मुलाला सोशल कसे बनवावे

Submitted by अंजली_१२ on 27 April, 2015 - 09:53

माझा मुलगा ३ वर्षाचा आहे. पण तो अजिबात समवयस्क मुलांमधे मिसळत नाही. खूप घाबरतो. त्याच्याजवळ कोणी आले तरी आई आई करून किंचाळतो. माझ्यामागे लपत असतो किंवा सारखे कडेवर घ्यायला सांगतो. कोणी हात लावलेला किंवा त्याच्याकडून काही वस्तू काढून घेतली तर अतिशय राग येतो, मला मारतो. अजून पूर्ण वाक्य बोलत नाही. काहीकाही शब्द बोलतो.
इतर मुलं खेळत असतील तर हा माझ्याजवळच बसून एकटा काहीतरी खेळतो पण त्यांच्यात जात नाही. काळजीच वाटते हा शाळेत काय करेल?
एका घरगुती डे केअरला पाठवत होते. तिकडे बरा राहायचा पण जरा एकटा एकटाच. मोठ्या मुलांमधे जास्त खेळायला आवडतं. जसे माझी मुलगी ८ वर्षाची आहे तिच्या मैत्रीणी वगैरे. मुलांशी नाहीच. आम्ही आया मुलं (२-४ वर्ष वयोगट मुलं) असा ग्रुप आठवड्यातून एकदा भेटतो की जेणेकरून मुलांना सवय होईल एकमेकांची. पण काय करू म्हणजे त्याची त्याच्या वयाच्या मुलांची भिती जाईल. आता शाळेत घालायचे आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वसाधारणपणे दुसर्या मुलासाठी असा प्रॉब्लेम यायला नको.

जर तुम्ही मुलाला घराबाहेर बागेत नेण्यास/ डेकेअर मध्ये जाऊन ४ ते ६ आठवडे झाले असतील तर
अजून ४ आठवडे वाट बघा.

दुसरा उपाय - त्याला एकदम चार/ सहा मुलांबरोबर मिसळण्यापेक्षा घरी एकाला बोलवून किंवा याला शेजारच्या घरी दुसर्या मुलाबरोबर सोडून या. त्याला लॉयब्ररित घेऊन जा आणि तिकडे चित्र काढणे/ गोष्टी ऐकणे या लहान मुलाच्या कार्यक्र्मात घाला.

धन्यवाद राजू७६ मुलाचे डेकेअर बंद आहे सध्या कारण त्या फॅमिलीला मुव्ह व्हावे लागले.
दुसरा उपाय करून पाहिन :)) लायब्ररीत जातो आम्ही पण मांडीवर बसूनच सगळा कारभार असतो तरी नेत राहणार आहे नक्की. एखाददिवस फरक पडेल.

विजयकुमार - धन्यवाद. तो दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा असेल :))

शाळेत गेल्यानंतर यात फरक पडेल तो जरुर मिसळेल . tyala roj Mulanmadhe khelayla pathway. Maza mulga 2 1/2 varshacha ahe lahan va mothya donhi prakarcha mulansobat thevate . shakya zalyas profetional day care la pathway kahi diwas.

अंजली तुम्हि घाबरु नका....माझा भाचा आता तिन वर्ष आठ महिन्यांचा आहे...माझे बरेच निरिक्षण असे आहे कि इथुन मुल इतरांमध्ये रुळायला सुरुवात होते...

काहीही करा पण...
"तो बघ कसा खेळतोय, जा बरं तू पण.." , "लांब हो .. मला चिटकू नको", "नाहीतर तुला एकट्याला तिथे सोडून जाईन..",
या सारखी कोणतीही वाक्यं वापरण्याचा मोह आवरा..
आणि करायचेच झाले तर एखादे चॉकलेट वा खेळणं दुसर्‍या मुलांकरवी त्याला द्या जेणे करून इतर मुलांबद्दल विश्वास निर्माण व्हायला सोपे होईल. आणि अजुन एक, ऐकायला थोडे विचित्र वाटेल, पण तुम्ही स्वतः इतर मुलांशी खेळणे सुरू करा अन मग बघा लगेच फरक दिसू लागेल..

