एक आग्रहाचे सहपरिवार निमंत्रण (Movie Review - Tanu Weds Manu Returns)

Submitted by रसप on 24 May, 2015 - 00:01

असं म्हणतात की एका व्यक्तीचे, एकाच आयुष्यात दोन जन्म होत असतात. एक आईच्या पोटातून बाहेर येताना आणि दुसरा घराच्या कोषातून बाहेर पडताना, दुनियेत स्वबळावर, स्वत:च्या पायावर उभं राहाण्याचा प्रयत्न सुरु करताना. पण हे अर्धसत्य असावं. कारण (बहुतेक) लोकांचा अजून एक जन्म होतो. लग्नाच्या नोंदणीपत्रावर सही केल्यावर रजिस्ट्रार मिश्किलपणे हात मिळवत असताना किंवा गळ्यात लग्नाची माला पडताना. डोक्यावर अक्षता पडतेवेळी म्हटलं जाणारं 'शुभ मंगल सावधान' मधलं 'सावधान' म्हणजे खरं तर 'अतिसावधानतेचा इशारा' असतो. भटजी शक्य तितक्या कठोर, रुक्ष आणि उच्चरवात 'सावधान' उच्चारून तो इशारा पोहोचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात, हे आंतरपाटाच्या दोन बाजूंना उभ्या असलेल्या दोन व्यक्तींना आप्तेष्टांच्या अतीव कौतुकानंदाच्या झगमगाटात समजुन येत नाही आणि त्यांच्या नकळतच त्यांचा तिसरा जन्म होतो. 'अमुक वेड्स तमुक'.
पण कधी कधी ही जन्मशृंखला इथे खंडित होत नाही. एका लग्नाचा अतिशय वाईट अनुभव आल्यावर एखादा हिंमतवान 'मनू' असाही असतो की तो स्वत:च्या चौथ्या जन्माचासुद्धा घाट घालतो. अर्थात त्याला कारणही तसंच असतं.
सांगतो.

तनू (कंगना राणावत) आणि मनू (आर. माधवन) लग्न करून लंडनला स्थायिक होतात. पण लग्नानंतर चारच वर्षांत एकमेकांना नकोसे होतात. भांडणं इतकी विकोपाला जातात की अखेरीस ते वेगळेही होतात. दोघेही परत भारतात आपापल्या 'माहेरी' परततात आणि एक नवीन आयुष्य सुरु करायचा प्रयत्न करतात. लग्नापूर्वीचा स्वत:चा विक्षिप्त आणि बिनधास्त स्वभाव तनूने लग्नानंतरही जपलेला असतोच आणि लग्नापूर्वीचा आपला बुजरा स्वभाव मनू लग्नानंतरही बदलू शकलेला नसतो. सारं काही नव्याने सुरु होणार इतक्यात मनूला 'कुसुम' दिसते. कुसुमचा चेहरा तनूशी खूपच मिळता-जुळता असतो. दिल्ली युनिवर्सिटीत अ‍ॅथलीट कोट्यातून प्रवेश मिळवणाऱ्या हरयाणवी कुसुमशी त्याची ओळख होते, वाढते आणि मनू शादीचा दुसरा लड्डू खाण्याचा निर्णय घेतो.
मात्र रणरणत्या उन्हात घश्याला कोरड पडलेली असताना आणि डोळ्यांची आग होत असताना दूरवर दिसणारा पाण्याचा साठा नुसताच एक आभास असतो किंवा वरवर शांत दिसणाऱ्या पाण्याच्या आत बऱ्याचदा भोवरेही असतात. हा आभास किंवा हे भोवरे तनू आणि मनूला बरंच काही फिरवून, दाखवून आणतात.
फक्त ह्या दोघांनाच नाही, तर ही सफर घडते राजा अवस्थी (जिमी शेरगिल), पप्पी (दीपक दोब्रीयाल), चिंटू (मोहम्मद झीशान अय्युब) आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 'कुसुम' (कंगना) लाही !

