इब्लिस अंडा करी

Submitted by इब्लिस on 17 May, 2015 - 05:10
iblis anda curry
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

३ कोंबडीची अंडी, १० मिनिट उकडलेली.

१ मोठा कांदा
२ मध्यम टोमॅटो
८-१० लसुण पाकळ्या
अर्धा इंच आले
धणे पूड १ चमचा
जिरे पूड अर्धा-पाऊण चमचा
मूठभर चिरलेली कोथिंबीर

खडा मसाला :
लवंग ३
दालचिनी छोटा तुकडा
३-४ मिरे
(वरील तिन्ही गोष्टी खलबत्त्यात थोड्या भरड कुटून घ्याव्यात)
२ तमाल पत्रे

फोडणीसाठी चिमूटभर जिरं

दीड टेबलस्पून (सुमारे ३० मिली) तेल.

लाल तिखट, गरम मसाला, मीठ : चवीनुसार. रफली अर्धा चहाचा चमचा प्रत्येकी.

क्रमवार पाककृती: 

१. अंडी उकडणे.
जाड बुडाच्या भांड्यात अंडी बुडतील इतके पाणी घेऊन त्याला उकळी काढा.
चमच्यात कच्चे अंडे (न फोडता, सालासहित) घेऊन हलकेच उकळत्या पाण्यात टाका. यामुळे अंडे ट्ण्णकन भांड्याच्या बुडाशी आपटून फुटत नाही.
सगळी अंडी सोडून झालीत, की गॅस कमी करून झाकण ठेवा.
घड्याळ लावून १० मिनिटांनी गॅस बंद करा.
अंडी थंड पाण्यात ट्रान्स्फर करून सोलून घ्या.

२. अंडी तळणे.
सोललेली हार्ड बॉईल्ड एग्ज तळायची आहेत.
यासाठी जाड फ्राइंग पॅनमधे (नॉनस्टिक चालेल) १-दीड मोठा चमचा (टेबलस्पून) तेल गरम करा.
सोललेल्या अंड्याला सुरीच्या टोकाने २-३ छोट्या चिरा द्या. याने अंडी तळताना फुटणार नाहीत. साधारण डार्क तपकिरी रंग येईपर्यंत अंडी तळायची आहेत. थोड्या थोड्या वेळाने उलटवत रहा. याला सुमारे ५-७ मिनिटे पुरतात.

हवा तसा बदामी रंग आल्यावर अंडी तेलातून बाहेर काढा, व बाजूला ठेवा. कढईतले तेल एका वाटीत काढून घ्या. अंडी पुन्हा कढईत टाकून त्यावर थोडे तिखट, मीठ व गरम मसाला भुरभुरवून थोडा वेळ परतून घ्या. अंड्याला तिखट्/मीठ/मसाला सगळीकडून लागला पाहिजे.

आता अंडी बाजूला काढून ठेवा.

egg1.jpg

३. करी.

त्याच पॅनमधे, मघाचं तेल पुन्हा टाका. त्यात जिरं टाकून फोडणी टेंपरेचर आलं, की खडा मसाला टाकून थोडं परता.
यात बाऽरीक चिरलेला कांदा घालून परता. त्याचा कचवटपणा गेला, की त्यात आलं लसणाची पेस्ट टाकून पुन्हा परता.
जिरेपुड, धनेपूड घाला.
नंतर थोडं मीठ, तिखट घालून परतून घ्या.
बाजूने तेल सुटायला लागले, की बारीक चिरलेले टमाटे, वा टमाटे उकडून मिक्सरमधून फिरवून केलेली प्यूरी त्यात घालून पुन्हा परता.
मला यात टेक्स्चर आवडते म्हणून मी कांदा/टमाट्याची पेस्ट केलेली नाही. तुम्हाला हवी तर दोन्ही गोष्टी बारीक पेस्ट केल्यात तरी चालतील.
टमाट्यांचा कच्चेपणा गेला असे जाणवले, की त्यात अर्धा पेला गरम पाणी घालून एक उकळी काढा व झाकण ठेवा.