चंबूशी अतोनात सहमत.
त्याला त्याची स्वतःची म्हणून जी स्पेस माहीत आहे.. त्यात इतरांना येऊ देण्यासाठी मदत करायचीये.
तसच.. इतर मुलांच्या सोशल स्किल्स बरोबर मुळीच तुलना नको.
प्रत्य्के मुलाच्या वेगवेगळ्या स्किल्स डेव्हलप होण्याच्या फेजेस असतात. तुमचं मूळ थोडं लेट बडिंग असेल ह्य बाबतीत. पेशन्स... Happy

त्याला घरात मोठ्ठ्या ताईबाई, आई बाबा ह्यांचीच सवय आहे. ती इन्टरॅक्शन ओळखीची आहे... समजुतीचीही असणार.
त्याच्या वयाची मुलं अर्थात त्याला समजून-बिमजून घेऊन वागणार नाहीत. तो डोस हळू हळू द्यायचा.

घरातही एखादी अ‍ॅक्टिव्हिटी ज्यात तुमच्यापासून दूर, तुमच्या विरुद्धं टीममधे.. स्पर्धात्मक विचार असलेले वगैरे खेळ खेळता येतात का बघा... काही बोर्ड गेम्स आहेत (आत्ता आठवत नाहियेत).

(माफ करा... इंग्रजाळलेलं लिहिलय..गडबडीत)

खूप खूप शुभेच्छा... एक दिवस मोठ्ठा झालेला तुमचा मुलगा इतका गोतावळ्यात असेल... निवांत असा तुम्हालाच मिळताना मुश्किल.. अनुभव आहे Happy

शाळेत गेल्यानंतर आपोआप प्रश्न संपेल असे मला वाटत नाही. शाळा निवडताना तुम्ही जरा जास्त चिकित्सक रहावे, तसेच त्याच्या शिक्षकांना, सपोर्ट स्टाफला जरुर विश्वासात घ्या.

ओह किती छान प्रतिसाद आलेत.
पेशन्स पाहिजे हे अगदीच पटतंय. पण वरची वाक्य बरेचदा निघून जातात तोंडून. :((
आजच माझ्याकडे एक कार्यक्रम होता बरीच मुलं होती. पेशन्सची टेस्ट होती आज Happy त्याची खेळणी इतर मुलं घेत होती म्हणून मिनिटामिनिटाला मूड जात होता. असो. सगळ्यांचे प्रतिसाद खूप हुरूप वाढवणारे आहेत.

>>. इतर मुलांच्या सोशल स्किल्स बरोबर मुळीच तुलना नको.>>>> नकळत होत होती पण आता नाही करणार.
उषा म्हणतात त्याप्रमाणे अजून थोडा वेळ जावा लागेल.

ताईसोबत अन तिच्या मैत्रिणींसोबत खेळतो ना? मग एखाद्या त्याच्याच वयाच्या मुला-मुलीला ताईच्या ग्रुप्मधे एन्ट्री द्या.. त्यालाही सवय होइल मग आपोआप.. काळजी नको..

त्याला कुठल्या केअर गिव्हर चा काही वाइट अनुभव आला आहे का? ते चेक करा. कारण अश्याने मुले एकदम क्लिंगी बिहेविअर दाखवतात आणि आईला/ सुरक्षिततेला सोडून जायला नकार देतात. हट्ट करून बघतात. त्याला प्रत्यक्ष सांगता येणार नाही. तर हलकेच चित्रे वगिअरे काढायला सांगा. समवन इज बॅड असे त्याच्या तोंडून आले तर चेक करा. पण त्याला कोणत्याही बाबतीत फोर्स करू नका. असे झाले नसेल पण ही एक शक्यता चेक करा.

