बृहन्महाराष्ट्र मंडळ २०१५ पुरस्कार

Submitted by वैभव on 21 May, 2015 - 13:19

बृहन्महाराष्ट्र मंडळ गेली कित्येक वर्षे उत्तर अमेरिकेत मराठी संस्कृतीचा झेंडा रोवण्याचे काम करत आहे. उत्तर अमेरिकेतील वेगवेगळ्या शहरांत विखुरलेल्या मराठी माणसांना एकत्र आणावे या हेतूने दर दोन वर्षांनी बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन भरवते. या वर्षीचे अधिवेशन लॉस एंजिलीसजवळ अनाहाईम येथे ३ ते ५ जुलै दरम्यान होणार आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून अशा अधिवेशनात वेगवेगळ्या क्षेत्रांतील उत्तुंग शिखरे गाठणाऱ्या उत्तर अमेरिकेतील मराठी मंडळींना पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष सुनील सूर्यवंशी यांनी यामागची भूमिका ’मायबोली.कॉम’शी बोलताना स्पष्ट केली, “मराठी कला, संस्कृती, उद्योजकता यांना प्रोत्साहन देणे आणि समाजबांधणी करण्याबरोबरच वेगवेगळ्या क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी करणाऱ्या मराठी माणसांचा गौरव करणे हाही या अधिवेशनाचा एक महत्त्वाचा भाग असतो. प्रत्येक पुरस्कारविजेत्याचे कर्तृत्व जगाला कळावे व त्यातून मराठी समाजातील इतरांनाही प्रेरणा मिळावी हा त्यामागचा
हेतू आहे.”

या वर्षीच्या अधिवेशनात पुढील लोकांना पुरस्कार देण्यात येणार आहे -

Shekhar-Rahate.jpgशेखर रहाटे फॅशन डिझायनर असून लॉस एंजिलीसचे रहिवासी आहेत. त्यांची Shekhar Rahate Haute Couture नावाची कंपनी आहे. २०१४ आणि २०१५च्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये शेखर रहाटेंचे पन्नास ड्रेस वेगवेगळ्या तारकांनी घातलेले पाहायला मिळाले. शेखर रहाटेंनी डिझाइन केलेले ड्रेस नुसत्या ऑस्कर सोहळ्यातच नव्हे, तर इतरही अनेक मोठ्या समारंभात पाहायला मिळतात. गोल्डन ग्लोब, एमी अवॉर्डस्, कान फिल्म फेस्टिवल इथेही शेखर रहाटे यांचे ड्रेस वेगवेगळ्या तारकांनी परिधान केलेले पाहायला मिळतात. रहाटे न्यूयॉर्क फॅशन वीकमध्येही दरवर्षी भाग घेतात. त्यांनी अलीकडेच आपले नवीन कलेक्शन Couture फॅशन वीकमध्ये सादर करुन लोकांची वाहवा मिळवली. शेखर रहाटेंना फॅशन व्यवसायात १५ वर्षांचा अनुभव असून त्यांनी दुबईच्या द दुबई बीम्स इंटरनॅशनल फॅशन स्कूलमधून शिक्षण घेतले आहे. शेखर रहाटेंना कलाक्षेत्रात अटकेपार झेंडा फडकवण्यासाठी पुरस्कार देण्यात येत आहे.

Rajeev-Joshi.jpgडॉ. राजीव जोशी यांना अलीकडे न्यू जर्सी इन्व्हेंटर हॉल ऑफ फेममध्ये निकोला टेस्लाच्या बरोबरीने सामील करण्यात आले. त्यांनी इंटिग्रेटेड सर्किट्‌स् व मेमरी चिप्सच्या क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. त्यांच्या नावावर ३५०हूनही अधिक पेटंट आहेत. डॉ. जोशी यांनी १७५हून अधिक शोधनिबंध लिहिले आहेत. डॉ. जोशींनी लावलेल्या शोधांचा उपयोग इलेक्ट्रॉनिक्स उद्योगामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर होतो. IEEEनेही २०१३मध्ये इंडस्ट्रियल पायोनियर पुरस्कार देऊन डॉ. जोशी यांचा गौरव केला. डॉ. जोशी यांच्याकडे मुंबई आय.आय.टीची पदवी असून मुबंई आय.आय.टीतर्फेही त्यांना विशेष माजी विद्यार्थी म्हणून गौरवण्यात आले आहे. डॉ. जोशी यांनी त्यानंतर एमआयटीमधून मास्टर्स डिग्री व कोलंबिया विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली आहे. डॉ. जोशी न्यू यॉर्कचे रहिवासी आहेत. डॉ. जोशी यांना या अधिवेशनामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील उत्तुंग कामगिरीबद्दल पुरस्कार देण्यात येत आहे.

