स्पर्शाची जादू (?) - अगं बाई अरेच्चा २

Submitted by जिप्सी on 23 May, 2015 - 11:48

"कुणीतरी म्हटलय ना अपघाताने प्रेम होतं, पण माझ्या आयुष्यात प्रेमामुळे अपघात होतात."
चित्रपटाचा ट्रेलर इथे पहा.

सुमारे १०-११ वर्षापूर्वी केदार शिंदे दिग्दर्शित अगं बाई अरेच्चा! हा चित्रपट आला आणि जबरदस्त हिट ठरला. हो, अगदी गाण्यांसहित. त्यानंतर आता पुन्हा केदार शिंदे घेऊन येत आहे अगं बाई अरेच्चा २. पहिल्या चित्रपटात "त्याची" गोष्ट होती आणि दुसर्‍या चित्रपटात "तिची". प्रोमोज बघतानाच कथानकाचा साधारण अंदाज आला होता. हि कथा आहे शुभांगी कुडाळकर अर्थात सोनाली कुलकर्णीची या मध्यमवयीन अविवाहित स्त्रीची. आयुष्याच्या प्रत्येक महत्वाच्या टप्प्यावर तिच्या आयुष्यात वेगवेगळे पुरूष येऊन गेले, पण यातील एकही तिचा होऊ शकला नाही. याला कारण कि ती ज्या पुरूषावर प्रेम करते आणि तो पुरूषही तिच्यावर प्रेम करत असेल आणि जर शुभांगीचा स्पर्श त्याला झाला तर त्या पुरुषाचा २४ तासाच्या आत अपघात होतो. कथानक तसं साधं सरळच आहे. पुढे काय होणार याची कल्पना आधीच येते असली तरीही शुभाचा स्पर्श ज्या पुरुषाला होतो त्याचा अपघात होणार हे माहित असुनही "तो अपघात" कसा होणार हे पाहण्याची जास्त उत्सुकता वाटते.


एका लग्नसमारंभातील फोटोग्राफर शुभांगीला पाहतो आणि आपल्या लेखक मित्राला, म्हणजेच विक्रम रघुनाथ देसाई (धरम गोहील)ला तिच्या या चमत्कारीक आयुष्यावर पुस्तक लिहायला सांगतो. शुभांगीला भेटल्यावर, विक्रमला तिच्या आयुष्यात आलेल्या वेगवेगळ्या पुरूषांबद्दल आणि त्यांच्या अपघाताबद्दल सांगते आणि चित्रपट पुढे सरकत राहतो. बालपणीचा सुनिल पाटील आणि प्रल्हाद किसमिसे, तरूणपणातील राहुल देशपांडे, नरेंद्र चकवे आणि पुन्हा एकदा प्रल्हाद किसमिसे यांचे शुभांगीवरचे प्रेम आणि तिचा स्पर्श झाल्यावर होणारे अपघात याभोवतीच चित्रपटाची (विनोदी अंगाने) कथा फिरते.

चित्रपटाची जमेची बाजु म्हणजे दिलीप प्रभावळकर आणि केदार शिंदे यांनी लिहिलेले उत्तम आणि हटके कथानक, सगळ्यांचाच उत्कृष्ट अभिनय. विशेष म्हणजे सोनाली कुलकर्णीचाचा उत्तम अभिनय आणि सुंदर दिसण. (सो कुल खरंच या चित्रपटात खुप छान दिसते. Happy तर मी हा चित्रपट खास सोनाली कुलकर्णीसाठीच पहायला गेलेलो Happy प्रोमोज पाहिलेले, जबरदस्त सुंदर दिसते प्रोमोज मध्ये Wink आणि हा चित्रपट खास तिच्यासाठीच मी पाहिलाय Happy ). चित्रपटात सोनालीच्या तरूणपणीची भूमिका आपल्या म्हाळसादेवीने (सुरभी हांडे) केलीय बरं का. फ्रॉकमध्येही म्हाळसादेवी दिसल्याही एकदम छान. Wink काही काही ठिकाणी सोनाली थोडी लाऊड वाटली विशेषतः शॅम्पेन प्यायल्यानंतरचा प्रसंग आणि विक्रम घरी येतो तेंव्हा पोहे बनविण्याचा प्रसंग. धरम गोहीलचा हा पहिलाच चित्रपट, पण अभिनय उत्तम झालाय. हा रोल खास त्याच्यासाठीच लिहिलाय असं वाटलं. किडे पाळणारा भरत जाधव, किस मी चॉकलेट देणारा प्रसाद ओक, क्रिकेटर माधव देवचक्के, सुरभी हांडे यांच्याही भूमिका (पाहुणे कलाकार) छान झाल्यात. खासकरून भरत जाधवचा नरेंद्र चकवे. Happy