माझा जगप्रसिद्ध सल्ला: त्याला एक क्यूट बारके पपी कुत्रे आणून द्या. कुत्रे मुलांना सोशलाइज व्हायला मदत करतात. ( अर्थात अ‍ॅलर्जी वगिअरे नसल्यासच. )

त्याला रोज संध्याकाळी बागेत नेता येईल का? तिथे सीसॉ, चेंडू असे दुसर्याचा कंपल्सरी सहभाग असलेले खेळ खेळायचे. घसरगुंडीही, एकाची झाली की दुसरा नंबर. इंटरेक्शन वाढायला मदत होईल. हळूहळू तोच हट्ट करेल बागेत.चल म्हणून. शुभेच्छा!

अमा केअर्गिव्हर चा वाईट अनुभव असा काही नाही कारण तो तिकडे छान राहिला होता जेवढे काही दिवस गेला तिच्याकडे.
हां सुरवातीला असं झालं होतं की माझ्या ज्या १-२ मैत्रीणी बनल्या त्यांची मुलं थोडी अग्रेसिव्ह होती/आहेत. एक दोन वेळा ढकलाढकली मारामारी झाली होती पण त्याचा परिणाम अजून मनात राहिला असेल? १ वर्ष तर झालंच.
पेट शक्य नाही Happy

आशूडी हो बागेत नेते. घसरगुंडीवर खुप मुलं असतील तर बुजतो थोडा. लांब थांबणं प्रिफर करतो. थोडी गर्दी कमी झालि की जातो.

मल्टीपल इंटेलीजन्स या कंन्सेप्ट मध्ये इंटर पर्सन इंटेलिजन्स नावाचा एक इंटेलिजन्स आहे.

http://www.maayboli.com/node/39215 मल्टीपल इंटेलिजन्स ( १)

मध्यंतरी एका प्रयोगात मी अडीच वर्षे वयाच्या मुलांची चाचणी घेऊन असे वाटले की मुले सोशल होण्याची प्रक्रिया अगदी लहान वयातच सुरु होते. हा अगदी प्रार्थमीक निष्कर्ष आहे.

खालील प्रश्न त्यांच्या पालकांना विचारले होते.

१) My son/daughter started recognizing other persons not from family at the age one year
२) My son/ daughter responds to conversation of person other than family at age second year.
३) My son/daughter likes to greet voluntarily to person other than family at the age second year.

४) My son/daughter is always comfortable at social situation like event marriage at age 2nd year
५) My son/daughter likes sharing of toys with other kids

या पाचही प्रश्नांची उत्तरे जर ( ऑलवेज ) हो असतील तर आपली मुले पुढे सोशल होण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. जर नसेल तर सोशल सिच्युएशन टाळुन उपयोग नाही.

मुलांना सोशल सिच्युएशन ची सवय व्हायला हवी. किमान त्यांनी घाबरु नये. जुजबी उत्तरे द्यावीत. त्यांना स्वतःहुन संवाद साधता यावा ही खुपच वरची पायरी असेल.

हे जर घडले नाही तर आपल्या मुलांचे खुपच नुकसान होईल असे नाही पण पुढे करियर मधे अनेक वाटा बंद होतील हे मात्र नक्की समजावे.

बुजरा स्वभाव आहे बहुतेक माझ्या दोन्ही मुलांचा. माझी मुलगी पण नणंदेच्या मुलीला अशीच खूप घाबरायची. दोघी अगदी एकाच वयाच्या. पण केस ओढणे , हातातून वस्तू ओढून घेणे याला माझी मुलगी घाबरायची.

