कॉपी करून पास (Movie Review - Gabbar Is Back)

Submitted by रसप on 3 May, 2015 - 04:53

आदल्या दिवशीच्या उरलेल्या पोळ्यांचे बारिक तुकडे करायचे. मिरची, कढीपत्त्याची फोडणी करून त्यात भरपूर कांदा परतायचा. त्यावर हे पोळ्यांचे तुकडे घालून हळद, तिखट, मीठ टाकून तयार होणारं पक्वान्न म्हणजे ‘फोडणीची पोळी.’ कुणी त्याला कुसकरा म्हणतं, मध्य प्रदेशात तर ह्याला एक गोंडस नाव आहे, ‘मनोहरा’! तर ही फोडणीची पोळी माझ्या मध्यमवर्गीय पोट व जिभेचा अत्यंत आवडता नाश्ता. रानोमाळ भटकणाऱ्या गब्बरसिंगलासुद्धा नाश्त्यासाठी ह्यावरच समाधान मानावं लागत असावं, असा माझा एक कयास आहे. गब्बरच्या नावाने चित्रपट करताना फोडणीच्या पोळीचीच रेसिपी वापरणं, हा निव्वळ योगायोग आहे की गब्बरच्या आवडत्या नाश्त्याला दिलेली एक मानवंदना ते माहित नाही, मात्र जे काही जुळून आलं आहे, ते जर त्याने पाहिलं असतं तर नक्कीच ‘सरदार खुस हुआ’ होता आणि ‘सबासी’ भी दिया होता !
‘गब्बर इज बॅक’मधल्या आदल्या दिवशीच्या उरलेल्या पोळ्या म्हणजे २००२ साली तमिळमध्ये बनलेला ‘रामण्णा’ हा चित्रपट आणि पुढील १३ वर्षांत त्याचे तेलुगु, कन्नड, बंगालीमध्ये झालेले रिमेक्स. ह्या सगळ्यांना एकत्र कुसकरून त्याला थोडासा ‘बॉलीवूडी’ तडका देऊन गब्बर हॅज कम बॅक! संजय लीला भन्साळीला जेव्हा गल्ला भरायचा असतो, तेव्हा तो एक दक्षिणायन करतो. मागे एकदा त्याने असंच दक्षिणायन केलं आणि ‘विक्रमार्कुडू’ घेउन आला अन् ‘राउडी राठोड’ निर्मित केला. आता भन्साळी इज बॅक विथ ‘रामण्णा’ उर्फ ‘गब्बर’.

एकाच दिवशी १० तहसीलदारांचं अपहरण आणि त्यांपैकी एकाचा खून झाल्यावर सरकारी यंत्रणा खडबडून जाग्या होतात. मृत तहसिलदाराच्या शरीरासोबत गब्बरच्या आवाजातली ऑडीओ सीडी आणि त्या तहसिलदाराच्या भ्रष्टाचाराचा संपूर्ण लेखाजोखा असतो. इथून सुरु होतो एक शोधमोहिमेचा, अपहरण-हत्यांचा, सूडाचा आणि जनजागृतीचा प्रवास.
एका कॉलेजात प्रोफेसर असलेल्या ‘आदित्य’ची (अक्षय कुमार) दोन रूपं असतात. एक जे जगाला दिसतंय ते एका प्रोफेसरचं आणि दुसरं जे भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मानगुटीवर बसतंय ते, ‘गब्बर’चं. मुलांशी मुलांच्याच भाषेत संवाद साधणारा, त्याचा वर्ग खुल्या मैदानात भरवणारा, प्रात्यक्षिकं दाखवून मजा-मस्करी करत शिकवणारा आदित्य विद्यार्थ्यांमध्ये प्रिय असतो. विद्यार्थ्यांचीच ताकद वापरून तो ‘गब्बर’ टोळी चालवत असतो. महाराष्ट्राच्या विविध भागांतून एखाद्या विशिष्ट विभागाच्या १० भ्रष्ट अधिकाऱ्यांना अपहृत करायचं आणि त्यांच्यातल्या सगळ्यात भ्रष्ट अधिकाऱ्याला सजा-ए-मौत देऊन पाचावर धारण बसलेल्या बाकीच्या ९ जणांना मुक्त करायचं, हा त्याचा शिरस्ता.
ह्या कहाणीच्या जोडीला - पोलीस विभागाच्या उच्चाधिकाऱ्यांना जे जमत नाही ते करून दाखवणारा, पण पात्रता असूनही केवळ लाच न दिल्यामुळे निरीक्षकाच्या ऐवजी हवालदार बनून राहिलेला एक इमानदार व तडफदार तरुण 'साधुराम' (सुनील ग्रोव्हर) आणि ‘आदित्य’ला ‘आदित्य’पासून ‘गब्बर’ बनवण्यात मोलाचा वाटा उचलणारा एक उद्योजक 'पाटील' (सुमन)– सुद्धा आहेत. मध्येच अकारण लुडबुड करवायची, गाणी घुसडायची सोय म्हणून एक बावळट मुलगी 'श्रुती'सुद्धा (श्रुती हासन) आहे. हा सगळा माल-मसाला मिळून बनणारा पदार्थ मात्र दोन घटिका जीभेवर एक बरी चव रेंगाळवतो.

