पुणे ते कन्याकुमारी सायकल प्रवास - दिवस ७ पय्यानुर - किल्ले दर्शन

Submitted by आशुचँप on 17 May, 2015 - 15:47

http://www.maayboli.com/node/53152 - पूर्वार्ध

http://www.maayboli.com/node/53206 - दिवस १ कराड

http://www.maayboli.com/node/53235 - दिवस २ निप्पाणी

http://www.maayboli.com/node/53300 - दिवस ३ धारवाड

http://www.maayboli.com/node/53330 - दिवस ४ अंकोला

http://www.maayboli.com/node/53394 - दिवस ५ मारवंथे

http://www.maayboli.com/node/53751 - दिवस ६ मंगळुरु

====================================================================

दुसरे दिवशीपण जरा निवांतच निघालो. युडी काकांनी तेवढ्यात चतुरपणा दाखवत त्यांच्याकडचे जादा सामान आपटेकाकांच्या बॅगेत कोंबले. असेही त्यांची गाडी दुपारची असल्यामुळे सकाळी ते आमच्याबरोबर २० किमी पर्यंत येतील असे ठरले. इतक्या दिवसांच्या प्रवासामुळे जो एक बंध आमच्यात तयार झाला होता त्यामुळे साथसंगत तुटावी असे कुणालाच वाटत नव्हते त्यामुळे या प्रस्तावाचे आम्ही जोरदार स्वागत केले.
मेधा रेसिडन्सीमधून निघालो तेव्हा बाहेर पडतानाच एक मध्यमवयीन जोडपे भेटले. त्यांनी सगळी चौकशी केली आणि आम्ही पुण्यावरून इतक्या लांब सायकलवर आल्याचे त्यांना जामच कौतुक वाटले. आमची सामानाची बांधाबांध, सायकल तपासणी इ.इ. सकाळचे उपक्रम डोळे भरून पाहिले आणि परत आलात नक्की आम्हाला भेटा असे सांगून गेले. तसेही आम्ही आता प्रो झाल्यामुळे सायकलवर पॅनिअर्स बांधणे आणि सगळी तयारी करणे अंगवळणीच पडले होते. त्यामुळे सकाळचा हा सोहळा एकदम प्रेक्षणीय वगैरे वाटत असावा.

हॉटेलच्या बाहेर पडल्या पडल्याच एक तीव्र चढ लागला. पहिला घाम यायच्या आधीच एकदम असे काहीतरी आल्यामुळे सगळेच थोडेफार फाफलले. आणि तो चढ संपायचे काही नावच घेईना. भर शहरात असले घाटवाटांचे रस्ते बांधणाऱ्याला तर मी किती शिव्या दिल्या असतील याला गणती नाही.

त्यातून लोकांचा माजोरडेपणा. एका कॉफीच्या दुकानापाशी थांबलो आणि इतक्या सायकलींना फक्त कॉफीसाठी लॉक लाऊन जाण्यापेक्षा आम्ही बाहेरच उभ्या उभ्या कॉफीचा आस्वाद घ्यावा असा प्रयत्न केला. पण त्या दुकानदाराने तो साफ मोडून काढला. पहिजे असेल तर आज जाऊन बसा. बर आत म्हणजे इतके आत होते की तिथून सायकली दिसूच शकत नव्हत्या. आणि कहर म्हणजे इतक्या भल्या पहाटे लोक पुरीभाजी तत्सम काहीतरी आणि काहीतरी भात पण खात होते. तेपाहूनच कसेतरी झाले. पुढच्या दुकानात बघु म्हणले तर एकही ढंगाचे हॉटेल दिसेना.

बराच वेळ गेल्यानंतर एक टपरीवजा काहीतरी दिसले आणि तिकडे थांबलो तर त्याने इतका वेळ लावला की इतक्या वेळात आमचा नाष्टापण झाला असता. पण आज वेळेचा काही प्रश्न नसल्याने सकाळसकाळचा भंकस बडबडीला उत आला होता. (अर्थात मी आणि बाबुभाईच....एकंदरीत आमच्यातील संवादाचे प्रमाण ७०-३० होते. मी आणि बाबुभाई मिळून सर्वांच्या वाट्याचे बोलत होतो)

त्यात या बाईंचे पोस्टर हा आजचा प्रमुख विषय होता. या बाईंचे पोस्टर जवळ जवळ सगळीकडे व्यापून होते. चौकाचौकात, रस्त्यारस्त्यावर आणि पार अगदी केरळाची सीमा गाठेपर्यंत. बरं त्यात शिवाजी महाराज, मारूती पण असल्याने माझ्या उत्सुकतेने शीग गाठली होती. वाटेत काही लोकांना विचारले पण त्यांना मी काय म्हणतोय ते समजले नाही आणि त्यांनी काय सांगितले ते मला...