जिमी शेरगिल सहाय्यक भूमिकांचा बादशहा बनत चालला आहे. त्याचा राजा अवस्थी, इतर अनेक चित्रपटांमधल्या त्याच्या ह्याच लांबीच्या भूमिकांप्रमाणेच लक्षात राहतो. खरं तर हा एक चांगला अभिनेता आहे, असं माझं मत. पण चांगल्या, आव्हानात्मक प्रमुख भूमिका त्याला कधी मिळणार आहेत कोण जाणे !

दीपक दोब्रीयालला आपण अनेक चित्रपटांत पाहिलेलं आहे पण लक्षात आलेलं नसेल. 'दबंग - २' मधला गेंदासिंग त्यातल्या त्यात स्मरणात असावा. जुन्या काळात हिरोचा मित्र किंवा भाऊ चित्रपटातला मुख्य कॉमेडीयन असायचा. तो फॉर्म्युला दीपकच्या रुपात इथे परत आला आहे. जबरदस्त टायमिंगच्या जोरावर तो अनेक जागी खळखळून हशा पिकवतो.

'चिंटू'च्या भूमिकेतला मोहम्मद अय्युब दिग्दर्शक आनंद रायच्याच 'रांझणा'त आपण 'मुरारी' म्हणून पाहिला होता. तोच मुरारी नव्या नावाने इथे आला आहे, असं वाटतं. दीपक आणि चिंटू दोघे मिळून प्रेक्षकाला सतत उसळवत ठेवतात !

माधवन त्याच्या टिपिकल शैलीत 'मनू' उभा करतो. समंजस, मितभाषी व मनातल्या मनात धुमसणारा मनू का कुणास ठाऊक माधवनच्या व्यक्तिमत्वास साजेसा वाटत राहतो. संयत अभिनय आणि विश्वासपूर्ण वावर हे माधवनचं अगदी सुरुवातीपासूनचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे खरं सांगायचं तर तो उत्तम काम करतो, ह्यात नवल असं वाटतच नाही.

कंगना राणावत बिनधास्त तनू आणि हरयाणवी कुसुम ह्या परस्परभिन्न व्यक्तिरेखा जबरदस्त साकारते. खासकरून 'कुसुम'. विना मेकअप आणि पुढे आलेले दात व लहान केस ह्यामुळे अगदी अनाकर्षक दिसणाऱ्या कुसुमबद्दल आपल्या मनातही एक हळवा कोपरा निर्माण होतो, ह्यातच तिचं यश सामावलं आहे. काही ठिकाणी तिचे उच्चार सफाईदार वाटत नाहीत, मात्र ते किरकोळ.

मध्यंतरानंतर जराशी धीमी गती, जरासं भरकटणं आणि शेवटाकडे बऱ्यापैकी रखडणं वगळल्यास 'त.वे.म.रि.' एक अस्सल मनोरंजनाचं पूर्ण पॅकेजच आहे. पूर्ण पॅकेजमध्ये अर्थातच 'संगीत' समाविष्ट नाही. चित्रपटातला 'संगीत' विभाग हा शाळेच्या अभ्यासक्रमातल्या भाषाविषयाप्रमाणे दुय्यम, तिय्यम झालेला आहे. त्यामुळे गाणी एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने शांतपणे सोडून देताना मधल्या भागात ढणढणाट होऊन भिरभिरलं नाही, तरी आजकाल मनापासून समाधान वाटतं ! मग लक्षात ठेवण्यासारखं काही नसलं तरी ठीक ! (काय ही वेळ ! सज्जादपासून रहमानपर्यंत सगळ्यांची हात जोडून क्षमा मागतो !)

खुसखुशीत संवाद आणि अनेक परिस्थितीजन्य विनोदांना पडद्यावरील कलाकारांच्या उत्तम टायमिंगची जोड मिळाल्याने धमाल येते. भावनिक दृश्यंही अतिरंजन न करता खूपच संयतपणे हाताळली असल्याने एकंदरीतच, जरी कथा बऱ्याच योगायोगांवर आधारित असली तरी, बाष्कळपणा व पांचटपणा कुठेच वाटत नाही.