त्याचा स्वभाव नैसर्गिक रीत्या बुजरा/ इंट्रोव्हरट असेल तर त्याला पुश करून उपयोगाचे नाही. चित्रकार, संगीतकार किंवा इव्हन काही अ‍ॅक्टर डायरेक्टर स्वरूपाचे क्रिएटिव्ह लोक फार इतर लोकांशी इंटर अ‍ॅक्ट करत नाहीत. त्यांच्याच कलेच्या विश्वात, रंगात मग्न असतात. ए आर रहमान सुद्धा प्रारंभी किती बुजरे वाटत. त्याचा कल बघा. पीनट्स मध्ये एक मुलगा कायम पियानो वाजवत असतो आणि त्याला सारखे डिवचलेले आव्डत नाही तसा ह्याचा स्वभाव असेल तर त्याला आपल्या मनाने रिलेशन शिप्स फॉर्म करूद्या.

माझी बेस्ट फ्रेंड अगदी बुजरी होती म्हणून तिच्या आईने मला मैत्रीण नियुक्त केले होते. एकत्र क्लासला जाणे , गप्पा मारणे विनोद करणे वगैरे माझी कामे असत. पुढे ती छान हसरी बोलकी झाली. त्याची आठवण झाली. Happy

नितीनचंद्र पहिल्या दोन प्रश्नांची उत्तरं हो आहेत. नंतरचे ३ नो नो आहेत. शेवटचे तर बिग नो सद्यस्थितीत तरी.
अमा Happy
त्याचा स्वभाव नैसर्गिक रीत्या बुजरा/ इंट्रोव्हरट असेल तर त्याला पुश करून उपयोगाचे नाही>>>> +११ एक मन म्हणतंय हे बरोबर आहे. पण एकिकडे वाटतं याला मिसळून राहण्याची कला येणार आहे की नाही ?

३ चाच आहे ना.. नका काळजी करू. माझी मुलगी शाळेत जाईपर्यंत घरातच होती. आजूबाजूला तिच्या आजीने तिला छोटी मुले असून खेळायला सोडले नव्हते. तर शाळेत डे १ पासून मजेत जाऊ लागली. मला चिंता होती घर सोडून राहती की नाही? आणि तुमच्या मुलाला मोठ्या मुलांबरोबर खेळायला-मिसळायला आवडते आहे ना.. समवयस्कांबरोबर पण शाळेत गेला की रमू लागेल. Happy

अंजलीजी,

बर्‍याच वेळा मुल जन्मतः बुजरी नसतात. घरी खुप कमी व्यक्ती असणे. पालकच कमी संवाद साधणारे/ संवाद टाळणारे असतील तर मुलांना ही सवय लागु शकते.

एकदा मी बस मधुन जाताना एक वडील पालक आपल्या लहान मुलीला घेऊन बसले होते. मी संवाद साधण्यासाठी मुलीशी बोलण्याचा प्रयत्न केला तर मुलीने तोंड फिरवले. लांबचा प्रवास असल्यामुळे मुलीच्या वडीलांशी चर्चा झाली तर ते म्हणाले आम्ही दोघे ( आई- वडील ) १२ तास घराच्या बाहेर असतो. पाळणाघरात फारशी मुले नाहीत आणि पाळणाघर चालक फारसे बोलत नाहीत त्यामुळे आमची मुलगी सोशल सिच्युएशनला सरावली नाही.

या एकाच उद्देशाने मी मुलांना ते घाबरतात/ रडतात म्हणुन सोशल सिच्युएशन टाळु नये. हळु हळु सवय होईल. काही मुले आयुष्यभर समाजात मिसळणार नाही हे उघड आहे. पण आई - वडीलांनी हा प्रयत्न करावा.

सोशल सिच्युएशन टाळणारे उत्तम शास्त्रज्ञ होण्याची शक्यता ( अधोरेखीत ) असते. त्यांचा लॉजीकल/ मॅथेमॅटीकल बुध्यांक उत्तम असेल तर अनेक महीने/ वर्षे अशी माणसे स्वतः ला संशोधनात गुंतवु शकतात.

