अधिवेशनामागचे चेहरे : श्री. शैलेश शेट्ये

Submitted by वैभव on 11 May, 2015 - 13:17

बृहन्महाराष्ट्र मंडळाचे १७वे अधिवेशन आता फक्त दोन महिन्यांवर येऊन ठेपले आहे. दोन अडिचशे स्वयंसेवकांना घेऊन चार-पाच हजार लोकांचे तीन दिवस मनोरंजन करणे ही काही सोपी गोष्ट नाही. गेल्या दोन वर्षाहूनही अधिक काळ या अधिवेशनाचे काम सुरु आहे. आणि हे काम करण्याची जबाबदारी ज्यांच्या समर्थ खांद्यानी पेलली आहे त्या शैलेश शेट्येंशी केलेही ही बातचीत. ShaileshShetyeCenter.jpgलॉस एंजिलीसमध्ये अधिवेशन आणण्याची कल्पना कशी सुचली?
अनेक वेळा एखादी गोष्ट आपल्यापासून दूर जाते तेव्हा आपल्याला तीचं महत्व कळतं. अमेरिकेत आल्यानंतर मराठी संस्कृती, मराठी समाजासाठी काहीतरी करावं असं वाटू लागलं. त्यातूनच मग मी महाराष्ट्र मंडळात काम करायला लागलो आणि लॉस एंजलीसच्या महाराष्ट्र मंडळाचा अध्यक्ष झालो. लॉस एंजलीसमधील मराठी समाजात काम केल्यानंतर या कामाला पुढे कसं न्यायचं याविषयी आम्ही विचार करायला लागलो. त्यातूनच संपूर्ण उत्तर अमेरिकेतील लोकांना एकत्र आणण्यासाठी काय करता येईल ते आम्ही पहायला सुरुवात केली. बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अधिवेशन लॉस एंजलीसमध्ये होऊन वीस वर्षे उलटून गेली होती. त्यामुळे हे अधिवेशन आयोजीत करावं असा प्रस्ताव मांडताच अनेक समविचारी मंडळी एकत्र यायला लागली. त्यांच्या प्रोत्साहनामुळे आणि प्रयत्नांमुळे आणि बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या पाठींब्यामुळे लॉस एंजिलीसमध्ये अधिवेशन आणण्यात आम्हाला यश मिळालं. मी खरंच नशीबवान आहे की मला अत्यंत गुणी सहकारी मिळाले आहेत. आमच्या सर्व स्वयंसेवकांनी दिलेल्या वेळेमुळे आणि सांघीक कामामुळे आम्ही २४ वर्षांनंतर एक यशस्वी अधिवेशन आयोजीत करण्याकडे जोमाने वाटचाल करत आहोत. त्यांनी दिलेला वेळ, मेहनत आणि बांधीलकीला मी सलाम करतो.

लॉस एंजलीसच्या अधिवेशनाचं वेगळेपण काय आहे?
मराठी लोकांच्या अनेक पिढ्या अमेरिकेत गेली ६० दशकापासून वास्तव्य करत आहेत. या पिढ्यांच्या गरजा वेगवेळ्या आहेत, त्यांच्या आवडी निवडी वेगवेगळ्या आहेत. या सर्व पिढ्यांचे सांस्कृतिक मनोमिलन या अधिवेशनात करायचा आमचा बेत आहे. प्रत्येक पिढीला आपले वाटतील असे कार्यक्रम या अधिवेशनात असतील. ‘मैत्र पिढ्यांचे’ ही कल्पना मध्यवर्ती ठेवूनच या अधिवेशनाची आम्ही आखणी केली आहे. मनोरंजनाच्या कार्यक्रमांबरोबर मला २ तारखेच्या काही सेमिनार्स आणि चर्चासत्रांचा विशेष उल्लेख करावासा वाटतो. ५५ पेक्षा अधिक वयोगटाच्या लोकांसाठी २ तारखेला 'उत्तररंग' हे या वयोगटाच्या समस्यांविषयीचे चर्चासत्र आयोजित केलेले आहे. या वयोगटातील अमेरिकेतील मराठी मंडळींच्या समस्या भारतापेक्षा वेगळ्या आहेत. त्यांच्यावर चर्चा होणे आपल्या समाजासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. तसेच या वर्षीच्या बिझनेस सेमिनारमध्ये एकाच व्यासपीठावर १० यशस्वी मराठी उद्योजकांना एकत्र पहायची संधी आपल्याला मिळेल. हर्ष आणि अनिता भोगले यांच्याविषयी तर मी आपल्याला काही वेगळे सांगायला नकोच पण त्यांच्याव्यतिरीक्त श्री ठाणेदार, रवी टिळक, सुनील गायतोंडे, समीर पाध्ये, अनिल दिवाण, लोकसारंग हरदास, किशोर पाटील, गिरीश गायतोंडे आणि संजय सुभेदार हे उद्योजकही यात सामील होणार आहेत. त्यांच्याकडून आपल्याला उद्योजकतेचे धडे घेता येतील. तसेच लॉस एंजिलीस हे हॉलिवूडचे माहेरघर. येथील अधिवेशनात चित्रपट उद्योगावर चर्चासत्र नसेल तरच नवल. ‘ला सिनेमा’ या चर्चासत्रात चित्रपट निर्मितीच्या विविध अंगांवर चर्चा करण्यासाठी डॉ. जब्बार पटेल, डॉ. मोहन आगाशे, सुप्रसिद्ध सिनेमटॉग्राफर महेश लिमये आणि इतर अनेक बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील प्रसिद्ध मंडळी हजर असणार आहेत. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना या सेमिनारच्या नोंदणी दरामध्ये खास सवलत दिली जाणार आहे.