दिग्दर्शक आनंद राय ह्यांचे विशेष अभिनंदन ह्यासाठी करायला हवे की फार क्वचित एखाद्या चित्रपटाचा दुसरा भाग पहिल्या भागापेक्षा जास्त चांगला जमून येतो आणि तेच इथे झालं आहे. किंबहुना, पहिला भाग पाहिला नसला तरी दुसरा पाहताना काही विशेष फरक पडत नाही. पात्रांची पूर्वीची ओळख एखाद-दोन संवादांतून लगेच होऊन जाते आणि वेगवेगळ्या प्रसंगांतील वेगवेगळे संदर्भ नकळतच आपण जोडतो आणि सगळी पार्श्वभूमी लगेच लक्षात येते. उदा. चिंटू तनूला म्हणतो, 'सूना हैं दो-दो बारातें आयी थी आपकी शादी में. गोली-वोली भी चल गयी थी !' आणि जरा वेळाने राजा अवस्थीची 'एन्ट्री' होते त्यावेळी तो तनूला म्हणतो, 'आपसे दिल हटाया तो पूजा-पाठ में लगाया !' लगेच कनेक्शन जुळतं की दुसरी बारात राजा अवस्थीची होती आणि त्याच्या एकंदर आविर्भावावरून गोळी का व कशाला चालवली गेली असेल, हेही उलगडतं.

थोडक्यात, 'तनू वेड्स मनू' रिटर्न येण्याचं प्रयोजन सफल झालं आहे, असं म्हणण्यास हरकत नसावी. दोन अडीच तासांचं ग्यारंटीड मनोरंजन आणि तेही वास्तव व सभ्यतेच्या सर्व मर्यादा पाळून, ह्याहून अधिक काय हवं असतं आपल्याला ?
त्यामुळे ह्या चौथ्या पुनर्जन्माच्या कौतुकानंदसोहळ्यासाठी सर्वांना आग्रहाचे, सहपरिवार निमंत्रण ! अवश्य येणे करावे. अहेर वा पुष्पगुच्छ न आणता पॉपकॉर्न व सॉफ्ट ड्रिंक्स आणावीत.

रेटिंग - * * * १/२
http://www.ranjeetparadkar.com/2015/05/movie-review-tanu-weds-manu-retur...

हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये आज (०३ मे २०१५ रोजी) प्रकाशित झाले आहे :-

12 - Tanu Weds Manu Returns - 24-May-15.JPG

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!
दोन्ही परीक्षणे पॉजिटीव्ह, आवडीचा माधवन, आणि प्रोमोजवरूनही चांगला वाटतोय.
पुढचा वीकेंड यासाठीच राखायला हरकत नाही.

पण पहिला भाग पाहिला नाही, आणि आता एवढ्या लेट बघायची इच्छाही नाही.
तरी त्याने फारसा काही फरक पडणार नाही हे आता गृहीतच धरतो.

जवळपास एकेक शब्दाला अनुमोदन ..
संगीत का तर मला आवडल .. बन्नो तेरा स्वेटर मधे काय खत्रा नाचलीय कंगना ..मस्त .
एका बारात मधे येड्यासारख नाचून मग कोर्‍या दुखर्‍या चेहर्‍यान बाहेर येणं जबरी .. दोन्ही कंगना मस्त वठवल्यायत तिनं ..
माधवन चा शेवटचा आवाजातला कंप .. नही हो रहा .. पहिल्या त वे म मधल्या मै क्या करू ची आठवण देऊन जात..
बाकी जिमी शेरगिल बद्दल अज्जिब्बात दुमत नै .. मोहोब्बते सोडला तर हरेक चित्रपट मस्तच.. मग तो वेनस्डे असो कि साहेब बिवी और गँग्स्टर .. झक्कास्स..
दिपक डोब्रियाल गुलाल मधल्या भट्टी पासुन जास्तच लक्षात राहिला .. त्याच पहिल्या त वे म मधलं जय माता दि सुपर्ब Lol ..