नितीन हो घरी मी आणि नवरा, मुलगी सोडले तर कोणी नाही. पण मी होममेकर आहे. त्यामुळे त्याला सगळीकडे नेऊ शकतेय बाहेर वगैरे. जसे लायब्ररी, जिममधली नर्सरी, प्लेडेट. पार्क.
हळु हळु सवय होईल>>>> +१११११

माझा मुलगा ३ वर्षाचा

माझा मुलगा ३ वर्षाचा होईपर्यंत फारसा सोशल नव्हता. मोजक्याच मोठ्या माणसांशी त्याचे सख्य होते. बरोबरीच्या मुलांशी खेळायला उत्सुक नसायचा कारण ढकलणे, हातातले खेळणे हिसकावून घेणे वगैरे प्रकार झेपायचे नाहीत. एक-दोनदा दुसर्‍या मुलाने चावणे वगैरे प्रकार केल्याने अंतर राखून रहायचा. मात्र त्याच्याशी समजुतदारपणे खेळणारे दादा-ताई आवडायचे. ३ वर्षाचा झाल्यावर प्रीस्कूलला घातले तेव्हा टिचरला याची कल्पना दिली होती. वर्गात दोन टिचर आणि १५-१६ मुले. डिसेंबर पर्यंत ही सगळीच मुले ग्रुप टाईम सोडल्यास बर्‍यापैकी एकेकटी खेळायची. मग डिसेंबरमधे मी मुलाला हाताशी घेवून पार्टीसाठी गुडीज बॅग्ज केल्या. इतर पालकांनीही असेच मुलांना हाताशी घेवून कुकी डेकोरेशन, कार्डस बनवणे केले. थोडी मैत्री झाली. मग हळू हळू प्ले डेट्स वगैरे. या काळात आम्ही त्याला अजिबात फोर्स केले नाही. प्लेडेट्सच्या बाबतही कुणाला बोलवायचे, कुणाचे आमंत्रण स्विकारायचे याबाबत त्याला चॉइस दिला. तो चार वर्षाचा झाल्यावर आम्ही गाव बदल्याने त्याला नव्या शाळेत घातले. नव्या शाळेत कसा रुळेल म्हणून आम्हाला काळजी होती परंतू तिथे ओपन हाउसला त्याने आपणहून , 'हाय आय अ‍ॅम ...' असे म्हणत मुलांशी /इतर पालकांशी ओळखी करुन घेतल्या. आपण गावात नवीन आहोत सांगितले. थोडा वेळ मुलांबरोबर खेळला. त्यादिवशी ओळख झालेल्या मुलामुलींपैकी बर्‍याच जणांशी त्याची मैत्री आजही टिकून आहे. तो जसा मोठा होत गेला तसे आम्ही त्याच्यावर घरी येणार्‍या पाहुण्याच्या आगत स्वागताची त्याला झेपेल अशी जबाबदारी टाकायचो. टेबल सेट करणे, आलेल्या पाहुण्यांना सॉफ्ट ड्रिंक्सचे कॅन्स देणे, पाहुण्या आलेल्या लहान मुलांना कलरिंग पेजेस, क्रेयॉन्स, लेगो ब्लॉक्स आणि तत्सम खेळणी देणे अशी कामे तो सुरवातीला करायचा. मात्र हे करताना आलेल्या मुलांशी त्याने सगळा वेळ खेळलेच पाहिजे असा आग्रह नसायचा. आमच्या मित्रांच्या मुलांशी समवयस्क आहेत म्हणून त्याने मैत्री करावी असा आग्रह धरला नाही. त्याला त्याचे मित्र-मैत्रिणी निवडू दिले. माझा लेक लहान असताना बुजरा होता हे सांगितले तर खोटे वाटावे इतका आज सोशल आहे.