कुणी इथे कन्नड किंवा मल्याळम वाचणारे असेल तर यावर काय लिहीले आहे ते सांगणार का...?

तसेच रमतगमत पुढे निघालो आणि एका चांगल्याश्या दिसणाऱ्या हॉटेलमध्ये नाष्टा केला. तिथेही फुल टू धिंगाणा. हॉटेलच्या मधे एक मोठा गोलाकार खांब होता आणि एका वेटरची ती जामच आवडीची जागा होती बहुदा. तो अॉर्डर दिली की त्या खांबावर जाऊन रेलायचा आणि पुढची अॉर्डर पण रेललेल्या अवस्थेतच घ्यायचा. त्यामुळे मी पण पुढची अॉर्डर देताना त्या खांबावर जाऊन रेललो आणि त्यामुळे तो वेटर इतका भांबावला की दोन मिनिटे त्याला काही रिअॅक्शन द्यावी हेच सुचेना.

या सगळ्यात घड्याळाकडे कुणाचे लक्षच नव्हते. बघतो तर नऊ वाजत आलेले. साडेसहाला निघालेलो आम्ही नऊपर्यंत जेमतेम २०-२२ किमी आलो होतो. एरवी या वेळात आमचे ३५-४० आरामात होत असत, तेही नाष्टा वगैरे करून. त्यामुळे आता घाई करण्याची गरज होती. त्यामुळे मामांनी आणि आपटे काकांना निरोप दिला. जाताना मामांनी पुन्हा एकदा त्यांच्या सूचना दिल्या आणि कसोशीनी पालन कराव्यात असेही सांगितले.

वियोगाचा क्षण

आता वेध लागले होते ते केरळ प्रवेशाचे. महाराष्ट्र सोडून कर्नाटकात प्रवेश करताना मी एकटाच होतो पण आता तिसऱ्या राज्यात प्रवेश करताना सगळ्यांनी एकत्र जावे असा माझा प्रयास होता. पण प्रत्यक्षात सगळे मागे पुढे विखुरले होते. पण मग तेवढ्यात बाबुभाई आणि लान्सदादा सापडले. त्यांना थांबवले आणि फोटो घेऊया सांगितले. तिघांचा एकत्रित फोटो हवा होता म्हणून कुणालातरी शोधावे अशा विचारात असताना एक महाशय घाईघाईत तिथून जाताना दिसले. त्यांना थांबवून फोटो काढणार का असे सौजन्यपूर्ण विचारले. पण त्याच्या चेहऱ्यावर बारा वाजलेले पाहून लक्षात आले की त्याला कन्नड किंवा बहुदा मल्याळी सोडून काही येत नाही. मग डमशेरज सुरु झाले. वेगवेगळे हावभाव करून त्याला समजाऊन सांगताना माझी पुरेवाट झाली आणि लान्स आणि बाबुभाईची हसून हसून...

हाच तो हिरा...नमुना होता साक्षात

कळस म्हणजे, समजल्यासारखे मान हलवत महाशय केरळ राज्यात प्रवेश अशा पाटीपाशी गेले आणि फोटो काढण्याची खूण केली. देवा, याला याचा फोटो काढावा असे का वाटले असेल. मग मी आणखी जोराने खाणाखुणा करून तुझा नाही, तु आमचा फोटो काढ असे सांगितले. त्याचा परिणाम म्हणजे, तो अजून पाटीच्या जवळ सरकला आणि इथे बास का असे हातवारे.

आता तर लान्स आणि बाबुभाई हसून हसून कोसळायच्या बेतात होते. मी शेवटी त्याच्या समाधानासाठी त्याचा एक फोटो काढला. त्याला दाखवला आणि सांगितले की बाबा रे हा कॅमेरा घे आणि आमचा फोटो काढ. पण गडी स्वताचाच फोटो बघुन इतका प्रसन्न झाला होता की त्याने छान छान अशी खूण केली आणि त्याचा फोटो काढू दिल्याबद्दलचा मोबदला म्हणून माझ्या सायकलला अडकवलेली पाण्याची बाटली घेऊन जाऊ का विचारले.