Samir-Mitragotri.jpgसमीर मित्रगोत्री युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, सँटा बार्बरा येथे प्राध्यापक म्हणून काम करतात. तेथील बायोइंजिनीअरिंग सेंटरचे ते सायंटिफिक डिरेक्टरही आहेत. मित्रगोत्री यांनी सुई खुपसण्याशिवाय शरीरात औषध घालण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान विकसित केले आहे. जी औषधे थेट सुयांद्वारेच शरीरात घालावी लागतात, ती त्यांच्या संशोधनामुळे शरीरावर लावायचे पॅच, जेल
आणि तोंडी घ्यायच्या गोळ्यांच्या साहाय्याने आता घेता येणे शक्य झाले आहे. त्यांनी बनवलेल्या अल्ट्रासोनिक उपकरणामुळे त्वचेतून लसीही इंजेक्शनशिवाय देणे शक्य झाले आहे. समीर मित्रगोत्री यांच्या नावावर ९० पेटंट (मिळालेली व मिळायची बाकी असलेली) असून त्यांनी अनेक कंपन्या त्यांच्या संशोधनावर आधारित उत्पादने बनवण्यासाठी सुरू केल्या आहेत. ते अनेक महत्त्वाच्या जर्नलच्या संपादकीय मंडळावरही काम करतात. त्यांनी मुंबईच्या युडीसीटी येथून पदवी घेतली असून एमआयटीमधून डॉक्टरेट मिळवली आहे. समीर मित्रगोत्री यांना विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरीसाठी पुरस्कार देण्यात येत आहे.

Narendra-Kale.JPGकाळे कन्सल्टंट्‌स् नाव न ऐकलेला आयटीमधला मराठी माणूस मिळणे कठीणच. सध्या शिकागो येथे राहणाऱ्या नरेंद्र काळे यांनी काळे कन्सल्टंट्‌स् या कंपनीची स्थापना १९८३ साली केली. त्यावेळी ह्या कंपनीमध्ये फक्त ८ लोक काम करत होते. २०११मध्ये जेव्हा अॅक्सेलया ग्रूपने ह्या कंपनीवर नियंत्रण प्रस्थापित केले, तेव्हा काळे कन्सल्टंट्‌स्‌ची उलाढाल १६६ कोटी रुपयांवर गेली होती. एअरलाइन्सना वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा पुरवण्यामध्ये काळे कन्सल्टंट्‌स् अग्रगण्य मानली जाते. काळे कन्सल्टंट्‌स्‌नंतर नरेंद्र काळे यांनी काळे लॉजिस्टीक्स ही एअरपोर्टना सेवा पुरवणारी नवीन कंपनी स्थापन केली आहे. नरेंद्र काळे यांनी कॉलेज ऑफ इंजिनीयरींग, पुणे, आयआयटी कानपूर आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून शिक्षण घेतले आहे. नरेंद्र काळे यांनी कॉलेज ऑफ इंजिनीयरिंग, पुणे येथे शिकवण्याचेही काम केले आहे. नरेंद्र काळे यांनी व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार देण्यात येत आहे.

