तारावर तार बत्तीस तार...

Submitted by सुशांत खुरसाले on 15 May, 2015 - 01:55

भाग 1:-

"तारावर तार बत्तीस तार..
त्याच्यावर बसले दिम्मगदार.."

"हे काय गुरूवर्य ?"

"हा बालपणाचा मंत्र आहे ."

"जरा अवघड नाही का वाटत ? त्यापेक्षा तुम्ही सुलभधर्मभारती मधील बाळाचार्यांचं ते प्रसिध्द चरण का शिकवत नाही ?"

"ते कोणतं, शिष्योत्तमा ?"

"लाल टमाटे खायेंगे
बालक मंदिर जायेंगे
बालक मंदिर दूर है ,
जाना भी जरूर है .."

"पण हा मंत्र तर अतिसामान्य आहे. "

"संदर्भांचं सामान्यीकरण करता आलं पाहिजे ,असं आपणच एकदा मागे म्हणालात गुरूवर्य. "

"हो शिष्योत्तमा, संदर्भाचं सामान्यीकरण जरूर करता यावं पण ते करताना संदर्भच 'सामान्य' होऊन जाणार नाही ,याचीही काळजी घ्यावी ."

"हे कृपया आपण सोदाहरण स्पष्ट करू शकाल का गुरूवर्य.."

"म्हणजे असं बघ,बाळाचार्यांचं वचन 'भाजीवाली सखू आणि हवालदार भिकू' या चित्रपटात वापरण्यासारखं आहे ;परंतू माझा मंत्र मात्र 'शिवाजी-द बॉस' मध्येही जोरात चालून जाईल. "

"ही कसली राक्षसी उदाहरणं देता गुरूवर्य, मी अजून बाल्यावस्थेत आहे हे विसरलात वाटतं. "

"काल तुझ्याच वयाच्या एका शिष्यानं, अधोक्षानं मला हे दोन चित्रपट दाखवले. तुलाही ठाऊक असतील असा विचार करून मी ही उदाहरणं दिली ."

"ते राहू द्या गुरूजी, उदाहरणं मी गृहपाठ म्हणून शोधून आणेन.
बरं एक सांगा- 'त्याच्यावर बसले दिम्मगदार' असं म्हणताना 'त्याच्यावर' मध्ये जी एक वृत्तीय धावपळ करावी लागते, त्याचं काय? "

"बाळ दिगंतनारायण, तुला मी दिवसभर वृत्तबध्द गझला करत बसणारा एखादा जालीय कवी वाटलो काय? "

"क्षमस्व गुरूवर्य. पण 'त्यावर' असा सोपा पर्याय उपलब्ध असताना....."

"तपोसामर्थ्याचे अंश सगळीकडे विखरून ठेवावे लागतात शिष्या.
माझा मंत्र हा 'लाल टमाटे खायेंगे...' प्रमाणे अगदी उघड उघड नाहीये, हे तर अगदी उघड आहेच ! शब्दांच्या भ्रमिष्ट रचनेबरोबरच जाणुनबजून केलेल्या वृत्तीय गडबडीचाही त्यात समावेश आहे. "

"जाणुनबुजून??"

"हो, 'तारावर तार बत्तीस तार' असं सगळं व्यवस्थित चालू असताना अचानक 'त्याच्यावर' सारखा शब्द येतो आणि हिरड्यांच्या मुळावर भुकंप झाल्याप्रमाणे माणसाची दातखीळ बसते. जीवनातल्या अनिश्चिततेचं प्रतीक म्हणून हा शब्द योजलाय. सगळं काही साग्रसंगीत चालू असताना काळाने अचानक निर्मिलेल्या उन्मादाचं प्रतिनिधित्व हा शब्द करतो. "

"शिवाय हे सगळं करून मेंदूत मुरडा येतो तो वेगळाच !"

"काय म्हणालास ?"

"काही नाही.
बरं एक शेवटचा प्रश्न- या मंत्राचा उपयोग काय? "

"चांगला प्रश्न विचारलास शिष्योत्तमा.
हा मंत्र दिवसातून बत्तीस वेळेस घोकणार्यास माझ्या तपोसामर्थ्याच्या बत्तीसाव्या भागाचा लाभ होतो. शिवाय हा ज्याच्यासमोर घोकला जातो, त्याच्या डोक्याची बत्तीस शकले व्हायची वेळ येते . सिंपली लाईक -विक्रम अँड वेताल. "

"धन्यवाद गुरूवर्य."

"ऐक -उद्या येताना हा मंत्र बत्तीस वेळेस लिहून आण. आणि......"

"आणि काय गुरूदेव..?"

"यापुढे माझ्यासमोर हा मंत्र घोकत जाऊ नकोस. अन्यथा असे मंत्र चमत्कारसिध्दीने निर्माण करायला मी शिल्लक राहणार नाही !"

================================

भाग 2:-

"चार टमाटे एकच मिर्ची
तेरी शादी ,मैं बावर्ची !"

"बाळ अधोक्ष, सकाळपासून हा काय घोष चालवला आहेस तू ?"

"गुरूवर्य, माझा प्रिय मित्र रमण याचा विवाह आज निश्चित झाला. त्याच्याच लग्नाची ही टॅगलाईन."

"अरे वा ! वधू कोण आहे म्हणालास ?"

"वधूचं नाव 'उतराई' असं असून तिचा इतिहास अतिशय रोचक आहे. आधी आधी ती आम्हा सगळ्या मित्रांनाच लाईन द्यायची.म्हणून आम्हीही सगळेच तिच्यावर लाईन मारायचो.परंतू तिच्या लाईनचा फायनल करंट रमणला बसला. "

"इतकं जास्त बोलायची काय गरज आहे, मला कळत नाही.फक्त नाव सांगुन भागत नाही का तुमचं ? कशाला लाईन-बिईनच्या गोष्टी काढायच्या ??
अशा वेळी जुन्या दिवसांची याद येऊन आमची केशगळती व्हायला सुरूवात होते."