दाक्षिणात्य मारधाडपटाचा रिमेक आणि त्यात अक्षय कुमार, सलमान खान किंवा अजय देवगण असले की चित्रपटगृहात शिरतेवेळीच विचारप्रक्रियेचा ‘लॉजिक’ मोड बंद करायचा असतो, हे मला 'चिंगम', 'खिक' व 'रद्दड राठोड' ह्यांच्या अविस्मरणीय अनुभवांतून शिकायला मिळालं आहे. त्यामुळे पडद्यावर ‘व्हूफ्.. व्हूफ्..’ करून शीर्षक आदळत असतानाच मी जाणीवपूर्वक माझा ‘लॉजिक’ मोड बंद केला होता. त्यामुळे ‘हे सगळं करण्यासाठी पैसे कुठून आले?’ किंवा ‘यूपीएससीमध्ये इतका आभाळ फाडणारा स्कोअर करून किंबहुना युपिएससी झाल्यावर कुणी हवालदार कसा राहील ?’ किंवा ‘गाडीच्या छोट्याश्या सीटवर त्यातही अर्ध्या भागात दुसरी व्यक्ती बसलेली असताना एक स्त्री प्रसवू कशी शकते?’ किंवा ‘ह्याच्या एकाच ठोश्यात हेल्यासारखा दिसणारा गुंड गपगार कसा पडतो ?’ किंवा ‘ह्याने उचलून आपटल्यावर माणूस चेंडूसारखा टप्पा कसा काय घेऊ शकतो? हा भौतिकशास्त्राचा प्रोफेसर आहे की न्यूटनचा बाप ?’ असले डोकॅलिटीवाले प्रश्न मला पडले नाहीत. ते तुम्हाला पडणार असतील, ‘लॉजिक’ मोड ऑन-ऑफचं बटन कुठे असतं, हे जर माहित नसेल तर हा चित्रपट तुमच्यासाठी निश्चितच नाही.

अ‍ॅक्शन हीरो म्हणून अक्षय कुमार सध्या तरी सर्वोत्तम असावा, असं मला वाटतं. त्याचा फिटनेस आणि मार्शल आर्ट्समधील निर्विवाद प्राविण्य केवळ जबरदस्त आहे. सनी देओलला आवरायला जेव्हा १५ लोक कमी पडायचे आणि तो उजव्या हाताने ७-८ आणि डाव्या हाता ७-८ जणांना झुलवायचा, तेव्हा त्याचा आवेश पाहून तो हे खरंच करू शकतो असं वाटायचं. अक्षय कुमारने सप्पकन् फिरवलेल्या किकने किंवा दिलेल्या जोरदार ठोश्याने भलेभले भेंडाळताना पाहून हे अगदीच अशक्य नाही, असं वाटतं. अर्थात, ह्यामागे मी बंद केलेल्या 'लॉजिक' मोडचा हातही असू शकतो, पण तरी !
अभिनय नावाच्या चिमणीला इथे चिवचिवायला वाव नाही, हे चोखंदळांनी लक्षात घ्यावे. जो काही अभिनय करायचा आहे, तो हवालदाराच्या भूमिकेतला सुनील ग्रोव्हर करतो आणि लक्षात राहतो.
उद्योजक पाटीलच्या भूमिकेतल्या 'सुमन'ला फक्त गुरगुरण्याचं काम आहे, ते तो बऱ्यापैकी करतो.
'श्रुती हासन' रस्त्यात नको तिथे बांधलेल्या स्पीड ब्रेकरसारखी उगाच आणि त्रासदायक आहे.
संगीत नावाची काही गोष्ट हिंदी चित्रपटांत कधी काळी असायची. आजकाल डबे, पराती, ताटल्या, तांबे बडवले जातात आणि त्या तालावर कोंबडे, बैल, घोडे इ. सुरेल प्राणी आरवत किंवा हंबरत किंवा रेकत असतात. डोक्याला पोचे पडेपर्यंतची सांगीतिक सोय इथे व्यवस्थित लावलेली आहे.

