे दाखवत त्याना अधिक त्रास देऊ नका. आपण ट्रीटमेंट सुरू करू. फार अपेक्षा नका ठेऊ. ट्रीटमेंट 'क्युअर' साठी नाही तर ‘लाइफ प्रोलोन्ग’ होणे आणि वेदना कमी व्हाव्यात याकरिता आहे, हे धरून चला.”

नाना एखाद्या अद्न्याधारक मुलान गुरुजींच ऐकाव तस मुकाट ऐकत होते.
डॉक्टर कामतांच बोलण संपल्यावर ते खुर्चीतून उठले. फाईल हातात घेतली आणि मुकाटयाने पाठमोरे होऊन नजरेने दरवाजा शोधू लागले. आणि पुढच्याच एका क्षणात लहान मूल रडाव तसे रडू लागले.

गोदी मामिला एव्हाना जाणीव झाली होती. तिला फक्त दुख व्हायच.

“ ज्या गर्भाशयान एक जीव निर्माण करायचा ते गर्भाशयच आता माझ्या जिवावर उठल” अस पुटपुटायचि.

नांनांना ऐकू येई पण नाना नेहमी प्रमाण पेपर मधे मान खूपसून घेत. आणि गोदी पाहत नाही ना हे पाहून शर्टाच्या बाहीने पापण्या आणि नाक पुसून घेत. गोदीमामिला शेवट पर्यंत समजत नसे नानान्ना ती बोलली ते ऐकू गेल की नाही ते.

डॉक्टर कामातान्नि सहा महिने सागितले होते...गोदीमामी पाचच महिने टिकली. बरच भोगल. नानान्नि ‘आई ने लहान मुलाच कराव’ तस सगळ केल गोदीच. शेवटी गोदी मामी जाताना नानान्ना 'स्वता:ला जपाल न? ' एवढच बोलली. नानान्नि नुसतीच मान हलवली, आणि बाही ने परत डोळे टिपले. 'जपतो' अस बोलले आणि तिचा हात हातात धरून तिच्या ओटीपोटावर डोक टेकून पाशाणवत स्थिर झाले.

नानान्नि डोक वर घेतल तेंव्हा गोदी च्या वेदना संपल्या होत्या. नानान्ना समजेना...आपण 'जपतो' अस म्हणालो ते तीन ऐकल की नाही. की त्या आधीच गेली. नाना अस्वस्थ झाले. त्याना काही सुचेना.

“ गोदी मी तुला आज उत्तर दिल ग! मी जपतो स्वतःला म्हणून उत्तर दिल ग तुझ्या प्रश्नाच sss दुर्लक्ष नाही केल मी ”

नाना एकटेच सैरभैरपणे बोलले. त्याना काय कराव समाजेना. आपण बोललो ते गोदीन ऐकल की नाही ?? की तीन माझ्याकडून अपेक्षाच ठेवली नाही उत्तरची कधी. नाना अस्वस्थ झाले ते कायमचे. गोदी गेली तेंव्हा रडलेच नाहीत. ती सुटली म्हणून असेल कदाचित.

दहाव्याला गोदिच्या पिंडाला कावळा शिवला...फार वेळ लागला नाही. नसता शिवला तर नानान्ना काय कराव ते सुचत नव्हत.

आज सगळे जुने कागद, गोदिचे रिपोर्ट हवेत पसरले आणि नानान्ना पुन्हा बेचैन व्हायला झाल. नाना दोन्ही हातचे तळवे जमिनीवर दाबत आधार देत उठले. पेपर वाचता वाचता डुलका लागला होता तेंव्हा शेजारी गारढोण झालेला चहाचा कप बेवारस पणे उभा होता. नानान्नि कप उचलला...तरातरा स्वयपाक घरात गेले.. तसाच गार चहा न पिता गरम केला, पन्नास वर्षात प्रथमच. डोळ्यात साचलेल्या धूक्यात आणि चहाच् आधण आलेल्या वाफेमधे समोरच काहीही दिसेनास झाल ! नंतर बराच वेळ स्वयपाक घराच्या ओट्या वर दोन्ही हात टेकून नाना ह्मसा-हमशी रडत होते…गोदी गेल्या नंतर पहिल्यांदाच.

चारुदत्त रामतीर्थकर
२८ मे २०१५
पुणे,

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुन्न केलं तुमच्या कथेनं.

निरव शब्दोचार >>> हे काही समजलं नाही. रव (आवाज) नसलेले शब्दोच्चार म्हणजे नक्की काय? नानांना मनातल्या मनात बोलताना पण दाखवलं नाहीये.

गहिवरून आल ... खूपच भावनिक .

माधव - निरव म्हणजे शांत अशा अर्थाने असाव .

माझ्या एका कथेची लिंक देत आहे .. साधारण असच काहीस
http://www.maayboli.com/node/51018

फारच टचिंग आहे कथा. लिहिण्यातून बरंच काही पोहोचवलंत.
नाना अगदी डोळ्यासमोर लख्खं उभे राहिले.

Sunder.

खुप छान Happy

मनमोकळ्या प्रतिसादान्बद्द्ल सर्वान्चे आभार.

@ माधव - मला "कसलेच चढउतार नसलेले शब्दोच्चार" या अर्थाने म्हणायच होत. 'निरव' हा शब्द चपलख नाही हे मी मान्य करतो. मला 'एका लयित' या करिता दुसरा शब्द मिळाला नाही म्हणून 'निरव' वापरला. 'एकसुरी' पण चालला असता. पण कथा लिहिताना आठवला नाही.

@मयुरी : तुम्ही पाठवलेली लिंक वाचली. छानच झालीय कथा.

Pages