Sudhir Jambhekar.jpgसुधीर जांभेकर जगातील नावाजलेल्या वास्तुरचनाकारांपैकी (आर्किटेक्टपैकी) एक मानले जातात. त्यांनी डिझाइन केलल्या प्रकल्पांची यादी खूप मोठी आहे. दुबईतील शेख रशील बिन सईद हा जगातील सर्वांत मोठा स्पॅनिंग आर्च पूल, भारत, युएई, चीन, जपान आणि कोरियातील अनेक निवासी व व्यवसायिक इमारती, दिल्लीबाहेरील एक आयटी पार्क आणि २०२ हेक्टरचा दुबई वॉटरफ्रंटवरील प्रकल्प अशा अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांवर त्यांनी काम केले आहे. सुधीर जांभेकर यांनी ‘हे विश्वाचे अंगण’ नावाचे आत्मचरीत्रही मराठीमध्ये लिहिले आहे. सुधीर जांभेकर यांनी मुंबईच्या जेजे स्कूल ऑफ आर्टमधून वास्तुरचनेची पदवी घेतली असून त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून मास्टर्स डिग्री मिळवली आहे. जांभेकर न्यूयॉर्क शहराचे रहिवासी आहेत. त्यांना व्यवसाय व उद्योग क्षेत्रामध्ये उत्तुंग कामगिरी केल्याबद्दलचा पुरस्कार देण्यात येत आहे.

Prabhakar-Ghate.jpgप्रभाकर घाटे डॅलास फोर्टवर्थचे रहिवासी आहेत. प्रभाकर घाटे यांनी वेळोवेळी अनेक प्रकारची सामाजिक कामे केली आहेत. त्यांनी धारवाडमध्ये एक संस्कृत शाळा व होस्टेलही सुरु केले आहे. प्रभाकर घाटे यांनी संतसेवा चालू रहावी म्हणूनही अथक प्रयत्न केले आहेत. त्यांनी धारवाडमधील आपले घर चिन्मय मिशनला देणगी म्हणून दिले. सज्जनगडावरही घाटे यांनी एक खोली बांधली आहे. डॅलास फोर्टवर्थ महाराष्ट्र मंडळालाही ते वेळोवेळी वेगवेळ्या प्रकारे मदत करत असतात. १९७० ते १९९५च्या दरम्यान प्रभाकर घाटे यांनी अनेक लोकांच्या घरी जाऊन पौरोहित्यही केले आहे. डॅलास फोर्टवर्थच्या हिंदू मंदिरात पंढरपूरचे विठ्ठल-रखुमाई आणण्याचे श्रेय प्रभाकर घाटे यांना दिले जाते. प्रभाकर घाटे टेक्सास इन्स्ट्रुमेंटमध्ये काम करत होते. त्यांनी अणूच्या घन पदार्थांतील हालचालींवर संशोधन करुन डॉक्टरेट मिळवली आहे. त्यांनी ७०हून अधिक शोध निबंधही लिहिले आहेत. ८२ वर्षांच्या प्रभाकर घाट्यांना त्यांच्या अथक सामाजिक कार्याबद्दल पुरस्कार देण्यात येत आहे.

Deepti-Pandit.pngदिप्ती पंडीत वॉशिंग्टन डी.सी.च्या रहिवासी आहेत. तेथील मराठी शाळेत त्या मराठी शिकवतात. दिप्ती पंडीत २००६पासून सातत्याने मराठी शिकवत आहेत. त्यांनी मेरीलँडमध्ये २००६मध्ये मराठी शाळेत शिकवायला सुरुवात केली. दिप्ती पंडीत यांनी ६ वर्षांपूर्वी वॉशिंग्टन डिसीची मराठी शाळा ५ मुलांसाह सुरू केली. आज या शाळेत वेगवेगळ्या वर्गात ६५हूनही अधिक विद्यार्थी मराठी शिकत आहेत. त्यांच्या अथक परीश्रमांमुळे वॉशिंग्टन डिसीची मराठी शाळा एक यशस्वी शाळा मानली जाते. ज्यावेळी मराठीचे भवितव्य भारतामध्ये असुरक्षित मानले जात आहे अशा वेळी दिप्ती पंडीत यांच्या मराठी शाळेने अमेरिकेमध्ये महाराष्ट्रातील मुलांच्या तोडीची मराठी बोलणारी मुले तयार केली आहेत. दिप्ती पंडीत यांना त्यांच्या या प्रयत्नात ६ ते ७ इतर शिक्षकांचीही मदत झाली आहे. दिप्ती पंडीत यांना मराठी शाळा उत्तम प्रकारे चालवल्याबद्दलचा पुरस्कार देण्यात येत आहे.

