अधिवेशनामागचे चेहरे : श्री. अजय दांडेकर

Submitted by वैभव on 27 May, 2015 - 11:04

बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या २०१५च्या अधिवेशनाच्या संयोजनात सक्रीय असणार्‍या, श्री. अजय दांडेकर यांच्याशी नुकताच संवाद साधायची संधी मिळाली.

आपण आणि आपले कुटुंबिय अमेरिकेत कधीपासून राहत आहात?
माझे काका आणि काकू (शरद आणि स्मिता दांडेकर) १९६८ मध्ये अमेरिकेत आले. माझे आजी आजोबा (ताई आणि बाबूजी दांडेकर) आणि दुसरे काका (वसंत आणि वर्षा दांडेकर) १९७८ मध्ये अमेरिकेत आले. मी स्वत: १९९६ मध्ये आलो. एव्हढे जवळचे नातेवाइक रहात असल्याने मला अमेरिकेतही स्वत:च्या घरीच रहात असल्याचा अनुभव आला. आम्ही सर्वच दांडेकर मंडळी या ना त्या निमित्ताने मराठी समाजामध्ये कार्यरत होतो. आजी आजोबा इथे पौरोहित्यही करत असत. १९९१ ला जेव्हा लॉस एंजलीसमध्ये पहिल्यांदा बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अधिवेशन झाले तेव्हा सर्वच दांडेकर मंडळींनी त्यात भाग घेतला होता. आमच्या चार पिढ्यांनी इथे कैक वर्षापासून वास्तव्य केले आहे. यावर्षीच्या अधिवेशनाची संकल्पना ‘मैत्र पिढ्यांचे’ ही आहे. मी हे पिढ्यांचे मैत्र आमच्या घरीच फार जवळून पाहिले आहे. आमच्या सारख्याच इतर अनेक मराठी मंडळींनाही लॉस एंजिलीसमध्ये हे मैत्र जपताना मी पाहिले आहे.

Dandekar family photo.jpgबृहन्महाराष्ट्र मंडळाशी आपला संबंध कधीपासूनचा आहे ?
बृहन्महाराष्ट्र मंडळाशी पहिला संबंध २००९ साली आला. २००९ ते २०११ आणि २०११ ते २०१३ अशा दोन वेळी मी बृहन्महाराष्ट्र मंडळाचा खजिनदार होतो. शिकागो आणि बॉस्टन या दोन्ही अधिवेशनांच्या समितीवर मी होतो. त्यामुळे या दोन अधिवेशनांची तयारी अगदी जवळून पहायला मिळाल्याने या अधिवेशनात त्या अनुभवाचा चांगलाच उपयोग झाला.

लॉस एंजिलीसला अधिवेशन आणायचं ठरलं तेव्हा आपली पहिली प्रतिक्रीया काय होती?
फिलाडेल्फीयाचं अधिवेशन हे मी पाहिलेलं पहिलं अधिवेशन. ते पाहिल्यापासून असं अधिवेशन लॉस एंजिलीसला व्हावं ही इच्छा होतीच. २०१३ मध्ये शैलेश शेट्ये आणि त्यांच्या चमूने पुढाकार घेऊन अधिवेशन लॉस एंजिलीसला करण्यासाठी अर्ज केला. ज्या दिवशी मला अधिवेशन लॉस एंजिलीसला मिळालं हे कळलं तेव्हा आनंद झाला. एक मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर येऊन पडली आहे याचीही लगेचच जाणीव झाली. क्षणभर भितीही वाटली. पण भिती लगेचच पळून गेली. दोन अधिवेशनावर काम करायचा अनुभव होताच. त्याशिवाय लॉस एंजिलीसच्या २०० कष्टाळू स्वयंसेवकांनीही हा भार हलका केला आहे.

