चिकतुळी

Submitted by धनुर्धर on 23 May, 2015 - 14:09

आमच्या शेताच्या थोडं पुढं गेल की एक डोंगराची रांग लागते. त्या डोंगरावर गेलं आणि आमच्या शेताकडे नजर टाकली की एक भलमोठं आंब्याच झाड नजरेत भरायचं तेच चिकतुळीच झाड. डोंगरावरूनच कशाला इतर कुठूनही त्या झाडाचा भारदस्तपणा नजरेत भरत असे. तसे बघायला गेल्यास आमच्या शेताच्या बांधावरील केळ्या आंबा सुद्धा खूप मोठा होता. पण चिकतुळीची गोष्टच वेगळी होती. तिच्या शेंड्याकडं बघायच म्हणजे मान पडायला व्हायची.
त्या झाडाचं नाव चिकतुळी का पडलं असेल ते मात्र कुणालाच माहीत नव्हते. अनेक जुन्या लोकांना विचारले. पण त्यानांही माहीत नव्हते किंबहुना, चिकतुळी म्हणजे काय? हे ही कुणाला सांगता येत नव्हते. मात्र पंचक्रोशीत एवढे झाड नाही असे मात्र ते म्हणत असत. चिकतुळीचा विस्तारच एवढा होता. फांद्या अजस्त्र आणि लांबच लांब पसरल्या होत्या. त्या फांद्याना अनेक गाठी झाल्या होत्या. त्यांना बीळं होती. त्यांना डोली म्हणत असतं. लहानपणी मोठी माणसे सांगायची , त्या डोलीमध्ये साप रहातो. मला त्या डोल्यांची खूप भीती वाटायची. चिकतुळीचे खोडाला मिठी मारायची म्हटलं तर चार ते पाच माणसांच्या हातांच्या लांबीचे हात लागतील एवढा त्याचा घेरा होता. अनेक ऊन पावसाळे बघितलेल्या आजोबांच्या चेहऱ्यावर जश्या सुरकूत्या असतात तश्या ढपल्या त्या खोडावर होत्या. झाडावर पाने तर एवढी विपुल होती की, झाडावर कोणी लपुन बसले तर खालच्या व्यक्तीला कळत नव्हते. सावली तर एवढी दाट पडे की जणू तेवढ्या भागापुरती रात्रच. दुपारच्या वेळी शेतकरी तिथं विश्रांतीसाठी येत. त्या झाडाच्या गार सावलीत शांत झोप लागे.
आंब्याच्या मौसम आला की, बहार उडायची. पहाटे पहाटे जो

त्या झाडाच्या खाली जाई त्याला आंब्याचा खजिनाच सापडत असे. आंब्याचा आकार बारीक चेंडूसारखा असे आणि पिकला की त्याला थोडीशी पिवळी झाक यायची. खाल्ला की मात्र खडीसाखर तोंडावर ठेवल्यासारखं वाटायचं. जिव्हा नि मन तृप्त करण्याची ताकद होती त्या आंब्यात.
आमच्या गावात लग्नाच्या आधल्या दिवशी नवरा किंवा नवरीने गावदेवांना नमस्कार करण्याची प्रथा आहे. त्यात या आंब्याचा ही मान होता. नवरा मुलगा किंवा मुलगी ढोल ताशाच्या गजरात आंब्याजवळ येऊन त्याला नमस्कार करत पानसुपारी देऊन लग्नाचे आमंत्रण देत. आणि ते झाडही त्यांना आर्शिवाद देई.
माणसांप्रमाणे कदाचित त्यांच्यापेक्षा जास्त लळा पशुपक्षांना त्या झाडाचा होता. ते झाड त्यांचा निवारा होता. संध्याकाळी त्या झाडावरचा किलबिलाट दूरवर एकू येत असे.
अश्या या चिकतुळीला कीड लागली. वादाची . . . .
ते झाड भावकीच्या वादात सापडलं. अनेक वादळे परतवून लावणारं झाड या वादळात नाही टिकू शकलं. वाद झाले. भांडणे झाली. स्वतंत्र राहणारी मुले जसे आपले आई बाप वाटून घेतात तश्या झाडाच्या फांद्या वाटून घेण्यात आल्या. पशुपक्षांच्या वाट्याला मात्र निराधारपण आलं. त्यांची घरटी उधवस्त झाली. ज्या फांद्याचे मधाळ आंबे खाल्ले त्यांच्यावर कुर्हाडी चालवण्यात आल्या. हात तोडलेल्या देहासारखं झाड लुळपांगळ दिसू लागलं. खोड तसच राहिले. काही दिवसांन त्यालाही वाळवी लागली. आणि एका संध्याकाळी त्याला अग्नीने आपल्या कवेत घेतले. आग कोणी लावली , काहीच कळले नाही. मात्र झाड तीन दिवस अहोरात्र जळत होतं. आणि ती चिता विझवण्याची ताकद कशातही नव्हती. अगदी माझ्या अश्रूतही . . . .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख आवडला. लहानपणी खाल्लेल्या मुबलक रायवळ - गोटी आंब्यांची आठवण आली. कलमी आंबे तेव्हा जुनमधेच मिळ्त .. तोतापुरी, बदाम वगैरे.. अन हापूस केसर इ. आंबे केवळ ऐकून माहित होते. कधीतरी मुंबईत चाखलेले.
हे गावरान आंबे तेव्हा १७, ३४, ५१ असे नगांनी मिळत असत. चोखून खाण्यात फार मजा येत असे.

छान लिहिले आहे पण ...

एका संध्याकाळी त्याला अग्नीने आपल्या कवेत घेतले. आग कोणी लावली , काहीच कळले नाही. मात्र झाड तीन दिवस अहोरात्र जळत होतं. आणि ती चिता विझवण्याची ताकद कशातही नव्हती.>>>:( Sad Sad

मस्त वर्णन केलयं ..
इथ घरातल एक छोटस रोपट जरी कोमेजल तरी जीव कासावीस होतं . लोक एवढ्या मोठ्या जुन्या झाडावर कुर्‍हाड कसे चालवत असतील कळत नै Sad