egg2.jpg

५-६ मिनिटांनी यात गरम मसाला अ‍ॅड करा. कोथिंबीर घाला. थोडावेळ झाकण ठेवून मग रश्शाची चव घेऊन पहा. चमच्यात थोडा रस्सा काढून गार होऊ द्यावा, अन चव पहावी. आपल्याला हवी तशी तिखट मिठाच्या चवीची अ‍ॅडजस्टमेंट करावी. त्यात पुन्हा हवे तसे थोडे पाणी घालून एक उकळी काढा. झाकण ठेवून गॅस बंद करा.

खायला देताना अंडी चिरून दोन भाग करून प्लेटमधे ठेवा, व त्यावर करी घालून सर्व करा.

egg3.jpg

या जेवायला.

वाढणी/प्रमाण: 
माझ्या पुरती झाली.
अधिक टिपा: 

आवडत असेल तर हवी तशी बारीक चिरलेली हिरवी मिरची कांदा फ्राय करताना त्यासोबत घालावी.

मसाला तेलावर परतून झाला, की तो मिक्सरमधून फिरवला तरी चालेल. त्याआधी तेजपत्ता(तमालपत्र) काढून घ्यायला विसरू नका.

फोडलेल्या अंड्याचे पिवळे रश्शात मिक्स झाले की वेगळी छान चव व घट्ट कन्सिस्टन्सी येते. त्यामुळे थोडे पाणी जास्त ठेवावे. माझ्या सारख्या टेक्स्चर्ड करीत पाणी थोडे वेगळे दिसले तरी बलक मिसळून छान होते.

नेहेमीप्रमाणे फोटो मी केल्याचा पुरावा म्हणून आहेत Wink

माहितीचा स्रोत: 
ढाब्यावर खाल्लेली अंडा करी. इंटरनेट.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंडं उकडताना चिमूटभर मीठ टाकले तर अंड्याचे कवच झटकन सोलता येते. नाहीतर कधी कधी ते आतल्या पांढर्‍या भागाला चिकटून बसते

खत्रा आहे..

अंड्याचे कालवण माझे फेव्हरेट.. त्यात वाटपाच्या कालवणाला उकळी देत त्यात अंडे फोडून सोडतात .. कालवणातही अंड्याची चव उतरते.. भाताबरोबर कितीही खाऊ शकतो... डब्यात घेऊन जातो तर ऑफिसमध्येही फेमस आहे..

टण्या, टिप करता धन्यवाद .. ट्राय करून बघते ..

अंडं नीट फ्लॉलेसली सोललं गेलं नाही तर फार चिडचिड होते ..

अंडी तळून घेण्याची कल्पना मस्त वाटली.

अंडं उकडताना चिमूटभर मीठ टाकले तर अंड्याचे कवच झटकन सोलता येते. >>> मीठ घातल्याशिवाय अंडी कधीही उकडलेली नाहीत तरीही ती काहीवेळा चिकटतातच.
अंडी जेवढी ताजी तेवढे त्याचे कवच सोलणे कठीण. जसजशी ती जुनी होत जातात ( शिळी म्हणत नाही कारण अंड्यांचे शेल्फ लाईफ तीन आठवडे तरी असतेच ) तसतशी सोलायला सोपी होतात.
अंड्याचा दोन्ही टोकांजवळचा भाग थोडा काढून फुंकर मारली तर कवच सुटायला मदत होते. तसेच गार पाण्यात बुडवत अंडे सोलल्याने साल पटकन सुटत जाते.

गरम पाण्यात सोडल्यावर अंड्यातील बाहेरच्या प्रोटीनचे पटकन कोअ‍ॅग्युलेशन होते>> थँक्यू इब्लिस Happy

खुप छान पाककृती आहे. तळलेली अंडी तोंपासू दिसतायत Happy
त्याबरोबर इतर जनरल उपयोगाच्या टिप्स पण मिळतायत. थँक्स!