Malaa pahilaa bhaag titakaasaa aawaDalaa navhataa. PaN haa bhaag baghen nakkee. Jimi malaa special 26 aaNi Jahaa madhehee aawaDalaa hotas. ( bang bang madhehee

क्वीननंतरचा कंगणाचा बेस्ट परफॉर्मन्स. दोन्ही भुमिका अगदी वेगवेगळ्या वाटतात. खासकरुन कुसुमचा रोखठोकपणा तर अगदीच मनाला भिडला. जो तनू मधे शेवटपर्यंत दिसला नाही. अगदी सुरुवातीपासून तनूचा चंचलपणा आणि कुसुमचा स्वतःवर असलेला आत्मविश्वास या दोन व्यक्तिरेखांमधले द्वंद शेवट पर्यंत उत्तम बांधून ठेवले आहे. कंगणाने नायिका , खलनायिका, सहनायिका तिन्ही आघाड्या अगदी लिलया उठवल्या आहेत. पिकू नंतर लगेच तनुवेड्समनूरिटर्न बघितल्याने श्रीखंडानंतर गुलाबजामून+रसगुल्ले खाल्याचा अनुभव आला. मधे काहीच बेचव बघितले न गेल्याचा आनंद जास्त आहे.
दोन्ही कंगणाने भुमिका केल्या असल्या तरी शेवटपर्यंत कुसुममधेच जीव जास्त अडकला जातो. कमालीचा साधेपणा व निरागसता दोन्हींमुळे कुसुम अधिक सुंदर दिसते.

माधनव बद्दल लिहुन उपयोग नाही. तो मनूच वाटतो नेहमी प्रमाणे कन्फुज्ड चेहर्‍यावर सारखे१२ वाजलेले. नैसर्गिक अभिनय करणार्‍यांबद्दल जास्त लिहु नये असे मला वाटते. चित्रपटात माधवन नुसता उभा राहिला तरी तो "मनु" वाटतो इतका त्या भुमिकेत शिरला आहे.

जाताजाता टीप:- दुसरीला पकडा रस्ता चुकलेली बायको सरळ होते (हे प्रसंगानुसार उलटसुलट देखील होउ शकते. संबंधितांनी आणि या टीपवर विचार करणार्‍यांनी खास का़ळजी घ्यावी) Light 1 Lol

जाताजाता टीप:- दुसरीला पकडा रस्ता चुकलेली बायको सरळ होते (हे प्रसंगानुसार उलटसुलट देखील होउ शकते. संबंधितांनी आणि या टीपवर विचार करणार्‍यांनी खास का़ळजी घ्यावी)
<<
नाही, बायको नाही सरळ मार्गी लागत , ती तशीच होती-आहे :), in fact she starts doing even more crazier things , म्हणून नवरा आत्मपरिक्षण करु शकतो आणि सरळ मार्गी लागतो Wink
"हम तो ऐसेही थे , पागल ! आप कब बदल गए शर्माजी? " - इति तनु :).
धमाल आहे सिक्वल.. enjoyed every bit of it !

नाही, बायको नाही सरळ मार्गी लागत , ती तशीच होती-आहे स्मित, in fact she starts doing even more crazier things , म्हणून नवरा आत्मपरिक्षण करु शकतो आणि सरळ मार्गी लागतो डोळा मारा
"हम तो ऐसेही थे , पागल ! आप कब बदल गए शर्माजी? " - इति तनु स्मित. >> +१००००००

हम जरासे बेवफा क्या हो गये .. आप तो बच्चलन हो गये . धन्य _/\_

हम जरासे बेवफा क्या हो गये .. आप तो बच्चलन हो गये . धन्य _/\_
<< Happy
धमाल केलीये कंगनानी !
बच्चन जसे टाळ्या शिट्ट्या घ्यायचा तसे शिट्ट्या डिझर्व करणारे सीन्स आहेत कंगनाचे :).(कुसुम आणि बॅड गर्ल तनु दोघींचे !)