"क्षमस्व गुरूदेव! जिव्हारी लागलेल्या गोष्टी नकळत बाहेर पडतात माणसाच्या तोंडून."

"असो.टॅगलाईनमधला टमाट्यांचा उल्लेख पाहून ती रचना माझे कट्टर प्रतिस्पर्धी बाळाचार्य यांनी केली असल्याची शंका मनास डसते आहे."

"उतराई ही बाळाचार्यांच्या गुरूकुलाची विद्यार्थीनी असली तरी ही शंका रास्त नाही गुरूदेव. खरंतर उतराईने बाळाचार्यांना टॅगलाईन लिहिण्याची विनंती केलीच होती ;परंतू अशा अतिसामान्य कार्यासाठी त्यांनी आपली प्रतिभा झिजवण्यास नकार दिला. "

"तर मग.."

"मग बाळाचार्यांनीच एक उपाय सुचवला. तिला झोपेत जागे राहण्यास सांगितले. अशा संभ्रमावस्थेत सुप्तपणे तिला जी ओळ ऐकू येईल,तीच लग्नाची टॅगलाईन ठरेल असे परस्पर जाहिर केले."

"बघ म्हणजे शिष्योत्तमा, त्या टमाटेखोर म्हातार्याने स्वप्नातही फक्त टमाट्याच्याच ओळी ऐकवल्या. मागेही तुम्ही मला
'लाल टमाटे खायेंगे
बालक मंदीर जायेंगे..'
अशा त्याच्या हीन ओळी शिकवण्याची विनंती केलीत, जी मी अर्थातच धुडकावून लावली. त्याच्या प्रेयसीच्या अंगणात फक्त टमाट्याचीच झाडं होती की काय, कोण जाणे !"

"दुसर्याच्या अंगणातली झाडं मोजण्याआधी स्वतःच्या बुडाखालचे निखारे विझवावेत, अशी माझी आपल्याला नम्र विनंती आहे गुरूजी."

"मारे चुरूचुरू बोलायला लागलात रे !एकाचं शुभमंगल ठरलं तर लगेच तुम्हा सगळ्यांना शिंगं फुटली वाटतं."

"आपला शिष्योत्तम कसं बोलतो यापेक्षा त्याला फुटलेली शिंगं आता आपल्याच पोटात रूतणार नाहीत ना ? याचीही आपण काळजी घ्यावी असे वाटते."

"हे काय बोलतो आहेस शिष्योत्तमा ! बुडाखालचे निखारे काय, पोटात रूतणारी शिंगं काय..यापूर्वी तुझ्या वाणीतून अशा उपमा-उत्प्रेक्षांची बरसात कधीच अनुभवायला मिळाली नव्हती."

"प्रेमभंगाची एखादी रात्रही अशा उपमा-उत्प्रेक्षांना माणसाच्या ह्रदयी रूजवायला पुरेशी असते, असा माझा अनुभव आहे गुरूवर्य."

"तुझी व्यथा नीट उलगडून सांगितलीस तर मी बुडाखालच्या निखार्यांचा बंदोबस्त करू शकेन."

"तर कसंय ना की, उतराई आमच्या प्रेमाची कधीच उतराई होऊ शकली नाही.
त्यामुळे 'एक प्रेमभंग झाला की लगेच पुढच्या प्रेमाच्या तयारीला लागा' या आपल्याच उपदेशानुसार मी लगेचच ग़म-ग़म मधे कृष्णतलावाकाठी मासेमारी करणार्या एका कोळ्याच्या मुलीच्या प्रेमात पडलो."

"अरे अरे ! हे काय करून बसलास. निदान जात-पात तरी पाहायचीस."

"तर ते काहीही असो ! मुलीला वश करण्याची जबाबदारी मी आधीच पार पाडली आहे. आता दोघांच्याही घरच्यांना पटवण्याची जबाबदारी तुमची."

"गुरूला असे आदेश देताना तुला लाज कशी नाही वाटत ?? मी आत्ताच्या आत्ता तुला बत्तीस रात्रीच्या निद्रानाशाचा शाप देऊ शकतो."

"आपल्या मठात वारंवार चकरा मारणार्या कुण्या जर्मन वा हंगेरियन तरूणीशी मी आपलं सूत जुळवलं नाही, हे या तमाम समाजावर उपकारच नाहीत का गुरूजी ?
शिवाय ही गोष्ट बाहेर कुणाला कळू दिली नाही, त्याचं भाडं वेगळंच !"

"कसं मोक्याचं बोललास शिष्योत्तमा ! माझ्या दुखर्या नसांची यादीच जणू तुझ्याकडे लिहिलेली आहे असं वाटतं कधीकधी. गुरूची विद्या गुरूलाच कशी शिकवावी, हे तुझ्याकडून शिकेन म्हणतो मी. "

"तर मग तुमचा सपोर्ट फायनल समजू ना ??"

" आता काय, तू बत्तीस लग्नं केलीस तरी मी तुझ्यापाठी खंबीरपणे उभा आहे शिष्योत्तमा. तू बिनघोर रहा."

"आणि माझ्या लग्नाची टॅगलाईन ??"

"तारावर तार बत्तीस तार..
त्याच्यावर बसले दिम्मगदार !"

--सुशांत..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लिहीले आहे तसं मजेदार, पण पहिल्यांदा संदर्भ लागत नव्हता.:)

दिनेशदांचा प्रतिसाद पाहिल्यावर ट्युबलाईट पेटली.:P