अधिवेशनामधलं आपलं कार्यक्षेत्र कोणतं?
मी या अधिवेशनाचा सहसंयोजक म्हणून काम पहात आहे. या अधिवेशनात माझा भर कार्यक्रमांवर आहे. लहानपणापासूनच माझ्यावर अभिनयाचे आणि नाटकाचे संस्कार झाले. ‘संस्कार’, ‘एका हाताची टाळी’ या टिव्ही मालिकांमध्ये दिलीप प्रभावळकर, मोहन जोशी अशा कलाकारांबरोबर मला काम करायची संधी मिळालेली आहे. लहानपणी झालेले संस्कार कायम टिकून रहातात. १९९६ मध्ये अमेरिकेत आल्यानंतरही मी अनेक नाटकांमध्ये कामे केलेली आहेत - आजही करतोय. त्यामुळे एकंदरीतच अधिवेशनाचे कार्यक्रम ठरवण्याऱ्या समितीमध्ये काम करण्यात जास्त रस होता.

भारतातील कोणते विशेष कार्यक्रम आपल्याला या वेळच्या अधिवेशनात पहायाला मिळणार आहेत?
मैत्र पिढ्यांचे या संकल्पनेला अनुसरुन वेगवेगळ्या पिढ्यांना आवडतील असे भारतातील कार्यक्रम या अधिवेशनात पहायला मिळतील. भारतातून अलिकडे आलेल्या तरुणांना अवधूत गुप्ते चांगलेच माहिती आहेत. गोष्ट तशी गमतीची हे सध्या भारतात गाजत असलेले आणि पिढ्यांचा संघर्ष दाखवणारे नाटक आपल्याला या अधिवेशनात पहायला मिळणार आहे. मागच्या पिढीला आवडतील असे गोष्ट ‘एका काळाची, काळ्या पांढऱ्या पडद्याची’ हा मराठी सिनेमाचा ‘प्रभात’ काळ दाखवणारा कार्यक्रम आहे. चित्रपट, नाट्य, संगीत, चित्र अशा अनेक कलांचा कोलाज या कार्यक्रमामध्ये आपल्याला पहायला मिळेल. आनंद भाटे यांचा गंधर्व हा बालगंधर्वावरचा कार्यक्रमही मागील पिढीला आवडेल. 'कथा कोलाज' म्हणजे मराठी लघुकथांचे सादरीकरण. मराठी साहित्याच्या खजीन्यातील अत्युत्कृष्ट तसेच दुर्मिळ कथा नामवंत कलाकार सादर करतील. द्वारकानाथ संझगिरींचा ‘मी पाहिलेले लेजंड’ हा कार्यक्रम क्रिकेट शौकिनांना आवडेल. हर्ष भोगलेबरोबरचा ‘टि टाईम’ हा क्रिकेटवरचा कार्यक्रमही अलिकडे आलेल्या पिढीला आवडेल. सत्यजित पाध्ये यांचा बोलक्या बाहुल्यांचा कार्यक्रम लहान मुलांना नक्की आवडेल. हा कार्यक्रम सत्यजित इंग्रजीमध्ये सादर करणार आहेत.