टिनाजी ...बन्नो तेरा स्वेटर >>>>>स्वेटर नसुन स्वेगर ( swagger )
आहे .......कंगना दोन्ही भुमिका अक्षरशा जगली. .....एक अतिशय सुंदर चित्रपट.

संगीत अ‍ॅक्च्युअली चांगले आहे. स्वेगर, मूव्ह ऑन, ओल्ड स्कूल गर्ल, घनी बावळी मस्त गाणी आहेत.
पार्ट वन मध्ये 'कजरा मुहब्बतवाला' मध्ये अशक्य धमाल आहे! ते गाणे मुळातच इतके फनी आहे की त्यावर पुन्हा नाचायचे म्हणजे महाभारी रिस्क. कंगना त्यात इतकी सहज आहे, केमिस्ट्री मस्त आहे. त्या पार्श्वभूमीवर एखादे जुने गाणे दुसर्‍या भागात वापरणे म्हणजे पुन्हा महाभारी रिस्क. पण जा जा जा बेवफा इतके सुंदर वापरले आहे की हॅटस ऑफ.
(अजून एक-दोन गाणी आहेत पण रसप म्हणतात तशी ती फरगेटेबल आहेत.)

Swagger bhannnat jamalay ani avadala mala

Movie awesome superb amezing

Madhavan nehamich avadato ani to ka avadato te punha ekda kalal as mhanen

Kangana baddal Shabdch nahit
What an talented actor she is yaar ! Mind blowing.
Eka hi kangana duasari madhe misalat nahi...
I jst love her... Jiyo kangana jiyo..

Ardha star story la
Ek star madhavan la
Ek star itara sagalya kalakarana
Ek star kanganala
Ani uralela did star dialogs na

Full on five on five stars mazyakadun
Punha pahanar.

ओह्ह्ह मी ते इंग्रजी डिड वाचले आणि काहीही अर्थ नाही लागला मला. राईट रियाचे फुल्ल ऑन ५ झाले पूर्ण Happy

सी Wink

रसप
छान परिक्षण.
कालच पाहिला. आणि चक्क आवडला.
आणि गाणीही मस्त!
स्वॅगरच आहे ते.........................स्वॅगर म्हणजे तोरा!
आणि ते एक विंग्रजी गाणं ..........सेन्टिमेन्टल....ते वरिजनल विन्ग्रजी सॉन्ग आहे का? म्हणजे आधीच फेमस असलेलं इ.इ.?( घोर अज्ञान!)
आणि तो दिपक डोब्रियाल???? तो अशक्यच आहे! Biggrin

महेशकुमार >> अर्रे अस्स आहे का.. मी आपलं स्वेटरच ऐकतेय Lol
चुकी दुरुस्त केल्याबद्दल धन्यवाद..

एकट्या तवेम वर तीन धागे आणि सगळीकडे वेगवेगळे प्रतिसाद .. हा हा हा..

बाकी रीया सहमत.. माझे पण फुल्ल ५ * .. आणि हा मी पन परत एकदा बघणार ..
सद्ध्या सगळे तेच गाणे वाजताहेत स्पिकर वर Wink .. साड्डी गली भुलके भी आया करोजी च गरबा व्हर्जन मस्त

What an talented actor she is yaar ! Mind blowing
>>>>>>>>>>>>>>>>>
रीये... एकदम ३डी च्या आशूची आठवण आली हे वाचून Proud (संदर्भः अ‍ॅन आ आणि अ‍ॅन अकोंडा चा एपिसोड)
एव्हरीबडी ऑन द डान्स फ्लोर.... Rofl

रसप..... नेहमीसारखंच परिक्षण मस्त.