कॉलेजमध्ये कट्ट्यावर बसून पूर्णवेळ टवाळक्या करणारा पण तसा अगदीच डफ्फळशंख नसल्याने परीक्षेच्या आधी रट्टा मारून आणि पेपरमध्ये कॉपी करून पास झालेला एखादा मित्र प्रत्येकाचा असतो. बहुतेकदा कॉलेजनंतरच्या आयुष्यात तो आपल्यापेक्षा चांगला कमवतही असतो. 'गब्बर इज बॅक' म्हणजे असाच एक मारलेला रट्टा आणि केलेली कॉपी आहे. ही कॉपी करून दिग्दर्शक 'क्रिश' नक्कीच पास होईल. पण तुम्ही मात्र चित्रपटगृहातून बाहेर पडल्यावर आपला 'लॉजिक' मोड पुन्हा सुरु करायचं मात्र विसरू नका, नाही तर नापास व्हाल !

रेटिंग - * * १/२

http://www.ranjeetparadkar.com/2015/05/movie-revie-gabbar-is-back.html

हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये आज (०३ मे २०१५ रोजी) प्रकाशित झाले आहे :-
09 - Gabbar Is Back - 03-May-15.JPG

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच्या हिशोबाने प्रत्येक हिंदी सिनेमा हा टाकाऊ आणि भिकारच असतो, तर त्या सिनेम्यावर एवढे शब्द वाया घालवायची काय गरज आहे. सरळ सिनेमाचे 'नाव' आणि पुढे 'टुकार' असे लिहिलेत तरी चालेल.

परिक्षण नेहमीप्रमाणेच एकदम "टुकार".

परीक्षण आवडले. अक्षय कुमार तसा आवडतो.

पण मला आज तुमच्याकडुन टाईमपास २ बद्दल परीक्षणाची अपेक्षा होती.:स्मित:

प्रसाद,

कदाचित माझी हिंदी सिनेमाकडून खूप जास्त अपेक्षा आहे, म्हणून अपेक्षाभंग होत असावा !
'म्हणजे तुम्हीसुद्धा जवागल श्रीनाथच्या वेगात चेंडू टाकायला हवा' ही अपेक्षा असताना, तुम्ही अनिल कुंबळेच्या वेगाने टाकायचात, तेव्हा तुमच्याकडून होत असे तसा!!

'म्हणजे तुम्हीसुद्धा जवागल श्रीनाथच्या वेगात चेंडू टाकायला हवा' ही अपेक्षा असताना, तुम्ही अनिल कुंबळेच्या वेगाने टाकायचात, तेव्हा तुमच्याकडून होत असे तसा!!
>>
<<
व्यंकटेश प्रसाद???
Lol

Malaa Akshay tyachya junya maaradhaaD khiladi chitrapaTaatahee aavaDaayachaa, haadekheel aavaDel. Tyaane paN ase chitrapaT kele paahijet adhunmadhun, tyaachyaa fitness saaThee.

ते गाणं - तेरी मेरी कहानी - फार कुठेतरी ऐकल्यासरखं वाटतय . कुठुन उचलल्ली आहे चाल ? कोणी सांगू शकेल का?

चांगला लिहिलाय रिव्ह्यू. रावडी राठोड सहन केलाय, त्यामुळे हा सहज पाहू शकू.

