योगवर्गातील योगाभ्यास, एक निरीक्षण - २

Submitted by अतुल ठाकुर on 11 May, 2015 - 00:36

free-vector-yoga-poses-stylized-clip-art_111371_Yoga_Poses_Stylized_clip_art_hight_0.png

योगवर्गात दाखल होताना काही पथ्ये पाळणे आवश्यक असते. बरेचदा माणसे जोपर्यंत शरीर मागणी करीत नाही, किंवा डॉक्टरकडुन सांगीतले जात नाही, योगवर्गाकडे फिरकत नाहीत. कदाचित गृहीणीवर्गात स्वतःहुन योगवर्गात दाखल होणार्‍यांची संख्या जास्त असेल. पण सर्वसाधारणपणे ज्येष्ठ नागरिकांची संख्या येथे जास्त असते. अशावेळी काही दुखणी जडल्यावर योगवर्गात दाखल झाल्यास योगशिक्षकाला हमखास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे "आम्हाला हे किती दिवस करावे लागेल?". शिकवणार्‍याला निराश करणारा हा प्रश्न असतो. खरं तर योग हि एक जीवनशैली आहे. आसने आणि प्राणायाम हा या शैलीचा फक्त एक भाग आहे. येथे मनापासुनच्या सहभागाचे महत्त्व अपरंपार आहे. नुसती आसने, प्राणायाम नव्हे तर रोजच्या आहार विहारातील काही बदलदेखिल कदाचित करावे लागतील. त्याला तयारी असावी लागते. तिखट, तेलकट आणि तुपकट खाऊन आम्लता होणारा जर योगवर्गात आला तर त्याला आहारात बदल हे करावे लागतील. आहार तसाच सुरु ठेऊन आसने केल्यास पुरेसा उपयोग होणार नाही. काही ठिकाणी दुखणे सांगीतल्यास काही विशिष्ठ आसनांची योजना केली जाते. काही आसने मुद्दाम वगळली जातात. त्यामुळे काही दुखणी असल्यास त्याबद्दल योगशिक्षकाला सविस्तर सांगणे आवश्यक आहे. उच्च रक्तदाब असलेल्यांना बरेचदा पुढे वाकण्याची किंवा डोके खाली पाय वर असा आकृती बंध असलेली आसने करण्यास मनाई केली जाते. मानेची, पाठिची दुखणी असलेल्या माणसांना पुढे वाकावी लागणारी आसने करणे टाळावे लागते. मात्र प्रत्येकाचे दुखणे, वय, शरीराची लवचिकता आणि त्या व्यक्तीची आवड, प्रयत्न यावर योगशिक्षक बरेच निर्णय घेतात. काहींना शिकण्याची खुप घाई असते. ही योगाबद्दलच्या अज्ञानातुन आलेली असते. योग ही कुणाशी चाललेली स्पर्धा नाही. त्यात पहिला नंबर काढुन कसलेही पारितोषिक मिळवायचे नसते. पारितोषिक मिळवायचेच असेल तर ते स्वतःच्या आरोग्याचे मिळवावे आणि त्यासाठी शांतपणे आणि संयम ठेऊन सांगीतलेली आसने पुरेसा वेळ देऊन करावी. या आसनांच्या पुनःपुनः केलेल्या आवर्तनानेच आपल्याला फायदा होणार असतो. आपण किती वेगवेगळी आसने करतो यापेक्षा ती कशी करतो यावर बरेच काही अवलंबुन असते.