अधिवेशनाचं विशेष आकर्षण काय असेल?
उत्तमोत्तम कार्यक्रम आणि विचार करायला लावणाऱ्या वेगवेगळ्या परिषदा हे या अधिवेशनाचे आकर्षण असेल. त्याव्यतिरीक्त अनेक विशेष अतिथींची आपल्याला उपस्थिती लाभणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून अधिवेशनाला येणार आहेत. सुप्रसिद्ध उद्योजक आणि सॅक्रमेंटो किंग्ज या एन बी ए टीमचे मालक श्री. विवेक रणदिवे आपल्याला विशेष अतिथी म्हणून लाभणार आहेत. सुप्रसिद्ध उद्योजक अच्युत गोडबोले अधिवेशनाचे प्रमुख वक्ते असणार आहेत. या सर्व लोकांना एका छताखाली ऐकण्याची सुवर्णसंधी क्वचितच लाभते. तसेच या वर्षी पहिल्यांदाच २ तारखेच्या संध्याकाळच्या बँक्वेटमध्ये फॅशन शोही पहायला मिळणार आहे. तसेच तीन दिवस सकाळ संध्याकाळी साबुदाण्याची खिचडी, वडापाव, सोलकढी, पुरणपोळी, आमरस, फणसाची भाजी अशा अस्सल मराठी पदार्थांची मेजवानी असेल ते वेगळंच!

एक्स्पोमध्ये काही वेगळं आहे का?
नेहमीप्रमाणे यावर्षीही एक्स्पोच्या माध्यामातून अनेक लोकांना आपल्या सेवा व उत्पादने चार हजार मराठी लोकांसमोर मांडता येतील. पण या वेळी पहिल्यांदाच आम्ही रिअल इस्टेट एक्स्पोचेही आयोजन केले आहे. उत्तर अमेरिकेतील अनेकांना भारतात जागा घेण्याचे स्वप्न असते. काही लोकांना भारतात रिटायरमेंटनंतर जाऊन रहायचे असते तर काही लोकांना फक्त गुंतवणूक करायची असते. अशा लोकांना वेगवेगळे पर्याय शोधण्यासाठी भारतात जाण्याची आता आवश्यकता नाही. अधिवेशनात मध्ये वेगवेगळ्या भारतीय रिअल एस्टेट कंपन्या त्यांचे प्रकल्प आपल्यापुढे रिअल इस्टेट एक्स्पोच्या माध्यमातून आपल्यापुढे मांडतील.