स्वाती ला मोदकच मोदक...
<<मात्र हे करताना आलेल्या मुलांशी त्याने सगळा वेळ खेळलेच पाहिजे असा आग्रह नसायचा. आमच्या मित्रांच्या मुलांशी समवयस्क आहेत म्हणून त्याने मैत्री करावी असा आग्रह धरला नाही. त्याला त्याचे मित्र-मैत्रिणी निवडू दिले. माझा लेक लहान असताना बुजरा होता हे सांगितले तर खोटे वाटावे इतका आज सोशल आहे.>>

फार महत्वाचं आहे हे.

स्वाती, छान पोस्ट आहे. एकदम पॉझिटिव्ह आहे.
माझी दोन्ही मुले इन्ट्रोव्हर्ट आहेत. वर अंजलीनी लिहीलय तस मागे लपतात. गार्डनमध्ये गर्दी असेल तर खेळत नाहीत. घरी चल म्हणून मागे लागतात. घरी एकत्र कुटंब - भरपूर माणसे आहेत. पण मुले सोशल करायच्या कुठल्याच प्रयत्नांना अजिबात दाद देत नाहीत. कधी कधी वाईट वाटते मग फार.

माझा मुलगा फारच लाजाळु होता.
अतिशय शांत वातावरणात आणि कमी लोक आजुबाजुला असलेल्या ठिकाणी रहात असल्याने तसा झाला असेल बहुद्धा.
पण नर्सरी पासुन रुळायला लागला हळुहळु.
एलकेजी / युकेजी आणि पहिली त्याच्या सर्व मिसनी आम्हाला पहिल्याच तिमाही भेटीत हीच तक्रार वजा सुचना केली होती की तो फारसा इन्व्होल्व्ह होत नाहिये ग्रुप अ‍ॅक्टिव्हीटी मध्ये. तुम्हीही घरी त्याला सगळ्यांमध्ये मिक्स होण्यासाठी पोजिटिव्ह सुचना देत चला.
नंतर ह्याच सर्व टीचर्स वार्षिक परिक्षेनंतर तो प्रचन्ड अ‍ॅक्टिव्ह झालाय अस कौतुकाने सांगायच्या. Wink
शाळेत गेल्यावर फरक पडलाच पण आम्हालाही त्याला नेहमी सांगावे लागले.
फरक पडेलच नक्की.
अर्थात अजुनही तो जिकडे फार धान्गडशिन्गा असेल, हिसकाहिसकी असेल तिकडे जात नाही.
त्याला गोन्धळ आवडत नाही. तो टाळतो. ही गोष्ट अर्थातच चांगली आहे अस मला वाटत.

माझा मुलगा ५-६ महिन्यांचा असल्यापासून बाहेर फिरायला गेलो म्हणजे अगदी ५-१० मिनिटे फेरफटका मारायला गेलो तरी रस्त्यात दिसणार्‍या शक्यतो सर्व लहान मुलांशी त्याला संवाद साधायला एनकरेज करायचे. म्हणजे 'दादाला टाटा कर, छानु छानु कर' असं काहितरी....अगदी ७-८ वर्षाचं मुल दिसलं तरीही. मॉल मध्ये गेलं की अमाप मुलं भेटत.ती मुलं सुद्धा आनंदानं रिस्पॉण्ड करायची. सगळी लहान मुलं त्याच्यासाठी 'दादा' झाली (मुलगा असो वा मुलगी... त्याला मुलगा/ मुलगी फरक कळत नाही. तो सर्वांना दादा म्हणतो). साधारण १० महिन्यानंतर त्याच्यात स्ट्रेंजर अ‍ॅन्कझायटी दिसू लागली. पण जवळपास १ वर्ष १ महिन्याचा झाल्यावर तीही गेली. आता तो १ वर्ष ७ महिन्याचा आहे. सध्या तो फक्त डॉक्टरांना घाबरतो.