सिनेमात कोकणातील (किल्ले निवतीचा समुद्रकिनारा आणि वालवल येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिर परीसर) दृष्ये फार छान टिपली आहेत. काही काही प्रसंग तर धम्माल आहेत. विशेषतः गोव्यातील मासे मार्केटमधला प्रसंग, शुभांगीच्या पायला काच लागते तो प्रसंग, सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसंग, शुभांगीच्या आत्महत्येचा प्रसंग, कविता "होतात" तो प्रसंग आणि सगळ्या पुरूषांचे होणार्‍या अपघाताचे प्रसंग.

संगीतकार निषाद याचे संगीत हि एक चित्रपटाची जमेची बाजु. खास करून खास कोकणी टच असलेले
एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती.....,

माझा देव कुणी पाहिला....

आपल्या म्हाळसादेवींचे Happy Wink
आभाळ आले भरूनी ......... दिल मेरा खाली खाली सुना

शंकर महादेवन यांनी गायलेले आणि उत्कृष्टरित्या चित्रित झालेले
जगण्याचे भान हे नाते अपुले.....

काही काही प्रसंग मात्र नीटसे कळले नाही. शुभांगी नक्की कुठे राहत असते कुडाळला कि मुंबईत. (साखरपुड्याच्या प्रसंगातील हॉल पार्ले मुंबईचा दाखवला आहे तर लग्नाचा प्रसंग वालावलच्या श्री लक्ष्मीनारायण मंदिरातील). तिचा भाऊ फक्त Income Tax Returns चे पेपर्स घ्यायला मुंबईहुन गोव्याला येतो? कोकणातले प्रसंग असुनही शुभांगीच्या डोक्या प्लास्टिकच्या मोगर्‍याचा गजरा का? Proud मध्यांतरानंतर चित्रपट थोडासा लांबल्यासारखा वाटला.. अर्थात या गोष्टींनी चित्रपटाच्या कथानकात काहीच फरक पडत नाही (निदान मला तरी). ;-).

इतके सगळे पुरूष आयुष्यात येऊन गेल्यावरही शुभांगीला तिचं खरं प्रेम मिळतं का? कि ती अविवाहितच राहते? या सार्‍या प्रश्नांची उत्तरे पाहिजे असेल तर अवश्य पहा "अगं बाई अरेच्चा २ ". हा चित्रपट शुक्रवार दि.२२ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.

विशेष सुचना: हा चित्रपट पहायला जाताना एक नवीन / फ्रेश चित्रपट पहायला जातो आहोत हे मनाशी ठरवा. आधीच्या अगं बाई अरेच्चा चित्रपटाचा आणि या चित्रपटाच्या कथानकाचा एकमेकांशी (नावाव्यतिरीक्त) काहीच संबंध नाही. चुकुनही अगं बाई अरेच्चा आणि अगं बाई अरेच्चा २ यांचे Comparison करू नका. एक फ्रेश चित्रपट म्हणुनच पहायला जा. तरंच तुम्ही हा चित्रपट एन्जॉय करू शकाल. Happy

(चित्रपट आवडला म्हणुन पुन्हा एकदा लिहिण्याचा प्रयत्न केला. हे चित्रपट परीक्षण वगैरे काही नाही आहे. :-))

आता उत्सुकता "व. पु. काळे" यांच्या "बदली" या कादंबरीवर आधारीत अ पेईंग घोस्ट या २९ मे रोजी प्रदर्शित होणार्‍या चित्रपटाची. Happy Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बघणार बघणार बघणार,

छान लिहिलेय, दिलसे.

पहिला अग बाई अरेच्चा देखील फार्र आवडलेला, गाणी तर आजही तेवढ्याच आवडीने ऐकतो. मराठीतील एक बेस्ट अल्बम आहे तो.

या चित्रपटालाही शुभेच्छा, पुढचा वीकेंड राखून ठेवतो. हलक्याफुलक्या मनोरंजनाची खात्री तशीही होतीच, शिक्कामोर्तब या परीक्षणाने केले..