मी कसाबसा त्याला वाटेला लावले आणि पुढच्या पाटीपाशी फोटो काढू म्हणून निघालो. सुदैवाने थोड्याच अंतरावर एक अजून एक चांगली पाटी होती. पण तिथेही हाच प्रकार. दोन तीन जणांना कॅमेरा हातात देऊन फोटो काढायची खूण केली तर हात मागे घेऊन असे पळून जात होते की जसे काही मी कॅमेरा विकतोय आणि त्यांनी हातात घेतला तर मी पैसै वसूल करीन. शेवटी एका रिक्षावाल्याला दया आली आणि त्याने फोटो काढून दिला.

केरळमधला प्रवेशच असा धमाल झाल्यामुळे केरळ आमच्या प्रवासात सर्वात झकास ठरणार अशी खात्री झाली आणि तसेच झालेही. केरळ राज्यात जी काय धमाल केली त्याला तोड नाही.
अजून एका दृष्टीने केरळ संस्मरणीय ठरले ते म्हणजे किल्ले. केरळात आमच्या वाटेवर किमान तीन किल्ले लागणार होते आणि ते मी सोडणे शक्यच नव्हते. दोन देवळांमध्ये सगळ्यांमुळे मला जावे लागले होते आणि आता माझ्या देवळांमध्ये मी त्यांना नेणार नाही असे शक्यच नव्हते.

त्यामुळे वाटेत पहिला किल्ला कुंबळा फोर्ट लागल्यावर थांबलोच.

हा अक्षरश रस्त्याला लागूनच किल्ला आहे. किल्ल्याच्या नावावरून आम्ही जोक्सपण केले की अनिल कुंबळेचा हा किल्ला असावा...पण जेव्हा घरी येऊन विकीपिडीयावर माहीती घेतली तेव्हा खरेच हा त्याचा किल्ला आहे असे कळले.

विकीदादांनी दिलेल्या माहीतीनुसार - या भागात कुंबळे राजवटच होती. (म्हणजे अनिल कुंबळे राजवंशीय आहे...अरे देवा..) तर १६ व्या शतकात हे कुंबळे लोक्स राज्य करत होते आणि दुराटे बार्बोसा या पोर्तुगिज प्रवाशाने असे लिहून ठेवले आहे की त्याकाळी इथून मालदिव्जला तांदुळ निर्यात केला जात असे आणि त्याबद्ल्यात काथ्याच्या वस्तु येत असत. पुढे टिपू सुलतानने या भागावर आक्रमण केले तेव्हा कुंबळे राजा थलासरीला पळून गेला. (तिथेही एक उत्तम किल्ला आहे..पुढे येईलच त्याबद्दल) आणि नंतर पुन्हा १७९९ मध्ये राज्य प्रस्थापित केले. आणि नंतर जे सह्याद्रीतल्या बहुतांश किल्ल्यांचे झाले तेच. थोड्या प्रतिकारांनंतर ब्रिटीशांना शरण. सालीना ११,८८८ च्या तनख्यावर राजाला मांडलिकत्व पत्करावे लागले.

विकिबाह्य माहीती - कुंबळा अथवा कुंबळे किल्ला हा काही कुंबळे लोकांनी बांधला नाही. तो बांधला गेला केलादीच्या नायक लोकांनी. यांनीच थोड्या पुढे बेकल किल्ला बांधला. दोन्ही किल्ल्याच्या बांधकामातील साम्य पाहिले तर लगेच लक्षात येते.

अर्थात कुंबळा किल्ला आता फार काही उरलेलाच नाही. तुटक्या फुटक्या भिंती, एक पडका बुरुज आणि मोकळवन. पण आपल्यासारख्या सह्याद्रीत फिरलेल्यांना तुटकेफुटके बुरुज पाहून देखील भरून येते. त्यामुळे मी प्रेमभराने किल्ला फिरून पाहिला. बाकीचे पटकनच पुढे सटकले आणि मी आणि बाबुभाई यांनी थोडे फार फोटोसेशन करून पुढची वाट धरली.