कन्व्हेन्शन सेंटरच्या आजूबाजूला बघण्यासारखं असं काय आहे?
कन्व्हेन्शन सेंटरच्या अगदी लागून डिस्नेलँड आहे. त्याशिवाय ५० मैलाच्या परिसरात अक्षरश: असंख्य आकर्षणे आहेत. युनिव्हर्सल स्टुडीओ, सुप्रसिद्ध सॅन डिएगो झू आणि वाइल्ड लाइफ सफारी, सी वर्ल्ड, लेगो लँड, व्हेनिस बीच, हॉलिवूड अशी लांबच्या लांबच यादी आहे. आणि मुख्य म्हणजे बहुतेक ठिकाणी जाण्यसाठी डिस्नेलँडवरुन बसेस उपलब्ध आहेत. खरंतर माझ्यासारख्या अनेक वर्ष इथे राहिलेल्या माणसानेही अजून इथली सर्व आकर्षणं पाहिलेली नाहीत इतकी पर्यंटन स्थळे आजूबाजूला आहेत. कन्व्हेन्शन सेंटरपासून ४० मैलावर टेमेक्युलाला वायनरीही पाहता येतील. या विषयीची अधिक माहीती आपल्याला अधिवेशनाच्या वेबसाइटवर -http://bmm2015.org/registration/travel-and-tourism/ मिळू शकेल.

किती लोकांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे? अजून कितीपर्यंत नोंदणी वर जाईल असे तुम्हाला वाटते?
तीन हजार पेक्षाही जास्त लोकांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे. हा आकडा चार हजार पार करेल असा आमचा विश्वास आहे. आपण जेव्हढ्या लवकर नोंदणी कराल तितकी पुढची सीट तुम्हाला मिळू शकेल. आणि मागे सीट मिळाल्या तरी स्टेडीयम सारख्या सीट असल्याने कार्यक्रम नीट दिसू शकतील. ज्यांना देणगी देणे शक्य होईल त्यांनी देणगी दिल्यास देणगीदारांसाठी राखून ठेवलेल्या खास जागा त्यांना मिळू शकतील. या जागा सर्वसाधारण नोंदणी करणाऱ्यांच्या पुढच्या रांगामंध्ये असतील. या अधिवेशनासाठी नुसत्या अमेरिकेतूनच नव्हे तर संपूर्ण जगातून लोकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. अनेक लोकांनी देणग्या दिल्या आहेत आणि अनेक उद्योजकांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे प्रायोजकत्व स्वीकारले आहे. त्यांच्या आर्थिक मदतीशिवाय एव्हढा मोठा प्रकल्प हाती घेणे शक्यच झाले नसते. मायबोलीमधील या मुलाखतीच्या निमित्ताने मी आमच्या देणगीदारांचे आणि प्रायोजकांचे पुन्हा एकदा आभार मानतो.

मायबोलीकरांना या अधिवेशनासाठी काय करता येईल?
मायबोलीकरांना अनेक वेगवेळ्या पद्धतीने अधिवेशनाच्या कार्यास हातभार लावता येईल. सर्वप्रथम तमाम मायबोलीकरांना मी अधिवेशनाच्या आयोजन समितीतर्फे अधिवेशनाला हजर राहण्याचे आवाहन करतो. भारतातील मायबोलीकरांना कदाचित हे थोडे कठीण जाईल, पण अमेरिकेतल्या मायबोलीकरांनी मात्र आवर्जून उपस्तिथ रहावे. अलीकडे काही अधिवेशनांपासून उत्तर अमेरिकेतील वेगवेगळ्या शहरात विखुरलेल्या मायबोलीकरांना एकमेकांना भेटण्यासाठी अधिवेशन ही एक हक्काची जागा झाली आहे. ज्या मायबोलीकरांनी अजूनही नोंदणी केली नसेल त्यांनी www.bmm2015.org वर जाऊन नोंदणी करावी. ज्या मायबोलीकरांना येणे जमणार नाही त्यांनी सोशल मिडीयामधून अधिवेशनावरील माहितीचा प्रसार करायला मदत करावी. अधिक माहितीसाठी अधिवेशनाच्या फेसबुक पानावर (https://www.facebook.com/bmm2015) भेट देऊन त्यावरील पोस्टना ‘लाइक’ करावे. आपल्या मित्रमंडळींनाही अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी आग्रह करावा. आपण सर्वांनी एकत्र मिळूनच मराठी संस्कृतीचा उत्तर अमेरिकेतील हा सर्वात मोठा उत्सव यशस्वी करु शकू.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगली मुलाखत! थोडी वैयक्तिक ओळख (उदा: यांच्या मराठी कार्यक्रमातील आवडीनिवडी किंवा येत असलेले कलाप्रकार, किंवा आजवरच्या वाटचालीतील एखादी अतिशय रंजक आठवण इ इ) वाचायला आवडेल.

अनेक शुभेच्छा!