नाचो.. पुढच्या विकेंडची वाट बघायची गरज नाही, उद्याचीच तिकीटे बूक केली.. धन्यवाद भावा, कसा वाटला ते इथे नक्की अपडेटेन Happy

ह्या चित्रपटाचा पेपराताला रिव्यु वाचताना मला सिमी गरेवालच्या सीमा चित्रपटाची आठवण आली.आपल्यावर प्रेम करणारा मरतो यावर हिरोइञ्चा ठाम विश्वास असतो. शेवट बहुतेक ट्रैजिक आहे, आठवत नाही आता. पण यातले रफिचे" जब भी ये दिल उदास होता है, जाने कौन आसपास होता है " हे सुमधुर गाणे आजही विविधभारती वर लागते.

छान सिनेमा आहे हा. पहिल्या सिनेमा इतका धमाल नसला तरी त्यात वेगळेपण आहे. अर्थात डोकं बाजूला ठेवून अन् फॅण्टसी वर्ल्ड तुम्हाला भावत असेल तर हा सिनेमा तुमच्यासाठी ऑप्शन असू शकेल.
दिलीप प्रभावळकरांची जेथे जातो तेथे नावाची एक नाटिका... रेशीमगाठी या मालिकेमधल्या एका एपिसोडवर बेतलेला असा हा सिनेमा आहे.

चांगला आहे.. पण मला स्वताला तितका नाही आवडला.. कदाचित पहिल्या भागाचा परिणाम.. त्याने डोक्यात असलेल्या अपेक्षा.. आणि हा बराच वेगळ्या जातकुळीचा आहे.. म्हणजे नाटकाचे दिग्दर्शन करताना केदार शिंदे स्टाईल असते ती यात जाणवली, खास करून मध्यांतरापूर्वीच्या भागात.. आणि व्यक्तीशा ती मला जास्त रुचली नाही... अर्थात बोअर झाले असे नाही पण फार हटके चित्रपट एंजॉय करतोय असेही नाही झाले.. पण उर्वरीत थिएटर माझ्या या आवडीशी फारकत दाखवत बरेपैकी हसत खिदळत होते हे देखील नमूद करतो.

ईंटरवल नंतर मात्र मला चांगला वाटला. आधीचे छोटे छोटे तुकडे आणि त्यातून घडणार्‍या विनोदांपेक्षा मध्यांतरानंतरचे कथानक आणि हलकाफुलकानेस जास्त बरा वाटला. पण शेवट मात्र पुन्हा फार हाय नोटवर झाला नाही जसा अपेक्षित होता.

सोनाली कुलकर्णी मध्येच ठिकठाक वाटायची, मध्येच सुंदर, तर मध्येच कमालीची सुंदर.
तिच्या अभिनयाबाबत वा तिने पकडलेल्या बेअरींगबाबतही हेच म्हणता येईल.
पण ज्या ज्या द्रुष्यात ती कमालीची सुंदर दिसलीय आणि ज्यात तिने कॅरेक्टरचे बेअरींग पकडत धमाल अभिनय केलाय ते या पिक्चरचे हायलाईट ठरावे. त्यातही शेवटचा दारू चढल्यावेळचा सीन जास्त आवडला.
ज्याला सोनाली आवडते त्यांनी नक्की बघा..

म्हाळसा.., वॉव.. ती बोल्ड अ‍ॅण्ड ब्यूटीफूलच दिसलीय Happy

बाकी स्वत:च बघून ठरवा.

.....................

अवांतर - आज कित्येक वर्षांनी लालबागच्या जयहिंद टॉकिजला जाण्याचा योग आला. याआधी शेवटचा तिथे पाहिलेला चित्रपट मुन्नाभाई एमबीबीएस. तो रात्रीचा शेवटचा नऊचा शो होता आणि हा सकाळचा पहिला पावणेदहाचा. अर्थात आता जयहिंद बदललेय आणि तिथे दोन स्क्रीन लागल्या आहेत. असो, पण आवर्जून उल्लेख करावासा वाटतोय ते सकाळी लवकर पोहोचून त्या शेजारी असलेल्या छोट्याश्या राजस्थानी हॉटेलमध्ये केलेला नाश्ता - फाफडा जिलेबी, दही कचोरी, दही समोसा .. सकाळीच सकाळी मजा आली.. पुन्हा त्यासाठी म्हणून जयहिंदचा सकाळचा शो जमवायचा प्रयत्न राहील Happy