आता पुढचे टारगेट होते बेकल फोर्ट...या किल्ल्याचे खास आकर्षण होते. एकतर खूप मेंन्टेन केलेला किल्ला आहे अशी माहीती होती आणि दुसरे म्हणजे बॉम्बे चित्रपटातल्या तु ही रे या नितांतसुंदर गाण्याचे चित्रीकरण या किल्ल्यात झालेय. त्या गाण्यातले टेकिंग, उधाणलेला समुद्र, व्याकुळ अरविंद - मनिषा आणि त्या धीरगंभीर वातावरणाला आपल्या जादुई संगीताची साथ देणारा दी ग्रेट रेहमान, जोडीला हरीहरन, कविता कृष्णमूर्ती....आहाहा हे सगळे जे काही जीवघेणे कॉम्बिनेशन जमून आलेय त्याला तोड नाही.

तसा मी या फिल्मी प्रकाराचा तिटकाराच करतो. म्हणजे कुठेतरी कुठल्या चित्रपटाचे शूटींग झालेय म्हणून ते जाऊन बघण्याचा प्रकार मला आवडत नाही. पण या गाण्यात तो निसर्ग, तो किल्ला एक जिवंतपणा घेऊन येतात. केवळ एक बॅकग्राऊंडला काहीतरी नाही. त्यात कितीतरी बारकावे दडले आहेत आणि मणिरत्नमने ते इतक्या खुबीने दाखवले आहेत. त्यामुळे यावेळी मला निरुपायच होता.

व्याकुळ करून टाकणारे प्रेम (प्रचि - आंतरजालावरून साभार)

तर, त्यामुळे आता ओढ होती बेकल फोर्टची. पण त्याआधी एक बिकट वाट आमच्या पुढ्यात होती. वाटेत रस्त्याचे बांधकाम सुरु असल्यामुळे जो काही कुटाणा झाला होता त्यानी केरळमधले रस्ते फार सुरेख आहेत या मतप्रवाहाला तडा गेला. हा जो काही होता त्याला रस्ता म्हणावे का या विचारातच मजल मारते झालो.

मेन अॅट वर्क आणि अॉन मिशन टू

फोटो वेदांग

फोटो वेदांग

फोटो वेदांग

फोटो वेदांग

पण नंतर नंतर रस्ता जो काही भस्सकन वर आभाळात घुसला त्याने भल्याभल्यांची फुफुस्से पेटवून दिली. वेदांग अर्थातच पुढे होता, आणि पुढे जाऊन आमचे फोटो काढायला माघारी पण आला. पाठोपाठ मी, लान्स, सुहृद. चढ अक्षरश जीवघेणा होता आणि उतरून चालत जाण्यापेक्षा जिद्दीला पेटून तशाच सायकली लोएस्ट गियरवर वरती चढवल्या. घाटपांडे काकांचे विशेष कौतुक. त्यांनीही एकदाही न उतरता चढ पार केला.

चढ संपला पण रस्ता मूळपदावर काय येईना. आगीतून फुफाट्यात ही म्हण साक्षात अनुभवण्याची ती वेळ होती. वरून सूर्यमहाराज आग ओकत होते आणि तापलेली धूळ अंगाखांद्यावर चढून लडीवाळपणा करत होती. त्यातून छातीचा पार भाता करून टाकणारे चढ. पण मस्ती अंगात इतकी चढली होती की आता त्याचेही काहीच वाटेनासे झाले होते. हाताच्या मुठी हँडलवर आवळून धरली होती, पुर्ण ताकतीने एक एक पॅडल आणि जोर अपुरा वाटला तर एका एका पॅडलला एक एक शिवी देत त्वेषाने तो टप्पा एकदाचा पार केला.

थोडे पुढे जाऊन एका सावलीत थांबलो आणि युडींची सायकल पंक्चर झाल्याची सुवार्ता कळली. वाह, हेच राहीले होते. युडी बिचारे सायकल ढकलत आले आणि घाटपांडे काकांनी मुकाट्याने सामान उपसून पंक्चर काढण्याची तयारी चालवली. आपण नुसतेच उनाडक्या करतोय असे वाटू नये म्हणून मी कॅमरा काढला आणि रस्त्यावर पंक्चर झाले तर कसे काढावे याचा एक युट्युबवर टाकायला व्हिडीयो करतोय असे सांगत शूटींग सुरु केले.