घरात भरपूर बडबडे एक व्यक्ती ठेवा (सा बा/आई/गप्पिष्ठ आजी आजोबा), मुले त्यांच्याबरोबर राहिली की आपोआप सोशाल होतात. ज्या घरात आई बाप जास्त बोलके नाहीत तिथे मुलेही जरा अबोल होतात आणि हल्ली मुलांना खूप प्रोटेक्टेड वातावरणाची सवय असते त्यामुळेही. (माझी मुलगी आता जरा सोशल आहे, त्यात तिच्या आजीची मेहनत आणि शाळा आणी एक दोन क्लासांचा महत्वाचा वाटा आहे.) माझी पुतणी ३ वर्षाच्या वयात जितकी सोशल आणि बडबडी होती तितकी माझी मुलगी नव्हती पण आता बरीच बोलते.

वरती सर्वांनी लिहिलेच आहे. पण मुलाला जराही फोर्स नको, कटकट तर बिलकूलच नको. आणि तुलना तर नकोच. तुम्ही स्वतः हा मंत्र लक्षात ठेवला तर तुम्हाला हा प्रश्ण हाताळायला बरा होइल.

त्याला काय आवडतं(करायला), कोण सहसा आवडतं(कशा स्वभावाच्या) आणि का( जी काही त्याची स्वतःची कारणं) हे बघून अ‍ॅक्टीवीटी ठरवा.

सगळ्यांना मनापासून धन्यवाद! मुलांचं जग खरंच समजून घेणं किती चॅलेंजिंग असतं.

अजुनही तो जिकडे फार धान्गडशिन्गा असेल, हिसकाहिसकी असेल तिकडे जात नाही.>>> सेम हिअर. पण बाकीच्या लोकांना इतकं पडलेलं अस्तं की हा जात का नाही मुलांमधे, सारखा आईला चिकटून बसतो, सोड जरा मुलांमधे बघू काय करतो, मुलगा असून असा कसा शांत असं करून जीव नकोसा करतात.

इतर वेळी म्हणजे आता दुकानात वगैरे हाय हेलो म्हणायला शिकवते. तेव्हा खुष अस्तो. बाय वगैरे म्हणतो. आता भारतात जाणार आहे एक महिन्यासाठी तेव्हा घरात सगळे असतील तर बहुतेक फरक पडेल. थोडं अजून बोलायला शिकेल असं वाटतं.

>> घरात भरपूर बडबडे एक व्यक्ती ठेवा
अनुशी सहमत.

शिवाय मित्र-मैत्रिणी (आवडीचे मावश्या काका आजी आजोबा लोक) आपले आपण निवडू द्या याच्याशीही सहमत.

आमच्याकडे थोडीफार उलट परिस्थिती आहे. मुलगा (२.५ वर्षे) इतर मुलांशी आनंदाने, स्वतः पुढाकार घेऊन खेळतो. पण मोठ्यांसमोर एकदम शिष्टपणा. फारसे लक्ष / प्रतिसाद देत नाही, अनोळखी मोठी माणसे असल्यास. मात्र बस, ट्रॅक्टर, डिगर असल्या वाहनांशी भरपूर संवाद साधतो. Wink

पण बाकीच्या लोकांना इतकं पडलेलं अस्तं >> Happy अभी तो शुरूवात है, डियर. मुलाला मुले होईपर्यंत हा प्रकार संपत नाही - आता सोशल नाही म्हणून नंतर फार सोशल झाला म्हणून Wink
अनेक वेळा ज्या लोकांना इतकं पडलेलं असते ते 'लोक' नसतात तर 'आपले'च आई-सासू-काकू-मामी इ. असतात :(. ते प्रॉब्लेमॅटीक होवून बसते. पटकन ना दुर्लक्ष करता येत, ना ठणकावून सांगता येत. खरेच 'लोक' म्हणजे भोचक शेजारी, उगीच कुठल्या भिशीतील बाया इ. असतील तर जाने दो!

सगळ्यांनी इतके छान अनुभव इथे दिले आहेत आणि तुझेही एफर्ट्स तू लिहीले आहेस. लवकर होईल सोशल, खूप शुभेच्छा त्याला!! Happy