“ शहाणपण “

Submitted by विनायक. दि.पत्की. on 19 May, 2015 - 11:41

पोटात भूक नसताना
अन्नाचे महत्व कळत नाही
वणवा पेटल्या शिवाय
ओले लाकूड जळत नाही

दिवाळे निघाल्या शिवाय
कष्टाचे महत्व कळत नाही
हरामाचे जगणे जगताना
कळते पण वळत नाही

गुर्मीने दुसर्याची कदर
करवत नाही
अंधार असल्याशिवाय
दिवा हाती धरवत नाही

पाण्यात राहून माश्याशी
वैर जमत नाही
मूर्ख बनल्याशिवाय
दुसर्याची अक्कल कळत नाही

मल्ल होताना अंग
मळल्या शिवाय राहणार नाही
सोन्याची शुद्धता हि
जळल्या शिवाय कळणार नाही

जेथे भरवसा तेथे संशय
मोलाचा नाही
जेथे संशय तेथे भरवसा
तोलाचा नाही

मला सर्व समजते या
म्हणण्याला काही अर्थ नाही
समजून लीनता बाळगण्या
शिवाय जन्म सार्थ नाही

शुद्ध हेतूने केलेले कर्म
कधीच वाया जात नाही
हेतू सोडून केलेले व्यर्थ
झाल्या शिवाय राहत नाही

जास्त पापा पेक्षा कमी
पाप करण्यास हरकत नाही
सत्कर्मासाठी कमी पणा
कधी वाया जात नाही

आधार देताना निराधार केल्यास
शाप लागल्याशिवाय राहत नाही
आधाराला भार झाल्यास
वरदान कधीच मिळत नाही

अखंड सावध असल्यास
कधीच काहीही बाधत नाही
मनातून तळमळ असल्याशिवाय
कधीच काही साधत नाही

सुंभ जळाला तरी
पीळ जळत नाही
विषय कितीही भोगले तरी
मन त्या पासुन ढळत नाही

जित्याची खोड मेल्याशिवाय
कधीच जात नाही
मनाविरुद्ध झाल्या शिवाय
शहाणपण कधीच येत नाही

Group content visibility: 
Public - accessible to all site users