प्रत्येक योगवर्गाच्या काही परंपरा असतात. त्याचा संबंध आसने करताना श्वास घेण्याची पद्धत, आसने करण्याची पद्धत अशा गोष्टींशी असतो. त्या पाळणं आवश्यक असतं. काही जण दुसरीकडे काही शिकुन येतात त्याचा सराव करण्याचा काही ठिकाणी मज्जाव केला जाण्याची शक्यता असते. योगवर्गात सर्वांबरोबर किंवा एकेकट्याने सराव करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. योगवर्गात शांतता ही पाळली गेलीच पाहीजे. पुर्वी हा प्रश्न नव्हता पण मोबाईल आल्यापासुन परिस्थिती बदलली आहे. शवासनाच्या वेळी हटकुन मोबाईलची रींग वाजली म्हणजे बाकीच्यांना देखिल ते आसन साधण्यात व्यत्यय येऊ शकतो. सराव करताना कपड्यांच्या बाबतीत बहुतेक जण जागरुक असतात. तरीही कपडे पुरेसे सैल असावेत हे आवर्जुन सांगावसं वाटतं. अन्यथा काही आसने करताना कपड्यांच्या तंगपणाची अडचण जाणवते. पश्चिमोत्तानासनात पुढे वाकताना किंवा पर्वतासनात दोन्ही हात डोक्याच्यावर नमस्कार मुद्रेत नेतानासुद्धा तंग कपड्याने त्रास होऊ शकतो. आवाजाचा काय त्रास होऊ शकतो यावर एक अनुभव सांगावासा वाटतो. एका योगवर्गात शवासन सुरु असतानाच एक बाई येत (किंवा जात). जाताना कपडे गोळा करताना त्या शांततेत त्यांच्या प्लास्टीकच्या पिशवीचा कर्कश्श आवाज होत असे. त्यामुळे इतर जण किती डिस्टर्ब होत आहेत हे त्यांच्या गावीही नसे. त्याचप्रमाणे नंतर उशीरा आलेल्यांनीदेखिल शवासनासारखी आसने सुरु असल्यास जोरजोरात आवाज करुन आपापले टॉवेल वगैरे घेण्यासाठी कपाटे उघडणेही गैरच. अनेक वर्षे आल्याने ओळखी झाल्या असल्या तरी शेजारच्यांशी गप्पा मारत राहण्याने इतरांना त्रास होऊ शकतो. योगवर्गात आपापल्या जागी बसल्यावर आसने करताना आपले पाय किंवा हात इतर कुणाला लागणार नाहीत याची काळजी घेणे आवश्यक आहे. उभे राहुन आसने करताना शक्यतो खांबाचा किंवा भिंतीचा आधार सुरुवातीला तरी घ्यायला हरकत नाही. त्यामुळे अपघात टाळता येतात. काही योगवर्गात योगासनांचा चार्ट तयार असतो. तो सुरुवातीला देऊन त्यातील क्रमाप्रमाणे आसने शिकवली जातात. हा चार्ट बरोबर आणणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे शांतपणे सराव करीत राहावे. काही शंका असल्यास योगशिक्षकाला आवर्जुन विचाराव्या. मनातल्या मनात काहीही दडपुन टाकु नये. आसन प्राणायामाचा सराव संपल्यावर शवासन करण्याची पद्धत असते. ती पाळावी.

काहीजण टिव्ही वर काही प्रकार पाहुन येतात आणि हे आम्हाला शिकवा अशी मागणी करतात. त्यांची समजुत काढणे हे एक महत्त्वाचे काम योगशिक्षकाला करावे लागते. "आम्हाला कपालभाती शिकायची आहे. आम्हाला ध्यान शिकवा. आम्हाला प्राणायाम शिकायचा आहे" अशा तर्‍हेची मागणी करणे हे योग विषयाबद्दल फारशी माहिती नसल्याचे लक्षण आहे. माहिती नसल्यास काही हरकत नाही पण योगशिक्षकाने समजावुन दिल्यास आपला हेका धरु नये. पहिल्याच दिवशी ध्यान, प्राणायाम, कपालभाती किंवा "फेवरेट" आसने शिकवण्याची "डिमांड" पूर्ण करता येत नसते. कारण योग शिकवण्याचा एक क्रम असतो. सर्वप्रथम वय आणि शरीराची लवचिकता पाहुन आसने कुठली शिकवावी याबद्दल योगशिक्षक निर्णय घेतात. काहींचे वजन वाढलेले असते, तर काहींचे शरीर कडक असते, काही नैसर्गिक रित्या लवचिक असतात. या बाबी ध्यानात घ्याव्या लागतात. शिवाय दुखणी खुपणी असल्यास ते ही जमेस धरावे लागते. अशा तर्‍हेने सर्वप्रथम सोप्यात सोपी आसने करण्यापासुन अभ्यासाला सुरुवात होते. त्यानंतर त्या आसनांची पुढची पायरी गाठण्याचा प्रयत्न करायचा असतो. बहुतेक आसनांच्या परीपूर्ण पायर्‍या गाठण्याआधी काही सोप्या पुर्वप्राथमिक म्हणता येतील अशा पायर्‍या असतात. त्या केल्यास शेवटचा आकृतीबंध साधणे सोपे जाते. मात्र यासाठी कुणाला किती वेळ लागेल हे सांगता येत नाही. ही बाब ज्याच्या त्याच्या मेहनतीवर आणि नियमितपणावर अवलंबुन असते. काहींना काही पायर्‍यांवर कदाचित जास्य वेळ द्यावा लागेल. यानंतर अगदी सोप्या प्राणायामाला सुरुवात केली जाते. यात कुंभक लावला जात नाही. उज्जायी सारख्या प्राणायामाची तर श्वास कसा सोडावा याचीच तयारी करण्यात बराच वेळ जातो. नौली क्रिये सारख्या क्रिया शिकणे या गोष्टी वेळेची मागणी करणार्‍या आहेत. यात पोटाचे स्नायु फिरवायचे असतात. मुळात ज्यांचे पोट पुढे आले आहे, त्यांना आधी ते सामान्य स्थितीत आणावे लागते. त्यानंतर उड्डीयान बंधाचा सराव दीर्घकाल करावा लागतो. त्यानंतर मध्यनौलीपासुन सुरुवात करायची असते. हे मुद्दाम सांगण्याचे कारण योग ही गोष्ट टप्प्या टप्प्याने शिकण्याची आहे हे लक्षात यावे.