सर्व फोटो वेदांग

यथावकाश सायकल दुरुस्त झाली आणि पुढे निघालो. दमछाक झालीच होती पण किल्ला बघितल्याशिवाय जाणार कसे त्यामुळे वळलो. आता माझ्या डोक्यात तीच तू ही रे वाली दृश्ये. पण ते शूटींग झाले पावसाळ्यात आणि आता टळटळीत उन्ह हा फरक लक्षात येताच प्रत्यक्षाहूनही प्रतिमा उत्कट असे म्हणत किल्ला डोळ्याखालून घातला. किल्ला होता मात्र मस्त. आपल्याकडे सिंधुदुर्ग, जंजिरा असे राखले गेले असते तर काय बहार अली असती अशा खिन्न मनानेच गडफेरी आटपली.

टेहळणी बुरुज

आधुनिक अरविंद-मनिषा Happy

बेकल फोर्ट हा केरळ राज्यातला सर्वात मोठ्या आकाराचा किल्ला. किल्ल्यात एक हनुमानाचे मंदिर आणि एक मशिद सुखनैव नांदत आहेत. पण महाल, किंवा प्रशासकीय इमारती नाहीत. त्यामुळे हे मुख्य कारभाराचे केंद्र नसावे असा अंदाज आहे.
किल्ल्याचा इतिहास - १६ व्या शतकात बदनूरच्या शिवाप्पा नाईक याने हा किल्ला बांधला. नायक राजांच्या राजवटीत या किल्ल्याला महत्त्व मिळालं. त्यांनी नंतर एक किल्ल्यांची साखळीच तयार केली. बेकल फोर्ट हा त्यापैकी एक. त्यानंतरच्या कमजोर राज्यर्कत्यांकडून हैदरअलीने हा किल्ला बळकवला. नंतर टिपू सुलतानकडून ब्रिटिशांनी हा किल्ला सर केला. शेवटी डचांनी ताबा घेतल्यावर याचा व्यापाराचे केंद म्हणून वापर केला. मोक्याच्या ठिकाणी असल्याने पूवीर् दक्षिणेकडील प्रांताला धान्यपुरवठा करण्यासाठी जाणाऱ्या बोटींवर देखरेख करण्यासाठी असलेल्या बेकल फोर्टचा उपयोग किती महत्त्वाचा होता, हे तिथल्या भूगोल समजून घेतल्यावर लक्षात येतं.

ही जागा लक्षात आली का...

आपापल्या मनिषांना बाहेर पार्क करून आलेले अरविंदस

सध्या किल्ल्यावर कोणत्याही राजाचे महाल, कोठी शिल्लक नाहीत, पण किल्ल्यातील अंधारकोठड्या मात्र अद्यापि शाबून आहेत. सव्वाशे फूट उंचीचे किल्ल्याचे भयानक कडे आजही मजबूत आहेत. असं म्हणतात, की पूवीर् कैद्याला याच कड्यांवरून समुदात फेकून देणं, हा एक शिक्षेचा प्रकार होता. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराचा मार्ग, किल्ले बांधणीतल्या पूवीर्च्या रचनेप्रमाणे सरळ न ठेवता, दिंडी दरवाजाशी वळवला आहे. किल्ल्यात चोरवाटांचं मोठं जाळं होतं, असं जाणकार सांगतात. बहुधा संकटकाळी त्या वाटांचा, किल्ल्यातील लोकांना पळून जाण्यासाठी उपयोग होई.

आधार - महाराष्ट्र टाईम्समध्ये अरुण अग्निहोत्री यांनी दिलेली माहीती व विकीपिडीया

कॅमेरात कैद फोटोग्राफर ( फोटो वेदांग )

आधीच ६०-७० किमी सायकलींग आणि वर उन्हात किल्ला पाहण्याचा शीण यामुळे सगळेच वैतागले होते आणि त्यामुळे पूर्ण फेरी केली नाहीच. असाही किल्ला इतका प्रचंड मोठा आहे की सविस्तरपणे पहायचा झाला तर आख्खा दिवस पाहिजे. त्यामुळे धावत्या भेटीवरच समाधान मानले आणि पुढे आगेकूच सुरु केली.