RujulZaparde.jpgरुजूल झापर्डे १९ वर्षीय तरुण असून तो मूळचा न्यू जर्सीचा रहिवाशी आहे. १७ वर्षांचा असताना त्याला एअरपोर्टवर कार शेअरिंगची कल्पना सुचली. त्यातूनच त्याने फ्लाइटकार नावाच्या कंपनीची स्थापना केली. गेल्या तीन वर्षांपासून तो यशस्वीपणे ही कंपनी चालवत आहे. रुजूलने फ्लाइटकार सेवा एका शहरात सुरू करून आता १५ शहरांमध्ये पसरवली आहे. फोर्ब्स मॅगेझिनच्या मते रुजूल
२० दशलक्ष डॉलर्स गुंतवणूक उभा करणारा सर्वांत तरुण उद्योजक आहे. रुजूलच्या कंपनीची दखल न्यूयॉर्क टाइम्सनेही घेतली आहे. फक्त १३ वर्षांचा असताना रुजूलने एक संस्था उघडून भारतामधील गावांमध्ये विहीर खणून द्यायला सुरुवात केली. रुजूलच्या शाळेमधून या विहिरीसाठी पैसे उभे करण्यात आले. लवकरच इतरही शाळांमध्ये हे लोण पसरून त्याच्या संस्थेपर्फे ६० विहिरी खोदण्यात त्याला यश आले. अंदाजे एक लाख लोकांना त्यामुळे पिण्याचे पाणी मिळाले आहे. रुजूलला तरुण वयात व्यवसायक्षेत्रात उत्तुंग कामगिरी केल्याबद्दलचा पुरस्कार देण्यात येत आहे.

Shri-Thanedar.jpgआपल्यापैकी अनेकांना डॉ. श्री. ठाणेदार हे ‘ही श्रीची इच्छा’ या पुस्तकाचे लेखक म्हणून माहिती असतील. या पुस्तकाच्या ४३ आवृत्त्या खपल्या असून सध्या ४४वी आवृत्ती बाजारात उपलब्ध आहे. या पुस्तकामुळे अनेक मराठी तरुणांना प्रेरणा मिळाली आहे. श्री ठाणेदार यांना Ernst and Young Entrepreneur of the Year या पुरस्कारानी सन्मानीत करण्यात आले आहे. डॉ. ठाणेदार
यांनी रसायनशास्त्रामध्ये डॉक्टरेट मिळवली आहे. श्री ठाणेदार हे हाडाचे उद्योजक असून त्यांनी आतापर्यंत ११ वेगवेगळ्या कंपन्या चालवल्या आहेत. त्यातील एक कंपनीने ५५ दशलक्ष डॉलर्सची उलाढाल केली आहे. सेंट लुईस महाराष्ट्र मंडळाच्या स्थापनेमध्ये डॉ. ठाणेदार यांचा सहभाग होता. त्यांनी बृहन्महाराष्ट्र मंडळातही वेगवेगळी पदे भूषवलेली आहेत. श्री. ठाणेदार यांच्या जीवनावर एका चित्रपटाचे कामही सध्या चालू आहे. डॉ. ठाणेदार मिशिगन राज्यातील अॅन आर्बर शहराचे रहिवासी असून त्यांची उत्तुंग कामगिरीविषयी देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