ताबडतोब करावीशी वाटतेय! जबरीच.
अंडं उकडण्याच्या पोस्टींसाठी खूप धन्यवाद. माझी पद्धतच चुकत होती. आता फुलॉन!

सातू | 19 May, 2015 - 00:00
गरम मसाला कुठला वापरायचा कारण बाहेरचा मसाला वापरुन केलेल्या करीची चव मला आवडत नाहि आणि घरगुती गरम मसाल्याच्या चवीप्रमाणे करीची चवपण बदलते ...एकुणच माझी अंडा करी चमचमीत होत नाहि म्हणुन विचारत आहे
<<

घरचा संपला की माझ्याकडे एवरेस्टचा वापरला जातो. एवरेस्टचा चिकन मसाला वापरलात तरी चालेल.

तुम्हाला चमचमीत करायचं असेल तर रस्सा करत असताना चव घेत तिखटपणा अ‍ॅडजस्ट करता येईल की!

दुसरं म्हणजे, अंडा करीत पूर्ण ब्लँड चवीचे अंडे व खाताना भात/पोळी अ‍ॅड होणार आहे. ते सगळे मिक्स करून जो घास तयार होईल, त्या अंदाजाने तिखट-मसाला घालायचे आहे. नुसता रस्सा खाल्ल्यावर जरा जास्तीचा तिखट लागायला पाहिजे.

त्यात वाटपाच्या कालवणाला उकळी देत त्यात अंडे फोडून सोडतात............माझी मैत्रिण असं करायची ते फोडलेले अंडे,त्याच आकाराचे रहायचे.

बापरे.. अंड्याची किती ती बाळंतपणं Happy
..
इब्लिसभौ, भारी दिसतेय करी मात्रं.
ते पाण्यात उकडलं, तेलात तळलं.. मसाल्यात घोळलं, परत तळलं... अशातून तावून सुलाखून निघालेल्या अंड्याला मग तुमच्या त्या भन्नाट रश्श्यात कापून घातल्यावर..
स्वर्गीय का काय म्हणतात तेच लागणार.

मी करते त्यात ते तळणं, घोळणं, तळणं नस्तय... आता करून बघेन...
तुमच्या पद्धतीने अगदी 'इब्लिस' होणार ह्याची मलाच खात्री Happy

आज केली होती या कृतीने, खूपच भारी झाली होती. सर्वात उत्तम म्हणजे, अंडी उकडण्याच्या सर्व टिप्स अतिशय उपयुक्त ठरल्या.
हे काही फोटो -
करी -
उकडून तळलेली अंडी -
वाफा येत असतानाच फोटो काढल्याने धूसर दिसतोय.
फायनल प्रॉडक्ट -

फक्त एक सजेशन - करीसाठी थोडं वाटण करुन टाकायला हवं नाहीतर पाणी, कांदा, टोमॅटो सगळं नीट मिळून येत नाही.

केवळ अण्डी वगळून बाकी पदार्थ घेऊन रस्सा वगैरे केला अन अण्ड्यांच्या ऐवजी इडलीचे गोल गोळे करुन, ते तळून घेऊन ते करीमधे टाकून हाणले... छान लागले. ! Proud
(आम्हाला मांसाहार निषिद्ध, म्हणुन इडलीचे गोळे)

पुढील प्रयोग म्हणजे इडलीच्या गोल गोळ्यांऐवजी, ब्रेडचे तुकडे तळून ते रश्शात टाकून खाऊन बघणार आहे.....

>>>> आता खरा धागा पळेल. <<<<<
हो हो हो, अगदी अगदी !