गेल्या सहा-सात दिवसात सुसाट सायकल चालवण्याचा शीण म्हणा किंवा काही पण बाबुभाईवर आता गुढगेदुखीचा फेरा ओढवला. इतके की त्याला वाटेत थांबून नीकॅप घ्यावी लागली. प्रथेप्रमाणे घाटपांडे काका त्याच्या सोबतीला थांबले आणि आम्ही पुढे निघालो. वाटेत मी असाही रमत गमतच चाललो होतो त्यामुळे लान्स, वेदांग वगैरे पुढे सटकले. आजचे मुक्कामाचे हॉटेल होते केके रेसिडन्सी. त्यामुळे पय्यानुर गाठल्या गाठल्या ट्रॅफिक पोलिसाला विचारून रस्ता माहीती करून घेतला आणि पुढे गेलो. हे हॉटेल अक्षरश आपल्या इथल्या स्वारगे़ट परिसरात असावे असे होते. प्रचंड अरूंद गल्ल्या, त्यातून पादचारी, टू व्हिलर, यांची रेटारेटी, आणि कहर म्हणजे एसटीस्थानक. त्या रगाड्यातून कसाबसा सायकल काढून हॉटेलच्या आवारात आलो आणि तिथे थोडे लॉन लावले होते त्यावर जाऊन पसरलो. तर सिक्युरीटीवाला धावत आला आणि तिथून उठायला सांगू लागला. म्हणलं माझा आधी जीवात जीव येऊ दे मग तुझे ऐकतो. पण आमच्या दोघांचे भाषिक मतभेद कमालीचे टोकाचे होते. त्यामुळे चरफडत उठलो आणि बाकीच्या सायकली बघू लागलो तर कुणीच दिसेना. आयला असे कसे काय झाले. वाटेत मी कुणालाच मागे टाकले नव्हते मग हे कुठे राहीले. अजून थोडा वेळ वाट पाहून पण कुणी येईना तेव्हा माझी जवळपास खात्री झाली की आपले हॉटेल चुकले. आणि मी अगदी सायकल काढून पुन्हा बाहेर जावे असा विचार करत असतानाच सुहृद धापा टाकत आला. त्याना कुणीतरी भल्यातच ह़ॉटेलला पाठवले होते आणि तब्बल १० एक किमी चा फेरा झाल्यानंतर ते कसेबसे येऊन पोचले होते.

मग पाठोपाठ काका आणि बाबुभाईपण आले. आजचा दिवस जामच दम उखडवणारा होता पण एकाच दिवसात दोन किल्ले झाल्यामुळे मी खुशीत होतो. आजूबाजूचा परिसरही टिपिकल बसस्थानकाच्या बाहेरचा असतो तसा होता त्यामुळे बाहेर कुठे जाण्यापेक्षा हॉटेलमध्येच जेवावे असा विचार केला आणि तो बराच महागात पडला. सगळ्यात महागडे जेवण आजच झाले. तिथले रेट पुण्यामुंबईला लाजवणारे होते. पण आता जाऊ दे आलिया भोगासी असे करत हवेशीर खोल्यांमध्ये पहुडते झालो.

आ़जचा प्रवास तसा लांबचा नव्हता पण वाटेत साईटसिईंग केल्यामुळे वेळखाऊ झाला. आणि खराब रस्त्यांनी पाठीचे भजे केले. बाकी एकदम फर्स्टक्लास...सातव्या दिवसापर्यंतचा हिशेब होता ९२२ किमी. उद्या आम्ही १००० किमी टप्पा पार करणार होतो. लईच भारी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्स, नचि, किश्या आणि सुन्याटुन्या...

कधी होईल देव जाणे...समुद्रातल्या शिवस्मारकाच्या निम्म्या रकमेत सुद्धा सगळे किल्ले सुरेख होतील. पण करणार कोण?

>>>>> त्याने सांगितले होते की प्रोटीन पावडर घेऊन जा. एवढ्या मेहनतीनंतर पुरेसे प्रोटीन गेले नाही तर वेट लॉसबरोबर मसल लॉसपण होईल <<<<<<
हा मुद्दा महत्वाचा आहे. मला मुळात वेटच नाहीये.. त्यामुळे तर जास्तच गंभीर. हे प्रोटिन्स डॉक्टरना विचारुन घ्यायचे की कसे?

>>>> अजून तरी आपल्या देशात अजून सायकलस्वारांना आदराने वागवले जातच नाही. कधी हे चित्र बदलेल माहीती नाही. <<<<<
बदलेल, नक्की बदलेल. पूर्ण गणवेशधारी, हेल्मेट वगैरे घालुन जास्तित जास्त सन्ख्येने लोक निदान शनिवार/रविवार सुट्टीच्या दिवशी सायकलने रस्त्यावर उतरतील, तेव्हा हे नक्की बदलेल, किंबहुना बदलण्याचि सुरुवात वेगवेगळ्या संस्था आयोजित करीत असलेल्या सायकल रॅली/रेसेस मुळे झालीच आहे.