पारंपरिक योग करण्याची एक पद्धत असते. ती अवलंबल्यास योगाभ्यास पूर्ण केल्यावर शांत वाटतं. थकल्याची भावना त्यात नसते. योगाभ्यास करताना थकवा वाटत असल्यास काहीतरी चुकते आहे, आपण आपली क्षमता ओलांडली आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे. योगाभ्यास करताना सर्वसाधारणपणे घाम येता कामा नये. कारण योगाभ्यास हा व्यायाम नाही. व्यायामाची पद्धत वेगळी असते. योगातील आसने व्यायामाप्रमाणे करण्यात अर्थ नसतो. बहुतेक योगवर्गात योगाभ्यास हा शारिरीक आणि मानसिक स्वाथ्यासाठी शिकवला जातो. योगाच्या अध्यात्मिक बाजुचा मला अनुभव नसल्याने त्यावर काही भाष्य करता येणार नाही पण सर्वसामान्यपणे शारिरीक, मानसिक स्वास्थ्यासाठी योग शिकवला जाणार्‍या केंद्रात जर आपण अध्यात्मिक उद्दिष्टे घेऊन गेलो तर ती किती पूर्ण होऊ शकतील हे ज्याचे त्याने ठरवायला हवे. योगाभ्यासासाठी दिला जाणारा वेळ ही आणखी महत्त्वाची गोष्ट. योगवर्गात बरेचदा याला पर्याय नसतो. तेथे वेळ निश्चित असते. त्यावेळात आपल्याला आपला अभ्यास संपवावा लागतो. क्वचित काही ठिकाणी वेळेचे बंधन नसते. मात्र योगवर्ग आठवड्यातुन दोन किंवा तीन दिवस असल्यास इतर दिवशी घरी सराव करणे हा उत्तम मार्ग आहे. योगवर्गा व्यतिरिक्त इतर दिवशी योगाभ्यासाला शक्य तोवर सुट्टी देऊ नयेच. ज्या दिवशी वेळ कमी असेल त्या दिवशी कमीत कमी एक पोटावरचे, एक पाठिवरचे, एक डोके खाली पाय वर अशा आकृतीबंधाचे, एक पुढे वाकण्याचे, एक पाठिमागे वाकण्याचे, एक डावी उजवी कडे ताण देणारे आणि एक शरिराला पीळ देणारे अशी आसने करण्याकडे भर द्यावा म्हणजे सराव सर्वांगसुंदर होईल. अलिकडे काही ठिकाणी एक दिवस फक्त पाठिवर झोपुन आसने घेतली जातात. दुसर्‍या दिवशी फक्त पोटावर झोपुन केली जातात. हे म्हणजे आठवड्याच्या एकुण जेवणाचा हिशेब करुन एक दिवस नुसताच भात आणि एक दिवस नुसतीच भाजी खाण्या इतके मुर्खपणाचे आहे. रोजचा योगाभ्यास हा सर्वांगसुंदरच असायला हवा. (क्रमशः)

अतुल ठाकुर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

योगमधे बहुतेक आसानाला विरुद्ध आसन आहेच! मी पुर्वी पोटावरची आसने करत नसायचो. चक्रासन करुन करुन माझ्या कमरेत मला त्रास होत होता. तेंव्हा मला कळले चक्रासन केले की भुजुंगासन करायलाच पाहिजे. तसेच हलासन केले की धनुरासन करायला हवे. खरे तर पोटावरचे, पाठीवरचे, बसून आणि उभे राहून सगळी आसने केलीत की शरिर आनंद देते. आणि श्वसन क्रिया केल्यात की मन आनंद देते.

याला विरुद्ध आसने म्हणण्यापेक्षा पुरक आसने असा जास्त योग्य शब्द आहे. कदाचित त्याबद्दल पुढच्या लेखात लिहेन. हा मुदा राहुन गेला. धन्यवाद बी.