उत्तर अमेरिकेतून येणाऱ्या कार्यक्रमापैकी काही खास कार्यक्रमांविषयी सांगाल का?
सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या इतिहासात एखाद्या अधिवेशनाला इतका चांगला प्रतिसाद मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. या वर्षी आम्हाला उत्तर अमेरिकेतून तब्बल १०६ कार्यक्रमांकडून अर्ज आले. हे सगळेच कार्यक्रम खरंतर उत्तम आहेत. पण काही कार्यक्रमांचा उल्लेख केल्यावाचून मला रहावत नाही. पाण्याच्या प्रश्नावरचे न्यूजर्सीचे ‘उदकशांती’ हे नाटक, शिकागोचा ‘पडल्यावर प्रेमात’ हा कार्यक्रम, Call of Silicon Valley हा बासरी आणि संतूरचा कार्यक्रम (हा कार्यक्रम सादर करणारे कलाकार पंडीत हरीप्रसाद चौरसिया व पंडीत शिवकुमार यांचे शिष्य आहेत), प्रत्येक अधिवेशनात लोकांना आवडणारा ‘उभ्या उभ्या विनोद’, सॅन फ्रान्सिस्को बे एरीआच्या ‘कला’ च्या समीप रंगमंचमधील एकांकिका अशा कित्येक उत्तमोत्तम कार्यक्रमांची या अधिवेशनात रेलचेल असणार आहे. पण नुसते मनोरंजन करणे हा अधिवेशनाचा हेतू नाही. उत्तर अमेरिकेतील मराठी समाजाच्या गरजा लक्षात घेऊन अनेक माहिती देणारे आणि विचार करायला लावणारे कार्यक्रमही या अधिवेशनात आपल्याला पहायला मिळतील. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यशाळा, मानसिक आरोग्यावर ‘आपले आरोग्य आपल्या मनात’, ‘Make death your friend’, ‘Alcohole Addiction’, ‘आता पुढे काय’ हा आयुष्यातील कठीण प्रसंगी मार्गदर्शन करणारा कार्यक्रम असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आपल्याला पहायला मिळतील.

उत्तर अमेरिकेत वाढलेल्या पिढीसाठी या अधिवेशनात खास काय काय करणार आहात?
उत्तर अमेरिकेत वाढलेल्या पिढीसाठी आम्ही खास कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. उत्तर अमेरिकेतली मराठी समाजातील अनेक इच्छुकांना आपला जोडीदार मिळावा म्हणून आम्ही खास http://www.minglemangal.com/ ही वेबसाइट तयार केली आहे. अधिवेशनाला येणाऱ्या आणि इच्छुक मुला मुलींनी या वेबसाइटवर नोंदणी करावी. तिथे ओळख झालेल्या मुला मुलींना अधिवेशनात प्रत्यक्ष भेटता येईल. आणि ही वेबसाइट फक्त तरुण मुलामुलींपर्यंत मर्यादीत नाही. कुठल्याही वयोगटातील लोकांना जोडीदार किंवा कंपॅनियन हवा असेल तर त्यांना या वेबसाइटवर नोंदणी करता येईल. अशा प्रकारची व्यवस्था बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच केली आहे. त्याव्यतिरीक्त स्पीड डेटींग आणि स्नेह बंधन हे कार्यक्रमही ठेवले आहेतच. आणि याव्यतिरीक्त युवा पिढीसाठी खास डिनर क्रूझचे आणि बॉलिवूड वर्कशॉपचेही आयोजन करण्यात आलेले आहे.

मायबोलीकरांची तुम्हाला काय मदत होऊ शकते?
मायबोलीकरांनी या अधिवेशनाची माहिती मिळवून ती मायबोलीवर जितकी पसरवता येईल तितकी पसरवायचा प्रयत्न केला तर खूप मदत होईल. अनेक मायबोलीकर चांगले लेखक आहेत, त्यांनी या अधिवेशनाची माहिती मिळवून लेख लिहावेत. सोशल मिडीयातूनही अधिवेशनाचा प्रसार करावा. आमच्या फेसबुक पेजला (www.facebook.com/bmm2015) भेट देऊन ‘लाइक’ करावे. अधिवेशनाला यायला जमलं तर अधिकच उत्तम. तिथे जमलं तर जरुर भेटूया.​

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान ओळख!
भारतातून आणि उत्तर अमेरिकेतून येणारे कार्यक्रम सर्वसमावेशक वाटत आहेत Happy
२०० कार्यकर्ते मनापासून झटून तयारी करत आहेत ते अधिवेशन नक्कीच छान होणार, अधिवेशनासाठी मनापासून शुभेच्छा Happy

चार पिढ्या अमेरिकेत.... (अन् तरीही) मराठीशी नाते टिकवून आहेत मंडळी कौतुक आणि आदर

अधिवेशनासाठी अनेकानेक शुभेच्छा Happy