आजही रिफ्लेक्टिव जॅकेट/हेल्मेट घालुन बाहेर पडलेले सायकलस्वार हा लोकांच्या औत्सुक्याचा विषय आहेच. व माझा तरी (मर्यादित) अनुभव आहे की दोनचार सडक्या अक्कलेचे माजोरी लोक सोडले तर बाकि पन्नास जण सायकलिंगचे कौतुकच करतात, मदत करु इच्छितात, येन केन प्रकारेण सहभागी होऊ पहातात.

फक्त सध्या प्रश्न इतकाच आहे की लोक "ते आपले काम नाही" म्हणून लांबुनच पहातात, तर त्यांच्यावर, "हे तुम्हालाही शक्य आहे, नव्हे, तुम्हीच ते करायचे आहे" हा विचार विविध प्रकारे/प्रयत्नाने ठसवला जाणे आवश्यक आहे व त्याकरीताच जास्तीतजास्त सक्षम तरुणाईत सायकलस्वारांनी रस्त्यावर उतरणे गरजेचे आहे.

फार दूर कशाला, मी देखिल सायकलिंगकडे "एक विशेष कार्यक्रम" म्हणुन वळलो ते येथिल केदार/हर्पेन/आशुचॅम्प इत्यादिंचे लेख वाचुन व फोटो पाहूनच. तुमचे सचित्र लेख हा देखिल बाकी लोकांना सहभागी करुन घेण्याच्या प्रयत्नातील महत्वाचा घटक आहे.

पुल देशपांड्यांच्या कोणत्याश्या गोष्टीत एक उल्लेख आहे, आशय असा की, अमक तमके भारी भारी गाणीबजावणी तालासुरात करतात, म्हणुन मग काय मी माझ्या आवाजात गाणे म्हणूच नये की काय?
त्याच अर्थाला घेऊन मी देखिल म्हणतो की केदार/हर्पेन्/आशुचॅम्प लांबलांबचे दौरे सायकलने करतात, म्हणजे मग काय मी धापाच किमि देखिल सायकल चालवूच नये की क्काय? Proud
उलट त्यांचे बघुन मी थोडाफार तरी प्रयत्न "न लाजता/न भिता" केलाच पाहिजे.

पब्लिक/मॉब/समाज अनुकरणप्रिय अस्ते... प्रश्न असतो की "अनुकरणाकरीता" तुम्ही त्यांचेसमोर सातत्याने चिकाटीने निश्चयाने काय मांडत रहाता... तुमचे सायकलिंग, शर्यती, त्यावरील लेख, अन तुमचे प्रत्यक्ष रस्त्यावर उतरणे, हा सर्व भाग अशा "मांडणीचाच" आहे ज्याचा दीर्घकाळात नक्कीच उपयोग झालेला असेल असे मला वाटते. Happy

लिंबुदा सॉरी मी आत्ता पाहीली तुमची पोस्ट.

प्रोटिन्स डॉक्टरना विचारुन घ्यायचे की कसे?
>>>>>
डॉक्टरपेक्षा डायटिशियनला विचारून...कारण नुसते प्रोटीन्स जाऊन उपयोग नाही. पुरेसा व्यायाम असला पाहिले.

तुमचे सचित्र लेख हा देखिल बाकी लोकांना सहभागी करुन घेण्याच्या प्रयत्नातील महत्वाचा घटक आहे.
>>>>>
धन्यवाद....खूप मस्त वाटले हे वाचून

पुल देशपांड्यांच्या कोणत्याश्या गोष्टीत एक उल्लेख आहे, आशय असा की, अमक तमके भारी भारी गाणीबजावणी तालासुरात करतात, म्हणुन मग काय मी माझ्या आवाजात गाणे म्हणूच नये की काय?
त्याच अर्थाला घेऊन मी देखिल म्हणतो की केदार/हर्पेन्/आशुचॅम्प लांबलांबचे दौरे सायकलने करतात, म्हणजे मग काय मी धापाच किमि देखिल सायकल चालवूच नये की क्काय?
>>>

लई भारी...खल्लास Happy Lol

Pages