Jaya-Huprikar.jpg१९६६ मध्ये जया हुपरीकर व शंकर हुपरीकर शिकागोला आले. शिकागोमध्ये आल्यापासून त्या तेथील मराठी समाजामध्ये कार्यरत होत्या. १९७० साली जया हुपरीकार यांच्या पुढाकाराने शिकागो मंडळाच्या ‘रचना’ या मुखपत्राचा पहिला दिवाळी अंक हस्तलिखीत स्वरुपात प्रसिद्ध झाला. १९८० मध्ये शिकागो मंडळाचा जम बसल्यानंतर अमेरिकेतील सर्व मंडळांना एकत्रित आणण्याच्या दृष्टीने जया हुपरीकर, विष्णु वैद्य आणि शरद गोडबोले यांनी बृहन्महाराष्ट्र मंडळाची स्थापना केली. बृहन्महाराष्ट्र वृत्त या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या मुखपत्राची रुपरेषा, मांडणी, लेखन आणि संपादन या सर्व जबाबदाऱ्या जया हुपरीकर यांनी सांभाळल्या. बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या कार्यकारीणीवरही त्यांनी पहिली सहा वर्षे काम केले. जया हुपरीकर यांनी लावलेल्या या बीजाचा आज महावृक्ष झला आहे. जया हुपरीकर यांची बृहन्महाराष्ट्र मंडळाने जीवन गौरव पुरस्कारासाठी निवड केली आहे. ​

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारच छान परिचय. अगदी कर्तृत्ववान लोकं आहेत ही. सगळ्यांच मनापासून अभिनंदन.

अरेवा ! उत्तुंग व्यक्तिमत्व एकसे एक. सर्वांचे अभिनंदन..
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ..
तिकडे मराठी शाळा आहे हे माहित नव्हते. ते ऐकून खूपच छान वाटले.

खूप कर्तृत्ववान मोठी माणसं..खूप छान परिचय. पुरस्काराबद्दल सगळ्यांचे अभिनंदन

मस्त वाटले वाचून. तो रुजुल झापर्डे आमच्या इथेच जवळ राहतो, त्यामुळे त्याच्याविषयी ऐकलं होतं. बाकीच्यांच्या पण अचीव्हमेन्ट्स जबरी आहेत!! सर्वांचे अभिनंदन!!

सर्वांचे अभिनंदन!! बृहन्महाराष्ट्र मंडळाचा मस्त उपक्रम.
यातील अनेक लोक माहीत नव्हते.>>> +१

चांगली माहिती, ईथे दिल्याबद्दल धन्यवाद!
सर्व पुरस्कार विजेत्यांचे आणि या स्तुत्य उपक्रमाबद्दल BMM चे पण अभिनंदन Happy

शेखर रहाटेंबद्दल वाचलं होतें. कुठल्यातरी पेपरला कान्स महोत्सवाच्या दरम्यान मुलाखत आली होती त्यांची. त्यांनी डिझाईन केलेले ड्रेसेस आणि त्यांचा एकूण या क्षेत्रातला अनुभव, मोठा प्रवास आणि यश याबद्दल सविस्तर आलं होतं.
नक्कीच एन्स्पायरिंग होती मुलाखत.

बाकीपण सगळे लोक आणि त्यांचं त्यांच्या क्षेत्रातलं योगदान, यश हे सगळं वाचून भारी वाटलं. इथे दिल्याबद्दल आभार! Happy

जबरदस्त वाटलं ह्या सगळ्यांविषयी वाचून !
सर्व पुरस्कार विजेत्यांचे आणि या स्तुत्य उपक्रमाबद्दल BMM चे पण अभिनंदन >>> + १

जया हुपरीकर यांची बृहन्महाराष्ट्र मंडळाने जीवन गौरव पुरस्कारासाठी निवड केली आहे.

१९७० साली जया हुपरीकार यांच्या पुढाकाराने शिकागो मंडळाच्या ‘रचना’ या मुखपत्राचा पहिला दिवाळी अंक हस्तलिखीत स्वरुपात प्रसिद्ध झाला. >> मस्त!! हे सगळ कुठे, कुणी सांभाळून ठेवले आहे का?? एक सुरूवात म्हणून मराठी समाजातील अशा महत्त्वाच्या पाऊलखुणांचे एक सुंदर फिरते म्युझियम तयार होईल. (फिरते = जसे नाटकांचे प्रयोग असतात तसा म्युझियमचा दिवस्/ प्रयोग.)

जया हुपरीकर यांचे अभिनंदन!