तुझा हसन बहिणींवर फारच राग आहे का? Proud शमिताभमध्येही धाकट्या हसन मुलीवर वैतागला होतास तू! Happy

@पूनम,

अक्षरा हसन तर आवडली आहे आपल्याला !

>> चित्रपटात 'अमिताभ'नंतर लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे 'अक्षरा हासन'. ही एक साखरेची बाहुली आहे. पण ती बाहुली वाटत असली, तरी शेवटी वडिलांचा अंश तिच्यात उतरला आहेच. तिचा वावर खूप आल्हाददायक व आश्वासक आहे. ती पडद्यावर येते तेव्हा एक थंडगार झुळूक आल्याचा भास होत राहतो. <<

असं लिहिलं होतं 'शमिताभ' च्या परीक्षणात!

सिंघम, रा.रा. हे गल्लाभरू सिनेमे आवडले होते त्यामुळे हा बघावा असं वाटतंय. अक्षयकुमारचे सध्याचे स्पेशल २६, हॉलिडे हेही आवडले होते 'एंटरटेनमेंट' वगळता....

ओके रसप, माझा गैरसमज झाला. बहुधा दुस-या कोणाच्यातरी परिक्षणात अक्षरा हसनवर जाम कमेन्ट्स केल्या गेल्या होत्या आणि त्या मला पटल्यामुळे लक्षात राहिल्या होत्या Happy

संगीत नावाची काही गोष्ट हिंदी चित्रपटांत कधी काळी असायची. आजकाल डबे, पराती, ताटल्या, तांबे बडवले जातात आणि त्या तालावर कोंबडे, बैल, घोडे इ. सुरेल प्राणी आरवत किंवा हंबरत किंवा रेकत असतात. डोक्याला पोचे पडेपर्यंतची सांगीतिक सोय इथे व्यवस्थित लावलेली आहे.>>>>>>>>>>>> अगदी Happy

अगदी टूकार सिनेमा आहे. ओह माय गॉड आल्यापासून 'आपण भ्रष्टाचाराच्या विरोधात सिनेमा काढू, ज्यामुळे आपली देशभक्ती सिद्ध होईल, देशाप्रतीचं एक कर्तव्य निभावलं जाईल' असं सगळ्यांना वाटून राहिलंय की काय न कळे!

टाईमपास-२ काय . टाईमपास-१ सुधा कसला टुकार सिनेमा अहे. आणि मला त्यातलं ते पोरगं (हिरो) अजिबात नाही आवडत

काल पाहिला.
अक्षयचा दाढी लूक भारी वाटला.
आता म्या पण तशी दाढी ठेवणार हे डिक्लेअर करून आजच त्याच्या शिव्या खाऊन झाल्यात.
हिरोईन कोण कशाला का घेतलीय ते ठिकाय पण कास्टींग सॉल्लिड गंडलीय,
एकतर सोज्वळ सत्यभामा घ्यायची होती वा आयटम मंदोदरी,
किंवा थेट सोनाकशी सिन्हाच घेतली असती.
सौथेंडीयन मसाला बघतोय असा फील वारंवार नव्हे पुर्ण पिक्चरभर येत राहतोच, पण त्यातील अजब गजब गोष्टी लिमिटमध्ये ठेवल्या आणि सुसह्य असे हिंदी कलाकार असले तर मजाही येतेच.
मला तर आली!

तळटीप - मध्यंतरी अक्षय कुमारला सतत त्या विनोदी चित्रपटांमध्ये बघून बोअर झालेल्या जिवाला जरा शांती मिळाली. अक्षय इझ बॅक इन अ‍ॅक्शनचे समाधान मिळाले.

मला आवडला ! . जाम टाईमपास वाटला .एकदम अ आणि अ आहे . पण सिंघम आणि रारा पेक्शा आवडला .

सौथेंडीयन मसाला बघतोय असा फील वारंवार नव्हे पुर्ण पिक्चरभर येत राहतोच, पण त्यातील अजब गजब गोष्टी लिमिटमध्ये ठेवल्या आणि सुसह्य असे हिंदी कलाकार असले तर मजाही येतेच.
मला तर आली! >>> + १०००००००