तमालपत्र, धनेजिरे पूड, कांदा-टोमॅटो (आलं-लसूण ऐच्छिक) मिक्सीतून काढलेलं वाटण आणि तळून घेतलेली अंडी अशीच अंडाकरी करते नेहेमी. खडा मसाला घालत नाही आणि अंड्यांना चिरा देऊन गरम मसाला इ. त घोळवून घेत नाही. आता एकदा फुरसतीत करून बघेन.
आणि अंडी उकडवायला वरणभाताच्या कुकरमधेच लावून घेते, नेहेमीच्या मेन्यूतला पदार्थ असल्याने फालतू लाड करत नाही Wink
बंगाली जन त्यात (अपरिहार्यपणे) बटाटा घालतातच. मी घालत नाही.

आता विषय निघालाच आहे तर, अगदी टिपिकल गावाकडे अंड्याची करी कशी करतात याची पाकृ कुणी देईल का? अगदी पातळ रस्सा असतो पण कातिल लागते. शेवटची खाल्ली होती ती फील्डवर एका मुस्लिम कुटुम्बात. त्यांनी आणि त्यात खास त्यांच्या पारंपरिक पद्धतीने केलीये असं सांगितलं होतं. ती तर आणखीच तोंपासु होती. पण या सगळ्या चवी 'मराठी'च. महाराष्ट्राबाहेरच्या बर्‍याच चवी बघितल्या आहेत. त्या वेगळ्या असतात थोड्या.

तेव्हा ही पाकृ माहित असेल तर प्लीज प्लीज इथे लिहा.

अंडी उकडवायला वरणभाताच्या कुकरमधेच लावून घेते>> वरण भाताला अंड्याचा वास येत नाही का? किंवा कुकरला सुद्धा? का आलेला चालतो? वरण भात तूप खाताना अंड्याचा वास आला तर मला चालणार नाही.

अंडी उकडवायला वरणभाताच्या कुकरमधेच लावून घेते>>>>>>>>जास्त वेळ उकडल्यामुळे अंड्याची चव आणि पोत वेगळा लागतो.पाणी उकळल्यानंतर ,गॅस बारीक करून पाण्यात अंडी घालून ७-८ मिनिटे उकळावी.अशी अंडी मऊ,टेस्टी लागतात.

छान पाककृती आणि फोटो एकदम तोंपासू..........

अंडी तळून ती करीमध्ये वापरण्याचा हा प्रकार आवडला. आतापर्यंत अश्या प्रकारे बनवलेली अंडाकरी खाल्लेली नाही पण आता नक्कीच करणार आणि खाणार.

आशूडी, ओह ओके.. मला स्वयंपाकाबाबत त्यामागची शास्त्रीय कारणे समजत नाही म्हणून ते लक्षात नाही आले.

अवांतर - हा धागा बघून हॉस्टेलच्या स्टडीनाईटला आम्ही बादलीत हिटर लाऊन त्यात अंडी उकडवून मीठ-मसाला लाऊन खायचो ते आठवले. अंडी केव्हा उकडली हे अचूक सांगणारे दोनच जाणकार होते आमच्यात, आणि त्यांचे फार कौतुक वाटायचे.. मला तर एकवेळ चहा कधी उकळली हे आयुष्यात समजेल, पण कवचामागची अंडी उकडलेली कशी समजतात हे नाही कळणार.

वाह!! वाचताना आणी फोटो पाहताना जेंव्हा तोंपासु होतं म्हंजे रेस्पी चांगलीच आहे असे हमखास समजावे..

इट्स टू गुड!!! Happy

अंडाकरी मस्तं झाली. सगळ्यांना आवडली. धन्यवाद इब्लिस!

कांदा-टोमॅटो आणि मसाले एकजीव झालेले आवडतात म्हणून परतून झाल्यावर वाटून घेतले. त्यानंतर का कोण जाणे, करीला जरा अन्नॅचरल लाल रंग आला. Proud तळलेली अंडी कमी पडली म्हणून नुस्ती उकडलेली शेवटी घालावी लागली. Happy

आजकाल मसाल्याच्या कर्‍यांबरोबर स्पंजदोसा पॉप्युलर झाल्यामुळे पुन्हा एकदा तोच...

eggcurry-maayboli.jpg

Pages